Wednesday 25 July 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

   

     आपल्या भारतात थर्ड वर्ल्ड वॉर ही गोष्ट 100 पैकी 2 जणांना तरी ठाऊक असेल का? ह्या बद्दल मला शंका आहे. खरं तर त्या 2 जणांमध्ये मी नवीनच ऍड झालेली मला मानते. ह्याला कारणही तसेच आहे. नुकत्याच एका आमच्या ग्रुप मध्ये ह्याची चर्चा चालू होती. आपल्याला दुसरे महायुद्ध पुस्तकी स्वरूपातून ऐकण्यात व अभ्यासनात आले ह्यावर जवळ जवळ सर्वेच दुजोरा देत होते. वर्धमानच्या तोंडातून तिसऱ्या महायुद्धविषयी ऐकताना आम्ही अक्षरशः त्याचा पापड करत होतो मात्र वीजेच्या आवाजसारखे त्याचे घडणाऱ्या घडामोडीतील गोष्टी ऐकून थंडर अनुभवत होतो.

     सिरिया, इराण, इराक, अमेरिका, इजराईल ह्यांची नावे आता पाठ झाली आहेत कारण सततचे त्यांच्यावरील काही न काही हल्ले किंवा घटनाक्रम. त्यांच्यातील घडणाऱ्या घडामोडी ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या पायाभरणीचे काम करत आहेत. हेही आम्हाला नव्यानेच जाणवत आहे. आपल्याला एक सवय असते... जो पर्यंत एखाद्या गोष्टीची झळ आपल्याला लागत नाही तो पर्यंत आपल्याला त्या भीषणतेची जाणीवही होत नसते. मुळात ते मान्य करणं आपल्याला पचत नाही. त्यामुळे उगाच कोणी काही माहिती सांगत असेल तर ती ऐकून घेण्याची संयमताही आपल्याजवळ नसते, असते ती फक्त अधीरता तेही बाष्कळ बडबड ऐकण्याची.  खरं तर तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे... आणि ह्याची झळ प्रत्येकाला पोहोचणारच आहे.  हे महायुद्ध देशादेशांतर्गत परिस्थिती नसून घर, ऑफिस, इतकेच न्हवे तर व्यक्ती व्यक्ती मधील मतभेद, वाद, तंटे ह्यास्वरूपातून आकार घेत आहेत.
    डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित सखोल अभ्यासपुर्ण तसेच वास्तव्याला धरून असणारे 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मला घडणाऱ्या घडामोडींची अर्थपूर्ण माहिती मिळविण्यास व त्याविषयी जाणून घेण्यास आणि त्याहुन अधिक त्याचा योग्य अर्थ लागण्यास मोलाची भूमिका बजावत आहे.  हे माझे वैयक्तिक ठाम मत आहे.

     आपल्या जागतिक आंतरराष्ट्रीय घडामोडीतील बातमीत तिसऱ्या महायुद्धाची बरीचसी माहिती आपल्याला वाचण्यात येते. माझ्या लेखणीतून दैनंदिन व्यवहारातील गोष्टींच्या घडामोडीद्वारे ह्या तिसऱ्या महायुद्धाची झळ नक्की काय आहे? ते मांडण्याचा प्रयास ह्या सदरातून केला जाईल.

     आज ऑफिस मध्ये कामाचा खूप लोड होता हे वाक्य संपते ना संपते तोच त्याला जोडून दुसरे वाक्य ह्यांनी पूर्ण केले ते म्हणजे ऑफिसच्या संगणकात वायरस आलाय... काय कसा केव्हा कोणाला कळायची फुरसत की काय सर्वांनाच आज जवळजवळ 24 तासाची ड्युटी झाली. 

     वायरस हा शब्द नेहमीच आपण ऐकतो पण सध्याच्या ह्या वायरसने मात्र जगाचीच झोप उडवली आहे. खरं तर थर्ड वर्ल्ड वॉर चा एक भाग म्हणायला हरकत नाही अस वाटावं इतका हा धुमाकूळ आणि त्याहीपेक्षा अधिक गोंधळ ह्या वायरसने घातला आहे.

     आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' वायरस 'वन्नाक्राय' या नावाने ओळखला जात आहे. भारतासह शंभराहून अधिक देश ह्या हल्ल्याला बळी पडले आहेत. 'रॅन्समवेअर' हल्ला म्हणजे लॅपटॉप किंवा संगणक चालू केल्यावर त्या स्क्रीनवर मेसेज दिसतो की तुमचा संगणक हॅक झाला आहे. जर तुम्हाला तुमचा डेटा हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर पेमेंटचा एक बॉक्स दिसतो त्यावर क्लीक करण्यास सांगितले जाते व अमुक रक्कम त्यांनी दिलेल्या वेळेत बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते. जर असे नाही झाले तर तुमचा डेटा डिलीट होतो. स्क्रीनवर दिलेल्या वेळेचे काउंट डाऊनही सुरू होते. ते पाहण्याव्यतिरिक्त स्क्रीनवर कुठलेही ऑप्शन नसते. कारण संगणक किंवा लॅपटॉपच्या पूर्ण ताबा हॅकर्सकडे असतो. ही गोष्ट सायबर गुन्हा अंतर्गत येते व अश्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला 'रॅन्समवेअर' असे म्हणतात. आणि ह्या गोष्टी अगदी अज्ञात ठिकाणाहून होतात, ज्याचा शोध घेणे एक प्रकारचे आव्हान असते.

     माहितीप्रमाणे या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला आहे. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपॉइमेंट्सदेखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली. 

     ही गोष्ट फक्त मोठे ऑफिसेस किंवा आयटी क्षेत्रातच होत आहेत असे नाही तर स्मार्टफोन युजर्सना देखील ह्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आपले संगणक असो किंवा स्मार्टफोन जितका सुरक्षित तितकाच फायद्याचे ठरेल. इंटरनेट वापरताना कुठल्याही जाहिरात किंवा भूलथापांना बळी पडू नये. मोबाइल गेम खेळताना अनेक वेळा जाहिरातीचे विंडो ओपन होतात. किंवा अमुक लिंक वर क्लीक करा असे मेसेज येतात त्यावेळी काळजीपूर्वक त्या गोष्टींकडे लक्ष देणे व दक्ष राहणे तितकेच महत्वाचे आहे. कारण... Third World War has been started..

                            अनुप्रिया सावंत

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)


Monday 23 July 2018

निसर्गाशी गुजगोष्टी

Photo Source:Google

       निसर्ग आणि मानवाचं एक सुंदर नातं आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आठवणींची साठवण म्हणजे निसर्गाशी दिलखुलास मारलेल्या गप्पांचा एक कप्पा. जिथे फक्त तो आणि तुम्ही अगदी मनमोकळेपणाने संवाद साधत असता. निसर्गाशी आपल्या गप्पा नेहमीच रंगतात. त्यातलेच काही तुमच्या आमच्या मनातले निसर्गाशी केलेल्या ह्या गुजगोष्टी.

     व्वा! आज वातावरणात किती सुंदरता जाणवतेय. काय प्रसन्न वाटतंय! सकाळची सूर्यकिरणे जणू जेजुरीचं दर्शन हळदीचा भंडारा उधळून घ्यावा तशी अंगणातल्या तुळशीला भेटायला येऊन सोनेरी पिवळे केशरी झाले आहेत. हिरवी झाडे आनंदाने डोलताहेत. 

     अहाहा... किती छान संगीत झाडातून ऐकू येतंय. कोकिळा... तुझ्या आवाजातील मधुरता काय वर्णावी बरं, जिथे श्रेष्ठ गायकांना तुझ्या आवाजची पदवी दिली जाते. सोबतीला तुझे सारे मित्र मैत्रिणींची किलबिलाट चालू आहे. ह्या झाडांना किती खेळवत असेल नाही का! ही झाडे डोलताहेत ते तुमच्यासोबत पकडपकडी खेळण्यासाठी! हम्म... आता लक्षात आलं.  छान!

     ही सुदंर रंगबेरंगी फुलं, फुलांचा सुगंध ह्या झाडांना किती टवटवीतपणा देतोय. फळांचा रस मनाला तृप्त करतोय. देव्हाऱ्यातील देव तुमच्या आगमनाची वाट पाहताहेत. त्यांनाही श्रुंगार करून निसर्ग अनुभवायचा आहे तर! किती छान दृश्य आज मनाला नव्याने आनंद देतोय.

     ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, टपोरे थेंबांचा जमिनीवर होणारा वर्षाव, मातीचा सुगंध. नुसता विचार मनाला तजेलता देतोय.  तुमच्याही... हो ना! 

                  देवा तुझे किती सुंदर आकाश, 
                      सुंदर प्रकाश सूर्य देतो... 

     हे गाणं बरेच दिवसापासून गुणगुणने चालूच आहे. गाण्याचा भावार्थ मनाला सतत खुणावतोय. मात्र अर्थाशी मन समरस होता होता कामाच्या गडबडीत गुणगुणनेच सुरू असायचे. ओठावर रुळलेले हे गाणं मात्र मला आज भावनेशी सरमिसळून घेतोय. कागदही स्वेच्छेने आज उड्या मारताहेत. पेन मात्र आज दांडियाची काठी गरबा खेळताना जशी फिरवावी तसा कागदावर मनसोक्त नाचत लेखणी चालवतोय. अहा... ही तर निसर्गाची जादू आहे जी प्रत्यकेला मनमुराद आनंद लुटायला देतेय. 

     निळे निळे स्वच्छ आकाश... पांढरे कापसासारखे ढग त्यातही काही गुबगुबीत, काही लांबट. पळताहेत असे जणू एकमेकांशी पकडापकडी खेळताहेत. सूर्य मात्र त्यांच्या पकडापकडीत लपाछपी खेळत ऊन सावल्यांचा खेळ खेळतोय. किती छान देवा तुझी किमया... गडगडाट ssss 

    हा आवाज कसला?? वीज राणी... पावसाची... छान! तिलाही आतुरता लागली तिच्या सवंगडयांशी खेळण्याची. हो! एवढेच न्हवे तर जमिनीला वेध लागलेत चिंब भिजण्याची आणि पावसाच्या टपोरे थेंबांना ओढ लागली भूमीला स्पर्श करण्याची. किती सुंदर नातं आहे ह्या साऱ्यांचं नाातं एकमेकांशी. 

     देवा! किती सुंदर रम्य ही वसुंधरा जिच्या उदरात एवढ्या सुंदर गोष्टी लपल्या आहेत. तुझीच कृपा सारी. हे दृश्य किती सहज अनुभवता येते मानवाला. पण तेही त्याला अशक्य व्हावे एवढा माणूस कामात अडकलाय? खरंच का??? 

     निसर्ग खुणावतोय त्याच्या प्रेमळ लीला पाहण्यासाठी, त्याचे अवर्णनीय रूप अनुभवण्यासाठी, त्याच्या मनाचा आपल्या हृदयाशी संवाद साधण्यासाठी. मानवी मनापेक्षा त्यालाच ओढ जास्त बिलगण्यासाठी. मग आपणही त्याच्या कुशीत लपंडाव खेळत, भटकंती करत, त्याच्याशी गुजगोष्टी करत जीवनाचा आनंद लुटायला हवा. काय? खरंय ना!!! 

                     अनुप्रिया सावंत.