Friday 20 March 2020

डब्ल्यूएफएच_लॉकडाउन - कंप्युटर्जी लॉक किये जाय?


  प्रत्येकजण नेहमीच विचार करतो कामाच्या धावपळीत स्वतःला वेळ मिळत नाही त्यामुळे घराकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही. फिरणं नाही, घरात वेळ देता येणं नाही नि काही नाही. सुट्टी लागली की पळायचच बाबा! सुट्टी लागल्यावर सगळी काम आवरून मामाच्या गावाला मीही जाणार इथपर्यंत झालेला प्लॅन माझा, मात्र वर्क फ्रॉम होमच्या चार भिंतीत कधी फ्रेम झाला हे कळलंच नाही.

     सुट्टीच्या आधीच मुलांना सुट्टी! खरं तर उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थक स्वरूपात प्रकट होईल, ह्याची कल्पना माझ्या मी मध्ये आ वासून उभी राहिलीही आणि मला माझ्या वर्तमानात आणून प्रश्नाच्या स्वरूपात कंबरडे मोडल्यावाणीच गत करून गेली. गंम्मत तर करत नाही ना कोणी ह्या आविर्भावातुन बाहेर येते ना येते तोच एकामागुन एक गोष्टी कानावर येऊ लागल्या. परिक्षेपासून सगळंच कसं लॉक झाल्यासारखे डाउन झाले. आणि बघता बघता 'कंप्युटर्जी लॉक किये जाय' सारखे सगळेच घरात स्टे ऍट होम झाले. 

   आता खरी धम्माल घरातून घराकडे आणि पुन्हा घरातच ह्या सर्कशीतील फिलिंग आकाशपाळणावाणी घिरट्या घेती झाली. खरं तर कुठलंही अतिशयोक्ती नसून विविध अलंकारांनी त्याच्या उपमाच्या छायेत वसलेले माझे हे घरकुल आज मला वास्तवाची एकापाठोपाठ फिल्मी रिव्ह्यू देते झाले. हो हो म्हणता पूर्ण शहरच वर्क फ्रॉम होमच्या कचाट्यात आले आणि सुरू झाले नवे पर्व अगदी बोंबलत सर्व.

     घराच्या सवयी नसलेल्या ह्या भिंतीला माणसांची चिवचिवाट उभारी देताना मला जाणवलं खरं. पण सवय नसलेल्या ह्या वातावरणाला सकाळी उठल्यापासून वेळेचं जुळवाजुळवीची गणितं काही केल्या सोडवता येईना. बाजारात तर जत्राच होती जिथे स्पष्टपणे गर्दी टाळा सांगितले असताना सहकुटुंबाला भाजी पाला घेताना मात्र त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह जाणवला. मलाच चुकल्यासारखे वाटलं, आपणही तर आलोच की बाजारात, मग नक्की लॉक डाउन म्हणजे असते तरी काय? बाजार आवरून घरी येते न येते तोच उंबरठा उलडल्यानंतरचा भयंकर पछाताप नवरा मुलांनी माझ्या चेहऱ्यावर येईल ह्याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसली. 

   पसारा आवरताना माझ्या नाकी नऊ येऊन दहाव्याला तोल जातोय तोच साहेबांचा वर्क फ्रॉम होमचा अलर्ट वाजला आणि धावत पळत अग्निदिव्य पार केल्याच्या आविर्भावात नवऱ्याने त्याच्या संगणकावर लॉगिन केले आणि गड काबीज झाल्याच्या आनंदात मुलं टाळ्या वाजवून सेलिब्रेशन करायला लागली. पण महत्वाचं म्हणजे सध्याची गरज आणि 'चिल, इट्स न्यु फॅमिली टाईम' म्हणून स्वतःला समजवण्याखेरीज दुसरा काहीच पर्याय मला तरी दिसत न्हवता.

     ऑफिस कम होम बॅलन्स सांभाळताना 24 बाय 7 चे समीकरण काही केल्या वर्क होत न्हवते. मुलांसोबत खेळताना त्यांच्या नवीन नवीन आईडीयाज थांबतच न्हवते आणि नवऱ्याचे कोड स्क्रिनिंग काही केल्या बॉस आवरेते घेईनासे होते. टीव्ही वर एकच बाई दोन हाताने दहा काम करणारी दाखवताना तिच्या चेहऱ्यावर दाखवणारे गोड हास्य मला खऱ्या अर्थाने आज लाजवते झाले. रील आणि रिअल ह्याच्यात आपणच बऱ्याच वेळा गफलत करतोय ह्याची वास्तविक जाणीव मनाला शांत करत 'नोबडी इज परफेक्ट, बट चेंज इज ओन्ली कॉन्स्टंट' ची खूण पटवून देत होती.

    घडणाऱ्या घडामोडीने आज एक गोष्ट मला मनापासून जाणवली आणि मुख्य म्हणजे पटली. कुटुंबाला वेळ मिळत नाही ही तक्रार आपण प्रत्येक जण करतच असतो, पण वर्क बॅलन्स असेल तर फॅमिली बॅलन्स नक्कीच साधला जातो. आणि येणारी परिस्थिती पाहता जमा खर्चाची आकडेवारी बाउन्स न होता बॅलन्स झाली तर साठवणीची पुंजी नक्कीच सहकार्य करती होईल. 

     'डब्ल्यूएफएच' चा फॉर्म्युला माझ्या मनाच्या इमॅजिकेला अक्षरशः हवेत पेलवत आहे, पण तरीही कॅरी ऑन करायची काहीच हरकत नाही, आणि मुख्य म्हणजे ती काळाचीही गरज आहे.  आफ्टरऑल पळती झाडे पाहायला मज्जा तेव्हाच येईल, जेव्हा लॉक डाउन बंद होऊन वर्क मस्ट गो ऑन होईल.
                              - अनुप्रिया सावंत.