Wednesday 11 November 2020

Social Media - एक व्यापक व्यासपीठ

     
Photo Source: Google
Photo Source: Google

     सोशल मिडीया म्हणजे असा व्यासपीठ ज्याद्वारे आपण एकाच ठिकाणाहून अनेकांशी जोडले जातो.  अशी गोष्ट जी इंटरनेटच्या माध्यमातून विस्तारीत पावते आणि आपल्याला एकापेक्षा अनेक व्यासपीठावर आणून सोडते.  हे व्यासपीठ म्हणजे डिजिटीलायझेशनच्या युगात विविध घटक, स्थळ, व्यक्ती ह्यांना जोडणारा दुवा.  आता तुम्ही हा माझा ब्लॉग वाचत असताना ब्लॉग व्यासपीठाचा वापर केला आहे.  थोडक्यात, ज्याप्रमाणे आपण आपले फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे अकाउंट वापरतो, ते अकाउंट म्हणजे डिजिटल युगातील आपले सोशल मिडियाचे व्यासपीठ होय. आणि ह्याच सोशल मिडियाचा वापर अधिक सजगतेने करण्यासाठी आणि एकाच वेळेला अनेकानेक लोकांपर्यंत संदेश/मेसेज पोहचविण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्युब अशा अनेक व्यासपीठ माध्यमांच्या वापर आपण करत आहोत.

     टेलिव्हिजनपेक्षा वेगाने पसरलेले हे सोशल मिडीया आज इंटरनेटच्या दुनियेतील प्रभावी शस्र आहे.  स्वतःचे मत, विचार अगदी सहज इथे व्यक्त करता येते.  इतकेच नाही तर विविध समाज घटक एकत्र येऊन अगदी कोणत्याही चळवळींपर्यंत ह्याचा वापर प्रभावी होत आहे.  ज्याप्रमाणे मोबाईल, मेल ह्यामार्फत आपण लोकांशी जोडले जातो त्याच्याही अनेक पाऊले पुढे जाऊन ह्याचा वापर करत आपण आपले फोटो, आपल्या भावना, आपले ठिकाण अशा सगळ्याच गोष्टी अगदी सहज पोहचवत आहोत.  थोडक्यात आपणही आज नकळत सोशल झालो आहोत.

     पुस्तक असो, पुस्तक प्रेमी असो, चित्रपट असो, किंवा एखादा कलाकार असो प्रत्येक जण आप-आपली कला अगदी सहजतेने जगासमोर मांडत असतो, ते ह्याच व्यासपीठावर.  त्यामुळे वेळ आणि पैसे ह्यांची बचत तर होतेच आहे, पण त्याहीपलीकडे जाऊन लोकांचे विचार एकमेकांना समजण्यास मदत होत आहे.  विचारांचे शक्तिप्रदर्शन अगदी सहज पुढे आलेले दिसून येते.  ह्यातून अनेक माहित नसलेल्या गोष्टींविषयी देखील जनजागृती होऊ लागली आहे, तर कित्येक गोष्टींची ओळख नव्याने होत आहे. 

फेसबुक

आपण आपले स्वतःचे प्रोफाइल बनवून स्वतः विषयीची माहिती इतर लोकांसोबत सामायिक/शेअर करू शकतो. सध्याच्या व्हर्च्युअल रिऍलिटी मध्ये फेसबुक अधिकच प्रभावी आहे. आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत आपण व्हर्च्युअली इथे जोडले जातो. 

इंस्टाग्राम

इंस्टाग्राम हाही फेसबुकचाच एक भाग आहे. फेसबुकप्रमाणे इथेही आपण आपले मत, विचार, फोटो शेअर करू शकतो.  तुम्ही तुमचे फोटो अगदी इफेक्टसहित स्लाईडद्वारे शेअर करू शकता.  इथेही तुम्ही एकाच वेळेला अनेकांशी जोडले जाता.  तुमचे विचार, मत, तुमची आवड, कला, आणि फोटोज तुम्ही इथे अगदी सहज शेअर करून ते फेसबुकला सुद्धा जोडून घेऊ शकता.  सध्याच्या युथमध्ये इंस्टाग्राम खूपच लोकप्रिय आहे.

युट्युब

ह्यावर आपण आपले विडिओ अपलोड करू शकतो.  आपल्या खाजगी गोष्टीपासून आपली आवड, निवड, पॅशन तुम्ही व्हिडीओ मार्फत अपलोड करू शकता.  सध्या माहिती, शिक्षण/एज्युकेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ह्याचा वापर फारच प्रभावी ठरत आहे.  ह्या व्यासपीठावरून आपण पैसेही कमवू शकतो.  आपला कन्टेन्ट/माहिती ही लोकोपयोगी असल्यास आपल्या युट्युब चॅनेलला भेटी देणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो आणि अधिकाधिक विझिटर/भेट संख्येमुळे ऍडसेन्स माध्यमातून आपल्याला त्याचे मूल्य देखील मिळते.

लिंक्डइन

हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. ज्याला आपण व्यावसायिक नेटवर्किंग असेही म्हणू शकतो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला भेटतात. इथे आपण स्वतःचा व्यक्तिगत प्रोफाइलची संक्षिप्त माहिती देतो, ज्याद्वारे आपल्याला आपल्याच क्षेत्रातील लोकांची ओळख होण्यास आणि त्याद्वारे नोकरी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो.  कारण इथे अनेक क्षेत्रातील कंपन्या आपल्या प्रोफाइल मार्फत लोकांशी व्यावसायिक संदर्भात जोडले जातात.

ट्विटर
अगदीच मोजक्या शब्दात आपले विचार व्यक्त करण्याचे आणि त्याचसोबत एका जादूच्या झप्पीसहित असंख्य दुवे जोडणारा हा ट्विटर अतिशय लोकप्रिय आहे.  सोशल मीडियामध्ये 'ट्विटर' अतिशय जबरदस्त आहे.  ह्या जादूच्या झप्पीविषयी नंतर नक्कीच पाहणार आहोत.

     अशा महत्वाच्या विविध प्लॅटफॉर्म/व्यासपीठ ह्यांच्याविषयी आपण जाऊन घेतले. आपल्यातले अनेक जण हे रोजच वापरतात. सोशल मिडियाच्या वापराने जरी जग एकमेकांच्या जवळ आले असले, तरी हे तितक्याच प्रभावशाली तसेच चांगल्या गोष्टींसाठी वापरण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात.  अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊयात पुढच्या सदरात.

                                                                      - अनुप्रिया सावंत.

Tuesday 11 August 2020

कविता #15 - शब्दांची दुनिया!!!



     मनाचे गणित खुपच अजब असते, नाही का?  मनातल्या मनात आपण कितीतरी वेळा संवाद साधतो, अनेक गोष्टींबद्दल विचार करत राहतो.  त्यांच्याशी बोलताना, हसताना वेळप्रसंगी भांडतोही.  इतकेच नाही तर अप्रत्यक्षपणे आपल्या मनाशी आपणच अगदी अगणित हितगुज करत राहतो.  बऱ्याचदा त्यांना खुप काही सांगायचे असते, पण ओठापर्यंत येऊन मग तिथेच थबकतात.  पुन्हा हृदयाला जाऊन भिडतात आणि मग हृदयातून मनाशी थेट संवाद साधत, नकळत आणि तितक्याच अलगदपणे कागदावर उतरतात.  
     
     हो, आपल्या मनाच्या कुशीत बागडणारी, खेळणारी, दंगा करणारी, आपल्याशी सतत गप्पा मार अगदी मुक्तविहार करणारी आपलीच 'शब्दांची दुनिया'.


शब्द हे असे मनातच लोळणारे,
मनालाच गादी समजून त्यातच मस्त लोळणारे.


शब्दांच्या दाटीतून हळूच ओठावर उतरून,
काठावरच थांबणारे,
शब्दांचे पाखरू बनून मनातच विहार करणारे.


शब्दांच्या  गर्दीत शब्दाला शोधणारे,
शब्दांच्या खेळात शब्दांनाच समजावणारे.


हृदयाच्या हुंदक्यात नयनांतच तरंगणारे,
शब्दांच्या राज्यात शब्दालाच फसवणारे.


ओठांच्या काठ्यावर आणि नयनांच्या तीरेवर पल्ल्याआड होणारे,
पल्ल्याआड होता होता हळूची, लेखणीच्या कुशीत जन्मणारे.

                          - अनुप्रिया सावंत.

Friday 19 June 2020

थर्ड वर्ल्ड वॉर ७ - भारत चीन सीमावाद - १

         
         १९६२ साली बेसावध भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनने या वेळीही विश्वासघातकी नाटक करून भारतीय सैनिकांवर लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडांनी विक्षिप्त हल्ला केला.  चीनच्या भ्याड हल्लाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.  आणि अशा भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर चीनला लवकरच मिळेल.  


         चीनला महासत्ता बनण्याचे असुरी ध्येय आहे.  चीनच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेसाठी त्याला जगभर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.  आणि त्यासाठी चीनने फार आधीपासूनच त्याची पाळेमुळे कशी खोलवर रुजवून ठेवली आहेत, ह्याचा प्रत्यय आपल्याला कोरोना वैश्विक महामारीमुळे यायला लागला आहे.  कोरोनामुळे चीनचा खरा चेहरा जगासमोर आला असला, तरी चीनला त्याच्या महत्वकांक्षेपासून रोखून ठेवू शकणारा एकमेव भारत देश आहे आणि चीनला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे.  


         पाकिस्तान आणि श्रीलंका ह्यांचे चीनशी संबंध आहेत कारण चीनकडून त्यांना आर्थिक स्वरूपात कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची मदत झालेली आहे.  सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर दोन्ही देशांना अजूनही मोठ्या कर्जाची आवश्यकता आहे.  आणि हीच संधी चीन साधणार आहे.  कारण भारताच्या शेजारी असणारे हे देश ह्यामुळे चीनच्या अधिपत्याखाली येण्यास मदत होणार आहे.  चीन आपल्या मार्केटिंग स्ट्रेटीजी चा वापर करून इतर देशांमधील आपला विस्तार वाढवत चालला आहे.   


     चीनचे पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.  शत्रू चा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र चीनने फार पूर्वीपासून अवलंबले आहे.  हिंदी महासागरातील भारताची सुरक्षा आणि अमेरिकाचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी, चीन भारताशेजारील देशांना आर्थिकदृष्ट्या आपल्या कूटनीतीमध्ये गुंतवू पाहत आहे.  त्याचमुळे चीन पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार ह्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत भारत व अमेरिकेला शह देण्याचा विफल प्रयत्न करत आहे.  चीनचे सुरु असलेले कुटील डाव हाणून पाडण्यासाठी भारत व अमेरिका इतर देशांसोबतचे नौदल सहकार्य वाढवीत आहे.  ह्यात श्रीलंकेसह, मालदीव, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर ह्यांचाही समावेश आहे.  श्रीलंकेसोबत भारताने सद्य स्थितीत करार करत आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

नेपाळ


        भारताच्या शेजारी असलेल्या ह्या नेपाळला महायुद्धात एक महत्वाचे स्थान आहे.  
अधिक माहितीसाठी: 
तिसऱ्या महायुद्धासंदर्भात डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि महत्वपूर्ण आहे.  

'तिसरे महायुद्ध' संदर्भातील जागतिक पातळीवरील दिवसागणिक बदलणाऱ्या अधिक घडामोडी पाहण्यासाठी:

        नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे.  याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे.  भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ८ मे रोजी 'लिपुलेख पास' ला जाणाऱ्या ८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते.  हा रास्ता उत्तराखंड आणि तिबेट ह्यांच्या मधून जाणारा आहे.  कैलाश मानसरोवर हे तिबेट मध्ये येते.  इथे जाण्याचे दोन रस्ते आहेत.  एक लिपुलेख (उत्तराखंड) आणि दुसरा नाथू-ला.  पण हे दोन्ही रस्ते खूप वेळ खाऊ आहेत.  त्यामुळे लिपुलेख सीमेपर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे.  ह्या लिंक रोडचा फायदा फक्त भाविकांनाच नाही, तर चीनच्या टोकाला असणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला सुद्धा कमी वेळेत अधिक रसद उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.


    हिंदू धर्मासाठी पवित्र असणारी कैलास यात्रा 'तिबेट' जवळून जाते.  हिंदूंच्या पवित्र कैलाश मानसरोवरावर चीन स्वतःचा हक्क दाखवतो.  भारताविरोधात नाराजीचा सूर लावणाऱ्या नेपाळने, ज्यावेळी चीनने ‘माऊंट एव्हरेस्ट’ वर स्वतःचा दावा केला, तेव्हाही कुठल्याही प्रकारची अपेक्षित आक्रमकता प्रदर्शित केली नव्हती.  ही बाब नेपाळमधील चीनचा प्रभाव अधोरेखित करणारी ठरते.


       आपल्या मुख्य पॉईंट्सवर येऊ.  नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा आहे, तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे.  याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे.  असे असतानाही नेपाळने भारताच्या लिंक रोडला विरोध का करावा?  इतकेच नाही तर नेपाळने लिपुलेखसह 'कालापानी' व 'लिंपियधुरा' हे नेपाळचाच भाग असल्याचा नवा नकाशा प्रसिद्ध करण्याचा इशारा देत निषेध नोंदवला होता.  फार आधीच भारत-नेपाळ सीमा प्रश्न मिटलेला असताना, नेपाळने भारतविरोधी अशी आक्रमकता दाखवण्यामागचे काय कारण असू शकेल?   की त्यामागे चीनची खेळी आहे? 


     ह्याच मुद्द्याला अधोरेखित करत चीनने लिपुलेखमधील भारताच्या अस्थायी बांधकामांवर आक्षेप घेत उघडपणे विरोध दर्शविला आहे.  नेपाळने 'कैलास मानसरोवर लिंक' रोडला ज्याप्रमाणे विरोध दर्शविला त्याचप्रमाणे चीनने कैलास मानसरोवराला जाणाऱ्या यात्रेकरू आणि चीनमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्यांकरिता जे तात्पुरते विश्रंतीसाठी अस्थायी बांधकाम बांधले आहेत त्यावरून विरोध सुरु केला आहे.  चीन इतर सीमाप्रदेशावरील देखील वाद उकरून काढत तसेच लिपुलेखसंदर्भात बांधकाम मुद्दा पुढे करत, भारतावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे जो अगदीच केविलवाणा वाटतो. 

 
     चीनला लिपुलेख इतका महत्वाचा का आहे?  'हिमालयीन ट्राय जंक्शन' हा अतिशय संवेदनशील असलेला भाग आहे.  कारण तिथे तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात.  त्यामुळे लष्करीदृष्ट्या अतिशय महत्वाचा असेलेला हा भाग खरं तर हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत.  

ही ट्राय जंक्शन म्हणजे,
१. सियाचीन ग्लेशियर 
२. कालापानी म्हणजे लिपूलेख पास 
३. डोकलाम 
४. दिफु पास  

     आणि महत्वाचे म्हणजे, हे चारही जंक्शन्स आपल्या भारताच्या ताब्यात आहेत.

     सियाचीन हातातून गेला तर लडाख हातातून गेल्यासारखे आहे.  सियाचीनच्या पश्चिमेला पाकिस्तान आणि पूर्वेला चीन लडाख वर कब्जा करू शकतील.  POK ताब्यात घेण्यासाठी तसेच लडाखला सुरक्षित ठेवण्यासाठी सियाचीन महत्वाची भूमिका बजावतो.

'लिपुलेख' ते दिल्ली अंतर फक्त ४१६ किमी आहे.  जर लिपूलेख चीनच्या ताब्यात गेला तर राजधानीवर हल्ला करायला चीन सैन्याला २ दिवस पुरेसे आहेत. 

'डोकलाम' हातातून गेले तर नॉर्थ ईस्टकडील राज्ये चीनच्या ताब्यात येतील.

         'भारत-म्यानमार-चीन' यांच्या सीमा 'दिफु पास' येथे येऊन मिळतात. मॅकमोहन लाईनच्या एंड पॉईंटवर अरुणाचल प्रदेशात दिफु पास आहे.  चीनला अरुणाचल प्रदेश ताब्यात आल्यास आसाम मध्ये सैन्य घुसवणे सोपे आहे परिणामी पूर्ण नॉर्थ ईस्ट इंडिया चीनच्या तब्येत येऊ शकते.
(ह्यासंदर्भात अधिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.)


         भारत-नेपाळ-चीन यांच्या सीमा ह्या 'कालापानी म्हणजे लिपूलेख पास' ला येऊन मिळतात.  तसेच भारताला ह्या भागावरून चीनच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणं सोयीचे पडते.  भारताने थेट लिपूलेखपर्यंत बांधलेला हा रास्ता तीर्थयात्रांकरिता जरी असला, तरी ह्यामुळे भारतीय सैन्य चीनच्या सीमेपर्यंत अगदी जलद गतीने धडक मारू शकतात.  आणि त्याचमुळे चीनच्या कोणत्याही नीच कृत्याला भारत चोख प्रयुत्तर देऊ शकतो.  हे सर्व पाहता नेपाळ आणि चीनने ह्याबाबत चालवलेल्या एकंदर भूमिकेचा अंदाज बांधता येऊ शकतो.

       २०१७ ला चीनने 'डोकलाम' मध्ये लष्करी तणाव निर्माण केला असतानाही भारताने एक इंचही जागा सोडली नव्हती.  आताही भारत तुसभरही मागे हटला नाही आणि हटणार नाही.  मजबूत नेतृत्वामुळे भारताचे चित्र आता बदलत चालले आहे.  एक जबाबदार देश, उत्कृष्ट निरीक्षण क्षमता, वाढती लष्करी शक्ती, अत्याधुनिक शस्रास्रे आणि मुख्य म्हणजे भारतीय सैन्यांचे मनोबल वाढते ठेवून त्यांना मिळणारा संपूर्ण सकारात्मक व सहकार्यात्मक पाठिंबा, ह्यामुळे भारत देश आता मजबूत आणि विशालतेच्या दिशेने आगेकूच करत आहे.


तिबेट
         तिबेट हा एक स्वतंत्र प्रांत होता.  मात्र १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले व १७ कलमांचा करार करत तिबेट गिळंकृत केले.  कलमांच्या मार्फत तिबेटवर स्वतःचा हक्क दाखवत तिबेटियन जनतेवर बरेच निर्बंध आणले गेले.  परिणामी जनतेमध्ये चीनबरोबर सातत्याने संघर्ष सुरु झाला.   पण चीनने तो प्रत्येक वेळी हाणून पडला.  १९५९ मध्ये १४ वे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले व भारताने त्यांना राजाश्रय दिला.  हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेतून तिबेटचे स्वंतत्र सरकार चालवण्याची परवानगी त्यांना देण्यात आली व तेथून आजही तिबेटचे सरकार चालवले जात आहे.  मात्र नेहमीप्रमाणेच चीनच्या विरोधामुळे तिबेटचे आजचे स्थान ‘चायना ऑक्युपाईड टेरीटरी’ म्हणजेच चीनव्याप्त क्षेत्र असेच आहे.

         तिबेटकडे स्वतःचे शासन, संस्कृती व पुरेशी लोकसंख्या असल्यामुळे 'तिबेट' हा 'देश' या संकल्पनेच्या निकषांमध्ये परिपूर्णतेने बसतो.  एखाद्या क्षेत्राला मान्यता देण्याचे अधिकार हे संयुक्त राष्ट्रसंघटनेचे आहेत.  ह्यात ठराव मंजूर होऊन, त्याला सुरक्षा परिषदेची मान्यता मिळवावी लागते.  तिबेटला जर मान्यता मिळाली तर चीनसाठी ही बाब चिंतेची ठरते.  

         तिबेट, हाँगकाँग, तैवान ह्या चीनच्या मुख्य नसा म्हणता येतील.  तिबेटच्या सीमारेषा भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या चार देशांशी जोडल्या गेलेल्या आहेत.  'अक्साई चीन' हा देखील तिबेटचाच एक भाग आहे.   परंतु, १९६२ मध्ये चीनने भारताकडून अक्साई चीनचा भाग बेकायदेशीरपणे गिळंकृत केला.  तो तिबेटचाच भाग असल्याने आमचाच भाग आहे असा दावा चीन ठोकत असला, तरी तो फोलच आहे हे येणार काळ नक्कीच सांगेल.  

          अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी सूत्रे हातात घेताना अमेरिकेत अनेक कायदे बनवण्यात आले.   त्यात चीनकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे आणि ते थांबवण्यात यावे यासंदर्भातील असलेले हे कायदे आहेत.  त्यामुळे चीन आपला दावा सांगत असणाऱ्या तिबेट, हॉंगकॉंग आणि तैवान ह्यांना ह्यासाठी चीनविरोधी लढण्यात एक प्रकारचे सकारात्मक सहकार्य होणार आहे.  मात्र चीनसाठी ही डोकेदुखी बनलेली असून ती अधिक तीव्र होत चालली आहे.  कारण जर तिबेटला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली तर चीनचा अक्साई चीन, लडाखवरील दावा सुद्धा पूर्णपणे फोल ठरेल.

अमेरिकेच्या 'तिबेट कार्ड' मुळे चीनवरील दबाव वाढणार आहे. कारण आंतराष्ट्रीय पातळीवर चीनने कोरोनाव्हायरस संदर्भात ज्या खेळी खेळल्या आहेत, त्यामुळे सर्वच देश चीनच्या विरोधात ठाकले आहेत.   ह्या कारणामुळे चीनच्या तैवान भूमिकेसंदर्भात पाठिंबा देण्यास कोणता देश पुढे येईल, असे वाटत नाही.  चीन सगळ्याच बाजूने कोंडीत पकडला गेल्यामुळे अधिक आक्रमक झाला आहे.  अमेरिका चीनवर आधीपासूनच संतप्त असल्यामुळे अमेरिकेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकात तिबेटला स्वतंत्र देश म्हणून दर्जा मिळण्याची शक्यता अधिक आहे.  चीनला हे मान्य नसल्यामुळे अमेरिका-चीन मधील संघर्ष वाढत आहे.  तर दुसरीकडे भारतासाठी ही घडामोड फायदेशीर ठरणार आहे.

     'कैलाश मानसरोवर' 'लिंक रोड' संदर्भात माहिती वाचताना लक्षात येते की, 'भारत-तिबेट-चीन' यांचा चाललेला सीमावाद किती महत्वाचा आहे.


तैवान -
         तैवानच्या जनतेने १९६० पासून चीनविरोधात स्वतंत्रलढा सुरु केला.  ज्यावेळी हॉंगकॉग चीनच्या अधिपत्याखाली गेला, त्यावेळी तैवानला झालेला धोका ओळखुन अमेरिकेने तैवानला मदत पाठवली.  केवळ त्याचमुळे चीनचा तैवान जिंकण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता.  


          ‘त्साई ईंग-वेन’ पुन्हा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा बनल्या.  त्यांच्या शपथग्रहण सोहळ्याला ४१ देशांच्या ९२ प्रतिनिधींनी  ‘व्हर्च्युअल उपस्थिती’ लावली होती.  त्यात भारतानेही सहभाग घेतला होता.  इतकेच नाही तर तैवानचा एक लोकशाहीवर आधारलेला देश म्हणून भारताने उल्लेख केला.  हा एकप्रकारे चीनसाठी  इशाराच ठरतो.  


        चीनने कोरोनाव्हायरसचे जे सत्य जगापासून लपवून ठेवले, त्या विरोधात जगभरात प्रचंड संताप आहे.  अनेक देश चीनविरोधी गेले आहेत.  असे असले तरी चीनने स्वतःच्या विस्ताराच्या राक्षसी महत्वकांक्षेला तुसभरही धक्का लागून दिला नाही.  उलट तो अधिक आक्रमक बनत 'ईस्ट आणि साऊथ चायना सी' तसेच तैवानच्या आखातात आपल्या हालचाली वाढवत आहेत.  तैवानच्या शपथग्रहण पार्श्वभूमीवर झालेल्या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनमधील नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना तैवानवर हल्ला चढवून 'तैवानताब्यात घेण्याचा सल्ला दिला आहे.

         त्यामुळे चीनला प्रत्युत्तराची झलक आणि तैवानला पाठिंबा दर्शवित अमेरिकेने, या क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत.  गेल्या आठवड्यात अमेरिकेची ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘साऊथ चायना सी’ मध्ये दाखल झाली आहे.  तसेच 'लान्सर' या बॉम्बर विमानांचा ताफाही दोन्ही सागरी क्षेत्रात गस्त घालत आहेत.

     
         चीन अनेक मार्गाने भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करत आहे.  भारताचा वेगाने सुरु असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास चीनला खुपतो आहे.  विविध सीमेवर चीनचे सुरु असलेले कपटी कारस्थाने, हालचाली, छोट्या प्रदेशांवर सुरु असलेली हुकूमत, धाक आणि त्यांना भारताविरुद्ध भडकावण्यासाठीचे सुरु असलेले षडयंत्र आता उघड आहे.  जगभरातील प्रमुख देशांचा भारताला चीनविरोधात संपूर्ण पाठिंबा असून,  चीनवर सणसणीत आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु आहेत.  


       चीनला टक्‍कर देणारा भारत हा एकमेव शेजारी देश असून भारतासमोर चीनची दंडेली चालणार नाही, असा इशारा एका तैवानी वर्तमानपत्राने दिला आहे. इतकंच नाही तर तैवानचा 'Photo of the Day' ला सोशल मिडियावरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.



         आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे असलेले स्थान आणि भारताची असलेली 'आत्मनिर्भरता' तसेच 'आत्मविश्वासमय' वाटचाल पाहताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.  भारताचा पाया हा मूलतः आध्यात्मिकच आहे.  भारतावर आजपर्यंत अनेक परकीय आक्रमणे आले, पण प्रत्येकवेळी भारताने तितक्याच त्वेषाने ते परतवूनही लावले.  भारताची संस्कृती, भारताची संयमता, भारताचे वाढते प्रभुत्व, भारताची सकारात्मक प्रतिमा त्याचबरोबरीने असलेली विशाल दूरदृष्टी हे सर्वच देशांनी जाणले आहे आणि अजूनही अनुभवत आहेत.  

         एकीकडे इतर देशांचा वाढत पाठिंबा, भारतावर असलेला विश्वास, भारताची प्रत्येक पाऊलागणिक वाढत जाणारी सक्षमता तर दुसरीकडे चीन, पाकिस्तान सारख्या धूर्त, कपटी, आणि काळाने ग्रासलेल्या त्यांच्यासारख्या विचारसरणीला पाहताना पवित्र्याने रसरसलेला 'सुंदरकाण्ड' मधील विभीषण-रावण संवाद आठवतो.  

रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि|
मैं रघुबीर सरन अब जाऊँ देहु जनि खोरि ||२३७|| (सुंदरकाण्ड ओवीं) 


          सध्या तैवान, तिबेट, नेपाळ आणि चीन मधील सीमावादावरून वातावरण चिघळत असताना चीनने भारतीय सैन्यावर कपटाने केलेला हल्ला हा अतिशय निंदनीय आणि आत्मघातकी आहे.  चालू घडामोडी पाहता आणि सध्याचे भारत-चीन सीमावादावरून घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहता, आपल्याला ह्याविषयी थोडेफार तरी धागेमुळे किंवा त्या गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.   त्याचबरोबर इतरांनाही ह्या गोष्टींबद्दल जागृत करणे ही काळाची गरज आहे.  कारण युद्ध सुरु झाले आहे.  सीमेवरून थेट घरापर्यंत त्याचा प्रवेश झालेला आहे.  आता आपल्याला सावधानतेसोबत सतर्कता आणि त्याबद्दल आवश्यक खबरदारीही तितकीच महत्वाची आहे.  आपले सैनिक सीमेवर सर्वस्व पणाला लावून शत्रूला  परतवून लावत आहेत.  आपल्याला सीमेवर जायची गरज नाही पण म्हणून आपले युद्ध थांबत नाही आणि संपत तर नाहीच नाही.  आपल्याला आपल्या भारतीय सैन्याला साथ द्यायची आहे.  भारताला बलाढ्य बनवायचं आहे.  भारताला सक्षम करण्यात जेवढा आपल्या सैन्याचा मोलाचा वाट आहे, तितकाच महत्वपूर्ण वाटा आत्मनिर्भर भारताचे नागरिक म्हणून आपलाही आहेच.  कारण... Third World War has been Started... 

         - अनुप्रिया सावंत


Monday 15 June 2020

"Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."



          बऱ्याचदा आपल्याला हवं तसं घडतच असं नाही.  मनासारखी गोष्ट घडली नाही, तर मन अगदी नानाविध विचार करायला लागते.  जर ह्या मनाला विचार करण्यासाठी, नकारात्मक विचार असतील, तर मग मनाचे आणि डोक्याचे(बुद्धी) अगदी तुंबळ युद्ध जुंपते.  हा अगदी प्रत्येकाला येणारा अनुभव आहे.  बऱ्याचदा एखादा नवीन विषय अचानक समोर आला की, व्यक्तीची कशी तारांबळ उडते. त्यात विषय नावडता असेल, तर मनःस्ताप ठरलेला असतो. आणि जर विषय आपल्या मनाच्या विरुद्ध टोकाचा असेल तर मग स्वभाव, मन, बुद्धी ह्यांना भेदत डोक्याचा भुगा.  मैत्रीच्या भाषेत बोलायचं तर डोक्याची दही नक्कीच होते.  बरेचदा गोष्टी खूप छोट्या असतात.  पण मनाला त्या छोट्या गोष्टी अगदीच, आता पेलवत नाही असे होऊन जाते.  ह्याला प्रामाणिक कारण एकचं, आपण स्वतःला खूप कमी संधी देतो असं वाटतं. 


     एखादा वैयक्तिक पातळीवरील निर्णय घ्यायचा म्हंटलं की, सामान्यातला सामान्य जीवसुद्धा अगदी कासावीस होतो.  मग ती गोष्टी छोटी असली तरीही. गोष्ट विचारांच्या मर्यादेपलीकडे असेल, तर मग ह्या कासावीस जीवाला खऱ्या अर्थाने गरज लागते ते आपलेपणाची.  हे 'आपलेपण' म्हणजे काय?  माझे मित्र-मैत्रीण, आई-बाबा, नातेवाईक, आप्त ह्यांच्याशी जिव्हाळा, संवाद म्हणजे 'आपलेपण'.  हे जरी खरे असले, तरी खरे 'आपलेपण' हा स्वतःचा-स्वतःशी, मनाचा-बुद्धीशी असलेल्या योग्य सुसंवादाशी असतो.  ह्या कासावीस होणाऱ्या जिवाला जशी कोणाच्या तरी आधाराची गरज असते, तशीच त्याला स्वतःचा स्वतःशी असलेल्या आधाराची सुद्धा तितकीच गरज असते. राहतो प्रश्न तो स्वतःला ओळखण्याचा.  फार काही फिलॉसॉफी पद्धतीत नक्कीच नाही व्यक्त व्हायचंय.  सर्वात जवळचा मित्र, म्हणजे आपल्या गाठीशी असलेला अनुभव.  सोबत ह्या अनुभवाला असलेली बुद्धीची उचित सांगड. 


       ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच छूमंतर अजिबात नाहीत.  ह्याला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची, नीट समजून घेण्याची आणि जी पारख आपल्याला त्यातून होते, त्यातही अनेक दृष्टिकोनातून स्वतःला स्वतः पैलू पाडण्याची नितांत आवश्यकता आहे.  अनेक अनुभवातून प्रत्येक जण शिकत असतो. हे अनुभव, आपण आपल्या आयुष्यात कसे वापरतो? हे महत्वाचे आहे.  कारण तेही तितकेच आपल्या मनाला आशावादी बनवण्यासाठी प्रेरित करत असतात. 


    अशा फिलॉसॉफिकल गोष्टी आपण जेव्हा समोरच्याला सांगतो किंवा आपले मत आपण मांडतो, त्यावेळी बऱ्याचदा आपणही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो.  It's OK.  काही हरकत नाही.  Just Let it beFocus on good changes inside you.  आपल्यातील चांगल्या बदलांवर लक्ष केंद्रित करायला हवं.  ह्यात एक गोष्ट नक्की, 'Acceptance is more important in our life'.  ती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे.  कारण 'Change is only constant'.  आपल्या आयुष्यात होणारा 'सातत्यपूर्ण' बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे.  ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या बुद्धीला स्थिर करण्यास आपण स्वतःच स्वतःला मदत करू शकतो.


       'बुद्दिभेद' म्हणजे माझ्या अर्थी, मनाचे आणि डोक्याचे असलेले वाकडेपण.  मन आणि बुद्धी स्थिर नसेल तर शरीर सुद्धा व्याधिमय बनते.  हा बुद्धिभेद बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्यावर हल्ला करण्याआधीच, स्वतःच्या विचारांच्या चुकीची पद्धतीमुळेच आपल्याला विनाशाकडे नेतो.  बऱ्याचदा आपण फार पटकन समोरच्याला आपले रिऍकशन्स देतो.  आपले मत आपण लगेच बनवतो.  आपल्या मृदू, प्रेमळ किंवा काळजीयुक्त स्वभावामुळे का असेना, आपले रिऍक्ट होणं बऱ्याचदा आपल्यालाच त्रासदायक ठरतं.  इतकंच नाही तर  आपण स्वतः देखील एखादी गोष्ट केली की, स्वतःवरही तितक्याच चंचलतेने रिऍक्ट होऊन जातो.  आणि हेच रिऍक्ट होणं, मग आपल्याला विचारांच्या चक्रीवादळात खेचून घेतो.  आणि त्यातून निष्पन्न काय होतं? तर मनाला होणाऱ्या भयंकर वेदना, अस्वस्थता, चलबिचलता, निर्णय शून्यता, आणि परिणामी चुकीचे पाऊल.


          पाऊल वाकडे पडले की, ते पुन्हा मार्गावर आणता येतातही.  पण जर ते चुकीच्या निर्णयामुळे जीवावर बेतले, तर त्याला पुन्हा मार्गावर आणता येऊ शकत नाही.  Nothing is bigger than Life.  आयुष्य हे एकदाच मिळते. कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा गोष्टीमुळे आपण ते वाऱ्यावर सोडून दिले, तर कसे चालेल?  असे म्हणतात, संधी एकदाच चालून येते, मला असं अजिबात वाटतं नाही.  'संधी ह्या चालून येत नाहीत, तर संधी ही निर्माण करावी लागते.'  कोणीतरी येईल आणि मला संधी मिळवून देईल, असं कधीच होतं नाही.  संकटात जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, तेव्हा Optimistic (आशावादी) व्यक्तीसाठी हेच संकट संधी बनून स्वतः त्याच्याकडे येते.  जेव्हा कोणत्या कार्याचा बेस (पाया) हा अध्यात्माला सोडून असतो, तेव्हा ह्या संधी त्यांचे सगळेच दारं बंद करून घेतात.  म्हणजे काय? आपल्या मनाचा बुद्धीचा एकमेकांशी संवाद तुटतो आणि तिथे सुरु होतो तो वाद.  वादातून कधीच काही चांगले निष्पन्न होऊ शकत नाही.  आणि राग येणं हे स्वाभाविक जरी असले, तरी त्या रागाला वादाच्या दारात उभं करायचं की नाही?  ते आपल्या हातात असते.  एखादी गोष्ट आपल्याला राग आणणारी असली, की आपण पटकन रिऍक्ट होतो.  आणि हे रिऍक्ट होणं जर चुकीच्या पद्धतीत व्यक्त झाले, तर वाद वाट पाहतच असतो.  कलियुगाच्या चरणात सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल?  तर हा द्वेष, राग, आणि त्यातून निर्माण होणारा वाद.  


         हे सगळे बोलण्यासाठी ठीक आहे असे जरी वाटले, तरी आता ह्यावर खऱ्या अर्थाने विचार करायला हवा.  ह्या सगळ्याचे सकारात्मक अनुकरण झटपट नक्कीच नाही होऊ शकंत.  पण हे सवयीने नक्कीच बदलू शकते.  नुसते सकारात्मक वाचून, बघून आणि लिहून व्यक्ती आशावादी बनत नाही.  तर त्याप्रमाणे त्याला स्वतःला स्वतःवर मेहनत घ्यावी लागते.  ही मेहनत घेणं सोपं नाही, पण अशक्यही नाही.  स्वतःवर चिडण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, द्वेष, मत्सर, लोभ ह्या मोहमायेत अडकण्यापेक्षा आपल्या 'Nothing is bigger than Life' असणाऱ्या ह्या स्वतःच्या अमूल्य जीवाला संधी द्यायला काय हरकत आहे.  एक गोष्ट मनाशी आपण पक्की बांधली पाहिजे, "संधी ह्या चालून येत नाही, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात."  You have to create it.


       आज माझ्याकडे नोकरी नाही म्हणून मी रडत बसलो, तर चालेल का?  माझा पगार कमी आहे आणि माझा मित्र जास्त कमावतो, असं करत राहिलो, तर घर चालेल का?  घरात कोणी मदत करत नाही म्हणून स्वतःवर चिडचिड करत राग करत बसलो, तर माझा जगणं सुसह्य होईल का?  मला आधी जास्त पगार होता, आता कमी पगारात काम करावं लागतंय, असं करत आहे ती नोकरी सोडली, तर मला पुन्हा नवीन संधी मिळतील का?  असे खूप प्रश्न आहेत, मला - तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाच.  


       आज लॉकडाऊन चालू होऊन ३ महिने झाले, आधीची परिस्थिती आणि आताची व पुढची परिस्थिती ह्यात नक्कीच बरंच अंतर निर्माण होणार आहे, किंबहुना झाले आहे.  अशा वेळेस मनाचा आणि बुद्धीचा संयम हाताळणे थोडं अवघड आहेच, पण जमणारचं नाही, असं अजिबात नाही.  परिस्थितीला गिव्ह अप(सोडून देत)  करत हतबल होण्यात काहीच अर्थ नाही.  ह्यात तरून जायचे असेल तर 'संधी' निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही.  संधी ही कोणत्याही प्रकारची असू शकेल, ते म्हणजे बुद्धिभेदापासून स्वतःचा बचाव करण्यापर्यंत ते स्वतःला अशाही परिस्थिती 'Optimistic' व्यक्तिमत्त्वाकडे नेण्यासाठी, आपला जोपासला जाणारा छंद ही त्याचाच भाग असू शकेल.  आणि नसेलच काही छंद किंवा नसेलच काही आवड, तर मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.  मग अगदी स्वतःवर सकारात्मक प्रयोग ही त्याचा भाग असू शकेल.  काय वाटतं तुम्हाला? 


        अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मान्य करून, स्वतःला संधी आपणच दिली पाहिजे.  स्वतःला आपण आहे तसे Accept(स्वीकार) करत, स्वतःवरही प्रेम केले पाहिजे.  दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला आनंद होतोच.  इतकंच नाही, तर दुसऱ्याचा छोटासा आनंद बघतानाही आपण किती हरखून जातो.  मग आपल्या स्वतःच्या जीवनाला आपण स्वतःच जर हा आनंद मिळवून दिला, तर आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.  जीवनात कोणीच परफेक्ट नसतात आणि परफेक्शनच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो.  


         इतिहास घडविणाऱ्यांमध्ये सातात्यतेने सकारात्मक वृत्ती होती. त्यांच्या शिकण्यात नाविन्यता होती, अनुभवांचे गाठोडे होते. त्याचा सकारात्मक वापर करून मन आणि बुद्धीवर मिळवलेला, तो विजय म्हणजे हा 'इतिहास'.  आपल्याला आपल्या इतिहासातील  'आदर्श' व्यक्तींची नुसती आठवण जरी आली, तरी अंगावर शहारे येतात.  अभिमान वाटतो आपल्याला आपल्या पूर्वजांचा.  आणि नकळत स्वतःचाही अभिमान वाटतो की, असे थोर संत, नेते, राजे, व्यक्ती आपले इतिहासकार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांनी आपल्याला संदेश तर दिला आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेकानेक संधी दिल्या आहेत.  जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि त्याचे अनेकानेक पैलू आपल्याला प्रत्यक्ष दिले आहेत.  असे म्हणतात, 'जिंदगी का दुसरा नाम ही प्रॉब्लेम है|' पण जर प्रॉब्लेम आलेच नाही, तर जीवनातल्या संधी कळणार तरी कशा? आयुष्यातली सुंदरता अनुभवणार तरी कशी?


          माझी आई आम्हाला नेहमी सांगते, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्याची सहजता आपल्याकडे असायला हवी.  प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असतात, तुम्ही त्याला कसे पाहता?  ते महत्वाचे.  'श्रद्धा' आणि 'भक्ती' ह्या दोन गोष्टी आणि त्यानुसार असलेले आपले कर्म जीवनात प्रत्यक्ष उतरत असते.  Spiritually आपला strongness आपल्याला सकारात्मक स्पंदन निर्माण करण्यास सहाय्यभूत होतात.  'भक्ती' हा प्रत्येक कार्याचा बेस आहेच, पण 'प्रपंच हाच परमार्थ', हे विसरून चालणार नाही. 


त्यासाठी...

     "Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."

              अनुप्रिया सावंत

Wednesday 29 April 2020

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)


     तिसरे महायुद्ध सदरात अनेक वेगळे विषय विशिष्ट घटकांसंदर्भात पाहताना, मुख्यतः तो त्या देशातीलच प्रश्न त्या देशाला भेडसावत होता आणि परिणाम काही अंशी इतर देशांवर पाहायला मिळत होते.  मात्र सध्याच्या ह्या अनप्रेडिक्टेबल परिस्थितीत सगळ्याच घडामोडी विचित्र आणि विक्षिप्त पाहायला मिळत आहेत. लॉक डाऊन हे एखाद्या तत्सुनामी पेक्षाही भयंकर स्वरूप घेऊन आले आहे. सगळेच देश ह्या काळ्या सावलीत अडकल्यासारखे डाऊन मोड वर आहेत. आणि ह्याहून बिकट गोष्ट अशी, की कोणत्याही देशाला ठामपणे ह्याची समाप्ती कालावधी सांगता येऊ शकत नाही. फक्त व्याप्ती दिवसेंदिवस प्रत्येक देशात वाढलेली पाहायला मिळत आहे.


     कोरोना दिवसेंदिवस पूर्ण जगाला विळखा घालत सुटला आहे. आणि त्याचे स्वरूप प्रत्येक देशात तितकीच काळीकुट्ट सावली पसरवत थैमान घालत आहे. पण अचानक ही महामारी आली कशी व कुठून?  की ह्याची उत्पत्ती ही ठरवून केली गेलेली षड्यंत्राची रचना असावी?  खरं तर नाट्यमयपूर्ण रीतीने 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' घेऊन ती साऱ्या जगाला गिळू पाहत आहे. 


     लाखो जणांचा बळी घेणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या ह्या महामारीचा साथीचा उगम झाला आणि बघता बघता सर्वत्र आणीबाणी लागू झाली. जगभरातील १८० हून अधिक देश ह्या विळख्यात सापडले आणि ह्याचे थेट परिणाम नागरिकांच्या जीवनावर आघात करता झाला आहे.  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हे नक्की आहे काय?  हे मागच्या भागात आपण वाचलंय.  त्याची व्याप्ती विळखा कशी घालत सुटली आहे हे पाहणे भयंकर आहे.


    लाखोंचा बळी आणि कमकुवत अर्थव्यवस्था ह्याचा फायदा नक्की होणार तरी कोणाला? आणि ह्या मागे नेमका हेतू काय? आणि कशासाठी? उत्तर एकच 'जागतिक महासत्ता'.  पण कोणाची? प्रत्येक देश आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. हो, प्रत्येक देश स्वतः आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षमतेच्या दिशेने वाटचाल करत आहेच.  स्वतःचे लष्कर आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्यांच्या परिपक्वतेसहित आपल्या शत्रूंशी लढण्यास सुसज्ज होत आहेत.  अनेक देश प्रभावशाली ठसा उमठवण्यासाठी सर्व बाजुंनी प्रयत्नशील आहे.  मग ते आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कोणत्याही पातळीवरची समस्या असो, स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी तयारच आहेत.  पण युद्ध हे विविध पातळींवर त्यांच्या विशिष्ट रूपात आकार घेत असते. सध्या चाललेली पॅनडेमिक स्थिती आणि युद्ध ह्याचा नेमका संबंध काय? हा प्रश्न बराच जणांना पडला असावा.


     आताच्या घडीला देखील 90 टक्के जनतेला तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे, ह्याची सुतरामही जाणीव नाही. आणि हे तिसरे महायुद्ध केव्हाच सुरू झाले आहे, ह्याची ओळखही फार कमी जणांना असावी. कारण युद्ध म्हंटलं तर ते देशाची सीमा हल्ला, बॉम्बहल्ला, शस्त्रास्त्रांचा मारा ह्या भोवतालीच आणि ह्या संदर्भाला लागूनच असते अशी समजूत आहे.  जैविक युद्ध हाही एक युद्धाचा प्रकार आहे. आधुनिक शस्त्रात्रे म्हणून ह्याचा वापर ह्या आधी झालेला आहे. आणि त्याचा प्रभाव संपूर्ण जगाने अनुभवलाही आहे.  जैविक हल्ला करून समाजात, पर्यायाने देशात अस्थिरता माजवणे, असंख्य बळी घेणे आणि आर्थिकदृष्ट्या त्या देशाला कमकुवत करणे म्हणजे पाया ढासळण्यास षड्यंत्राद्वारे युद्धनीती आखणे.  हो, संदर्भ पहाल तर 'प्लेगची साथ'.


     याच प्लेगने चीनमधील दोन तृतीयांश लोकसंख्या नष्ट केली होती आणि तो युरोपात पोहोचला. मग युरोपातील एकतृतीयांश लोकसंख्याही त्याने झटपट नष्ट करून टाकली.  त्यात तरुण, वृद्ध, गरीब, श्रीमंत वगैरे सर्व प्रकारचे लोक सापडले. 


     हल्लीच, डॅन ब्राउन लिखित इन्फर्नो पुस्तक वाचनात आलं.  अर्थात हे पुस्तक सध्याच्या ह्या Pandemic परिस्थितीला वाचायला मिळणं म्हणजे हा नक्कीच योगायोग नसावा. 'Coincidence is nothing but God creations.'


    ह्या पुस्तकात आलेल्या व्हेनिसच्या वर्णनात प्लेगची साथ व्हेनिसमध्ये पसरल्यावर, तिथे जो हाहा:कार उडाला त्यात एवढी मोठ्या प्रमाणात माणसं मेली की, त्यांना पुरण्यासाठी कुठेही कोरडी जमीन व्हेनिसमध्ये उरली नाही.  शेवटी प्रेते कालव्यात फेकून दिली जाऊ लागली.  अशी बरीच प्रेते कालव्यात तरंगत रहात.  काही ठिकाणी तर त्यांची एवढी दाटी व्हायची की, मोठमोठ्या ओंडक्यांच्या साहाय्याने ती प्रेते ढकलत, ओढत समुद्राकडे नेऊन तिथे सोडून दिली जायची. त्यामुळे प्लेगचा जोर किंचितही ओसरला नाही. नंतर नगराधिकाऱ्यांना कळून चुकले की, उंदरांकडून प्लेगचा प्रसार होतो.


     व्हेनिसने बंदरात येणाऱ्या सर्व परकीय जहाजांना किनाऱ्यापासून काही अंतरावर किमान ४० दिवस थांबून रहाण्याचा हुकूम काढला.  नंतरच त्यांना बंदरात येण्यास परवानगी दिली जाऊ लागली.  आजही इटलीत असे रोगराई पसरवणारे संशयित जहाज आल्यास त्याला ४० दिवस वेगळे ठेवले जाते.  त्याला इटालियन भाषेत ‘क्वॉरन्ट’ असे म्हणतात. त्यातूनच इंग्रजीत quarantine –‘क्वॉरन्टाईन’ हा शब्द आला.


  इतिहासात इस्तंबूलमध्ये अनेक वेळा भयानक प्लेगच्या साथी उद्भवलेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पावल्याने लोकसंख्या कमी झाली होती. प्लेगच्या साथीच्या शेवटच्या काळात जेव्हा कहर झाला होता, तेव्हा तर इस्तंबूल शहराला, ‘प्लेगचे केंद्र’ असे लोक म्हणू लागले.  एकदा तर एका दिवसात १० हजार रहिवासी मृत्युमुखी पडले होते.  ऑटोमान साम्राज्याच्या काळात जी चित्रे काढली गेली, त्यात अनेक चित्र प्लेगवरची होती.  ती पुढे खूप गाजली.  एका चित्रात तर तक्सिम नावाच्या मैदानापाशी प्रेतांचे ढीग रचलेले होते आणि ती प्रेते पुरण्यासाठी लोक बेभान होऊन अनेक खड्डे खणताना दिसत होते. (इन्फर्नो)


   ह्याच पुस्तकातील मुख्य खलनायक असलेल्या झोब्रिस्टने ‘मानव संहाराचे घड्याळ’ सादर केले होते. त्याच्या म्हणण्यानुसार लोकसंख्यावाढीवर मर्यादा घालण्यासाठी आनुवंशिक शास्त्राची मदत घेऊन एखादा असा उपाय शोधायचा की, ज्यामुळे कोणाचाही रोग, व्याधी, दुखणे हे बरे न होता, उलट रोग, व्याधी आपोआप त्यांच्यात निर्माण होतील. रोग बरे होणार नाहीत, पण ते वाढतील असे करायचे. आहे की नाही भयंकर? आता आपण बोलू हे फक्त पुस्तकी कथेत आहेत.  पण, खरंच तुम्हाला वाटतं असं? 


     त्याने असे प्रतिपादन केले होते, प्रगत तंत्रज्ञानानुसार अनेक रोग निर्माण करणारा एक असा संकरित विषाणू किंवा जंतू निर्माण करायचा की, त्यावर आपल्या आधुनिक औषधशास्त्रात कसलाही उपाय असणार नाही.  आताच्या परिस्थितीला हे वाक्य आणि ह्या गोष्टी अगदी वास्तव आहेत. 


  'परदेशातील चैनीच्या वस्तूंची समाजात आवड असल्यामुळेच शेवटी विनाश होतो. त्यामुळेच तो महाघातक प्लेग चीनच्या लोकांमधून व्हेनिसमध्ये व्यापारी जहाजातील उंदरांमधून प्रवास करीत उगवला.' ह्या पुस्तकातील हे वाक्य वाचलं आणि जाणीव झाली, चीनची असलेली महत्वकांक्षा सर्व जगावर महासत्ता स्थापन करण्याचं, स्वतःचं शक्तिशाली वर्चस्व प्रस्थापित करण्याचं.  आणि दिसले ते चीनने त्यासाठी विस्तारलेले जाळे. अगदी खरं आहे हे सर्व. (5G, टिकटॉक, चीप टेक्नॉलॉजि, लो मार्केट व्हॅल्यू)


   सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा विळख्यात अडकला आहे.  जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जवळ जवळ सगळेच देश ह्या व्हायरसचा प्रदूर्भावात आहे. असे असूनही ह्याच व्हायरसचा वापर अगदी युद्धातील शस्रासारखा करण्यात कित्येक देश गुंतले आहेत.  चीनविषयी सांगायचं तर एखादी लांबलचक यादी तयार होईल.  सध्या चीनच्या ह्या उपद्व्यापामुळे इतर देशातील घडणाऱ्या घडामोडी बघता, युद्ध काय स्वरूपात आकार घेतंय?  ते लक्षात येईल.


    चीनचा खास मित्र असणाऱ्या म्हणजे म्हणाल तर घरचा पाव्हनां असणारा पाकिस्तान चीनच्या सहाय्याने अनेक कारस्थान करत आहे.  अर्थातच तो एक मोहरा आहे आणि त्या प्यादाला हलवणारा चीन त्यातूनच आपले कुटील हेतू विस्तारतो आहे. चीन संदर्भात अमेरिकेने वारंवार लक्ष वेधले आहे. 


     अण्वस्त्रांंसाठी लागणारे साहित्य चीन मधून घेऊन पाकिस्तानला निघालेले जहाज आपल्या भारताने अडवले होते व त्यातील साहित्य जप्त केले.  यामुळे चीन व पाकिस्तानचे छुपे आण्विक सहकार्य पुन्हा एकदा जगाच्या समोर आले होते. पाकिस्तानला कितीही समज दिली किंवा अद्दल घडवली तरीही त्यात काही बदल होण्यासारखे नाही.  काही गोष्टी मुळासकट उखडावे लागतात. जग संकटाच्या खाईत असताना आणि मुळात स्वतःच्या देशात रुग्णांसाठी बेसिक सुविधाही उपलब्ध न करणाऱ्या पाकिस्तानने मात्र अरबी समुद्रात जहाजभेदी क्षेपणास्त्राच्या चाचण्या केल्या. तसेच काश्मीर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्रे तैनात केल्याचेही वृत्त आहे. सर्वात चीड आणणारी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपल्याच कोरोनाग्रस्तांचा वापर आतंकवादांप्रमाणे चालवला आहे. सीमेचा वापर करून अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी जैविक हल्ला अंतर्गत त्यांचा वापर केला जात आहे. 


  सर्वत्र लॉकडाऊन असताना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात  काबुलमधील शिखधर्मीयांच्या गुरुद्वारावर झालेला दहशतवादी हल्ला. हल्ल्याशी संबंधित व्यक्तीला पकडल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तान सरकारला त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.  कशासाठी?  म्हणजेे हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा संबंध अधोरेखित होत आहे.


     पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या २८१ पार आहे तर साडेतेरा हजाराहून अधिक रुग्ण पाकिस्तानात आहेत. पुढच्या काळात या साथीचा भयंकर विस्फोट पाकिस्तानात होईल, अशी भयावह शक्यता या देशातील वैद्यकीय तज्ञ व पत्रकार वर्तवित आहेत.  कारण इतकं होऊनही हा एकमेव देश असावा, जो कोरोनव्हायरस आणि लॉकडाउन ह्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे मानतो.  संपूर्ण लॉकडाऊनच्या ऐवजी स्मार्ट लॉकडाऊन करायला हवा, असे ह्यांचे म्हणणे आहे.  मात्र नक्की काय? त्याचे तपशील काही त्यांनी उघड केलेले नाहीत.


   तुर्की आणि सीरिया ह्यांच्यातील वाद व संघर्ष आपल्याला माहीतच आहे. अस्साद राजवट आणि तेथील चाललेले खरे खोटे संघर्ष ह्याबद्दलही आपल्याला वृत्तपत्रातून हळू हळू माहिती होत चालली आहे.  सीरिया हा मध्य पूर्वेतील देश त्याच्या बाजूला लेबेनॉन, भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कीस्तान, पूर्वेला असलेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला असलेला इस्राईल देश. 


  तुर्की लष्कर व समर्थक बंडखोरांनी सीरियन लष्करावर नवे हल्ले चढविले आहेत.  संयुक्त राष्ट्रसंघाने ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या पार्श्वभूमीवर सिरियात संघर्षबंदीचे आवाहन केले असतानाही तुर्कीने हे हल्ले केले.   तुर्की सरकारने सिरियातील अस्साद राजवट तसेच कुर्दवंशियांना सातत्याने विरोध केला असून त्यांच्याविरोधात संघर्ष कायम ठेवण्याची धमकी वारंवार दिली आहे.  या मुद्यावरून तुर्कीचे अमेरिका व रशियाशी सातत्याने खटके उडाल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे.

    तुर्कीचा युरोपीय देशांशी करार झाला आहे, त्यानुसार सिरिया व इतर देशातील निर्वासित तुर्की सामावून घेण्यास तयार आहे, कारण त्यासाठी युरोपीय देशांकडून तुर्कीला मोठे अर्थसहाय्यही मिळत आहे. मात्र सिरियावर अशा परिस्थितीत हल्ले करून तुर्कीने कराराचे उल्लंघन केले आहे.  इतकेच नसून पाकिस्तान प्रमाणेच तुर्कीही कोरोनाबाधित व्यक्तींना ग्रीसमधून युरोपीय देशांमध्ये घुसवत आहे आणि ह्याचा खुलासा सॅटेलाईट फोटोमार्फत ग्रीस सरकारकडून झाला आहे.


    तुर्कीच्या ह्या वागण्यावर संताप व्यक्त करत सुरक्षिततेसाठी ग्रीसच्या सागरी सुरक्षेला अधिक धोका निर्माण होऊ नये म्हणून, लढाऊ विमाने व युद्धनौका ह्यांची मागणी ग्रीसच्या संरक्षण मंत्र्यांनी नाटोकडे केली आहे.  नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) ही जगातील अनेक देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे.  


    अमेरिकेकडून या स्वरूपाचा दर्जा हा एखाद्या मित्रराष्ट्राला दिला जातो.  यासाठी काही निकष त्यांनी ठेवलेले आहेत.  ‘नाटो’चा सदस्य नसला, तरीही ज्या देशाचे अमेरिकेशी घनिष्ट लष्करी वा संरक्षण संबंध आहेत, अमेरिकेच्या लोकशाहीचा प्रसार, दहशतवादाचा सामना करणे या उद्दिष्ष्टांमध्ये जो देश मदत करतो, त्या देशाला हा दर्जा दिला जातो.  अशा प्रकारचा दर्जा दिल्यामुळे या राष्ट्रांबरोबर घनिष्ट लष्करी संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी मिळते.  तसेच अमेरिका त्या राष्ट्राबरोबर मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रातील व्यापार करू शकते. हे वाचून नक्कीच लक्षात येते, ते म्हणजे अमेरिका हा एक महाशक्तीशाली देश आहे. त्यामुळे तुर्कीवर असणारी नाराजी आणि तुर्कीचा ह्या देशांकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याचा सर्वसाधारण अंदाज आपण सर्वसामान्य नागरिक तर नक्कीच बांधू शकतो.


    कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर सिरियात संघर्षबंदीचे आवाहन केले असतानाही तुर्कीने हल्ले केले.  तुर्की सरकारने सिरियातील अस्साद राजवट तसेच कुर्दवंशियांना सातत्याने विरोध केला असून त्यांच्याविरोधात संघर्ष कायम ठेवण्याची धमकी वारंवार दिली आहे.  ह्या मुद्द्यावरून अमेरिका आणि रशिया ह्यांचे तुर्कीशी खटके उडत आहेत. नाटोचा सदस्य असलेला हा शत्रू एकेकाळी रशियाचा मित्र होता मात्र पुन्हा तुर्कीचे रशिया आणि अमेरिकेशी असलेले संबंध बिघडत आहेत. 


    ‘लाखो जणांचा बळी घेणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्था ठप्प करणाऱ्या ह्या कोरोनाव्हायरस. ह्याचा उगम चीनमधील वूहान शहरातून झाल्याचे बोलले जाते.  पण कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे हे सत्य अजून अंधारातच आहे. ह्याविषयी डिसेंबर महिन्यातच चीनकडे या साथीची माहिती होती, पण चीनने जाणीवपूर्वक ही माहिती दडवून ठेवली. 


    2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनला या विषाणूची पूर्ण माहिती होती.  या साथीचे सत्य जगापासून दडपवण्यासाठी चीनने जे काही केले, त्याचा लांबलचक पाढा वाचला जाईल.  30 डिसेंबर रोजी एका वेगळ्याच विषाणूचा रोगी चीनमध्ये सापडला होता. त्यासंदर्भात सर्वप्रथम वुहान मध्ये आढळून आलेल्या न्यूमोनियाविषयी कोणतीही माहिती बाहेरील जगामध्ये उघड करण्यास बंदी आणण्यात आली.  इतकेच नाही तर त्याबद्दल वाच्यता करण्याऱ्यांवर कारवाईचे आदेश निघाले.  खरं तर जाणीवपूर्वक चीन हा न्यूमोनिया रोग आहे असे सांगून दिशाभूल करत होता.  नंतर पुन्हा नावे बदलून दिशाभुल करण्यात आली.


    डॉक्टर ली वेनलियांग (Li Wenliang), वय ३४ वर्षे फक्त. पेशाने नेत्रतज्ज्ञ (ophthalmologist). चीनच्या वूहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये कामाला होते. हे तेच वुहान जिथून हा कोरोना व्हायरस जगभर पसरला. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये तापाने ग्रस्त लोकं यायला सुरुवात झाली. बऱ्याच लोकांमध्ये सारखेच लक्षणं आढळल्याने त्यावर संशोधनाअंतर्गत डॉक्टर ली वेनलियांग ह्यांना हा आजार इतर आजारापेक्षा वेगळा आणि भयंकर आहे ह्याचा पूर्ण अंदाज आला होता.  त्यांनी यासंदर्भात जागृती करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र हुकूमशाही प्रशासनाचा प्रभाव त्यांना आणि कालांतराने जगाला मारक ठरला. खोट्या अफवा आणि शांतता भंग ह्यांचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. इतकेच नाही तर ह्या व्हायरस संदर्भातील त्यांचे सोशल मीडयावरील सगळे ट्विट्स, पोस्ट डिलिट करण्यात आले. पण सोशल मीडियामुळे ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. मात्र दुर्दैवाने डॉक्टर ली ह्यांनाच ह्या विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. 


    डॉक्टर ली यांनी जगाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण मुर्दाड व्यवस्थेनं त्यांचा जीव घेतला आणि आज जग वेठीस धरल गेलंय.  हे कोणामुळे? आणि मुळात ही गोष्ट कशासाठी? सगळ्या गोष्टीच्या खोलीत जेवढं जाऊ तेवढं केंद्रबिंदूला चीनचा विक्षिप्त कहर सापडत आहे. 


    ३० डिसेंबर रोजी पहिला रूग्ण मिळाल्याचे स्पष्ट होऊनसुद्धा त्याविषयी कोणतीही माहिती चीन सरकारतर्फे देण्यात आली नव्हती. पण शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत होती. टीकेचे लक्ष होऊ नये म्हणून वुहान मध्ये मिळालेला व्हायरस हा वटवाघळामुळे होतोय, कारण जिनोम क्रम मिळताजुळता आहे असे सांगण्यात आले.  म्हणजे हा व्हायरस नैसर्गिक आहे, हे चित्र उभं करण्याचा प्रयत्न. 


    पुन्हा एक गोष्ट अधोरेखित होते, की मानवनिर्मित जैविक शस्राचा वापर करून काय उत्पात माजवता येतो.  बॅक टू पॉईंट अगेन.  चीनमध्ये भक्ष्य आणि भक्षक हा जणू फरकच नसावा. कोणताही जीव हे विकृत लोक सहज खातात. नुसतं चीनच्या मार्केटवरील विडिओवर नजर जरी फिरवली तरी माणसाला किळस येईल इतकी राक्षसी वृत्ती.  ह्या मार्केट मधून हा व्हायरस पसरला गेला आणि त्यामुळे इथूनच ती साथ वाढत गेली असा निष्कर्ष चीन सरकारने लोकांपुढे मांडण्यास सुरुवात केली. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जाणीवपूर्वक वुहान बाजारात कधी गेला होता का? हे प्रश्न विचारून त्यांच्यावर बिंबवण्यात आले, पर्यायाने जगाला गुंडाळण्याचा हा कुटील डाव.  त्यानंतर २३ जानेवारी रोजी वुहान शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली.


   संस्थेमध्ये काम करणाऱ्यांची अवस्था त्याहूनही बिकट होती. डॉक्टर ली वेनलियांग ह्यांच्याबाबतीत घडलेली घटना पाहून अनेक जण समोर येण्यास धजावत होते. मात्र जनतेच्या संतप्त भावना, प्रतिक्रिया किती वेळ सरकार दाबून ठेवू शकते.


     ह्या व्हायरसची निर्मिती वुहान संस्थेतच झाली असून, तिथूनच हा पसरला हे स्पष्ट आपल्या खऱ्या नावानिशी शु बो यांनी जाहीर केले. आणि तिथून भरभर गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच दिवसात म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी चिनी लष्कराचे बायोवेपन्स (जैविक शस्त्रात्रे) तज्ञ चेन वा ई यांची संस्थेची सूत्रे हाती घेतली गेली आणि एका आठवड्यात म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी शी जिन पिंग यांनी देशाच्या संरक्षण आराखड्यामध्ये जैविक सुरक्षा अंतर्भूत केल्याचे जाहीर केले.  आता प्रश्न इथे असा आहे की यासाठी प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप का? व कशासाठी घडला?  संकट भीषण होतं म्हणून की लपाछपी म्हणून एकावर एक शंभर खोटं, हा प्रश्न नक्कीच पडतो.


    पहिल्या महायुद्धातही जैविक शस्त्राचा वापर झाला होता जो जर्मन सैन्याने केला होता.  ग्लॅन्डर्स, कॉलरा हे त्यातलेच आहेत. असे बऱ्याच गोष्टी आहेत त्या सर्वच मांडणे शक्य नाही.  (गुगल वर बायोलॉजिकल विपन बद्दल सविस्तर माहिती वाचायला मिळते.)


  'डब्ल्यूएचओ' जागतिक आरोग्य संघटनेने ह्यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. उलट चीनचं पितळ उघडं पडू नये म्हणून चीनच्या प्रयत्नांना लपवाछपवी करत अप्रत्यक्षपणे साथ दिली आहे. त्यामुळे रोखू शकत येऊ शकणाऱ्या ह्या उद्रेकाला ह्या संस्थेने मोकळी वाट करून दिली आहे. 'डब्ल्यूएचओ' चे बेजबाबदारपणे वागणे प्रत्येक देशाला महाग पडत आहे.  मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही अशी सडेतोड भूमिका घेत अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’चे अर्थसहाय्य रोखत आहे, या निधीचा अमेरिका पुढच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने वापर करेल, असे वक्तव्य करून ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ सहित चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. 


   कोरोनाव्हायरसची साथ अमेरिकेत दाखल झाल्यानंतर निकी हॅले, यांनी चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन या देशाला धडा शिकविण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.  चीन आपला प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवत आहे आणि हा प्रभाव वेळीच रोखण्यासाठी अमेरिकी विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासकांना चीनकडून मिळणारे फंडिंग याची माहिती उघड करुन हे फंडिंग थांबविण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने कारवाई करावी’, अशी मागणी हॅले यांनी केली.  अमेरीकेने ग्रीनलँडवर मिळवलेला ताबा हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चीनला थोपवण्यासाठीच आहे.

    
     कोरोनाव्हायरसचे उगमस्थान असलेल्या वुहानमधील लॉकडाउनचे सत्य जगासमोर मांडणाऱ्या चिनी लेखिका ‘फँग फँग’ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांनी 13 फेब्रुवारी रोजी जगाला हादरवून टाकणारे दफणभूमीतील विदारक सत्य मांडले होते. त्यांच्या डॉक्टर मित्राने पुरविलेल्या फोटोमध्ये मृतदेह आणि मोबाईल फोन ह्यांचा ढीग पडलेला होता.  कोरोना व्हायरस हा मानवी संसर्गाने होत आहे, याबाबत वुहान च्या डॉक्टरांनी आपल्या वरिष्ठांना कळवून सुद्धा कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही आणि जनतेला सावधही केले गेले नाही, हे त्यांच्या डॉक्टर मित्राने त्यांना कळवलं होते, अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते.  मात्र आता फँग ह्यांचे सोशल मिडयावरील अकाऊंटही बंद केले गेले आहे. तसेच त्यांच्या पोस्टही डिलिट केली गेल्याची माहिती त्यांनी स्वतः स्थानिक माध्यमांना दिली आहे. 


  कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या आड हॉंगकॉंगमधील चीनधार्जिण्या प्रशासनाने १४ लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांना अटक करुन चीन येथील लोकशाही संपविण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका या देशांकडून तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांकडून केली जात आहे.  जितका पाढा वाचू तितका कमीच आहे.


    एवढे कारस्थान करूनही कोरोनाग्रस्त देशाला टेस्टिंग किट्स पुरवण्याची जबाबदारी चीनने घेतली खरी.  मात्र पुरविलेले टेस्टिंग किट्स हे सरळ सरळ सदोष होते. भारतालाही चीनने असेच सदोष किट्स पुरवले त्याचे परिणाम आता चीनला भोगावे तर लागणारच. 


    गेल्याच आठवड्यात भारताने एफडीआय (थेट परकीय गुंतवणूक) नियमात बदल केला आहे.   इतकेच नाही तर चिनी कंपनीची ऑर्डर भारताने रद्द करत चीनला धक्का दिला आहे.  त्यामुळे, टेस्टिंग किट्स हा भारत आणि चीनमध्ये वादाचा नवा मुद्दा ठरू शकतो, अशी शक्यता विश्लेषक व्यक्त करीत आहेत. 

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी अधिक वाचण्यासाठी:
http://newscast-pratyaksha.com/


     ह्या संदर्भात अधिक सविस्तर वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक वाचू शकता.  तिसऱ्या महायुद्धाविषयी लिहिताना डॉ. अनिरुद्ध म्हणतात, “दोन राष्ट्रांमधील लढाई त्या त्या राष्ट्रांमधील प्रत्येक घराच्या अंगणापर्यंत जाऊन पोहोचते व त्यामुळे फक्त दोन राष्ट्रांची सैन्ये लढत नाहीत तर दोन्ही राष्ट्रांमधील प्रत्येक नागरीक या लढाईत सहभागी असतोच.  त्याचप्रमाणे विषारी वायू, जैविक बॉंब (रोगजंतूंचा प्रसार), व प्रचंड कृत्रिम पाऊस पाडून दलदल व सर्वत्र चिखल निर्माण करण्याची क्षमता (अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जे केले) इत्यादीमुळे संपूर्ण राष्ट्राच्या रोजच्या व्यवहरात थोडीही सुरक्षितता उरत नाही.”


      सध्या चाललेले घटनाक्रम बघता प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवं.  कारण अजूनही लोकांना तिसरे महायुद्ध म्हणजे नेमकं काय? आणि त्याने फार आधीच अक्राळ विक्राळ जबडा उघडला आहे, ह्याची जाणीवच नाही.  आपण जे बघतोय, पाहतोय, आणि ऐकतोय त्याही पलीकडे खूप साऱ्या घडामोडी घडत आहेत.  ह्या घडामोडी कोणत्या पातळीवर आहेत किंवा असतील ह्याचा उलगडा हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला झाल्याशिवाय राहणार नाही.


    'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता.  सध्या हे पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे. तिसऱ्या महायुद्धासंदर्भात वाचकांना नक्कीच ह्यातून अनेक संदर्भ लागणार आहेत आणि माहीत नसलेल्या ह्या घडामोडींचा उलगडा होण्यास मदतच होणार.

तिसरे महायुद्ध 

https://ebooks.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=TWWMAR


    शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे समीकरण प्रत्येकाला माहीत आहे.  डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांचे तिसरे महायुद्ध हे 2006 साली प्रकाशित झालेले पुस्तक आजच्या काळाची आणि पुढे घडणाऱ्या घटनांची अगदी अचूक वेध घेणाऱ्या गोष्टींची प्रचिती देणारे आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच डॉ. अनिरुद्ध म्हणतात, “पुढील काळात आजचे समीकरण उद्या असेलच असे नाही, तर अगदी सकाळी सातचे समीकरण सात वाजून पाच मिनीटांनी मूळ हेतू साध्य होताच पूर्णपणे भिरकावून दिलेले आढळणार आहे.” ह्या ओळींचे गांभीर्य आजची सद्य स्थिती पाहताच लक्षात येते.  2006 साली केलेले विश्लेषण किती अचूक वेध घेणारे आहे.

     ह्या पुस्तकाचे लेखक डॉ. अनिरुद्ध स्पष्टपणे मांडतात की, सर्व जगालाही (विशेषतः अमेरिकेला) त्रासदायक ठरू शकणारे एक भयप्रद 'त्रिकूट’ जन्माला आलेले आहे.  चीन, पाकिस्तान व नॉर्थ कोरिया.  हे अभद्र त्रिकूट, त्याला चौथा भागीदार मिळताच संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटणार आहे.  हा चौथा भागीदार इराण, जर्मनी किंवा सिरीया असू शकतो”.

ह्याविषयी अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.



       येणाऱ्या काळात बरीच उलथापालथ होणार आहे, हे एकंदरीत लक्षात येतंय.  तिसरे महायुद्ध हे फक्त देशा देशात चाललेले नाही हे सद्य परिस्थिती नीट जाणून घेतल्यास लक्षात येते.  देशातील लॉकडाऊनमुळे जगभरातील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार ह्या साथीने हिरावून घेतला आहे.  जगभरात ह्या रोगाने लाखोंनी मृत्युमुखी पडलेले माणसे आहेत.  आणि लागण झालेले त्याहून अधिकपटीने आहेत.  पुढच्या काळाविषयी सगळेच अनभिज्ञ आहेत.  असे असले तरी, ना धीर सोडून चालणार ना हतबल होऊन चालणार.  कारण हे युद्ध आताशी सुरू झालेले आहे आणि ते देशांच्या सीमेवरून थेट घरात घुसू पाहत आहे.   आपल्याला जे दिसतंय ते खुप छोटं स्वरूप आहे.  वर उल्लेखलेल्या घटना हे तिसऱ्या महायुद्धाची फक्त सुरुवात आहे.  जगात अनेक ठिकाणी अनेक घटना खूप वेगाने घडत आहे.  
सध्या एकंच करायचं आहे, ते म्हणजे लक्ष्मण रेषा.
Stay Home, Stay Safe.

कारण... Third World War has been started...
  - अनुप्रिया सावंत.