Saturday 27 February 2016

कविता #11 - 'मराठी राजभाषा दिन' - हार्दिक शुभेच्छा!


'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'.

     27 फेब्रुवारी, हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.  कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर - थोर कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध.  त्यांनी 'कुसुमाग्रज' ह्या टोपण नावाने त्यांचे कवितालेखन केले.) यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे.  हा वारसा आपण आणि आपल्या भविष्यातील पिढीने जपला पाहिजे.   आणि तो अखंड सुरू रहावा याच स्फूर्तीने कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.  

मराठीचा छंद
मराठीचा गंध,
लाभला वारसा
भारतीय आमुचा जन्म.

बोलतो मराठी
ऐकतो मराठी,
जाणतो मराठी
अभिमान रुपी.

संतसज्जनांनी प्रत्यक्ष
देव जन्मभूमी लाभली,
सर्व त्यागुनी वीरांनी
मराठी मायभूमी घडविलीं.

अनंत ध्येयसक्तींनी
कवीरूपी माय सजली,
नानाविध अलंकार
भूषवित मराठी अवतरली.

सहज सोपी सुंदर भाषा
घेते हृदयी ठाव मनाशी,
अभिमान आम्हा भारतीयांना
गर्जतो मराठी मी मराठी.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

                                                   - अनुप्रिया सावंत.

Monday 15 February 2016

कविता #10 - व्हॅलेंटाइन स्पेशल - माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

     दरवेळेस ठरवतो आज तरी तिला आपण बोलू शकू. पण नाही, ह्याही वेळेस मन धजावले.  माहित आहे मला तुलाही मी आवडतो!  पण का तुला हे सांगता येत नाही, कि मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो.  तुही बोलायला तयार नाहीस पण माझे अबोल मन तर तुला कळतेय ना! 
     व्हॅलेंटाइन डे होऊनही प्रेम व्यक्त करता नाही आले...
प्रेम असूनही तुला सांगता नाही आले.  खरं तर प्रेमाचा दिवस ठरवून ते तेव्हाच व्यक्त करतात असे काही नसते, हे जाणतो गं मी.  पण तरीही...
प्रीतीची भाषा, प्रेमाचा अबोल नजराणा
ह्या शब्दरूपी कवितेतून तू
जाणशील का माझ्या भावना?


दोघांच्या प्रेमाचा अबोल नजराणा,
मनाची चलबिचलता प्रीतीचा नजारा,

दिल मे तेरी तस्वीर, धडकन मे तेरी धून
तुझ्याचसाठी मी वेडा कळेल का तुला?

कर्तव्य परायणता, कर्तव्य दक्षता,
प्रेमाची निष्ठा, तुझीच आस्था..
तत्परता आपुली नि मनाची आतुरता,
अबोलं मन माझे कळेल का तुला?

तुझ्यावरच प्रेम, मन सांगायला धजतयं...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

हृदय तुझ्याच प्रेमासाठी आसुसले,
नजर नित्य राही तुझ्याच वाटेला...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

जवळ असतानाही मन तुलाच पाहत रहातं,
लांब असतानाही मन तुझ्याच जवळ असतं..
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

दूर जाताना न वळता सहज निघूनही जातेस...
तुझ्या पाऊल वाटा शोधत नजर फिरत राहते..
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

जे ठाउके मजला ते माहित मलाच...
तुला ते माहित असावे कि नसावे,
ह्या प्रश्नाचीही मनी नाही आस...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

शेवटच्या क्षणी माझ्या तू जवळ असावीस,
डोळे भरुनी पाहत तुला मी तुझ्याच जवळ असावं...
मनाची ही तळमळता, नजरेची ही आतुरता...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

                                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday 3 February 2016

सेकंडरी स्टोरेज मेमरी

    संगणकाच्या मेमरी साईझविषयी आपण मागील सदरात जाणून घेतले.  आता पाहूयात ह्या मेमरीज कुठे आणि कश्या पद्धतीने साठवल्या जातात.

     आपण बाहेरून एखादी वस्तू आणली की, ती वस्तू तिची जागा बघून त्या ठिकाणी ठेवून देतो.  जर एखादा पदार्थ असेल तर आपण त्या पदार्थाचा आकार बघून त्या साईझच्या डब्यात तो पदार्थ ठेवून देतो.  त्याचप्रमाणे संगणकामध्ये आपण आपला डेटा आपल्या सोयीनुसार आप-आपल्या 'फोल्डर' मध्ये एखादी फाईल बनवून ठेवून देतो.  ह्यालाच 'डेटा स्टोर' करणे असे म्हणतात.  डेटा स्टोर करण्यासाठी आणि ही माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी सेकंडरी मेमरीचा वापर केला जातो.  

आपण पाहूयात ही सेकंडरी स्टोरेज मेमरी म्हणजे काय?

सेकंडरी स्टोरेज मेमरी - सेकंडरी स्टोरेज मेमरीला 'सहाय्यक संग्रह स्मृती' असेही म्हणतात.  या मेमरीतील माहिती कायमस्वरूपी साठवता येते.  या मेमरीत लिहिता येते आणि लिहिलेले पुस्तीही येते. (डिलीट करता येते).  सेकंडरी मेमरीची क्षमता प्रायमरी मेमरीपेक्षा अनेक पटीने जास्त असते.  ह्या मेमरीमध्ये साठवलेली माहिती आपण संगणकाला आज्ञा दिल्याशिवाय संगणक ती नष्ट करीत नाही.  ती आपण केव्हाही वापरू शकतो.  म्हणून या मेमरीला 'परमनंट मेमरी' असे म्हणतात.


ह्या सेकंडरी स्टोरेज मेमरीचे दोन प्रकारात विभागणी केली जाते.

१) नॉन रिमुव्हेबल मिडिया
२) रिमुव्हेबल मिडिया

१) नॉन रिमुव्हेबल मिडिया - कायमस्वरूपी बसवलेल्या स्टोरेज मेमरीला 'नॉन रिमुव्हेबल मिडिया' असे म्हणतात.  हार्ड डिस्क ही नॉन रिमुव्हेबल मिडियाचे उदाहरण आहे.

      ही हार्ड डिस्क सी.पी.यु. केबिनेटमध्ये कायमस्वरूपी बसवलेली असते.  हार्ड डिस्कमध्ये संगणकात 'इंस्टाल (INSTALL) केलेले प्रोग्राम साठवलेले असतात.

२) रिमुव्हेबल मिडिया - जी मेमरी आपण संगणकापासून वेगळी करू शकतो  आणि तिला हवी तिथे नेऊ शकतो, (म्हणजे पोर्टेबल)  तिला  'रिमुव्हेबल मिडिया' असे म्हणतात.  CD , DVD , पोर्टेबल हार्ड डिस्क, पेन डाइव्ह, कार्ड-रीडर हे रिमुव्हेबल मिडियाचे उदाहरण आहेत.  

       ह्या साधनांद्वारे आपण माहिती एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडे पाठवू शकतो.  
      म्हणजेच ज्या साधनांद्वारे आपण संगणकातील माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो ते साधन रिमुव्हेबल मिडिया अंतर्गत येते.

      रोजच नवीन नवीन टेक्नोलॉजी उदयास येत आहेत आणि  दिवसेंदिवस त्यांचा विस्तार हा वाढतच आहे.        
   पुढच्या सदरात आपण जाणून घेऊयात आपल्या बेसिक संगणक शिकण्यासाठीच्या तसेच संगणकात आवश्यक ती माहिती एका ठिकाणी व्यवस्थितरीत्या ठेवण्यासाठी वापरात येणाऱ्या फाईल व फोल्डर ह्याविषयी.

              मागील लेख                                                                              पुढे पहा