Thursday 29 March 2018

पाऊल - एक धाडसी निर्णय


    

     गावाकडच्या सवयी आणि शहरकडच्या गोष्टी दोन्ही वेगवेगळ्याच. शहरातल्या वातावरणात लाडाने मोठी झालेली आनंदी लग्न होऊन सासरी जाणार हे तिच्या मित्र मैत्रिणींमध्ये पसरायला वेळ लागला नाही. मनमिळाऊ, अबोल तितकीच हसरी, प्रसन्न आणि वेळेनुसार खंबीर असणारी आनंदी सगळ्यांचीच आवडती. हा हा म्हणता लग्नाचा दिवस उजाडला आणि पोर लग्न करून सासरी आली. शहरातून सासरी आलेल्या आनंदीला सासरी रुळायला फारसा वेळ लागला नाही. दिवस भराभर जात होते. नवरा सासू आणि ती. आनंदीचा संसार फुलत होता. 

     अन्वेष आणि आनंदी शोभून दिसणारे जोडपं. बिल्डरचा व्यवसाय अपार कष्टाने स्वबळावर त्याने चालवला आणि प्रसिद्धीस आणला. बरेच छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेत तो आता नावारूपाला येत होता. अन्वेष दिसण्याऐवढाच बोलायलाही रुबाबदार तितकाच स्वभावाने जिद्दी. नाही ऐकण्याची सवय नसणारा, स्वतःच्या शब्दासाठी वाटेल ते करणारा, असे असले तरी त्याचे घरात बारकाईने लक्ष असायचे. घरी कशाचीही कमी नव्हती. आईला घरात पाळणा हलावा ही एकमेवच आस. वयाने थकलेली आई मनाने मात्र उत्साही आणि तरुण होती. नातवावरचं प्रेम आजी आजोबांना चिरतरुण ठेवण्यास पोषकच असते म्हणा. घरच्या सुनेची त्या मुलीप्रमाणे काळजी घेत.

     अन्वेष नेहमीप्रमाणे आज कामावर जात असताना का कुणास ठाऊक आनंदीचे मन आज त्याला जाऊ द्यायला तयार न्हवते. त्याने तिच्यासोबत दिवसभर रहावं हा तिचा हट्ट त्याला पूर्ण करावा लागला. आज ते दोघे एकमेकांच्या कुशीत बराच वेळ विसावले होते. दिवस बराच टळून गेला हे दोघांना आईने जेवणासाठी हाक मारल्यावर लक्षात आले. अन्वेष जेवल्यानंतर बराच वेळ विचार करत बाहेर बघत होता. तेवढ्यात त्याची तंद्री बाहेरच्या आवाजाने भंग पावली. 3-4 मजूर धापा टाकत अन्वेष च्या वाड्याजवळ थांबले. एव्हाना आनंदी आणि आई दोघीही त्या आवाजाने भांबावून कामे सोडत पळत बाहेर आल्या.

     सायेब आपले चार मजूर बांधकामाच्या ढिगाऱ्यात अडकले व्हते, लय धडपड क्येली समद्यांनी पण नाय जगले. कोंडले साहेब ते आणि हकण्याक बळी गेल्ये. तरी सांगत व्हते ते बुवा... नाय उभी राहणार ही इमारत.. गप्प बसा... अन्वेष च्या संतापी मुद्रेने मजूर जागेवरच खिळले. अन्वेष तातडीने घटनास्थळी दाखल झाला. सर्व प्रकार पाहुन अन्वेषने मजुरांना काम थांबवायला सांगितले. तुच्छित नजरेने बुवा साराच प्रकार पाहत होते.

     इथे आनंदीला काय प्रकार आहे हेच कळेना. अन्वेषचा रुद्र अवतार ती प्रथमच पाहत होती. बघता बघता दिवस निघून गेले. अन्वेष त्याची छोटी मोठी कामे करतच होता मात्र त्या अर्धवट बांधकामविषयीची सल त्याला कायम बोचत होती. प्रथमच त्याने कोणते काम अर्धवट टाकले होते जे त्याच्या सवयीत बसत न्हवते. अश्यातच आनंदीला दिवस गेले. सर्वत्र आनंद आनंद होता. आईंच्या आनंदाला तर उधाण आले होते. काय हव काय नको हे पाहण्यात कोडकौतुकात दिवस मजेत जात होते. कोणाची दृष्ट लागू नये असा संसार फुलत होता.

     आनंदीला मुलगा झाला. अन्वेषचा आनंद गगनात मावेनासा झाला कारण त्यालाही मुलगाच हवा होता त्याचा व्यवसायाला हातभार लागावा म्हणून. मात्र त्याचा आनंद त्याच्यासाठी क्षणभुंगर ठरला. मुलगा सुदृढ होता मात्र त्यात व्यंग होते. आपल्याला असा मुलगा जन्माला आला, ही गोष्ट त्याला सहन झालीच नाही. ताडताड करत तो निघून गेला. इथे आनंदी आणि आई ह्यांना अन्वेषच्या वागण्यामुळे काय बोलावे तेच सुचेना. आनंदीने आपल्या मुलाला जवळ घेतले त्याचा पापा घेतला. आईनेही त्याच मायेने आपल्या नातवाला जवळ घेतले. त्याला घरी घेऊन जायला दोघी निघाल्या. मात्र अन्वेषने तिला मुलाला घेऊन घरी येऊ नकोस ही तंबीच दिली. नाईलाजास्तव ती नि तिचं छकुल बाळ एका छोट्याश्या गावनजीकच्या त्यांच्या घरात रहायला आले. ह्याही परिस्थितीत तिला साथ मिळाली ज्यांनी मुलगी मानलेल्या त्या सासुआईंची.

     ह्या खंबीरतेवर तिने आपल्या मुलाला मोठं करण्याचं धाडस ठेवले. आईपणाचे कर्तव्य ती प्रेमाने, अभिमानाने बजावत होती. मुलाचं व्यंग हे होते की त्याला दोन्ही हाथ न्हवते. मात्र दिसायला जणू छोटा अन्वेषच. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष जात होते. इथे आनंदीचा नवरा अन्वेष दिवसेंदिवस रागाने लालबुंद होत होता. त्याच्या उभ्या आयुष्यात त्याला कसलीच हार मिळाली नव्हती ना कामाची पीछेहाट. त्या बंद पडलेल्या कामामुळेच ही सुरुवात तर नसेल? त्या जागेवर काम करायला घेतलच नसतं तर? माझ्या सारख्या हुशार बिल्डरला अश्या अपयशाची सवयच नाही, ह्या आणि अश्या विचारांनी त्याला पोखरून काढले होते. काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे ह्या जिद्दीने त्याने नाईलाजास्तव बुवाला भेटण्याचे ठरवले.

     बुवांच्या सान्निध्यात जवळ जवळ पूर्ण गावच बुवावार विसंबून. कुठचबी अड-अडचण असो बुवा बगर सुटायचं न्हाय! हा गावकऱ्यांचा विश्वास. अन्वेषही आता बुवांच्या सोबतीने कामे करू लागला. अचानक एके दिवशी तो त्याच्या आनंदीकडे परतला. त्याच्या बाळाला पहायची विनवणी करू लागला. आनंदीला हे अनपेक्षित होतं तरी ती सुखावली होती. आपल्या मुलाला झालेल्या जाणिवेमुळे आईचेही डोळे पाणावले होते. दोनच दिवसांनी गुडीपाडवा होता. आपल्या स्वतःच्या घरात आपल्याला जायचंय मी तुम्हाला न्यायला आलोय हे अन्वेषचं वाक्य आनंदीला अचंबित करणारे होते. कारण ज्या अन्वेषला तिने पाहिले होते तो त्याच्या मुलाचा तोंडही बघायला तयार नव्हता. त्यासाठी त्याने स्वतःच्या आईलाही घराबाहेर काढले होते, तो खरच आपल्याला सांभाळेल का? ह्या आणि अश्या अनेक कुशंका तिच्या मनात येत होत्या. पण शहराकडची विचारधारा असणारी खंबीर आनंदी संसाराला पुन्हा फुलवायला सज्ज होती आणि म्हणूनच तिने सर्व तर्क-कुतर्क बाजूला सारून त्याच्यासह पुन्हा स्वतःच्या हक्काच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.

     आज घरी दिवाळी दसरा साजरा होत होता कारणही तसंच होतं. अन्वेषचं कुटुंब त्याला पुन्हा मिळालं होत. छोटा छकुला जो अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष बाबांसाठी व्याकुळ होता त्यालाही आज त्याचे बाबा मिळाले होते. आईही आपल्या 3 वर्षाच्या नातवाचा आनंद पाहताना हरवून गेल्या होत्या. सार काही एकदम आलबेल चालू होतं.

     अन्वेषने घरी पूजन ठेवले होते. त्यात त्याने गावाकडच्या प्रतिष्ठित लोकांना, काही गावकऱ्यांना आमंत्रित केले होते. सर्वत्र धूप अगरबत्ती मंत्रोच्चार ह्यांचा सुंदर मेळ घरातील उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध करीत होता. छोटा छकुला सर्वांकडून लाड कौतुक करूवून घेत होता. आनंदी आणि आई घरात पाहुण्यांसाठी काय हवं काय नको ते पाहण्यात गुंतल्या होत्या. माणसांची गर्दी कमी होऊ लागली तशी काही मोजकीच मंडळी घरात चर्चा करत बसली होती. आनंदी स्वयंपाक घरात आईसोबत गप्पा मारत होती तर छकुलाही थकल्यामुळे आत झोपला होता.

     काय साहेब आम्ही सांगत व्हतो ना... बुवांनी सांगितलं तस केलं नि तुम्हासनी पुन्हा उभारी आली बघा. होय, खरंय तुम्ही म्हणता ते... अन्वेष त्याच काम कधीच अर्धवट सोडत नाही. ह्या बांधकामाला 3 वर्षाचा मुलाचा बळी मिळणार आणि माझं काम पूर्ण व्हनार. हा हा हा.... दबक्या स्वरातल्या अन्वेषच्या हसण्याला बसलेल्या मंडळींनीही दुजोरा दिला.

     क्षणातच भयंकर किंकाळी बाहेर पडणार तोच आनंदीने आईंच्या तोंडावर हाथ ठेवला. दोघींना थोडावेळ गरगरल्या सारख झालं. घरातल्या भिंती दाबून टाकताहेत हा भास व्हायला लागला. आनंदीही पुरती हादरली होती. पुन्हा स्वतःला सावरतच आईंनी बोलायला सुरुवात केली. व्हत्याचे नव्हतं व्हायला येळ लागणार नाय पोरी... तू निघून जा पोरी... तुझ्या बाळाला घे आणि माहेरी निघून जा.. दोघी हमसून हमसून रडत होत्या. आनंदीला अन्वेषवर ठेवलेल्या विश्वासाचा पश्चाताप करायलाही वेळ नव्हता.

     आणि ती निघाली... खंबीरतेने... पुन्हा कधीही मागे वळून न पाहण्यासाठी... कारण... तिच्या मनाचा बळी त्याने आधीच घेतला होता.

                                                                                                               - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.