Friday 22 January 2021

डिजिटल माईंड



         आपण प्रत्येक जण सतत काही ना काही विचार करत असतो.  काहीजण तो विचार मनात करतात, काही जण आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करतात, तर काही जण तो लिहून व्यक्त करतात.  प्रत्येक जण व्यक्त होत असतोच, पण प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे असतात.  बऱ्याचदा आपण आपल्या मनातले विचार झटकून टाकण्यासाठी असो किंवा आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी असो, कुठेतरी मन रमवत असतो.  अगदी बोटावर मोजण्या इतके लोक असतील, जे आपला वेळ सत्कारणी लावत असतात.  ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपला वेळ वाया घालवतो.  इतकंच आहे की अनेकदा उचित ठिकाणी तो देता येणे आपल्याला उमजत नाही.


     आम्ही नाही बाबा त्यातले, आम्हाला नाही जमत हे वेळ सत्कारणी लावणं वैगरे. तुम्ही मोठी माणसं.  आहे तोच वेळ पुरत नाही आणि म्हणे वेळ सत्कारणी लावा(मुरडले नाक :)).  आम्हाला काही कमी टेन्शन आहे का?  असे एक ना अनेक उत्तरे आपणच स्वतःला देत असतो आणि देत राहतो. नाही का?


     माझंच घ्या, किती दिवसापासून म्हणते, कि काही तरी नवीन करावं, आपला वेळ लावावा सत्कारणी.  पण, हा विचार काही प्रत्यक्ष उतरताना दिसला नाही.  हो कि नाही!  बघा, तुमचा माझा विचार एकच झाला.  हे असं करत अनेक महिने लोटले बघा, हा 'पण' काही करू देईना! 

पण अगदी खरं सांगू का?  तुम्हाला म्हणून सांगते हा!  

काही मनाला खटकलं ना, कि बरोबर गाडी रुळावर येते बघा. 

अहो हसताय काय?  खरंच.  

     आपल्याला कधीच वेळ नसतो.  आणि वेळ काढायला तर वेळ नसतोच नसतो.  पण जर कोणत्या बाबतीत आपलं मन खट्टू झालं कि बरोबर आपल्याला आपला वेळ मिळतो बघा. आणि हा वेळ खरंच 'सत्कार्य' करण्यासाठीच असतो, हे कळायला तुमच्या आमच्या सारख्यांना बऱ्याचदा बराच उशीर होतो.  पण काही हरकत नाही.


     सवयी ह्या लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात.  आणि त्या अशा पटकन निर्माणही होत नाहीत, त्या तयार कराव्या लागतात.  तशी सवय लागण्यासाठी थोडंसं कष्ट मात्र आपल्याला करावेच लागते.  कष्ट म्हंटले तरी सुद्धा त्या कष्टाचा विचार करण्यातच आपला अर्धा दिवस निघून जातो.  खरंय ना!  मग आपण म्हणतो आम्हाला नाही वेळ.  

     अहो, हे सगळं जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जाणवते.  आणि जाणवलेल्या गोष्टी मनातच उजळत राहताना त्याचा सुंगंध म्हणजेच त्याची निर्मिती अगदी अलगद जडत जाते बघा!  अगदी १०८%.


     म्हणून मन खट्टू होण्याची वाट बघत बसू नका हं!  काहीही झालं तरी 'चांगले विचार' आणि 'सकारात्मक भावना' ह्या जोडगोळीला हृदयाशी घट्ट धरून ठेवलंच पाहिजे.  आणि हे असं लगेच नाही होत, असा विचार मनात येताच क्षणी त्या नकारात्मक विचाराला थांबवून आपला खरा प्रयास सुरु करायला हवा.  हा नकारात्मक विचार खरंच आपल्या मनाचा कहर आहे आणि त्याला आपणच STRANGE करतो.  हे आहे तिथेच STOP करून START WHERE YOU ARE... हे बिंबवता यायला हवं!

     
     शाळेत असतानाची धम्माल, आजीच्या गावी जाताना गावच्या मातीचा दरवळणारा सुगंध, आवडणारी व्यक्ती, तिच्याविषयी जाणवणाऱ्या भावना, आपल्या बाळाचे कौतुक, त्याची निरागसता, उतार वयातील गोष्टी, नातवंडांचा सहवास, प्रपंचाच्या व्यापात कामाची चाललेली धावपळ, आपले सहकारी, घडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, त्यातून मनाला उभारी देत केलेला प्रवास, प्रवासातील धम्माल आठवणी, कितीs कितीs गोष्टी आहेत, ज्या आपल्या मनात वाचतानाच बघा झरझर येऊन गेल्या.  हो ना!  खरंच आपलं मन खूप STRONG आणि जबरदस्त आहे.


     आपल्यातले किती तरी जण ह्या गोष्टी आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवत असतात.  किती तरी जण त्या अल्बमच्या माध्यमातून पाहत राहतात.  किती तरी जण आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देत पेनाच्या शाईने अलगद कागदावर उतरवत असतात.  कागदावर उतरताना त्याचा ओलावा खरंच स्पर्शून जातो.  आणि खरंच हे अगदी खरं आहे. 

     कित्येकदा आपल्या मनातले विचार आपल्या मनातच राहतात. पण कागदावर उतरलेला मायेचा स्पर्श आपल्या व्यक्तीला कधी ना कधी सहज देऊन जातात.  


     आजच्या ह्या डिजिटलायझेशनच्या युगात हाच स्पर्श आता डिजिटल झाला आहे.  बदलत्या जगानुसार घडणारा हा बदल CONSTANT आहे.  

 'CHANGE IS THE ONLY CONSTANT.'  

     म्हणून आपल्या मायेचा ओलावा काही थांबत नाही, ते  प्रेम काही कमी होत नाही, ती जाणीव काही आटत नाही.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे.  आणि ह्या प्रवाहात आपल्याला आपल्याच मार्गाने पुढे जात रहायचं आहे.  फक्त त्यासाठी थोडं डिजिटल विश्व अधिक जवळून जाणून घेता यायला हवं.

     प्रत्येकाने TECHNO SAVY होणं ही आता काळाची गरज आहे.  आणि हो, Techno Savy होण्यातही खूप गंम्मत आहे बरं का?  हम्म!!!  पण आता आपण इथेच थांबूयात.  ह्या डिजिटल विश्वातील खजिन्याची गंम्मत जाणून घेण्यासाठी नक्की भेटूयात पुढच्या सदरात.

                                                  - अनुप्रिया सावंत.