Monday 15 June 2020

"Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."



          बऱ्याचदा आपल्याला हवं तसं घडतच असं नाही.  मनासारखी गोष्ट घडली नाही, तर मन अगदी नानाविध विचार करायला लागते.  जर ह्या मनाला विचार करण्यासाठी, नकारात्मक विचार असतील, तर मग मनाचे आणि डोक्याचे(बुद्धी) अगदी तुंबळ युद्ध जुंपते.  हा अगदी प्रत्येकाला येणारा अनुभव आहे.  बऱ्याचदा एखादा नवीन विषय अचानक समोर आला की, व्यक्तीची कशी तारांबळ उडते. त्यात विषय नावडता असेल, तर मनःस्ताप ठरलेला असतो. आणि जर विषय आपल्या मनाच्या विरुद्ध टोकाचा असेल तर मग स्वभाव, मन, बुद्धी ह्यांना भेदत डोक्याचा भुगा.  मैत्रीच्या भाषेत बोलायचं तर डोक्याची दही नक्कीच होते.  बरेचदा गोष्टी खूप छोट्या असतात.  पण मनाला त्या छोट्या गोष्टी अगदीच, आता पेलवत नाही असे होऊन जाते.  ह्याला प्रामाणिक कारण एकचं, आपण स्वतःला खूप कमी संधी देतो असं वाटतं. 


     एखादा वैयक्तिक पातळीवरील निर्णय घ्यायचा म्हंटलं की, सामान्यातला सामान्य जीवसुद्धा अगदी कासावीस होतो.  मग ती गोष्टी छोटी असली तरीही. गोष्ट विचारांच्या मर्यादेपलीकडे असेल, तर मग ह्या कासावीस जीवाला खऱ्या अर्थाने गरज लागते ते आपलेपणाची.  हे 'आपलेपण' म्हणजे काय?  माझे मित्र-मैत्रीण, आई-बाबा, नातेवाईक, आप्त ह्यांच्याशी जिव्हाळा, संवाद म्हणजे 'आपलेपण'.  हे जरी खरे असले, तरी खरे 'आपलेपण' हा स्वतःचा-स्वतःशी, मनाचा-बुद्धीशी असलेल्या योग्य सुसंवादाशी असतो.  ह्या कासावीस होणाऱ्या जिवाला जशी कोणाच्या तरी आधाराची गरज असते, तशीच त्याला स्वतःचा स्वतःशी असलेल्या आधाराची सुद्धा तितकीच गरज असते. राहतो प्रश्न तो स्वतःला ओळखण्याचा.  फार काही फिलॉसॉफी पद्धतीत नक्कीच नाही व्यक्त व्हायचंय.  सर्वात जवळचा मित्र, म्हणजे आपल्या गाठीशी असलेला अनुभव.  सोबत ह्या अनुभवाला असलेली बुद्धीची उचित सांगड. 


       ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच छूमंतर अजिबात नाहीत.  ह्याला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची, नीट समजून घेण्याची आणि जी पारख आपल्याला त्यातून होते, त्यातही अनेक दृष्टिकोनातून स्वतःला स्वतः पैलू पाडण्याची नितांत आवश्यकता आहे.  अनेक अनुभवातून प्रत्येक जण शिकत असतो. हे अनुभव, आपण आपल्या आयुष्यात कसे वापरतो? हे महत्वाचे आहे.  कारण तेही तितकेच आपल्या मनाला आशावादी बनवण्यासाठी प्रेरित करत असतात. 


    अशा फिलॉसॉफिकल गोष्टी आपण जेव्हा समोरच्याला सांगतो किंवा आपले मत आपण मांडतो, त्यावेळी बऱ्याचदा आपणही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो.  It's OK.  काही हरकत नाही.  Just Let it beFocus on good changes inside you.  आपल्यातील चांगल्या बदलांवर लक्ष केंद्रित करायला हवं.  ह्यात एक गोष्ट नक्की, 'Acceptance is more important in our life'.  ती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे.  कारण 'Change is only constant'.  आपल्या आयुष्यात होणारा 'सातत्यपूर्ण' बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे.  ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या बुद्धीला स्थिर करण्यास आपण स्वतःच स्वतःला मदत करू शकतो.


       'बुद्दिभेद' म्हणजे माझ्या अर्थी, मनाचे आणि डोक्याचे असलेले वाकडेपण.  मन आणि बुद्धी स्थिर नसेल तर शरीर सुद्धा व्याधिमय बनते.  हा बुद्धिभेद बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्यावर हल्ला करण्याआधीच, स्वतःच्या विचारांच्या चुकीची पद्धतीमुळेच आपल्याला विनाशाकडे नेतो.  बऱ्याचदा आपण फार पटकन समोरच्याला आपले रिऍकशन्स देतो.  आपले मत आपण लगेच बनवतो.  आपल्या मृदू, प्रेमळ किंवा काळजीयुक्त स्वभावामुळे का असेना, आपले रिऍक्ट होणं बऱ्याचदा आपल्यालाच त्रासदायक ठरतं.  इतकंच नाही तर  आपण स्वतः देखील एखादी गोष्ट केली की, स्वतःवरही तितक्याच चंचलतेने रिऍक्ट होऊन जातो.  आणि हेच रिऍक्ट होणं, मग आपल्याला विचारांच्या चक्रीवादळात खेचून घेतो.  आणि त्यातून निष्पन्न काय होतं? तर मनाला होणाऱ्या भयंकर वेदना, अस्वस्थता, चलबिचलता, निर्णय शून्यता, आणि परिणामी चुकीचे पाऊल.


          पाऊल वाकडे पडले की, ते पुन्हा मार्गावर आणता येतातही.  पण जर ते चुकीच्या निर्णयामुळे जीवावर बेतले, तर त्याला पुन्हा मार्गावर आणता येऊ शकत नाही.  Nothing is bigger than Life.  आयुष्य हे एकदाच मिळते. कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा गोष्टीमुळे आपण ते वाऱ्यावर सोडून दिले, तर कसे चालेल?  असे म्हणतात, संधी एकदाच चालून येते, मला असं अजिबात वाटतं नाही.  'संधी ह्या चालून येत नाहीत, तर संधी ही निर्माण करावी लागते.'  कोणीतरी येईल आणि मला संधी मिळवून देईल, असं कधीच होतं नाही.  संकटात जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, तेव्हा Optimistic (आशावादी) व्यक्तीसाठी हेच संकट संधी बनून स्वतः त्याच्याकडे येते.  जेव्हा कोणत्या कार्याचा बेस (पाया) हा अध्यात्माला सोडून असतो, तेव्हा ह्या संधी त्यांचे सगळेच दारं बंद करून घेतात.  म्हणजे काय? आपल्या मनाचा बुद्धीचा एकमेकांशी संवाद तुटतो आणि तिथे सुरु होतो तो वाद.  वादातून कधीच काही चांगले निष्पन्न होऊ शकत नाही.  आणि राग येणं हे स्वाभाविक जरी असले, तरी त्या रागाला वादाच्या दारात उभं करायचं की नाही?  ते आपल्या हातात असते.  एखादी गोष्ट आपल्याला राग आणणारी असली, की आपण पटकन रिऍक्ट होतो.  आणि हे रिऍक्ट होणं जर चुकीच्या पद्धतीत व्यक्त झाले, तर वाद वाट पाहतच असतो.  कलियुगाच्या चरणात सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल?  तर हा द्वेष, राग, आणि त्यातून निर्माण होणारा वाद.  


         हे सगळे बोलण्यासाठी ठीक आहे असे जरी वाटले, तरी आता ह्यावर खऱ्या अर्थाने विचार करायला हवा.  ह्या सगळ्याचे सकारात्मक अनुकरण झटपट नक्कीच नाही होऊ शकंत.  पण हे सवयीने नक्कीच बदलू शकते.  नुसते सकारात्मक वाचून, बघून आणि लिहून व्यक्ती आशावादी बनत नाही.  तर त्याप्रमाणे त्याला स्वतःला स्वतःवर मेहनत घ्यावी लागते.  ही मेहनत घेणं सोपं नाही, पण अशक्यही नाही.  स्वतःवर चिडण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, द्वेष, मत्सर, लोभ ह्या मोहमायेत अडकण्यापेक्षा आपल्या 'Nothing is bigger than Life' असणाऱ्या ह्या स्वतःच्या अमूल्य जीवाला संधी द्यायला काय हरकत आहे.  एक गोष्ट मनाशी आपण पक्की बांधली पाहिजे, "संधी ह्या चालून येत नाही, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात."  You have to create it.


       आज माझ्याकडे नोकरी नाही म्हणून मी रडत बसलो, तर चालेल का?  माझा पगार कमी आहे आणि माझा मित्र जास्त कमावतो, असं करत राहिलो, तर घर चालेल का?  घरात कोणी मदत करत नाही म्हणून स्वतःवर चिडचिड करत राग करत बसलो, तर माझा जगणं सुसह्य होईल का?  मला आधी जास्त पगार होता, आता कमी पगारात काम करावं लागतंय, असं करत आहे ती नोकरी सोडली, तर मला पुन्हा नवीन संधी मिळतील का?  असे खूप प्रश्न आहेत, मला - तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाच.  


       आज लॉकडाऊन चालू होऊन ३ महिने झाले, आधीची परिस्थिती आणि आताची व पुढची परिस्थिती ह्यात नक्कीच बरंच अंतर निर्माण होणार आहे, किंबहुना झाले आहे.  अशा वेळेस मनाचा आणि बुद्धीचा संयम हाताळणे थोडं अवघड आहेच, पण जमणारचं नाही, असं अजिबात नाही.  परिस्थितीला गिव्ह अप(सोडून देत)  करत हतबल होण्यात काहीच अर्थ नाही.  ह्यात तरून जायचे असेल तर 'संधी' निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही.  संधी ही कोणत्याही प्रकारची असू शकेल, ते म्हणजे बुद्धिभेदापासून स्वतःचा बचाव करण्यापर्यंत ते स्वतःला अशाही परिस्थिती 'Optimistic' व्यक्तिमत्त्वाकडे नेण्यासाठी, आपला जोपासला जाणारा छंद ही त्याचाच भाग असू शकेल.  आणि नसेलच काही छंद किंवा नसेलच काही आवड, तर मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.  मग अगदी स्वतःवर सकारात्मक प्रयोग ही त्याचा भाग असू शकेल.  काय वाटतं तुम्हाला? 


        अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मान्य करून, स्वतःला संधी आपणच दिली पाहिजे.  स्वतःला आपण आहे तसे Accept(स्वीकार) करत, स्वतःवरही प्रेम केले पाहिजे.  दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला आनंद होतोच.  इतकंच नाही, तर दुसऱ्याचा छोटासा आनंद बघतानाही आपण किती हरखून जातो.  मग आपल्या स्वतःच्या जीवनाला आपण स्वतःच जर हा आनंद मिळवून दिला, तर आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.  जीवनात कोणीच परफेक्ट नसतात आणि परफेक्शनच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो.  


         इतिहास घडविणाऱ्यांमध्ये सातात्यतेने सकारात्मक वृत्ती होती. त्यांच्या शिकण्यात नाविन्यता होती, अनुभवांचे गाठोडे होते. त्याचा सकारात्मक वापर करून मन आणि बुद्धीवर मिळवलेला, तो विजय म्हणजे हा 'इतिहास'.  आपल्याला आपल्या इतिहासातील  'आदर्श' व्यक्तींची नुसती आठवण जरी आली, तरी अंगावर शहारे येतात.  अभिमान वाटतो आपल्याला आपल्या पूर्वजांचा.  आणि नकळत स्वतःचाही अभिमान वाटतो की, असे थोर संत, नेते, राजे, व्यक्ती आपले इतिहासकार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांनी आपल्याला संदेश तर दिला आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेकानेक संधी दिल्या आहेत.  जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि त्याचे अनेकानेक पैलू आपल्याला प्रत्यक्ष दिले आहेत.  असे म्हणतात, 'जिंदगी का दुसरा नाम ही प्रॉब्लेम है|' पण जर प्रॉब्लेम आलेच नाही, तर जीवनातल्या संधी कळणार तरी कशा? आयुष्यातली सुंदरता अनुभवणार तरी कशी?


          माझी आई आम्हाला नेहमी सांगते, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्याची सहजता आपल्याकडे असायला हवी.  प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असतात, तुम्ही त्याला कसे पाहता?  ते महत्वाचे.  'श्रद्धा' आणि 'भक्ती' ह्या दोन गोष्टी आणि त्यानुसार असलेले आपले कर्म जीवनात प्रत्यक्ष उतरत असते.  Spiritually आपला strongness आपल्याला सकारात्मक स्पंदन निर्माण करण्यास सहाय्यभूत होतात.  'भक्ती' हा प्रत्येक कार्याचा बेस आहेच, पण 'प्रपंच हाच परमार्थ', हे विसरून चालणार नाही. 


त्यासाठी...

     "Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."

              अनुप्रिया सावंत

4 comments:

  1. Very well penned Anupriya ! Congratulations!!! Ancesteral history of Bharatvarsh has always displayed 'Bhakti' as base of Life. Without that we will be going nowhere...

    ReplyDelete
  2. Khup sundar .... Zindadi na milegi dobara....

    ReplyDelete
  3. Khup sunder.... situation la suitable vicharanchi manadani keli ashes.

    ReplyDelete
  4. Very well pened down thoughts that everyone can imagine but can't express.
    Apt in current situation

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.