Tuesday 11 August 2020

कविता #15 - शब्दांची दुनिया!!!



     मनाचे गणित खुपच अजब असते, नाही का?  मनातल्या मनात आपण कितीतरी वेळा संवाद साधतो, अनेक गोष्टींबद्दल विचार करत राहतो.  त्यांच्याशी बोलताना, हसताना वेळप्रसंगी भांडतोही.  इतकेच नाही तर अप्रत्यक्षपणे आपल्या मनाशी आपणच अगदी अगणित हितगुज करत राहतो.  बऱ्याचदा त्यांना खुप काही सांगायचे असते, पण ओठापर्यंत येऊन मग तिथेच थबकतात.  पुन्हा हृदयाला जाऊन भिडतात आणि मग हृदयातून मनाशी थेट संवाद साधत, नकळत आणि तितक्याच अलगदपणे कागदावर उतरतात.  
     
     हो, आपल्या मनाच्या कुशीत बागडणारी, खेळणारी, दंगा करणारी, आपल्याशी सतत गप्पा मार अगदी मुक्तविहार करणारी आपलीच 'शब्दांची दुनिया'.


शब्द हे असे मनातच लोळणारे,
मनालाच गादी समजून त्यातच मस्त लोळणारे.


शब्दांच्या दाटीतून हळूच ओठावर उतरून,
काठावरच थांबणारे,
शब्दांचे पाखरू बनून मनातच विहार करणारे.


शब्दांच्या  गर्दीत शब्दाला शोधणारे,
शब्दांच्या खेळात शब्दांनाच समजावणारे.


हृदयाच्या हुंदक्यात नयनांतच तरंगणारे,
शब्दांच्या राज्यात शब्दालाच फसवणारे.


ओठांच्या काठ्यावर आणि नयनांच्या तीरेवर पल्ल्याआड होणारे,
पल्ल्याआड होता होता हळूची, लेखणीच्या कुशीत जन्मणारे.

                          - अनुप्रिया सावंत.

1 comment:

  1. Representative for everyone's feelings.. Especially for the ladies.
    Loved each word and the world they have opened up...

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.