Thursday 31 December 2015

कविता #8 - कविवर्य - मंगेश पाडगावकर


पावसाच्या सरी बरसाव्यात
तश्या शब्दांच्या बरसणाऱ्या सरीत
ओलचिंब भिजवणारे... मंगेश पाडगावकर

हवेचा गारवा स्पर्शून
प्रेमाचे बंध हळुवार
कवितेतून जोडणारे... मंगेश पाडगावकर

समुद्र आणि आकाशाचे मिलन
ज्या शब्द रचनेतून घडवावे
ते रचनाकार... मंगेश पाडगावकर

मुलांच्या बालमनाला
आनंदित करून
डोलायला लावणारे बालगीत
ते गीत... मंगेश पाडगावकर

प्रेम युगुलांना कवितेतून
ऋणानुबंधात जोडणारे
ऋणानुबंध... मंगेश पाडगावकर

मराठी संस्कृतीत तुरा
मानाचा रोवणारे
महाराष्ट्र गौरव... मंगेश पाडगावकर

भातुकलीच्या खेळामधल्या
राजा राणीला एकत्र आणणारे
शब्दरूपी घर... मंगेश पाडगावकर

निसर्गाशी संवाद साधताना
हळूच लेखणीच्या कुशीत
विसावणारे लेखक... मंगेश पाडगावकर

कवी मनाला
तेवत ठेवून
सतत प्रेरणा देणारे
प्रेरणास्रोत... मंगेश पाडगावकर

चांदण्यासंगे अंतरंगी
ओसंडून वाहणारे
नक्षत्रांचे देणे
ते नक्षत्र... मंगेश पाडगावकर

'माझे जीवन गाणे'
संपूर्ण जीवन प्रवास
सोप्या शब्दांसह मांडून
घेतला जगाचा निरोप
स्वर्गीय कविवर्य... मंगेश पाडगावकर

तुझेच कविमन तुलाच अर्पुनी
वाहतो आदरांजली
पुन्हा यावे या मायभूमी
जीवन गाणे रुपी.


                           - अनुप्रिया सावंत.

Sunday 27 December 2015

प्रत्यक्ष - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त




प्रत्यक्ष - १० वा वर्धापनदिन विशेषांक - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त

     'प्रत्यक्ष' ह्या दैनिक वृत्रपत्रास २०१५ च्या दत्तजयंतीच्या शुभमुहर्तावर १० वर्षे पूर्ण झाली. दर दिवशीच्या दैनिक वृत्तांसोबत प्रती वर्षी विशेष लेख असणाऱ्या प्रत्यक्षाची नवीन नवीन संकल्पना काळाच्या बरोबरीने असते. वास्तव्याची ओळख अगदी जवळून करून देणारा प्रत्यक्ष हा एकमेव असा दैनिक आहे, जो इतर राजकीय आणि बिगर राजकीय दैनिकापेक्षा अनेक पटीने वेगळा आहे.

     लहान मुलांच्या बुद्धीला चालना व मनोरंजन देण्यापासून ते अगदी तरुणांपासून थेट ज्येष्ठ लोकांपर्यंत उपयुक्त असे हे वृत्तपत्र आहे. जगातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा इत्यंभूत खबरी ह्यात असतातच.

     यंदाच्या ह्या विशेषांकामध्ये  मानवाचे जीवन ते अगदी रहस्यमय आदिवासींच्या जीवनातील वात्सव्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असलेल्या उलाढाली, नैसर्गिक आपत्तीचा तिढा, गोल्डन ट्रेनचे भुयार, अण्वस्राहून भयंकर 'अमली पदार्थ', तियांजीन स्फोट, नेपाळचा धरणीकंप, अमानवी व्यापार, 'मोबाईल बँकिंग' घोटाळे, The Catacombs of Paris ( रहस्यमय ठिकाण), नाझ्का लाईन्स(पेरू) - रहस्यमय ठिकाण, विलक्षण जीवसृष्टी, ट्यूब ट्रान्सपोर्ट ह्या आणि अश्या अनेक विषयांवर सखोल माहिती देणारे, जाणीव करून देणारे व वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला लावणारे विषय आहेत. त्यांची ओळख 
वाचताना आपल्याला प्रत्याक्षामुळे प्रत्यक्ष होत आहे.

     तसेच जॉर्जिया नेशनल अक्वेरिअम, वाळवंटातले मत्सालय, ट्रोपिकल आयलंड रिझोर्ट (जर्मनी) ह्या मानवनिर्मित सौंदर्याची ओळखही ह्यातून होते. फक्त एवढेच न्हवे, तर रोजच्या घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा, उलाढाली ह्यांची वास्तव्यातील घटना कळते. आजच्या जलद युगात अपडेट राहता यावे म्हणून मागच्याच वर्षी 'प्रत्यक्ष'
नववर्ष विशेषांक मार्फत 'सोशल मेडिया इश्यू' अंतर्गत ब्लॉग बनवणे, फेसबुक हाताळणे यांचे अतिशय बारकाईने मुद्दे मांडून तसेच ते सर्वांसाठी उपयुक्त व्हावे, प्रत्यक्षात वापरता यावे अश्या सुयोग्य रचनेत सादर केले होते. ह्याही वर्षी नवीन विषय आणि नवीन भेट ह्या संकल्पनेतून सोशल मेडिया दुनियेतील सफर विस्तृतरित्या पुन्हा एकदा घडवली आहे ती - ई-कॉमर्स आणि पेमेंट्स ह्या विषयाच्या सादरीकरणातून.

     वरील गोष्टी वाचत असतानाच लक्षात येते कि, "विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त" ह्या प्रत्याक्षाच्या वर्धापन विशेषांकातून अनेक गोष्टी ज्या आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला, पर्यायी आपल्या विश्वात घडत आहेत, त्यांची जाणीव होते. इंटरनेटच्या दुनियेत फेसबुक, ट्विटर ह्या सारख्या माध्यमातून जगाशी आपण जसे जोडले जात आहोत, तसेच 'प्रत्यक्ष'च्या माध्यमातून डॉक्टर अनिरुद्ध जोशी आपल्याला
काळासोबत चालायला खर तर चालवायलाच शिकवत आहेत.  ह्या वर्षीच्या विशेषांकमध्ये समाविष्ट केलेल्या गोष्टी जेवढ्या भयावह आणि महत्वाच्या आहेत, तेवढ्याच त्या जनमानसात वास्तव्याची कानउघडणी करणारे आहेत. ह्यातून जगातील घडामोडींच्या बाबतीत स्वतःचे व आपल्या आप्तीयांचे संरक्षण करत मानवाने कसे सतर्क राहायला हवे, ह्याची वारंवार प्रचीती येते.

     'दैनिक प्रत्यक्ष' हा आजच्या जीवनाला आणि वास्तविक घडामोडीला साजेशा असा असून त्याचे नियमित वाचन व्यक्तीला वेगळा दृष्टीकोन देते. इतकेच नाही तर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात, स्वतःला ह्या धावत्या जगात सतर्क, अपडेट ठेवण्यास मोलाची कामगिरी बजावतो. प्रत्येकाने वाचावे असे हे दैनिक प्रत्यक्ष नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर जगाला माहिती देऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतोच, पण त्याच बरोबर वाचकांना नेहमीच 'वेगळ' देऊन वास्तव्यातील घटनांच्या शैलींचा छटा बारकाईने पाहण्यास शिकवतो आणि हेच प्रत्यक्षचे वैशिष्ट्य आहे.

    आध्यात्मिक ते वैज्ञानिक ह्यांची उत्तम जोड 'प्रत्यक्ष'मध्ये वेगवेगळ्या स्वरुपात पहायला मिळते. 'प्रत्यक्ष' हा 'आपला मित्र' आहे. काळासोबत चालायचे असेल तर प्रत्यक्षची(आपल्या
प्रत्यक्ष मित्राची) साथ ही हवीच. 
     
     हीच माहिती हिंदीमधून 'प्रत्यक्ष मित्र''अंबज्ञ' प्रत्यक्ष मधूनही मिळते.  
http://www.pratyaksha-mitra.com/ 
     ह्या वेबसाईटला भेट देणाऱ्या प्रत्येकाला ह्या 'प्रत्यक्ष' चे महत्व आजच्या घडीला प्रत्यक्षात किती महत्वाचे आहे? ह्याची जाणीव आपसूकच होते.  आजच्या जगातील ह्या भीषण वास्तव्याला सामोरे जाण्यासाठी, चला तर मग चालूयात 'प्रत्यक्ष' सोबत...
                                                                
                                                                   अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Sunday 13 December 2015

'आपले आरोग्य' - 'आरोग्यम सुखसंपदा'

     आपल्या प्रत्येकाला वाटते आपण हेल्दी असावे. आपण मस्त सुदृढ दिसावे. मग आपण त्यासाठी निरनिराळे प्रयोग स्वतःवर करून पाहतो. अर्थात मीही पाहिलेच होते! पण हे निरनिराळे प्रयत्न डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेतल्यामुळे आणि तसेच सतत आपल्या मनाप्रमाणे रिझल्ट न मिळाल्यामुळे आपण कसलाही योग्य विचार न करता डॉक्टरही बदलतो. आरोग्याबाबत सगळ्यांच्याच मनात काळजी ही साहजिकच असते. पण त्या काळजीला योग्य मार्ग आणि योग्य सल्ल्याची आवश्यकताही असतेच. आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शकही. नाही का?

      १३ डिसेंबर २०१४, शहाजी राजे क्रीडा संकुल, अंधेरी येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी(एम. डी.) ह्यांचे 'आपले आरोग्य' ह्या विषयावर केलेले उचित आणि अत्यंत उपयोगी असणारे असे बहुपयोगी मार्गदर्शन मिळाले. उत्तम आरोग्य कसे असावे? आणि त्यासाठी आपल्या सवयी आपण हळू हळू का होईना, कसे उत्तम प्रकारे बदलून स्वतः मध्ये उत्तम बदल कसे घडवून आणू शकतो? हे त्यावेळी मनोमन पटले. आणि नुसते पटलेच नाही तर त्यानुसार प्रयासही सुरु झाले. आज १३ डिसेंबर, २०१५ म्हणजे एक वर्षातच डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाने शरीरातील व मनातील उचित बदल मी स्वतः आणि माझ्यासह माझे कुटुंबही अनुभवत आहे.

      मला केव्हाच सकाळी उठल्यावर ब्रेक फास्ट करणे आवडत नसायचे. त्यामुळे सकाळचा नाश्ता करायची मला सवयच न्हवती. फक्त चहा घेतला की माझी सकाळ सुरु. हेल्थ विषयीच्या मार्गदर्शन करत असताना त्या सकाळच्या नाश्ताविषयीच्या मार्गदर्शनात डॉ. अनिरुद्ध(बापू) ह्यांनी सकाळच्या नाश्त्याचे महत्व कसे आणि काय असते हे पटवून दिले. रात्री झोपल्या नंतरच्या काळापासून ते सकाळी उठे पर्यंतच्या काळात आपल्या पोटी काहीच नसते. त्यामुळे अश्या रिकाम्या पोटी आपण चहा घेतल्यावर आपल्या शरीराला ते हानिकारक असते. सकाळी नाश्ता केल्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी उर्जा तर मिळतेच परंतु त्यामुळे आपल्यात उत्साह राहतो. त्यामुळे आता सकाळी उठल्यावर नुसता चहा घेण्याची सवय बंद होऊन त्यासोबत काही ना काही खाणे असतेच. कधी इडली, कधी ढोकला, कधी ब्रेड बटर कधी आणखी काही ज्यात लेस ऑइल असेल.

     लेस ओइल (कमी तेल) ह्यामुळे तर आणखी एक गोष्ट फार उत्तम घडली. ती म्हणजे, मला जेवणात तेल भरपूर टाकण्याची सवय होती. त्यामुळे प्रश्न पडायचा कि भाजीत तेल आहे कि तेलात भाजी! इथेही त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझे लेस ओइल ही संकल्पना उत्तम जोर घेत आहे. फिश फ्राय करताना डीप फ्राय करण्यासाठी लागणारे भारंभार तेल वापरणे खूपच कमी झाले. माझ्या जेवणात तेल आहे कि नाही हे घरच्यांना कळत तर नाहीच! परंतु जेवणाची चव जराही न बदलता ते जेवण आता घरचे अधिक चवीने खाऊ लागले आहेत. कारण नको असलेले अतिरिक्त तेल शरीरात जाण्यापासून सगळ्यांची सुटका तर झालीच आहे आणि त्याहीपेक्षा आता वजनही न वाढता शरीर सुदृढ दिसत आहे. एकंदरीत हा बदल सर्वांनीच अनुभवला आणि तो प्रत्येकाला आवडला.

     घरात सततचा चहा प्यायला लागणारी मी, आता चहाचे प्रमाण पहिल्यापेक्षा बरेच कमी झाले आहे. त्याहीपेक्षा चहामध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थात जिथे साखर लागते, ते आता बाद होऊन त्याची जागा Dextrose ने घेतली आहे. ह्यामुळे साखर पूर्णपणे बंद होऊन वजनही अटोक्यात आहे.

     डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांच्या 'आपले आरोग्य' ह्या मार्गदर्शनामुळे शरीरात आणि मनात जो अवर्णनीय बदल झाला आहे तो मी आणि माझ्या घरचे आम्ही सगळेच अनुभवत आहोत. आणि आम्ही ते एन्जोय करत आहोत. Yes! I Am Healthy. त्यांनी सांगितलेल्या अजूनही बऱ्याच गोष्टी अधिकाधिक जाणून घेऊन आणि त्या अमलात आणून हेल्दी राहण्याचा प्रयास आम्ही सर्वच करीत आहोत. 

 
'आरोग्यम सुखसंपदा' -  http://www.aarogyamsukhsampada.com/ 
  
     ह्या वेब साईट मार्फत अधिक मदत होत आहे.  आरोग्यविषयक उचित आणि निश्चित जाणून घेण्याविषयी डॉक्टर अनिरुद्ध (बापू) जोशी ह्यांनी केलेले मार्गदर्शन हे आयुष्याला नक्कीच 'आरोग्यम सुखसंपदा' असे करणारे आहे. सुंदर आयुष्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने असलेले असे हे मार्गदर्शन तुम्हीही नक्कीच अनुभवून पहा.


                                                         अनुप्रिया सावंत.


मागील कथा वाचा                                              पुढील कथा वाचा