Wednesday 20 February 2019

शिदोरी - 'आत्मबल - आईचा पदर'



     प्रत्येक लेकीला आईचा पदर हा हवाहवासा असतो. मनातलं दुखणं खुपण त्या पदराशी जोडून भावनांना मोकळी वाट करून देत असतं. प्रत्येक वेळी हा पदर हवा तेव्हा मिळतोच असे नाही. लग्न झाल्यानंतर ह्या पदराची लेकींना खूपच आठवण होत असते. त्या मायेची ऊब प्रत्येकीला हवीहवीशी वाटत असते. 

     नोकरी करणारी असो किंवा होम मेकर लेक असो; घर, मुले, कुटुंब ह्या सगळ्याच जबाबदारीत ती गुंतून जात असते. तरीही मायेच्या उबेची संध्याकाळ तिला नेहमी हवीहवीशीच असते.  स्त्री म्हणून मुलगी, बहीण, बायको, वहिनी, नणंद, आई, आज्जी ह्या कुठल्याही नात्यातील जबाबदारी पार पाडत असली तरी आईचा पदर तिच्यासाठी मखमलीची शाल, वास्तल्याची मऊ ऊब बनत असते.

     फास्ट लाईफ स्टाईलमध्ये अनेक नाती मागे पडतात. काही सोडून जातात, काही रागावतात, काही थांबतात तर काही तोडून जातात.  अनेक जबाबदारी पेलावत असताना कालांतराने नात्यांतील ओढही कमी होत जाते.   अबाधित असते ती एकच ओढ... 'आईचा पदर'.

     जीवनात अनेक अडचणी येतात-जातात, त्यावर अनेक जणी मात करतात, काही शिकतात काही सावरतात तर काही धडपडतात. ह्या सगळ्यात स्वाभिमान, अभिमान आणि आत्मविश्वास कळत नकळत कमी होत जातो.  अचानक काही जबाबदारीने खचूनही जातो. वेळेच्या पाठी पळताना कुटुंबाची काळजी घेताना स्वत्वाची जाणीवच मागे पडत राहते. जेव्हा जाणीव होते तेव्हा हक्काची व्यक्ती समोर असतेच असे नाही.  कुणाशी संवाद साधून मन मोकळे होईलच किंवा होतेच असे नाही.  मात्र आईचा पदर ह्या सगळ्याला अपवादच ठरत असतो,  नाही का?

     प्रत्येक लेकीला आपल्या आईकडून हौस मौज करून घ्यायला आवडतेच.   ह्यासाठी वयाचे मोज माप कधी असूच शकत नाही. माहेरहुन सासरी निघताना आई तिच्या लेकीची खण नाराळाने ओटी भरते. माझी नंदाई मात्र तिच्या प्रत्येक लेकीची ओटी भरते ते अनेकानेक संपन्न परिपूर्ण गोष्टींनी, तिच्या विशाल मायेच्या पदराने.

     धावपळीच्या जीवनात अनेक अडचणी येतात, संकटे उभी राहतात, आव्हाने असतात. ह्याला तोंड देताना अनेकदा मार्गही संपल्यासारखे वाटते. पण मायेने विचारपूस करणारा आवाज आणि तिचा पदर सोबत असला की दहा हत्तीचे बळ अंगात आल्यासारखी वीरश्री अनुभवायला मिळते. खरंच! माझ्यासाठी माझ्या आईचा माझ्या नंदाईचा पदर मला 'वीरश्री' देते. 

     आयुष्यात मागे वळून पाहताना आजची मी आणि पूर्वीची मी ह्यात स्वतःलाच अनेक पैलू पाहायला मिळतात.  राहून गेलेल्या गोष्टी, सुटलेल्या गोष्टी, हव्या असणाऱ्या गोष्टी आणि आवश्यक त्या महत्वाच्या गोष्टी ह्यांना उत्तमरित्या गुंफणारे नाथसंविध् आयुष्याला मिळाले, ते सद्गुरू कृपेने!  नाथसंविध्.


पिपासा 3 अभंगातल्या ह्या ओळी मनाला अधिकच स्पर्शून जातात.

शोधत होतो काय नक्की
तेही कधी कळले नाही
मनातली आकृती माझ्या
स्पष्ट कधी झाली नाही 


    मात्र ह्या अनिरुद्धच्या प्रेमाचा नंदाईच्या पदराचा तिच्या शब्दांचा तिच्या प्रेमाचा स्पर्श झाला आणि....


नूरली नशिबाची लढाई
क्लेश कष्ट सारे सरले
अनंत श्रमे न मिळे ते 
बापू कृपे जवळी आले.


     आईने तिच्या लेकीला नुसतंच घडवलं नाही तर जीवन सजवायला शिकवलं.  एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या बदलांना सहज सामोरे जाण्याचे बळ ह्या आईच्या पदराने दिले.  ही सहजता आईच्या ह्या शिदोरीने दिली. माहेरपणाचे सुख, आनंद, धम्माल, मज्जा, मस्ती आणि हक्काची कधीही न सोडून जाणारी मैत्रीण ह्या आत्मबलने दिली.  चारचौघात वावरण्याची सहजता, आत्मविश्वास ह्या पदरातून मिळाला.   हा पदर म्हणजे आनंदाची खाण आहे.  जितका लुटू तितका तो वाढतच राहतो.  जादू आहे आणि जादूची झप्पी पण ह्या 'आत्मबल' क्लासमध्ये आहे. नंदाईच्या पदरात लपलेली, भरभरून आनंद, समाधान आणि तृप्तीचे ढेकर देणारी एकमेव अद्वितीय असे, जिचे वर्णन शब्दात करताच येऊ शकत नाही, कारण ते अनुभवण्यासाठीच असते.  तिच्या लेकीच्या हक्काचे माहेरपण आणि माहेरपणाचे अनेकानेक हितगुज.

    तिच्या लेकींसाठी हे सर्व करत असताना, तिला घडवत असताना ही माय ना कधी दमत नाही कधी थकत.  हिच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित झळकत असते.  लेकीसाठी अगदी धावत पळत येत असते.  स्वतःचे कितीही बिझी शेड्युल असले तर लेकींच्या प्रेमापोटी ही प्रत्येक क्लासला हजर असते ते तिच्या लेकीची नानाविध संपन्न गोष्टींनी स्वतःच्या पदराने ओटी भरण्यासाठी.  स्वतःचे घर सांभाळून इतरही अनेक जबाबदाऱ्या ही लीलया पार पाडत असते.  स्वतः प्रत्यक्ष करते आणि लेकींनाही तसं घडवते.  हिला कधी आराम करताना आम्ही खरंच पाहिलेच नाही.  आराम हिला माहीतच नाही.  तिच्या शिदोरीतून तिने आम्हाला स्वतःसारखे ऍक्टिव्ह राहायलाच शिकवले.  आज आम्ही जे काही आहोत, करतोय आणि आत्मबल क्लासमधून अनंतपटीने जो खजिना लुटला, अनुभवला, साजरा केला, आणि जीवनात उतरवला त्याचे सर्वच श्रेय माझ्या आईचे, तिच्या पदराचे आणि आत्मबलच्या शिदोरीचे आहे.   

     मला लाभलेल्या प्रत्येक गोष्टी मोठ्या आई चरणी अर्पण करते.  आणि आम्हा सगळ्याच लेकींसाठी नंदाईचा हा पदर सतत अधिक घट्ट पकडण्याचे नाथसंविध् अनिरुद्धा चरणी आम्ही वारंवार मागतो.  आम्ही सर्वच खुप भाग्यवान आहोत.

जय जगदंब जय दुर्गे!

     आयुष्यातला हा आत्मबदल ज्या स्त्रीला प्रत्यक्ष अनुभवायचा असेल, हिच्या मायेची ऊब अनुभवायची असेल, हिच्या पदरात सुखाची, आनंदाची, विसावाची, शांतीची, समाधानाची, प्रेमाची, कर्तृत्वाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आत्मविश्वासाची झेप घ्यायची असेल तर 'आत्मबल' हा आईचा पदराचा विशाल किनारा आहे जो अनिरुद्ध प्रेमसागरात ह्या भक्तिभाव चैतन्याच्या झऱ्यात मनसोक्त चिंब भिजवतो. 

     आत्मबल हा एक असा सेतू आहे जो आत्मबल ते आत्मबदल घडवणारा प्रत्येक स्त्रीला परिपूर्ण बनवून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे आनंदवन करणारा सुगंध आहे. नंदाईच्या प्रत्येक क्षणाच्या मेहनतीचा, अपार कष्टाचा, विशाल प्रेमाचा आणि कणखर व्यक्तिमत्वाचा एकमेव अद्वितीय असा वृक्ष आहे जो भक्तीभावचैतन्याच्या सुगंधाने निरंतर बहरत राहतो. आणि ह्याचा अनुभव आत्मबल अनुभवलेल्या प्रत्येक लेकीसह तिच्या कुटुंबालाही येत असतो.

    अबलाची सबला करण्याची ताकद ह्या माझ्या नंदाईत आहे. सुकणाऱ्या रोपट्याला, खुंटलेल्या प्रगतीला, आटत चाललेल्या नदीला प्रवाहित करत, फुलवून ताजेतवान, आनंदी, समाधानी, सुगंधित करणारी सोबतच जीवन आनंदानी समृद्ध करणारी माझ्या डॅडाची नंदाई माझी ही आई आल्हादिनी आहे.

    प्रत्येक मुलीला नेहमीच डॅडसारखं रहायला आवडतं. मुलीचे पहिले प्रेम तिच्या डॅडवर अधिक असते. असे असले तरी मात्र ह्या प्रेमासाठी लेकीला डॅडसारखे बनवण्यासाठीची अफाट मेहनत, कष्ट, शिस्त, आणि कणखरता ह्याचे भक्कम पाठबळ हे आईचेच असते.   ही किमया ही जादू तिने तिच्या पदराने भरलेल्या ओटीचीच असते.  हे अनुभवायला 'आत्मबल' ची शिदोरी प्रत्येक लेकीकडे असायलाच हवी.   ह्या पदराची जादू आईची शिदोरी प्रत्येक लेकीने अनुभवायलाच हवी.

                     अनुप्रिया आदित्य सावंत.
                     पुष्प 19