Monday 9 February 2015

मी कोण - मी आहे


मी सौ. अनुप्रिया आदित्य सावंत.

राईट अबाउट "मायसेल्फ" असा प्रश्न आला कि अक्षरशः भीतीने गाळण उडायची.  मी कोण? म्हणजे काय असत?  हे कधी ना समजले, नाही लिहिता आले.  पुस्तकात जे आहे ते छापायचे एवढेच माहित.  त्या पलीकडे केव्हाही काहीही उमगले नव्हते.

पण... आज जर मला कोणी "माझ्याबद्दल" विचारले.....
तर माझे उत्तर एकच असेल.....
मी आहे !!!
'माझे अस्तित्व आहे' ही माझी पहिली ओळख आहे.  कारण दुनियाच्या भुलभुलैय्यात आज प्रत्येक जण आपले स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही धडपड करीत असतो.  पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का की "माझे अस्तित्व म्हणजे काय"? मी कमावत असलेला पैसा माझे अस्तित्व आहे की मी घेतलेले शिक्षण म्हणजे माझे अस्तित्व आहे. तर उत्तर येईल नाही. मग तरीही हे मिळविण्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत असतो. व्यावहारीक दृष्ट्या ते अगदी बरोबरही आहे....पण मग माझे अस्तित्व काय आणि ते कस जपता येईल याचा विचार केला पाहीजे.

म्हणूनच माझे सदगुरु अनिरुद्ध बापू अगदी सोप्प्या शब्दात सांगतात की "मी आहे..." "आय एम" "मैं हू" हे शब्द माझे अस्तित्व दर्शविणारे आहे. "मी आहे..." ही जाणिव आधी स्वतःला झाल्यानंतर मी कशी आहे? माझ्याकडे काय आहे? हे प्रश्न आपण स्वतःला विचारु शकतो आणि ते प्रश्न विचारल्यावर मला मिळालेले उत्तर म्हणजे "अनुप्रिया".

हो अनुप्रिया म्हणजे 'प्रिय मुलगी'.  Beloved Daughter.
माझ्या वडीलांची अर्थात माझ्या Dad ची मी प्रिय मुलगी आहे...."मी अनुप्रिया आहे" आणि हेच माझे मूळ अस्तित्व आहे.  म्हणूनच मी या ब्लॉगचे नावच "अनुप्रिया" ठेवले आहे जे माझे ही नाव आहे.
नावात काय आहे... असे शेक्सपिअर म्हणतो... माझ्या नावात माझे तरी अस्तित्व आहे, असे मला वाटते.

आणि ह्या अस्तित्वाची जाणिव करुन देणार्‍या आणि ते खुलवणार्‍या माझ्या सदगुरुला माझे कोटी कोटी वंदन.

या सद्गुरुने माझे अस्तित्व खुलवले ते कसे?
तर,
मला मुळातच लिखाणाची खूप आवड. शाळेत असताना चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्यकला, मैदानी खेळ, तसेच शाळेने आयोजिलेले विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणं आणि ते मनापासून एन्जोय करणे हीच माझी शाळेतली सर्वात सुंदर गोष्ट. पण मोठे झाल्यावर कॉलेज लाईफमध्ये बालपण हरवल्यासारखे झाले.  ज्याक्षणी माझ्या ह्या सैरभैर बेभान मनाला अनिरुद्ध प्रेमसागर येउन मिळाला, त्याक्षणी हरवलेल्या बालपणासोबत आयुष्यात अखंड दरवळणारा सुगंधित अनिरुद्ध बहर, अनिरुद्ध गती सद्गुरुकृपेने लाभली.  आयुष्याचं सोनं होणं! म्हणजे काय असतं? हे बापूच्या सहवासात आल्यावर उमगतेच.

कवितेशी काडीमात्रही संबंध नसलेली मी... सहज म्हणून सुचलेली 1st जानेवारी, २०१४ ला लिहिलेली माझी पहिली कविता आणि ती ही माझ्या सद्गुरुवरची कविता.  आणि त्यानंतर सद्गुरुकृपेने माझे लिखाण पुन्हा चालू झाले. विविध विषयांवर कविता लिहिणे, लेख लिहिणे, हे सुरु झाले. कोणाशीही स्पर्धा म्हणून किंवा त्या दृष्टीने जीवनाकडे न पाहता हे सर्व एन्जोय करत राहणे मला आवडते. 

प्रेम, पावित्र आणि मर्यादा या त्रिसूत्रीच्या सहाय्याने संसार आणि परमार्थ साधणं, हे माझ्या बापूंनी शिकविले.
'बापू' आणि बापू कृपेने उमगलेले "मी आहे!" ह्याशिवाय आयुष्यात सुंदर आणि अवर्णनीय गोष्ट असूच शकत नाही. 

अनुप्रिया सावंत.

4 comments:

  1. फ।र सुंदर लेख़

    ReplyDelete
  2. खूप छान लिहीत राहा।Y

    ReplyDelete
  3. खूप छान लिहीत राहा।Y

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.