Tuesday 10 September 2019

शिदोरी - मिनी कपाट

शिदोरी - मिनी कपाट
     आज घरी जायला जरा उशीरच झाला म्हणा, त्यात हा पाऊस म्हणजे काही नेमच नाही.   केव्हाही येतो केव्हाही जातो.  आईने फटके दिल्यासारखे नुसता रुसून फुगून असतो, तर कधी मनात येईल तेवढं तांडव करतो.  तरी कुहू आठवणीने सांगत होती, त्या अंब्रेला ताईला घेऊन जा तुझ्यासोबत. कुहू माझी लहान बहीण, पण सगळं कसं आजीबाई सारख घरातल्यांकडे लक्ष असतं.

     कुहू घरी नसेल की आम्हाला कोणालाच अजिबात करमत नाही.  आई, बाबा, चिनु आम्हाला सर्वांना तिचा सहवास अगदी हवाहवासा असतो कारण तिचा सहवास आमचा श्वास आहे. आमच्या चिन्याचे कपाट म्हणजे एखाद्या डोंगरातून अचानक येणारा धबधबा असतो, तर माझा ड्रेसिंग टेबल म्हणजे छु मंतर सारखं गायब कम प्रकट होणारे अदलाबदलीचे प्रयोग असतात. आणि आमची कुहू आमच्यसाठी जिनी बनून आलेली सोनपरी.

     चिन्याला कपाटाच्या प्रत्येक कप्प्यात अगदी कोंबून ठेवायची सवय, तर माझ्या प्रत्येक वस्तू इथे तिथे ठेवण्याच्या वेंधळ्या सवयीमुळे बऱ्याचदा आईचा ओरडा ठरलेलाच असतो. मात्र बाबांपर्यंत कम्प्लेन्टबॉक्स जायच्या आधीच आमची कॉम्प्लेन गर्ल ह्या कानाची खबर त्या कानाला लागू न देता सर्व काही तिच्या जिनीच्या प्रयोगातून आवरून घेते.  आहे ना गंम्मत! अर्थात ह्या गंमतीचा खरा भाग म्हणजे हे कोडे आम्हाला नंतर सुटले.

     पाऊसातून छत्री आणि बॅग सांभाळत घरी येणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत असते.   पण आमच्या कुहूची बॅग म्हणजे एखादं मिनी घर आहे.  हो खरंच, काय नसतं त्या बॅगेत म्हणून सांगू?  सुई दोऱ्या पासून पाणी, बिस्कीट, शुगर पावडर, मिरची पावडर ते अगदी मेडिकल किट पर्यंतच्या अनेक गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि विश्वासाचं नातं असणारी 'उदी' त्यात अगदी नीटनेटके ठेवलेली असते. 

     परवाच्या दिवशी आमची कुहू घरी येत असताना तिने केलेला पराक्रम डोळे दिपवतील असाच होता. पावसाचे तांडव नृत्य, तिची बॅग, पिशवी, छत्री आणि सामसूम रस्ता ह्यातून मार्ग काढत येत असताना तिला एक अनोळखी वयस्क व्यक्ती दिसली. प्रथमदर्शनी तिने दुर्लक्ष करून पुढे निघाली. मात्र धाडकन होणाऱ्या आवाजाने तिच लक्ष वेधून घेतलं आणि धावत पळतच ती त्या वयस्क व्यक्तीच्या दिशेने धावली. त्यांना पडल्यामुळे लागलेला मार आणि वाहती जखम ह्यामुुुळे ग्लानी आली.   क्षणभरही न थांबता न घाबरता तिने त्यांना उचलून बसवले. आजोबांना ग्लानी येत असल्यामुळे प्रथम बॅगेत असणारे डेक्सट्रोज(शुगर पावडर) त्यांना खायला दिले.  इतक्यावरच न थांबता पाणी आणि बिस्कीट त्यांना खाऊ घातले.  नेहेमीचा तिच्या बॅगेत वास्तव्य करणारा मेडिकल किट बाहेर डोकावत असताना लागलीच त्याला हाताशी घेत तिने त्यांची जखम पुसून घेतली.  थोडंस त्यांना बरं वाटल्यावर त्यांच्याकडून घरच्यांचा नंबर घेऊन तिने त्यांच्याशी संपर्क करून सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. 

     घरी आल्या आल्या तिने आधी देवाला नमस्कार केला. आणि आम्हाला घडलेला प्रसंग अगदी शांतपणे सांगितला. तिचे ऐकताना आम्ही घरातले सर्वच आवक् होऊन तिला पाहतच बसलो.   तिच्या बॅगेला नेहमीच थट्टा मस्करीने चिडवत आम्ही खुदूखुदू हसायचो.  कुहू मात्र ह्या चिडवण्यावर कधीच रागवायची नाही, पण ती नेहमीच तिच्या मिनी बॅगेला कुरवाळत तिच्या जागी नीट ठेवायची.  आज हीच बॅग जीला आम्ही 'मिनी कपाट' म्हणून चिडवायचो, तीच अगदी रुबाबदारपणे अभिमानाने आमच्याकडे पाहताना भासत होती. 

     घडलेला प्रसंग आणि अशा बऱ्याच गोष्टीचे अनुभव आणि तिच्या मिनी बॅगेचे रहस्य आमच्यासमोर ती उलगडत होती.  ट्रेन, बस, कॉलेज, क्लास, मार्केट, अशा अनेक गोष्टीबाबत मिनीबॅगेची कमाल आम्ही निःशब्द होऊन ऐकत होतो.  बॅगेचे ओझे कधीही न वाटून घेणारी कुहू आणि कुहूसोबत तिच्या मिनी कपाटाने आज आम्हाला प्रॅक्टिकल शिकवण दिली होती. कुहू मधील एवढे धाडस, एवढी सतर्कता, एवढी संयमता, एवढी धीरता आणि तिच्यातले 'आत्मबल' पाहून आमच्यात संमिश्र आनंदाच्या, गोंधळाच्या, अभिमानाच्या लहरी उसळत होत्या.  आमची लहान असणारी कुहू एवढी मोठी झाली, कळलंच नाही. 

     खरंच, तिच्यातले अंतर्भूत गुण, स्वयंसिद्धता आणि कुठल्याही परिस्थितीतील बदलाला सामोरे जाण्याची सहजता ह्याची शिदोरी म्हणजे खरं तर जादूची झप्पी आहे.  आणि तिची ही 'जादूची झप्पी' तिची नानु 'आई' आहे.  हो, नानु आई. कुहूची नानु आई, खरं तर आईच ती, आपल्या सर्वांचीच.  स्मित हास्य, गोडवा, मधुरता, स्निग्धता, कोमलता, कणखरता, खंबीरता, सहजता अशा अनेक शब्दांनाही मर्यादा पडाव्यात अशी आल्हादिनी असणारी, आमच्या कुहूला लाभलेली 'आई', हे सर्व तिच्याच 'आत्मबल' संस्काराचे बीज आहे. 

     गोड, गोंडस, हसरी, प्रेमळ, मनमिळावू आणि तितकीच शिस्तप्रिय.  आमचं जाण-येणं किंवा पाहणं-भेटणं असलं तरी आमच्या कुहूला तिचा सहवास अधिक लाभला, खरं तर तिच्या पदरात ती खऱ्या अर्थाने फुलत आहे. कुहूला पाहताना एक गोष्ट नेहमीच जाणवते, "संस्काराचे बीज आपण लहानाचे मोठे कुठे आणि कोणासोबत होत असतो ह्यात नसते, तर आपण कोणाच्या सहवासात घडतो, राहतो, त्याचे अनुकरण करतो आणि ती गोष्ट जीवनात उतरवतो ह्यात असते."

     कुहूला ही शिदोरी मिळाली तिच्या नंदा आई कडून, आणि ह्या शिदोरीतून तिने आम्हालाही नकळत घट्ट पदराने बांधलं. खऱ्या अर्थाने आईची शिदोरी तिचा पदर तिची नाळ तिने जोडली आहेच, निरंतर नाविन्यपूर्णतेने रसरशलेला 'आत्मबल' पुष्पाचा हा 'खजिना' आम्हाला वारंवार लुटायचा आहे.   त्या शिदोरीत मनसोक्त विहार करत जीवन घडवताना सजवायचं आहे.  स्वतः फुलताना त्याचा सुगंध बहरताना अनुभवायचं आहे, भक्तिभाव चैतन्याचा ह्या अनिरुद्ध प्रेम सागरात चिंब भिजायचं आहे.

                                        आत्मबल पुष्प 19
                                        अनुप्रिया सावंत.