Tuesday 10 September 2019

शिदोरी - मिनी कपाट

शिदोरी - मिनी कपाट
     आज घरी जायला जरा उशीरच झाला म्हणा, त्यात हा पाऊस म्हणजे काही नेमच नाही.   केव्हाही येतो केव्हाही जातो.  आईने फटके दिल्यासारखे नुसता रुसून फुगून असतो, तर कधी मनात येईल तेवढं तांडव करतो.  तरी कुहू आठवणीने सांगत होती, त्या अंब्रेला ताईला घेऊन जा तुझ्यासोबत. कुहू माझी लहान बहीण, पण सगळं कसं आजीबाई सारख घरातल्यांकडे लक्ष असतं.

     कुहू घरी नसेल की आम्हाला कोणालाच अजिबात करमत नाही.  आई, बाबा, चिनु आम्हाला सर्वांना तिचा सहवास अगदी हवाहवासा असतो कारण तिचा सहवास आमचा श्वास आहे. आमच्या चिन्याचे कपाट म्हणजे एखाद्या डोंगरातून अचानक येणारा धबधबा असतो, तर माझा ड्रेसिंग टेबल म्हणजे छु मंतर सारखं गायब कम प्रकट होणारे अदलाबदलीचे प्रयोग असतात. आणि आमची कुहू आमच्यसाठी जिनी बनून आलेली सोनपरी.

     चिन्याला कपाटाच्या प्रत्येक कप्प्यात अगदी कोंबून ठेवायची सवय, तर माझ्या प्रत्येक वस्तू इथे तिथे ठेवण्याच्या वेंधळ्या सवयीमुळे बऱ्याचदा आईचा ओरडा ठरलेलाच असतो. मात्र बाबांपर्यंत कम्प्लेन्टबॉक्स जायच्या आधीच आमची कॉम्प्लेन गर्ल ह्या कानाची खबर त्या कानाला लागू न देता सर्व काही तिच्या जिनीच्या प्रयोगातून आवरून घेते.  आहे ना गंम्मत! अर्थात ह्या गंमतीचा खरा भाग म्हणजे हे कोडे आम्हाला नंतर सुटले.

     पाऊसातून छत्री आणि बॅग सांभाळत घरी येणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत असते.   पण आमच्या कुहूची बॅग म्हणजे एखादं मिनी घर आहे.  हो खरंच, काय नसतं त्या बॅगेत म्हणून सांगू?  सुई दोऱ्या पासून पाणी, बिस्कीट, शुगर पावडर, मिरची पावडर ते अगदी मेडिकल किट पर्यंतच्या अनेक गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि विश्वासाचं नातं असणारी 'उदी' त्यात अगदी नीटनेटके ठेवलेली असते. 

     परवाच्या दिवशी आमची कुहू घरी येत असताना तिने केलेला पराक्रम डोळे दिपवतील असाच होता. पावसाचे तांडव नृत्य, तिची बॅग, पिशवी, छत्री आणि सामसूम रस्ता ह्यातून मार्ग काढत येत असताना तिला एक अनोळखी वयस्क व्यक्ती दिसली. प्रथमदर्शनी तिने दुर्लक्ष करून पुढे निघाली. मात्र धाडकन होणाऱ्या आवाजाने तिच लक्ष वेधून घेतलं आणि धावत पळतच ती त्या वयस्क व्यक्तीच्या दिशेने धावली. त्यांना पडल्यामुळे लागलेला मार आणि वाहती जखम ह्यामुुुळे ग्लानी आली.   क्षणभरही न थांबता न घाबरता तिने त्यांना उचलून बसवले. आजोबांना ग्लानी येत असल्यामुळे प्रथम बॅगेत असणारे डेक्सट्रोज(शुगर पावडर) त्यांना खायला दिले.  इतक्यावरच न थांबता पाणी आणि बिस्कीट त्यांना खाऊ घातले.  नेहेमीचा तिच्या बॅगेत वास्तव्य करणारा मेडिकल किट बाहेर डोकावत असताना लागलीच त्याला हाताशी घेत तिने त्यांची जखम पुसून घेतली.  थोडंस त्यांना बरं वाटल्यावर त्यांच्याकडून घरच्यांचा नंबर घेऊन तिने त्यांच्याशी संपर्क करून सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले. 

     घरी आल्या आल्या तिने आधी देवाला नमस्कार केला. आणि आम्हाला घडलेला प्रसंग अगदी शांतपणे सांगितला. तिचे ऐकताना आम्ही घरातले सर्वच आवक् होऊन तिला पाहतच बसलो.   तिच्या बॅगेला नेहमीच थट्टा मस्करीने चिडवत आम्ही खुदूखुदू हसायचो.  कुहू मात्र ह्या चिडवण्यावर कधीच रागवायची नाही, पण ती नेहमीच तिच्या मिनी बॅगेला कुरवाळत तिच्या जागी नीट ठेवायची.  आज हीच बॅग जीला आम्ही 'मिनी कपाट' म्हणून चिडवायचो, तीच अगदी रुबाबदारपणे अभिमानाने आमच्याकडे पाहताना भासत होती. 

     घडलेला प्रसंग आणि अशा बऱ्याच गोष्टीचे अनुभव आणि तिच्या मिनी बॅगेचे रहस्य आमच्यासमोर ती उलगडत होती.  ट्रेन, बस, कॉलेज, क्लास, मार्केट, अशा अनेक गोष्टीबाबत मिनीबॅगेची कमाल आम्ही निःशब्द होऊन ऐकत होतो.  बॅगेचे ओझे कधीही न वाटून घेणारी कुहू आणि कुहूसोबत तिच्या मिनी कपाटाने आज आम्हाला प्रॅक्टिकल शिकवण दिली होती. कुहू मधील एवढे धाडस, एवढी सतर्कता, एवढी संयमता, एवढी धीरता आणि तिच्यातले 'आत्मबल' पाहून आमच्यात संमिश्र आनंदाच्या, गोंधळाच्या, अभिमानाच्या लहरी उसळत होत्या.  आमची लहान असणारी कुहू एवढी मोठी झाली, कळलंच नाही. 

     खरंच, तिच्यातले अंतर्भूत गुण, स्वयंसिद्धता आणि कुठल्याही परिस्थितीतील बदलाला सामोरे जाण्याची सहजता ह्याची शिदोरी म्हणजे खरं तर जादूची झप्पी आहे.  आणि तिची ही 'जादूची झप्पी' तिची नानु 'आई' आहे.  हो, नानु आई. कुहूची नानु आई, खरं तर आईच ती, आपल्या सर्वांचीच.  स्मित हास्य, गोडवा, मधुरता, स्निग्धता, कोमलता, कणखरता, खंबीरता, सहजता अशा अनेक शब्दांनाही मर्यादा पडाव्यात अशी आल्हादिनी असणारी, आमच्या कुहूला लाभलेली 'आई', हे सर्व तिच्याच 'आत्मबल' संस्काराचे बीज आहे. 

     गोड, गोंडस, हसरी, प्रेमळ, मनमिळावू आणि तितकीच शिस्तप्रिय.  आमचं जाण-येणं किंवा पाहणं-भेटणं असलं तरी आमच्या कुहूला तिचा सहवास अधिक लाभला, खरं तर तिच्या पदरात ती खऱ्या अर्थाने फुलत आहे. कुहूला पाहताना एक गोष्ट नेहमीच जाणवते, "संस्काराचे बीज आपण लहानाचे मोठे कुठे आणि कोणासोबत होत असतो ह्यात नसते, तर आपण कोणाच्या सहवासात घडतो, राहतो, त्याचे अनुकरण करतो आणि ती गोष्ट जीवनात उतरवतो ह्यात असते."

     कुहूला ही शिदोरी मिळाली तिच्या नंदा आई कडून, आणि ह्या शिदोरीतून तिने आम्हालाही नकळत घट्ट पदराने बांधलं. खऱ्या अर्थाने आईची शिदोरी तिचा पदर तिची नाळ तिने जोडली आहेच, निरंतर नाविन्यपूर्णतेने रसरशलेला 'आत्मबल' पुष्पाचा हा 'खजिना' आम्हाला वारंवार लुटायचा आहे.   त्या शिदोरीत मनसोक्त विहार करत जीवन घडवताना सजवायचं आहे.  स्वतः फुलताना त्याचा सुगंध बहरताना अनुभवायचं आहे, भक्तिभाव चैतन्याचा ह्या अनिरुद्ध प्रेम सागरात चिंब भिजायचं आहे.

                                        आत्मबल पुष्प 19
                                        अनुप्रिया सावंत.

Sunday 5 May 2019

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

     


     गेल्या काही महिन्यांमध्येही व्हेनेझुएला चलन मूल्याचे मूल्य इतके कमकुवत झाले आहे की चलनवाढ फक्त चालूच आहे आणि सामान्य व्हेनेझुएला कामगार अगदी मूलभूत वस्तूही घेऊ शकत नाही.  

     व्हेनेझुएलामध्ये सर्वार्धिक मोठे तेल साठे आहेत. पण असे असतानाही आज व्हेनेझुएला सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना करत आहे.  थोडं मागे जाऊन ह्याचा ऐतिहासिक घडामोडीचा आढावा घेतला तर बऱ्याच गोष्टीचे मुळ लक्षात येते. 1990 च्या दशकातील उत्तरार्धात माजी अध्यक्ष असलेले ह्युगो चावेझ यांनी व्हेनेझुएलामध्ये तेल व्यवहाराद्वारे येत असलेल्या पैशामधून "मिझनेस" (Missions)म्हणून ओळखले जाणारे अनेक कार्यक्रमाअंतर्गत दारिद्र्य कमी करणे, असमानतेचा सामना करणे तसेच विनामूल्य आरोग्य सेवा प्रदान, मोफत शिक्षण व व्यक्तींना शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठीच प्रशिक्षण सुरू केले.

     चावेझ यांनी ग्रामीण भागात या क्लिनिकमध्ये येऊन हजारोंनी क्युबाचे डॉक्टर आयात केले.  ह्यासाठीचा लागणारा पैसा तेल उत्पन्नातील घेतला जाऊ लागला. मात्र असे करत असताना पेट्रोलियमच्या किमतीतील झालेली लक्षणीय घट व्हेनेझुएला सरकारला भरून काढण्यात अक्षमता निर्माण झाली. त्यातच, व्हेनेझुएलाचे पेट्रोलियम कमीत कमी दरात सहयोगींना विकण्यास बांधील होते.  परिणामी उत्पन्न महसूल केवळ खर्च होत राहिल्याने पायाभूत सुविधांकडे सरकार लक्ष देण्यास अकार्यक्षम ठरत गेले. 

      ह्यावर उपाय म्हणून व्हेनेझुएला सरकारने अधिक पैसे छापून महसुलाची गरज असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे चलनवाढीचा दरही वाढला, कारण चलन खरेदीच्या पैशात चलन वाढते. चावेझ आणि त्याचे उत्तराधिकारी निकोलस मदुरो यांनी मोठ्या चलनवाढीच्या बदलांमुळे या वाढत्या चलनवाढीला प्रतिसाद दिला.


     2008 मध्ये पहिला बदल झाला तेव्हा व्हेनेझुएला मानक बोलिव्हरपासून बॉलिव्हर फुएरटे (मजबूत) वर वळला तेव्हा जुने चलन 1,000 युनिट्सचे होते.  ऑगस्ट 2018 मध्ये व्हेनेझुएलाने पुन्हा चलनात बदल केले, यावेळी बॉलिव्हर सोबेरानो (सार्वभौम) सह मजबूत बोलिव्हरची जागा घेतली. ही चलन मूळ बॉलीव्हर्सच्या 10 दशलक्षांपेक्षा अधिक किमतीची आहे जी एक दशकापूर्वीपेक्षा किंचित जास्त होती.  (चलन बदल संदर्भातील माहिती गुगल वरून घेण्यात आली आहे.)  परंतु या चलन बदलांनी अजुनही काही मदत झाली नाही त्यामुळे परिस्थितीही नियंत्रणात आली नाही.

     ह्या सर्वांचा परिणाम थेट व्हेनेझुएला स्थायिक नागरिकांवर होत आहे. सरकारी सबसिडीशिवाय व्हेनेझुएलाचे लोक अन्न खाऊ शकत नाही.  औषधे महागले, बाहेरून वस्तूंचे आयात करण्यात सरकार अकार्यक्षमता दाखवते.


     दक्षिण अमेरिकेचा देश बऱ्याच वर्षांपासून खाली घसरत आहे.  राजकीय अपयशीपणामुळे हायपरिनफ्लॉवर, पावर कट आणि अन्न व औषधांची कमतरता वाढली आहे.  अलीकडील वर्षांत 30 दशलक्षांहून अधिक व्हेनेझुएलांनी देश सोडला आहे. आताचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांना बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाने केलेल्या वाढत्या प्रयत्नांमध्ये व्हेनेझुएलाचे राजकीय संकट उकळते आहे.  

     काही समस्या बर्याच काळापासून तशाच सुरू असतात. व्हेनेझुएलाचे आताचे मदुरो आणि त्यांचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ आहेत, जे नागरिकांच्या सध्याच्या क्रोधाचे जास्त लक्ष्य आहेत.


     चावेझ यांचे समाजवादी धोरणे ज्यायोगे गरीबांना मदत करण्यास मदत केली गेली. उदाहरणार्थ, किंमत नियंत्रणे, पीठ, स्वयंपाक तेल आणि टॉयलेटरीजची किंमत कमी करून गरीबांना मूलभूत वस्तूंपेक्षा जास्त परवडण्याकरिता अल्प दरात उपलब्ध करून दिले. परंतु त्यामुळे या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्हेनेझुएला व्यावसायिकांना इथली गुंतवणूक यापुढे फायदेशीर वाटत नाही.


     वरील सर्व महिती ही व्हेनेझुएलाचा पूर्व व सद्य इतिहासाला जोडून आहे. मात्र चालू काळात व्हेनेझुएलाची ही परिस्थिती दिवसेंदिवस अनेक घडामोडींनी अधिकाधिक संतापजन्य होत आहे.

     मे महिन्यात व्हेनेझुएलात झालेल्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष मदुरो यांनी गैरव्यवहार घडवून पुन्हा स्वतःलाच सहा वर्षांसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केले होते. मदुरो यांच्या या निर्णयाचे लॅटिन अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले होते. लॅटिन अमेरिकेतील देशांची संघटना असणार्‍या ‘लिमा’ व ‘ओएएस’ने मदुरो यांना यापुढे अधिकृत पातळीवर राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देणार नसल्याचा इशारा दिला. त्याचवेळी अमेरिकेनेही व्हेनेझुएलावर निर्बंध लादून राजवट बदलण्यासाठी अधिक आक्रमक कारवाईचे संकेत दिले. तरीही राष्ट्राध्यक्ष मदुरो ह्यांनी कशालाही ना जुमानता मित्र देश रशिया, चीन, इराण, क्युबा ह्यांच्या साहाय्याने आपली राजवट अधिकच सक्रिय केली आहे. 

  व्हेनेझुएलात निकोलस मदुरो यांच्या हुकुमशाहीविरोधात जनतेत तीव्र असंतोष असून अमेरिकेसह अनेक देशांनी त्यांचे नेतृत्त्व नाकारले आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला रशिया, चीन व क्युबासारखे देश व्हेनेझुएलाला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरवित असल्याचे समोर आले आहे.  या सहकार्यामुळेच मदुरो यांनी सत्ता राखण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने रशिया व चीनला यापूर्वीच व्हेनेझुएलातील हस्तक्षेप थांबविण्याचे इशारे दिले आहेत.

     व्हेनेझुएलात मदुरो यांच्या राजवटीवरील दडपण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारा पाठिंबाही कमी होत चालला आहे. रशिया, चीन, क्युबा, इराण यासारखे मोजके देश वगळले तर बहुतांश देशांनी व्हेनेझुएलातील मदुरो यांच्याशी असलेले संबंध तोडले आहेत. त्यामुळे व्हेनेझुएलातील परिस्थिती चिघळत चालली असून अन्नधान्य, औषधे, वीज यासारख्या मूलभूत घटकांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. 

व्हेनेझुएलांच्या आजूबाजूच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे हायपरिफ्लेशन.  राजधानी कॅरॅकसमधील एक कप कॉफीच्या किमतीत गेल्या डिसेंबरच्या एक आठवड्याच्या तुलनेत दुप्पट 400 बॉलीव्हर्ड्स इतकी वाढ होती, तर आता दुधाची किंमत 4,500 बॉलीव्हर्ड्स आहे.


     युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, 2014 पासून आर्थिक संकटामुळे 30 दशलक्ष व्हेनेझुएलांनी देशाला सोडले आहे.  त्यापैकी बहुतेक जण शेजारच्या कोलंबियामध्ये पोहचले आहेत, तेथून काही इक्वेडोर, पेरू व चिली येथे जात आहेत तर इतर दक्षिण ब्राझीलमध्ये गेले आहेत. 

     व्हेनेझुएलामध्ये किमान वेतन 18,000 बॉलीव्हर्स आहे, याचा अर्थ असा आहे की दुधाचे एक लिटर (वर दर्शविलेले) व्हेनेझुएलाला मासिक वेतन एक चतुर्थांश खर्च होऊ शकते.

     व्हेनेझुएला नागरिकांचे सरकारबद्दलचे म्हणणे आहे की, त्यांनी आम्हाला एक खराब दर्जा दिला, अनेक व्यावसायिक संधी मिळण्यापासून रोखले आणि त्याचबबरोबर त्यांनी व्हेनेझुएलाला पुढाकार दिला नाही तर सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, विद्यापीठ, सर्व गोष्टींमध्ये मागे पाडला आहे.

     ह्या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर, "व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेने मला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचे अधिकार दिले आहेत, फक्त मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे", अशा शब्दात व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांनी देशात लोकशाहीवादी बंड घडविण्याचे संकेत दिले. व्हेनेझुएलात गैरमार्गाने पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या निकोलस मदुरो यांच्याविरोधात उघड बंडाचे आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

        लॅटिन अमेरिकेतील तब्बल १७ देशांनी मदुरो यांची राजवट स्वीकारण्यास नकार दिला असून ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’ या संघटनेने उघडपणे विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे.

ह्या संदर्भात सविस्तरपणे वाचण्यासाठी:
वेबसाईट   - http://worldwarthird.com

ट्विटर      - @ww3Info , @NewscastGlobal


फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha

     व्हेनेझुएलाची आर्थिक स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी एक पूर्णपणे नवीन प्रणाली आवश्यक आहे; या क्षणी तेथे असलेल्या सिस्टममध्ये हे होणार नाही.   हे जाणून, संयुक्त राष्ट्राच्या उच्चायुक्त कार्यालयाने असे आरोप केले आहे की व्हेनेझुएला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आंतरराष्ट्रीय कराराच्या मानकांचे पालन करण्यास अयशस्वी ठरला आहे. 

     ह्यासर्व घडामोडींमुळे बाहेरचे जग व्हेनेझुएलाच्या आत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधून घेत आहे.  एकंदरीत युद्धजन्य स्थितीतील व्हेनेझुएलाशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या रशिया, इराण, क्युबा आणि चीनसारख्या राष्ट्रांसह, व्हेनेझुएलाची राजकीय आणि आर्थिक अस्थिरता त्यांना देखील प्रभावित करणार ही वास्तविकता आहे.

     शांतता व स्थैर्य हे देश व देशाचे नागरिक ह्या दोघांनाही लाभणे महत्वाचे असते.  प्रत्येक देश स्वतःच्या प्रगतीसाठी झटत असतो.  देशासंबंधित घेतले जाणारे निर्णय हे त्या देशासमवेतच नागरिकांसाठी देखील तितकेच महत्वाचे असते.  देशातील निर्णायक बदलामुळे देशातील धार्मिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती त्यानुसार प्रभावित होत राहते आणि हा प्रभाव प्रत्येक देशांवरही त्यानुसार होणारा असतोच.  कारण... Third World War has been started...

                                 - अनुप्रिया सावंत.

मागे पहा

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

Wednesday 20 February 2019

शिदोरी - 'आत्मबल - आईचा पदर'



     प्रत्येक लेकीला आईचा पदर हा हवाहवासा असतो. मनातलं दुखणं खुपण त्या पदराशी जोडून भावनांना मोकळी वाट करून देत असतं. प्रत्येक वेळी हा पदर हवा तेव्हा मिळतोच असे नाही. लग्न झाल्यानंतर ह्या पदराची लेकींना खूपच आठवण होत असते. त्या मायेची ऊब प्रत्येकीला हवीहवीशी वाटत असते. 

     नोकरी करणारी असो किंवा होम मेकर लेक असो; घर, मुले, कुटुंब ह्या सगळ्याच जबाबदारीत ती गुंतून जात असते. तरीही मायेच्या उबेची संध्याकाळ तिला नेहमी हवीहवीशीच असते.  स्त्री म्हणून मुलगी, बहीण, बायको, वहिनी, नणंद, आई, आज्जी ह्या कुठल्याही नात्यातील जबाबदारी पार पाडत असली तरी आईचा पदर तिच्यासाठी मखमलीची शाल, वास्तल्याची मऊ ऊब बनत असते.

     फास्ट लाईफ स्टाईलमध्ये अनेक नाती मागे पडतात. काही सोडून जातात, काही रागावतात, काही थांबतात तर काही तोडून जातात.  अनेक जबाबदारी पेलावत असताना कालांतराने नात्यांतील ओढही कमी होत जाते.   अबाधित असते ती एकच ओढ... 'आईचा पदर'.

     जीवनात अनेक अडचणी येतात-जातात, त्यावर अनेक जणी मात करतात, काही शिकतात काही सावरतात तर काही धडपडतात. ह्या सगळ्यात स्वाभिमान, अभिमान आणि आत्मविश्वास कळत नकळत कमी होत जातो.  अचानक काही जबाबदारीने खचूनही जातो. वेळेच्या पाठी पळताना कुटुंबाची काळजी घेताना स्वत्वाची जाणीवच मागे पडत राहते. जेव्हा जाणीव होते तेव्हा हक्काची व्यक्ती समोर असतेच असे नाही.  कुणाशी संवाद साधून मन मोकळे होईलच किंवा होतेच असे नाही.  मात्र आईचा पदर ह्या सगळ्याला अपवादच ठरत असतो,  नाही का?

     प्रत्येक लेकीला आपल्या आईकडून हौस मौज करून घ्यायला आवडतेच.   ह्यासाठी वयाचे मोज माप कधी असूच शकत नाही. माहेरहुन सासरी निघताना आई तिच्या लेकीची खण नाराळाने ओटी भरते. माझी नंदाई मात्र तिच्या प्रत्येक लेकीची ओटी भरते ते अनेकानेक संपन्न परिपूर्ण गोष्टींनी, तिच्या विशाल मायेच्या पदराने.

     धावपळीच्या जीवनात अनेक अडचणी येतात, संकटे उभी राहतात, आव्हाने असतात. ह्याला तोंड देताना अनेकदा मार्गही संपल्यासारखे वाटते. पण मायेने विचारपूस करणारा आवाज आणि तिचा पदर सोबत असला की दहा हत्तीचे बळ अंगात आल्यासारखी वीरश्री अनुभवायला मिळते. खरंच! माझ्यासाठी माझ्या आईचा माझ्या नंदाईचा पदर मला 'वीरश्री' देते. 

     आयुष्यात मागे वळून पाहताना आजची मी आणि पूर्वीची मी ह्यात स्वतःलाच अनेक पैलू पाहायला मिळतात.  राहून गेलेल्या गोष्टी, सुटलेल्या गोष्टी, हव्या असणाऱ्या गोष्टी आणि आवश्यक त्या महत्वाच्या गोष्टी ह्यांना उत्तमरित्या गुंफणारे नाथसंविध् आयुष्याला मिळाले, ते सद्गुरू कृपेने!  नाथसंविध्.


पिपासा 3 अभंगातल्या ह्या ओळी मनाला अधिकच स्पर्शून जातात.

शोधत होतो काय नक्की
तेही कधी कळले नाही
मनातली आकृती माझ्या
स्पष्ट कधी झाली नाही 


    मात्र ह्या अनिरुद्धच्या प्रेमाचा नंदाईच्या पदराचा तिच्या शब्दांचा तिच्या प्रेमाचा स्पर्श झाला आणि....


नूरली नशिबाची लढाई
क्लेश कष्ट सारे सरले
अनंत श्रमे न मिळे ते 
बापू कृपे जवळी आले.


     आईने तिच्या लेकीला नुसतंच घडवलं नाही तर जीवन सजवायला शिकवलं.  एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या बदलांना सहज सामोरे जाण्याचे बळ ह्या आईच्या पदराने दिले.  ही सहजता आईच्या ह्या शिदोरीने दिली. माहेरपणाचे सुख, आनंद, धम्माल, मज्जा, मस्ती आणि हक्काची कधीही न सोडून जाणारी मैत्रीण ह्या आत्मबलने दिली.  चारचौघात वावरण्याची सहजता, आत्मविश्वास ह्या पदरातून मिळाला.   हा पदर म्हणजे आनंदाची खाण आहे.  जितका लुटू तितका तो वाढतच राहतो.  जादू आहे आणि जादूची झप्पी पण ह्या 'आत्मबल' क्लासमध्ये आहे. नंदाईच्या पदरात लपलेली, भरभरून आनंद, समाधान आणि तृप्तीचे ढेकर देणारी एकमेव अद्वितीय असे, जिचे वर्णन शब्दात करताच येऊ शकत नाही, कारण ते अनुभवण्यासाठीच असते.  तिच्या लेकीच्या हक्काचे माहेरपण आणि माहेरपणाचे अनेकानेक हितगुज.

    तिच्या लेकींसाठी हे सर्व करत असताना, तिला घडवत असताना ही माय ना कधी दमत नाही कधी थकत.  हिच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मित झळकत असते.  लेकीसाठी अगदी धावत पळत येत असते.  स्वतःचे कितीही बिझी शेड्युल असले तर लेकींच्या प्रेमापोटी ही प्रत्येक क्लासला हजर असते ते तिच्या लेकीची नानाविध संपन्न गोष्टींनी स्वतःच्या पदराने ओटी भरण्यासाठी.  स्वतःचे घर सांभाळून इतरही अनेक जबाबदाऱ्या ही लीलया पार पाडत असते.  स्वतः प्रत्यक्ष करते आणि लेकींनाही तसं घडवते.  हिला कधी आराम करताना आम्ही खरंच पाहिलेच नाही.  आराम हिला माहीतच नाही.  तिच्या शिदोरीतून तिने आम्हाला स्वतःसारखे ऍक्टिव्ह राहायलाच शिकवले.  आज आम्ही जे काही आहोत, करतोय आणि आत्मबल क्लासमधून अनंतपटीने जो खजिना लुटला, अनुभवला, साजरा केला, आणि जीवनात उतरवला त्याचे सर्वच श्रेय माझ्या आईचे, तिच्या पदराचे आणि आत्मबलच्या शिदोरीचे आहे.   

     मला लाभलेल्या प्रत्येक गोष्टी मोठ्या आई चरणी अर्पण करते.  आणि आम्हा सगळ्याच लेकींसाठी नंदाईचा हा पदर सतत अधिक घट्ट पकडण्याचे नाथसंविध् अनिरुद्धा चरणी आम्ही वारंवार मागतो.  आम्ही सर्वच खुप भाग्यवान आहोत.

जय जगदंब जय दुर्गे!

     आयुष्यातला हा आत्मबदल ज्या स्त्रीला प्रत्यक्ष अनुभवायचा असेल, हिच्या मायेची ऊब अनुभवायची असेल, हिच्या पदरात सुखाची, आनंदाची, विसावाची, शांतीची, समाधानाची, प्रेमाची, कर्तृत्वाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आत्मविश्वासाची झेप घ्यायची असेल तर 'आत्मबल' हा आईचा पदराचा विशाल किनारा आहे जो अनिरुद्ध प्रेमसागरात ह्या भक्तिभाव चैतन्याच्या झऱ्यात मनसोक्त चिंब भिजवतो. 

     आत्मबल हा एक असा सेतू आहे जो आत्मबल ते आत्मबदल घडवणारा प्रत्येक स्त्रीला परिपूर्ण बनवून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे आनंदवन करणारा सुगंध आहे. नंदाईच्या प्रत्येक क्षणाच्या मेहनतीचा, अपार कष्टाचा, विशाल प्रेमाचा आणि कणखर व्यक्तिमत्वाचा एकमेव अद्वितीय असा वृक्ष आहे जो भक्तीभावचैतन्याच्या सुगंधाने निरंतर बहरत राहतो. आणि ह्याचा अनुभव आत्मबल अनुभवलेल्या प्रत्येक लेकीसह तिच्या कुटुंबालाही येत असतो.

    अबलाची सबला करण्याची ताकद ह्या माझ्या नंदाईत आहे. सुकणाऱ्या रोपट्याला, खुंटलेल्या प्रगतीला, आटत चाललेल्या नदीला प्रवाहित करत, फुलवून ताजेतवान, आनंदी, समाधानी, सुगंधित करणारी सोबतच जीवन आनंदानी समृद्ध करणारी माझ्या डॅडाची नंदाई माझी ही आई आल्हादिनी आहे.

    प्रत्येक मुलीला नेहमीच डॅडसारखं रहायला आवडतं. मुलीचे पहिले प्रेम तिच्या डॅडवर अधिक असते. असे असले तरी मात्र ह्या प्रेमासाठी लेकीला डॅडसारखे बनवण्यासाठीची अफाट मेहनत, कष्ट, शिस्त, आणि कणखरता ह्याचे भक्कम पाठबळ हे आईचेच असते.   ही किमया ही जादू तिने तिच्या पदराने भरलेल्या ओटीचीच असते.  हे अनुभवायला 'आत्मबल' ची शिदोरी प्रत्येक लेकीकडे असायलाच हवी.   ह्या पदराची जादू आईची शिदोरी प्रत्येक लेकीने अनुभवायलाच हवी.

                     अनुप्रिया आदित्य सावंत.
                     पुष्प 19