शाळेत रोज सकाळी घंटा वाजते, वर्ग भरतात, वर्ग सुटतात… आणि हे अखंड चक्र सुरूच असतं.
काही आवाज ठळकपणे ऐकू येतात... वर्गामध्ये, मिटिंग्समध्ये, स्टेजवर, अहवालांमध्ये. तर काही ठिकाणी लहान-मोठ्या विद्यार्थ्यांचा गोंधळच अधिक जाणवतो.
आणि काही आवाज… शांतपणे वर्गाच्या चार भिंतींमध्येच विरून जातात, पण तितक्याच प्रखरपणे ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव निर्माण करत असतात.
हे आवाज असतात—अदृश्य शिक्षकांचे.
असे शिक्षक जे रोज वर्गात उभे राहतात, पूर्ण मनाने शिकवतात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या छोट्या प्रगतीलाही मनापासून साजरं करतात. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी असते.
कारण ते फक्त शिकवत नाहीत... ते शिकणं जगतात, आणि त्यातून विद्यार्थ्यांना अनुभव देतात.
त्यांची शिकवण पुस्तकापुरती मर्यादित राहत नाही, तर विद्यार्थ्यांच्या थेट विचारांपर्यंत पोहोचते.
पण अनेकदा हे सगळं तिथेच थांबतं…
चार भिंतींच्या आत...
विद्यार्थ्यांच्या मनात…
कधीमधी पालकांच्या शब्दांत…
पण शाळेच्या भिंतींपलीकडे ते क्वचितच पोहोचतं.
का असं होतं?
कदाचित कारण...
जे दिसतं, जे मोठ्याने बोललं जातं, तेच जास्त लक्षात राहतं. आणि जे शांतपणे, सातत्याने घडत असतं… ते अनेकदा 'नॉर्मल' समजलं जातं.
आज एक छोटासा प्रसंग मनाला स्पर्शून गेला.
आमच्या शाळेच्या अतिशय उत्कृष्ट अशा ‘अभिव्यक्ती आर्ट एक्झिबिशन’ च्या ठिकाणी काही पालक भेटले.
त्यातल्या एका पालकांनी पुढे येऊन नम्रपणे अभिवादन केलं... हे नक्कीच आनंददायी होतं. पण त्यानंतर त्यांनी साधलेला संवाद… त्यातून मिळालेली खरी समाधानाची पावती अधिक महत्त्वाची होती.
त्यांनी त्यांच्या भावना अगदी सहज व्यक्त केल्या… पण त्यातली जाणीव खूप खोल होती.
शिक्षक म्हणून आपण अनेक विद्यार्थी घडवत असतो. प्रत्येक चेहरा लक्षात राहीलच असं नाही… पण विद्यार्थी आणि पालक मात्र तेच चेहरे, तीच शिकवण, तीच जाणीव मनात जपून ठेवतात.
आणि जेव्हा तेच विद्यार्थी किंवा पालक, मनापासून येऊन आपल्या अध्यापनाची दखल घेतात, तेव्हा त्या क्षणाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
अगदी तसाच अनुभव आज आला. आणि ह्यासाठी मी कृतज्ञ आहे.
पण नंतर पुन्हा मनात एक विचार उमटला...
प्रत्येक शिक्षक आपलं सर्वोत्तम देत असतो. पण त्याला तितकंच 'शुद्ध समाधान' मिळतं का?
खरं पाहता, ते उत्तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीत असतं आणि शिक्षकाच्या साधनेतही.
कारण खरं शिकवणं हे अहवालात नसतं, ते विद्यार्थ्यांच्या बदलामध्ये दिसतं. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या आत्मविश्वासात, त्यांच्या विचारांमध्ये उमलतं.
आणि कदाचित…
अदृश्य राहणं हीच त्या कामाची खरी ओळख असते.
पण तरीही, कधी कधी वाटतं... तेही अगदी प्रत्येकाला,
हे अदृश्यपण थोडं तरी दिसावं!
कारण प्रत्येक शांत प्रयत्नामागे एक प्रगल्भ शिक्षक उभा असतो.
जो फक्त शिकवत नाही, तर आयुष्य घडवत असतो.
प्रत्येक शिक्षकासाठी, पालकांकडून मिळणारी एक साधी appreciation…
हीच त्याच्या कामाची खरी पावती असते - real impact असतो.
हा अनुभव प्रत्येक शिक्षकाने अनुभवायला हवं.. कारण तो फक्त आनंद देत नाही, तर पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद व जिद्द देतो.
पण यासाठी जबाबदारीही आपलीच आहे!
आजच्या या धावपळीच्या, तुटक संवादाच्या युगात…
आपण एकमेकांशी जोडलेलं राहणं,
योग्य वेळी मनापासून व्यक्त होणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे.
कारण कधी कधी,
एक साधं वाक्य - “तुमचं काम खूप छान आहे” -
“विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकाच्या संपूर्ण प्रवासाला अर्थ देऊन जातं.”
And maybe… that is where real learning begins.
- अनुप्रिया सावंत

Beautiful expression and so real!!!
ReplyDeleteA small compliment, a response to the dedicated efforts taken by the teachers indeed boosts their morale!
Lastly everyone feels motivated to do more when there is recognition. You have worded it appropriately