Thursday 6 December 2018

शिदोरी - दोन सुयांची


     थंडीच्या वातावरणातील संध्याकाळचा गारवा मनाला एकदम प्रफुल्लीत करतंय ना! सोबत वाफाळता चहा आणि चवीला कांदा भजी हे समीकरण तर मला ऑल टाईम भन्नाट वाटतं. काय वाटतं? कधी थकली, दमली, उल्हासित असली किंवा अगदी चिडलेली जरी असली तरी चहाशी मी कधीच रुसत नाही. निवांतपणे तर ह्याची माझी जास्तच गट्टी जमते. चहा व त्याची वाफाळती वाफ जणू अस्पष्ट धुकचं भासतात, जे मला माझ्या मनाच्या गावी अलगद घेऊन जातात.

     माझी आई, मी व चहा ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या की गप्पांना अगदी उधाण येतं. खासकरून थंडीच्या ह्या दिवसात मला आईच्या खास दोन सखी आवर्जून आठवतात.
हो, माझ्या आईच्या दोन खास आवडत्या सख्या आहेत. त्या आईच्या आवडत्या आहेत, की आई त्यांच्या आवडती, हे माझ्यासाठी एक गमतीशीर विधान आहे. ह्या दोन सख्या म्हणजे दोन सुया/निडल्स. आश्चर्य वाटलं ना! हो खरच. 

     ह्या निडल्सने ती जेव्हा तिच्या बाळांसाठी स्वेटर विणते तेव्हा तिला जो आनंद होत असतो, तो पाहणं हा माझा छंद आहे. हा छंद जोपासणं माझा ध्यास आहे.  ह्या दोन निडल्सची गोष्ट ऐकताना मन पूर्ण हरखुन जातं.  अफाट प्रेम, वात्सल्य, करूणा ह्यांचे मूर्तिमंत रुप असणारी ही माझी आई तिच्या लेकीची ओटी भरताना तिची शिदोरी जोडत असते, ते तिच्या प्रत्यक्ष कृतीनेच.

     आपण आपल्या बाळासाठी त्याला थंडी वाजू नये म्हणून कानटोपी, हातमोजे, स्वेटर हे घालून छान कव्हर करतो ना! मात्र अशी बाळं ज्यांना थंडी वाजते पण अंगावर घ्यायला चादरही नसते, घालायला स्वेटर नसतो, ना कान झाकायला रुमाल.  मग अशा बाळाची काळजी कोण करत असतं?  ही माझी आई मात्र हे करत असते आणि करवूनही सहज घेते.  ना कधी दमत, ना थकत, ना थांबत, ही फक्त कष्ट करत असते. तेही Unstoppable. Yes!

     आईच्या पदरात लपण्याची, खेळण्याची मज्जा वेगळीच असते ना! ह्याच पदराने जेव्हा ती लेकीची ओटी भरते तेव्हा मुलगी तीची शिकवण शिदोरी रुपी जपत असते.  हो ना!

   आपण प्रत्येक जण काही ना काही कामात अडकलेलो असतो.  रस्त्याने जाताना येताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, जाणवत असतात.  मात्र काही गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तर काही गोष्टी आपल्याला माहीत असून पण त्यासाठी काही करता येत नसतं. 

     रस्त्यावर आपल्याला अनेक लहान बाळ किंवा वृद्ध वयस्क स्त्री पुरुष दिसतात.   ज्यांना अंगावर नीट कपडेही नसतात. मग थंडीपासून संरक्षण करताना त्यांची तारेवरची कसरत होते. मुंबईची थंडी आणि गावाकडची थंडी ह्यात तर जमीन अस्मानचा फरक. तुटपुंज्या पगारावर घर खर्च चालवताना अनेक कुटुंब अनेक गोष्टींचा सामना करत असतात.  

     मग आशा ह्या बाळांना, कुटुंबांना आपल्या इथून स्वेटर विकत घेऊन देऊयात का? आई हे सांगत असताना आईचं बोलणं मध्येच थांबवत माझा प्रश्न मी आईला विचारला.

    जगात कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही ही माझ्या आईची शिकवण आहे.  प्रत्येक गोष्ट कष्ट करून घ्यायची असते आणि मग त्याचे रसाळ फळही आपल्याला परमेश्वर तितकेच गोड देतो.  हा माझ्या आईचा ठाम विश्वास. आईच्या हातात नेहमीच विणण्याचे निडल्स असायचे, ज्याने ती स्वेटर बनवायची.  तिला आम्ही सर्वच नेहमी सांगायचो, अगं आई आपण विकत घेऊन देऊयात ना!  कशाला स्वतःचा वेळ घालवतेस, तेवढा आराम मिळेल तुला. उगाच ते निडल्स आणायला दुकानात जायचं पुन्हा तासनतास विणत राहायचं,  हात किती दुखतात त्याने. पण आई आम्हाला फक्त छान स्माईल द्यायची. त्या हसण्यात वेगळीच प्रसन्नता लाभयची. 

    जस जसे मोठे होत गेलो तशी आईची शिकवण फुलत गेली.   हळूच स्मित हास्य करत आई आम्हाला ह्या निडल्सची गोष्ट त्याचे महत्व शिदोरी रूपाने द्यायला लागली. घरची, ऑफिसची, बाहेरची कामे तसेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनही तिचं निडल्स वरचं प्रेम कधीही कमी झालं नाही.  आणि तिच्या सवयीने ते प्रेम तिने आमच्याही ओटीत द्यायला सुरुवात केली.  आणि आम्ही कधी त्यात रमलो ते कळलंच नाही.

     आईच्या दोन सख्या म्हणजे ह्या दोन निडल्स 'भक्ती' व 'सेवा' ह्याचे प्रतिक आहेत.   कालांतराने हळु हळू हयाचेे स्ववरुपही कळत गेले.  आई हेे स्वेटर 'कोल्हापूर मेडिकल कॅम्प' मधील तिच्या बाळांना देण्यासाठी करत असते.  तिची बाळं हे स्वेटर घेताना व ते घालताना त्यांना जितका आनंद होतो, त्याच्यापेक्षा अधिक आनंद ह्या माऊलीला होताना पाहताना भान हरपून जाते.  आपल्या आईला असं आनंदात पाहणं हे प्रत्येक बाळाला हवंहवंसच असतं ना!  तो आनंद, तो उत्साह जेव्हा आपल्या आईकडूनच आपल्याकडे येतो तेव्हा खरच मनाला 'भक्तिभाव चैतन्य' लाभल्या सारखं वाटतं. खरंच!

     आई नेहमी सांगते, आपण जेव्हा ह्या दोन निडल्स घेऊन स्वेटर विणतो तेव्हा आपण 'भक्ती' आणि 'सेवा' ह्या परमेश्वराच्या आवडत्या गुणांना जोपासत असतो. आणि ह्यातून आपला सर्वांगीण विकास होत असतो. 


हल्ली धावपळीच्या जीवनात मनाला शांतता फार कमी मिळते. जरा मोकळा वेळ भेटला की असं वाटतं सगळं सोडून आईच्या पदराखाली लहान होऊन मनसोक्त बागडावं, तिची शिदोरी अनुभवावी. हा चहा, कसा मस्त आईच्या शिदोरीची सफर घडवून आणतो ना! माझ्या विचारांची तंद्री भंग करता नेमका फोन खाणाणला. इंकमिंग कॉल... आईsss!....
काय म्हणताहेत माझ्या दोन्ही सख्या? हाहा...

     जणू तिला बसल्या जागीच कळालं माझ्या मनातले विचार. आईच ना ती. आपल्या लेकीच्या मनातले कळणार नाही, असं कसं होईल?

     सेवा आणि भक्ती हे संसारातून परमार्थ करताना कसे साधायचे? ह्याचा मार्ग मला माझ्या आईने ह्या दोन निडलच्या साहाय्याने ओटी स्वरूपात दिल्या.   तिची ही शिदोरी तिच्या प्रत्येक बाळांसाठी आहे.   निःस्वार्थ प्रेम, निःस्वार्थ भक्ती आणि निःस्वार्थ सेवा परमेश्वराला अतिशय प्रिय आहेत.  आणि ही गोष्ट माझी आई तिच्या लेकींकडून अगदी सहज करून घेते.  तिची अपेक्षा , ईच्छा एकच आपल्या लेकीचं चांगलं व्हावं.   लेकींच्या संसाराची वेल फुलवताना भक्ती व सेवा घडवून तिचा प्रपंच सुखात करण्यासाठी माझी आई तत्पर असते.  ही तिच्या दोन सख्यांच्या साहाय्याने येणाऱ्या संकटातील काटे अगदी सहजच बाजूला काढते.  माझी आई आहेच सॉलिड, सेवेला भक्तीची जोड देऊन आयुष्यात भक्तिभाव चैतन्य निर्माण करणारी.  अशी सेवा, ज्याने.....
        जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यु लागो सार्थकी ।

     सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ‘अहिल्या संघा’ तर्फे ‘वात्सल्याची ऊब’ हा उपक्रम राबविण्यात येतो.  ज्या स्त्री श्रद्धावानांना स्वेटर्सचे विणकाम करण्याची इच्छा आहे, अशा स्त्रियांना अहिल्या संघातर्फे विनामूल्य विणकामाचे प्रशिक्षण दिले जाते.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ/ वेबसाईटला भेट द्या:
https://aniruddhafoundation.com/compassion-vatsalyachi-oob/

                           - अनुप्रिया सावंत.

Tuesday 4 December 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest


     सरकारने आखलेल्या धोरणांचा आपल्याला राग आला किंवा निषेध करायचा झाला तर आपण आंदोलने उभारतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा शब्द जवळजवळ माहीतच आहे. निषेध शांततेत होतो किंवा एखादया मैदानात सभा भरवून भाषणे केली जातात. मात्र ह्याचे स्वरूप तीव्र झाल्यास सर्वच नागरिकांना परिणामी त्या राष्ट्रालाही धोकादायक ठरते.

     भारतात 1993 ला झालेली दंगल व त्याचे स्वरूप बऱ्याच जणांनी पाहिले, अनुभवले. सरकारच्या धोरणेतील बदल जनसामान्यांनाही बदलवत असतोच.

     आपण भारतात राहत असलो तरी दुसऱ्या देशातील बदल आपल्या देशातही जाणवतो.  ह्याचे सोपे उदाहरण सांगायचे  झाले तर, देशातील आयात निर्यात वस्तूंबाबतचे करवाढ. कर वाढले की ते एकाच गोष्टीवर वाढले जातात असं कधीच होऊ शकत नाही.  प्रत्येक गोष्टींवर त्याचा परिणाम होताना आपण अनुभवतो.  दुधाचा भाव वाढला की टपरी वरील चहाचा भाव सुद्धा वधारतो.  मग तर  हॉटेलची गोष्टच वेगळी.

    बऱ्याचदा मिडल क्लास कुटुंबाचे गणित सुद्धा ह्या बदलाने बदलत जातात.  तर मग त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटांचे प्रश्नच दबले जातात. आमच्याकडे दूध विक्रेत्याने प्रत्येक लिटरमागे 2 रुपये वाढवले.  कारण ऐकून हसावं की रडावं हेच कळाले नाही.  म्हणतो कसा, क्या करे, पेट्रोल बढ गया इसलीये दूध का भाव भी बढ गया| आता सायकल वरून दूध विकताना पेट्रोल कसं खर्च होत, हे गणित काही केल्या सुटायला वेळच लागला.  सामान्य प्रश्न वाटला तरी प्रत्यक्षात त्याचा आवक खूपच मोठा आहे.

    सामान्य जनता अगदी दररोजच्या कमी अधिक बदलला सहज सामावून घेत असते.  मात्र जेव्हा हे बदल तीव्र स्वरूप घेतात तेव्हा मात्र अल्प उत्पन्न गटापासून उच्च उत्पन्न असणाऱ्या सर्वांनाच ह्याचा त्रास हा होतोच आणि त्याची परिणामीकता निषेधात होते.  हा निषेध शांत करणं हे सरकारचेच काम आहे, असं आपण सहज बोलतो ना!  पण तुम्हाला काय वाटतं... आपली जबाबदारी झटकून आपण थांबतो का?

    जागतिक घडामोडी पाहिल्या की आपण खरंच भारतात किती सुरक्षित आहोत ह्याची पदोपदी जाणीव होते.  आज फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाविषयी खूपच कमी जणांना माहित असावं. किंवा तो आपला भाग नाही, आपल्याला काय त्याचं... असही सहज म्हणतो ना आपण.

     जागतिक युद्ध हे प्रत्येक देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभावित करित असते.  हे युद्ध फक्त त्या देशांपुरतेच मर्यादित नाही राहू शकत.  कारण त्याचा विस्तार इतक्या प्रचंड वेगाने होत असतो की त्याची झळ बसल्यावर आपल्याला जाणीव व्हायला चालू होते.   फ्रांसमध्ये चालू असलेली चळवळ ही अशीच सामान्य नागरिकांपासून ते अगदी उच्चशिक्षित ते उच्चवर्ग ह्या सगळ्याच लोकांना घेऊन उभी आहे.  ह्याचे कारण(?)... वाढते इंधन कर.  ह्या चळवळीने इतके आक्रमक स्वरूप घेतले आहे की त्याला हिंसेचे रूप प्राप्त झाले आहे. 

     'गिलेट्स ज्यून्स' (पिवळे वेस्ट्स ) असे ह्या चळवळीचे नाव ठेवले गेले आहे. चळवळीत सहभागी लोकांनी पिवळे जॅकेट्स वापरून सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

     विरोधक हे फ्रान्समधील शहरे आणि ग्रामीण भागांमधून आले आहेत आणि त्यात अनेक महिला व एकल माता आहेत. बहुतेक निदर्शकांना नोकऱ्या आहेत, त्यात सचिव, आयटी कर्मचारी, कारखाने कामगार, वितरण कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी यांचाही समावेश आहे.  विरोधकांचे म्हणणे आहे की , त्यांचे कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांना बेसिक गरजा भागावणेही कठीण आहे.  काही जण म्हणतात आम्हाला खूप सावधपणे आमचं आयुष्य जगावं लागतं, जीवनातल्या सुखसोयी कमी होत चालल्या आहेत, परिणामी हॉटेल मध्ये जाण सुद्धा परवडत नाही.   काही आंदोलककारक म्हणतात की, आमचा पैसा इतका अपुरा आहे की आम्हाला आमच्या पालकांना घेऊन नर्सिंग होम किंवा धर्मदायमध्ये जावं लागतं. परिणामी ह्या सगळ्याच भावनांचा उद्रेक म्हणजे ही चळवळ.

     मॅक्रोनच्या (फ्रांस) सरकारने अनेक हवामान बदल-संबंधित इंधन कर लागू केले आहेत.  जानेवारीत आणखी एक पाऊल टाकणे समाविष्ट आहे.  मॅक्रॉन म्हणतात की, हे कर म्हणजे ड्रायव्हर्सला पर्यावरण-अनुकूल मॉडेलसाठी डिझेल-इंधन चालविणारे वाहन बदलविण्यास प्रोत्साहित करणे.  परंतु, अनेक मध्यमवर्गीय फ्रेंच नागरिकांना ही लूट वाटते.   ह्यासाठी जवळजवळ 75 हजारापेक्षा अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत.   विशेष म्हणजे ह्या चळवळीचा एकही सिंगल लीडर नाही(?) असे सांगितले जात आहे.  नोव्हेंबर आठवड्याच्या अखेरीस फ्रान्सच्या राजधानीच्या रस्त्यावर हजारो लोकांनी दंगली केल्या, त्यापैकी अनेकांनी कार चालवताना पिवळ्या पिशव्या लावल्या.

     2015 च्या पॅरिस वातावरणाच्या करारा अंतर्गत निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इंधनवाढ हा फ्रान्सच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  निवडून आल्यावर मार्कोनने पर्यावरणला प्राथमिकता देण्याचे वचन दिले होते, परंतु त्याच्या कर धोरणामुळे मध्यमवर्गीयातील बऱ्याच लोकांना वेगळे केले गेले. आणि त्याचे एकंदरीत परिणाम म्हणजे ही हिसंक झालेली चळवळ.

     फ्रान्स हा एक प्रजासत्ताक लोकप्रिय देश आहे, मात्र आज त्याची लोकप्रियता हिंसाचारात परावर्तित झाली आहे.  अतिशय घृणास्पद विध्वंस इथे चालू आहे.   जाणकारांचे म्हणणे आहे की ह्या लढाईत हिंसकता, निषेध, दंगली, विद्रोह हे अगदी गृहयुद्धापेक्षाही पुढे गेले आहे. आणि ह्यात काही कट्टरपंथीय आपले उद्दिष्ट साध्य करून घेत आहेत.
ह्या संदर्भात सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंक पहा:
वेबसाईट   - http://worldwarthird.com

ट्विटर      - @ww3Info , @NewscastGlobal

फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha

     आज आपण अभिमानास्पद अशा विशाल भारतात राहतो. आपला भारत देश महासत्ताकतेकडे यशस्वी वाटचाल करत आहे. इतर देशांशी आपले अनेक करार होत आहेत, वाढत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण त्या देशांशी जोडले जात आहोत.  ह्यावरून आपल्या लक्षात ह्या गोष्टी यायला हव्यात की चालू घडामोडींबद्दल आपण सुज्ञ नागरिक म्हणून कशाप्रकारे जागृत राहायला हवं.

     वरवर जरी हे आंदोलन किंवा चळवळ आक्रमकता व नागरिकांचे रोष वाटत असले तरी प्रत्यक्षात ह्या गोष्टी तिसऱ्या महायुद्धाला आव्हान देणाऱ्या आहेत.  कदाचित 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' षडयंत्राचा एक भागही असू शकतो.   कारण... Third World War has been started...

                                - अनुप्रिया सावंत.

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

Monday 3 December 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय


    


     'दहशतवाद व कट्टरपंथीयांपासून साऱ्या जगाला धोका' ही 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रातील बातमी वाचण्यात आली.  'दहशतवाद व कट्टरवादी यापासून साऱ्या जगाला मोठा धोका संभवतो.  म्हणूनच या धोक्याच्या विरोधात साऱ्या जगाने एकजुटीने कारवाई करायला हवी', असे आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी आवाहन केले आहे.  दहशतवाद आणि कट्टरवाद या जगासमोरील सर्वात मोठ्या समस्या आहेत. 

     भीती व दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हिंसात्मक गुन्हेगारी दहशतवादींकडून घडवून आणली जाते. राजकीय हेतूने प्रेरित असलेले हे दहशतवादी संघटित, नियोजित व हिंसात्मक कृती घडवून आणतात.  लोकांच्या धर्मभावना भडकवून राजकारण व धर्माच्या हट्टाहासासाठी खेळी खेळल्या जातात.  ह्याचा ज्वलंत इतिहास म्हणजे पाकिस्तानचे धार्मिक युद्ध व काश्मिरी पंडितांचा बळी.  उठाव आणि दंगली ह्यातून कट्टरपंथीय त्यांची भूमिका(?) वरचढ ठरवतात. आज कट्टरपंथी हे समाजावर वरचढ झालेले आहेत. 

    ह्याविरोधी आवाज उठवणे महत्वाचे झाले आहे.  गेल्यावर्षी सुरक्षदलांनी हाती घेतलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांच्या संपूर्ण उच्चाटनासाठी प्रचंड यशस्वी ठरले. ह्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे खच्चीकरण झाले.

     कट्टरपंथीयांची भूमिका ही अत्यंत द्वेषाची व वातावरण चिघळवण्याची आहे.  आताच्या  पॅलेस्टाईन लढ्यामागे इस्लामी हेतू असल्याची दाखवले जात आहे , मात्र त्यांचा मूळ हेतू मात्र अधिराज्य प्रस्थापित करणं आहे.  कट्टरपंथीय हे कोणत्याच देशाचे, राज्याचे किंवा मानवी हिताचे असूच शकत नाही. 

     कट्टरपंथीय जे तिसरे महायुद्धाच्या पटलावर कसे कार्यरत आहे, हे पहायचे झाले तर बरीच उदाहरणे आपल्या लक्षात येतील. 

   सौदीचे कट्टरपंथीय अमेरिका व इस्राईल विरोधक आहेत.  अस्साद राजवट आणि तेथील चाललेले खरे खोटे संघर्ष ह्याबद्दलही आपल्याला वृत्तपत्रातून हळू हळू माहिती होत चालले आहे.

  अमेरिकेतील इस्लामधर्मीय नेते 'वर्कशॉप फॉर पॅलेस्टाइन' बद्दल योजना आखताना वरवर जरी मानवतावादाचा दावा करत असले तरी त्यांची खरी योजना ही इस्राईल विरोधीच आहे.  जनतेला चिथावणी देणे, ज्यूंची कत्तल करून जेरुसलेमचा ताबा घेणे, जगभरातून जनतेला पॅलेस्टाईनच्या बाजूने वळवण्यासाठी मानवतावादाच्या नावाने सहाय्यता मिळवून त्याचे मार्केटिंग करणे.  कट्टरवादांचे असे अनेक मास्टरमाइंड प्लॅन जगभरात कार्यरत आहेत.

    युरोपात देखील हे कट्टरपंथीय फारच आक्रमक आहेत.  काही आठवड्यापूर्वीच अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये ज्यूधर्मीय द्वेषभाव बाळगणाऱ्यांनी केलेल्या विघातक कृत्यांच्या बातम्या समोर आल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आधीही ज्यूधर्मीयांच्या विरोधात असाच द्वेषपूर्ण प्रचार सुरू करण्यात आला होता. आणि आताही ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

    भारतात झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला, कट्टरपंथीयांनी घडवलेल्या 1993 च्या दंगली, बॉम्बस्फोट हे कोणीही विसरू शकत नाही.  आताच्या घडामोडीला चालू असलेला राममंदिराचा प्रश्न हा तर खूपच संवेदनशील आहे.  हा प्रश्न खरं तर प्रत्येक भारतीयांच्या मनाचा संवेदनशील भाग आहे. दहशतवादी संघटनेने राम मंदिर संदर्भात दिलेली धमकी ही चिथावणीची भाषा आहे.  ह्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध पेट घेऊ शकतं हे आपण सर्वच जाणतो.

   चालू घडामोडी ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने विशेष लक्ष वेधून घेतात.   दहशतवाद व कट्टरपंथीय या साऱ्यांच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने खडे ठाकले पाहिजे, असे आवाहन दूरदृष्टी असणारे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी केलेले हे विधान विशेष लक्षवेधी आहे.

    ह्या गोष्टी फक्त अमेरिका, इराण, इस्राईल, युरोप, अरब ह्या देशातच चालू आहेत, ह्या भ्रमातून आपण भारतीयांनी बाहेर यायला हवं.  ह्याविषयी आक्रमक होऊन नाही तर सक्रिय भूमिका घेऊन तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेची जाणीव करून घ्यायला हवी. 

    आपल्याला युद्ध करायला जायचे नाही तर ते युद्ध होऊच नये किंवा त्याची झळ, त्याची तीव्रता कमी करता येण्यासाठी माझी भूमिका काय ह्याचा वेध घेता यायला हवा. त्यासाठी जगात चाललेल्या जागतिक पातळींवरील घडामोडींची माहिती ठेवणे गरजेचे आहे.   प्रत्येक देशात अनेक कुगोष्टी सर्व दिशांनी प्रचंड वेगात वेगवेगळ्या पद्धतीने पसरत आहेत. 

     ह्याविषयीची माहिती आपल्याला 
            http://worldwarthird.com 
 या वेबसाईटवर अधिक विस्तृतरित्या पाहता येते.  तसेेेच इंग्लिश, हिंदी व मराठी या तीनही भाषांमध्ये आपल्याला ह्या विषयीची अधिक माहिती उपलब्ध होते.

   हल्ली आपल्या स्मार्टफोन मध्ये फेसबुक आणि ट्विटर हे दोन्ही ऍप असतात व ते आपण वापरतही असतो. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडी संदर्भातील बातमीसाठी कनेक्ट राहण्यासाठी आपण खालील ट्विटर व फेसबुक अकाऊंट आपल्याशी जोडू शकतो. जेणेकरून त्या पेजेस वरील अपडेटेड माहिती आपल्याला त्याचवेळेस नोटिफिकेशन्सद्वारे सहज उपलब्ध होते.
ट्विटर      - @ww3Info , @NewscastGlobal

फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha


    माझी भूमिका, माझी जबाबदारी, माझी आस्तिकता, माझी श्रद्धा, माझी धर्मनिरपेक्षता, माझा देश, माझे कर्तव्य, माझी निष्ठा ह्याबद्दल माझ्याच मनात नाही तर प्रत्येकाच्या मनात संवेदनशील जागृती करता यायलाच हवी. ह्याची जाणीव, खबरदारी हेच आपल्याला तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेला सामोरे जाण्यास सज्ज करतील.  कारण... Third World War has been started...

Thursday 29 November 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक


Image : Pratyaksh Newspaper
     
     आजचा 'बिगर राजकीय दैनिक-प्रत्यक्ष' हा वृत्तपत्र वाचताना त्यातील अमेरिकेतील चेटुकविद्येसंदर्भातील बातमी वाचण्यात आली. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडींवर नियमित अप टु डेट माहिती वाचकांना मिळवून देणारा हा एकमेव दैनिक वृत्तपत्र.

    ब्लॅक मॅजिक आणि थर्ड वर्ल्ड वॉर ह्याचा एकमेकांशी काय संबंध हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेलच.  पण खरंच, ह्याचा संबंध अगदीच आहेच आणि तोही ठराविक समूहामध्ये नसून हे अनेक देशातील कानाकोपऱ्यात घडत असणारे खरेखुरे प्रकार आहेत.  ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे 'अमेरिका'.  होय, उच्चशिक्षित उच्चभ्रू वस्ती असणारा हा प्रगत देश आणि तिथे चालतात ते चेटूकविद्या म्हणजेच ब्लॅक मॅजिक. 

   अमेरिकेत महिषासुराचे मंदिर उभे करण्यासाठी काही कुवृत्तीच्या लोकांनी आपला संघ तयार केला होता.  मात्र त्यालाच विरोध करणारेही तितकेच उपस्थित होते.  ह्या घटना आपल्या भारताबाहेरच्या असल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे कानडोळाच केला.  डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्दा ह्या गोष्टीला कडाडून विरोध केल्याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या.  पण त्याची फारशी गंभीरता नागरिकांना आली नसावी. 

  मात्र आता अमेरिकेसमोरची चिंता दार ठोठावत नसून आत प्रवेश करती झाली आहे. अमेरिकेतील काही संस्थाने ह्यांच्या दाव्यानुसार तसेच प्रत्यक्ष पाहणीनुसार ब्लॅक मॅजिक उपासकांची संख्या ही आठ हजारावरून पंधरा लाखांवर गेली आहे.  कदाचित त्याहीपेक्षा जास्त उपासक असावे, जे अजूनही जगासमोर आली नसतील.  धक्कादायक गोष्ट ह्यापेक्षा मोठी अशी की, ख्रिस्तधर्माशी एकनिष्ठ असणारे सश्रद्ध मंडळीही आता चेटूकविद्येच्या मायाजालात अडकत चालली आहे.

  Third World War is part of New World Order.  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' च्या पद्धतशीर मायाजालात जग अडकत चालले आहे.  कारण 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' (एनडब्लूओ) हे एक कुख्यात अस्पष्ट षड्यंत्र सिद्धांत आहे, ज्यात असे म्हटले आहे की काही शक्तिशाली गट गुप्तपणे जग चालवत आहेत आणि स्वतःची सत्ता स्थापन करू पाहत आहे.

  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हा शब्द नवीन नवीन नाट्यमय गोष्टीत जगाला अडकवून तसेच त्यांना गुलाम बनवून सर्व राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा नाश करण्यासाठी समर्पित गुप्त अभिजाताने वापरला जातो.

    खरं तर फक्त अमेरिका ह्यात अडकली आहे, हा समज चुकीचा आहे.  कारण तिसरे महायुद्धाची पार्श्वभूमी ही न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या रहस्यमय चालीने सुरू झाली आहे.  प्रत्येक देशात काही न काही अचंबित करणाऱ्या आणि अस्थैर्य प्राप्त करणाऱ्या घडामोडी घडतच आहे.

      आपल्या भारतात कधी न होणारी हॉलीविनची पार्टी सुरू झाली आहे.  ऑफिस, कॉलेज, शाळा इतकेच नव्हे तर अगदी ज्युनिअर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्यात सहभागी केले जात आहे.  मुलांना जरी ह्याची गम्मत वाटत असली तरी सुज्ञ आणि सुशिक्षित पालकवर्ग मात्र ह्यात हिरीरीने पुढाकार घेताना आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त कस भुतासारखं दिसता येईल, वेडीवाकडी किळस येणारी वेशभूषा देऊन जिंकविता येईल, ह्यात बेधुंद झालेले पाहण्यास मिळाले. 

     वेशभूषा केल्यामुळे कोणी चेटूक होत नाही किंवा त्याचे साधक होत नाही असे हसत हसत म्हणणारे मात्र नकळत महिषासुराचे साधक बनत आहेत.  माहित नसणे आणि माहित न करून घेणे दोन्ही गोष्टी घातकच आहेत.

     परवा माझी मैत्रीण तिच्या शेजारच्या कुटुंबाची गोष्ट सांगत होती.  मुलीला मूल होत नाही म्हणून अंगात येणाऱ्या बाबाला भेटायला गेले आणि वर्षभरात त्यांना मुल झालं.  त्यासाठी तीन रस्त्याला लिंबू फेकणे, पाठी वळून न बघणे, तसेच एखादा कपडा आणून त्याला होल्स करणे, वैगरे वैगरे गोष्टी होत्या. अशा विविध करणी-मंत्र-तंत्रचा प्रकार केल्यावर त्यांना मिळालेल्या फळामुळे त्यांचा आनंद(?) द्विगुणित झाला आणि नकळत ते चेटूक विद्येचे साधक झाले. 

    अजून अशीच एक साम्य तरीही वेगळी असणारी गोष्ट इथे प्रामुख्याने आठवली.  अमेय इंजिनिअर कॉलेजमध्ये असताना एक तंत्र-मंत्र करणारा साधक अनायासे त्यांच्या ग्रुपला भेटला.  आधीच मार्क सांगतो, पास करतो सांगून घेऊन गेला आणि त्यांचा त्याने स्वतःच्या काळ्या विद्येसाठी बळी दिला.  सश्रद्ध व स्वतःच्या मेहनतीवर तसेच परमेश्वरावर दृढ विश्वास असलेला अमेय मात्र त्यातून बचावला, ते त्या साधकाच्या नादी न लागल्यामुळे.  होय खरंच. परमेश्वर आहेच आणि त्यावर पूर्ण विश्वास आपल्याला कुठल्याही संकटातून सहज बाहेर काढते हे अमेयने अनुभवलं.

     आजकालच्या आपल्या सर्वांनाच सर्व काही झटपट हवं असतं. त्यासाठी गैरमार्गाचा वापर करायलाही काहीवेळेस आपण धजत नाही.   मात्र भक्तीची शिदोरी जवळ असली की सबुरी लाभतेच.  त्यामुळे चुकीच्या गोष्टीपासून रक्षण करण्यास, सद्गुरू आपल्या हाक मारण्याच्या आधीच उभा ठाकतो.   असत्यावर सत्याचा विजय हा नेहमीच असतो.  महिषासुराचा वध हा महिषासुरमर्दिनीकडून होतोच.

     अस्तिकता ही श्रद्धेमुळे येते, श्रद्धा ही भक्तीभावामुळे येते.  भक्तिभाव हा उपासनेतून उत्पन्न होतो.  चांगले कार्य करताना न हाक मारताही परमेश्वर संकटात सोबत असतोच.  मात्र वाईट कर्म करताना रावण त्याचे सर्व बळ एकवटतो, जेणेकरून त्याच्या साधकात भर पडून त्याच्या गुलामांची संख्या वाढेल.

   आज जगात एवढ्या प्रमाणात वाईट गोष्टी घडत आहेत, त्याचे उदाहरण देऊ तितके कमीच.  चॅलेंज घेणे, टिकटोक व्हिडीओ बनवणे, गेम्सच्या आहारी जाऊन स्वतःची मानसिक-शारीरिक हानी करणे, ह्या रोजच्या घडणाऱ्या गोष्टी असल्या तरी 'All Plan Set - एक अस्पष्ट षडयंत्र' प्रमाणे हे सर्व 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' चा एक भाग आहे,  हे आपल्याला आता कळायला हवे.

     आजकालची तरुणाई ह्या सर्व गोष्टी हसण्यावर घेते.  मात्र खरंच प्रत्यक्षात घडणाऱ्या ह्या घटना आणि त्या घटनांचे झालेले बळी ह्यांच्यातुन मात्र तिसरे महायुद्धाचे वादळ उभे ठाकले आहे आणि असुरी न्यू वर्ल्ड ऑर्डर सर्व प्लॅन सेट करत आहे. 

    ह्यातून आपण, प्रत्येक नागरिकाने, समाजाने बोध घेऊन वेळीच सावध व्हायला पाहिजे.  कारण... Third World War has been started...

                                 - अनुप्रिया सावंत.


थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय


थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

Wednesday 28 November 2018

ई-मेल(E-Mail) १ - इंटरनेटवर खाते तयार करणे

     आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेच. आपण मोबाईलचा वापर फक्त संपर्क करण्यासाठी करत नसून इतर अनेक गोष्टींसाठी करतो. उदाहरणार्थ, आधार कार्ड, लाईटबिल, गॅसबिल, मोबाईल बिल, बँक व्यवहार. 



    मला भजन ऍप त्यातील अभंग ऐकण्यासाठी वापरायचा आहे. हा ऍप वापरताना मला त्यात माझा स्वतःचा इमेल आयडी माहीत असणे महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय ऍप वापरता येऊ शकत नाही. अश्या वेळी आपण काय करणार?



    आपल्या जवळ आपला इमेल आयडी असणे आता गरजेचं झाले आहे. मी हाऊस मेकर आहे मग मला ह्याची काय गरज? किंवा मी आता नोकरीला नाही घरीच असते मग मला काय उपयोग? अशी उत्तरे ह्या टेक्नोसॅव्ही जगात देणे चुकीचे ठरेल. सध्याचे युग हे संगणकाचे आहे, त्यामुळे काळाला धरून असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीत असणे व त्याचा वापर करणे ही आजची गरज आहे.



     आपण जवळ जवळ सर्वेच जण व्हाट्स ऍप वापरतो मात्र बऱ्याच वेळेला असे होते की आपल्याला आपला इमेल आयडी माहीत नसतो. हो खरंय! असं आमच्या शेजारच्या काकूंच्या बाबतीत झालंय. त्या स्मार्टफोन वापरकर्ते आहेत मात्र त्यांच्या स्मार्टफोनसाठी लागणारी प्राथमिक व आवश्यक गोष्ट, स्वतःचा इमेल आयडी. तो त्यांना त्यांच्या मिनूने तयार करून वापरण्यास सज्ज करून दिला. हो, हे चित्र बऱ्याच घरांत थोड्याफार फरकाने असते.

     इंटरनेट आपल्या प्रत्येकाकडे हल्ली असतो. ह्याचे कारण व उदाहरण, आपले व्हाट्स ऍप, जे आपल्या फ्रेंड व फॅमिलीला एकाच जागी हवे तिथे आणून त्यांच्याशी संपर्क घडवते. 'गुड नाईट टेक केअर' हा मुव्ही आजच्या काळाची गरज व वाढत्या टेक्नोसॅव्हीचे चांगले-वाईट परिणाम तसेच संभाव्य धोके ह्यांची जाणीव करून देऊन ह्यातून बोध घेण्याचे ज्वलंत उदाहरण आहे. खास करून पालकांसाठी, त्यांच्या पालकत्वासाठी, प्रत्येक कौटुंबिक सदस्यासाठी हा मुव्ही खूप काही शिकवून जातो. आणि म्हणूनच टेक्नोसॅव्ही दुनियेत आपण जरी टेक्नोसॅव्ही नसलो तरी ह्या इथे वावरण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टींची माहिती तर हवीच पण त्याच बरोबर त्याचे प्रात्यक्षिक कृती स्वतःसाठी स्वतः करता येणेही तितकेच गरजेचे आहे. त्यातलेच हे महत्वाचे म्हणजे आपले इमेल खाते.

     ईमेलच्या साहाय्याने आपण संदेश म्हणजेच मेसेजेस पाठवू शकतो. फक्त माहिती टाईप करून नाही तर आपले फाईल्स, फोटो, व्हिडीओ क्लिप्स ह्या गोष्टीही पाठवू शकतो. मात्र ह्यासाठी इंटरनेट अकाउंट असणे आवश्यक आहे. आपला हा मेसेज कुठेही काही सेकंदामध्ये पाठविणाऱ्याला मिळतो. थोडक्यात, ह्याचा वापर गॉसिप, शुभेच्छा, आमंत्रण, बातम्या, व्यापार ह्यांची देवाणघेवाण करण्यासाठी होत असतो.

असा हा महत्वाचा असणारा ईमेल आपण कसा तयार करतात ते पाहुयात.

1. आपल्याला इमेल करण्यासाठी खालील गोष्टी असणे गरजेचे असते.

* आपला संगणक/ स्मार्ट फोन/ लॅपटॉप

* इंटरनेट केनेक्शन

* वेब ब्राऊझर

* इमेल अकाऊंट


2. आता आपल्याकडे वरील बाबी अंतर्गत इमेल अकाऊंट नसल्यामुळे तो तयार करायचा आहे.

त्याची कृती खालीलप्रमाणे:

1. वेब ब्राउझर वर क्लीक करा. (वेब ब्राउझर - इंटरनेट एक्सप्लोरर / मॉझिला / तुम्ही जो वापरत असाल)

खालीलप्रमाणे वेब ब्राऊझर स्क्रीन प्रदर्शित होते.






2. अड्रेसबार मध्ये तुम्हाला इमेल ज्या साईट वरचा हवा आहे त्या साईटचा अड्रेस टाईप करा. 


उदारहरणार्थ, 'याहू' किंवा 'जी मेल' ह्या साईट वरचा इमेल आयडी हवा आहे. तर त्यानुसार त्या साईटवर जाणे.
(इथे मी 'गूगल अकाऊंट - जी मेल' प्रात्यक्षिक करत आहे.)

खालील आकृती पहा.




3. आता जी प्रदर्शित स्क्रीन दिसते आहे, त्या स्क्रीनला 'लॉगिन विंडो / स्क्रीन' म्हणतात.




4. आपण प्रथमच आपला नवीन इमेल आयडी बनवत आहोत, त्यामुळे 'Create account' ह्यावर क्लीक करणार.


5. आता आपल्याला आपले अकाऊंट तयार करण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. 

त्यात आपले 

* First Name पहिले नाव 

* Last Name शेवटचे नाव

     ह्यानंतर त्याखाली आपल्याला आपले Username द्यायचे आहे म्हणजे आपल्याला आपले अकाऊंट नाव कोणत्या नावाने हवे आहे ते द्यावयाचे आहे. ह्या अकाऊंट / पत्त्यावर इतर व्यक्ती आपल्यालाशी आपल्या ह्या युझरनेमवर इंटरनेटद्वारे पत्रव्यवहार सुरू करू शकतील.


लक्षात ठेवा आपला युझरनेम हा इतर कोणीही वापरलेला नसावा. जर तुम्ही घेतलेला युझरनेम दुसऱ्या कोणी वापरला असेल तर तुम्हाला संगणक दुसरा युझरनेम वापरण्यास सांगेल. व त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शनही करेल. खालील आकृती पहा:



     
     त्याचप्रमाणे जर तुमचा पासवर्ड हा चुकीचा असेल किंवा आठ / 8 अक्षरांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एरर्र लाल अक्षरात दर्शवेल. आणि त्याप्रमाणे पुढे मार्गदर्शन करेल.

खालील आकृती पहा.




     नाव, युझरनेम, पासवर्ड इत्यादी व्यवस्थित संगणकाकडून मान्य झाल्यावर मला पुढील स्क्रीन दिसेल ती ह्याप्रमाणे:




     आता मला इथे माझी इतर माहिती पूर्ण करणे गरजेचे आहे.

     फोन नंबर हा त्यांनी ऑपशनल दिला आहे म्हणजे तो लिहिलाच पाहिजे ह्याचे काहीही बंधन नाही. आणि जरी आपण त्यांना आपला नंबर दिला तर तो इतरांना दिसणार नाही ह्याची आपल्याला खात्री देतात. हे आपल्या सुरक्षित खात्यासाठी / अकाऊंटसाठी असते.

    त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख त्यांनी सांगितल्या प्रमाणे लिहायची असते. प्रथम महिना, दिवस मग वर्ष. त्या त्या कॉलम वर आपण माऊस पॉइंटर नेऊन आपली माहिती पूर्ण करावयाची असते.

    त्याखाली जेंडर हा कॉलम असतो. त्यावर क्लीक करून तो पूर्ण करावा.

    जर एखादा कॉलम / रकाना भरण्यास आपण विसरलो किंवा तो रकाना रिकामा ठेवला तर आपण पुढच्या स्क्रीनवर जाऊ शकत नाही. संगणक लाल अक्षरांनी तो रकाना भरण्यास दर्शवितो. कारण बंधनकारक असलेले रकाने / कॉलम आपल्याला पूर्ण करणे हे गरजेचे असते. 





     हे सर्व पूर्ण करून नेक्स्ट / Next केल्यावर संगणक आपल्याला गुगल अकाऊंटचे नियमावली / Privacy and Terms चे स्क्रीन दाखवितो. त्या खाली I Agree ह्या बटनांवर क्लीक केल्यास आपले अकाउंट यशस्वीरित्या वापरण्यास तयार होते.





ह्यानंतर आपल्याला वेलकम ची स्क्रीन पाहण्यास मिळते.




     
     नेक्स्ट बटनांवर क्लीक करून आपल्याला हव्या असलेल्या व्ह्यू / दृश्य / डिझाईन मध्ये आपण आपले जीमेल अकाऊंट वापरण्यास तयार होते.





     येस! आपले इंटरनेटवरील पत्रव्यवहारासाठीचे दालन आपल्याला खुले झाले आहे, तेही आपण स्वतः तयार केलेले.  हो ना!


     मेल कसा लिहायचा, पाठवायचा व आलेले मेल कसे पाहायचे हे आता आपण पुढील सदरात पाहू.

                                                                              - अनुप्रिया सावंत.

         मागील लेख                               पुढील भाग

Wednesday 25 July 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

   

     आपल्या भारतात थर्ड वर्ल्ड वॉर ही गोष्ट 100 पैकी 2 जणांना तरी ठाऊक असेल का? ह्या बद्दल मला शंका आहे. खरं तर त्या 2 जणांमध्ये मी नवीनच ऍड झालेली मला मानते. ह्याला कारणही तसेच आहे. नुकत्याच एका आमच्या ग्रुप मध्ये ह्याची चर्चा चालू होती. आपल्याला दुसरे महायुद्ध पुस्तकी स्वरूपातून ऐकण्यात व अभ्यासनात आले ह्यावर जवळ जवळ सर्वेच दुजोरा देत होते. वर्धमानच्या तोंडातून तिसऱ्या महायुद्धविषयी ऐकताना आम्ही अक्षरशः त्याचा पापड करत होतो मात्र वीजेच्या आवाजसारखे त्याचे घडणाऱ्या घडामोडीतील गोष्टी ऐकून थंडर अनुभवत होतो.

     सिरिया, इराण, इराक, अमेरिका, इजराईल ह्यांची नावे आता पाठ झाली आहेत कारण सततचे त्यांच्यावरील काही न काही हल्ले किंवा घटनाक्रम. त्यांच्यातील घडणाऱ्या घडामोडी ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या पायाभरणीचे काम करत आहेत. हेही आम्हाला नव्यानेच जाणवत आहे. आपल्याला एक सवय असते... जो पर्यंत एखाद्या गोष्टीची झळ आपल्याला लागत नाही तो पर्यंत आपल्याला त्या भीषणतेची जाणीवही होत नसते. मुळात ते मान्य करणं आपल्याला पचत नाही. त्यामुळे उगाच कोणी काही माहिती सांगत असेल तर ती ऐकून घेण्याची संयमताही आपल्याजवळ नसते, असते ती फक्त अधीरता तेही बाष्कळ बडबड ऐकण्याची.  खरं तर तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे... आणि ह्याची झळ प्रत्येकाला पोहोचणारच आहे.  हे महायुद्ध देशादेशांतर्गत परिस्थिती नसून घर, ऑफिस, इतकेच न्हवे तर व्यक्ती व्यक्ती मधील मतभेद, वाद, तंटे ह्यास्वरूपातून आकार घेत आहेत.
    डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित सखोल अभ्यासपुर्ण तसेच वास्तव्याला धरून असणारे 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मला घडणाऱ्या घडामोडींची अर्थपूर्ण माहिती मिळविण्यास व त्याविषयी जाणून घेण्यास आणि त्याहुन अधिक त्याचा योग्य अर्थ लागण्यास मोलाची भूमिका बजावत आहे.  हे माझे वैयक्तिक ठाम मत आहे.

     आपल्या जागतिक आंतरराष्ट्रीय घडामोडीतील बातमीत तिसऱ्या महायुद्धाची बरीचसी माहिती आपल्याला वाचण्यात येते. माझ्या लेखणीतून दैनंदिन व्यवहारातील गोष्टींच्या घडामोडीद्वारे ह्या तिसऱ्या महायुद्धाची झळ नक्की काय आहे? ते मांडण्याचा प्रयास ह्या सदरातून केला जाईल.

     आज ऑफिस मध्ये कामाचा खूप लोड होता हे वाक्य संपते ना संपते तोच त्याला जोडून दुसरे वाक्य ह्यांनी पूर्ण केले ते म्हणजे ऑफिसच्या संगणकात वायरस आलाय... काय कसा केव्हा कोणाला कळायची फुरसत की काय सर्वांनाच आज जवळजवळ 24 तासाची ड्युटी झाली. 

     वायरस हा शब्द नेहमीच आपण ऐकतो पण सध्याच्या ह्या वायरसने मात्र जगाचीच झोप उडवली आहे. खरं तर थर्ड वर्ल्ड वॉर चा एक भाग म्हणायला हरकत नाही अस वाटावं इतका हा धुमाकूळ आणि त्याहीपेक्षा अधिक गोंधळ ह्या वायरसने घातला आहे.

     आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' वायरस 'वन्नाक्राय' या नावाने ओळखला जात आहे. भारतासह शंभराहून अधिक देश ह्या हल्ल्याला बळी पडले आहेत. 'रॅन्समवेअर' हल्ला म्हणजे लॅपटॉप किंवा संगणक चालू केल्यावर त्या स्क्रीनवर मेसेज दिसतो की तुमचा संगणक हॅक झाला आहे. जर तुम्हाला तुमचा डेटा हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर पेमेंटचा एक बॉक्स दिसतो त्यावर क्लीक करण्यास सांगितले जाते व अमुक रक्कम त्यांनी दिलेल्या वेळेत बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते. जर असे नाही झाले तर तुमचा डेटा डिलीट होतो. स्क्रीनवर दिलेल्या वेळेचे काउंट डाऊनही सुरू होते. ते पाहण्याव्यतिरिक्त स्क्रीनवर कुठलेही ऑप्शन नसते. कारण संगणक किंवा लॅपटॉपच्या पूर्ण ताबा हॅकर्सकडे असतो. ही गोष्ट सायबर गुन्हा अंतर्गत येते व अश्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला 'रॅन्समवेअर' असे म्हणतात. आणि ह्या गोष्टी अगदी अज्ञात ठिकाणाहून होतात, ज्याचा शोध घेणे एक प्रकारचे आव्हान असते.

     माहितीप्रमाणे या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला आहे. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपॉइमेंट्सदेखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली. 

     ही गोष्ट फक्त मोठे ऑफिसेस किंवा आयटी क्षेत्रातच होत आहेत असे नाही तर स्मार्टफोन युजर्सना देखील ह्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आपले संगणक असो किंवा स्मार्टफोन जितका सुरक्षित तितकाच फायद्याचे ठरेल. इंटरनेट वापरताना कुठल्याही जाहिरात किंवा भूलथापांना बळी पडू नये. मोबाइल गेम खेळताना अनेक वेळा जाहिरातीचे विंडो ओपन होतात. किंवा अमुक लिंक वर क्लीक करा असे मेसेज येतात त्यावेळी काळजीपूर्वक त्या गोष्टींकडे लक्ष देणे व दक्ष राहणे तितकेच महत्वाचे आहे. कारण... Third World War has been started..

                            अनुप्रिया सावंत

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)


Monday 23 July 2018

निसर्गाशी गुजगोष्टी

Photo Source:Google

       निसर्ग आणि मानवाचं एक सुंदर नातं आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आठवणींची साठवण म्हणजे निसर्गाशी दिलखुलास मारलेल्या गप्पांचा एक कप्पा. जिथे फक्त तो आणि तुम्ही अगदी मनमोकळेपणाने संवाद साधत असता. निसर्गाशी आपल्या गप्पा नेहमीच रंगतात. त्यातलेच काही तुमच्या आमच्या मनातले निसर्गाशी केलेल्या ह्या गुजगोष्टी.

     व्वा! आज वातावरणात किती सुंदरता जाणवतेय. काय प्रसन्न वाटतंय! सकाळची सूर्यकिरणे जणू जेजुरीचं दर्शन हळदीचा भंडारा उधळून घ्यावा तशी अंगणातल्या तुळशीला भेटायला येऊन सोनेरी पिवळे केशरी झाले आहेत. हिरवी झाडे आनंदाने डोलताहेत. 

     अहाहा... किती छान संगीत झाडातून ऐकू येतंय. कोकिळा... तुझ्या आवाजातील मधुरता काय वर्णावी बरं, जिथे श्रेष्ठ गायकांना तुझ्या आवाजची पदवी दिली जाते. सोबतीला तुझे सारे मित्र मैत्रिणींची किलबिलाट चालू आहे. ह्या झाडांना किती खेळवत असेल नाही का! ही झाडे डोलताहेत ते तुमच्यासोबत पकडपकडी खेळण्यासाठी! हम्म... आता लक्षात आलं.  छान!

     ही सुदंर रंगबेरंगी फुलं, फुलांचा सुगंध ह्या झाडांना किती टवटवीतपणा देतोय. फळांचा रस मनाला तृप्त करतोय. देव्हाऱ्यातील देव तुमच्या आगमनाची वाट पाहताहेत. त्यांनाही श्रुंगार करून निसर्ग अनुभवायचा आहे तर! किती छान दृश्य आज मनाला नव्याने आनंद देतोय.

     ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, टपोरे थेंबांचा जमिनीवर होणारा वर्षाव, मातीचा सुगंध. नुसता विचार मनाला तजेलता देतोय.  तुमच्याही... हो ना! 

                  देवा तुझे किती सुंदर आकाश, 
                      सुंदर प्रकाश सूर्य देतो... 

     हे गाणं बरेच दिवसापासून गुणगुणने चालूच आहे. गाण्याचा भावार्थ मनाला सतत खुणावतोय. मात्र अर्थाशी मन समरस होता होता कामाच्या गडबडीत गुणगुणनेच सुरू असायचे. ओठावर रुळलेले हे गाणं मात्र मला आज भावनेशी सरमिसळून घेतोय. कागदही स्वेच्छेने आज उड्या मारताहेत. पेन मात्र आज दांडियाची काठी गरबा खेळताना जशी फिरवावी तसा कागदावर मनसोक्त नाचत लेखणी चालवतोय. अहा... ही तर निसर्गाची जादू आहे जी प्रत्यकेला मनमुराद आनंद लुटायला देतेय. 

     निळे निळे स्वच्छ आकाश... पांढरे कापसासारखे ढग त्यातही काही गुबगुबीत, काही लांबट. पळताहेत असे जणू एकमेकांशी पकडापकडी खेळताहेत. सूर्य मात्र त्यांच्या पकडापकडीत लपाछपी खेळत ऊन सावल्यांचा खेळ खेळतोय. किती छान देवा तुझी किमया... गडगडाट ssss 

    हा आवाज कसला?? वीज राणी... पावसाची... छान! तिलाही आतुरता लागली तिच्या सवंगडयांशी खेळण्याची. हो! एवढेच न्हवे तर जमिनीला वेध लागलेत चिंब भिजण्याची आणि पावसाच्या टपोरे थेंबांना ओढ लागली भूमीला स्पर्श करण्याची. किती सुंदर नातं आहे ह्या साऱ्यांचं नाातं एकमेकांशी. 

     देवा! किती सुंदर रम्य ही वसुंधरा जिच्या उदरात एवढ्या सुंदर गोष्टी लपल्या आहेत. तुझीच कृपा सारी. हे दृश्य किती सहज अनुभवता येते मानवाला. पण तेही त्याला अशक्य व्हावे एवढा माणूस कामात अडकलाय? खरंच का??? 

     निसर्ग खुणावतोय त्याच्या प्रेमळ लीला पाहण्यासाठी, त्याचे अवर्णनीय रूप अनुभवण्यासाठी, त्याच्या मनाचा आपल्या हृदयाशी संवाद साधण्यासाठी. मानवी मनापेक्षा त्यालाच ओढ जास्त बिलगण्यासाठी. मग आपणही त्याच्या कुशीत लपंडाव खेळत, भटकंती करत, त्याच्याशी गुजगोष्टी करत जीवनाचा आनंद लुटायला हवा. काय? खरंय ना!!! 

                     अनुप्रिया सावंत.

Friday 6 April 2018

स्पर्श

    
Image Source: Google
    काय म्हणायचं ह्या माणसांना... घृणा वाटते एकदम... निर्लज्ज, बेशरम ह्या लेव्हलच्या पदवी कमीच पडतील ह्यांना.  भलीमोठी डिग्री घेऊन मिरवतात आणि लक्षण सगळे खोटे.  अगं काय झालं कृतिका?  चिडचिड असहाय्य झालेली कृतिका संध्याच्या बोलण्याने भानावर आली.  मनात असंख्य प्रश्न, राग, द्वेषाच्या पाऱ्यात उन्हाच्या लाह्या तरी जीवाला कमी बोचतील.   बॉस आल्याने दोघीही गप्प बसल्या आणि आपापल्या कामाला लागल्या. 

      कृतिका एक धडाडीचे व्यक्तिमत्व.  दिसायला सुंदर स्वभावाला थोडी तापट पण तितकीच हळवी.  ऑफिस ते घर बसने प्रवास करणारी.  संध्या, कृतिका, गौरी आणि माधुरी चौघी शाळेपासूनच्या बालमैत्रिणी.  संध्या आणि कृतिका एकाच ऑफिसमध्ये मात्र डिपार्टमेंट वेगवेगळे, त्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या.  गौरी आणि स्वाती दोघी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये मात्र दर रविवारी ह्या चौघी घरापासून जवळच ठरलेल्या ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्कला न चूकता भेटतात.

     कृतिकाच्या कामात मुद्दामहून काही न काही चुका काढून सतत तिला केबिन मध्ये बोलावणारा आणि लॅपटॉपवर मुद्दामहून काही ना काही काम देताना हाताला, अंगाला स्पर्श करणारा तिचा विकृत बॉसची तिला मनस्वी चीड यायची.  वाटायचं ह्याचं एकदाच बिंग फोडूनच टाकावं.  पण विश्वास ठेवणार कोण आपल्यावर?  संध्याला कृत्तिकाबद्दल बॉसचे मुद्दामहून चाललेल्या गोष्टी कळत होत्या मात्र तीही इतरांना हे सांगू शकत नव्हती.  ह्यावर जॉब चेंजिग हा खरंच पर्याय आहे का?  आपल्या ठरलेल्या ठिकाणी दोघी ऑफिसमधून सुटल्यावर बोलत होत्या.  आपल्या मैत्रिणींना ह्याविषयी बोलून काय तो तोडगा काढलाच पाहिजे... ह्यावर दोघींचं एकमत झाले.  घरी सांगितलं तर घरचे कसे.. काय आणि कोणत्या प्रतिक्रिया देतील म्हणून दोघींनी घरी सांगणे टाळले.

     गौरी कराटे चॅम्पियन म्हणून फेमस.  रस्त्याने धक्के देणारे, जाणून बुजून चालताना स्पर्श करणारे, विचित्र नजरा ह्यांचा सोक्षमोक्ष आपण कधीतरी लावू ह्या धाडसी व बिनधास्त विचारांची असणारी.  नुसती विचारच नाही तर कृती करणारी.  असेच एके दिवशी ऑफिसहुन घरी जाताना एका व्यक्तीने जाणून बुजून तिला धक्का दिला.  तो थोडा पुढे जातो ना जातो तेवढ्यातच.... आबे रुक साले... तेरी तो... रुक... क्षणातच सगळे तिच्याकडे पाहायला लागले... ज्याने धक्का दिला त्याची पुरती गाळण उडाली होती.. त्याच क्षणी जराही विलंब न लावता त्याची कॉलर पकडून तिने त्याच्या मुस्कटात लगावली.  तिच्या अंगात जणू वाघिणीचे बळ आल्यासारखे भासले.  तिथेच काही अंतरावर पोलिसांची गाडी उभी होती.  लोकांनीही ह्या रणरागिणीला सलाम करून त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.  एवढेच नाही तर पोलिसांनीही तिचे विशेष कौतुक केले.  एवढी सतर्कता लोकांनीही दाखवली त्यामुळे तिच्या नारीशक्तीला आणि त्या लोकांच्या सहकार्याला मुजरा.  अश्या गौरया घराघरात जन्माला याव्यात.  झालेला सर्व प्रकार गौरीने आपल्या घरी आल्यावर घरच्यांना सांगितला व तशीच ती आपल्या मैत्रिणींना ठरलेल्या ठिकाणी भेटण्यास निघाली.
    
   कृतिकाच्या पडलेला चेहरा गौरीला काहीतरी बिनसल्याची जाणीव करून देत होता.  विचारल्यावर आहे तो प्रकार संध्याने तिच्या कानावर घातला.  त्यावर शांत बसेल ती गौरी कसली?  थोड्याच वेळापूर्वी घडलेली गोष्ट तिने दोघींशी शेअर केला.  काही वेळ सर्वच शांत बसलेले पाहून गौरीने विषयाला सुरुवात केली.  आपण खरं तर खूप शांत बसतो संध्या... हे सगळे प्रकार वेळीच रोखता येतातही आणि काही वेळेस आपल्या गप्प बसण्याच्या सवयीमुळे टोकालाही जातात.  माझा भाचा विराज... तिसरीला आहे... बहिणीचा एकुलता एक मुलगा असूनही तितकाच शिस्तप्रिय आणि हुशार आहे.  माझ्या बहिणाचा दीर अधून मधून त्यांचा घरी येत असतो.  तो जेव्हा केव्हा येतो तेव्हा विराज खूप अस्वस्थ होतो.  खूप बिथरला सारखा करतो... कारण काय तर दोघांनाही कळेना!

     विराज आजीकडे आला तेव्हा त्याला ह्या गोष्टीबद्दल विचारले असता त्याने ज्या काही गोष्टी तुटक मुटक सांगण्याच्या प्रयत्न केला त्यावरून वारंवार घडलेल्या ह्या प्रकाराबद्दलची भीषण कल्पना आली.  सतत त्या काकाचे विराजला घेऊन मांडीवर बसणे.. गालगुच्छा घेणे... पायात दाबणे... ह्याप्रकारने विराज खूप संकोचून जायचा मात्र त्याला ते शब्दात मांडता येत नव्हते... नाही घरच्यांना सांगता... त्याच्यावरील लैंगिक शोषणामुळे त्याची मानसिकता ढासळत चालली होती.  ताईला ह्याबद्दल कल्पना दिली असता तिला धक्काच बसला... मात्र ती भाऊजींना सांगायला तयार होईना... नाती बिघडण्याची भीती.... ह्यावर तिने पर्याय शोधला... विराजला त्याचे काका आल्यावर एकटे त्यांच्याबरोबर सोडायचे नाही.  मला सांगा हा खरच पर्याय असू शकतो की अजून काही उपाय शोधता येईल?  गौरीच्या बोलण्याने संध्या तिच्या भूतकाळात गेली.

     आपली संध्या खुपचं साधी.  मात्र लहानपणीच्या काही गोष्टींमुळे तिलाही पुरुषांच्या विकृत स्वभावाचा प्रचंड राग यायचा.  आई नोकरीनिमित्त नऊ तास बाहेर तर वडील ऑफिसला सकाळी जायचे ते रात्री घरी यायचे.  मुलांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून तिच्या आईने प्रायव्हेट होम ट्युशन तिच्यासाठी चालू केले.  संध्याला मात्र सर्वांसोबत अभ्यास करायला आवडायचे.  आईच्या पुढे तिला काही बोलता यायचे नाही, त्यामुळे तिचे ट्युशन घरीच चालायचे.  संध्याला तिचे सर शिकवताना अतिशय प्रेमाने शिकवत.  मात्र ज्यावेळी तिची आई घरातील कामात व्यस्त असे त्यावेळी सरांचं प्रेमाने शिकवण तिला नकोसं व्हायचं.  त्याला कारण जाणून बुजून केलेला स्पर्श.  कधी हातावर हाथ ठेवून तर कधी जवळ बसवून.   सातवीत असणारी संध्या सरांचं विचित्र वागणं आईला नीट स्पष्टही करू शकली नाही, फक्त आई मला नको असा क्लास... मला ते सर नाही आवडत... आई मात्र आपल्या बाळाला समजावत होती... बाळा छान आहेत सर... मी ओळखते त्यांना.. नीट अभ्यास घेतील तुझा... ह्यावर संध्या फक्त स्वतःवर चिडचिड करत राहिली.  भूतकाळातील आठवणीने संध्या कासावीस झाली.  खरंच ह्या गोष्टी दाबून का ठेवल्या जातात?  ह्यांचा पर्दाफाश करणे महत्वाचे की गपगुमानं चालत राहून ते विसरणे हे फायद्याचे?  कोमल मनावरील आघाताचा विचार कोण करणार?  खरच ते विसरता येतं का?  हा स्पर्श... समज....गैरसमज... ह्याविषयी का कुणी सांगत नाही?  घरातले मनमोकळेपणाने का बोलत नाही ह्याविषयी?  शाळेत सांगितले जाते तो पर्यंत आपल्याला बरीच समजही आलेली असते.  पण घडून गेलेल्या गोष्टी मात्र झाकून जातात... मुक्कामार लागल्यासारखं...  संध्याच्या ह्या अचानक बोलण्याने तिच्यावर बालमनात झालेला आघाताने पहिल्यांदाच तिच्या मनातील मूक जखमेला मोकळी वाट करून दिली होती.  मगाशीच येऊन पोचलेल्या स्वातीला नकळत हुंदका आला... तिची अवस्था पाहून तिघींनी तिला पाणी प्यायला देऊन शांत केले.

    स्वाती... लग्नाला 2 वर्ष झालेली... गोंडस मुलगा पदरी... नवरा उच्चशिक्षित, सुसंस्कारी, अतिशय प्रेमळ तितकाच भावुक.  स्वाती क्लेरिकल म्हणून सरकारी कार्यालयात कामाला आहे... घर नोकरी संसार अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळते.  कुटुंब आणि नोकरी तितक्याच लीलया पेलते.  घरापासून बाजार थोडा दूर... भाजीपाला फळभाज्या काही हवे असेल तर विकणारे सोसायटीत येतात.  दररोज सोसायटीत केळीवाला भैय्या घरोघरी केळीसाठी फिरतो.  स्वातीही इतरांप्रमाणे त्याच्याकडूनच केळी विकत घेते... दर वेळी केळी घेताना तो भैय्या हाताला हात लावायचा... घाईत पैसे देताना असेल म्हणून स्वातीनेही दुर्लक्ष केले... पुन्हा एकदा त्याला लांबून पैसे देताना पुन्हा त्याने हाताला हाथ लागेल अश्या रीतीने वर्तन केले... असे करताना त्याच्या चेहऱ्यावर भाव मात्र शून्य... जणू काही झालेच नाही... तो खूप घाईत आहे असा अविर्भावात... पुढच्या वेळेस मात्र मी ह्यांना म्हणाली... जरा तुम्ही घ्या हो त्याच्याकडून मी कामात आहे... कसाबसा वेळ मारून तो विषय तिथेच थांबवला.. मात्र दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केळीवाला आल्यावर पुन्हा नवऱ्याला बोलली अहो तुम्हीच घ्या... तो केळीचे पैसे घेताना हाताला हाथ लावतो... ह्यावर मात्र ह्यांनी लगेचच प्रतिक्रिया देताना म्हंटल की तू देताना नीट पैसे देत नसशील त्याला... आणि ह्यापुढे आपल्याला केळी नको असे म्हणून त्यांनी विषयच बंद केला.  नवऱ्याच्या प्रतिक्रियेवर राग व्यक्त करावा की भोळेपणा समजून कीवL करावी हेच कळेना... घडलेला प्रकार मैत्रिणींशी शेअर करताना चौघीही कमालीच्या दुखावल्या गेल्या.

     कृतिका, संध्या, गौरी आणि स्वाती ह्यांच्यासारख्या समाजात कित्येक मुली आहेत.  बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी छोट्या मोठया कारणास्तव सोडून देतो.  काही वेळा त्यावर पडदा टाकतो तर काही वेळा स्वतःलाच दोष देतो.  कृतिकाने बदनामी नको म्हणून सहनशीलता वाढवली तर संध्या सारख्या सोज्वळ मुलीला तिच्या आईच्या बाहेरील व्यक्तीवर असलेल्या विश्वासामुळे पोखरून काढले गेले.  स्वातीसारख्या स्रियांना आजही असे अनेक अनुभव येताहेत त्याविषयी त्या कोणाला सांगूंही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही.  आजही समाज स्त्रीला दोषी ठरवतो.  स्वातीचा नवरा जितक्या सहजतेने तिला बोलला की तू पैसे देताना नीट पैसे देत नसशील ह्यावरून पायाची आग मस्तकात भिनतेय असंच काहीसं स्वातीला झालं असेल.  ह्यात त्या स्त्रीवरील अविश्वास समजायचं की अस्सल भोळा भाबडा स्वभाव समजायचं?

     आपण ज्या समाजात वावरतोय तिथे आपण सतर्क राहिले पाहिजे.  कृतिकासारख्या असंख्य स्त्रीया आहेत... त्यात काहीजणी शांत बसून सहन करणाऱ्या तर काही त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या.  संध्यासारख्या प्रत्येक मुलींना लहानपणीच काही गोष्टी शिकवण्याची व समजवण्याची गरज असते... त्यासाठी हक्काने मायेने जवळ घेणारे आणि तेवढ्याच अल्लड बुद्धीला समजून घेणाऱ्या व्यक्तिमत्वाची... मग त्या भूमिकेत आईच असेल असे नाही... आणि प्रत्येक वेळी समजून घेणारे आणि समजवणारे शिक्षकच असतील असेही नाही.  आपल्या बाळाला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श समजावणे ही काळाची गरज आहे.  गौरीसारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यावीच मात्र त्याचबरोबर आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे प्रत्येक कुटुंबाने द्यायला हवे.  स्वातीसारख्या स्त्रियांनी स्व-अस्तित्वाची जाणीव ठेवून अश्या विकृतींना तिथल्या तिथेच आळा घालून देण्याच्या विचारांना जागवणे ही गरज आहे.  ह्या भूमिकेत नवऱ्यानेही तितक्याच जबाबदारीने आपल्या बायकोच्या भावना समजून तिला अशा प्रसंगांना सामोरे जाण्यास तयार करायला हवं... मानसिक बळ द्यायला हवं.

     समाज बदलतोय... विचार बदलताहेत... स्त्रिया खऱ्या अर्थाने घडताहेत... हे फक्त विधानाकरता की खरंच?  खरं सांगायचं तर हा स्पर्श जितका प्रेमळ असतो तितकाच विकृतही असतो... त्याला कारण माणसांच्या वृत्ती.  जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... आळा घालताना व्यक्ती कधी विळख्यात सापडली जाते कळत नाही...  त्यामुळे स्ट्रिकनेस पेक्षा स्मार्ट अलर्टनेस हा हवाच... आणि हो... स्पर्श.... ह्या घडणाऱ्या गोष्टी फक्त स्त्रियांच्याच बाबतीत घडत आहे ह्या भ्रमातून आपल्याला बाहेर येणे तितकेच गरजेचे आहे... काळ बदलतोय... मुलगा असो की मुलगी... लहान असो की मोठे... शक्य तितक्या लवकर... दे मस्ट हॅव टू नो अबाऊट गुड टच अँड बॅड टच... Raise Your Voice..

                                    - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा