Monday 4 December 2017

सॉफ्टकॉपी व हार्डकॉपी



       डेस्कटॉम्हणजे काय आणि डेस्कटॉवरील विविध भाग ह्यांची बेसिक ओळख आपल्याला झालेली आहे.  आता फाईल आणि फोल्डर यांची माहिती घेऊयात.

     फाईल व फोल्डर हे नाव आपण घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी ह्यांच्या समवेत असताना बऱ्याच वेळा ऐकतो.  आणि स्वतःही वापरतो.  मात्र संगणकावरील फाईल-फोल्डर म्हणजे काय?  त्या आधी जाणून घेऊयात काही बाबी, त्या म्हणजे आज काल बऱ्याच वेळा आपण ऐकतो तो शब्द म्हणजे सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी.  काय असते हे सॉफ्टकॉपी आणि हार्डकॉपी?  

     आपल्या घरात आपण आपले कागदपत्रे ठेवण्यासाठी फाईल किंवा फोल्डर वापरतो.  ह्या फाईल्स आणि कागदपत्र्यांना आपण पाहू शकतो व त्याचबरोबर हातातही घेऊ शकतो.  ह्यालाच 'हार्डकॉपी' असे म्हणतात.  आपल्याला आपली कागदपत्रे स्वतः सांभाळावी लागतात.  कुठेही गरजेचे असल्यास ते प्रत्यक्ष घेऊन जाणे व पुन्हा सांभाळून आणणे महत्वाचे असते.  शिवाय एखादे कागदपत्रे विसरल्यास किंवा हरवल्यास पुन्हा मिळवणे कठीण जाते.

     आजच्या जगात सर्व काही ऑनलाईन आहे हे आपण पाहतो ऐकतो.  हे ऑनलाईन असणे तसेच आपले कागदपत्र इंटरनेटवर ठेवणे म्हणजे काय?  आपल्या कागदपत्रांची जी प्रत आपल्या हातात आहे त्याची अजून एक प्रत किंवा कॉपी संगणकावर ठेवणे.  

     ह्यात ते कागदपत्र किंवा ती माहिती माझ्या हातात नसते तर संगणकावर असते.  म्हणजेच काय तर आपल्या माहितीची प्रत/झेरॉक्स आपण पाहू शकतो, कुठेही घेऊन जाऊ शकतो.  पण प्रत्यक्षात आपल्या हातात नसते, त्यालाच संगणकीय भाषेत 'सॉफ्टकॉपी' असे म्हणतात.  

   ह्यात मोठाले वजन किंवा कॅरी बॅग आपल्या डॉक्युमेंटसाठी जवळ बाळगणे आवश्यक नसते तर पेन ड्राईव्ह सारख्या इलेक्ट्रॉनिक, वजनाला हलके, आणि दिसायला लहान स्टोरेज डिव्हाईसची ( स्टोरेज डिव्हाईस विषयी आपण आधीच ब्लॉगवर अभ्यासलेले आहे) गरज असते.  

     हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी दोन्ही सारखेच महत्वाचे आहेत.  संगणकावरील ह्या कॉपींची फाईल व फोल्डर ह्यांमध्ये कशाप्रकारे जतन केले जाते हे जाणून घेऊयात पुढच्या सदरात.

                                                                                   - अनुप्रिया सावंत.

          मागील लेख                                                                            पुढे पहा

Thursday 29 June 2017

गोल्डन अपॉरच्युनिटी - पुस्तक प्रकाशन सोहळा


     मनाच्या कप्प्यात मला सतत खुणावणारा एक प्रश्न तो म्हणजे पुस्तक प्रकाशित कसे होते बरं! लेखक कसे एवढे मोठाले लेख लिहितात. कसे त्याचे पुस्तकात रूपांतर होते? काय जादू असेल ही? दादरला पुस्तक प्रकाशन भरल्यावर नेहमीच कुतूहल जागृत व्हायचं. पुस्तकांच्या प्रदर्शनाला फेरफटका व्हायचा. मात्र हे प्रदर्शन ज्या लेखकांचे आहे ते लेखक आपली लेखणी कशी मांडत असतील? त्यांच्या शब्दांची बाग किती विविध पैलू असलेल्या अलंकारांनी नटलेली असते नाही का? ह्याचे चित्र मनाच्या चित्रपटलावर हळुवार तरळून जायचे अर्थातच माझ्या मनाच्या कल्पनांत. हे रूप प्रत्यक्ष कसे सादर होत असेल हे पाहण्याची ओढ मनाला अनेक वर्षांपासून होतीच. तो योग आला ते 'प्रत्यक्ष' च्या स्वरूपातून लोटस पब्लिकेशन्स पुस्तक प्रकाशन सोहळा अंतर्गत.

     होय. माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.. आय गॉट गोल्डन अपॉरच्युनिटी टू अटेंड - पुस्तक प्रकाशन सोहळा. लोटस पब्लिकेशन्स आयोजित इतका सुंदर सोहळा पाहण्यास मिळाला. पुस्तक हे वाचक आणि लेखक यांना जोडणारा रसिकप्रेक्षकांचा रेशीम धागा आहे. काय वाचावं, कस लिहावं ह्या खजिन्यासोबत संवाद साधण्याची लेखणी शैली कशी विणली जाते हे लेखिकांच्या अनुभवातून ऐकण्यास मिळाले. भाषा हे प्रभावी माध्यमाच्या कार्याची ओळख ह्यातून अनुभवली.


     'गर्द सभोवती' हे आशालता वाबगावकर ह्यांचे अनेक लेखांचा संग्रह असलेले तसेच उत्कृष्ट गोष्टींचा खजिन्याने भरभरून वाहणारे पुस्तक.  तर सामान्य माणसांना प्रचंड उत्सुकता असणाऱ्या तरीही अपुरी माहिती असलेल्या 'न्यायवैद्यक शास्त्र' विषयाशी संबंधित परिपूर्ण माहितीने सज्ज असलेला - 'गुन्हेगारांचे कर्दनकाळ' - लेखिका डॉ. वसुधा आपटे. ह्या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सोहळा अतिशय प्रफुल्लित वातावरणात पाहण्यास मिळाले. सचिन खेडेकर यांनी सादर केलेले कविता वाचन अप्रतिम होते. काव्य वाचन करताना ते कशा प्रकारे वाचले गेले पाहिजे ह्याचे सुंदर उदाहरण.

     ह्या सोहळ्याची सुरुवात 'श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम' ने झाली.  जिथे प्रत्यक्ष जगदंबाचे स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात होते तो सोहळा पवित्र स्पंदन निर्माण करणारच.  अशा या मंगलमय स्पंदनात हा सोहळा अनुभवता येणे ही सुंदर गोष्ट मनाला निरंतर सुख देणारी आहे.



     आशाताई ह्यांचे 'गर्द सभोवती' ह्या पुस्तकाचे मुखपृष्ट पाहताक्षणीच मनाला भुरळ पडते.  निसर्गाच्या कुशीत मनाने अनुभवलेले सुंदर क्षण, भावना, त्यातील कथा मनाला खिळवून तर ठेवतेच त्याचसोबत त्यातून हृदयात आल्हाददायक सकारात्मकता निर्माण करते.  आपणही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी नकळत दुर्लक्षित करतो मात्र लेखिकेने इथे  त्या अलगद आणि हळुवार मनाच्या कुशीतून कागदावर उतरवत रसिकवाचकाला आनंद मिळवून देणारे साधन पुस्तकरुपी दिले आहे.  बिगर राजकीय दैनिक 'प्रत्यक्ष' ह्या सर्वोत्तम वर्तमानपत्रात देखील त्यांचे येणारे लेख वाचकाला खिळवून ठेवणारे व मनमुराद आनंदातून नवीन दृष्टीचे पैलू विकसित करणारे आहेत.  हेच जेव्हा एकत्रित संग्रहित होऊन व त्यात आणखीन नवीन गोष्टींचा संग्रह घेऊन पुस्तक रूपाने समोर येते तेव्हा रसिकवाचकला त्याहून सुंदर भेट कोणती असू शकेल? नाही का!  ह्या पुस्तकातील प्रस्तावना आपले सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे सर ह्यांनी केलेली आहे.  प्रेम-आदराने सुबोध भावे सर आशताईंना 'माँ' म्हणतात.
                 

     सी.आय.डी, क्राईम पेट्रोल असे गुन्हे-गुन्हेगारांविषयीचे कार्यक्रम अनेक घराघरांत पाहिले जातात.  सामान्य माणसालाही ह्या विषयी जाणून घेण्यास उत्सुकता असते मात्र नेमकी माहिती त्याच्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोहचते. किंबहुना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रमाणतही असते.  न्यायवैद्यकशास्त्र म्हणजे असे शास्त्र ज्यात गुन्हा गुन्हेगार व कारण ह्याचा घेतला जाणारा शोध, माहिती यांचा समावेश असतो.  ह्यात अनेक गोष्टींबाबतचे आव्हान तर असतेच.  न्यायवैद्यकशास्त्राचे शिक्षण घेऊन त्यात ३५ वर्षे अविरतपणे आपले कार्य वसुधाताई यांनी केले.  आलेल्या आव्हानांचे स्वरूप व त्यातून उलगडणारे रहस्य ह्यांचा वेध कसा घेतला जातो ह्याचे विश्लेषनात्मक मांडणी करणारे डॉ. वसुधाताई आपटे ह्यांचे पुस्तक - 'गुन्हेगारांचे कर्दनकाळ' होय.  ह्या पुस्तकाची प्रस्तावना शूर धाटणीचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण सर दीक्षित ह्यांनी केले आहे.
                   
     दोन्ही लेखिका व्यक्त होताना प्रथम 'प्रत्यक्ष' चे संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांचे मिळालेले पाठबळ व विश्वास ह्यामुळे त्यांना लाभलेली स्थिरता, मनोबल, आत्मविश्वास ह्यांचे आवर्जून व आदराने उल्लेख करतात.  श्रद्धा, सबुरी व विश्वास ह्यांचे नाते अलगद उलगडताना तेवढ्याच ठामपणे जेव्हा घट्ट होत जाते तेव्हा स्वतःतला 'मी' पणा विरताना दिसणारी व्यक्ती रंगमंचावर आत्मविश्वासाने उभी राहते.  केवळ त्याचमुळे परमेश्वरी कृपा व भक्ती ह्यांचे अधिक दृढ नाते वाढीस लागते.  ही ह्या सोहळ्यांतर्गत अनुभवलेली गोष्ट मनाला सुखद अनुभव व कधीही न संपणारी शिदोरी देऊन गेली.


     हा सोहळा माझ्यासाठी विशेष होता. लेखक लेखणी ह्यांची सांगड पान व पेन ह्यांच्याशी घालून सतत बहरत राहणारी वेल पाहण्याची संधी मला एवढ्या जवळून दिल्याबद्दल लोटस पब्लिकेशन्सचे खूप आभार.

ऑनलाइन बुक लिंक -


"गर्द सभोवती" 
Garda Sabhowati - गर्द सभोवती (Marathi Print Copy)
"गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र" 
Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi Print Copy)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMDL

Gunhegaranche Kardankaal - गुन्हेगारांचे कर्दनकाळ (Marathi E-Book)
https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=GKDMAR

                   
                                                                                                              - अनुप्रिया आदित्य सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

Monday 2 January 2017

कविता #13 - नवीन वर्षाच्या शुभेच्छा! - Welcome 2017

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


वर्ष आले तसे गेलेही
असे म्हणत अनेक वर्ष सरलेही

धम्माल मस्ती कट्टा
ह्यातच वर्षाचा सरकता पट्टा

नवीन वर्षाचे स्वागत
जुन्या आठवणींचा पत्ता

मिळवल्यापेक्षा हरवलेल्या क्षणांची
गणितीय आकडेवारी आलेखरूपाची

स्वागत करायचे ह्याही वर्षाचे
मात्र गवसलेल्या खजिनारूपाचे

वजाबाकी दुःखाची बेरीज सुखाची 
प्रत्येक क्षणाला अधिक लुटावयाची

स्वतःच्या अंतर्मनाच्या कुशीत
साजरा करूया होऊनि प्रफुल्लित

परमेश्वराच्या स्मरणाने 
आनंदाची शाल पांघरुया

नववर्षाच्या स्वागता 
प्राजक्ताची फुले उधळूया

जीवनाचा आनंद सुगंधरुपी 
फुलासारखे घेऊयात

फुलपाखरासारखे सुंदर क्षण 
जीवनभर जपूयात


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

                                    - अनुप्रिया सावंत