Friday 20 February 2015

कविता #2 - बटाट्याची कहाणी.....



बटाटा मी आहे सर्वांचा लाडका,
माझी चव न्यारी वेगवेगळे पदार्थ बनवी.

कधी वडा, कधी समोसा, कधी बटाट्याची भाजी,
कधी भजी, कधी पाव भाजी तर कधी इतर भाजी.

तेलात मुरल्याशिवाय चव माझी येत नाही,
मला घेतल्याशिवाय पदार्थाला चव येत नाही.

माझी आणि तेलाची दोघांची गट्टी जमली,
म्हणूनच तर वाटतं माझी सगळ्यांशीच कट्टी झाली.

होतेय माझी वजाबाकी तेलाच्या मोहापायी,
नाद माझी सोडला, सर्वांनीच आजारपणापायी.

न्याहारी, जेवणाची जागा माझी
तेलाला माईनस करून घेतोय,
इडली, डोसा प्लस पोईंटच्या 
सोबतीला त्यांच्या ढोकळाही येतोय.

कळून चुकली जागा मला माझीच,
तेलाचा मोह आवरावा आपणच.
प्रमाणाचा मोहही ठरवावा आपणच.
'अति तिथे माती' म्हण लागू होते सगळ्याच गोष्टीला,
मीही तिथे न ठरलो अपवाद त्या गोष्टीला.

अशी ही माझी 'बटाटा' ची कहाणी,
वडाच्या मोहात पावा नेही करावी उपेक्षा,
चूक भूल माफ असावी, माझी ही एक अपेक्षा.

                                   - अनुप्रिया सावंत.

Friday 13 February 2015

लेख #२ - आयुष्याचा जोडीदार!!!



          लग्नसराइचे दिवस चालले आहेत.  जिथे तिथे लगीनघाई पाहायला मिळत आहे.  वधू-वर दोन्ही आप-आपल्या भावी जोडीदाराच्या स्वप्नांत आणि अपेक्षेत गुंतले आहेत.  घराच्या मंडळींची लग्नाच्या गडबडीमुळे नुसते धावपळ चाललेली आहे.  सगळं कस आनंदाला उधान आल्याप्रमाणे लगीन सराईचा घाट असतो ना!

         जे जोडीदार लग्न करणार आहेत आणि ज्यांची लग्न झालेली आहेत ते आप-आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा करत असणे हि अगदी साहजिकच आहे.  भावी जोडीदार तसेच नवरा बायको आपल्या जोडीदाराला जितकं समजून घेईल तितके प्रेम वाढते.  आता बरेच जण म्हणतील बोलणे सोपं आहे, प्रत्यक्षात ज्याचं त्यालाच सावरायचा असतं.  हो बरोबर आहे हेही.  पण, समाजात माणसाच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत असतात.  कधी चांगल्या तर कधी वाईट.  माणूस विचारांच्या कचाट्यात असा काही अडकून पडतो कि, बरोबर काय नि चूक काय? ह्याचा अंदाज बांधणे कठीण होते.  ज्यावेळी आपण अश्या समस्येत अडकतो तेव्हा नैराश्याने एवढे ग्रासून जातो कि जीवनाचा अंत ह्या पलीकडे आपणाला पर्याय हि दिसेनासा होता आणि हि दैना आपण आपली स्वतःच्याच मताने करून घेतो बरं का?  कारण स्वतः केलेल्या चुकांची शिक्षा भोगणे हे आपल्याला कठीण वाटते.  आणि आपण हे विसरतो कि, "आयुष्य हि परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे.  संकटं जशी येतात तशी आल्या पावले निघूनही जातात.  त्यासाठी आपण आपली विचारसरणी हि उत्तम ठेवेणे आवश्यक आहे.  कारण परमेश्वराने प्रत्येकाला संकटाचे बळं हे दिलेलेच असते".

         माणूस एकटा आयुष्य जगणं हि कठीण बाब आहे.  त्यामुळे जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवेल अश्या व्यक्तीच्या आपण शोधात असतो.  असं कोणी भेटले कि त्याचे रुपांतर प्रेमात होते.  हं, हे झाले लग्न अगोदरचे.

       लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टी मध्येहि खटके उडाले तरी आपण स्वतःला किवा समोरच्याला दोष देऊन आपल्या अपेक्षांच्या भंग झाल्याप्रमाणे वागतो.  त्यामुळे लग्नानंतर विवाहित असूनही प्रेम होण्याची कारण कोणती असू शकतील ह्याला मार्ग अनेक आहेत.  मुळात, प्रेमामध्ये माणूस स्वतःच एक अलिखित करार बनवतो आणि तो समोरच्यावर लादतो ते म्हणजे, माझ्या जोडीदाराने (आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती म्हणजे नवरा बायको किंवा भावी जोडीदार) मला समजून घेणे.  हो ना?  कळत-नकळत प्रत्येक जण ह्या करारात अडकतोच.  जेव्हा हा करार त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर पूर्णपणे मोडून निघतो, अशावेळी झालेले लग्नं हे प्रेमविवाह असो कि ठरवून झालेले लग्नं.  ते 'प्रेम' ह्या आभासी शब्दामागे कळत नकळत धावू लागते.  त्यामुळे अश्या व्यक्ती सहजच ज्यांना त्या पसंद करतात आणि जेथून त्यांना आनंद मिळतो अश्या गोष्टींकडे धावतात.  त्यातले काही जण स्वतःला सावरतातही पण काही जण मात्र स्वतःच्या इच्छा आकांशाच्या मोहात अडकून पडून स्वताला चुकीच्या मार्गावर नेतात आणि मनाप्रमाणे भरकटतात.  पण कधी ना कधी अश्या व्यक्ती संकटात सापडतात आणि तिथून पुढे मग संसारात खटके उडायला सुरुवात होते.  तेव्हा पुन्हा आपल्याच माणसांचा आधाराकडे आणि आधारासाठी धाव घेणारे भरकटलेले जीव आणि आपल्या जोडीदाराच्या चुकांना माफ करणारे तसेच आपला संसार पुन्हा नव्याने सुरळीत चालवा म्हणून अश्या व्यक्तींना माफही करतात आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुढाकारही घेतात.

        पण असं असूनही जिथे संशयाची सुई टोचली तिथे कधीना कधी पुन्हा त्याच गोष्टीवरून त्यांच्यात खटके उडणे साहजिकच आहे.  त्याचे कारणही अगदी तसेच, 'आपण त्या व्यक्तीला माफ केले ही भावना आपण स्वतःच्या आणि त्यांच्या मनात रुजवतो कि मी तुला माफ केले'.  हा मानवी स्वभावाच आहे.  आणि आपण असे करतोही अगदी कळत नकळततेने.  ह्याच गोष्टीचा विपिरीत परिणाम नवरा-बायकोत होऊन वादविवाद निर्माण होतात, संसारात खटके उडायला पुन्हा सुरुवात होते आणि हेच त्यांच्या आनंदी आयुष्यावर खोलवर परिणाम करतात.

      चुकलेली वाट पुन्हा मिळविता येते हो!  इतकी छोटीसी गोष्टही आपण विसरतो.  लग्नं म्हणजे एकमेकांच्या सहवासाने जोडीने आयुष्य जगणं.  एक चुकला कि दुसऱ्याने धीर देऊन त्याला सावरणं.  जशी चुकलेली वाट पुन्हा मिळविता येते तसेच अगदी संसाराचेही आहेच की.  पण त्यासाठी तुम्ही तुमचा हक्क, 'मी' पणा, अहंकार सोडवा आणि मुख्य म्हणजे माफ करण्यापेक्षा त्या व्यक्तीला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयास करा.  भांड्याला भांड लागले कि आवाज हा येणारच ना!  तसेच संसाराचेही असते.  एकमेकांच्या समजुतीचा आधार होऊन पहा, आयुष्य खूप सुंदर वाटेल.

       समोरच्याला माफ करण्यापेक्षा समोरच्याला समजून घेवून त्याला आणि स्वतःला त्यातून सावरणं हे खूप गरजेचे असते.  कारण कितीही झाले तरी आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी सर्वकाही सोडले असते.  जरी आपण चुकलो किंवा समोरचा चुकला तरी त्या चुकांचे समर्थन करण्यापेक्षा समोरच्याला एवढे प्रेम द्या कि, तो आणि आपण सर्वकाही चुकीच्या गोष्टी विसरून जाऊन पुन्हा प्रेमाचा बहर नव्याने फुलेल.  प्रेमाची ताकदच भारी हो.

        दोघांनी एकमेकांना माफ केले असं न समजता तसेच ती गोष्ट मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात न ठेवता एकमेकांना जेवढं समजून उमजून घेता येईल तेवढे तुमचेच प्रेम वाढत जाईल.  कारण प्रेम हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठीच असते.
                      

                                                                                                      अनुप्रिया ठोंबरे-सावंत.

मागील कथा वाचा                                                                                               पुढील कथा वाचा 

Tuesday 10 February 2015

कविता #1 - प्रेमाचे भांडण...


 
त्याच्या माझ्यातले भांडण आता नेहमीचेच झालंय.
माझ्या रागाला कारण अनेक बळीचा बकरा मात्र तोच झालंय.

त्याला मनवणे आता मला रोजचेच झालंय,
त्याचे रुसणे मला अजून हवेहवेसे झालंय.

त्याच्या माझ्या प्रेमाचे भांडण असावे हे असेच.
दोघांच्या प्रेमाचे कमळ फुलावे हे असेच.

त्याचं माझ्याशी न बोलणं काही काळ शांत वाटते,
वेळ निघून जाते जशी डोळ्यातून मात्र अश्रू वाहते.

त्याचे मौन माझ्या कानांना सुन्न करत जाते.
त्याच्या माझ्यातली दुरी पाहून त्यालाही पाझर फुटतो.

राहवेना दोघा आम्हा काही क्षणापुरतेही,
त्याच्या माझ्या प्रेमाची नाळ अशी हि जन्माची.

आमच्यातील भांडणं मिटून पुन्हा,
प्रेम दुप्पट वाढते आमचे प्रेम दुप्पट वाढते.
असे हे प्रेम आमचे दोघांचे प्रेम.

         - अनुप्रिया सावंत.

Monday 9 February 2015

संगणकाच्या विश्वात...माहिती संप्रेषण तंत्रज्ञान

Information Communication and Technology (ICT)  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे शाळा, कॉलेज, तसेच IT Person ह्यांसाठीच मर्यादित नसून तुम्ही, मी तसेच आपणा सर्वांनाच उपयुक्त असा आहे.  आणि मुख्य म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने कळत-नकळत आपण ICT ह्या गोष्टीशी जोडले जात आहोत.  आपण पाहूयात हे आय. सी. टी म्हणजे नेमकं काय आहे?

आपण सगळेच जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तंत्रज्ञानाचा वापर करतो.  मोबाईल, संगणक, लेपटोप, नोटबुक, रेडीओ, केबल टी.व्ही., ई. इलेक्ट्रोनिक साधनांच्या / उपकरणांच्या मदतीने आपण आपल्याला हवी असलेली माहिती मिळवितो तसेच माहितीचे देवाण घेवाण करतो.

आपण सगळेच जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तंत्रज्ञानाचा वापर करतो.  मोबाईल, संगणक, लेपटोप, नोटबुक, रेडीओ, केबल टी.व्ही., ई. इलेक्ट्रोनिक साधनांच्या / उपकरणांच्या मदतीने आपण आपल्याला हवी असलेली माहिती मिळवितो तसेच माहितीचे देवाण घेवाण करतो.

इंटरनेट, ई-उपग्रह संप्रेषण, INTER ACTIVE रेडीओ, लोकल आणि वाईड एरिया नेटवर्क (LAN & WAN) आणि सिम्युलेशन पद्धतीचा वापर करून माहिती गोळा करणे आणि तिचे विश्लेषण करणे, ती वापरणे आणि इतरांसाठी उपलब्ध करून देणे ह्या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होते.

आय. सी. टी. साधने -

१) संगणक (कॉम्पुटर)
     मानवाला बौद्धिक कार्यात मदत करणारे इलेक्ट्रोनिक साधन.  माहितीची देवाण घेवाण करणारे साधन म्हणजे संगणक होय. 


     ह्यात पुढील भागांचा समावेश होतो.

१. इनपुट डिव्हाईस - ज्या साधनान द्वारे आपण संगणकाला आज्ञा देतो किंवा ज्या साधनांद्वारे संगणकाला माहिती व सूचना पुरवितो, त्याला इनपुट डिव्हाईस (आदान उपकरणे) असे म्हणतात.
उदाहरणार्थ - कि-बोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, बारकोड रीडर, टचस्क्रीन ई.




कि-बोर्ड - किबोर्डच्या मदतीने आपणांस संगणकाला माहिती पुरविता (टायपिंग) येते तसेच सूचनाही देता येतात.


माउस - संगणकाला जलद माहिती पुरविण्यासाठी व सूचना देण्यासाठी माउसचा वापर केला जातो.

                       
स्कॅनर - स्कॅनरच्या मदतीने संगणकाला फोटो, हस्तलिखिते, छापील मजकूर, चित्रे ह्यांची हुबेहूब नक्कल पुरविली जाते.
                
डिजीटल कॅमेरा - ह्याच्या साह्याने फोटो काढून संगणकात साठवता येतो.

                  


२. आउटपुट डिव्हाईस - ज्या साधनान द्वारे संगणक आपणाला उत्तर देतो त्यास आउटपुट डिव्हाईस असे म्हणतात.

उदाहरणार्थ - प्रिंटर, मोनीटर (डिसप्ले स्क्रीन), स्पिकर्स.

१. प्रिंटर - संगणकाद्वारे प्राप्त माहितीची छापील प्रत कागदावर काढण्यासाठी प्रिंटरचा वापर होतो.

२. मोनीटर - संगणकाला माहिती पुरवल्यानंतर व सूचना दिल्यानंतर प्रक्रिया होऊन मिळणारी उत्तरे मोनीटरच्या पडद्यावर दिसतात.

३. स्पिकर्स - ध्वनीच्या / आवाजाच्या स्वरुपात संगणकाकडून माहिती ऐकण्यासाठी स्पिकर्सचा उपयोग होतो.
       
३. मेमरी डिव्हाईस - ज्या साधनान द्वारे संगणक त्याच्या कक्षात माहिती साठवतो, त्यास मेमरी डिव्हाईस असे म्हणतात.

उदाहरणार्थ - हार्ड डिस्क, युएसबी डेटा, मेगनेटिक टेप, फ्लोपी डिस्क, कॉम्पेक्ट डिस्क ई.
      




आजकाल आकाराने लहान, हलके असलेले आणि सर्वसामान्यांना वापरता येतील असे लेपटोप, टेबलेट पीसी देखील बाजारात उपलब्ध आहेत.  अद्ययावत मोबाईल्समध्ये इंटरनेट, वाय-फाय, ब्लुए टूथ, कॅमेरा, एसएमएस आणि एमएमएस यांचा समावेश असतो.

२. रेडीओ/ टी.व्ही. -

१९७० च्या दशकात रेडीओचा वापर मोठ्या प्रमाणात व्ह्याचा.  पण त्या नंतर मात्र दृश्य स्वरूपातील प्रसारणाच्या (टी.व्ही.) च्या आगमना नंतर, त्याच टी.व्ही. ची जागा रंगीत टी.व्ही.ने घेतली आणि आता एलसीडी आणि एल.ई.डी.  टी. व्ही. घेण्याचा वाढता कल आपल्याला दिसतो.  नुकतेच स्मार्ट टी.व्ही. देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत.

३. भ्रमणध्वनी संच (मोबाईल फोन) -
 भ्रमणध्वनी संच म्हणजेच ‘मोबाईल’ फोन ह्या बिनतारी संपर्कयंत्रणेचा वापर एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी करतात.  मोबाईल कॉमप्यूटिंगमध्ये ब्रोडकास्ट फ्रिक्वेन्सीज आणि कॅरीअर फ्रिक्वेन्सीजचा वापर संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी केला जातो.  ह्यासाठी 'सेल्युअर पेकेट रेडीओ' पद्धतीचा वापर केला जातो.  आणि ह्या तंत्रात माहिती पेकेटच्या स्वरुपात रेडीओ फ्रिक्वेन्सीद्वारे पाठविण्यात येते.  भ्रमणध्वनीद्वारे आवाज, लिखित व चित्रस्वरुपात संदेश जगात कोठेही पाठवणे शक्य झाले आहे.  त्याच बरोबर अद्ययावत भ्रमणध्वनीमध्ये इंटरनेट, वाय-फाय, ब्लू -टूथ, एसएमएस ह्यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
   
          
४. मोबाईल टचस्क्रीन -
 टचस्क्रीन म्हणजे दृश्य माहिती दर्शविणारा.  त्याला होणारा स्पर्श आणि तो कोणत्या जागी झाला, हे समजू शकणारा इलेक्ट्रोनिक पडदा.  टचस्क्रीन असलेल्या साधनांच्या पडद्याला हाताने किंवा बोटाने स्पर्श केला जातो.
         
  

५. इंटरनेट -
पूर्वी आपण पुस्तके वाचून किंवा ग्रंथालयात जाऊन, टी.व्ही वरील कार्यक्रम पाहून माहिती मिळवीत असू.  पण आता इंटरनेटमुळे हे बसल्याजागी शक्य झाले आहे.  संप्रेषण (कम्युनिकेशन) तंत्रज्ञानातील (टेकनोलोजी) प्रगतीमुळे म्हणजेच डिजीटल टेकनोलोजीच्या दुनियामुळे जग जवळ आले आहे.  त्यामुळे संप्रेषण, संवाद म्हणजेच कम्युनिकेशन अतिशय सुलभ, जलद आणि सुरक्षित झाले आहे.
            



सिम्युलेशन - 
संगणक प्रणालीच्या मदतीने वास्तवातील जगाचे आभासी रूप उभे करणे म्हणजेच सिम्युलेशन होय.

      

सिम्युलेशनअंतर्गत प्रतिकृती तयार करून त्या प्रतिकृतीचे कार्य कसे चालते, हे दाखवले जाते किंवा आपणांस ते पाहता येते.



गाडीच्या यंत्राचे किंवा एखाद्या औद्योगिक वस्तूचे डिझाईन करण्यासाठी ह्याचा वापर होतो.
      


कम्प्युटर गेम्स, युद्ध गेम ह्या सारख्या मनोरंजनाच्या गेमसाठी देखील ह्याचा वापर होतो.




सुरक्षित संशोधनकार्यासाठी ह्याचा उपयोग होतो.  धोकादायक स्वरूपाचे प्रशिक्षण, कोणत्याही स्वरूपाच्या जीवित किंवा वित्तहानीशिवाय सुरक्षितपणे देण्यासाठी देखील ह्याच वापर केला जातो.


अश्या अनेक प्रकारे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आपल्याला उपयोगी पडते आणि आपल्यास कोणत्या ना कोणत्या उपकरणाद्वारे/ साधनांद्वारे वापरास येते. 

     संगणक सुरु करण्यापासुंचे ते संगणकाचे भाग, प्रकार, विंडोजची ओळख, त्यांचे अप्लिकेशन, पेंट, ब्लोग, फोरम, एक्सेल, वर्ड प्रोसेसर, प्रेझेनटेशन व प्रेझेनटेशन प्लानिंग, इंटरनेट, ब्राउझिंग, स्काईप, आउटलुक, अश्याच आणि अनेक वेगवेगळ्या उपकरणांची आणि त्यांच्याशी सलंग्न असलेल्या विविध विषयांच्या माहितीची आपण देवाण-घेवाण करणार आहोतच.                                                    
Continue....
                                                                                           पुढे पहा

लेख #१ - नाती आणि माणसे!!!


       नाती आणि माणसे, जसे काटा कि छापा आणि रुपयावरचा शिक्का.
     समाजात आपला दर्जा राखून ठेवण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो.  खूप वेळेस एखादी मिळालेली जागा आपण गमवून बसतो आणि मग त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत राहतो.  त्याचप्रमाणे जागा हि एखादे पद असो किवा कोणाच्या मनातले स्थान असो, ती मिळवायला इतका वेळ लागतो कि आयुष्यही कमी पडते त्याच उलट ती जागा गमवायला एक क्षणही पुरेसा असतो.  प्रश्न असतो विश्वासाचा, आपुलकीचा आणि भावनेचा.  पण गम्मत तर इथे अशी असते कि, जे निकष आपण आपल्या नात्यांच्या बाबतीत लावतो त्याचप्रमाणात ते निकष आपल्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत लावू शकलो असतो तर?  अर्थातच नाही आणि तो मुद्दाहि फारच निराळा.  असो आपण सर्वच ह्याबाबतीत जाणकार आहोतचं.

      नात्याच्या विश्वासात, भावनेच्या बंधनात, प्रेमाच्या विश्वात, गुंफली जाते हि माळ अशी,
               कि जशी पहिल्या पावसाच्या सरीत दरवळतो सुगंध मातीचा नव्याने.

जीवनात नाती अनेक असतात पण जपणारी लोक फार कमीच असतात.  काही नातं रक्ताचे असतात तर काही हृदयानेच जोडली जातात.  काही जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच.  काही नाती झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोव्ल्यागत तर काही झाडाच्या फांदीसारखी अलगद तुटणारी.  नाती हि अशी सहज रुजली जात नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी आवश्यक असते.  जर हे खतपाणी नियमितपणे दिले गेले नाही तर ते फार काळ तग न धरू शकणारे.

नात्यांचे खतपाणी हे भावनांच्या ओलाव्याने, प्रेमाने केलेल्या विचारपूसने आणि वेळप्रसंगी मदतीला धावणाऱ्या हाताच्या साह्याने बनलेल्या पाठीचा कणाप्रमाणे असते.  पण इतक्याश्या साध्या गोष्टी करतानाही आपण त्यात बरेच कारणे उपस्थित करतो.  हो ना?  आपण ज्या हौसेने बागेची निगा राखतो, काळजी घेतो.  त्याच हौसेने आपल्या जिव्हाळाच्या माणसासाठी धडपडतो का?  खरच प्रश्न मनात आलाच ना?  काय असावं बंर हे?

काही नाती हि जन्मोजन्मीची तर काही क्षणातच परकी करणारी.
काही नाती लांबूनच आपलंस करणारी, तर काही जवळ गेल्यास लांब जाणारी.
काही नाती न जोडताही टिकाव धरणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी.
काय हा विलक्षण खेळ नात्यांचा!!!!!

नाती हि विश्वासाने बनतात, भावनेच्या बंधनात एकमेकांत विरघळून जाण्यासाठी.

प्रेमाच्या ओलाव्याने नात्यांचा अलगद स्पर्श आयुष्याला सुखद क्षण अनुभवून देतात.  कारण नाती हि अशीच असतात.  त्यात 'मी' पण हा उरतच नाही.  जसे कि प्रेम हे देण्यासाठीच असते, घेण्यासाठी न्हवेचं.  नात्याची जादूच हि निराळी जशी कि प्रेमाचीचं किमया.  आपला माणूस कितीही दूर असला तरी प्रेमाच्या शब्दांत, भावनेच्या ओलाव्यात नुसती विचारपूसही नात्यांचा मूळ सक्षमपणे रोवू शकते.

जीवनात नाती तशी अनेक असतात.  'जीवन हे एक रहस्य आहे.  तिथे सर्व काही लपवावेच लागते.  मनात कितीही दुखं असली तरी जगासमोर हसावच लागतं.'  हे असं जरी असलं तरी नात्याची किंमत कशानेही करता येत नाही आणि आणि ती कशाने कमीही होत नाहीत.  कारण नातं हे माणसाच्या हृदयातून निर्माण होतं.

नातं जुळत सहजतेने,
नातं टिकत सहजतेने,
नातं तुटतहि सहजतेने,
परंतु तुटल्यानंतर डोळ्यांतून थेंब हि गळतात तितक्याच सहजतेने,
कारण ते नातं मनात कोरलेले असते, मनामध्येच नकळततेने.

स्वतःसाठी सुंदर घर असावे हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच वाटते.  पण आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करायला शिकलो कि जिथे जाऊ तिथे ते घर आपले आणि त्या घरातली माणसेही आपलीचं.  खूप साधी गोष्ट वाटते ना वरवरून पण तितकाच मृगजळाप्रमाणे भासणारी आणि तितकीच सहजतेने अवगत होणारी आहे.  बसं ती सहजता आपल्यात अवगत करायला शिकले पाहिजे आणि त्यात फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे बोलणे असायला हवे.

काही नाती हि बांधलेली असतात, ती सगळीच खरी असतात असेहि नाही तर बांधलेली नाती हि जपावी लागतात कारण जपूनही ती पोकळ राहतात.  त्याचप्रमाणे काही मात्र आपोआपच जपली जातात.  नात्यांमधली हि सहजता ज्यांनी कोणी हेरली, कि मग ती नाती शेवटपर्यंत आपलीच असतात.

ग्लोबलाईझेशनच्या युगात जग एवढे जवळ आले आहे कि माणसाला आता प्रत्यक्षातला संवादाची गरज वाटत नाही.  कारण त्याची हि संवादाची जागा आता मोबाइलच्या दुनियेने व्यापली आहे.   मोबाइल म्हणजे जिवंत माणूसच आणि ऑपेरेटिंग सीसटम.  जशी नवीन ऑपेरेटिंग सीसटम लौंच होईल तशी जुनी फेकून द्या.  भयानक वाटतात ना हे विचार सुद्धा?  खरच हे सत्य प्रत्यक्षात येण्याआधीच आपण आपल्या नात्याला जगवूया पुन्हा नव्याने खतपाणी घालून.  कारण नाती हि पैश्याने विकत घेता येऊ शकत नाहीत.  माणूस एकदा निघून गेला कि तो पुन्हा भेटत नाही.  त्यामुळे आपल्या माणसांना जपुयात, त्यांची काळजी घेऊयात.  शक्य तितका वेळ स्वतःला आणि आपल्या जिव्हाळाच्या नात्यांना देऊन ती जपुयात.

नाती असावीत निखळ, निर्मळ.
त्यात नसावे देणे नि घेणे.
असावे फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे बोलणे.

                                                      अनुप्रिया ठोंबरे-सावंत.

माझे सद्गुरु

आयुष्याचं सोनं होतं म्हणजे नेमकं काय असतं ह्याची प्रत्यक्षात आलेली प्रचिती म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्या सद्गुरूचे येणं.

प्रेम आणि पावित्र्याने प्रपंचास परमार्थाची उत्तम जोड देऊन आयुष्याचं सोनं करणारे माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू.
उत्तम वक्ता, उत्तम श्रोता, उत्तम वाचक, उत्तम कवी, नाटककार, मूर्तिकार, फोटोग्राफर, चित्रकार, नृत्य तसेच इतर अनेक कलागुणांनी सर्वसंपन्न असे सद्गुर अनिरुद्ध बापू  M. D. डॉक्टर आहे.
HE IS SIMPLY UNIQUE.

डॉक्टर असून देखील प्रत्येक गोष्टीची मुळ उकल आणि प्रत्येक गोष्टीचा मुळ गाभा ह्यांची त्यांना असलेली माहिती अचंबित करणारी आहे. बापू स्वतः अध्यात्म आणि विज्ञान ह्यांची उत्तम सांगड घालून तसेच ते स्वतः आचरणात आणून आमच्याकडूनही करवून घेतात.  उत्तम शिक्षक कसा असावा हे डॉ. अनिरुद्ध (बापू) ह्यांच्याकडे पाहिल्यावर कळतेच.  प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळेल समजेल अश्या सोप्या भाषेत ते सांगतात. सर्व कलागुण संपन्न असूनही त्यास तोडीस तोड त्यांची मधुर वाणी, प्रेमळ, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, तसेच वेळप्रसंगी अत्यंत कठोर असा त्यांचा स्वभाव.

बापूंनी सहा ग्रंथ लिहले आहेत. त्यातील श्रीमदपुरुशार्थाचे तीन खंड म्हणजे मर्यादा पुरुषार्थ शिकविणारे पाठ्यपुस्तकच. "अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक" हे माझ्या सद्गुरूचे ब्रीद वाक्य. हे तीन ग्रंथ जणू अवघाची संसार सुखाचा करण्यासाठीचे प्रॅक्टिकल ग्रंथच आहेत.
त्यानंतर 'रामरसायन' हा ग्रंथ - अत्यंत गोड मधूर असा आनंद देणारा.
'मातृवास्तल्य विन्दानाम' आणि 'मातृवास्तल्य उपनिषद' - गायत्रीमाता, महिषासुरमर्दिनी आणि अनसूयामाता यांचे आख्यान समाविष्ट.
तसेच, "तदात्मानम सृजाह्म्यम" आणि "आवाहन न जानामी" ही पुस्तके.
ह्याव्यतिरिक्त "दैनिक प्रत्यक्ष" मधील अग्रलेखांची मालिका तर भूत, भविष्य आणि वर्तमान ह्यांची ओळख करून देणारी, जाणीव करून देणारी, रहस्यमय तसेच ऐका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देऊन वसुंधरेवरचे अद्भुत रहस्य आणि सत्य उलगडून सांगणारे आहे.
माझे सद्गुरु अनिरुद्ध केवळ अध्यात्मिकच नाही तर समाजात, जगात, विश्वात घडणाऱ्या अनेक गोष्टींची जाणीव करून देणारा आहे.  त्यांनी लिहिलेले 'तिसरे महायुध्द' हे वास्तववादी पुस्तक वाचल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चाललेल्या सद्य परिस्थितीतले घडामोडी आणि डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचा अभ्यास किती अचूक आहे ह्याची पदोपदी खात्री होते.  असं बरंच काही माझ्या सद्गुरुबद्दल सांगण्यासारखे आहे.  त्याचे वर्णन करण्यास शब्दांना सीमाही नाही आणि शब्दही अपुरे पडतील. 

असा माझा मित्र, सखा, मायबाप, माझा सद्गुरु डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी माझ्या आयुष्यात सद्गुरु रूपाने लाभला. ह्याहून सुंदर गोष्ट असूच शकत नाही.

अनुप्रिया सावंत.

मी कोण - मी आहे


मी सौ. अनुप्रिया आदित्य सावंत.

राईट अबाउट "मायसेल्फ" असा प्रश्न आला कि अक्षरशः भीतीने गाळण उडायची.  मी कोण? म्हणजे काय असत?  हे कधी ना समजले, नाही लिहिता आले.  पुस्तकात जे आहे ते छापायचे एवढेच माहित.  त्या पलीकडे केव्हाही काहीही उमगले नव्हते.

पण... आज जर मला कोणी "माझ्याबद्दल" विचारले.....
तर माझे उत्तर एकच असेल.....
मी आहे !!!
'माझे अस्तित्व आहे' ही माझी पहिली ओळख आहे.  कारण दुनियाच्या भुलभुलैय्यात आज प्रत्येक जण आपले स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही धडपड करीत असतो.  पण आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का की "माझे अस्तित्व म्हणजे काय"? मी कमावत असलेला पैसा माझे अस्तित्व आहे की मी घेतलेले शिक्षण म्हणजे माझे अस्तित्व आहे. तर उत्तर येईल नाही. मग तरीही हे मिळविण्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत असतो. व्यावहारीक दृष्ट्या ते अगदी बरोबरही आहे....पण मग माझे अस्तित्व काय आणि ते कस जपता येईल याचा विचार केला पाहीजे.

म्हणूनच माझे सदगुरु अनिरुद्ध बापू अगदी सोप्प्या शब्दात सांगतात की "मी आहे..." "आय एम" "मैं हू" हे शब्द माझे अस्तित्व दर्शविणारे आहे. "मी आहे..." ही जाणिव आधी स्वतःला झाल्यानंतर मी कशी आहे? माझ्याकडे काय आहे? हे प्रश्न आपण स्वतःला विचारु शकतो आणि ते प्रश्न विचारल्यावर मला मिळालेले उत्तर म्हणजे "अनुप्रिया".

हो अनुप्रिया म्हणजे 'प्रिय मुलगी'.  Beloved Daughter.
माझ्या वडीलांची अर्थात माझ्या Dad ची मी प्रिय मुलगी आहे...."मी अनुप्रिया आहे" आणि हेच माझे मूळ अस्तित्व आहे.  म्हणूनच मी या ब्लॉगचे नावच "अनुप्रिया" ठेवले आहे जे माझे ही नाव आहे.
नावात काय आहे... असे शेक्सपिअर म्हणतो... माझ्या नावात माझे तरी अस्तित्व आहे, असे मला वाटते.

आणि ह्या अस्तित्वाची जाणिव करुन देणार्‍या आणि ते खुलवणार्‍या माझ्या सदगुरुला माझे कोटी कोटी वंदन.

या सद्गुरुने माझे अस्तित्व खुलवले ते कसे?
तर,
मला मुळातच लिखाणाची खूप आवड. शाळेत असताना चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्यकला, मैदानी खेळ, तसेच शाळेने आयोजिलेले विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणं आणि ते मनापासून एन्जोय करणे हीच माझी शाळेतली सर्वात सुंदर गोष्ट. पण मोठे झाल्यावर कॉलेज लाईफमध्ये बालपण हरवल्यासारखे झाले.  ज्याक्षणी माझ्या ह्या सैरभैर बेभान मनाला अनिरुद्ध प्रेमसागर येउन मिळाला, त्याक्षणी हरवलेल्या बालपणासोबत आयुष्यात अखंड दरवळणारा सुगंधित अनिरुद्ध बहर, अनिरुद्ध गती सद्गुरुकृपेने लाभली.  आयुष्याचं सोनं होणं! म्हणजे काय असतं? हे बापूच्या सहवासात आल्यावर उमगतेच.

कवितेशी काडीमात्रही संबंध नसलेली मी... सहज म्हणून सुचलेली 1st जानेवारी, २०१४ ला लिहिलेली माझी पहिली कविता आणि ती ही माझ्या सद्गुरुवरची कविता.  आणि त्यानंतर सद्गुरुकृपेने माझे लिखाण पुन्हा चालू झाले. विविध विषयांवर कविता लिहिणे, लेख लिहिणे, हे सुरु झाले. कोणाशीही स्पर्धा म्हणून किंवा त्या दृष्टीने जीवनाकडे न पाहता हे सर्व एन्जोय करत राहणे मला आवडते. 

प्रेम, पावित्र आणि मर्यादा या त्रिसूत्रीच्या सहाय्याने संसार आणि परमार्थ साधणं, हे माझ्या बापूंनी शिकविले.
'बापू' आणि बापू कृपेने उमगलेले "मी आहे!" ह्याशिवाय आयुष्यात सुंदर आणि अवर्णनीय गोष्ट असूच शकत नाही. 

अनुप्रिया सावंत.