Tuesday 18 August 2015

संगणकीय मेमरी - प्रायमरी स्टोअरेज मेमरी



      आपण जसे हात, पाय, नाक, कान, डोळे, त्वचा ह्या आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांमार्फत आपले कार्य करत असतो, त्याचप्रमाणे संगणक माऊस,कीबोर्ड, कॅमेरा, प्रिंटर, स्पीकर अश्या संगणकाच्या साधनांद्वारे माहितीची देवाण घेवाण करण्याचे कार्य करतो. आपण जसे मेंदू मध्ये गोष्टी साठवतो / लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे संगणकही त्याच्या गोष्टी लक्षात ठेवत असतो. संगणकालाही काम करण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. परंतु संगणकाचा मेंदूचा भाग हा मेमरीच्या स्वरुपात असतो. आपण शाळेत शिकलेल्या सर्व गोष्टींची नोंदी आपल्या वहीमध्ये करतो. आणि आपल्याला हवे तेव्हा त्याचे वाचन ही पुन्हा पुन्हा करतो. त्याच प्रमाणे संगणकाची मेमरी संगणकमध्ये माहिती साठवण्याचे कार्य करते. ह्या माहितीद्वारे संगणक त्याची कार्ये चोखपणे पार पाडत असतो.



आपण एक उदाहरण पाहूयात,
     आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात स्मरणशक्तीचे महत्व अनन्यसाधारण आहे. समजा तुम्हाला एक महत्वाचा फोन करायचा आहे. पण त्यावेळेला तुम्हाला तो नंबरच नीट आठवत नसेल. तर तुम्ही काय कराल? तो नंबर ज्या वहीत लिहून ठेवला आहे त्या वहीचा वापर कराल. असेच काहीसे आपल्या संगणकाच्या बाबतीत असते. संगणकाला कार्यरत राहण्यासाठी काही माहितीची सतत आवश्यकता असते, तर काही माहिती संगणकाला तात्पुरत्या स्वरुपात पुरवली जाते.

त्यामुळे संगणकाची मेमरी ही विशिष्ट कार्यपद्धतीसाठी दोन भागात विभागली गेली आहे.
१. प्रायमरी स्टोअरेज मेमरी २. सेकंडरी स्टोअरेज मेमरी
आता आपण जाणून घेऊयात प्रायमरी स्टोअरेज मेमरी.
प्रायमरी स्टोअरेज मेमरी - प्रायमरी स्टोअरेज मेमरीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात.
     १)रॉम(ROM ) 
     २)रैम(RAM )



१) रॉम (ROM ) - 
संगणकातील रॉम ही चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्ड वर कायमस्वरूपी बसविलेली असते. ह्यात प्रोग्राम्स व डेटा साठवलेला असतो. 
   

     या मेमरीमध्ये एकदा लिहिलेली माहिती फक्त वाचता येते, ती पुसता येत नाही. तसेच तिच्यात बदलही करता येत नाही. प्रत्येक संगणकाच्या मदरबोर्डवर BIOS नावाची ROM चीप असते. जिच्यामध्ये संगणक सुरु केल्यावर, तो कार्य करण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी BIOS मधील प्रोग्राम्स व कमांड्स 'रन'(सुरु) होतात. व संगणकातील आवश्यक बाबींची पूर्तता होते कि नाही याची छाननी होते.

     BIOS मधील प्रोग्राम आपण बदलू शकत नाही. कारण ते प्रोग्राम्स संगणक निर्मात्याने कायमस्वरूपी बनवलेले असते.  हो, जर आपल्याला स्वतःला प्रोग्राम तयार करून ही ROM ची चीप बनवायची असेल तर बाजारात तश्या ROM चिप्स उपलब्ध आहेत.

त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात - 

१) PROM (प्रोग्रामेबल रॉम) - यावर एकदाच प्रोग्राम लिहिला जाऊ शकतो. एकदा सेट केलेला प्रोग्राम आपण पुन्हा बदलू शकत नाही.


२) EPROM (इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम) - बनवलेला प्रोग्राम आपल्याला इरेज म्हणजे पुसता येतात. व त्यात पुन्हा नवीन प्रोग्राम भरता(स्टोर) करता येतात. ह्यावरील माहिती फक्त वाचता येते. एडिटिंगचा प्रकार ह्यात करताना आहे तो डेटा पूर्ण नष्ट करून मगच नवीन प्रोग्राम भरता येते.
ह्याचेही दोन प्रकार आहेत.

1) EEPROM (इलेक्ट्रीकली इरेजेबल PROM ) 
2) UVEPROM (अल्ट्रा व्हायोलेट PROM ).

* EEPROM मध्ये असलेल्या डेटा(माहिती) जादा विद्युतदाब दिला गेल्यास नष्ट होतो. ह्यांना फ़्लेश मेमरी असेही म्हणतात. ह्यांचा वापर करणे सोयीची आणि सोपे असते. ह्यांचा वापर सेल फोन्स, MP3 प्लेयर्स, डीजीटल कॅमेरे ह्या मध्ये केला जातो.

* UVEPROM मधील डेटा अतिनील प्रकाश टाकला असता नष्ट होतो.


२) रैम(RAM ) -
     रैम ही संगणकाच्या इनपुटद्वारा आलेली सर्व माहिती व सूचना साठवते. रैमची माहिती साठवण्याची क्रिया ही अति जलद असते. त्यामुळे माहितीचा वापरही जलदगतीने होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर एखादे कच्चे काम करण्यासाठी लागणाऱ्या कागदसारखी असते. म्हणजेच एकदा का संगणक बंद झाला कि रैम मधील सर्व माहिती नाहीशी होते. म्हणून ह्या मेमरीला टेम्पररी(तात्पुरती) किंवा व्होलाटाईल मेमरी असे म्हणतात. रैमची क्षमता ही मेगाबाईट मध्ये मोजली जाते. संगणकाचा वेग हा रैमच्या क्षमतेवर अवलंबून असतो. रैम कार्ड मदरबोर्डवरील स्लॉटमध्ये बसवतात. 

     रैमची क्षमता वाढवायची असल्यास मदरबोर्डवरील अतिरिक्त स्लॉटमध्ये रैम कार्ड वापरून रैमची क्षमता आपण वाढवू शकतो.
रैमचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत - 
१) डायनेमिक रैम(DRAM )
२) स्टेटीक रैम(SRAM )

) डायनेमिक रैम (DRAM ) - यामध्ये मेमरी सेल तयार करण्यासाठी कॅपासिटर व ट्रानझिसटर वापरला जातो. कॅपासिटर हा विद्युतभार साठवून ठेवणारा डिव्हाइस आहे. जेव्हा हा विद्युतभारीत (चार्ज) असतो, त्यावेळी सेलमध्ये साठवलेली बायनरी किंमत १ असते. परंतु हा कॅपासिटर सतत गळत असतो त्यामुळे त्याला सतत चार्ज करावे लागते. ह्या चार्ज करण्याच्या प्रक्रियेला रेफ्रेशिंग असे म्हणतात. सततच्या ह्या रेफ्रेश क्रियेमुळे त्याला अस्थिर किंवा डायनेमिक रैम असे म्हणतात.
DRAM चा उपयोग संगणक तसेच प्लेस्टेशनसारख्या गेमिंग मध्ये करतात.


२) स्टेटीक रैम (SRAM ) - स्टेटीक रैम ही जलद गतीने काम करते. तसेच तिला विद्युतपुरवठाही कमी प्रमाणात लागतो. एसरैम मध्ये साठवलेली माहिती विद्युतपुरवठा सुरु असेपर्यंत स्थिर राहते म्हणून तिला स्टेटीक रैम असे म्हणतात. 

SRAM डीजीटल कॅमेरा मोबाईल फोन्स ह्यासाठी वापरली जाते.
     आज आपण संगणकाच्या ह्या प्रायमरी स्टोअरेज मेमरीबद्दल बेसिक माहिती जाणून घेतली आहे.
     आपण बऱ्याचवेळा असे म्हणतो, संगणकावर लोड येतोय त्यामुळे संगणकाची मेमरी वाढवायला हवी.  तर हे संगणकाची मेमरी वाढवणं म्हणजे नेमकं काय?  ह्या विषयी जाणून घेऊयात पुढच्या सदरात.

                  मागील लेख                                                                                पुढे पहा

1 comment:

  1. फार छान आणि उपयुक्त माहिती आहे.मला माहिती चा चांगला उपयोग झाला. अगदी सुटसुटीत आणि सोप्या भाषेमधे समजायला उत्तम अशी आहे.धन्यवाद!!!!!

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.