Friday 6 April 2018

स्पर्श

    
Image Source: Google
    काय म्हणायचं ह्या माणसांना... घृणा वाटते एकदम... निर्लज्ज, बेशरम ह्या लेव्हलच्या पदवी कमीच पडतील ह्यांना.  भलीमोठी डिग्री घेऊन मिरवतात आणि लक्षण सगळे खोटे.  अगं काय झालं कृतिका?  चिडचिड असहाय्य झालेली कृतिका संध्याच्या बोलण्याने भानावर आली.  मनात असंख्य प्रश्न, राग, द्वेषाच्या पाऱ्यात उन्हाच्या लाह्या तरी जीवाला कमी बोचतील.   बॉस आल्याने दोघीही गप्प बसल्या आणि आपापल्या कामाला लागल्या. 

      कृतिका एक धडाडीचे व्यक्तिमत्व.  दिसायला सुंदर स्वभावाला थोडी तापट पण तितकीच हळवी.  ऑफिस ते घर बसने प्रवास करणारी.  संध्या, कृतिका, गौरी आणि माधुरी चौघी शाळेपासूनच्या बालमैत्रिणी.  संध्या आणि कृतिका एकाच ऑफिसमध्ये मात्र डिपार्टमेंट वेगवेगळे, त्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या.  गौरी आणि स्वाती दोघी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये मात्र दर रविवारी ह्या चौघी घरापासून जवळच ठरलेल्या ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्कला न चूकता भेटतात.

     कृतिकाच्या कामात मुद्दामहून काही न काही चुका काढून सतत तिला केबिन मध्ये बोलावणारा आणि लॅपटॉपवर मुद्दामहून काही ना काही काम देताना हाताला, अंगाला स्पर्श करणारा तिचा विकृत बॉसची तिला मनस्वी चीड यायची.  वाटायचं ह्याचं एकदाच बिंग फोडूनच टाकावं.  पण विश्वास ठेवणार कोण आपल्यावर?  संध्याला कृत्तिकाबद्दल बॉसचे मुद्दामहून चाललेल्या गोष्टी कळत होत्या मात्र तीही इतरांना हे सांगू शकत नव्हती.  ह्यावर जॉब चेंजिग हा खरंच पर्याय आहे का?  आपल्या ठरलेल्या ठिकाणी दोघी ऑफिसमधून सुटल्यावर बोलत होत्या.  आपल्या मैत्रिणींना ह्याविषयी बोलून काय तो तोडगा काढलाच पाहिजे... ह्यावर दोघींचं एकमत झाले.  घरी सांगितलं तर घरचे कसे.. काय आणि कोणत्या प्रतिक्रिया देतील म्हणून दोघींनी घरी सांगणे टाळले.

     गौरी कराटे चॅम्पियन म्हणून फेमस.  रस्त्याने धक्के देणारे, जाणून बुजून चालताना स्पर्श करणारे, विचित्र नजरा ह्यांचा सोक्षमोक्ष आपण कधीतरी लावू ह्या धाडसी व बिनधास्त विचारांची असणारी.  नुसती विचारच नाही तर कृती करणारी.  असेच एके दिवशी ऑफिसहुन घरी जाताना एका व्यक्तीने जाणून बुजून तिला धक्का दिला.  तो थोडा पुढे जातो ना जातो तेवढ्यातच.... आबे रुक साले... तेरी तो... रुक... क्षणातच सगळे तिच्याकडे पाहायला लागले... ज्याने धक्का दिला त्याची पुरती गाळण उडाली होती.. त्याच क्षणी जराही विलंब न लावता त्याची कॉलर पकडून तिने त्याच्या मुस्कटात लगावली.  तिच्या अंगात जणू वाघिणीचे बळ आल्यासारखे भासले.  तिथेच काही अंतरावर पोलिसांची गाडी उभी होती.  लोकांनीही ह्या रणरागिणीला सलाम करून त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.  एवढेच नाही तर पोलिसांनीही तिचे विशेष कौतुक केले.  एवढी सतर्कता लोकांनीही दाखवली त्यामुळे तिच्या नारीशक्तीला आणि त्या लोकांच्या सहकार्याला मुजरा.  अश्या गौरया घराघरात जन्माला याव्यात.  झालेला सर्व प्रकार गौरीने आपल्या घरी आल्यावर घरच्यांना सांगितला व तशीच ती आपल्या मैत्रिणींना ठरलेल्या ठिकाणी भेटण्यास निघाली.
    
   कृतिकाच्या पडलेला चेहरा गौरीला काहीतरी बिनसल्याची जाणीव करून देत होता.  विचारल्यावर आहे तो प्रकार संध्याने तिच्या कानावर घातला.  त्यावर शांत बसेल ती गौरी कसली?  थोड्याच वेळापूर्वी घडलेली गोष्ट तिने दोघींशी शेअर केला.  काही वेळ सर्वच शांत बसलेले पाहून गौरीने विषयाला सुरुवात केली.  आपण खरं तर खूप शांत बसतो संध्या... हे सगळे प्रकार वेळीच रोखता येतातही आणि काही वेळेस आपल्या गप्प बसण्याच्या सवयीमुळे टोकालाही जातात.  माझा भाचा विराज... तिसरीला आहे... बहिणीचा एकुलता एक मुलगा असूनही तितकाच शिस्तप्रिय आणि हुशार आहे.  माझ्या बहिणाचा दीर अधून मधून त्यांचा घरी येत असतो.  तो जेव्हा केव्हा येतो तेव्हा विराज खूप अस्वस्थ होतो.  खूप बिथरला सारखा करतो... कारण काय तर दोघांनाही कळेना!

     विराज आजीकडे आला तेव्हा त्याला ह्या गोष्टीबद्दल विचारले असता त्याने ज्या काही गोष्टी तुटक मुटक सांगण्याच्या प्रयत्न केला त्यावरून वारंवार घडलेल्या ह्या प्रकाराबद्दलची भीषण कल्पना आली.  सतत त्या काकाचे विराजला घेऊन मांडीवर बसणे.. गालगुच्छा घेणे... पायात दाबणे... ह्याप्रकारने विराज खूप संकोचून जायचा मात्र त्याला ते शब्दात मांडता येत नव्हते... नाही घरच्यांना सांगता... त्याच्यावरील लैंगिक शोषणामुळे त्याची मानसिकता ढासळत चालली होती.  ताईला ह्याबद्दल कल्पना दिली असता तिला धक्काच बसला... मात्र ती भाऊजींना सांगायला तयार होईना... नाती बिघडण्याची भीती.... ह्यावर तिने पर्याय शोधला... विराजला त्याचे काका आल्यावर एकटे त्यांच्याबरोबर सोडायचे नाही.  मला सांगा हा खरच पर्याय असू शकतो की अजून काही उपाय शोधता येईल?  गौरीच्या बोलण्याने संध्या तिच्या भूतकाळात गेली.

     आपली संध्या खुपचं साधी.  मात्र लहानपणीच्या काही गोष्टींमुळे तिलाही पुरुषांच्या विकृत स्वभावाचा प्रचंड राग यायचा.  आई नोकरीनिमित्त नऊ तास बाहेर तर वडील ऑफिसला सकाळी जायचे ते रात्री घरी यायचे.  मुलांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून तिच्या आईने प्रायव्हेट होम ट्युशन तिच्यासाठी चालू केले.  संध्याला मात्र सर्वांसोबत अभ्यास करायला आवडायचे.  आईच्या पुढे तिला काही बोलता यायचे नाही, त्यामुळे तिचे ट्युशन घरीच चालायचे.  संध्याला तिचे सर शिकवताना अतिशय प्रेमाने शिकवत.  मात्र ज्यावेळी तिची आई घरातील कामात व्यस्त असे त्यावेळी सरांचं प्रेमाने शिकवण तिला नकोसं व्हायचं.  त्याला कारण जाणून बुजून केलेला स्पर्श.  कधी हातावर हाथ ठेवून तर कधी जवळ बसवून.   सातवीत असणारी संध्या सरांचं विचित्र वागणं आईला नीट स्पष्टही करू शकली नाही, फक्त आई मला नको असा क्लास... मला ते सर नाही आवडत... आई मात्र आपल्या बाळाला समजावत होती... बाळा छान आहेत सर... मी ओळखते त्यांना.. नीट अभ्यास घेतील तुझा... ह्यावर संध्या फक्त स्वतःवर चिडचिड करत राहिली.  भूतकाळातील आठवणीने संध्या कासावीस झाली.  खरंच ह्या गोष्टी दाबून का ठेवल्या जातात?  ह्यांचा पर्दाफाश करणे महत्वाचे की गपगुमानं चालत राहून ते विसरणे हे फायद्याचे?  कोमल मनावरील आघाताचा विचार कोण करणार?  खरच ते विसरता येतं का?  हा स्पर्श... समज....गैरसमज... ह्याविषयी का कुणी सांगत नाही?  घरातले मनमोकळेपणाने का बोलत नाही ह्याविषयी?  शाळेत सांगितले जाते तो पर्यंत आपल्याला बरीच समजही आलेली असते.  पण घडून गेलेल्या गोष्टी मात्र झाकून जातात... मुक्कामार लागल्यासारखं...  संध्याच्या ह्या अचानक बोलण्याने तिच्यावर बालमनात झालेला आघाताने पहिल्यांदाच तिच्या मनातील मूक जखमेला मोकळी वाट करून दिली होती.  मगाशीच येऊन पोचलेल्या स्वातीला नकळत हुंदका आला... तिची अवस्था पाहून तिघींनी तिला पाणी प्यायला देऊन शांत केले.

    स्वाती... लग्नाला 2 वर्ष झालेली... गोंडस मुलगा पदरी... नवरा उच्चशिक्षित, सुसंस्कारी, अतिशय प्रेमळ तितकाच भावुक.  स्वाती क्लेरिकल म्हणून सरकारी कार्यालयात कामाला आहे... घर नोकरी संसार अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळते.  कुटुंब आणि नोकरी तितक्याच लीलया पेलते.  घरापासून बाजार थोडा दूर... भाजीपाला फळभाज्या काही हवे असेल तर विकणारे सोसायटीत येतात.  दररोज सोसायटीत केळीवाला भैय्या घरोघरी केळीसाठी फिरतो.  स्वातीही इतरांप्रमाणे त्याच्याकडूनच केळी विकत घेते... दर वेळी केळी घेताना तो भैय्या हाताला हात लावायचा... घाईत पैसे देताना असेल म्हणून स्वातीनेही दुर्लक्ष केले... पुन्हा एकदा त्याला लांबून पैसे देताना पुन्हा त्याने हाताला हाथ लागेल अश्या रीतीने वर्तन केले... असे करताना त्याच्या चेहऱ्यावर भाव मात्र शून्य... जणू काही झालेच नाही... तो खूप घाईत आहे असा अविर्भावात... पुढच्या वेळेस मात्र मी ह्यांना म्हणाली... जरा तुम्ही घ्या हो त्याच्याकडून मी कामात आहे... कसाबसा वेळ मारून तो विषय तिथेच थांबवला.. मात्र दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केळीवाला आल्यावर पुन्हा नवऱ्याला बोलली अहो तुम्हीच घ्या... तो केळीचे पैसे घेताना हाताला हाथ लावतो... ह्यावर मात्र ह्यांनी लगेचच प्रतिक्रिया देताना म्हंटल की तू देताना नीट पैसे देत नसशील त्याला... आणि ह्यापुढे आपल्याला केळी नको असे म्हणून त्यांनी विषयच बंद केला.  नवऱ्याच्या प्रतिक्रियेवर राग व्यक्त करावा की भोळेपणा समजून कीवL करावी हेच कळेना... घडलेला प्रकार मैत्रिणींशी शेअर करताना चौघीही कमालीच्या दुखावल्या गेल्या.

     कृतिका, संध्या, गौरी आणि स्वाती ह्यांच्यासारख्या समाजात कित्येक मुली आहेत.  बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी छोट्या मोठया कारणास्तव सोडून देतो.  काही वेळा त्यावर पडदा टाकतो तर काही वेळा स्वतःलाच दोष देतो.  कृतिकाने बदनामी नको म्हणून सहनशीलता वाढवली तर संध्या सारख्या सोज्वळ मुलीला तिच्या आईच्या बाहेरील व्यक्तीवर असलेल्या विश्वासामुळे पोखरून काढले गेले.  स्वातीसारख्या स्रियांना आजही असे अनेक अनुभव येताहेत त्याविषयी त्या कोणाला सांगूंही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही.  आजही समाज स्त्रीला दोषी ठरवतो.  स्वातीचा नवरा जितक्या सहजतेने तिला बोलला की तू पैसे देताना नीट पैसे देत नसशील ह्यावरून पायाची आग मस्तकात भिनतेय असंच काहीसं स्वातीला झालं असेल.  ह्यात त्या स्त्रीवरील अविश्वास समजायचं की अस्सल भोळा भाबडा स्वभाव समजायचं?

     आपण ज्या समाजात वावरतोय तिथे आपण सतर्क राहिले पाहिजे.  कृतिकासारख्या असंख्य स्त्रीया आहेत... त्यात काहीजणी शांत बसून सहन करणाऱ्या तर काही त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या.  संध्यासारख्या प्रत्येक मुलींना लहानपणीच काही गोष्टी शिकवण्याची व समजवण्याची गरज असते... त्यासाठी हक्काने मायेने जवळ घेणारे आणि तेवढ्याच अल्लड बुद्धीला समजून घेणाऱ्या व्यक्तिमत्वाची... मग त्या भूमिकेत आईच असेल असे नाही... आणि प्रत्येक वेळी समजून घेणारे आणि समजवणारे शिक्षकच असतील असेही नाही.  आपल्या बाळाला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श समजावणे ही काळाची गरज आहे.  गौरीसारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यावीच मात्र त्याचबरोबर आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे प्रत्येक कुटुंबाने द्यायला हवे.  स्वातीसारख्या स्त्रियांनी स्व-अस्तित्वाची जाणीव ठेवून अश्या विकृतींना तिथल्या तिथेच आळा घालून देण्याच्या विचारांना जागवणे ही गरज आहे.  ह्या भूमिकेत नवऱ्यानेही तितक्याच जबाबदारीने आपल्या बायकोच्या भावना समजून तिला अशा प्रसंगांना सामोरे जाण्यास तयार करायला हवं... मानसिक बळ द्यायला हवं.

     समाज बदलतोय... विचार बदलताहेत... स्त्रिया खऱ्या अर्थाने घडताहेत... हे फक्त विधानाकरता की खरंच?  खरं सांगायचं तर हा स्पर्श जितका प्रेमळ असतो तितकाच विकृतही असतो... त्याला कारण माणसांच्या वृत्ती.  जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... आळा घालताना व्यक्ती कधी विळख्यात सापडली जाते कळत नाही...  त्यामुळे स्ट्रिकनेस पेक्षा स्मार्ट अलर्टनेस हा हवाच... आणि हो... स्पर्श.... ह्या घडणाऱ्या गोष्टी फक्त स्त्रियांच्याच बाबतीत घडत आहे ह्या भ्रमातून आपल्याला बाहेर येणे तितकेच गरजेचे आहे... काळ बदलतोय... मुलगा असो की मुलगी... लहान असो की मोठे... शक्य तितक्या लवकर... दे मस्ट हॅव टू नो अबाऊट गुड टच अँड बॅड टच... Raise Your Voice..

                                    - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    

5 comments:

  1. कटू सत्य आणि दखल घेऊन सतर्क राहण्याची गरज सोप्या शब्दात दाखवून देणारा लेख 👌👏👊

    ReplyDelete
  2. Khoop chan lekh *! Kharach vichrniy ani Kristi karnyas ata pudhakar ghyaylach havanahi yapudhe ankhi bhayanak paristhiti yeiil.very good Anupriya

    ReplyDelete
  3. Very very thoughtful article Anupriya. Awarness and Smartness much needed for the mentioned problems. Thanks for the article.

    ReplyDelete
  4. आजच्या काळातील एक कटुसत्य... मग ती शाळेतील मुलगी असो की संसार करणारी स्री असो... कुठे ना कुठे अशा स्पर्शला ती बळी पडते... पण काळ बद्दल तोय तसेच प्रत्येक एका स्री मध्ये अशाच एक गौरीचे अस्तित्व जीवतच असते... फक्त गरज एकाच गोष्टीची अाहे ती... त्या गौराईचे रुप या जगा समोर ये अावश्यक अाहे....

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.