Thursday 8 July 2021

निबंधलेखन - निबंध कसा लिहावा?


     निबंध लेखन हा शब्द आपल्याला नवखा नाही.  कोणतीही भाषा म्हटली की त्यात निबंध लिहिणे ही गोष्ट आलीच.

 

निबंध = (नि + बंध) - नीट बांधणी करणे.

थोडक्यात, गुंफणे, जुळवणे होय.

 

     फुलांचा हार बनवताना जसे चांगले फुले शोधून मगच दोऱ्यांत गुंफले जातात.  त्याचप्रमाणे शब्दांची रचना, त्यांची बांधणी करताना आपल्याला असे शब्द वेचावे लागतात.

 

     म्हणजेच काय?  अक्षरांची, शब्दांची आणि पर्यायाने वाक्यांची जोडणी, मांडणी ही जितकी उठावदार, रुबाबदार आणि परिपूर्ण तितका तो निबंध उत्तम.  वाक्यांची रचना करताना विरामचिन्हांना मोलाचे स्थान आहे.  कारण वाक्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी 'विरामचिन्हे' महत्वाची भूमिका बजावत असतात.


     निबंधलेखनात आत्मविष्काराला मोठा वाव असतो.  तुमच्या स्वतःची स्पष्ट मते, भावना, प्रश्न, समस्येचे आकलन, गांभीर्यता, त्याचे स्वरूप आपण आपल्या शब्दांत मांडू शकतो.  बरेच अनुभव आपण प्रत्यक्ष घेत असतो, अनुभवत असतो किंवा आपल्या वाचनातून आपण तो मिळवत जातो.  ह्याचमुळे आपल्या विचारांना, कल्पनांना शब्दांचे खाद्य मिळत जाते.  हा खजिनाच आपल्याला मिळत असतो.  आणि त्याचमुळे अनेक पैलूंचे दर्शन आपल्याला आत्माविष्कारामुळे घडविता येते.

 

निबंधात प्रामुख्याने दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.

१) निबंधाचा आशय म्हणजे मुद्दे

२) आशयाची म्हणजेच मुद्द्यांची मांडणी.

 

     ह्या दोन गोष्टी आपल्या निबंधाची उंची ठरवत असतो.  आपली विचार शक्ती आणि लेखन शैली ह्यातून व्यक्त होत जाते.  तरीही निबंध म्हटलं तर काही गोष्टींची मर्यादा ही आहेच.  ती म्हणजे शब्दमर्यादा.  निबंधाची बांधणी ही अतिशय जास्त किंवा अगदीच कमी अशी नसावी.  पण त्यात मोजक्याच शब्दांत सलगता(विषयाला/मुद्द्याला अनुसरून केलेले लिखाण) नक्कीच जाणवायला हवी तरच तो प्रभावी ठरतो आणि ह्यासाठी सराव हा महत्वाचा आहे.

 

निबंध कसा लिहावा?  (How to write an Essay?)

(सर्वात महत्वाचे - कोणताही निबंध किंवा प्रश्न सुरु करताना दोन्ही बाजूला समास(Border) आखणे.  म्हणजे दोन बोटांच्या जागे एवढी दोन्हीकडून समान उभी रेषा आखून घेणे.)


१) निबंधाचा विषय (Topic) - प्रथम दिलेल्या निबंधाचा विषय आपल्याला नीट समजून घ्यायला हवा.  सुरुवात करताना निबंधाचा निवडलेला विषय ठळक अक्षरात लिहावा.


२) प्रस्तावना (Introduction) - ज्या विषयावर निबंध लिहायचा आहे त्यासंदर्भातील थोडी ओळख म्हणजे ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो ती करून द्यावी.  त्यात तुम्ही कल्पकतेची जोड देऊ शकता किंवा वास्तविकतेला धरून सुरुवात करू शकता.  'प्रस्तावना' निबंधाचा पहिला घटक आहे.


३) मुद्दे (Points) - ज्या विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे त्यावर आधारित मुद्द्यांची मांडणी (to lay out in order) करणे.


४) मुद्द्यांचा क्रम (Sequence of points) - आपल्याला मुद्द्यांची मांडणी तुम्ही पेपरवर लिहून काढू शकता किंवा मनात त्यांचा क्रम बांधु शकता.


५) विश्लेषण (Analysis) - क्रमानुसार मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण (सविस्तर स्वरूप) करावे.


६) भाषा (Language/Spellings) - आपल्या निबंधाची भाषा शुद्ध व अचूक असावी.(खाडाखोड, चुका टाळाव्यात.)


७) काव्य, म्हणी, सुविचार (Good Thoughts/Poems) - निबंध लिहिताना तो अधिक आकर्षित व वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी त्यात आवर्जून एखादा सुविचार किंवा कवितेच्या ओळी किंवा म्हणी किंवा महान व्यक्तींचे विचार, वाक्ये वापरायला हरकत नाही.  (स्वशब्दांतील कविता सुद्धा उत्तम.  तसेच सुरुवात, मध्य किंवा शेवट ह्याठिकाणी तुम्ही ह्याचा वापर करू शकता.)


८) परिच्छेद (Paragraph) - सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परिच्छेद.  बऱ्याचदा लिहिताना आपल्याला ह्या गोष्टीचा विसर पडतो की, कोठे परिच्छेद करावे?  

१) तुम्ही निबंधात आवश्यकतेनुसार परिच्छेद करावा.  

२) शक्यतो ५ ते ६ वाक्यानंतर परिच्छेद यायला हवा. (परिच्छेद करताना समास सोडावा.  इथे समास सोडावा म्हणजे विशिष्ट शब्दांची जागा सोडून मग पुढे लिहावे.  (आपल्या हाताच्या दोन बोटांइतकी जागा सोडावी.)


९) शेवट (End) - निबंधाच्या विषयाची शेवट करताना ती नेहमीच सकारात्मक असावी ह्याकडे विशेष काळजी घ्यावी.  निबंधाचा शेवट हा विषयाला अनुसरून असावा.  मूळ मुद्दा धरून आपल्याला बोधात्मक संदेश देता आला, तर निबंध परिपूर्ण होण्यास मदत होते.  शेवट करताना आपण कवितेच्या ओळी, संतांचे काव्य किंवा विषयाला अनुरूप असे वाक्ये जोडून शेवट सकारात्मक करता येतो.

 

                                         अनुप्रिया सावंत.

1 comment:

  1. Thank you so much mam for this important information , mala hyachi exam madhye khup madat milali

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.