Friday 6 April 2018

स्पर्श

    
Image Source: Google
    काय म्हणायचं ह्या माणसांना... घृणा वाटते एकदम... निर्लज्ज, बेशरम ह्या लेव्हलच्या पदवी कमीच पडतील ह्यांना.  भलीमोठी डिग्री घेऊन मिरवतात आणि लक्षण सगळे खोटे.  अगं काय झालं कृतिका?  चिडचिड असहाय्य झालेली कृतिका संध्याच्या बोलण्याने भानावर आली.  मनात असंख्य प्रश्न, राग, द्वेषाच्या पाऱ्यात उन्हाच्या लाह्या तरी जीवाला कमी बोचतील.   बॉस आल्याने दोघीही गप्प बसल्या आणि आपापल्या कामाला लागल्या. 

      कृतिका एक धडाडीचे व्यक्तिमत्व.  दिसायला सुंदर स्वभावाला थोडी तापट पण तितकीच हळवी.  ऑफिस ते घर बसने प्रवास करणारी.  संध्या, कृतिका, गौरी आणि माधुरी चौघी शाळेपासूनच्या बालमैत्रिणी.  संध्या आणि कृतिका एकाच ऑफिसमध्ये मात्र डिपार्टमेंट वेगवेगळे, त्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या.  गौरी आणि स्वाती दोघी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये मात्र दर रविवारी ह्या चौघी घरापासून जवळच ठरलेल्या ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्कला न चूकता भेटतात.

     कृतिकाच्या कामात मुद्दामहून काही न काही चुका काढून सतत तिला केबिन मध्ये बोलावणारा आणि लॅपटॉपवर मुद्दामहून काही ना काही काम देताना हाताला, अंगाला स्पर्श करणारा तिचा विकृत बॉसची तिला मनस्वी चीड यायची.  वाटायचं ह्याचं एकदाच बिंग फोडूनच टाकावं.  पण विश्वास ठेवणार कोण आपल्यावर?  संध्याला कृत्तिकाबद्दल बॉसचे मुद्दामहून चाललेल्या गोष्टी कळत होत्या मात्र तीही इतरांना हे सांगू शकत नव्हती.  ह्यावर जॉब चेंजिग हा खरंच पर्याय आहे का?  आपल्या ठरलेल्या ठिकाणी दोघी ऑफिसमधून सुटल्यावर बोलत होत्या.  आपल्या मैत्रिणींना ह्याविषयी बोलून काय तो तोडगा काढलाच पाहिजे... ह्यावर दोघींचं एकमत झाले.  घरी सांगितलं तर घरचे कसे.. काय आणि कोणत्या प्रतिक्रिया देतील म्हणून दोघींनी घरी सांगणे टाळले.

     गौरी कराटे चॅम्पियन म्हणून फेमस.  रस्त्याने धक्के देणारे, जाणून बुजून चालताना स्पर्श करणारे, विचित्र नजरा ह्यांचा सोक्षमोक्ष आपण कधीतरी लावू ह्या धाडसी व बिनधास्त विचारांची असणारी.  नुसती विचारच नाही तर कृती करणारी.  असेच एके दिवशी ऑफिसहुन घरी जाताना एका व्यक्तीने जाणून बुजून तिला धक्का दिला.  तो थोडा पुढे जातो ना जातो तेवढ्यातच.... आबे रुक साले... तेरी तो... रुक... क्षणातच सगळे तिच्याकडे पाहायला लागले... ज्याने धक्का दिला त्याची पुरती गाळण उडाली होती.. त्याच क्षणी जराही विलंब न लावता त्याची कॉलर पकडून तिने त्याच्या मुस्कटात लगावली.  तिच्या अंगात जणू वाघिणीचे बळ आल्यासारखे भासले.  तिथेच काही अंतरावर पोलिसांची गाडी उभी होती.  लोकांनीही ह्या रणरागिणीला सलाम करून त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.  एवढेच नाही तर पोलिसांनीही तिचे विशेष कौतुक केले.  एवढी सतर्कता लोकांनीही दाखवली त्यामुळे तिच्या नारीशक्तीला आणि त्या लोकांच्या सहकार्याला मुजरा.  अश्या गौरया घराघरात जन्माला याव्यात.  झालेला सर्व प्रकार गौरीने आपल्या घरी आल्यावर घरच्यांना सांगितला व तशीच ती आपल्या मैत्रिणींना ठरलेल्या ठिकाणी भेटण्यास निघाली.
    
   कृतिकाच्या पडलेला चेहरा गौरीला काहीतरी बिनसल्याची जाणीव करून देत होता.  विचारल्यावर आहे तो प्रकार संध्याने तिच्या कानावर घातला.  त्यावर शांत बसेल ती गौरी कसली?  थोड्याच वेळापूर्वी घडलेली गोष्ट तिने दोघींशी शेअर केला.  काही वेळ सर्वच शांत बसलेले पाहून गौरीने विषयाला सुरुवात केली.  आपण खरं तर खूप शांत बसतो संध्या... हे सगळे प्रकार वेळीच रोखता येतातही आणि काही वेळेस आपल्या गप्प बसण्याच्या सवयीमुळे टोकालाही जातात.  माझा भाचा विराज... तिसरीला आहे... बहिणीचा एकुलता एक मुलगा असूनही तितकाच शिस्तप्रिय आणि हुशार आहे.  माझ्या बहिणाचा दीर अधून मधून त्यांचा घरी येत असतो.  तो जेव्हा केव्हा येतो तेव्हा विराज खूप अस्वस्थ होतो.  खूप बिथरला सारखा करतो... कारण काय तर दोघांनाही कळेना!

     विराज आजीकडे आला तेव्हा त्याला ह्या गोष्टीबद्दल विचारले असता त्याने ज्या काही गोष्टी तुटक मुटक सांगण्याच्या प्रयत्न केला त्यावरून वारंवार घडलेल्या ह्या प्रकाराबद्दलची भीषण कल्पना आली.  सतत त्या काकाचे विराजला घेऊन मांडीवर बसणे.. गालगुच्छा घेणे... पायात दाबणे... ह्याप्रकारने विराज खूप संकोचून जायचा मात्र त्याला ते शब्दात मांडता येत नव्हते... नाही घरच्यांना सांगता... त्याच्यावरील लैंगिक शोषणामुळे त्याची मानसिकता ढासळत चालली होती.  ताईला ह्याबद्दल कल्पना दिली असता तिला धक्काच बसला... मात्र ती भाऊजींना सांगायला तयार होईना... नाती बिघडण्याची भीती.... ह्यावर तिने पर्याय शोधला... विराजला त्याचे काका आल्यावर एकटे त्यांच्याबरोबर सोडायचे नाही.  मला सांगा हा खरच पर्याय असू शकतो की अजून काही उपाय शोधता येईल?  गौरीच्या बोलण्याने संध्या तिच्या भूतकाळात गेली.

     आपली संध्या खुपचं साधी.  मात्र लहानपणीच्या काही गोष्टींमुळे तिलाही पुरुषांच्या विकृत स्वभावाचा प्रचंड राग यायचा.  आई नोकरीनिमित्त नऊ तास बाहेर तर वडील ऑफिसला सकाळी जायचे ते रात्री घरी यायचे.  मुलांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून तिच्या आईने प्रायव्हेट होम ट्युशन तिच्यासाठी चालू केले.  संध्याला मात्र सर्वांसोबत अभ्यास करायला आवडायचे.  आईच्या पुढे तिला काही बोलता यायचे नाही, त्यामुळे तिचे ट्युशन घरीच चालायचे.  संध्याला तिचे सर शिकवताना अतिशय प्रेमाने शिकवत.  मात्र ज्यावेळी तिची आई घरातील कामात व्यस्त असे त्यावेळी सरांचं प्रेमाने शिकवण तिला नकोसं व्हायचं.  त्याला कारण जाणून बुजून केलेला स्पर्श.  कधी हातावर हाथ ठेवून तर कधी जवळ बसवून.   सातवीत असणारी संध्या सरांचं विचित्र वागणं आईला नीट स्पष्टही करू शकली नाही, फक्त आई मला नको असा क्लास... मला ते सर नाही आवडत... आई मात्र आपल्या बाळाला समजावत होती... बाळा छान आहेत सर... मी ओळखते त्यांना.. नीट अभ्यास घेतील तुझा... ह्यावर संध्या फक्त स्वतःवर चिडचिड करत राहिली.  भूतकाळातील आठवणीने संध्या कासावीस झाली.  खरंच ह्या गोष्टी दाबून का ठेवल्या जातात?  ह्यांचा पर्दाफाश करणे महत्वाचे की गपगुमानं चालत राहून ते विसरणे हे फायद्याचे?  कोमल मनावरील आघाताचा विचार कोण करणार?  खरच ते विसरता येतं का?  हा स्पर्श... समज....गैरसमज... ह्याविषयी का कुणी सांगत नाही?  घरातले मनमोकळेपणाने का बोलत नाही ह्याविषयी?  शाळेत सांगितले जाते तो पर्यंत आपल्याला बरीच समजही आलेली असते.  पण घडून गेलेल्या गोष्टी मात्र झाकून जातात... मुक्कामार लागल्यासारखं...  संध्याच्या ह्या अचानक बोलण्याने तिच्यावर बालमनात झालेला आघाताने पहिल्यांदाच तिच्या मनातील मूक जखमेला मोकळी वाट करून दिली होती.  मगाशीच येऊन पोचलेल्या स्वातीला नकळत हुंदका आला... तिची अवस्था पाहून तिघींनी तिला पाणी प्यायला देऊन शांत केले.

    स्वाती... लग्नाला 2 वर्ष झालेली... गोंडस मुलगा पदरी... नवरा उच्चशिक्षित, सुसंस्कारी, अतिशय प्रेमळ तितकाच भावुक.  स्वाती क्लेरिकल म्हणून सरकारी कार्यालयात कामाला आहे... घर नोकरी संसार अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळते.  कुटुंब आणि नोकरी तितक्याच लीलया पेलते.  घरापासून बाजार थोडा दूर... भाजीपाला फळभाज्या काही हवे असेल तर विकणारे सोसायटीत येतात.  दररोज सोसायटीत केळीवाला भैय्या घरोघरी केळीसाठी फिरतो.  स्वातीही इतरांप्रमाणे त्याच्याकडूनच केळी विकत घेते... दर वेळी केळी घेताना तो भैय्या हाताला हात लावायचा... घाईत पैसे देताना असेल म्हणून स्वातीनेही दुर्लक्ष केले... पुन्हा एकदा त्याला लांबून पैसे देताना पुन्हा त्याने हाताला हाथ लागेल अश्या रीतीने वर्तन केले... असे करताना त्याच्या चेहऱ्यावर भाव मात्र शून्य... जणू काही झालेच नाही... तो खूप घाईत आहे असा अविर्भावात... पुढच्या वेळेस मात्र मी ह्यांना म्हणाली... जरा तुम्ही घ्या हो त्याच्याकडून मी कामात आहे... कसाबसा वेळ मारून तो विषय तिथेच थांबवला.. मात्र दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केळीवाला आल्यावर पुन्हा नवऱ्याला बोलली अहो तुम्हीच घ्या... तो केळीचे पैसे घेताना हाताला हाथ लावतो... ह्यावर मात्र ह्यांनी लगेचच प्रतिक्रिया देताना म्हंटल की तू देताना नीट पैसे देत नसशील त्याला... आणि ह्यापुढे आपल्याला केळी नको असे म्हणून त्यांनी विषयच बंद केला.  नवऱ्याच्या प्रतिक्रियेवर राग व्यक्त करावा की भोळेपणा समजून कीवL करावी हेच कळेना... घडलेला प्रकार मैत्रिणींशी शेअर करताना चौघीही कमालीच्या दुखावल्या गेल्या.

     कृतिका, संध्या, गौरी आणि स्वाती ह्यांच्यासारख्या समाजात कित्येक मुली आहेत.  बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी छोट्या मोठया कारणास्तव सोडून देतो.  काही वेळा त्यावर पडदा टाकतो तर काही वेळा स्वतःलाच दोष देतो.  कृतिकाने बदनामी नको म्हणून सहनशीलता वाढवली तर संध्या सारख्या सोज्वळ मुलीला तिच्या आईच्या बाहेरील व्यक्तीवर असलेल्या विश्वासामुळे पोखरून काढले गेले.  स्वातीसारख्या स्रियांना आजही असे अनेक अनुभव येताहेत त्याविषयी त्या कोणाला सांगूंही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही.  आजही समाज स्त्रीला दोषी ठरवतो.  स्वातीचा नवरा जितक्या सहजतेने तिला बोलला की तू पैसे देताना नीट पैसे देत नसशील ह्यावरून पायाची आग मस्तकात भिनतेय असंच काहीसं स्वातीला झालं असेल.  ह्यात त्या स्त्रीवरील अविश्वास समजायचं की अस्सल भोळा भाबडा स्वभाव समजायचं?

     आपण ज्या समाजात वावरतोय तिथे आपण सतर्क राहिले पाहिजे.  कृतिकासारख्या असंख्य स्त्रीया आहेत... त्यात काहीजणी शांत बसून सहन करणाऱ्या तर काही त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या.  संध्यासारख्या प्रत्येक मुलींना लहानपणीच काही गोष्टी शिकवण्याची व समजवण्याची गरज असते... त्यासाठी हक्काने मायेने जवळ घेणारे आणि तेवढ्याच अल्लड बुद्धीला समजून घेणाऱ्या व्यक्तिमत्वाची... मग त्या भूमिकेत आईच असेल असे नाही... आणि प्रत्येक वेळी समजून घेणारे आणि समजवणारे शिक्षकच असतील असेही नाही.  आपल्या बाळाला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श समजावणे ही काळाची गरज आहे.  गौरीसारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यावीच मात्र त्याचबरोबर आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे प्रत्येक कुटुंबाने द्यायला हवे.  स्वातीसारख्या स्त्रियांनी स्व-अस्तित्वाची जाणीव ठेवून अश्या विकृतींना तिथल्या तिथेच आळा घालून देण्याच्या विचारांना जागवणे ही गरज आहे.  ह्या भूमिकेत नवऱ्यानेही तितक्याच जबाबदारीने आपल्या बायकोच्या भावना समजून तिला अशा प्रसंगांना सामोरे जाण्यास तयार करायला हवं... मानसिक बळ द्यायला हवं.

     समाज बदलतोय... विचार बदलताहेत... स्त्रिया खऱ्या अर्थाने घडताहेत... हे फक्त विधानाकरता की खरंच?  खरं सांगायचं तर हा स्पर्श जितका प्रेमळ असतो तितकाच विकृतही असतो... त्याला कारण माणसांच्या वृत्ती.  जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... आळा घालताना व्यक्ती कधी विळख्यात सापडली जाते कळत नाही...  त्यामुळे स्ट्रिकनेस पेक्षा स्मार्ट अलर्टनेस हा हवाच... आणि हो... स्पर्श.... ह्या घडणाऱ्या गोष्टी फक्त स्त्रियांच्याच बाबतीत घडत आहे ह्या भ्रमातून आपल्याला बाहेर येणे तितकेच गरजेचे आहे... काळ बदलतोय... मुलगा असो की मुलगी... लहान असो की मोठे... शक्य तितक्या लवकर... दे मस्ट हॅव टू नो अबाऊट गुड टच अँड बॅड टच... Raise Your Voice..

                                    - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    

Tuesday 3 April 2018

फोल्डर

     फाईल्स म्हणजे काय हे आपण पाहिले.  विविध एप्लिकेशन्स मध्ये तयार केलेल्या आपल्या माहितीचा साठा फाईल्समध्ये असतो.  प्रत्येक फाईल ही दुसऱ्या फाईल पेक्षा वेगळी असते.  ह्या सर्व फाईल्स ज्या विभागात एकत्र ठेवले जातात, त्याला 'फोल्डर' असे म्हणतात.  फोल्डर हे आपल्या संगणकावरील ड्राईव्ह प्रमाणे असते. (संगणकावर आपण C: D: हे ड्राइव्हज् पाहतो.)  म्हणजेच एकाच नावाचे दोन फोल्डर आपण तयार करू शकत नाही त्याचप्रमाणे एकाच फोल्डर मध्ये आपण एकाच नावाच्या दोन फाईल्स तयार करू शकत नाही.

     थोडक्यात, फोल्डर्स म्हणजे हार्ड डिस्कवर माहिती साठवण्याचे छोटे छोटे कप्पेच असतात.  एका फोल्डरमध्ये एकाच विषयाशी संबंधित अनेक फाईल्स आपण साठवू शकतो.  तसेच एका फोल्डरच्या आत आपण आणखी एक फोल्डरही तयार करू शकतो. फोल्डरच्या आतील फोल्डरला सब फोल्डर असे म्हणतात.  फोल्डर आणि सब फोल्डरचा डिफॉल्ट आयकॉन पिवळ्या रंगाचा असतो.

फोल्डर कसा तयार करावा:
     तुम्ही फोल्डर माय कॉम्पुटर तसेच विंडोज एक्सप्लोररच्या साहाय्याने तयार करू शकता.

माय कॉम्प्युटरचा वापर करून फोल्डर तयार करणे-

१) माय कॉम्पुटर ह्या आयकॉनवर डबल क्लीक करणे.
Photo Source: Google

2) आपल्याला जिथे आपला फोल्डर बनवायचा आहे त्या भागातील ड्राईव्ह किंवा फोल्डर सिलेक्ट करणे.  सिलेक्ट केल्यामुळे आपण त्या ड्राईव्ह / फोल्डरच्या आतील भागात येतो.

3) ज्या ड्राईव्ह किंवा फोल्डर मध्ये आपल्याला नवीन फोल्डर बनवायचा आहे तेथील कोणत्याही सफेद भागावर राईट क्लीक करा.  ओपन झाल्यावर न्यू फोल्डर लिहिलेले आपल्याला  दिसेल, त्यावर सिलेक्ट करा.

4) आपल्याला पिवळ्या रंगाचे एक बॉक्स दिसेल.  त्या फोल्डर बॉक्स ला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नाव देऊन त्यावर एंटर करा.
Photo Source: Google
     तुमचा फोल्डर तुम्ही दिलेल्या नावानुसार तयार झालेला तुम्हाला त्या स्क्रीनवर पाहता येईल.

     आपण बनवलेले फोल्डर आपण शेअरही (शेअर म्हणजे आपली फाईल आपल्यासोबतच ठेवून दुसऱ्यालाही ती पाठवू शकतो) करू शकतो.  त्यासाठी संगणकावर विविध पर्याय असतात.  सोपं उदाहरण 'ब्लुटूथ'.  आपण मोबाइलवर एखादी इमेज शेअर करताना म्हणजेच दुसऱ्याला पाठवताना ब्लुटूथचा वापर करतो.  इतरही अनेक पर्याय ह्यासाठी आहेतच.  (आपण सध्या संगणकासंदर्भातील फाईल शेअरिंग पाहत आहोत त्यासाठी ब्लुटूथ हे एक उदहरणासाठी दिलेले आहे.)


फोल्डर कसे शेअर केले जाते:
  • फोल्डर शेअर करण्यासाठी शेअर करायच्या फोल्डरवर माऊस पॉइंटरच्या साहाय्याने राईट क्लीक करा.  
  • तिथे आपल्याला 'शेअर विथ' / 'share with' हा ऑप्शन दिसेल.  त्यावर क्लिक करणे.
Photo Source: Google
  • ज्या व्यक्तीसोबत किंवा लोकांसोबत आपल्याला आपली फाईल शेअर करायची आहे त्यांना सिलेक्ट करा.(संगणकाला कनेक्टेड असलेल्या युझर्सचे/ वापरकर्त्यांचे नावे दिसतात.) 
  • सिलेक्ट झाल्यावर 'Add' वर क्लिक करा.  
  • तुमची फाईल 'Add' केलेल्यांसोबत शेअर्ड होईल.

फोल्डर शेअरिंग बंद करायचे असल्यास:
  • जे फोल्डर तुम्हाला शेअर करावयाचे नाही त्यावर तुम्ही राईट क्लिक करून प्रथम 'शेअर विथ' ह्या ऑप्शन वर क्लिक करा.  
  • त्यानंतर 'नो बडी' ह्यावर माऊस पॉइंटर नेऊन तो ऑप्शन क्लिक करा. 
  • तुमची फाईल अनशेअर्ड होईल.
Photo Source: Google

     आपण माय कॉम्पुटर द्वारे फोल्डर बनवणे तसेच फोल्डर शेअर्ड व अनशेअर्ड करणे पाहिले.  आता पुढे आपण विंडोज एक्सप्लोरर द्वारे फोल्डर कसा बनवतात हे पाहू.  तत्पूर्वी विंडोज एक्सप्लोरर काय आहे? आणि त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो? हे आपण पाहणार आहोतच, तो पर्यंत इथेच थांबुयात.
                                                                                            - अनुप्रिया सावंत.

        मागील लेख                                                                            पुढे पहा

Monday 2 April 2018

क्रशवाली स्टोरी - He Is My Crush


     प्रत्येकाला एक अशी व्यक्ती आवडते जी त्याची क्रश असते.  पण क्रश असणारी व्यक्ती हे आपले प्रेमंच असते असं नाही.  आपल्या प्रेमाला आपल्या क्रशबद्दल सांगतानाचा विश्वास आणि योगायोग ह्या गोष्टीबद्दल ही कथा आहे.

     अनघा... सातवीत असतांनाच प्रेमात पडली.  खरं तर प्रेम करण्याचं हे वय नाहीच म्हणा पण प्रेम म्हणजे काय तेही माहीत नसताना त्याच्या नावावरही खुश होणारी.  कधी पाणीपुरी तर कधी वडापाव खाण्याच्या बहाण्याने जाता येता तिला त्याच्या घराचा दरवाजा दिसायचा.  कधी तो उभा दिसायचा तर कधी मानलेल्या सासू बाई.  ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी बाई अभ्यासात पण त्यालाच शोधायच्या.  बाजारात भाजी आणयलाही आवडीने जाणाऱ्या आपल्या लेकीचं आईला कौतुक भारी, तर हिला मात्र त्याच्या नुसत्या दिसण्याचं.  पोरगा नुसता दिसायलाच नाही तर बुद्धीनेही हुशार.  पूर्ण कुटुंब एकमेकांच्या ओळखीतलेच.  त्यामुळे त्याच्या बद्दलची जमेल तितकी माहिती अनघा मिळवायची.  अर्थात हे करत असताना कोणालाही शंका येणार नाही हे पाहूनच.  दोघेही एकाच वयाचे मात्र शाळा आणि माध्यम दोन्हीही दोन टोकाचे.
    
     ह्या प्रेमात तर्फी न्हवती... होती ती बर्फी... निखळ प्रेमाची. असो. असे हे प्रेम सातवीपासून तब्बल पंधरावी म्हणजे ग्रॅज्युएशन होईस्तोवर कोणाला कळू दिले नाही. तब्बल 9 वर्ष तिने त्याला पाहण्यातच घालवले. खरं तर हेच का प्रेम हेही तिला जाणून घ्यायचे नव्हते, तिला फक्त त्याला पहायचे होते. वर्ष सरत होते, दिवस पळत होते. दोघेही शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले होते. हिने एकदाही त्याच्या मनात कोणी आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
     
     अचानक एके दिवशी अनघाला कळते की त्याची अगोदरपासून गर्लफ्रेंड आहे. नाराजीतेने अनेक प्रश्न स्वतःला करते... आपण त्याला आधीच सांगितलं असतं तर.. आपण उशीर केला... वैगरे वैगरे... क्षणातच स्वतःला सावरत ती विचारते... 9 वर्ष फक्त त्याला पाहण्यात घालवली... ह्यात खरंच तुला प्रेम होतं की अजून काही?.. नो नो नो... इट्स नॉट लव्ह... अँड इट्स अलसो नॉट ऍटरॅक्शन... आणि नक्कीच हे चुकीचंही नाही... इट्स सॅमथिंग क्रेझिनेस... येस... आय हॅव क्लिअर वेरी स्पेशल थिंग... ओ येस... ही इज माय क्रश... फॉरेव्हर क्रश?.... हा हा हा... येस... अनघा एक क्लीन क्लिअर व्यक्तीमत्व आणि तितकीच डॅशिंग.  पिक्चर अभी बाकी है... करत अनघा सगळे विचार झटकून नॉर्मल झाली.
     
     अनघाला ह्या गोष्टीतून बाहेर यायला फारसा वेळ लागला नाही... मुळात तिला तिच्या भावना स्पष्ट होत्या.  आणि तिला स्वतःच्या भावनांची कदर आणि आदर दोन्हीही भरभरून होत्या.  भटकंती सोबत फोटोग्राफी करणं हा तिचा सर्वात आवडत छंद. ह्यातच तिचा नवीन ग्रुप जोडला गेला.  सर्वांशी बिनधास्त बोलणारी आणि सर्वांमध्ये लगेच मिसळणारी अनघा अनिशला बघता क्षणीच आवडली होती.  अनेक ट्रेकिंगच्या वेळेस एकत्र मौजमजेत दोघेही एकमेकांना चांगले ओळखायला लागले होते.  आवड ह्या प्राथमिक स्थराने आता द्वितीय स्थराचा टप्पा गाठला होता.  फोन वरच्या गप्पा, चॅटिंग एव्हाना सुरू होऊन गाडी रुळावर आली होती.  बस 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा सीन प्रतीक्षेत होता.
     
   क्लीन क्लिअर स्पष्ट अनघा आणि प्रेमळ समझदार, तितकाच सहज स्वभावाचा अनिश.  दोघांची जोडी तितकीच छान आणि तितकीच हलकी फुलकी. बोलताना मनातलं सर्व शेअर करणाऱ्या अनघाने अनिशला तिच्या क्रश विषयीची गोष्ट, तिच्या भावना सर्व काही त्याच्याशी शेअर केलं.  अनिशनेही तितक्याच हळुवारपणे तिच्या भावनांचा आदर केला.  मात्र दोघांनी अधिक काही न बोलता विषय तिथेच थांबवला.  अनघाला आपण अनिशशी जे काही बोललो त्याचा अनिश राग तर करणार नाही ना? ह्या विचाराने थोडी काळजी वाटली.
    
    दुसऱ्या दिवशी अनिशने तिला फोन केला आणि आपण त्याला भेटलो असल्याचे सांगितले.  अनघाला तिच्या कानावर विश्वास तर बसेना, मात्र नक्की काय झाले हेही तिला कळेना.  कारण तिचं अनिशवर खरं प्रेम होतं आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती.  अनघाच्या मनावरचं दडपण अनिशलाही जाणवायला लागले.  तो काही बोलणार तितक्याच अनघा अनिशची माफी मागून त्याला पुन्हा पुन्हा आपल्या प्रेमाची कबुली देऊ लागली... अनिश कसलाही चुकीचा विचार करू नकोस, मला फक्त तो आवडायचा आणि त्यापलीकडे कोणतंच नात कधीच नव्हतं. अनघाला कोणत्याही क्षणी रडू येईल हे जाणून अनिशने तिला शांत राहण्यास सांगितले.
     
     योगायोग कसा असू शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण.  दोघेही संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटले. अनघा मी भेटलो त्याला... अनिशच्या ह्या बोलण्याने राग, काळजी, उत्सुकता ह्या सगळ्याच भावना अनघाच्या नजरेत दाटून आल्या होत्या.  आपण फक्त बोललो आणि ह्याने सरळ त्याला शोधून त्याची भेट घेणं हे अनघाला विचारात पाडणारे होते.  हा आपली मस्करी तर करत नाहीये ना? अनिशच्या स्वभावाचे पैलू बघण्यात हरवलेल्या अनघाला अनिशने मोठ्याने हसून भानावर आणले.  तिला प्रेमाने मिठी मारत तिचा हात हातात घेतला... आय लव्ह यु अनघा.  अनिशच्या बोलण्याने अनघा अजूनच गोंधळात पडली.

     तू काल बोलताना त्याच्याविषयी आणि झालेल्या गोष्टीविषयी माझ्याशी सर्वच सविस्तर शेअर केलेस.  अनघा... मीही या गोष्टी वर जास्त काही विचार केलाच नाही. आज ऑफिस मध्ये सकाळी अचानक तो समोर आला आणि तुझ बोलणं आठवलं. खरं तर तू सांगत होतीस तेव्हाच मला हा आठवला.  कारण तू त्याचे केलेले वर्णन.. त्याची गर्लफ्रेंड त्यांचे प्रेम. त्याच्या सगळ्या गोष्टी मी कॉलेजपासून पाहिले आहे.  आणि तू सांगताना त्या हुबेहूब जुळल्या होत्या.  मात्र सर्वात मोठा योगायोग असा की तो कॉलेज लाईफनंतर आज प्रथमच भेटला आणि तेही तू मला जेव्हा बोललीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी.  मला खूप गंमत वाटली... आणि अनघा... तुझ्यावरचं प्रेम विश्वास अधिकच वाढलं.

     अनघा... तो आणि मी आम्ही एकाच कॉलेजमध्ये... एकाच वर्गात... आमची खूप छान मैत्री आहे... आणि हो त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल आम्हाला सर्वांनाच माहीत होतं की ते खूप सिरिअस कपल आहेत. हम्म... ते लहानपणापासून प्रेम करतात हे नंतर कळालं मला पण माझा सातवी पासून क्रश आहे तो... म्हणजे ती माझ्या नंतर आली.. अनघाच्या ह्या बोलण्याने दोघेही मनापासून हसत एकमेकांच्या मिठीत विसावले.  विश्वासाचं नात नकळत दृढ झालं होतं.
'दिलवाले दुल्हन ले जाएंगे' च्या हटके क्रशवाल्या स्टोरीचा... प्रेमाचा वटवृक्ष विश्वासाच्या फुलांनी बहरला आहे... त्यावर सुंदर गोड फळेही आली आहेत.

                                                                                            - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                           पुढील कथा वाचा