Saturday 31 March 2018

कविता #14 - नाउमेद मी कधीच नव्हते...




     प्रत्येक व्यक्तीच्या मनात व्यक्तिपरत्वे अनेक विचारांचे काहूर माजत असते. आपण काय करतोय? काय चालू आहे? एक ना अनेक प्रश्न स्वतःच स्वतःला बऱ्याच वेळा विचारतो. आपल्या जे हवे असते ते मिळतेच असे नाही. आणि जे आपल्याजवळ असते त्यात आपण समाधानी असतोच असे नाही. कारण माणसाला जे हवंय त्यापेक्षा त्याच्याकडे काय नाही आहे, ह्या तुलनेतच तो जास्त गुरफटला जातो. ह्यात आपला आळशीपणा म्हणा किंवा आत्मविश्वासाची कमी म्हणा ह्यामुळे स्वतःला ओळखण्यात आणि त्यातून चांगले शिकण्यात कमी पडतो.

     कुठेतरी मेहनत कमी पडते किंवा काहीतरी अविचारीपणा नडतो. मात्र ह्यामुळे गफलत होते ती आपलीच. नाही का? क्षणात असे वाटते सगळे मार्ग थांबले. क्षणात वाटते आता काहीच नाही उरले. पण, खरच असं असतं का हो? जीवन ही कला तर आहेच पण त्याहूनही सुंदर परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मग असं असताना खरच आपले मार्ग थांबतील का? तर नक्कीच नाही. थांबेल ती 'आशा' कसली? सोडून देईल त्यात 'उमेद' कसली? हिंम्मत हारेल ती 'व्यक्ती' कसली?

        कारण, उमदीपणा व्यक्तीला प्रवाहित करतो ते न थांबण्यासाठीच. नदीच्या प्रवाहासारखा कुठूनही प्रवाहित झाला तरी अथांग समुद्राला मिळण्याकरिता, सागराच्या लाटांसोबत किनारा शोधण्याकरता. स्वतःच्या नावेत स्वतः नावाडी होण्याकरता.

    नाउमेद मी कधीच नव्हते... 'दैनिक प्रत्यक्ष काव्यपीठ' द्वारे माझी ही कविता दिनांक 5 मार्च 2018 ला छापून आलेली आहे. ती मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून पुन्हा सर्वांसमोर सादर करते.


उमदी ही आशा,
ना उमेद मी कधीच नव्हते.
जीवनाची भाषा मी 
जगण्यातून शिकत होते.
हातात असतानाही हाताच्या रेषेत 
वेड्यासारखी शोधत होते.

हृदयात असूनही,
देवळाची पायरी चढत होते.
दगडासमोर डोके फोडून, 
जखमांनी विव्हळत होते.
तरीही उमेदाची आशा,
मनामनात भिनवत होते.
नाउमेद मी कधीच नव्हते.

जगण्यासाठी सतत, 
झोकून प्रयास करत होते.
प्रयास करताना मात्र 
डोळे झाकत शोधत होते.
ठेच लागता पायाला, 
दोष मात्र दगडाला देत होते,

माझी चूक मला कळताच,
स्वतावर फक्त हसत होते.
प्रयत्न अपुरे असताना,
दैवावरच दोष देत होते.

आळशीपणाने भरलेल्या
ह्या माझ्याच मनाला,
पुन्हा नव्याने जागवत आहे.
माझ्या मनाला समजावत, 
पुन्हा पुन्हा शहाणं मी करणार आहे.

कारण अजूनही उमेद आहे, 
नाउमेद मी कधीच नव्हते.

                                                       - अनुप्रिया सावंत.

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.