Monday 7 June 2021

कविता #16 - निसर्ग

         निसर्ग ह्याचा नुसता उल्लेख करताना सुद्धा किती गोष्टी आपल्यासमोर झरझर उभ्या राहतात.  त्याचे रंग, रूप, सौन्दर्य, आल्हादायकता, त्याचे हसणे, रुसणे, बागडणे, अनेकप्रकारे जगाशी असणारे अतूट नाते ह्यातून व्यक्त होत जाते.  ह्याच निसर्गासोबत आपण मनसोक्त गप्पाही मारतो.  मनातला हिंदोळ्यावर मुक्त संचार करतो, तो ह्याच निसर्गाच्या साक्षीने.  

       प्रत्येकाला त्याचे दिसणारे अलौकिक रूप न्यारेच.  ह्याचाच छत्राखाली सारे जीव विसावत राहतात.  हा आपल्याला हवा तसा सादही घालत असतो.  त्यालाही आपली सोबत आवडत असतेच.  व्यक्त होताना तो त्याच्या सवंगड्यांना घेऊन आपल्याशी गुजगोष्टी करत असतो, त्याच्या भावना आपल्याला सांगत राहतो.  हा खरंच एक साजिरा कलावंत आहे.  हो ना!

Published in #Pratyaksha Newspaper

सांज वेळेला निसर्ग रंगारी
नव्याने निसर्ग बहरत खुणवी
उधळत येतो त्याचे सप्तरंग
काय किमया त्याची वर्णावी!

सखे, काय सांगू या मनी
हाच कलावंत मनाला खुणवी
मनाच्या हिंदोळ्यावर मुक्त झुलवुनी
वाऱ्याच्या वेगानं बेभान बागडवी

समुद्राच्या लाटेवर सैरावैरा आदळत
म्हणे जाऊनि वाऱ्याला भिडतो
इथेच नित्य नादनिर्मिती घडवत
कलाची कलाकारी इथेच जडवितो

उधळतो चहूकडे सप्तरंग रंगारी 
जनी निरोप देता सायंकाळी
किमयागार नित्य हाच कलाकार
निरंतर ह्याची जादूच निराळी!

               - अनुप्रिया सावंत.

1 comment:

Thank You For Sharing Your Valuable Feedback.