Saturday 31 March 2018

कविता #14 - नाउमेद मी कधीच नव्हते...




     प्रत्येक व्यक्तीच्या मनात व्यक्तिपरत्वे अनेक विचारांचे काहूर माजत असते. आपण काय करतोय? काय चालू आहे? एक ना अनेक प्रश्न स्वतःच स्वतःला बऱ्याच वेळा विचारतो. आपल्या जे हवे असते ते मिळतेच असे नाही. आणि जे आपल्याजवळ असते त्यात आपण समाधानी असतोच असे नाही. कारण माणसाला जे हवंय त्यापेक्षा त्याच्याकडे काय नाही आहे, ह्या तुलनेतच तो जास्त गुरफटला जातो. ह्यात आपला आळशीपणा म्हणा किंवा आत्मविश्वासाची कमी म्हणा ह्यामुळे स्वतःला ओळखण्यात आणि त्यातून चांगले शिकण्यात कमी पडतो.

     कुठेतरी मेहनत कमी पडते किंवा काहीतरी अविचारीपणा नडतो. मात्र ह्यामुळे गफलत होते ती आपलीच. नाही का? क्षणात असे वाटते सगळे मार्ग थांबले. क्षणात वाटते आता काहीच नाही उरले. पण, खरच असं असतं का हो? जीवन ही कला तर आहेच पण त्याहूनही सुंदर परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मग असं असताना खरच आपले मार्ग थांबतील का? तर नक्कीच नाही. थांबेल ती 'आशा' कसली? सोडून देईल त्यात 'उमेद' कसली? हिंम्मत हारेल ती 'व्यक्ती' कसली?

        कारण, उमदीपणा व्यक्तीला प्रवाहित करतो ते न थांबण्यासाठीच. नदीच्या प्रवाहासारखा कुठूनही प्रवाहित झाला तरी अथांग समुद्राला मिळण्याकरिता, सागराच्या लाटांसोबत किनारा शोधण्याकरता. स्वतःच्या नावेत स्वतः नावाडी होण्याकरता.

    नाउमेद मी कधीच नव्हते... 'दैनिक प्रत्यक्ष काव्यपीठ' द्वारे माझी ही कविता दिनांक 5 मार्च 2018 ला छापून आलेली आहे. ती मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून पुन्हा सर्वांसमोर सादर करते.


उमदी ही आशा,
ना उमेद मी कधीच नव्हते.
जीवनाची भाषा मी 
जगण्यातून शिकत होते.
हातात असतानाही हाताच्या रेषेत 
वेड्यासारखी शोधत होते.

हृदयात असूनही,
देवळाची पायरी चढत होते.
दगडासमोर डोके फोडून, 
जखमांनी विव्हळत होते.
तरीही उमेदाची आशा,
मनामनात भिनवत होते.
नाउमेद मी कधीच नव्हते.

जगण्यासाठी सतत, 
झोकून प्रयास करत होते.
प्रयास करताना मात्र 
डोळे झाकत शोधत होते.
ठेच लागता पायाला, 
दोष मात्र दगडाला देत होते,

माझी चूक मला कळताच,
स्वतावर फक्त हसत होते.
प्रयत्न अपुरे असताना,
दैवावरच दोष देत होते.

आळशीपणाने भरलेल्या
ह्या माझ्याच मनाला,
पुन्हा नव्याने जागवत आहे.
माझ्या मनाला समजावत, 
पुन्हा पुन्हा शहाणं मी करणार आहे.

कारण अजूनही उमेद आहे, 
नाउमेद मी कधीच नव्हते.

                                                       - अनुप्रिया सावंत.

Friday 30 March 2018

फाईल - प्रायमरी नेम आणि एक्सटेंशन

     मागच्या सदरात फाईल विषयी आपण काही गोष्टी जाणून घेतल्या आहेत. ह्या फाईलला नाव देताना त्यांना ज्या दोन भागात विभागले जाते त्या विषयी आपण आज पाहणार आहोत.

फाईल नेमचे दोन भाग असतात.
1) प्रायमरी नेम
2) एक्सटेंशन


1) प्रायमरी नेम :
     प्रायमरी नेम हा प्रत्येक फाईलच्या सुरुवातीचा भाग असतो. आणि हे प्रायमरी नेम जी व्यक्ती ती फाईल बनवते ती व्यक्ती देते. आपल्या फाईलला नाव देताना फाईलमधील माहितीला अनुसरून द्यावे जेणेकरून ती फाईल आपण सहजरित्या शोधू शकतो.

     फाईल नेममधील प्रायमरी नेम देताना अक्षरे, अंक, चिन्ह यांचा वापर करता येतो यांनाच कॅरॅक्टर असे म्हणतात. परंतु काही चिन्हांचा अपवाद वगळता (ही चिन्हे /,\, *,?, <, > विशिष्ट अर्थ असणारी आहेत आणि त्यांचा वापर कॉम्पुटर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये केला जातो.) कीबोर्ड वडील इतर सर्व चिन्हांचा वापर फाईलच्या नावासाठी करता येतो.

    डॉस ऑपरेटिंग सिस्टिम मधील नेमिंग कॅरॅक्टर संख्येला मात्र येते मर्याद असते. त्यात फक्त 8 कॅरॅक्टर वापरले जातात, तर आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये प्रायमरी नेम 255 कॅरेक्टर आपण वापरू शकतो.


2) एक्सटेंशन
     आपण पाहतो ज्यावेळी आपण संगणकावर फाईल ओपन करतो त्यापुढे . (ह्या डॉटला परिअड असे म्हणतात)करून त्या त्या फाईलच्या एक्सटेंशन विषयी लिहिलेले असते. उदाहरणार्थ आपण मागे फाईल बनवताना पाहिले .txt
हे .txt ती फाईल नोटेपॅड मधील फाईल असल्याचे स्पष्ट करते.

     एक्सटेंशन हा फाईल नेमचे दुसरा भाग असतो. फाईल नेम आणि एक्सटेंशन ह्यांच्या मध्ये जो डॉट म्हणजेच पूर्णविराम असलेला आपल्याला दिसतो त्याला पिरिअड असे म्हणतात. हा एक्सटेंशनचाच भाग असतो. पिरिअड नंतर सामान्यतः 3 अक्षरांनी हे एक्सटेंशन दर्शविले जाते. हीच महत्वाची अक्षरे आपल्याला फाईल कोणत्या अप्लिकेशन प्रोग्रॅमची आहे हे सूचित करते. 

नोट: विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये एक्सटेंशन आपोआप(by default) दिले जाते.


आपण खाली काही उदाहरणे पाहू:

अप्लिकेशन प्रोग्रॅम          फाईलचा प्रकार            एक्सटेंशन

1) मायक्रोसॉफ्ट वर्ड        वर्ड डॉक्युमेंट                 .doc
2) MS पॉवरपॉइंट          पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन      .ppt
3) MS एक्सेल                एक्सेल वर्कशीट              .xls
4) MS पेंट                     बिटमॅप इमेज                 .bmp
5) नोटपॅड                      टेक्स्ट                            .txt
6) इंटरनेट एक्सप्लोरर    वेबपेज                          .html

     प्रायमरी फाईल आणि त्याच्यासह असलेले एक्सटेंशन ह्याविषयी सविस्तर माहिती आपण पहिली.  सर्व फाईलस एकत्र कशा प्रकरे संग्रहित केला जातो त्या फोल्डर विषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या सदरात.

                                                                                      अनुप्रिया सावंत.

          मागील लेख                                                                                     पुढे पहा

Thursday 29 March 2018

पाऊल - एक धाडसी निर्णय


    

     गावाकडच्या सवयी आणि शहरकडच्या गोष्टी दोन्ही वेगवेगळ्याच. शहरातल्या वातावरणात लाडाने मोठी झालेली आनंदी लग्न होऊन सासरी जाणार हे तिच्या मित्र मैत्रिणींमध्ये पसरायला वेळ लागला नाही. मनमिळाऊ, अबोल तितकीच हसरी, प्रसन्न आणि वेळेनुसार खंबीर असणारी आनंदी सगळ्यांचीच आवडती. हा हा म्हणता लग्नाचा दिवस उजाडला आणि पोर लग्न करून सासरी आली. शहरातून सासरी आलेल्या आनंदीला सासरी रुळायला फारसा वेळ लागला नाही. दिवस भराभर जात होते. नवरा सासू आणि ती. आनंदीचा संसार फुलत होता. 

     अन्वेष आणि आनंदी शोभून दिसणारे जोडपं. बिल्डरचा व्यवसाय अपार कष्टाने स्वबळावर त्याने चालवला आणि प्रसिद्धीस आणला. बरेच छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेत तो आता नावारूपाला येत होता. अन्वेष दिसण्याऐवढाच बोलायलाही रुबाबदार तितकाच स्वभावाने जिद्दी. नाही ऐकण्याची सवय नसणारा, स्वतःच्या शब्दासाठी वाटेल ते करणारा, असे असले तरी त्याचे घरात बारकाईने लक्ष असायचे. घरी कशाचीही कमी नव्हती. आईला घरात पाळणा हलावा ही एकमेवच आस. वयाने थकलेली आई मनाने मात्र उत्साही आणि तरुण होती. नातवावरचं प्रेम आजी आजोबांना चिरतरुण ठेवण्यास पोषकच असते म्हणा. घरच्या सुनेची त्या मुलीप्रमाणे काळजी घेत.

     अन्वेष नेहमीप्रमाणे आज कामावर जात असताना का कुणास ठाऊक आनंदीचे मन आज त्याला जाऊ द्यायला तयार न्हवते. त्याने तिच्यासोबत दिवसभर रहावं हा तिचा हट्ट त्याला पूर्ण करावा लागला. आज ते दोघे एकमेकांच्या कुशीत बराच वेळ विसावले होते. दिवस बराच टळून गेला हे दोघांना आईने जेवणासाठी हाक मारल्यावर लक्षात आले. अन्वेष जेवल्यानंतर बराच वेळ विचार करत बाहेर बघत होता. तेवढ्यात त्याची तंद्री बाहेरच्या आवाजाने भंग पावली. 3-4 मजूर धापा टाकत अन्वेष च्या वाड्याजवळ थांबले. एव्हाना आनंदी आणि आई दोघीही त्या आवाजाने भांबावून कामे सोडत पळत बाहेर आल्या.

     सायेब आपले चार मजूर बांधकामाच्या ढिगाऱ्यात अडकले व्हते, लय धडपड क्येली समद्यांनी पण नाय जगले. कोंडले साहेब ते आणि हकण्याक बळी गेल्ये. तरी सांगत व्हते ते बुवा... नाय उभी राहणार ही इमारत.. गप्प बसा... अन्वेष च्या संतापी मुद्रेने मजूर जागेवरच खिळले. अन्वेष तातडीने घटनास्थळी दाखल झाला. सर्व प्रकार पाहुन अन्वेषने मजुरांना काम थांबवायला सांगितले. तुच्छित नजरेने बुवा साराच प्रकार पाहत होते.

     इथे आनंदीला काय प्रकार आहे हेच कळेना. अन्वेषचा रुद्र अवतार ती प्रथमच पाहत होती. बघता बघता दिवस निघून गेले. अन्वेष त्याची छोटी मोठी कामे करतच होता मात्र त्या अर्धवट बांधकामविषयीची सल त्याला कायम बोचत होती. प्रथमच त्याने कोणते काम अर्धवट टाकले होते जे त्याच्या सवयीत बसत न्हवते. अश्यातच आनंदीला दिवस गेले. सर्वत्र आनंद आनंद होता. आईंच्या आनंदाला तर उधाण आले होते. काय हव काय नको हे पाहण्यात कोडकौतुकात दिवस मजेत जात होते. कोणाची दृष्ट लागू नये असा संसार फुलत होता.

     आनंदीला मुलगा झाला. अन्वेषचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्यालाही मुलगाच हवा होता त्याचा व्यवसायाला हातभार लागावा म्हणून. मात्र त्याचा आनंद त्याच्यासाठी क्षणभुंगर ठरला. मुलगा सुदृढ होता मात्र त्यात व्यंग होते. आपल्याला असा मुलगा जन्माला आला, ही गोष्ट त्याला सहन झालीच नाही. ताडताड करत तो निघून गेला. इथे आनंदी आणि आई ह्यांना अन्वेषच्या वागण्यामुळे काय बोलावे तेच सुचेना. आनंदीने आपल्या मुलाला जवळ घेतले त्याचा पापा घेतला. आईनेही त्याच मायेने आपल्या नातवाला जवळ घेतले. त्याला घरी घेऊन जायला दोघी निघाल्या. मात्र अन्वेषने तिला मुलाला घेऊन घरी येऊ नकोस ही तंबीच दिली. नाईलाजास्तव ती नि तिचं छकुल बाळ एका छोट्याश्या गावनजीकच्या त्यांच्या घरात रहायला आले. ह्याही परिस्थितीत तिला साथ मिळाली ज्यांनी मुलगी मानलेल्या त्या सासुआईंची.

     ह्या खंबीरतेवर तिने आपल्या मुलाला मोठं करण्याचं धाडस ठेवले. आईपणाचे कर्तव्य ती प्रेमाने, अभिमानाने बजावत होती. मुलाचं व्यंग हे होते की त्याला दोन्ही हाथ न्हवते. मात्र दिसायला जणू छोटा अन्वेषच. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष जात होते. इथे आनंदीचा नवरा अन्वेष दिवसेंदिवस रागाने लालबुंद होत होता. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याला कसलीच हार मिळाली नव्हती ना कामाची पीछेहाट. त्या बंद पडलेल्या कामामुळेच ही सुरुवात तर नसेल? त्या जागेवर काम करायला घेतलच नसतं तर? माझ्या सारख्या हुशार बिल्डरला अश्या अपयशाची सवयच नाही, ह्या आणि अश्या विचारांनी त्याला पोखरून काढले होते. काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे ह्या जिद्दीने त्याने नाईलाजास्तव बुवाला भेटण्याचे ठरवले.

     बुवांच्या सान्निध्यात जवळ जवळ पूर्ण गावच बुवावार विसंबून. कुठचबी अड-अडचण असो बुवा बगर सुटायचं न्हाय! हा गावकऱ्यांचा विश्वास. अन्वेषही आता बुवांच्या सोबतीने कामे करू लागला. अचानक एके दिवशी तो त्याच्या आनंदीकडे परतला. त्याच्या बाळाला पहायची विनवणी करू लागला. आनंदीला हे अनपेक्षित होतं तरी ती सुखावली होती. आपल्या मुलाला झालेल्या जाणिवेमुळे आईचेही डोळे पाणावले होते. दोनच दिवसांनी गुडीपाडवा होता. आपल्या स्वतःच्या घरात आपल्याला जायचंय मी तुम्हाला न्यायला आलोय हे अन्वेषचं वाक्य आनंदीला अचंबित करणारे होते. कारण ज्या अन्वेषला तिने पाहिले होते तो त्याच्या मुलाचा तोंडही बघायला तयार नव्हता. त्यासाठी त्याने स्वतःच्या आईलाही घराबाहेर काढले होते, तो खरच आपल्याला सांभाळेल का? ह्या आणि अश्या अनेक कुशंका तिच्या मनात येत होत्या. पण शहराकडची विचारधारा असणारी खंबीर आनंदी संसाराला पुन्हा फुलवायला सज्ज होती आणि म्हणूनच तिने सर्व तर्क-कुतर्क बाजूला सारून त्याच्यासह पुन्हा स्वतःच्या हक्काच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.

     आज घरी दिवाळी दसरा साजरा होत होता कारणही तसंच होतं. अन्वेषचं कुटुंब त्याला पुन्हा मिळालं होत. छोटा छकुला जो अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष बाबांसाठी व्याकुळ होता त्यालाही आज त्याचे बाबा मिळाले होते. आईही आपल्या 3 वर्षाच्या नातवाचा आनंद पाहताना हरवून गेल्या होत्या. सार काही एकदम आलबेल चालू होतं.

     अन्वेषने घरी पूजन ठेवले होते. त्यात त्याने गावाकडच्या प्रतिष्ठित लोकांना, काही गावकऱ्यांना आमंत्रित केले होते. सर्वत्र धूप अगरबत्ती मंत्रोच्चार ह्यांचा सुंदर मेळ घरातील उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध करीत होता. छोटा छकुला सर्वांकडून लाड कौतुक करूवून घेत होता. आनंदी आणि आई घरात पाहुण्यांसाठी काय हवं काय नको ते पाहण्यात गुंतल्या होत्या. माणसांची गर्दी कमी होऊ लागली तशी काही मोजकीच मंडळी घरात चर्चा करत बसली होती. आनंदी स्वयंपाक घरात आईसोबत गप्पा मारत होती तर छकुलाही थकल्यामुळे आत झोपला होता.

     काय साहेब आम्ही सांगत व्हतो ना... बुवांनी सांगितलं तस केलं नि तुम्हासनी पुन्हा उभारी आली बघा. होय, खरंय तुम्ही म्हणता ते... अन्वेष त्याच काम कधीच अर्धवट सोडत नाही. ह्या बांधकामाला 3 वर्षाचा मुलाचा बळी मिळणार आणि माझं काम पूर्ण व्हनार. हा हा हा.... दबक्या स्वरातल्या अन्वेषच्या हसण्याला बसलेल्या मंडळींनीही दुजोरा दिला.

     क्षणातच भयंकर किंकाळी बाहेर पडणार तोच आनंदीने आईंच्या तोंडावर हाथ ठेवला. दोघींना थोडावेळ गरगरल्या सारख झालं. घरातल्या भिंती दाबून टाकताहेत हा भास व्हायला लागला. आनंदीही पुरती हादरली होती. पुन्हा स्वतःला सावरतच आईंनी बोलायला सुरुवात केली. व्हत्याचे नव्हतं व्हायला येळ लागणार नाय पोरी... तू निघून जा पोरी... तुझ्या बाळाला घे आणि माहेरी निघून जा.. दोघी हमसून हमसून रडत होत्या. आनंदीला अन्वेषवर ठेवलेल्या विश्वासाचा पश्चाताप करायलाही वेळ नव्हता.

     आणि ती निघाली... खंबीरतेने... पुन्हा कधीही मागे वळून न पाहण्यासाठी... कारण... तिच्या मनाचा बळी त्याने आधीच घेतला होता.

                                                                                                               - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

Saturday 24 March 2018

फाईल

     मागच्या सदरात आपण सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी ह्याविषयी जाणून घेतले. फाईल संबंधी आपण पुढे जाणून घेत आहोत. 

   फाईल म्हणजे सध्याच्या भाषेत सॉफ्ट आणि हार्ड कॉपी, जे आपण मागील सदरात पाहिले.  मला संगणकावर फाईल तयार करायची आहे ही क्रिया सॉफ्टकॉपी च्या प्रकारात मोडते.


फाईल - संगणकावरील स्टोरेज डिव्हाईसवर बायनरी पद्धतीने एकत्रितपणे साठवलेल्या माहितीच्या गटाला 'फाईल' असे म्हणतात.
     थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या स्वतःची माहिती, कामा-स्वरूपातील व इतर अनेक माहिती संगणकात साठवली जाते, ती फाईल स्वरूपात एकत्र ठेवली जाते.



लक्षात ठेवा / नोट :


स्टोरेज डिव्हाईस - हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क (CD, DVD), पेन ड्राईव्ह ह्यांची बेसिक माहिती मागील सदरात पाहिले आहे.

बायनरी पद्धत बायनरी पद्धत म्हणजे संगणकाला 0 आणि 1 ही भाषा समजते, ह्याविषयी सुद्धा आपल्या मागच्या सदरात दिलेले आहे.


पाहुयात संगणकात फाईल तयार करण्याची कृती:

1) स्टार्टबारवर जाऊन प्रथम प्रोग्रॅम ओपन करावे तिथून नोटपॅड वर जावे. (तुम्ही स्टार्ट बार ओपन केल्यावर डायरेक्ट सर्च माध्यमातून नोटपॅड असेही टाईप करु शकता.) 

लक्षात ठेवा / नोट : कॉम्पुटर ऑपरेटिंग सिस्टिम (आपण यूजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टिम संबंधित संगणकीय माहिती पाहत आहोत.) नुसार प्रत्येक एप्लिकेशन्स वेगवेगळ्या स्वरूपात असू / दिसू शकतात, मात्र फाईल तयार करण्याचे स्वरूप ह्याच पद्धतीने असते.



तुम्ही पाहू शकता नोटपॅड हे अप्लिकेशन ओपन केल्यावर कसे दिसते.

2) फाईल तयार केल्यावर त्या फाईलला नाव देणे गरजेचे असते, जेणे करून आपल्याला ती फाईल पटकन ओळखता येईल.  वरील आकृतीत तुम्ही पाहू शकता फाईलला 'Creating_The_File' हे नाव दिलेले आहे.

3) फाईल सेव्ह करताना फाईलला एक एक्स्टेंशन दिले जाते. हे एक्स्टेंशन आपल्याला आपली फाईल कोणत्या प्रकारातील आहे हे दर्शविते. 
.txt फाईल म्हणजे आपली माहिती (डेटा) नोटपॅड स्वरूपातील असल्याची माहिती आपल्याला संगणक देतो.

आकृतीत एक्सटेंशन .txt पाहावे.


         
          फाईल फक्त एकाच स्वरूपात नसते तर ते एखादे डॉक्युमेंट स्वरूप, चित्र स्वरूप, प्रेझेन्टेशन स्वरूप, वर्कशीट स्वरूप किंवा पेज स्वरूप अश्या वेगवेगया स्वरूपात असू शकते. म्हणजेच फाईलची अनेक स्वरूपे आहेत. आणि हे स्वरूप 'प्रायमरी नेम' व 'एक्सटेंशन' ह्यांच्या द्वारे भिन्न असते. 

          फाईलचे नाव अर्थात 'प्रायमरी नेम' व 'एक्सटेंशन' ह्याविषयी अधिक माहिती आपण पाहू पुढच्या सदरात.                                                                                                   

                                                                                                        - अनुप्रिया सावंत.

            मागील लेख                                                                                             पुढे पहा