Sunday 6 November 2016

कविता #12 - मनाची सर...

               बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला मात्र शब्दाला गती मिळत नाहीये.. अक्षरही शब्दांमध्ये गुंफले जात नाहीयेत.. मन शांत आहे तरीही अनेक विचारातून फिरत आहे.. संध्याकाळची मैफिल ताऱ्यांनी सजल्यासारखी नटली आहे.. चांदण्या रात्रीत शाल पांघरल्यासारखे शब्द पहुडले आहेत.. मनाला उसंत मिळाली भावनेला नाही.. शब्दाला जागवायला हवं.. 
    
          मनाची झेप अनेक विचारांत गवसणी घालतंच आहे.. त्यातूनच गवसलेली ही सैरभैर मनाची सर... 

Sunday 5 June 2016

जागतिक पर्यावरण दिन!!!

     आज ५ जून हा दिवस संपूर्ण विश्वात 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. ५ जून १९७२ रोजी बदलत्या हवामानाविषयी स्टॉकहोम येथे पहिले विचारमंथन करण्यात आले, म्हणूनच त्या दिवसापासून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जाऊ लागला.


     आज आपण पाहतो उष्णता खूप अधिक प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या पावसाळ्या नंतर जसा हिवाळा येईल तसाच पुढील उन्हाळा अधिक उग्र स्वरूप धारण करून येईल. २००५ चा २६ जुलै हा अजूनही प्रत्येकाच्या स्मरणात असेलच. त्याला कारणही पर्यावरणातील असमतोल हाच होता. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, पर्यावरणाचा व वन्यजीवांचा ऱ्हास अश्या विविध गोष्टींमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा महाराक्षस समोर उभा राहिला आहे. 

     सध्याच्याच घटना... डम्पिंग ग्राउंडविषयी आपण सर्वांनी ऐकले तर काही जणांनी प्रत्यक्षात अनुभवले. तिथल्या कचऱ्याचे विघटन होण्याअधिक राजकारणच अधिक झाले. त्याचे परिणाम मात्र भोगावे लागले ते तेथील स्थानिकांना आणि पर्यायांनी आपल्या सर्वांनाच. त्यातून जे वायुप्रदूषण झाले, श्वसनविकार झाले, शारीरिक मानसिक समस्या निर्माण झाल्या ते निराळेच. वास्तविक पाहता प्रत्येक घरात ओला कचरा आणि सुका कचरा अशी वर्गवारी केल्यास डम्पिंग ग्राउंडवर केवळ २० टक्के कचरा जाऊन पडेल. आज मुंबईसारख्या शहरात नऊ हजार टन कचरा गोळा केला जातो. घराघरात जर ह्या सुका आणि ओला कचऱ्याची वर्गवारी केल्यास डम्पिंग ग्राउंडवर पडणारा कचरा केवळ १५०० ते १८०० टन होईल. (रेफेरेंस बाय गुगल सर्च इंजिन) हल्ली रस्त्यावरील ट्रफिक जॅम आणि भरमसाट वाहने ह्यामुळे वायुप्रदूषणात भरच पडत आहे.

     ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साइड ह्यांचे
ही प्रमाण संतुलित नाही. ह्याला कारण झाडांची झालेली कत्तल आणि गळती, ह्याला जबाबदारही मानवच. उन-पावसात आधार देणारे झाडे आज आपल्याला शोधावे लागतात. पण तरीही आजच्या युवा पिढीचे ह्या बाबतचे बदलते मत प्रत्यक्षात दिसत आहे. अनेक ठिकाणी 'वृक्षारोपण' उपक्रम सुरु करण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे कार्यक्रमात देखील आपण बघतो की 'छोटे रोपटे भेट' म्हणून आलेल्या पाहुण्यांना दिले जात आहेत. ही बदलती मानसिकता प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे, आणि त्याहूनही अधिक त्यासाठी प्रत्यक्षातले प्रयास.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावरून त्यांच्या पहिल्याच भाषणात भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नाविषयी आवाहन केले होते.  ते म्हणाले होते की, '१२० कोटी लोकसंख्येच्या देशाने जर स्वच्छतेचा निश्चय केला तर आपला देश अस्वच्छ करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, म्हणून देशाचा कानाकोपरा स्वच्छ करण्याचा निश्चय प्रत्येकाने करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.'
 
     'जागतिक पर्यावरण दिन' ह्या निमित्ताने सर्वांनी मिळून निश्चय करू की, 'पर्यावरणाची हानी होणार नाही, असा एक तरी संकल्प मी करेन.' आणि तो कसोशीने पाळण्याचा आग्रह असेन.  मग त्यात माझा खारीचा वाट हा नक्कीच असणारंच.

     चला तर मग घेऊयात वसा आपल्या वसुंधरेच्या सुंदरतेचा!!!
 
                                                              अनुप्रिया सावंत.
 


मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Thursday 12 May 2016

डेस्कटॉप - Desktop Information

      फाईल आणि फोल्डर ह्याविषयी जाणून घेण्या आधी आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर (डेस्कटॉवर)असणाऱ्या विविध गोष्टींची बेसिक माहिती करून घेऊयात. जेणे करून फाईल आणि फोल्डर बनविताना आपल्याला पूर्वज्ञान होईल.

     आकृतीमध्ये दर्शविलेले चिन्ह आणि त्या चिन्हासमोर असलेली नावे ह्यांची ओळख करून घेऊयात.




     आपण ज्यावेळी संगणक सुरु करतो तेव्हा मूलतः तो ह्या प्रकारे आपल्याला दिसतो. त्यात असेलेले विविध प्रकारचे चिन्ह, चित्रे आणि नावे आपण वाचतो. आणि त्याद्वारे आपण ओळखतो कि अमुक चित्र व त्याचे नाव कशाशी संबंधित आहे आणि त्यात कोणती माहिती असू शकेल. (अर्थात फाईल आणि फोल्डरचा येथे संबंध येतो, तो आपण पुढील सदरात पाहू.) आकृतीत दाखविण्यात आलेले चौकाटातील लाल रंगाचे नावे हे आपल्याला त्या संबंधित आकृतीच्या भागाला  काय म्हणतात? हे दर्शविण्यासाठी देण्यात आलेली आहेत.


डेस्कटॉप - हा भाग म्हणजे संगणकाचा वॉलपेपर होय. जसे आपल्या आधुनिक काळात वापरात असलेल्या मोबाईलवर आपले स्वतःचे किंवा इतर फोटो(चित्र) ठेवतो त्याला आपण त्याचे वॉलपेपर म्हणतो.  हा वॉलपेपर आपण बदलू शकतो.

डेस्कटॉप आयकॉन्स - डेस्कटॉपवर असलेल्या आयकॉन्सना म्हणजे डेस्कटोपवरील भागावर असलेल्या कोणत्याही चिन्हान्कृत भागाला 'डेस्कटॉआयकॉन्स' असे म्हणतात.

माउस पोइंटर - वरील आकृतीत आपण जे बाणासारखे चिन्ह पाहत आहोत त्याला माउस पोइंटर असे म्हंटले जाते.   त्याद्वारे आपण हव्या त्या फाईल किंवा फोल्डरवर चटकन जाऊ शकतो. तसेच हवी असलेली माहिती 'माउस पोइंटर' च्या क्लिकने सहज मिळवू शकतो.

टास्कबार
-
टास्कबार म्हणजे संगणकाच्या खालच्या भागात असलेली आडवी लांब पट्टी (ब्लू रंगाची किंवा वॉलपेपर समावेशक असलेल्या रंगाची) म्हणजे टास्कबार होय.
 क्विक लॉंच - जेव्हा आपल्याला एखादी फाईल किंवा एखादे अप्लिकेशन चटकन ओपन करता यावे ह्यासाठी टास्कबारवर आपण ते अप्लिकेशन किंवा फाईल लॉक करून ठेवतो म्हणजे 'पिन' करून ठेवतो (Pin - Unpin ह्या संगणकीय भाषा) त्या भागाला  'क्विक लॉंच' असे म्हणतात.

नॉटीफिकेशन एरिया - नॉटीफिकेशन एरिया म्हणजे वेळ, तारीख, स्पीकर असल्यास त्याचे चिन्ह, इंटरनेट जोडणी असल्यास त्याची चिन्ह असे वेगवेगळे नॉटीफिकेशन असतात. म्हणजेच टास्कबारच्या उजव्याबाजूला असणाऱ्या चिन्हांना 'नॉटीफिकेशन्स एरिया' असे म्हणतात.  

     डेस्कटॉम्हणजे काय आणि डेस्कटॉवरील विविध भाग ह्यांची बेसिक ओळख आपल्याला झालेली आहे.  आता फाईल आणि फोल्डर बनवण्यासाठी डेस्कटॉचा वापर, जाणून घेऊयात पुढच्या सदरात...

                                                                     अनुप्रिया सावंत.


           मागील लेख                                                  पुढे पहा

Saturday 27 February 2016

कविता #11 - 'मराठी राजभाषा दिन' - हार्दिक शुभेच्छा!


'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'.

     27 फेब्रुवारी, हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.  कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर - थोर कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध.  त्यांनी 'कुसुमाग्रज' ह्या टोपण नावाने त्यांचे कवितालेखन केले.) यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे.  हा वारसा आपण आणि आपल्या भविष्यातील पिढीने जपला पाहिजे.   आणि तो अखंड सुरू रहावा याच स्फूर्तीने कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.  

मराठीचा छंद
मराठीचा गंध,
लाभला वारसा
भारतीय आमुचा जन्म.

बोलतो मराठी
ऐकतो मराठी,
जाणतो मराठी
अभिमान रुपी.

संतसज्जनांनी प्रत्यक्ष
देव जन्मभूमी लाभली,
सर्व त्यागुनी वीरांनी
मराठी मायभूमी घडविलीं.

अनंत ध्येयसक्तींनी
कवीरूपी माय सजली,
नानाविध अलंकार
भूषवित मराठी अवतरली.

सहज सोपी सुंदर भाषा
घेते हृदयी ठाव मनाशी,
अभिमान आम्हा भारतीयांना
गर्जतो मराठी मी मराठी.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

                                                   - अनुप्रिया सावंत.

Monday 15 February 2016

कविता #10 - व्हॅलेंटाइन स्पेशल - माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

     दरवेळेस ठरवतो आज तरी तिला आपण बोलू शकू. पण नाही, ह्याही वेळेस मन धजावले.  माहित आहे मला तुलाही मी आवडतो!  पण का तुला हे सांगता येत नाही, कि मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो.  तुही बोलायला तयार नाहीस पण माझे अबोल मन तर तुला कळतेय ना! 
     व्हॅलेंटाइन डे होऊनही प्रेम व्यक्त करता नाही आले...
प्रेम असूनही तुला सांगता नाही आले.  खरं तर प्रेमाचा दिवस ठरवून ते तेव्हाच व्यक्त करतात असे काही नसते, हे जाणतो गं मी.  पण तरीही...
प्रीतीची भाषा, प्रेमाचा अबोल नजराणा
ह्या शब्दरूपी कवितेतून तू
जाणशील का माझ्या भावना?


दोघांच्या प्रेमाचा अबोल नजराणा,
मनाची चलबिचलता प्रीतीचा नजारा,

दिल मे तेरी तस्वीर, धडकन मे तेरी धून
तुझ्याचसाठी मी वेडा कळेल का तुला?

कर्तव्य परायणता, कर्तव्य दक्षता,
प्रेमाची निष्ठा, तुझीच आस्था..
तत्परता आपुली नि मनाची आतुरता,
अबोलं मन माझे कळेल का तुला?

तुझ्यावरच प्रेम, मन सांगायला धजतयं...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

हृदय तुझ्याच प्रेमासाठी आसुसले,
नजर नित्य राही तुझ्याच वाटेला...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

जवळ असतानाही मन तुलाच पाहत रहातं,
लांब असतानाही मन तुझ्याच जवळ असतं..
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

दूर जाताना न वळता सहज निघूनही जातेस...
तुझ्या पाऊल वाटा शोधत नजर फिरत राहते..
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

जे ठाउके मजला ते माहित मलाच...
तुला ते माहित असावे कि नसावे,
ह्या प्रश्नाचीही मनी नाही आस...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

शेवटच्या क्षणी माझ्या तू जवळ असावीस,
डोळे भरुनी पाहत तुला मी तुझ्याच जवळ असावं...
मनाची ही तळमळता, नजरेची ही आतुरता...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

                                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday 3 February 2016

सेकंडरी स्टोरेज मेमरी

    संगणकाच्या मेमरी साईझविषयी आपण मागील सदरात जाणून घेतले.  आता पाहूयात ह्या मेमरीज कुठे आणि कश्या पद्धतीने साठवल्या जातात.

     आपण बाहेरून एखादी वस्तू आणली की, ती वस्तू तिची जागा बघून त्या ठिकाणी ठेवून देतो.  जर एखादा पदार्थ असेल तर आपण त्या पदार्थाचा आकार बघून त्या साईझच्या डब्यात तो पदार्थ ठेवून देतो.  त्याचप्रमाणे संगणकामध्ये आपण आपला डेटा आपल्या सोयीनुसार आप-आपल्या 'फोल्डर' मध्ये एखादी फाईल बनवून ठेवून देतो.  ह्यालाच 'डेटा स्टोर' करणे असे म्हणतात.  डेटा स्टोर करण्यासाठी आणि ही माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी सेकंडरी मेमरीचा वापर केला जातो.  

आपण पाहूयात ही सेकंडरी स्टोरेज मेमरी म्हणजे काय?

सेकंडरी स्टोरेज मेमरी - सेकंडरी स्टोरेज मेमरीला 'सहाय्यक संग्रह स्मृती' असेही म्हणतात.  या मेमरीतील माहिती कायमस्वरूपी साठवता येते.  या मेमरीत लिहिता येते आणि लिहिलेले पुस्तीही येते. (डिलीट करता येते).  सेकंडरी मेमरीची क्षमता प्रायमरी मेमरीपेक्षा अनेक पटीने जास्त असते.  ह्या मेमरीमध्ये साठवलेली माहिती आपण संगणकाला आज्ञा दिल्याशिवाय संगणक ती नष्ट करीत नाही.  ती आपण केव्हाही वापरू शकतो.  म्हणून या मेमरीला 'परमनंट मेमरी' असे म्हणतात.


ह्या सेकंडरी स्टोरेज मेमरीचे दोन प्रकारात विभागणी केली जाते.

१) नॉन रिमुव्हेबल मिडिया
२) रिमुव्हेबल मिडिया

१) नॉन रिमुव्हेबल मिडिया - कायमस्वरूपी बसवलेल्या स्टोरेज मेमरीला 'नॉन रिमुव्हेबल मिडिया' असे म्हणतात.  हार्ड डिस्क ही नॉन रिमुव्हेबल मिडियाचे उदाहरण आहे.

      ही हार्ड डिस्क सी.पी.यु. केबिनेटमध्ये कायमस्वरूपी बसवलेली असते.  हार्ड डिस्कमध्ये संगणकात 'इंस्टाल (INSTALL) केलेले प्रोग्राम साठवलेले असतात.

२) रिमुव्हेबल मिडिया - जी मेमरी आपण संगणकापासून वेगळी करू शकतो  आणि तिला हवी तिथे नेऊ शकतो, (म्हणजे पोर्टेबल)  तिला  'रिमुव्हेबल मिडिया' असे म्हणतात.  CD , DVD , पोर्टेबल हार्ड डिस्क, पेन डाइव्ह, कार्ड-रीडर हे रिमुव्हेबल मिडियाचे उदाहरण आहेत.  

       ह्या साधनांद्वारे आपण माहिती एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडे पाठवू शकतो.  
      म्हणजेच ज्या साधनांद्वारे आपण संगणकातील माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो ते साधन रिमुव्हेबल मिडिया अंतर्गत येते.

      रोजच नवीन नवीन टेक्नोलॉजी उदयास येत आहेत आणि  दिवसेंदिवस त्यांचा विस्तार हा वाढतच आहे.        
   पुढच्या सदरात आपण जाणून घेऊयात आपल्या बेसिक संगणक शिकण्यासाठीच्या तसेच संगणकात आवश्यक ती माहिती एका ठिकाणी व्यवस्थितरीत्या ठेवण्यासाठी वापरात येणाऱ्या फाईल व फोल्डर ह्याविषयी.

              मागील लेख                                                                              पुढे पहा

Tuesday 19 January 2016

मनाचे सुख...


      सुख म्हणजे नक्की काय असतं?  जे मनापासून असते ते सुख?  कि जे मानण्यात असते ते सुख?
मनाचे सुख...
    
     आज अगदी सहजच पुस्तकांच्या कपाटात पुस्तके पाहत असताना 'हसत जगावं' हे पुस्तक पहिले आणि म्हंटले जरा वाचून बघावं.  पुस्तकात अनेक छान छान गोष्टी होत्या.  त्यातले 'मनाचे सुख'...  ही गोष्ट वाचत असताना मला जाणवले ते म्हणजे मी काही दिवसांपूर्वी विचार करत असलेली गोष्ट आणि ह्या पुस्तकातून वाचनात आलेली गोष्ट हे बऱ्याच अंशी सारखीच आढळली.  'तुटे वाद संवाद...' ह्या बद्दलच्या माझ्या ब्लॉगच्या एका आर्टिकल बद्दल लिहित असताना माझ्या मनात चालेला संवाद हाच होता... 'मनाचे सुख म्हणजे नक्की काय?'

      आपण कळत नकळत काळाच्या ओघासोबत चालत असताना कुठेतरी वाहत असतो. मनाचे सुख शोधण्यासाठी धडपडत असतो. पण मनाचे सुख ह्या गोष्टीबद्दल मला तरी असे वाटते कि ते आपल्यातच दडलंय. पण आपण आपल्या संकुचित वृत्तीमुळे ते हरवतोय.  लोभ, राग, द्वेष, मत्सर ह्यामुळे आपण आपले सुख गमवतोय.  हातात जे आहे त्याचा आनंद करण्याऐवजी, मी जे नाहीये त्याच्याच पाठी तर धावत नाहीये ना?  नाही नाही... मन हे सैरभैर पळणारेच असते, फुलपाखरासारखे स्वच्छंद जगणारेही असते. पण... फुलपाखरासारखे मुक्त जगताना आपले भान सोडून तर आपण जगत नाहीये ना!  हाही विचार मी करतेय का?  पण.. का करायचा हा विचार?  आयुष्य माझं आहे मला हवं तसं आपण जगू... हल्लीच चित्रपट पाहिला - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि... मनाने पुन्हा कल्पनेच्या विश्वात रमायला सुरुवात केली.

      तरीही... असा विचार करताना आपण आपल्या आयुष्यात असलेल्या माणसांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या आप्त स्नेहांचा प्रामाणिक विचार करतो का?  हे आणि असे अनेक प्रश्नांनी ह्या छोट्याश्या 'मनाचे सुख' ह्या गोष्टीने  प्रश्नावालींचा काहोर माजवला.  उत्तर माझ्याजवळच होते आणि आहे.  पण त्या उत्तराकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकतोय.  हो! खरच चुकतोय.  का कुणास ठाऊक... आज जाणीव होतेय कि हल्ली सोशल मेडिया मध्ये आपण किती गुंतत आहे.  समाजाचे भान तर दूरच, आपल्याला आपलेही भान नसते.   वेगवेगळे कॅन्डी क्रश सारखे गेम्स खेळण्यात तर आपण आनंद व्यक्त करतोय आणि त्याहीपेक्षा त्या गेम्सचे रिक्वेस्ट दुसऱ्यांना पाठवण्यात आपले मोठे सुखच मानतोय.  खरं तर फारच हास्यास्पद गोष्ट आहे ही.

      स्वतःच्या सुखासाठी मोठ-मोठ्या चैनीच्या वस्तू विकत घेण्यात सुख मानतो.  पण घरात नेमकी गरजेची वस्तू कोणती?  घरातल्यांना आपण सुख देतोय का?   माझ्या जबाबदारीची जाणीव आहे का?  माझे कर्त्यव्य तर मी विसरत नाही ना!  त्यात काही उणीव आहेत का?  समाज... समाजासाठी आपण काही करतोय का?  ह्या पूर्वी होऊन गेलेले आणि अजूनही समाजासाठी झटणारे मदर तेरेसा, बाबा आमटे ह्यांनी समाजाची सेवा करण्यात आपले मोठे सुख मानले आहे.   राष्ट्रासाठी शहीद होणारे वीर राष्ट्रासाठी प्राणाची आहुती देण्यात आणि आपल्याकडून समाजासाठी सेवा घडावी हेच मोठे सुख मानत आहे.  आणि मी?  आपण मात्र त्या शहीदांसाठी श्रद्धांजली तर सोडा, त्यांच्या स्मृतीही विसरून जातोय. 
     स्वतःसाठी संकुचित विचार करणारी माणसे सुख कधीच मिळवू शकत नाही.  वरून जरी आपल्याला अशी माणसे आनंदी दिसले, तरी आतल्या-आत आपण काहीच करू शकलो नाही ह्याची जाणीव त्यांनी कधी ना कधी नक्कीच होत असते.  ह्या गोष्टीचा परामर्श घेताना त्यात अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.  कवी कुसुमाग्रज म्हणतात... आपण धरणे बांधली, इमारती बांधल्या, कारखाने बांधले; पण मन? मन बांधायचे आपण विसरून गेलो.  खरंच... मन बांधणं आपण विसरून गेलो.   घडाळ्याच्या काट्यावर चालणारी माणसं आपण आजकाल मनाचे सुखच विसरून गेलो.  जे करतोय त्यात सुख शोधण्याचा आनंदच आपण हरवून बसलोय.

      माझे 'DAD' आणि 'मित्र' ह्या दोन्ही भूमिकेत असणारे डॉक्टर अनिरुद्ध जोशी ह्यांचे एक वाक्य मनाला अगदी जवळून स्पर्श करते, ते म्हणजे...
                       'छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?'

       उगाचच छोट्या गोष्टींचा आपण बाऊ करतो आणि स्वतः सोबत दुसऱ्यांनाही त्रास देतो.  जे आहे त्यात सुख शोधण्याऐवजी जे नाही ते मिळविण्यासाठी अट्टाहास करतो.  आपण विसरून जातो.. अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जवळ आहेत ज्यात सुख दडलंय... आणि सुख मिळवण्याच्या नादात आपण ते साजरा करायलाच विसरतोय.  
हो ना?
                                           
                                                                                   अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Friday 1 January 2016

कविता #9 - नवीन वर्षाच्या शुभेच्छा! - Welcome 2016



नवीन वर्ष नवीन दिवस
नवीन स्वप्न नवीन संकल्पना,
नवी दिशा नवा ध्यास
असावा नित्य पुन्हा खास.


                  गेले दिवस उरल्या आठवणी
                  काही आवडी काही नावडी,
                  जुनी नाती नव्याने उलगडावी
                  प्रेम पावित्र्यात जपून ठेवावी.


नको सारे हेवेदावे
नको मागचे काही,

प्रेम रुपी सारे हवे
फुलाचे फुलणे नव्याने असावे.

                   राग मत्सर द्वेष
                 नसावा मनी लोभ,
                 विसरुनी हे सारे त्वेष
                 धरुनी संकल्परुपी प्रेम.

संकल्पनेचा नको नुसता
आरंभशूर फक्त आता,
नित्य स्वरूप पूर्ण रुपी
करुनी घे निश्चित 'संकल्प' आता.


                    करूया स्वागत नवं वर्षाचे
                  वाढवूनी रोपटे संकल्प बीजाचे,
                  धरुनी कास ध्येयाची
                  उंच आकाशात झेपावण्याची.

 
नवीन वर्षाच्या सर्वांना अनिरुद्धमय शुभेच्छा!
जय जगदंब जय दुर्गे.


                                               - अनुप्रिया सावंत.