Tuesday, 22 September 2026

Turn On Your Roaming Mode!!!☕🚗

    
        भाई अभयारण्य म्हंटल की घनदाट जंगल, रानटी पक्षी, रातकिड्यांचे आवाज, पालापाचोळा, हे सगळं आलाच की ना रे! आपण मस्त अश्या हटके ट्रेक ला जायचं का... आशुतोष. 

हा आश्या मस्त पैकी सेव्हन अप ऍड सारखं अगदीच काहीतरी तुफान करूयात. 

मनीष उर्फ मन्या आणि धनंजय उर्फ धन्या आशुच्या हटके प्लॅन मध्ये सहभागी होत होते. 

आताच्या रोजच्या रुटिंगला कंटाळलेले हे तिघेही फेमस 'कॉलेज कट्टेकरी सबसे हटके करी' ह्या बिरुदावलीतील जानेमाने दोस्त. 

कॉलेज लाईफ झाल्यावर तिघेही एकाच क्षेत्रात मात्र वेगवेगळ्या कंपनीत रुजू झाले होते. ऑन ड्युटी चोवीस तास आयटी इंडस्ट्रीतले 24/7 शिफ्ट मध्ये काम करणारे थकले भागलेले सबसे हटके जीव.

     फायनली तिघांनीही आपापल्या ऑफिसमध्ये सुट्टी मिळवली ती आठवडाभराची शेड्युलडेड कामं पूर्ण करण्याच्या अटीवरच. 

आयटी इंडस्ट्री म्हणजे संपूर्णतः संगणकाच्या जीवावर उदार होऊन मनुष्यबळाच्या जोरावर काम करणारा परी संगणकाच्या आहारी गेलेला समाज. 

मन्याची ही व्याख्या त्याच्या टीम मध्ये जोर धरू लागली होती. सर्वांचीच गत एकच ना! असो. 

दिवसभरात सर्वी कामे आटोपून लवकरात लवकर आपापल्या ऑफिस मधून बाहेर पडायचे या एकमेव ध्येयाने पिछाडलेल्या तिघांना आज संगणकाने जणू मिठीच मारली होती.

     झाले असे की आपल्या धनंजयच्या संगणकावरील डेटाबेस(माहिती) हॅक झाले.  हे त्याला डेटाबेस अप्लिकेशन सपोर्टवर काम करणाऱ्या त्याच्या मित्राकडून समजले.  म्हणजे सिनिअरकडून मेलचा पाऊस एव्हाना पडला असेलच फक्त आता स्वतःवर कोसळायचा तेवढा बाकी आहे हे त्याला कळून चुकले.  आपल्या सुट्टीचं सोडा घरी जायला भेटेल की नाही हाच अबब प्रश्न आ वासून त्याच्याकडे पाहत होता.

       बऱ्याच डिटेल मध्ये गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की ज्या क्लायंट(अशी कंपनी ज्यांनी आपली काही कामे दुसऱ्या कंपनीच्या डिपार्टमेंटकडे सोपवली असतात) चा डेटा हॅक झालाय त्या प्रोजेक्टवर आपला मनीष आहे. 

म्हणजे एकूण काय तर धन्या आणि मन्या दोघेही डेटा रिकव्हर झाल्याशिवाय कुठेही हलू शकत नव्हते. 

दोघांचे एकमेकांशी बोलणे झाले व त्यांनी कॉन्फरन्स कॉल द्वारे आशुतोषला सविस्तर वृत्त कळवले. 

तिघांची झालेली निराशा एकमेकांना आवाजातून स्पष्ट कळत होती.

     रात्रभर सपोर्ट टीमला हाताशी धरून डिटेल्स सहित बॅकअप पूर्ण घेतला गेला व फार उशिराने का होईना धनंजयने डेटा रिकव्हर करत अँटिव्हायरस प्रॉपर वर्क करतोय की नाही हे टेस्टिंगही स्वतःच करून क्लायंट कडून फीडबॅक घेऊन मॅनेजरला रिपोर्ट मेल केले.  

हे एवढं धडाडीने केले गेले की त्यात फक्त सुट्टीवर जायची ओढ होती अर्थात मित्रांचा लळा, प्रेम, आपुलकी, दिलेला शब्द आणि झिंगाट ओतून काम केले गेले होते.  धडाधड एकमेकांना फोन कॉल करून कन्फर्मेशन दिले गेले.
     
        'दिल दोस्ती दुनियादारी त्यात आपली जबाबदारी' हा टॅग लावून आशु मोकळा झाला होता. मोकळा म्हणजे हातावर हात तोंडावर बोट असे नव्हे तर अळीमिळी गुप चिळी करत त्याने गाडी, सर्वांचा खाऊ सामान-सुमान कपडे सगळं अगदी व्यवस्थित रेडी करून दोघांना पिकअप करण्याच्या तयारीत हजरजबाबीपणा दाखवला होता.
     
       गाडी पळत डुलत 'हारी बाजी को जितना हमे आता है करत' चालली. आशुतोष ड्राईव्ह करत होता.  

एवढ्या गाण्यांच्या मैफिलीतही हे दोघं छान झोपा काढत होते.  चहाच्या टपरीवर गाडी थांबली तशी दोघांची झोप उडाली. त्याला कारण आशु ने मारलेला धक्के देत देत ब्रेक.  

खरं तर धक्के न्हवते ते इय्या इय्या करत आशु ने केलेली निद्रा भंग करणारी इशारा वजा सूचना होती.  

ह्याला चहाची टपरी दिसली असणार म्हणून दोघेही न बडबडता उतरले.

        गर्द हिरवी झाडे, पावसाने नुकताच चिंब भिजलेला रस्ता, मातीतील सुगंध, वातावरणातील आल्हादायकता आणि मस्त चहाचा घोट. 

अहाहा... काय सुंदर चहा आहे मामा... बरं वाटलं. 

टपरीवरील मामाने मान डोलावून एक स्मित केले.  

आपण थोड्यावेळ बसूयात का रे इथे? कसलं भारी वाटतंय रे! 

मन्याच्या वाक्याला संमती दर्शवत तिघेही थोड्यावेळ निवांत शांततेत बसले. 

बराच वेळ कोणीच काही बोलले नाही, फक्त निसर्ग अनुभवत होते.

     नक्की काय लोचा झाला रे ऑफिसमध्ये? आशूच्या प्रश्नवजा टॉपिक कम शांतता असहाय्य होणाऱ्या मनाने हा विचारलेला गॉसिपिंग सहाय्यक प्रश्नचिन्हाला आपली प्याक प्याक चालू करा हे कव्याक(quack) कव्याकने दिलेला इशारा आज्ञा शिरसावंद मानून दोघांनी बोलण्यास प्रारंभ केला. 

अखेर शांतता भंग पावली आणि त्याची जागा कुतुहूल कम ट्विट ट्विट ने घेतली. 

आता सगळं कसं आलबेल वाटतेया. वातावरण हलकं झालया बघा. 

आशूच्या खट्याळ स्वभावाची जाणीव असलेले दोघे खळखळून हसले.

       'मुसफिर हू यारो ना घर है ना ठिकाणा मुझे बस चलके जाना है'... काय रे धन्या काय झाला बावा, असं वळवळल्यावाणी काय हे? आशु बोलला. 

असे वळवळणारे हे किडे गाण्यावाणी इकडून तिकडे नुसते फिरतच असतात रे. एवढं अँटीवायरस असून पण काय कामाचं नाही. आपल्या डोक्याचा वापर करून आपण चांगल्या गोष्टी करायच्या आणि कोणी अति की शुन्य बुद्धिमान विघ्नसंतोषी माणसांनी वायरस बनवून त्यावर पाणी सोडायचं. 

हे बिनडोक संगणक त्याला बळी पडतात आणि बकरा मात्र आपण बनतो. 

विघ्नसंतोषी.... हा हा हा हा हा... भारी नामकरण केलंस रे! हॅकर ला विघ्नसंतोषी बोलल्यास जास्तच प्रभावी दिसतोय... मन्या बोलला.

         अरे तुला आठवतंय तो 'नाना करते प्यार तुमसे कर बैठे' वाला नाना बैठेकर? पुस्तकी किडा... कीडा कसला गोचिडा होता तो... आशु. 

आता त्याच काय मध्येच... धन्या बोलला.

अरे जसा पुस्तकी किडा तसेच हे संगणकावरचे किडे. नको तिथे नको ते उद्योग करतात नि तुमच्या आमच्या सारख्यांना कामाला लावतात. 

तेव्हा पण काय कमी ओरडा मिळायचा आपल्याला त्याच्यामुळे. फरक इतकाच की तिथे गुरुवर्य आणि इथे ऑफिसवर्य. 

तिघांना हसू आवरले नाही मात्र नकळत वातावरणात गंभीरता आली.
   
         आपल्या राजकारणात पण लय किडे आहेत ना रे भावा. पप्पूडा, केज्जूडा, आपाडा... ह्या शेवटून 'डा' च्या सिरीज वाले आपली डाळ शिजवून लोकांना भुंगे बनवून टाकतात ना रे! राजकारणातले अफलातून 'डा' वायरसचे प्रकार. हो आशु खरंय..आशुतोष भलताच गंभीर झालेला पाहून मन्याने विषय हलका करण्याचा प्रयत्न केला. 

अरे आपल्या फेसबुक वर पण नाही का एस्ट्रो नावाचा ऍप आलाय. तुम्हाला लोक काय समजतात? तुमच्या विषयी ती काय विचार करते? असे एक ना अनेक प्रश्न ज्यांची उत्तर आपल्याला मानविकृत संगणक देतो आणि आपणही त्या ऍपला बिनधास्त भेट देऊन जाणून घेतो. 

हेच करत असताना त्या वेबसाईट वर असंख्य ऍड चालू असतात आणि नकळत आपला डेटा त्याद्वारे चोरला जातो. मग ह्यात मार्क करून झुकरबर्ग तरी काय करणार. अशाने बर्गर टिका पण मिळायचा नाही.

हा खरंय ह्या लसी पण किती आणि कश्या पुऱ्या पडणार म्हणा. 

ह्या लसी जरी त्यांना शोधून आपले काम चोख बजावत असले तरी अजूनही बऱ्याच नव्या किड्यांचा वावर वाढतच आहे. 

पुन्हा आशु ने आपल्या स्वभावाला धरून अँटीवायरस चे नामकरण 'लसीकरण' मध्ये केले.

      मन्या, आशु अरे खरं तर अश्या बऱ्याच कंपन्या आहेत ज्या ह्या किड्यांना लसीकरणाचे डोस पाजतात. त्यातही बऱ्याच कंपन्या अश्या आहेत ज्या स्वतः अगाऊ अश्या लसी बनवतात जे किडे/ वायरस अजून वळवळायचे आहेत. 

म्हणजे इथेही करप्शन आहेच. 

'होम प्रॉडक्ट कंपनी' स्वतः किडे बनवा त्यावर स्वतः मलम लावा आणि बक्कळ पैसे कमवा.

वाह वाह वाह.... माझ्या धन्या काय बोललास! लय हुश्शSS हुश्शआSSर हाय पोरं आमचं. 

आशुतोषच्या बोलण्याला दाद देत मनीष आणि धनंजय दोघेही मनसोक्त हसायला लागतात. 

एव्हाना त्यांचे चहाचे सात राऊंड होऊन गेले होते.

आणि पुन्हा एकदा....

मामा... 3 कटिंगsssss...

        मैत्री ही अशीच असते, संगणकासारखी कॉपी पेस्ट करते आणि व्यक्ती वल्ली करत मनाचा धागाही अलगद घट्ट विणते.

तिघेही निघाले.... संगणक गॉसिप शट डाऊन करून ते 'रोमिंग मोड ऑन' करत. 

सोबतीला वाऱ्याची झुळूक आणि बॅकग्राऊंडला...

हम है राही प्यार के चलना अपना काम
पलभर मे हो जाएगी हर मुश्किल नाकाम
हौसला ना हारेंगे हम तो बाज़ी मारेंगे...
      
                                     - अनुप्रिया सावंत.


मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

Thursday, 13 August 2026

निबंधलेखन - निबंध कसा लिहावा? - भाग २


निबंध कसा लिहायचा हे समजून घेतल्यानंतर पुढचा प्रश्न असतो....

“पण प्रत्यक्ष निबंध लिहिताना सुरुवात कुठून करायची?”


          याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता काही निबंधांची उदाहरणे दिली आहेत. ही उदाहरणे केवळ वाचण्यासाठी नाहीत, तर निबंधाची मांडणी समजून घेण्यासाठी आहेत. सुरुवात, विषयाचा विस्तार, मुद्द्यांची मांडणी, परिच्छेदांची रचना आणि शेवट यांचा योग्य मेळ कसा साधता येतो, हे या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना सहज समजेल.

माझा आवडता खेळ – फुटबॉल

             खेळ हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते. अनेक खेळांपैकी फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे.
          फुटबॉल हा जगभर लोकप्रिय असलेला सांघिक खेळ आहे. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. मैदानाच्या दोन्ही बाजूंना गोलपोस्ट असतात. खेळाडू पायाने चेंडू खेळवत तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. जो संघ अधिक गोल करतो, तो विजयी ठरतो.
        मला फुटबॉल खेळताना खूप आनंद मिळतो. चेंडूवर नियंत्रण ठेवणे, वेगाने धावणे, योग्य वेळी पास देणे आणि गोल करण्याचा प्रयत्न करणे मला विशेष आवडते. फुटबॉलमध्ये केवळ कौशल्य पुरेसे नसते, तर संघभावना, शिस्त, एकाग्रता आणि योग्य नियोजनही आवश्यक असते.
        फुटबॉल खेळल्यामुळे माझा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. या खेळातून सहकार्य, नेतृत्व, संयम आणि पराभव स्वीकारण्याची वृत्ती शिकायला मिळते. जिंकताना नम्र राहणे आणि हरल्यानंतर पुन्हा प्रयत्न करणे हा महत्त्वाचा धडा फुटबॉल मला शिकवतो.
        मोकळ्या वेळेत मित्रांसोबत फुटबॉल खेळणे मला खूप आवडते. मैदानावर खेळताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे फुटबॉल हा केवळ माझा आवडता खेळ नाही, तर मला उत्साह, शिस्त आणि आत्मविश्वास देणारा माझा आवडता खेळ आहे.

                            ******************

निबंध - एका पुस्तकाचे आत्मवृत्त!

मुद्दे :
  • माझा जन्म
  • ज्ञानाचा खजिना
  • विद्यार्थ्यांचा जिवलग मित्र
  • मोबाईलच्या युगातील माझे स्थान
  • वाचनाचे महत्त्व
  • विद्यार्थ्यांना संदेश


एका पुस्तकाचे आत्मवृत्त!

            मी एक पुस्तक आहे. ज्ञानाच्या अथांग सागरातील एक छोटासा थेंब! लेखकाच्या कल्पनाशक्तीतून आणि विचारांतून माझा जन्म झाला. छापखान्यातील विविध प्रक्रियांतून मी आकाराला आलो आणि वाचकांच्या हातात येऊन माझे जीवन सार्थकी लागले. माझ्या प्रत्येक पानात ज्ञान, अनुभव आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा दडलेला आहे.
            मी ज्ञानाचा खजिना आहे. माझ्या सहवासातून माणूस विचारशील बनतो. विज्ञान, इतिहास, साहित्य, कला आणि जीवनमूल्ये यांचे ज्ञान मी उदारपणे देत असतो. महान व्यक्तींचे विचार, प्रेरणादायी कथा आणि विविध विषयांची माहिती माझ्या पानांमध्ये जपलेली असते. म्हणूनच मला माणसाचा खरा मित्र असेही म्हटले जाते.
            विद्यार्थ्यांचा मी जिवलग मित्र आहे. विद्यार्थी जीवनात माझे स्थान अनन्यसाधारण आहे. मी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत यश मिळवून देत नाही, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्यही करतो. वाचनामुळे विद्यार्थ्यांची भाषाशैली समृद्ध होते, विचारशक्ती वाढते आणि ज्ञानाच्या नव्या वाटा त्यांच्यासाठी खुल्या होतात.
            आज मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात माझे स्वरूप काहीसे बदलले असले, तरी माझे महत्त्व कमी झालेले नाही. ई-पुस्तकांच्या रूपाने मी अधिक सुलभ झालो आहे. तंत्रज्ञानाने मला नवे रूप दिले असले, तरी माझ्या ज्ञानदानाच्या कार्यात कोणताही बदल झालेला नाही. मोबाईल तात्पुरती माहिती देऊ शकतो; परंतु सखोल ज्ञान आणि विचारांची समृद्धी मीच प्रदान करू शकतो.
            वाचन ही एक उत्तम सवय आहे. वाचनामुळे मन समृद्ध होते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. नियमित वाचन करणारी व्यक्ती अधिक संवेदनशील, सुसंस्कृत आणि आत्मविश्वासपूर्ण बनते.
            विद्यार्थ्यांना माझा एवढाच संदेश आहे की, रोज काही काळ वाचनासाठी राखून ठेवा. मला तुमचा मित्र बनवा. माझ्या सहवासातून तुम्हाला ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा मिळेल. कारण पुस्तकांशी जुळलेली मैत्री आयुष्यभर साथ देणारी असते.

निष्कर्ष : पुस्तके ही ज्ञानाची दारे उघडणारी आणि माणसाला समृद्ध करणारी खरी मित्र असतात.



******************


निबंध - सामाजिक माध्यमे - वरदान की शाप?

मुद्दे :
  • सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव
  • त्यांचे फायदे
  • त्यांचे दुष्परिणाम
  • विद्यार्थी आणि सामाजिक माध्यमे
  • जबाबदारीने वापरण्याची गरज
  • निष्कर्ष

सामाजिक माध्यमे - वरदान की शाप?

                      आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक माध्यमे ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. माहितीची देवाणघेवाण, संवाद आणि ज्ञानप्राप्ती यांसाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून त्यांचा उपयोग जीवनाच्या विविध क्षेत्रांत होताना दिसून येतो.
                सामाजिक माध्यमांचे अनेक फायदे आहेत. आपण जगभरातील घडामोडींची माहिती काही क्षणांत मिळवू शकतो. शिक्षण, व्यवसाय, कला आणि विविध कौशल्यांना वाव देण्यासाठीही सामाजिक माध्यमे उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, अभ्याससाहित्य आणि विविध विषयांची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. तसेच, दूरवर राहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधणेही सहज शक्य झाले आहे.
                मात्र, सामाजिक माध्यमांच्या अतिवापरामुळे काही गंभीर समस्या निर्माण होत आहेत. खोटी माहिती पसरवणे, वेळेचा अपव्यय, मानसिक ताण, व्यसनाधीनता आणि गोपनीयतेचा भंग यांसारखे दुष्परिणाम आज दिसून येत आहेत. अनेकदा सामाजिक माध्यमांच्या अतिवापरामुळे व्यक्ती प्रत्यक्ष संवादापासून दूर जात आहे. त्यामुळे नातेसंबंधांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
                विद्यार्थी आणि सामाजिक माध्यमे यांचे नाते विशेष महत्त्वाचे आहे. सामाजिक माध्यमांचा योग्य वापर केल्यास ती विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे भांडार ठरू शकतात. परंतु, मनोरंजनाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून आणि आवश्यकतेनुसारच सामाजिक माध्यमांचा वापर करणे गरजेचे आहे.
                आज सामाजिक माध्यमांचा जबाबदारीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि वापरावर योग्य मर्यादा ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक माध्यमांचा उपयोग ज्ञान, संवाद आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्हावा, यासाठी सजगता बाळगणे गरजेचे आहे.

निष्कर्ष: सामाजिक माध्यमे ही स्वतःमध्ये ना वरदान आहेत, ना शाप. त्यांचा योग्य आणि जबाबदारीने वापर केल्यास ती वरदान ठरतात, तर अतिरेक आणि गैरवापरामुळे ती शाप बनू शकतात. म्हणूनच "सामाजिक माध्यमांचा वापर करा; पण विवेक आणि संयम कधीही सोडू नका."


******************

थोडंसं हितगुज...

        निबंध लिहिताना प्रत्येक वेळी उत्तम शब्द सापडतीलच असे नाही. प्रत्येक विषयावर लगेच विचार सुचतीलच असेही नाही. पण लिहायला सुरुवात केली की विचार हळूहळू शब्दांत उतरू लागतात.

        म्हणून दिलेली उदाहरणे फक्त वाचू नका. त्यातून कल्पना घ्या, मांडणी समजा आणि मग आपल्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण निबंध सुंदर होतो तो केवळ शब्दांमुळे नाही, तर त्यातले विचार आपले असतात म्हणून.

        आणि हो... निबंध लिहिताना कधी एखादा विषय कठीण वाटला, सुरुवात सुचली नाही किंवा “हे नेमकं कसं लिहायचं?” असा प्रश्न पडला, तर पुन्हा इथे या.
आपण पुन्हा एकत्र विचार करू, विषय समजून घेऊ आणि त्याला शब्दांची सुंदर वाट करून देऊ.

            तोपर्यंत लिहित राहा...

        कारण प्रत्येक लिहिलेला निबंध तुम्हाला फक्त चांगले गुण मिळवून देत नाही, तर स्वतःचे विचार व्यक्त करायलाही शिकवतो.

        तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहते आहे...!


                                          – अनुप्रिया सावंत

Tuesday, 11 August 2026

कथालेखन - कथालेखन कसे करावे?

कथालेखन: विद्यार्थ्यांसाठी सोपी आणि गुण मिळवून देणारी पद्धत

कथालेखन म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांना वाटतं, “मला कल्पना सुचत नाहीत”, “कथा कशी सुरू करायची?”, “शेवट काय करायचा?” किंवा “कथा लिहिताना खूप मोठं लिहावं लागतं का?”

पण खरं तर कथालेखन म्हणजे अवघड साहित्यनिर्मिती नाही. परीक्षेच्या दृष्टीने पाहिले तर दिलेल्या मुद्द्यांचा योग्य वापर करून, त्यांना क्रमाने जोडून एक अर्थपूर्ण आणि वाचनीय कथा तयार करणे हेच कथालेखनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कथालेखन सहज आणि प्रभावीपणे करता येते.

१. कथालेखनात नेमकं काय तपासलं जातं?

कथालेखनात फक्त कथा किती मोठी आहे हे पाहिले जात नाही. दिलेल्या विषयाचा/मुद्द्यांचा योग्य वापर झाला आहे का, कथा सुसंगत आहे का, भाषा योग्य आहे का आणि कथा पूर्ण वाटते का, याला महत्त्व असते.

साधारणपणे पुढील बाबी लक्षात घेऊन गुण मिळतात :

१. आशय (Content) / विषयाची मांडणी

दिलेल्या विषयाचा आणि मुद्द्यांचा योग्य वापर झाला आहे का?

२. क्रमबद्धता (Sequence) व सुसंगती (Coherence)

घटना योग्य क्रमाने आणि एकमेकांशी जोडून पुढे जातात का?

३. भाषा (Language)

वाक्यरचना, शब्दप्रयोग आणि शुद्धलेखन योग्य आहे का?

४. सर्जनशीलता (Creativity) / परिणामकारकता (Effectiveness)

कथेत स्वतःची कल्पना, रंजकता आणि प्रभावी मांडणी आहे का?

५. पूर्णत्व (Completeness)

कथेला योग्य आणि समर्पक शेवट आहे का?

लक्षात ठेवा: फक्त मोठी कथा लिहिल्याने जास्त गुण मिळत नाहीत. आशय, मांडणी, भाषा आणि योग्य शेवट यांना महत्त्व आहे.


२. कथालेखनाची सोपी पद्धत – ५ Steps

Step 1: दिलेले मुद्दे नीट वाचा

प्रश्नात दिलेले सर्व मुद्दे प्रथम शांतपणे वाचा.

उदा.

एक मुलगा – रस्त्यात पाकीट सापडणे – पाकिटात पैसे व महत्त्वाची कागदपत्रे – मालकाचा शोध – पाकीट परत करणे – प्रामाणिकपणाचे बक्षीस

हे फक्त मुद्दे आहेत. आता त्यांना योग्य क्रमाने जोडून कथा तयार करायची आहे.

Step 2 : पात्रे ठरवा

कथेत कोण असणार, हे ठरवा.

उदा.
अजय – मुख्य पात्र
एक व्यक्ती – पाकिटाचा मालक

खूप जास्त पात्रे आणण्याची गरज नाही.

Step 3 : सुरुवात करा

कथा विषयाला धरून आणि सहजपणे सुरू करा.

उदा.
“अजय रोजप्रमाणे शाळेतून घरी जात होता. रस्त्यात त्याला एक पाकीट दिसले.”

ही सुरुवात साधी आहे आणि लगेच कथा पुढे नेते.

Step 4 : घटनांना क्रमाने जोडा.

मुद्दे फक्त एकामागोमाग एक लिहायचे नाहीत; त्यांच्यातील संबंध दाखवायचा आहे.

फक्त माहिती :
अजयला पाकीट सापडले.
पाकिटात पैसे होते.
त्याने मालकाचा शोध घेतला.
त्याने पाकीट परत केले.

ही माहिती आहे; पण कथा नाही.

घटनांना जोडून :

अजयने पाकीट उचलून पाहिले. त्यात बरीच रक्कम, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि एक ओळखपत्र होते. त्याच्या मनात क्षणभर विचार आला, “हे पैसे आपण वापरले तर...?” पण लगेच त्याला आपल्या आईचे शब्द आठवले, “दुसऱ्याची वस्तू कधीही स्वतःची समजू नये.”

अशा प्रकारे घटना एकमेकांशी जोडल्यामुळे कथा अधिक रंजक होते.


Step 5 : प्रभावी शेवट करा

कथेचा शेवट अचानक करू नका. शेवटातून कथेचा मुख्य विचार स्पष्ट झाला पाहिजे.

उदा.

अजयने पाकीट त्याच्या मालकाला परत केले. त्या व्यक्तीने अजयचे आभार मानले आणि त्याला बक्षीस देऊ केले; मात्र अजयने नम्रपणे नकार दिला.

त्या दिवशी अजयला जाणवले की प्रामाणिकपणातून मिळणारे समाधान हे कोणत्याही पैशांपेक्षा मोठे असते.


३. Sample Story - विषय :

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा:

एक मुलगा – रस्त्यात पाकीट सापडणे – पाकिटात पैसे व महत्त्वाची कागदपत्रे – मालकाचा शोध – पाकीट परत करणे – प्रामाणिकपणाचे बक्षीस

कथा : प्रामाणिकपणाचे बक्षीस

        एकदा अजय नावाचा मुलगा शाळेतून घरी जात होता. रस्त्यात त्याला एक पाकीट दिसले. त्याने ते उचलून पाहिले. पाकिटात बरीच रक्कम, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि एक ओळखपत्र होते.
        अजयच्या मनात क्षणभर विचार आला, “हे पैसे मी माझ्यासाठी वापरले तर?” पण लगेच त्याला आपल्या आईने सांगितलेले शब्द आठवले, “दुसऱ्याची वस्तू कधीही स्वतःची समजू नये.”
        त्याने ओळखपत्रावरील पत्ता पाहिला आणि त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे ठरवले. काही वेळाने तो त्या पत्त्यावर पोहोचला आणि पाकीट त्या व्यक्तीच्या हातात दिले.
        पाकीट मिळताच त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ते म्हणाले, “बाळा, यात माझ्या मुलाच्या उपचारांसाठी ठेवलेले पैसे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती.” त्यांनी अजयचे मनापासून आभार मानले आणि त्याला बक्षीस देऊ केले.
        पण अजयने नम्रपणे नकार दिला.  घरी परतताना अजयच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्या दिवशी त्याला जाणवले की प्रामाणिकपणातून मिळणारे समाधान हे कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठे असते.

तात्पर्य : प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे.


४. कथालेखनात टाळावयाच्या चुका
  • दिलेले मुद्दे न वापरणे
  • मुद्दे फक्त एकामागोमाग एक लिहिणे
  • विषयापासून दूर जाणे
  • खूप मोठी किंवा गुंतागुंतीची वाक्ये लिहिणे
  • अनावश्यक पात्रे आणणे
  • कथा अचानक संपवणे
  • शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करणे
  • फक्त संवाद लिहून कथा पूर्ण करणे
  • कथेच्या आशयाशी संबंध नसलेले तात्पर्य लिहिणे

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट...

कथालेखनासाठी प्रत्येक वेळी नवीन आणि भन्नाट कल्पना असणे आवश्यक नाही.

दिलेल्या मुद्द्यांचा योग्य वापर + घटनांचा क्रम + साधी व शुद्ध भाषा + प्रभावी शेवट = चांगले कथालेखन.

परीक्षेत “मला मोठी कथा लिहायची आहे” असा विचार न करता,  “मला दिलेल्या मुद्द्यांवर आधारित पूर्ण आणि सुसंगत कथा लिहायची आहे.”  हा विचार मनात ठेवा.

थोडक्यात :

मुद्दे वाचा → पात्रे ठरवा → सुरुवात करा → घटना जोडा → योग्य शेवट करा → शुद्धलेखन तपासा.

                                  - अनुप्रिया सावंत

Sunday, 2 August 2026

कविता #25 - डूमस्क्रोलिंगची धुंदी

    आपण अशा काळात जगतो आहोत जिथे जगाशी जोडणारी साधनं वाढली, पण स्वतःशी जोडणारे क्षण कमी झाले. दिवसाची सुरुवात स्क्रीनने होते आणि शेवटही त्याच प्रकाशात. मधल्या वेळेत किती बातम्या, किती व्हिडिओ, किती पोस्ट, किती प्रतिक्रिया समोरून गेल्या... पण दिवस संपल्यावर मन मात्र अनेकदा रिकामंच वाटतं.

    मोबाइल, सोशल मीडिया किंवा तंत्रज्ञान चुकीचं नाही. उलट त्याने आयुष्य अनेक प्रकारे सोपं केलं आहे. पण प्रत्येक सोयीची एक किंमत असते. नकळत आपण आपल्या वेळेची, शांततेची आणि स्वतःशी असलेल्या संवादाची किंमत मोजू लागतो.

    आज आपण प्रत्येक क्षण टिपतो, पण तो जगायला विसरतो. इतरांच्या आयुष्यात डोकावताना स्वतःच्या मनात डोकावण्यासाठी वेळच उरत नाही. जवळची माणसं शेजारी बसलेली असतात, पण प्रत्येकाच्या नजरा वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेल्या असतात. संवाद कमी होतो, प्रतिक्रिया वाढतात. माहिती वाढते, पण मन हलकं होत नाही.

    कधी स्वतःलाच प्रश्न पडतो... शेवटचं आपण शांत बसून काहीच न करता केव्हा राहिलो होतो? शेवटचं आकाशाकडे पाहून मन भरून आलं होतं ते कधी? शेवटचं स्वतःच्या मनाचं बोलणं आपण खरंच ऐकलं होतं का?

    कदाचित या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगळी असतील. पण प्रश्न मात्र जवळजवळ सगळ्यांचाच एकसारखाच आहे.

    ही कविता कोणावर टीका करण्यासाठी नाही. मोबाइल बाजूला ठेवा, असं सांगण्यासाठीही नाही. ही फक्त आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नकळत घडत गेलेल्या बदलांकडे एक शांत नजरेने पाहण्याचा प्रयत्न आहे. कारण कधी कधी बदलाची सुरुवात मोठ्या निर्णयाने होत नाही; ती फक्त एका क्षणाच्या जाणीवेने होते.

    त्या जाणीवेच्या प्रवासातील काही कवितारुपी शब्द...

Poem Published in Pratyaksha Newspaper
                      फोन उजळतो, खोली अंधारते,
                    डोळे थकतात, मन सैरभैरते.
                    स्क्रीनवर जग धावतं पुढे,
                    आपण मात्र मागेच राहतो तिथे.


बोटं फिरतात, वेळ निसटतो,
एक पोस्ट, मग दुसरी करत क्षण हरवतो.
हातात मोबाइल, मनात कोलाहल,
शांततेचा पत्ता मात्र शून्यच राहतो.



                    इतरांच्या हसण्यात आनंद शोधतो,
                    स्वतःच्या मनाशी बोलणं टाळतो.
                    Status रंगीत, आयुष्य फिकं,
                    तुलनेच्या गर्दीत हरवतं अस्तित्व एकटं.



निसर्ग बाहेर, आपण आत,
आभासी प्रकाशात हरवलेले हात.
आकाश निळं, पण नजरेत नाही,
स्क्रीनचं आकाश मात्र सतत सोबत राही.



                 जवळची माणसं जवळ असून दूर,
                 स्क्रीनवरची नाती मात्र रोजच हजर.
                 घरात संवाद कमी होत जातो,
                 Notification चा आवाज मात्र वाढत जातो.



सेकंदागणिक बातम्यांचा मारा,
कधी भीती, कधी राग, कधी सारा.
कोमल मन थरथरतं आत,
कठोर मन होतं दगडासारखं घट्ट.



                        स्क्रोलिंगमध्ये विचार विरघळतात,
                        भावना हळूच बोथट होतात.
                        हसणं reaction मध्ये अडकतं,
                        खरं हसू कुठेतरी हरवतं.



वेळ जातो, पण कळत नाही,
आज संपतो, उद्या सुरूच राही.
आयुष्य live असतं बाहेर कुठे,
आपण replay मध्ये अडकलेलो इथे.



                   आभासी गर्दीत श्वास अडखळतो,
                   मन मात्र काहीतरी शोधत राहतो.
                   अचानक शांततेची हलकी जाणीव,
                   आणि आत कुठेतरी… काहीतरी उमजतं.



त्या उमजण्यात काही सांगणं नसतं,
काही बदलायचंही नसतं,
फक्त आत कुठेतरी हलकं वाटतं,
आणि तेवढंच पुरेसं ठरतं.


                                    - अनुप्रिया सावंत



Wednesday, 22 July 2026

लघुकथा #3 - Beyond Words!

    

    आयुष्याची गंमतच वेगळी आहे. रोज कितीतरी माणसं भेटतात. काही फक्त ओळखीची होऊन राहतात, काही आठवणी बनतात आणि काही नकळत आपल्या जगण्याचा भाग होऊन जातात. पण या सगळ्या भेटींमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, आपण एकमेकांच्या सहवासात जगत असतो.


    सहवास म्हणजे फक्त एकत्र असणं नव्हे. तो कधी एका स्मितात असतो, कधी एखाद्या वाक्यात, तर कधी काहीही न बोलता दिलेल्या समजुतीत असतो. कितीतरी वेळा आपल्याला आठवतही नाही की, एखाद्या दिवशी आपण कोणाला काय बोललो होतो; पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला कसं वाटू दिलं होतं, हे मात्र मन फार काळ जपून ठेवतं.


    शाळेतल्या फळ्यावरचे धडे रोज बदलत असतात. कार्यालयातल्या फायली बदलत असतात. घरातल्या जबाबदाऱ्याही बदलत राहतात. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही, माणसाला माणसाची असलेली गरज. कुठल्याही वयात, कुठल्याही भूमिकेत आपण असलो, तरी आपल्याला समजून घेणारे शब्द, आपुलकीचा सहवास आणि मनाला हलकं करणारी माणसं हवीहवीशी वाटतच राहतात.


    निसर्गही आपल्याला हेच शिकवत असावा. आकाशाला क्षितिजाची घाई नसते, नदीला तिच्या प्रवाहाचा गर्व नसतो आणि झाडाला त्याच्या सावलीचा हिशेब नसतो. ती फक्त आपलं असणं जगत राहतात. कदाचित माणसाचंही तसंच असावं. आपल्या सहवासाने कोणाला आधार मिळाला, कोणाच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं किंवा कोणाचा दिवस थोडासा हलका झाला, तर त्यापेक्षा मोठी कमाई कोणती!


    दिवसाच्या शेवटी आपण किती कामं केली याचा हिशेब लागतोच. पण काही हिशेब असेही असतात, जे कुठे लिहिले जात नाहीत. ते फक्त मनात साठत राहतात. एखाद्या विद्यार्थ्याच्या आठवणीत, एखाद्या सहकाऱ्याच्या विश्वासात, एखाद्या मित्राच्या हसण्यात किंवा आपल्या माणसांच्या ऊबदार सहवासात.


    कदाचित म्हणूनच, आयुष्य आपल्याला मोठं होण्यापेक्षा सुंदर होण्याची अधिक संधी देत असतं. आणि सुंदर असणं म्हणजे फार काही वेगळं नाही, फक्त आपल्या सहवासाने कोणाचं तरी मन थोडंसं प्रसन्न होणं.


    कारण शेवटी, आपल्या सहवासाने कोणाच्या आयुष्यात मोठे बदल घडवणं आवश्यक नसतं; त्या प्रवासात त्याला एक सुंदर क्षण, एक हसरं स्मित आणि मनाला ऊब देणारी एक आठवण देता आली, तरी ते कमी नसतं.

                                 - अनुप्रिया सावंत

Learnscape🌍 #6 - Learning Beyond Words

    Life has a beautiful way of bringing people together. Some become a part of our memories, and some quietly become a part of our lives. In every place we go and in every role we play, one thing remains the same. We grow through one another's presence.

     Presence is more than simply being there. Sometimes, it is a smile. Sometimes, it is a few kind words. And sometimes, it is the comfort of knowing that someone understands us without saying much at all. We may forget what was said on a particular day, but we often remember how someone made us feel.
    
    Some of life's most beautiful lessons are never found in books. They are found in classrooms, in shared moments, and in simple acts of kindness. The words written on a board may change every day, but the warmth we leave in someone's heart can stay for years.

    Whether we are teachers, students, colleagues, friends, or simply a small part of someone's journey, we all need kindness, understanding, and a sense of belonging. Sometimes, teaching is not only about sharing knowledge. It is about listening, encouraging, and helping someone believe in themselves. And perhaps, that is true of life too.

    Nature teaches us this every day. The sky never rushes to meet the horizon. A tree never counts how many people rest in its shade. They simply continue to give. Maybe we are meant to do the same in our own small ways.

    At the end of the day, there are some things that cannot be measured. They quietly stay in people's hearts. In a student's smile, a colleague's trust, a friend's memory, or in the warmth of a kind presence.

    Perhaps life is not only about becoming successful. It is also about becoming a little kinder, a little gentler, and leaving people happier than we found them.

    After all, we do not always have to change someone's life in a big way. If, somewhere along their journey, we can give them a beautiful moment, a heartfelt smile, or a memory that brings warmth to their heart, that is more than enough.

                                        -    Anupriya Sawant

Wednesday, 15 July 2026

Learnscape🌍 #5 - The Mirror Within - Where Every Change Begins!!!

     Some thoughts stay with us long after the day is over. They make us pause, reflect, and quietly look within. Today, I found myself thinking not only as a mother or a teacher, but as someone who truly wants to make a meaningful difference in a child's life.

     I asked myself a few honest questions. Am I really teaching my students, or am I only completing the syllabus? Am I truly raising my child, or am I simply taking care of their needs? The more I reflected, the more I realized that being a mother and being a teacher have something beautiful in common. Both begin with love, but neither can grow on love alone.

     Children need guidance, values, patience, consistency, and the freedom to learn from both "Yes" and "No." One day, they will step into a world where we cannot always walk beside them. In those moments, it will not be our words that protect them, but the values they carry, the way they think, and the choices they make.

     Children naturally turn to their friends first. Whether something happens at home or at school, they often choose to share their thoughts, feelings, and experiences with their friends before anyone else. That is a beautiful and natural part of growing up. But with so many voices, opinions, and influences around them, there are moments when they may feel unsure of what is right or which path to choose. In those moments, it is not our presence that stays with them, but the values we have nurtured, the trust we have built, and the quiet voice within that gently reminds them to choose what is right.

     That is why I believe education is much more than books, and parenting is much more than care. The greatest gift we can give our children is a safe space where they feel heard, the confidence to ask questions without fear, and the wisdom to choose what is right, even when no one is watching.

One thought stayed with me more than anything else.

Acceptance.

Every positive change begins with acceptance. When we are willing to learn, acknowledge our mistakes, and grow, we inspire our children to do the same.

Every generation is given a new name. Today it is Gen Z. Tomorrow it may be Gen Alpha, and many more will follow. But maybe all of us need to begin again with one simple letter.

A for Awareness.

A for Acceptance.

A for Action.

     Because change does not begin with children. It begins with us, with the way we think, the way we respond, and the way we choose to live each day.

   More than giving my child and my students a successful future, I want them to become kind, confident, thoughtful people who can think for themselves and make choices that not only enrich their own lives but also make a positive difference in the lives of others.

We may not be able to stop social media, remove peer pressure, or change every trend. But we can help our children build a strong inner voice, one that quietly asks,

"Is this the right thing to do?"

If that voice stays with them, they will never truly be alone.

     Children may not always listen to what we say, but they never stop watching how we live. They learn far more from our actions than from our advice. If we want our children to become their own role models instead of simply following someone else's, then that journey must begin with us.

Because every better tomorrow begins with one small change today.

And maybe...

That change can begin with us.

                                                 Anupriya Sawant

Saturday, 27 June 2026

शिक्षणविश्व #6 - 'आरसा... एका आईचा, एका शिक्षकाचा आणि प्रत्येक पालकाचा!'



आज मी एक Zoom Session attend केलं.

खरं सांगायचं तर विषय नवीन नव्हता. आपण अनेकदा अशा विषयांवर बोलतो, ऐकतो, वाचतो. पण आज काहीतरी वेगळं होतं.

Speaker फक्त बोलत नव्हती; ती जगलेले अनुभव सांगत होती. तिच्या प्रत्येक वाक्यामागे वास्तव होतं. कोणतंही पुस्तकातलं उदाहरण नव्हतं. कोणतीही मोठी तत्त्वज्ञानाची भाषा नव्हती. फक्त आपण रोज जगतो ते आयुष्य होतं... आणि म्हणूनच प्रत्येक वाक्य मनाला भिडत होतं.

Session संपलं. स्क्रीन बंद झाली. पण माझ्या मनात विचारांची दारं उघडली.

मी आई आहे. मी शिक्षिकाही आहे.

आणि अचानक मला स्वतःलाच प्रश्न पडला...

या दोन भूमिका निभावताना मी खरंच काय करते आहे?

मी शिकवते... की फक्त अभ्यास पूर्ण करते?

मी मुलांना वाढवते... की फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करते?

आई होणं सोपं नाही. शिक्षक होणंही सोपं नाही. दोन्ही ठिकाणी प्रेम लागतं. पण फक्त प्रेम पुरेसं नसतं.

कारण आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. ते निर्णयांवर चालतं. संयमावर चालतं. सातत्यावर चालतं. आणि सर्वात महत्त्वाचं... Practice वर चालतं. रोज... पुन्हा पुन्हा... स्वतःलाही शिकवत राहण्याच्या Practice वर.

आपण घराला सुरक्षित जागा म्हणतो. ते खरंच आहे.

पण घराबाहेरचं जग अजूनही तिथेच आहे. आणि एक दिवस आपल्या प्रत्येक मुलाला त्या जगात पाऊल ठेवावंच लागणार आहे.

मग प्रश्न असा नाही की जग कसं आहे.

प्रश्न असा आहे...

आपण आपल्या मुलांना त्या जगासाठी तयार करतो आहोत का?

आपण मुलांच्या प्रत्येक मागणीला हो म्हणतो. कारण प्रेम असतं. काळजी असते.

पण कधी विचार केलाय...

'नाही' हा शब्द मुलांनी कुठे शिकायचा?

घरीच ना?

घरी 'नाही' स्वीकारलेलं मूल बाहेर चुकीच्या गोष्टींनाही ठामपणे 'नाही' म्हणायला शिकतं. तेवढाच तो शब्द Self Protection बनतो.

शिक्षक म्हणून माझाही अनुभव वेगळा नाही.

आपण शिकवतो. समजावतो. मार्गदर्शन करतो. कधी रागावतो. कधी कौतुक करतो. कधी आईसारखं जपतो.

तरीही... कुठेतरी आपण कमी पडतो.

कारण मुलं आपल्यासोबत काही तास असतात; पण त्यांच्या मनात त्यांच्या मित्रांचा आवाज जास्त काळ घुमत असतो.

घरी काही झालं... शाळेत काही झालं... की पहिला संवाद Friends सोबतच होतो. तिथून विचारांची दिशा बदलायला सुरुवात होते.

सगळेच मित्र चुकीचे नसतात. सगळेच विचार वाईट नसतात.

पण कधी कधी विचार इतके Neutral होतात, की बरोबर काय आणि चूक काय... याचं भानच राहत नाही.

आणि मला वाटतं... हीच खरी भीती आहे.

कारण त्या क्षणी आई काही करू शकत नाही. शिक्षकही काही करू शकत नाही. मित्रही नाही.

फक्त त्या मुलाचा स्वतःचा विवेक त्याला वाचवू शकतो.

म्हणूनच आजच्या काळात शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नाहीत. Parenting म्हणजे फक्त काळजी नाही. संस्कार म्हणजे फक्त नियम नाहीत.

संवाद, विश्वास आणि योग्य वेळी योग्य प्रश्न विचारण्याची सवय... हीच खरी गुंतवणूक आहे.

आजच्या Session मधली माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट कोणती होती माहीत आहे?

Acceptance.

हल्ली हे प्रमाण जरी कमी असले तरी वेगाने घडणाऱ्या गोष्टी पाहता जागरूक पालक बदलत आहेत. ते प्रश्न विचारत आहेत, शिकत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे... स्वतःच्या चुका स्वीकारायलाही तयार आहेत.

कारण...

Acceptance शिवाय कोणताही बदल सुरू होत नाही.

आपण आजच्या पिढीला Gen Z म्हणतो.

मला मात्र आज असं वाटलं...

प्रत्येकाला आता पुन्हा 'A' पासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे.

A for Awareness.
A for Acceptance.
A for Action.

कारण बदल मुलांपासून सुरू होत नाही.  तो आपल्या विचारांपासून सुरू होतो.

मला माझ्या मुलाचं भविष्य घडवायचं आहे. मला माझ्या विद्यार्थ्यांचंही भविष्य घडवायचं आहे.

पण त्याहून महत्त्वाचं...

मला त्यांना स्वतःचा विचार करणारा माणूस बनवायचं आहे.

कारण Role Model शोधत जगणारी मुलं अनेक असतील.

पण...

स्वतःच स्वतःचे Role Model बनणारी मुलंच समाज बदलतील.

आपण Social Media बंद करू शकत नाही. Peer Pressure थांबवू शकत नाही. Trends बदलू शकत नाही.

पण आपण मुलांच्या मनात एक आवाज तयार करू शकतो.

जो प्रत्येक चुकीच्या क्षणी त्यांना विचारेल...

"हे खरंच योग्य आहे का?"

जर तो आवाज आपण निर्माण करू शकलो...

तर आपण जिंकलो.

कधी कधी वाटतं... मी जास्त विचार करते.

पण मग स्वतःलाच आठवतं...

विचार करणं ही समस्या नाही. विचार न करणं ही समस्या आहे.

आजचा दिवस मला एक गोष्ट शिकवून गेला...

आपलं मूल फक्त आपल्या घराचं भविष्य नाही.

ते या समाजाचं भविष्य आहे.

या देशाचं भविष्य आहे.

आणि...

या जगाचंही भविष्य आहे.

कदाचित देवाने मुलांना आपल्या घरी पाठवलं ते त्यांना फक्त मोठं करण्यासाठी नाही...

तर...

त्यांच्यामार्फत एक चांगलं जग घडवण्यासाठी.

ह्या क्षणी खरंच मनापासून एक गोष्ट जाणवते...

फक्त मुलांना शिकवण्यापेक्षा... त्यांच्यासोबत शिकूया.  कारण मुलं आपलं ऐकतातच असं नाही...

पण ती आपल्याला पाहतात... अनुभवतात... आणि नकळत आपल्यासारखी होऊ लागतात.

म्हणूनच...

जर आपल्या मुलांनी दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःच स्वतःचे Role Model व्हावं, असं आपल्याला मनापासून वाटत असेल...

तर त्या बदलाची सुरुवात...

आपल्यापासूनच व्हायला हवी.

कारण बदल नेहमी एका व्यक्तीपासून सुरू होतो.

मग... ती व्यक्ती आपणच का नसावी?

                                        अनुप्रिया सावंत