Friday 21 October 2022

कविता #18 - स्वच्छंदी

     खरं तर लिहिण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे प्रत्येकाकडे खूप काही असते. आवडीचे पदार्थ खायचे आहेत, बनवायचे आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, मैत्रिणी-मित्रांना भेटायचे आहे, भटकंती करायची आहे, लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे, खूप काही छान छान गोष्टी करायच्या आहेत. सर्वात महत्वाचं स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. मात्र सगळं कळत असूनही हे आपलं मन मात्र अनेकानेक गोष्टीत अडकलेले राहिले आहे आणि त्यातून आऊटपुट काय? थोडं गंमतीत घ्यायचे झालं तर 'बाकी सब ठीक है| हो की नाही?

     आपल्या मनाला आपण खूप बांधून ठेवतो. एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की मात्र एक नाही दोन नाही अनेक दगड समोर येऊन उभे राहतात आणि सुरु होते मनाची लहर! तुम्हाला म्हणून सांगते अगदीच 'कहर' आहे हो हे!  
तेवढ्यात मन गुणगुणू लागते... दगड दगड दगड दगड इकडे दगड तिकडे दगड... दगड दगड दगड दगड. थांबा थांबा..... तुम्ही लगेच चाल म्हणायलाच सुरुवात केली...

     खरं तर मीच खूप दिवसांनी माझ्या ब्लॉगला भेटायला आले आणि तिथे पुन्हा 
भेट झाली माझ्यातल्या हरवलेल्या 'मी' ची. असा 'मी' जो पुन्हा स्वतःला काही सांगू पाहत आहे, काहीतरी सुचवायचे आहे, काहीतरी पुन्हा त्या दुनियादारीत स्वतःलाच नव्याने पाहायचे आहे. कामे तर प्रत्येकाचीच चालू असतात. वेळ नसतोच, तो आपल्याला काढावा लागतो, हे माहित असूनही चालण्यातला वेग थोडासा कमी झालेला असतो. थोडासाच म्हटले, कारण नुसती गाडी चालू करून उपयोग नाही, ऍक्सिलेटरवर जोर धरावाच लागतो. आपल्यातला छंद आपण नाही जपला तर ह्या आपल्या 'स्वच्छंदी' मनाला साद कशी घालणार?



नको राग नको द्वेष,

नको लोभ विनाकारण त्वेष,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको थट्टा नको मस्करी,

नको हांजी कुणाची फुशारकी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको लालच नको बंधने,

नको खोटे नाते आश्वासने,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


रम्य चित्र संगीताची साथ,

नभी इंद्रधुनचा रंग खास,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


शुभ्र आकाश ढगांची बात,

पक्षी स्वैरावत मनमुराद गात,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


वेळेचे गणित बांधूनी गाठोडी,

स्वप्नांचे पंख घेऊनी भरारी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


                                                      - अनुप्रिया सावंत