Wednesday 2 June 2021

लेक

 
  

     बीज अंकुरत पालवी फुटायला लागली की हळू हळू मोठे होत जाणारे रोपटे झाडांचा आकार घेत वृक्षात रूपांतरित होते.  आपणही वयाने त्यांच्यासोबत मोठे होत असतो ही जाणीव मनाला सुखावत जाते. आणि जसे हे निसर्गाचे नाते घट्ट होत जाते तसे निसर्ग आणि अनुभव ह्यांचे विश्व एकमेकांत समरस होत जाते.  माझ्या आईला झाडांची फारच आवड.  नेहमी छोट्या कुंडीत झाडे लावणे, जोपासणे, त्यांना पाणी घालणे, त्यांना टवटवीतपणा येण्यासाठी पाण्याचे अधूनमधून सिंचन करणे ह्या छंदात तिला रमताना पाहून वेळ कसा जायचा कळायचेच नाही.  तिला मी त्यांच्यासोबत बोलताना पाहिले, त्यांच्या भावना जाणून घेताना तिच्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव मी जवळून पाहिले आहे.  जणू आईच ती त्या रोपट्यांची!  


     आपल्या बाळाची काळजी आई जशी घेते तशीच काळजी ती झाडांची घ्यायची.  आमच्या बाल्कनीत अनेक झाडे लावली होती.  ती झाडे त्यांच्या आकार विस्तारते झाले की त्यांना अजून पोषक वातावरण मिळावं म्हणून तिने आमच्या बगीचेत त्यांचे भरण पोषण केले.  शाळेतून येताना जाताना त्यांना बघताना वेगळाच आल्हाद जाणवायचा. आम्ही दोघं भावंडं नेहेमीच एकमेकांना टाळी देत म्हणायचो, ही तर आपल्या आईची बाळं आहेत, म्हणजे आपले भाऊ बहीण झाले.  


     शाळेत शिक्षिका असलेली माझी आई मृदू, शांत आणि सतत काही न काही नवीन करण्यात नेहमीच गुंतलेली असायची.  शाळा, घर, मुले आणि तिचं फुलत असलेलं नंदनवन हेच तिचं जीवन.  आणि ते जीवन जगताना त्यात नव्याने सातत्यपूर्ण आनंद ती छोट्या छोट्या गोष्टीतून घ्यायची आणि त्याची सवय आम्हालाही तिने करून दिली.  कुठलंही काम असो तिच्यातील सळसळता उत्साह नेहमीच कामासाठी एनर्जी देत असायचा.  


     आम्ही दोघेही बहीण भाऊ भरपूर मस्तीखोर.  काही न काही सतत एकमेकांच्या कुरघोडी काढत रुसवा फुगवा करत राहायचो.  तरीही न थकता, न दमता तिच्या कलेने आम्हाला छान समजावून सांगायची.  ती शाळेतून घरी यायची तेव्हा आम्हाला खिडकीत बसून वाट पहायला खूप धम्माल यायची.  कारण येताना आम्हाला भरपूर खाऊ  आणायची ती बाजारातून.  अर्थात त्यात फळांचे प्रमाण अधिक असायचे.  जेवणात पालेभाजी असायलाच हवी हा तिचा आग्रह असायचा.  जशी तिला आमच्या आहाराची काळजी असायची तशीच ती तिच्या बागेची तिथल्या प्रत्येक झाडांची काळजी तेवढ्याच तत्परतेने घ्यायची.  


     शाळेतल्या अनेक गरजू मुलांच्या पुस्तकांची शाळेच्या फीची व्यवस्था करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना शिकण्यास प्रोत्साहित करत असायची.  तिचा अध्यापनाचा दर्जा पाहून सरकारकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या माझ्या आईचा आम्हाला अभिमान असला तरी तिने ह्या गोष्टीने हुरळून न जाता सातत्यपूर्ण सकारात्मक कार्य करण्याची जिद्द आमच्यात रुजवली.


     आईने तिच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या.  आमचे शाळा, कॉलेज होऊन दोघेही नोकरीवर रुजू झालो.  बघता बघता संसारही सुरू झाला.  आमच्या बागेतील झाडांना आता फळे फुले बहरत होते आणि त्याचा आनंद आजीच्या मांडीवर बसून त्यांचे नातवंड घेत होते.  अजूनही आई जेव्हा जेव्हा बाहेर कामानिमित्त जाते तेव्हा तेव्हा आम्ही त्याच ओढीने ती घेऊन येणाऱ्या खाऊचे वाट पाहत असतो आणि आता तर तिचे नातवंडेही.


     माझ्या आईंनी मला संसारात अडकून राहू नये, म्हणून सतत माझ्या कलेला पाठिंबा देत मलाही शिक्षक ते प्राध्यापकापर्यंतचा प्रवास घडवून आणला होता.  माझ्या दोन्ही अहो आई आणि ए आईने माझ्या प्रपंचाचा भार आपापल्यापरीने हलका केला होता, असं मी नेहमीच माझ्या सख्यांना सांगते.  खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये खूप विलक्षण शक्ती असते, त्याची जाणीव व्हायला हवी.  माझ्या दोन्ही माऊली माझ्यासाठी खूपच विलक्षणच आहेत.


     सकाळी लेकीचा फोन येऊन गेला होता, घरी जाताना भेटायला येणार आहे सांगितलं.  आणि तसंही अजून बऱ्याच गप्पा प्रत्यक्ष भेटून करायच्या आहेत.  तिच्या येण्याची वेळ होत आलेली, थोडा चहा बनवून घेऊ म्हणजे आल्यावर एकत्र बसून चहा पिताना गप्पांचा मनमुराद आनंद घेता येईल म्हणून चहा ठेवायला आत आले.  चहाचे वाफाळत्या धुक्यांचे आवरण मला पुन्हा माझ्या विचारांच्या दुनियेत घेऊन आले.  


     आज घरात बऱ्याच दिवसांनी निवांतपणा मिळाला.  गौरीशा, गणेश दोन्ही मुलं आता आपापल्या संसाराला लागली.  तरीही गौरीशा मात्र अजूनही तिच्या दोन्ही घरांना घट्ट जोडून आहे.  गौरीशा माझी मोठी मुलगी.  मुली पटापट मोठ्या होतात असं म्हणतात.  पण माझं तर ठाम मत आहे, मुली त्याहीपेक्षा लवकर समजुतदार आणि कर्तव्यदक्ष बनतात.  स्वयंपाकाची आवड नसलेली गौरी किचन किंग म्हणून कधी ताबा घेता झाली कळलंच नाही.  अगदी लहान असतानाच तिने स्वतःची आवड कलामध्ये जपून स्वतःचा घरगुती क्लास मोठ्या स्वतंत्र कोचिंग क्लासमध्ये जिद्दीने रूपांतरीत केले.   ह्या गोष्टी करताना तिचे घराकडे मात्र कधीच दुर्लक्ष झाले नाही.  माझ्या आणि लेकीच्या नात्याची जागा आमच्या मैत्रीने केव्हाच घेतली.


     माझं ऑफिस ते घर हा वेळ नऊ तासाचा असायचा.  आईप्रमाणे मी देखील शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आणि कालांतराने प्राध्यापक म्हणून नियुक्तही झाले.  घरातील कामे, शाळेतील मुलांचे पेपर, रिझल्टस ह्यात आमच्या आईंचा नेहमीच हातभार असे.  त्यामुळे, मुलांना माझ्यापेक्षाही जास्त लाड त्यांच्या आजीच्या चमचमीत पदार्थातून मिळून पुरवले जात.  नोकरी सांभाळून कुटुंब सांभाळणे हे एक आव्हानच मानते.  मला हे शक्य झाले ते केवळ  घर, नोकरी आणि कुटुंब ह्यांना जोडणारे मुख्य दुवे असणारे माझे 'अहो आई' आणि 'ए आई' ह्या दोघी आणि त्यांचे असलेले खंबीर पाठबळ आणि आधार.  मुलं ह्यांच्या संस्कारक्षम बीजात संस्कारीत होत होती.  घरी आल्यावर त्यांच्या आजीच्या गोष्टी ऐकण्याची हौस आमच्या दोघांचीही मनसोक्त पूर्ण व्हायची.


     घरातल्या भिंतींना बहर फुलत राहतो, जेव्हा घरात स्त्री असते.  हो, खरंच ही गोष्ट मला मनापासून मोहित करते.  मला सहज आठवलं म्हणून हा विषय.  बऱ्याच वर्षापूर्वी एका शाळेत डेमोसाठी मला बोलावण्यात आलेले आणि महत्वाचं म्हणजे त्यांची काही अट नव्हती की, पाठच घ्या किंवा कविताच घ्या किंवा व्याकरणच सादर करा.  पण मी मात्र तिन्ही गोष्टी व्यवस्थित तयारी करून गेलेले.  रस्त्यातून जाताना अगदी सहजच विचार आला आपल्याला दहा मिनिटांत त्यांनी डेमो द्यायला सांगितला आहे, तर काय बरं द्यावा?  पाठ घ्यावा? कविता घ्यावी? की व्याकरण मस्त घेऊ?  हे की ते करत मी शाळेचा गेट गाठला आणि आता मात्र मला विचार करायला काहीही फुरसत नव्हती.  


     पूर्ण वर्ग भरत आलेला जाणवला, ते विद्यार्थ्यांनी भरलेले नव्हे तर भावी शिक्षकांनी.  एक एक करत डेमोचे टप्पे पार पडत होते.  आता माझ्या आधी अजून एक शिक्षिका होती, तिच्या नंतर माझा डेमो ठरलेला, मात्र अचानक त्यांनी मला आधी डेमोला बोलावलं.  झालं.... आता मात्र माझं एक पक्क होतं की मी कविता घेते.  डेमोला विद्यार्थी नसून शिक्षक आणि शाळेचे मुख्य कॉर्डिनेटर बसले होते.  क्षणभर थांबले आणि मग जी गाडी माझी सुरू केली, ते अगदी ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेगवान झाली.  माझ्या कवितेचे नाव होते 'लेक'.


     गाडी गिअर मध्ये व्यवस्थित आल्यानंतर काय उदाहरण द्यावं? हा प्रश्नच मला पडला नाही.  त्यांच्याच नजरेतून विविध अनुभव विश्व मांडताना, मला उदाहरणे शोधावी लागलीच नाही.  ती अलगद उलगडली जात होती.  कारण आपला विषयच हार्ड.  त्यात मी एवढी समरस झाली, की मला बराच वेळ विसर पडला की, आपल्या समोर विद्यार्थी नसून अध्यापक आहेत, जे अनेक वर्षांपासून अनुभवी शिक्षक म्हणून वावरत आहे.  


     थोडक्यात, आपली कला आपल्याला सादर करायची असेल, तर त्या कलेला कोणतेही निमित्त अगदी चपखल बसते, हे माझ्या आईचे तत्वज्ञान.  विषयाचे विषयांतर झाले तरी, जर विषयाला प्रवाह योग्य असेल, तर आनंद घ्यायला व द्यायला आणि रसग्रहणाची निर्मिती करायला तुम्हाला आम्हाला रसिक हे व्यासपीठ आपला कणाच असतो.  


     बॅक टू टॉपिक.  मुलगी घरात असेल तर आईवडिलांना नुसती घरकामात मदत होते असे नाही, तर तिच्यात सतत नावीन्य भरलेले असते.  माझ्या मुलीला काही न काही सतत नवीन प्रयोग करण्यात जो आनंद मिळतो, त्यापेक्षा तो आनंद पालक म्हणून पाहताना गुणाकाराच्या पटात भर पाडत राहतो.  भाऊ-भाऊ मिळून जेवढे पराक्रमी नसतील, तेवढे अतुल्य पराक्रम हे दोघे भाऊ बहीण सतत एकमेकांच्या खोड्या काढून गाजवतात.  एखादा जरी रुसला तरी, त्यांच्यात असलेला आनंद किंवा नाराजी त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  तरीही, ह्या सगळ्यात केंद्रीत असते ती 'लेक'.  


     घरात आई आजारी असेल तर ही लेक मात्र आईच्या भूमिकेत यायला सांगावं लागत नाही.  वडिलांची औषधं, भावाचा डब्बा, स्वयंपाक सगळं कसे अगदी माझं म्हणून करते.  हे माझंपण मला त्या प्रत्येक लेकीत दिसते.  म्हणूनच कदाचीत, शाळेतला अध्यापनाचा तो अनुभव ह्या लेकीने आधीच अध्ययन करून घेतला असावा.


     प्रवासात ये-जा करताना एक वाक्य मला नेहमीच दिसत असते, 'नसीब वालोंके घर लडकी होती है|'  मला हे वाक्य बघून स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो.  आणि हीच ती 'लेक' स्त्री जीवनातील तिच्या प्रत्येक क्षणी अगदी तत्पर आणि कर्त्यव्यनिष्ठ असते.  मग तीची भूमिका मुलगी म्हणून असो की सून म्हणून.  कारण मायेच्या स्पर्शात लेकीला जबाबदारीचे ओझे कधीच होत नसते.


                                        - अनुप्रिया सावंत.

2 comments:

Thank You For Sharing Your Valuable Feedback.