Monday 23 July 2018

निसर्गाशी गुजगोष्टी

Photo Source:Google

       निसर्ग आणि मानवाचं एक सुंदर नातं आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आठवणींची साठवण म्हणजे निसर्गाशी दिलखुलास मारलेल्या गप्पांचा एक कप्पा. जिथे फक्त तो आणि तुम्ही अगदी मनमोकळेपणाने संवाद साधत असता. निसर्गाशी आपल्या गप्पा नेहमीच रंगतात. त्यातलेच काही तुमच्या आमच्या मनातले निसर्गाशी केलेल्या ह्या गुजगोष्टी.

     व्वा! आज वातावरणात किती सुंदरता जाणवतेय. काय प्रसन्न वाटतंय! सकाळची सूर्यकिरणे जणू जेजुरीचं दर्शन हळदीचा भंडारा उधळून घ्यावा तशी अंगणातल्या तुळशीला भेटायला येऊन सोनेरी पिवळे केशरी झाले आहेत. हिरवी झाडे आनंदाने डोलताहेत. 

     अहाहा... किती छान संगीत झाडातून ऐकू येतंय. कोकिळा... तुझ्या आवाजातील मधुरता काय वर्णावी बरं, जिथे श्रेष्ठ गायकांना तुझ्या आवाजची पदवी दिली जाते. सोबतीला तुझे सारे मित्र मैत्रिणींची किलबिलाट चालू आहे. ह्या झाडांना किती खेळवत असेल नाही का! ही झाडे डोलताहेत ते तुमच्यासोबत पकडपकडी खेळण्यासाठी! हम्म... आता लक्षात आलं.  छान!

     ही सुदंर रंगबेरंगी फुलं, फुलांचा सुगंध ह्या झाडांना किती टवटवीतपणा देतोय. फळांचा रस मनाला तृप्त करतोय. देव्हाऱ्यातील देव तुमच्या आगमनाची वाट पाहताहेत. त्यांनाही श्रुंगार करून निसर्ग अनुभवायचा आहे तर! किती छान दृश्य आज मनाला नव्याने आनंद देतोय.

     ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, टपोरे थेंबांचा जमिनीवर होणारा वर्षाव, मातीचा सुगंध. नुसता विचार मनाला तजेलता देतोय.  तुमच्याही... हो ना! 

                  देवा तुझे किती सुंदर आकाश, 
                      सुंदर प्रकाश सूर्य देतो... 

     हे गाणं बरेच दिवसापासून गुणगुणने चालूच आहे. गाण्याचा भावार्थ मनाला सतत खुणावतोय. मात्र अर्थाशी मन समरस होता होता कामाच्या गडबडीत गुणगुणनेच सुरू असायचे. ओठावर रुळलेले हे गाणं मात्र मला आज भावनेशी सरमिसळून घेतोय. कागदही स्वेच्छेने आज उड्या मारताहेत. पेन मात्र आज दांडियाची काठी गरबा खेळताना जशी फिरवावी तसा कागदावर मनसोक्त नाचत लेखणी चालवतोय. अहा... ही तर निसर्गाची जादू आहे जी प्रत्यकेला मनमुराद आनंद लुटायला देतेय. 

     निळे निळे स्वच्छ आकाश... पांढरे कापसासारखे ढग त्यातही काही गुबगुबीत, काही लांबट. पळताहेत असे जणू एकमेकांशी पकडापकडी खेळताहेत. सूर्य मात्र त्यांच्या पकडापकडीत लपाछपी खेळत ऊन सावल्यांचा खेळ खेळतोय. किती छान देवा तुझी किमया... गडगडाट ssss 

    हा आवाज कसला?? वीज राणी... पावसाची... छान! तिलाही आतुरता लागली तिच्या सवंगडयांशी खेळण्याची. हो! एवढेच न्हवे तर जमिनीला वेध लागलेत चिंब भिजण्याची आणि पावसाच्या टपोरे थेंबांना ओढ लागली भूमीला स्पर्श करण्याची. किती सुंदर नातं आहे ह्या साऱ्यांचं नाातं एकमेकांशी. 

     देवा! किती सुंदर रम्य ही वसुंधरा जिच्या उदरात एवढ्या सुंदर गोष्टी लपल्या आहेत. तुझीच कृपा सारी. हे दृश्य किती सहज अनुभवता येते मानवाला. पण तेही त्याला अशक्य व्हावे एवढा माणूस कामात अडकलाय? खरंच का??? 

     निसर्ग खुणावतोय त्याच्या प्रेमळ लीला पाहण्यासाठी, त्याचे अवर्णनीय रूप अनुभवण्यासाठी, त्याच्या मनाचा आपल्या हृदयाशी संवाद साधण्यासाठी. मानवी मनापेक्षा त्यालाच ओढ जास्त बिलगण्यासाठी. मग आपणही त्याच्या कुशीत लपंडाव खेळत, भटकंती करत, त्याच्याशी गुजगोष्टी करत जीवनाचा आनंद लुटायला हवा. काय? खरंय ना!!! 

                     अनुप्रिया सावंत.

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.