कधी कधी खरंच असं वाटतं की आपण सगळं व्यवस्थित सांभाळतोय, पण आतून मात्र कुठेतरी थकलो आहोत... रोजच्या आयुष्यात बोलताना काही गोष्टी गिळून टाकतो, हसताना काही वेदना लपवतो, आणि पुढे जात राहतो. जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि धावपळ यामध्ये स्वतःशी निवांत बसण्याची सवडच मिळत नाही. मग एखादा शांत क्षण येतो आणि आपण स्वतःलाच विचारतो... मी नेमका कोणासाठी एवढा धावत आहे?
त्या क्षणी जाणवतं की मनात खूप काही साचलेलं आहे. भीती, संभ्रम, न बोललेले प्रश्न… पण त्याच मनात कुठेतरी एक शांत, स्थिर जागाही आहे. तिथे पोहोचलो की कळतं, "आपण पूर्णपणे एकटे नाही आहोत."
काहीतरी अदृश्य आधार सतत सोबत असतो. तो गाजावाजा करत नाही, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत बसत नाही, पण जेव्हा आपण थोडं थांबतो, थोडं मन मोकळं करतो, थोडा विश्वास ठेवतो, तेव्हा त्याची जाणीव होते.
सगळं स्वतःच पेलायची गरज नसते, हे समजणं म्हणजेच कदाचित आतून मजबूत होण्याची सुरुवात असावी.
(सदर कविता 'दैनिक प्रत्यक्ष' मध्ये छापून आलेली आहे.)
तुझे शब्द श्वास व्हावे,
तुझा ध्यास आस ठरावे,
तुझ्यामुळे तल्लीन व्हावे,
मन वारे सावरावे.
अंधार सावल्या झटकुनी,
भीती उडवी वाऱ्यांनी,
अश्रूंना हसू खुलावे,
पावलांना दिशा लाभावे.
गाभाऱ्यात उजेड साठे,
शून्यातही नवे पथ गाठे,
वादळात किनारा मिळे,
हरवुनी स्वतःला सापडे.
हा प्रवास अदृश्यात मिसळे,
शांत सागरात विसावे,
कृपेच्या ओघात वाहावे,
इथेच अंतर्मन उजळावे!
- अनुप्रिया सावंत
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.