Monday 9 February 2015

लेख #१ - नाती आणि माणसे!!!


       नाती आणि माणसे, जसे काटा कि छापा आणि रुपयावरचा शिक्का.
     समाजात आपला दर्जा राखून ठेवण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो.  खूप वेळेस एखादी मिळालेली जागा आपण गमवून बसतो आणि मग त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत राहतो.  त्याचप्रमाणे जागा हि एखादे पद असो किवा कोणाच्या मनातले स्थान असो, ती मिळवायला इतका वेळ लागतो कि आयुष्यही कमी पडते त्याच उलट ती जागा गमवायला एक क्षणही पुरेसा असतो.  प्रश्न असतो विश्वासाचा, आपुलकीचा आणि भावनेचा.  पण गम्मत तर इथे अशी असते कि, जे निकष आपण आपल्या नात्यांच्या बाबतीत लावतो त्याचप्रमाणात ते निकष आपल्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत लावू शकलो असतो तर?  अर्थातच नाही आणि तो मुद्दाहि फारच निराळा.  असो आपण सर्वच ह्याबाबतीत जाणकार आहोतचं.

      नात्याच्या विश्वासात, भावनेच्या बंधनात, प्रेमाच्या विश्वात, गुंफली जाते हि माळ अशी,
               कि जशी पहिल्या पावसाच्या सरीत दरवळतो सुगंध मातीचा नव्याने.

जीवनात नाती अनेक असतात पण जपणारी लोक फार कमीच असतात.  काही नातं रक्ताचे असतात तर काही हृदयानेच जोडली जातात.  काही जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच.  काही नाती झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोव्ल्यागत तर काही झाडाच्या फांदीसारखी अलगद तुटणारी.  नाती हि अशी सहज रुजली जात नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी आवश्यक असते.  जर हे खतपाणी नियमितपणे दिले गेले नाही तर ते फार काळ तग न धरू शकणारे.

नात्यांचे खतपाणी हे भावनांच्या ओलाव्याने, प्रेमाने केलेल्या विचारपूसने आणि वेळप्रसंगी मदतीला धावणाऱ्या हाताच्या साह्याने बनलेल्या पाठीचा कणाप्रमाणे असते.  पण इतक्याश्या साध्या गोष्टी करतानाही आपण त्यात बरेच कारणे उपस्थित करतो.  हो ना?  आपण ज्या हौसेने बागेची निगा राखतो, काळजी घेतो.  त्याच हौसेने आपल्या जिव्हाळाच्या माणसासाठी धडपडतो का?  खरच प्रश्न मनात आलाच ना?  काय असावं बंर हे?

काही नाती हि जन्मोजन्मीची तर काही क्षणातच परकी करणारी.
काही नाती लांबूनच आपलंस करणारी, तर काही जवळ गेल्यास लांब जाणारी.
काही नाती न जोडताही टिकाव धरणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी.
काय हा विलक्षण खेळ नात्यांचा!!!!!

नाती हि विश्वासाने बनतात, भावनेच्या बंधनात एकमेकांत विरघळून जाण्यासाठी.

प्रेमाच्या ओलाव्याने नात्यांचा अलगद स्पर्श आयुष्याला सुखद क्षण अनुभवून देतात.  कारण नाती हि अशीच असतात.  त्यात 'मी' पण हा उरतच नाही.  जसे कि प्रेम हे देण्यासाठीच असते, घेण्यासाठी न्हवेचं.  नात्याची जादूच हि निराळी जशी कि प्रेमाचीचं किमया.  आपला माणूस कितीही दूर असला तरी प्रेमाच्या शब्दांत, भावनेच्या ओलाव्यात नुसती विचारपूसही नात्यांचा मूळ सक्षमपणे रोवू शकते.

जीवनात नाती तशी अनेक असतात.  'जीवन हे एक रहस्य आहे.  तिथे सर्व काही लपवावेच लागते.  मनात कितीही दुखं असली तरी जगासमोर हसावच लागतं.'  हे असं जरी असलं तरी नात्याची किंमत कशानेही करता येत नाही आणि आणि ती कशाने कमीही होत नाहीत.  कारण नातं हे माणसाच्या हृदयातून निर्माण होतं.

नातं जुळत सहजतेने,
नातं टिकत सहजतेने,
नातं तुटतहि सहजतेने,
परंतु तुटल्यानंतर डोळ्यांतून थेंब हि गळतात तितक्याच सहजतेने,
कारण ते नातं मनात कोरलेले असते, मनामध्येच नकळततेने.

स्वतःसाठी सुंदर घर असावे हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच वाटते.  पण आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करायला शिकलो कि जिथे जाऊ तिथे ते घर आपले आणि त्या घरातली माणसेही आपलीचं.  खूप साधी गोष्ट वाटते ना वरवरून पण तितकाच मृगजळाप्रमाणे भासणारी आणि तितकीच सहजतेने अवगत होणारी आहे.  बसं ती सहजता आपल्यात अवगत करायला शिकले पाहिजे आणि त्यात फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे बोलणे असायला हवे.

काही नाती हि बांधलेली असतात, ती सगळीच खरी असतात असेहि नाही तर बांधलेली नाती हि जपावी लागतात कारण जपूनही ती पोकळ राहतात.  त्याचप्रमाणे काही मात्र आपोआपच जपली जातात.  नात्यांमधली हि सहजता ज्यांनी कोणी हेरली, कि मग ती नाती शेवटपर्यंत आपलीच असतात.

ग्लोबलाईझेशनच्या युगात जग एवढे जवळ आले आहे कि माणसाला आता प्रत्यक्षातला संवादाची गरज वाटत नाही.  कारण त्याची हि संवादाची जागा आता मोबाइलच्या दुनियेने व्यापली आहे.   मोबाइल म्हणजे जिवंत माणूसच आणि ऑपेरेटिंग सीसटम.  जशी नवीन ऑपेरेटिंग सीसटम लौंच होईल तशी जुनी फेकून द्या.  भयानक वाटतात ना हे विचार सुद्धा?  खरच हे सत्य प्रत्यक्षात येण्याआधीच आपण आपल्या नात्याला जगवूया पुन्हा नव्याने खतपाणी घालून.  कारण नाती हि पैश्याने विकत घेता येऊ शकत नाहीत.  माणूस एकदा निघून गेला कि तो पुन्हा भेटत नाही.  त्यामुळे आपल्या माणसांना जपुयात, त्यांची काळजी घेऊयात.  शक्य तितका वेळ स्वतःला आणि आपल्या जिव्हाळाच्या नात्यांना देऊन ती जपुयात.

नाती असावीत निखळ, निर्मळ.
त्यात नसावे देणे नि घेणे.
असावे फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे बोलणे.

                                                      अनुप्रिया ठोंबरे-सावंत.

1 comment:

Thank You For Sharing Your Valuable Feedback.