Monday, 31 May 2021

मराठी व्याकरण - वाक्य म्हणजे काय?

मराठी व्याकरण - 'वाक्य' / 'Sentence'


      मराठी व्याकरणाची सुरुवात करताना आज आपण प्रथम 'वाक्य' कशी तयार होतात?  ते पाहणार आहोत.  'चिन्ह' म्हणजे काय?  'अक्षर' म्हणजे काय? अक्षरांचे संच, त्यापासून 'शब्दआणि शब्दांचे 'वाक्य', हे सोप्या शब्दांत जाणून घेणार आहोत.



सदर व्याकरण विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी: YOUTUBE LINK


                                                          - अनुप्रिया सावंत.

'Grammar - व्याकरण' सदरा संदर्भात...



नोट्स - व्याकरण / Grammar

     मराठी व्याकरणाचा हा सदर सुरु करताना मला अतिशय आनंद होत आहे.  शिक्षक म्हणून मराठी विषयावरचे माझे प्रेम, आदर, त्यासाठी लागणारी कार्य तत्परता आणि त्यातून मिळणारा आनंद हा द्विगुणित करण्यासाठी ह्या सदराचे सादरीकरण मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  'Grammar - व्याकरण' ह्या सदरातून त्यासंदर्भातील गोष्टी साध्या आणि अतिशय सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयास आहे.  


     व्याकरण सदरासाठी सर्वप्रथम मार्गदर्शिका आणि शिक्षक असलेली माझी आई, माझे विषय शिक्षक, व्याकरणासंदर्भातील विविध पुस्तकांच्या लेखकांचे लेखन तसेच माझे सहकारी ह्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.  ह्या सर्वांसह विविध स्पर्धा परीक्षा पुस्तके, तसेच इंटरनेटच्या साहाय्याने एकत्रित ज्ञानाच्या अभ्यासातून तयार करण्यात आलेले हे 'नोट्स' - प्रायमरी/प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्रवेश परीक्षा/UET अशा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच उपयुक्त आहेत.  

       
       ब्लॉगवरील माझ्या 'Grammar - व्याकरण' ह्या सदरात YOUTUBE LINK दिलेली असेल. सदर व्याकरण व्हिडीओ स्वरूपातही उपलब्ध असेल.  


व्याकरणाचे मुद्दे/TOPIC खालील प्रमाणे: 

मराठी व्याकरण नोट्स:
(व्याकरण सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.)


                                                  - अनुप्रिया सावंत.

Friday, 7 May 2021

थर्ड वर्ल्ड वॉर ८ - चीनचा फास

     



भारत व युरोपिय महासंघ यांचे व्यापारी सहकार्य अधिक प्रमाणात वाढत आहे.  कोरोनाच्या महासंकटातून पूर्ण जगच होरपळून निघत आहेत.  त्यात अर्थव्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था असताना भारत मात्र ह्याला पूर्णतः नसला तरी बऱ्याच प्रमाणात अपवाद म्हणायला हरकत नाही.  


चीनने जो काही खेळ सुरु केलेला तो चीनच्याच अंगावर उलटायला सुरुवात केव्हाच झाली आहे.  युरोपीय महासंघ व्यापारी क्षेत्रात भारतासह करार करण्यास पुढाकार घेण्यास जी सहकार्याला दिसून येत आहे, त्यामुळे चीनचे धाबे नक्कीच दणाणलेले दिसत आहेत.  कारण चीनने जे अक्राळ विक्राळ जाळे पसरवले होते ते आता उखडून काढायला चीनच्याच धूर्त खेळीमुळे मदत झाली आहे.

 

     हुवेवरील बंदीवर चीन आक्रमक भूमिका घेत आहे.  जपानऑस्ट्रेलियाब्रिटनकॅनडाभारतस्वीडन अशा १० पेक्षा अधिक देशांनी बंदीची घोषणाही केली.  चीनच्या बाजारपेठांचा अगदीच बाजार उठला आहे.  चीनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्यापारसुद्ध अधिक तीव्र केले आहे.  स्वीडीश कंपन्यांना संधी नाकारणेऑस्ट्रेलियाचे नैसर्गिक इंधनवायूचे आयात प्रमाण कमी करणेअसे अनेक गोष्टी चीन इतर देशांना कोंडीत पकडण्यासाठी विविध मार्गाने करत आहे.  आस्ट्रेलियातून होणारे २९ टक्के फायदेशीर असणारे आयात व्यापार चीनने पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  त्या ऐवजी चीन तुर्कीशी व्यापार करण्यास उत्सुक दिसत आहे.  अर्थात ह्या गोष्टीला त्यापलीकडे जाऊन सबळ कारणे आहेच.

 

     चीन आणि फिलिपाइन्स ह्यांचा साऊथ चायना सी मुद्द्याचा वाद चिघळतो आहे.  चीनने आपली मच्छिमार जहाजे फिलिपाइन्सच्या हद्दीत घुसवले होते.  चीनचे हे कारनामे विनाकारण नसतात हे एव्हाना त्याच्या ड्रॅगन वृत्तीमुळे जगाला कळत चालले आहे.  जशात तसे आणि सतर्कता म्हणून फिलिपाइन्सने सुद्धा घुसखोरीची प्रयत्न उधळवला आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साऊथ चायना सी मध्ये 'मिलिटरी हबउभारण्याच्या त्यांच्या दृढ निर्णयाचा थेट इशाराच चीनला दिला आहे.

 

क्वाडला (Quad – The Quadrilateral Security Dialogue - QSD) चीनच्या विरोध आहे.  बांगलादेशने ह्याला पाठिंबा देऊ नये अन्यथा बांगलादेशचे नुकसान होईल असे चीनने इशारा वजा धमकीच बांगलादेशला दिली आहे.  आता ह्या गोष्टीने चीनला बांगलादेशचे कसे आणि काय नुकसान करता येईल ह्याचा अंदाज आपल्याला हळू-हळू का होईना जागतिक घडामोडी बघता नक्कीच लावता येऊ शकेल.

 

(ह्या संदर्भातील सविस्तर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.)

क्वाड आर्थिक व सुरक्षाविषयक संघटना म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.  मात्र भेदरलेल्या चीनला हे कारस्थान वाटतंय.  खरंच आहे म्हणा!  चीनची खेळी सर्वच जग पूर्णपणे ओळखून आहे.  


'साऊथ चायना सी' चीनला संपूर्णपणे गिळंकृत करायचा आहे.  आणि त्यासाठीची हालचाल फार आधीपासूनच आखली गेलेली आहे.  हाँगकाँगची झालेली वाताहत स्पष्टच दिसून येत आहे.  त्यातच तैवानचा ताबा जर चीनला मिळाला, तर चीन अमेरिकेलाच काय पूर्ण जगाला किती धोकादायक ठरू शकेल ही वास्तविकता आता सर्वांच्याच लक्षात येतेय.


सध्या सुरु असलेले पॅलेस्टाईन आणि इस्राईल युद्ध भयंकर आहे.  दोन्हीकडे धगधगती आग सुरु असताना चीनने पुन्हा आपला हात साफ करत तेल ओतायचं काम केल आहे.  चीनच्या सवयीचे नवल नाही, पण ह्या युद्धाने चीनला असे काय फरक पडणार असा जर प्रश्न आपल्याला पडला?  तर आपण प्रत्यक्षातल्या वास्तविकतेपासून किती दूर आहोत ह्याची त्याचक्षणी खात्री पटेल.


     ह्याचे कारण स्पष्ट आहे.  चीन आर्थिक आणि आण्विकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे, हे तो वारंवार सिद्ध करतोच आहे.  त्यातून त्याची जगातील सर्वात मोठी महासत्ता बनण्याची आकांशा, जिद्द, आणि ध्येय हे अगदीच स्पष्ट आहे.  चीनने धूर्तपणे नेपाळला आपल्या बाजूने केले आहे, त्याचसह श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूतान असे छोटे देश सुद्धा चीनने आपल्या बाजूने केव्हाच वळवले आहेत.  पाकिस्तानविषयी काही सांगायलाच नको.  मानसपुत्र असल्यासारखे चीन-पाकिस्तानचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे.  


खनिजसाठ्यांनी समृद्ध असणाऱ्या इराणला आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या वर आणण्यात पाकिस्तान आणि चीनचाच हात आहे.  चीनचा नकाशा नीट निरखून पहिला तर त्याचा आजूबाजूला आणि एकमेकांशी असलेले संलग्नित छोटे मोठे जोडून असलेले देश पाहता आपल्याला त्याचा अक्राळ विक्राळ जबड्याचे स्वरूप दिसते.  


     चीनचे सुरु असलेले कारनामे जगासमोर कितीही पांघरण्याचा प्रयत्न केलेला असला तरी उघड आहे.  कम्युनिस्ट असलेल्या चीनचे उत्तर कोरियाला आपल्या मुठीत घेऊन त्याचे लक्ष्य दक्षिण कोरियावर किती आसुसलेले आहे, हे सध्या सुरु असलेल्या साऊथ चायना सी प्रदेशातील हालचालींवरून स्पष्ट आहे.  हाच दक्षिण कोरिया चीनला जादूचा दिव्यासारखा भासतोय.  नेमकं हेच ओळखून अमेरिका, भारतासह इतर देशांनी सर्व दृष्टींनी सहसंबंध मजबूत करण्याचे धोरण आखले आहे.  त्यातलेच स्पष्ट असलेले धोरण म्हणजे 'क्वाड कमिटी'.

सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषणासहित देणाऱ्या 'बिगर राजकीय दैनिक - प्रत्यक्ष' ह्यांचे आंतरराष्ट्रीय बातम्या म्हणजे डोळ्यात अंजन घालणारे आहे.  आणि त्याचमुळे आम्हा वाचकांना अतिशय गुंतागुंत वाटणाऱ्या ह्या घडामोडी लक्षात यायला सहज सोपे जाते.  कारण... Third World War has been Started...


                                                                                                - अनुप्रिया सावंत.

Friday, 22 January 2021

डिजिटल माईंड



         आपण प्रत्येक जण सतत काही ना काही विचार करत असतो.  काहीजण तो विचार मनात करतात, काही जण आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करतात, तर काही जण तो लिहून व्यक्त करतात.  प्रत्येक जण व्यक्त होत असतोच, पण प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे असतात.  बऱ्याचदा आपण आपल्या मनातले विचार झटकून टाकण्यासाठी असो किंवा आपल्या विचारांना दिशा देण्यासाठी असो, कुठेतरी मन रमवत असतो.  अगदी बोटावर मोजण्या इतके लोक असतील, जे आपला वेळ सत्कारणी लावत असतात.  ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपला वेळ वाया घालवतो.  इतकंच आहे की अनेकदा उचित ठिकाणी तो देता येणे आपल्याला उमजत नाही.


     आम्ही नाही बाबा त्यातले, आम्हाला नाही जमत हे वेळ सत्कारणी लावणं वैगरे. तुम्ही मोठी माणसं.  आहे तोच वेळ पुरत नाही आणि म्हणे वेळ सत्कारणी लावा(मुरडले नाक :)).  आम्हाला काही कमी टेन्शन आहे का?  असे एक ना अनेक उत्तरे आपणच स्वतःला देत असतो आणि देत राहतो. नाही का?


     माझंच घ्या, किती दिवसापासून म्हणते, कि काही तरी नवीन करावं, आपला वेळ लावावा सत्कारणी.  पण, हा विचार काही प्रत्यक्ष उतरताना दिसला नाही.  हो कि नाही!  बघा, तुमचा माझा विचार एकच झाला.  हे असं करत अनेक महिने लोटले बघा, हा 'पण' काही करू देईना! 

पण अगदी खरं सांगू का?  तुम्हाला म्हणून सांगते हा!  

काही मनाला खटकलं ना, कि बरोबर गाडी रुळावर येते बघा. 

अहो हसताय काय?  खरंच.  

     आपल्याला कधीच वेळ नसतो.  आणि वेळ काढायला तर वेळ नसतोच नसतो.  पण जर कोणत्या बाबतीत आपलं मन खट्टू झालं कि बरोबर आपल्याला आपला वेळ मिळतो बघा. आणि हा वेळ खरंच 'सत्कार्य' करण्यासाठीच असतो, हे कळायला तुमच्या आमच्या सारख्यांना बऱ्याचदा बराच उशीर होतो.  पण काही हरकत नाही.


     सवयी ह्या लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात.  आणि त्या अशा पटकन निर्माणही होत नाहीत, त्या तयार कराव्या लागतात.  तशी सवय लागण्यासाठी थोडंसं कष्ट मात्र आपल्याला करावेच लागते.  कष्ट म्हंटले तरी सुद्धा त्या कष्टाचा विचार करण्यातच आपला अर्धा दिवस निघून जातो.  खरंय ना!  मग आपण म्हणतो आम्हाला नाही वेळ.  

     अहो, हे सगळं जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हाच ते खऱ्या अर्थाने जाणवते.  आणि जाणवलेल्या गोष्टी मनातच उजळत राहताना त्याचा सुंगंध म्हणजेच त्याची निर्मिती अगदी अलगद जडत जाते बघा!  अगदी १०८%.


     म्हणून मन खट्टू होण्याची वाट बघत बसू नका हं!  काहीही झालं तरी 'चांगले विचार' आणि 'सकारात्मक भावना' ह्या जोडगोळीला हृदयाशी घट्ट धरून ठेवलंच पाहिजे.  आणि हे असं लगेच नाही होत, असा विचार मनात येताच क्षणी त्या नकारात्मक विचाराला थांबवून आपला खरा प्रयास सुरु करायला हवा.  हा नकारात्मक विचार खरंच आपल्या मनाचा कहर आहे आणि त्याला आपणच STRANGE करतो.  हे आहे तिथेच STOP करून START WHERE YOU ARE... हे बिंबवता यायला हवं!

     
     शाळेत असतानाची धम्माल, आजीच्या गावी जाताना गावच्या मातीचा दरवळणारा सुगंध, आवडणारी व्यक्ती, तिच्याविषयी जाणवणाऱ्या भावना, आपल्या बाळाचे कौतुक, त्याची निरागसता, उतार वयातील गोष्टी, नातवंडांचा सहवास, प्रपंचाच्या व्यापात कामाची चाललेली धावपळ, आपले सहकारी, घडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी, त्यातून मनाला उभारी देत केलेला प्रवास, प्रवासातील धम्माल आठवणी, कितीs कितीs गोष्टी आहेत, ज्या आपल्या मनात वाचतानाच बघा झरझर येऊन गेल्या.  हो ना!  खरंच आपलं मन खूप STRONG आणि जबरदस्त आहे.


     आपल्यातले किती तरी जण ह्या गोष्टी आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवत असतात.  किती तरी जण त्या अल्बमच्या माध्यमातून पाहत राहतात.  किती तरी जण आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देत पेनाच्या शाईने अलगद कागदावर उतरवत असतात.  कागदावर उतरताना त्याचा ओलावा खरंच स्पर्शून जातो.  आणि खरंच हे अगदी खरं आहे. 

     कित्येकदा आपल्या मनातले विचार आपल्या मनातच राहतात. पण कागदावर उतरलेला मायेचा स्पर्श आपल्या व्यक्तीला कधी ना कधी सहज देऊन जातात.  


     आजच्या ह्या डिजिटलायझेशनच्या युगात हाच स्पर्श आता डिजिटल झाला आहे.  बदलत्या जगानुसार घडणारा हा बदल CONSTANT आहे.  

 'CHANGE IS THE ONLY CONSTANT.'  

     म्हणून आपल्या मायेचा ओलावा काही थांबत नाही, ते  प्रेम काही कमी होत नाही, ती जाणीव काही आटत नाही.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे.  आणि ह्या प्रवाहात आपल्याला आपल्याच मार्गाने पुढे जात रहायचं आहे.  फक्त त्यासाठी थोडं डिजिटल विश्व अधिक जवळून जाणून घेता यायला हवं.

     प्रत्येकाने TECHNO SAVY होणं ही आता काळाची गरज आहे.  आणि हो, Techno Savy होण्यातही खूप गंम्मत आहे बरं का?  हम्म!!!  पण आता आपण इथेच थांबूयात.  ह्या डिजिटल विश्वातील खजिन्याची गंम्मत जाणून घेण्यासाठी नक्की भेटूयात पुढच्या सदरात.

                                                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 11 November 2020

Social Media - एक व्यापक व्यासपीठ

     
Photo Source: Google
Photo Source: Google

     सोशल मिडीया म्हणजे असा व्यासपीठ ज्याद्वारे आपण एकाच ठिकाणाहून अनेकांशी जोडले जातो.  अशी गोष्ट जी इंटरनेटच्या माध्यमातून विस्तारीत पावते आणि आपल्याला एकापेक्षा अनेक व्यासपीठावर आणून सोडते.  हे व्यासपीठ म्हणजे डिजिटीलायझेशनच्या युगात विविध घटक, स्थळ, व्यक्ती ह्यांना जोडणारा दुवा.  आता तुम्ही हा माझा ब्लॉग वाचत असताना ब्लॉग व्यासपीठाचा वापर केला आहे.  थोडक्यात, ज्याप्रमाणे आपण आपले फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे अकाउंट वापरतो, ते अकाउंट म्हणजे डिजिटल युगातील आपले सोशल मिडियाचे व्यासपीठ होय. आणि ह्याच सोशल मिडियाचा वापर अधिक सजगतेने करण्यासाठी आणि एकाच वेळेला अनेकानेक लोकांपर्यंत संदेश/मेसेज पोहचविण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्युब अशा अनेक व्यासपीठ माध्यमांच्या वापर आपण करत आहोत.

     टेलिव्हिजनपेक्षा वेगाने पसरलेले हे सोशल मिडीया आज इंटरनेटच्या दुनियेतील प्रभावी शस्र आहे.  स्वतःचे मत, विचार अगदी सहज इथे व्यक्त करता येते.  इतकेच नाही तर विविध समाज घटक एकत्र येऊन अगदी कोणत्याही चळवळींपर्यंत ह्याचा वापर प्रभावी होत आहे.  ज्याप्रमाणे मोबाईल, मेल ह्यामार्फत आपण लोकांशी जोडले जातो त्याच्याही अनेक पाऊले पुढे जाऊन ह्याचा वापर करत आपण आपले फोटो, आपल्या भावना, आपले ठिकाण अशा सगळ्याच गोष्टी अगदी सहज पोहचवत आहोत.  थोडक्यात आपणही आज नकळत सोशल झालो आहोत.

     पुस्तक असो, पुस्तक प्रेमी असो, चित्रपट असो, किंवा एखादा कलाकार असो प्रत्येक जण आप-आपली कला अगदी सहजतेने जगासमोर मांडत असतो, ते ह्याच व्यासपीठावर.  त्यामुळे वेळ आणि पैसे ह्यांची बचत तर होतेच आहे, पण त्याहीपलीकडे जाऊन लोकांचे विचार एकमेकांना समजण्यास मदत होत आहे.  विचारांचे शक्तिप्रदर्शन अगदी सहज पुढे आलेले दिसून येते.  ह्यातून अनेक माहित नसलेल्या गोष्टींविषयी देखील जनजागृती होऊ लागली आहे, तर कित्येक गोष्टींची ओळख नव्याने होत आहे. 

फेसबुक

आपण आपले स्वतःचे प्रोफाइल बनवून स्वतः विषयीची माहिती इतर लोकांसोबत सामायिक/शेअर करू शकतो. सध्याच्या व्हर्च्युअल रिऍलिटी मध्ये फेसबुक अधिकच प्रभावी आहे. आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत आपण व्हर्च्युअली इथे जोडले जातो. 

इंस्टाग्राम

इंस्टाग्राम हाही फेसबुकचाच एक भाग आहे. फेसबुकप्रमाणे इथेही आपण आपले मत, विचार, फोटो शेअर करू शकतो.  तुम्ही तुमचे फोटो अगदी इफेक्टसहित स्लाईडद्वारे शेअर करू शकता.  इथेही तुम्ही एकाच वेळेला अनेकांशी जोडले जाता.  तुमचे विचार, मत, तुमची आवड, कला, आणि फोटोज तुम्ही इथे अगदी सहज शेअर करून ते फेसबुकला सुद्धा जोडून घेऊ शकता.  सध्याच्या युथमध्ये इंस्टाग्राम खूपच लोकप्रिय आहे.

युट्युब

ह्यावर आपण आपले विडिओ अपलोड करू शकतो.  आपल्या खाजगी गोष्टीपासून आपली आवड, निवड, पॅशन तुम्ही व्हिडीओ मार्फत अपलोड करू शकता.  सध्या माहिती, शिक्षण/एज्युकेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ह्याचा वापर फारच प्रभावी ठरत आहे.  ह्या व्यासपीठावरून आपण पैसेही कमवू शकतो.  आपला कन्टेन्ट/माहिती ही लोकोपयोगी असल्यास आपल्या युट्युब चॅनेलला भेटी देणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो आणि अधिकाधिक विझिटर/भेट संख्येमुळे ऍडसेन्स माध्यमातून आपल्याला त्याचे मूल्य देखील मिळते.

लिंक्डइन

हे एक सोशल नेटवर्किंग साईट आहे. ज्याला आपण व्यावसायिक नेटवर्किंग असेही म्हणू शकतो.  वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला भेटतात. इथे आपण स्वतःचा व्यक्तिगत प्रोफाइलची संक्षिप्त माहिती देतो, ज्याद्वारे आपल्याला आपल्याच क्षेत्रातील लोकांची ओळख होण्यास आणि त्याद्वारे नोकरी मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो.  कारण इथे अनेक क्षेत्रातील कंपन्या आपल्या प्रोफाइल मार्फत लोकांशी व्यावसायिक संदर्भात जोडले जातात.

ट्विटर
अगदीच मोजक्या शब्दात आपले विचार व्यक्त करण्याचे आणि त्याचसोबत एका जादूच्या झप्पीसहित असंख्य दुवे जोडणारा हा ट्विटर अतिशय लोकप्रिय आहे.  सोशल मीडियामध्ये 'ट्विटर' अतिशय जबरदस्त आहे.  ह्या जादूच्या झप्पीविषयी नंतर नक्कीच पाहणार आहोत.

     अशा महत्वाच्या विविध प्लॅटफॉर्म/व्यासपीठ ह्यांच्याविषयी आपण जाऊन घेतले. आपल्यातले अनेक जण हे रोजच वापरतात. सोशल मिडियाच्या वापराने जरी जग एकमेकांच्या जवळ आले असले, तरी हे तितक्याच प्रभावशाली तसेच चांगल्या गोष्टींसाठी वापरण्यासाठी काही गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात.  अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊयात पुढच्या सदरात.

                                                                      - अनुप्रिया सावंत.

Tuesday, 11 August 2020

कविता #15 - शब्दांची दुनिया!!!



     मनाचे गणित खुपच अजब असते, नाही का?  मनातल्या मनात आपण कितीतरी वेळा संवाद साधतो, अनेक गोष्टींबद्दल विचार करत राहतो.  त्यांच्याशी बोलताना, हसताना वेळप्रसंगी भांडतोही.  इतकेच नाही तर अप्रत्यक्षपणे आपल्या मनाशी आपणच अगदी अगणित हितगुज करत राहतो.  बऱ्याचदा त्यांना खुप काही सांगायचे असते, पण ओठापर्यंत येऊन मग तिथेच थबकतात.  पुन्हा हृदयाला जाऊन भिडतात आणि मग हृदयातून मनाशी थेट संवाद साधत, नकळत आणि तितक्याच अलगदपणे कागदावर उतरतात.  
     
     हो, आपल्या मनाच्या कुशीत बागडणारी, खेळणारी, दंगा करणारी, आपल्याशी सतत गप्पा मार अगदी मुक्तविहार करणारी आपलीच 'शब्दांची दुनिया'.


शब्द हे असे मनातच लोळणारे,
मनालाच गादी समजून त्यातच मस्त लोळणारे.


शब्दांच्या दाटीतून हळूच ओठावर उतरून,
काठावरच थांबणारे,
शब्दांचे पाखरू बनून मनातच विहार करणारे.


शब्दांच्या  गर्दीत शब्दाला शोधणारे,
शब्दांच्या खेळात शब्दांनाच समजावणारे.


हृदयाच्या हुंदक्यात नयनांतच तरंगणारे,
शब्दांच्या राज्यात शब्दालाच फसवणारे.


ओठांच्या काठ्यावर आणि नयनांच्या तीरेवर पल्ल्याआड होणारे,
पल्ल्याआड होता होता हळूची, लेखणीच्या कुशीत जन्मणारे.

                          - अनुप्रिया सावंत.

Friday, 19 June 2020

थर्ड वर्ल्ड वॉर ७ - भारत चीन सीमावाद - १

         
         १९६२ साली बेसावध भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनने या वेळीही विश्वासघातकी नाटक करून भारतीय सैनिकांवर लोखंडी सळ्या, काठ्या आणि दगडांनी विक्षिप्त हल्ला केला.  चीनच्या भ्याड हल्लाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो.  आणि अशा भ्याड हल्ल्याचे प्रत्युत्तर चीनला लवकरच मिळेल.  


         चीनला महासत्ता बनण्याचे असुरी ध्येय आहे.  चीनच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेसाठी त्याला जगभर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.  आणि त्यासाठी चीनने फार आधीपासूनच त्याची पाळेमुळे कशी खोलवर रुजवून ठेवली आहेत, ह्याचा प्रत्यय आपल्याला कोरोना वैश्विक महामारीमुळे यायला लागला आहे.  कोरोनामुळे चीनचा खरा चेहरा जगासमोर आला असला, तरी चीनला त्याच्या महत्वकांक्षेपासून रोखून ठेवू शकणारा एकमेव भारत देश आहे आणि चीनला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे.  


         पाकिस्तान आणि श्रीलंका ह्यांचे चीनशी संबंध आहेत कारण चीनकडून त्यांना आर्थिक स्वरूपात कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची मदत झालेली आहे.  सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर दोन्ही देशांना अजूनही मोठ्या कर्जाची आवश्यकता आहे.  आणि हीच संधी चीन साधणार आहे.  कारण भारताच्या शेजारी असणारे हे देश ह्यामुळे चीनच्या अधिपत्याखाली येण्यास मदत होणार आहे.  चीन आपल्या मार्केटिंग स्ट्रेटीजी चा वापर करून इतर देशांमधील आपला विस्तार वाढवत चालला आहे.   


     चीनचे पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान ह्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.  शत्रू चा शत्रू तो आपला मित्र हे सूत्र चीनने फार पूर्वीपासून अवलंबले आहे.  हिंदी महासागरातील भारताची सुरक्षा आणि अमेरिकाचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी, चीन भारताशेजारील देशांना आर्थिकदृष्ट्या आपल्या कूटनीतीमध्ये गुंतवू पाहत आहे.  त्याचमुळे चीन पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार ह्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत भारत व अमेरिकेला शह देण्याचा विफल प्रयत्न करत आहे.  चीनचे सुरु असलेले कुटील डाव हाणून पाडण्यासाठी भारत व अमेरिका इतर देशांसोबतचे नौदल सहकार्य वाढवीत आहे.  ह्यात श्रीलंकेसह, मालदीव, म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर ह्यांचाही समावेश आहे.  श्रीलंकेसोबत भारताने सद्य स्थितीत करार करत आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

नेपाळ


        भारताच्या शेजारी असलेल्या ह्या नेपाळला महायुद्धात एक महत्वाचे स्थान आहे.  
अधिक माहितीसाठी: 
तिसऱ्या महायुद्धासंदर्भात डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि महत्वपूर्ण आहे.  

'तिसरे महायुद्ध' संदर्भातील जागतिक पातळीवरील दिवसागणिक बदलणाऱ्या अधिक घडामोडी पाहण्यासाठी:

        नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे.  याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे.  भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ८ मे रोजी 'लिपुलेख पास' ला जाणाऱ्या ८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते.  हा रास्ता उत्तराखंड आणि तिबेट ह्यांच्या मधून जाणारा आहे.  कैलाश मानसरोवर हे तिबेट मध्ये येते.  इथे जाण्याचे दोन रस्ते आहेत.  एक लिपुलेख (उत्तराखंड) आणि दुसरा नाथू-ला.  पण हे दोन्ही रस्ते खूप वेळ खाऊ आहेत.  त्यामुळे लिपुलेख सीमेपर्यंत रस्ता बनवण्यात आला आहे.  ह्या लिंक रोडचा फायदा फक्त भाविकांनाच नाही, तर चीनच्या टोकाला असणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला सुद्धा कमी वेळेत अधिक रसद उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.


    हिंदू धर्मासाठी पवित्र असणारी कैलास यात्रा 'तिबेट' जवळून जाते.  हिंदूंच्या पवित्र कैलाश मानसरोवरावर चीन स्वतःचा हक्क दाखवतो.  भारताविरोधात नाराजीचा सूर लावणाऱ्या नेपाळने, ज्यावेळी चीनने ‘माऊंट एव्हरेस्ट’ वर स्वतःचा दावा केला, तेव्हाही कुठल्याही प्रकारची अपेक्षित आक्रमकता प्रदर्शित केली नव्हती.  ही बाब नेपाळमधील चीनचा प्रभाव अधोरेखित करणारी ठरते.


       आपल्या मुख्य पॉईंट्सवर येऊ.  नेपाळमधील काली नदीच्या पूर्वेकडील भाग नेपाळचा आहे, तर पश्चिमेकडील भाग भारताचा आहे.  याबाबत कोणताही वाद नाही आणि भारताने बांधलेला रस्ता नदीच्या पश्चिमेकडे आहे.  असे असतानाही नेपाळने भारताच्या लिंक रोडला विरोध का करावा?  इतकेच नाही तर नेपाळने लिपुलेखसह 'कालापानी' व 'लिंपियधुरा' हे नेपाळचाच भाग असल्याचा नवा नकाशा प्रसिद्ध करण्याचा इशारा देत निषेध नोंदवला होता.  फार आधीच भारत-नेपाळ सीमा प्रश्न मिटलेला असताना, नेपाळने भारतविरोधी अशी आक्रमकता दाखवण्यामागचे काय कारण असू शकेल?   की त्यामागे चीनची खेळी आहे? 


     ह्याच मुद्द्याला अधोरेखित करत चीनने लिपुलेखमधील भारताच्या अस्थायी बांधकामांवर आक्षेप घेत उघडपणे विरोध दर्शविला आहे.  नेपाळने 'कैलास मानसरोवर लिंक' रोडला ज्याप्रमाणे विरोध दर्शविला त्याचप्रमाणे चीनने कैलास मानसरोवराला जाणाऱ्या यात्रेकरू आणि चीनमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्यांकरिता जे तात्पुरते विश्रंतीसाठी अस्थायी बांधकाम बांधले आहेत त्यावरून विरोध सुरु केला आहे.  चीन इतर सीमाप्रदेशावरील देखील वाद उकरून काढत तसेच लिपुलेखसंदर्भात बांधकाम मुद्दा पुढे करत, भारतावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे जो अगदीच केविलवाणा वाटतो. 

 
     चीनला लिपुलेख इतका महत्वाचा का आहे?  'हिमालयीन ट्राय जंक्शन' हा अतिशय संवेदनशील असलेला भाग आहे.  कारण तिथे तीन देशांच्या सीमा एकत्र येऊन मिळतात.  त्यामुळे लष्करीदृष्ट्या अतिशय महत्वाचा असेलेला हा भाग खरं तर हिमालयाची प्रवेशद्वारे आहेत.  

ही ट्राय जंक्शन म्हणजे,
१. सियाचीन ग्लेशियर 
२. कालापानी म्हणजे लिपूलेख पास 
३. डोकलाम 
४. दिफु पास  

     आणि महत्वाचे म्हणजे, हे चारही जंक्शन्स आपल्या भारताच्या ताब्यात आहेत.

     सियाचीन हातातून गेला तर लडाख हातातून गेल्यासारखे आहे.  सियाचीनच्या पश्चिमेला पाकिस्तान आणि पूर्वेला चीन लडाख वर कब्जा करू शकतील.  POK ताब्यात घेण्यासाठी तसेच लडाखला सुरक्षित ठेवण्यासाठी सियाचीन महत्वाची भूमिका बजावतो.

'लिपुलेख' ते दिल्ली अंतर फक्त ४१६ किमी आहे.  जर लिपूलेख चीनच्या ताब्यात गेला तर राजधानीवर हल्ला करायला चीन सैन्याला २ दिवस पुरेसे आहेत. 

'डोकलाम' हातातून गेले तर नॉर्थ ईस्टकडील राज्ये चीनच्या ताब्यात येतील.

         'भारत-म्यानमार-चीन' यांच्या सीमा 'दिफु पास' येथे येऊन मिळतात. मॅकमोहन लाईनच्या एंड पॉईंटवर अरुणाचल प्रदेशात दिफु पास आहे.  चीनला अरुणाचल प्रदेश ताब्यात आल्यास आसाम मध्ये सैन्य घुसवणे सोपे आहे परिणामी पूर्ण नॉर्थ ईस्ट इंडिया चीनच्या तब्येत येऊ शकते.
(ह्यासंदर्भात अधिक माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.)


         भारत-नेपाळ-चीन यांच्या सीमा ह्या 'कालापानी म्हणजे लिपूलेख पास' ला येऊन मिळतात.  तसेच भारताला ह्या भागावरून चीनच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवणं सोयीचे पडते.  भारताने थेट लिपूलेखपर्यंत बांधलेला हा रास्ता तीर्थयात्रांकरिता जरी असला, तरी ह्यामुळे भारतीय सैन्य चीनच्या सीमेपर्यंत अगदी जलद गतीने धडक मारू शकतात.  आणि त्याचमुळे चीनच्या कोणत्याही नीच कृत्याला भारत चोख प्रयुत्तर देऊ शकतो.  हे सर्व पाहता नेपाळ आणि चीनने ह्याबाबत चालवलेल्या एकंदर भूमिकेचा अंदाज बांधता येऊ शकतो.

       २०१७ ला चीनने 'डोकलाम' मध्ये लष्करी तणाव निर्माण केला असतानाही भारताने एक इंचही जागा सोडली नव्हती.  आताही भारत तुसभरही मागे हटला नाही आणि हटणार नाही.  मजबूत नेतृत्वामुळे भारताचे चित्र आता बदलत चालले आहे.  एक जबाबदार देश, उत्कृष्ट निरीक्षण क्षमता, वाढती लष्करी शक्ती, अत्याधुनिक शस्रास्रे आणि मुख्य म्हणजे भारतीय सैन्यांचे मनोबल वाढते ठेवून त्यांना मिळणारा संपूर्ण सकारात्मक व सहकार्यात्मक पाठिंबा, ह्यामुळे भारत देश आता मजबूत आणि विशालतेच्या दिशेने आगेकूच करत आहे.


तिबेट
         तिबेट हा एक स्वतंत्र प्रांत होता.  मात्र १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले व १७ कलमांचा करार करत तिबेट गिळंकृत केले.  कलमांच्या मार्फत तिबेटवर स्वतःचा हक्क दाखवत तिबेटियन जनतेवर बरेच निर्बंध आणले गेले.  परिणामी जनतेमध्ये चीनबरोबर सातत्याने संघर्ष सुरु झाला.   पण चीनने तो प्रत्येक वेळी हाणून पडला.  १९५९ मध्ये १४ वे दलाई लामा भारताच्या आश्रयाला आले व भारताने त्यांना राजाश्रय दिला.  हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेतून तिबेटचे स्वंतत्र सरकार चालवण्याची परवानगी त्यांना देण्यात आली व तेथून आजही तिबेटचे सरकार चालवले जात आहे.  मात्र नेहमीप्रमाणेच चीनच्या विरोधामुळे तिबेटचे आजचे स्थान ‘चायना ऑक्युपाईड टेरीटरी’ म्हणजेच चीनव्याप्त क्षेत्र असेच आहे.

         तिबेटकडे स्वतःचे शासन, संस्कृती व पुरेशी लोकसंख्या असल्यामुळे 'तिबेट' हा 'देश' या संकल्पनेच्या निकषांमध्ये परिपूर्णतेने बसतो.  एखाद्या क्षेत्राला मान्यता देण्याचे अधिकार हे संयुक्त राष्ट्रसंघटनेचे आहेत.  ह्यात ठराव मंजूर होऊन, त्याला सुरक्षा परिषदेची मान्यता मिळवावी लागते.  तिबेटला जर मान्यता मिळाली तर चीनसाठी ही बाब चिंतेची ठरते.  

         तिबेट, हाँगकाँग, तैवान ह्या चीनच्या मुख्य नसा म्हणता येतील.  तिबेटच्या सीमारेषा भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या चार देशांशी जोडल्या गेलेल्या आहेत.  'अक्साई चीन' हा देखील तिबेटचाच एक भाग आहे.   परंतु, १९६२ मध्ये चीनने भारताकडून अक्साई चीनचा भाग बेकायदेशीरपणे गिळंकृत केला.  तो तिबेटचाच भाग असल्याने आमचाच भाग आहे असा दावा चीन ठोकत असला, तरी तो फोलच आहे हे येणार काळ नक्कीच सांगेल.  

          अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी सूत्रे हातात घेताना अमेरिकेत अनेक कायदे बनवण्यात आले.   त्यात चीनकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे आणि ते थांबवण्यात यावे यासंदर्भातील असलेले हे कायदे आहेत.  त्यामुळे चीन आपला दावा सांगत असणाऱ्या तिबेट, हॉंगकॉंग आणि तैवान ह्यांना ह्यासाठी चीनविरोधी लढण्यात एक प्रकारचे सकारात्मक सहकार्य होणार आहे.  मात्र चीनसाठी ही डोकेदुखी बनलेली असून ती अधिक तीव्र होत चालली आहे.  कारण जर तिबेटला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली तर चीनचा अक्साई चीन, लडाखवरील दावा सुद्धा पूर्णपणे फोल ठरेल.

अमेरिकेच्या 'तिबेट कार्ड' मुळे चीनवरील दबाव वाढणार आहे. कारण आंतराष्ट्रीय पातळीवर चीनने कोरोनाव्हायरस संदर्भात ज्या खेळी खेळल्या आहेत, त्यामुळे सर्वच देश चीनच्या विरोधात ठाकले आहेत.   ह्या कारणामुळे चीनच्या तैवान भूमिकेसंदर्भात पाठिंबा देण्यास कोणता देश पुढे येईल, असे वाटत नाही.  चीन सगळ्याच बाजूने कोंडीत पकडला गेल्यामुळे अधिक आक्रमक झाला आहे.  अमेरिका चीनवर आधीपासूनच संतप्त असल्यामुळे अमेरिकेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकात तिबेटला स्वतंत्र देश म्हणून दर्जा मिळण्याची शक्यता अधिक आहे.  चीनला हे मान्य नसल्यामुळे अमेरिका-चीन मधील संघर्ष वाढत आहे.  तर दुसरीकडे भारतासाठी ही घडामोड फायदेशीर ठरणार आहे.

     'कैलाश मानसरोवर' 'लिंक रोड' संदर्भात माहिती वाचताना लक्षात येते की, 'भारत-तिबेट-चीन' यांचा चाललेला सीमावाद किती महत्वाचा आहे.


तैवान -
         तैवानच्या जनतेने १९६० पासून चीनविरोधात स्वतंत्रलढा सुरु केला.  ज्यावेळी हॉंगकॉग चीनच्या अधिपत्याखाली गेला, त्यावेळी तैवानला झालेला धोका ओळखुन अमेरिकेने तैवानला मदत पाठवली.  केवळ त्याचमुळे चीनचा तैवान जिंकण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता.  


          ‘त्साई ईंग-वेन’ पुन्हा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा बनल्या.  त्यांच्या शपथग्रहण सोहळ्याला ४१ देशांच्या ९२ प्रतिनिधींनी  ‘व्हर्च्युअल उपस्थिती’ लावली होती.  त्यात भारतानेही सहभाग घेतला होता.  इतकेच नाही तर तैवानचा एक लोकशाहीवर आधारलेला देश म्हणून भारताने उल्लेख केला.  हा एकप्रकारे चीनसाठी  इशाराच ठरतो.  


        चीनने कोरोनाव्हायरसचे जे सत्य जगापासून लपवून ठेवले, त्या विरोधात जगभरात प्रचंड संताप आहे.  अनेक देश चीनविरोधी गेले आहेत.  असे असले तरी चीनने स्वतःच्या विस्ताराच्या राक्षसी महत्वकांक्षेला तुसभरही धक्का लागून दिला नाही.  उलट तो अधिक आक्रमक बनत 'ईस्ट आणि साऊथ चायना सी' तसेच तैवानच्या आखातात आपल्या हालचाली वाढवत आहेत.  तैवानच्या शपथग्रहण पार्श्वभूमीवर झालेल्या घडामोडीमुळे अस्वस्थ झालेल्या चीनमधील नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना तैवानवर हल्ला चढवून 'तैवानताब्यात घेण्याचा सल्ला दिला आहे.

         त्यामुळे चीनला प्रत्युत्तराची झलक आणि तैवानला पाठिंबा दर्शवित अमेरिकेने, या क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या आहेत.  गेल्या आठवड्यात अमेरिकेची ‘यूएसएस थिओडोर रुझवेल्ट’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका ‘साऊथ चायना सी’ मध्ये दाखल झाली आहे.  तसेच 'लान्सर' या बॉम्बर विमानांचा ताफाही दोन्ही सागरी क्षेत्रात गस्त घालत आहेत.

     
         चीन अनेक मार्गाने भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करत आहे.  भारताचा वेगाने सुरु असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास चीनला खुपतो आहे.  विविध सीमेवर चीनचे सुरु असलेले कपटी कारस्थाने, हालचाली, छोट्या प्रदेशांवर सुरु असलेली हुकूमत, धाक आणि त्यांना भारताविरुद्ध भडकावण्यासाठीचे सुरु असलेले षडयंत्र आता उघड आहे.  जगभरातील प्रमुख देशांचा भारताला चीनविरोधात संपूर्ण पाठिंबा असून,  चीनवर सणसणीत आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु आहेत.  


       चीनला टक्‍कर देणारा भारत हा एकमेव शेजारी देश असून भारतासमोर चीनची दंडेली चालणार नाही, असा इशारा एका तैवानी वर्तमानपत्राने दिला आहे. इतकंच नाही तर तैवानचा 'Photo of the Day' ला सोशल मिडियावरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.



         आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे असलेले स्थान आणि भारताची असलेली 'आत्मनिर्भरता' तसेच 'आत्मविश्वासमय' वाटचाल पाहताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.  भारताचा पाया हा मूलतः आध्यात्मिकच आहे.  भारतावर आजपर्यंत अनेक परकीय आक्रमणे आले, पण प्रत्येकवेळी भारताने तितक्याच त्वेषाने ते परतवूनही लावले.  भारताची संस्कृती, भारताची संयमता, भारताचे वाढते प्रभुत्व, भारताची सकारात्मक प्रतिमा त्याचबरोबरीने असलेली विशाल दूरदृष्टी हे सर्वच देशांनी जाणले आहे आणि अजूनही अनुभवत आहेत.  

         एकीकडे इतर देशांचा वाढत पाठिंबा, भारतावर असलेला विश्वास, भारताची प्रत्येक पाऊलागणिक वाढत जाणारी सक्षमता तर दुसरीकडे चीन, पाकिस्तान सारख्या धूर्त, कपटी, आणि काळाने ग्रासलेल्या त्यांच्यासारख्या विचारसरणीला पाहताना पवित्र्याने रसरसलेला 'सुंदरकाण्ड' मधील विभीषण-रावण संवाद आठवतो.  

रामु सत्यसंकल्प प्रभु सभा कालबस तोरि|
मैं रघुबीर सरन अब जाऊँ देहु जनि खोरि ||२३७|| (सुंदरकाण्ड ओवीं) 


          सध्या तैवान, तिबेट, नेपाळ आणि चीन मधील सीमावादावरून वातावरण चिघळत असताना चीनने भारतीय सैन्यावर कपटाने केलेला हल्ला हा अतिशय निंदनीय आणि आत्मघातकी आहे.  चालू घडामोडी पाहता आणि सध्याचे भारत-चीन सीमावादावरून घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना पाहता, आपल्याला ह्याविषयी थोडेफार तरी धागेमुळे किंवा त्या गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.   त्याचबरोबर इतरांनाही ह्या गोष्टींबद्दल जागृत करणे ही काळाची गरज आहे.  कारण युद्ध सुरु झाले आहे.  सीमेवरून थेट घरापर्यंत त्याचा प्रवेश झालेला आहे.  आता आपल्याला सावधानतेसोबत सतर्कता आणि त्याबद्दल आवश्यक खबरदारीही तितकीच महत्वाची आहे.  आपले सैनिक सीमेवर सर्वस्व पणाला लावून शत्रूला  परतवून लावत आहेत.  आपल्याला सीमेवर जायची गरज नाही पण म्हणून आपले युद्ध थांबत नाही आणि संपत तर नाहीच नाही.  आपल्याला आपल्या भारतीय सैन्याला साथ द्यायची आहे.  भारताला बलाढ्य बनवायचं आहे.  भारताला सक्षम करण्यात जेवढा आपल्या सैन्याचा मोलाचा वाट आहे, तितकाच महत्वपूर्ण वाटा आत्मनिर्भर भारताचे नागरिक म्हणून आपलाही आहेच.  कारण... Third World War has been Started... 

         - अनुप्रिया सावंत


Monday, 15 June 2020

"Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."



          बऱ्याचदा आपल्याला हवं तसं घडतच असं नाही.  मनासारखी गोष्ट घडली नाही, तर मन अगदी नानाविध विचार करायला लागते.  जर ह्या मनाला विचार करण्यासाठी, नकारात्मक विचार असतील, तर मग मनाचे आणि डोक्याचे(बुद्धी) अगदी तुंबळ युद्ध जुंपते.  हा अगदी प्रत्येकाला येणारा अनुभव आहे.  बऱ्याचदा एखादा नवीन विषय अचानक समोर आला की, व्यक्तीची कशी तारांबळ उडते. त्यात विषय नावडता असेल, तर मनःस्ताप ठरलेला असतो. आणि जर विषय आपल्या मनाच्या विरुद्ध टोकाचा असेल तर मग स्वभाव, मन, बुद्धी ह्यांना भेदत डोक्याचा भुगा.  मैत्रीच्या भाषेत बोलायचं तर डोक्याची दही नक्कीच होते.  बरेचदा गोष्टी खूप छोट्या असतात.  पण मनाला त्या छोट्या गोष्टी अगदीच, आता पेलवत नाही असे होऊन जाते.  ह्याला प्रामाणिक कारण एकचं, आपण स्वतःला खूप कमी संधी देतो असं वाटतं. 


     एखादा वैयक्तिक पातळीवरील निर्णय घ्यायचा म्हंटलं की, सामान्यातला सामान्य जीवसुद्धा अगदी कासावीस होतो.  मग ती गोष्टी छोटी असली तरीही. गोष्ट विचारांच्या मर्यादेपलीकडे असेल, तर मग ह्या कासावीस जीवाला खऱ्या अर्थाने गरज लागते ते आपलेपणाची.  हे 'आपलेपण' म्हणजे काय?  माझे मित्र-मैत्रीण, आई-बाबा, नातेवाईक, आप्त ह्यांच्याशी जिव्हाळा, संवाद म्हणजे 'आपलेपण'.  हे जरी खरे असले, तरी खरे 'आपलेपण' हा स्वतःचा-स्वतःशी, मनाचा-बुद्धीशी असलेल्या योग्य सुसंवादाशी असतो.  ह्या कासावीस होणाऱ्या जिवाला जशी कोणाच्या तरी आधाराची गरज असते, तशीच त्याला स्वतःचा स्वतःशी असलेल्या आधाराची सुद्धा तितकीच गरज असते. राहतो प्रश्न तो स्वतःला ओळखण्याचा.  फार काही फिलॉसॉफी पद्धतीत नक्कीच नाही व्यक्त व्हायचंय.  सर्वात जवळचा मित्र, म्हणजे आपल्या गाठीशी असलेला अनुभव.  सोबत ह्या अनुभवाला असलेली बुद्धीची उचित सांगड. 


       ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच छूमंतर अजिबात नाहीत.  ह्याला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची, नीट समजून घेण्याची आणि जी पारख आपल्याला त्यातून होते, त्यातही अनेक दृष्टिकोनातून स्वतःला स्वतः पैलू पाडण्याची नितांत आवश्यकता आहे.  अनेक अनुभवातून प्रत्येक जण शिकत असतो. हे अनुभव, आपण आपल्या आयुष्यात कसे वापरतो? हे महत्वाचे आहे.  कारण तेही तितकेच आपल्या मनाला आशावादी बनवण्यासाठी प्रेरित करत असतात. 


    अशा फिलॉसॉफिकल गोष्टी आपण जेव्हा समोरच्याला सांगतो किंवा आपले मत आपण मांडतो, त्यावेळी बऱ्याचदा आपणही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असतो.  It's OK.  काही हरकत नाही.  Just Let it beFocus on good changes inside you.  आपल्यातील चांगल्या बदलांवर लक्ष केंद्रित करायला हवं.  ह्यात एक गोष्ट नक्की, 'Acceptance is more important in our life'.  ती गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात स्वीकारणे अधिक महत्वाचे आहे.  कारण 'Change is only constant'.  आपल्या आयुष्यात होणारा 'सातत्यपूर्ण' बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे.  ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून, आपल्या बुद्धीला स्थिर करण्यास आपण स्वतःच स्वतःला मदत करू शकतो.


       'बुद्दिभेद' म्हणजे माझ्या अर्थी, मनाचे आणि डोक्याचे असलेले वाकडेपण.  मन आणि बुद्धी स्थिर नसेल तर शरीर सुद्धा व्याधिमय बनते.  हा बुद्धिभेद बाहेरच्या व्यक्तीकडून आपल्यावर हल्ला करण्याआधीच, स्वतःच्या विचारांच्या चुकीची पद्धतीमुळेच आपल्याला विनाशाकडे नेतो.  बऱ्याचदा आपण फार पटकन समोरच्याला आपले रिऍकशन्स देतो.  आपले मत आपण लगेच बनवतो.  आपल्या मृदू, प्रेमळ किंवा काळजीयुक्त स्वभावामुळे का असेना, आपले रिऍक्ट होणं बऱ्याचदा आपल्यालाच त्रासदायक ठरतं.  इतकंच नाही तर  आपण स्वतः देखील एखादी गोष्ट केली की, स्वतःवरही तितक्याच चंचलतेने रिऍक्ट होऊन जातो.  आणि हेच रिऍक्ट होणं, मग आपल्याला विचारांच्या चक्रीवादळात खेचून घेतो.  आणि त्यातून निष्पन्न काय होतं? तर मनाला होणाऱ्या भयंकर वेदना, अस्वस्थता, चलबिचलता, निर्णय शून्यता, आणि परिणामी चुकीचे पाऊल.


          पाऊल वाकडे पडले की, ते पुन्हा मार्गावर आणता येतातही.  पण जर ते चुकीच्या निर्णयामुळे जीवावर बेतले, तर त्याला पुन्हा मार्गावर आणता येऊ शकत नाही.  Nothing is bigger than Life.  आयुष्य हे एकदाच मिळते. कोणत्या चुकीच्या निर्णयामुळे किंवा गोष्टीमुळे आपण ते वाऱ्यावर सोडून दिले, तर कसे चालेल?  असे म्हणतात, संधी एकदाच चालून येते, मला असं अजिबात वाटतं नाही.  'संधी ह्या चालून येत नाहीत, तर संधी ही निर्माण करावी लागते.'  कोणीतरी येईल आणि मला संधी मिळवून देईल, असं कधीच होतं नाही.  संकटात जेव्हा सगळे मार्ग खुंटतात, तेव्हा Optimistic (आशावादी) व्यक्तीसाठी हेच संकट संधी बनून स्वतः त्याच्याकडे येते.  जेव्हा कोणत्या कार्याचा बेस (पाया) हा अध्यात्माला सोडून असतो, तेव्हा ह्या संधी त्यांचे सगळेच दारं बंद करून घेतात.  म्हणजे काय? आपल्या मनाचा बुद्धीचा एकमेकांशी संवाद तुटतो आणि तिथे सुरु होतो तो वाद.  वादातून कधीच काही चांगले निष्पन्न होऊ शकत नाही.  आणि राग येणं हे स्वाभाविक जरी असले, तरी त्या रागाला वादाच्या दारात उभं करायचं की नाही?  ते आपल्या हातात असते.  एखादी गोष्ट आपल्याला राग आणणारी असली, की आपण पटकन रिऍक्ट होतो.  आणि हे रिऍक्ट होणं जर चुकीच्या पद्धतीत व्यक्त झाले, तर वाद वाट पाहतच असतो.  कलियुगाच्या चरणात सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल?  तर हा द्वेष, राग, आणि त्यातून निर्माण होणारा वाद.  


         हे सगळे बोलण्यासाठी ठीक आहे असे जरी वाटले, तरी आता ह्यावर खऱ्या अर्थाने विचार करायला हवा.  ह्या सगळ्याचे सकारात्मक अनुकरण झटपट नक्कीच नाही होऊ शकंत.  पण हे सवयीने नक्कीच बदलू शकते.  नुसते सकारात्मक वाचून, बघून आणि लिहून व्यक्ती आशावादी बनत नाही.  तर त्याप्रमाणे त्याला स्वतःला स्वतःवर मेहनत घ्यावी लागते.  ही मेहनत घेणं सोपं नाही, पण अशक्यही नाही.  स्वतःवर चिडण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा, द्वेष, मत्सर, लोभ ह्या मोहमायेत अडकण्यापेक्षा आपल्या 'Nothing is bigger than Life' असणाऱ्या ह्या स्वतःच्या अमूल्य जीवाला संधी द्यायला काय हरकत आहे.  एक गोष्ट मनाशी आपण पक्की बांधली पाहिजे, "संधी ह्या चालून येत नाही, त्या स्वतःला निर्माण कराव्या लागतात."  You have to create it.


       आज माझ्याकडे नोकरी नाही म्हणून मी रडत बसलो, तर चालेल का?  माझा पगार कमी आहे आणि माझा मित्र जास्त कमावतो, असं करत राहिलो, तर घर चालेल का?  घरात कोणी मदत करत नाही म्हणून स्वतःवर चिडचिड करत राग करत बसलो, तर माझा जगणं सुसह्य होईल का?  मला आधी जास्त पगार होता, आता कमी पगारात काम करावं लागतंय, असं करत आहे ती नोकरी सोडली, तर मला पुन्हा नवीन संधी मिळतील का?  असे खूप प्रश्न आहेत, मला - तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाच.  


       आज लॉकडाऊन चालू होऊन ३ महिने झाले, आधीची परिस्थिती आणि आताची व पुढची परिस्थिती ह्यात नक्कीच बरंच अंतर निर्माण होणार आहे, किंबहुना झाले आहे.  अशा वेळेस मनाचा आणि बुद्धीचा संयम हाताळणे थोडं अवघड आहेच, पण जमणारचं नाही, असं अजिबात नाही.  परिस्थितीला गिव्ह अप(सोडून देत)  करत हतबल होण्यात काहीच अर्थ नाही.  ह्यात तरून जायचे असेल तर 'संधी' निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही.  संधी ही कोणत्याही प्रकारची असू शकेल, ते म्हणजे बुद्धिभेदापासून स्वतःचा बचाव करण्यापर्यंत ते स्वतःला अशाही परिस्थिती 'Optimistic' व्यक्तिमत्त्वाकडे नेण्यासाठी, आपला जोपासला जाणारा छंद ही त्याचाच भाग असू शकेल.  आणि नसेलच काही छंद किंवा नसेलच काही आवड, तर मला माझ्या आयुष्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे.  मग अगदी स्वतःवर सकारात्मक प्रयोग ही त्याचा भाग असू शकेल.  काय वाटतं तुम्हाला? 


        अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मान्य करून, स्वतःला संधी आपणच दिली पाहिजे.  स्वतःला आपण आहे तसे Accept(स्वीकार) करत, स्वतःवरही प्रेम केले पाहिजे.  दुसऱ्यांना मदत करताना आपल्याला आनंद होतोच.  इतकंच नाही, तर दुसऱ्याचा छोटासा आनंद बघतानाही आपण किती हरखून जातो.  मग आपल्या स्वतःच्या जीवनाला आपण स्वतःच जर हा आनंद मिळवून दिला, तर आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.  जीवनात कोणीच परफेक्ट नसतात आणि परफेक्शनच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नसतो.  


         इतिहास घडविणाऱ्यांमध्ये सातात्यतेने सकारात्मक वृत्ती होती. त्यांच्या शिकण्यात नाविन्यता होती, अनुभवांचे गाठोडे होते. त्याचा सकारात्मक वापर करून मन आणि बुद्धीवर मिळवलेला, तो विजय म्हणजे हा 'इतिहास'.  आपल्याला आपल्या इतिहासातील  'आदर्श' व्यक्तींची नुसती आठवण जरी आली, तरी अंगावर शहारे येतात.  अभिमान वाटतो आपल्याला आपल्या पूर्वजांचा.  आणि नकळत स्वतःचाही अभिमान वाटतो की, असे थोर संत, नेते, राजे, व्यक्ती आपले इतिहासकार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांनी आपल्याला संदेश तर दिला आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेकानेक संधी दिल्या आहेत.  जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आणि त्याचे अनेकानेक पैलू आपल्याला प्रत्यक्ष दिले आहेत.  असे म्हणतात, 'जिंदगी का दुसरा नाम ही प्रॉब्लेम है|' पण जर प्रॉब्लेम आलेच नाही, तर जीवनातल्या संधी कळणार तरी कशा? आयुष्यातली सुंदरता अनुभवणार तरी कशी?


          माझी आई आम्हाला नेहमी सांगते, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्याची सहजता आपल्याकडे असायला हवी.  प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला असतात, तुम्ही त्याला कसे पाहता?  ते महत्वाचे.  'श्रद्धा' आणि 'भक्ती' ह्या दोन गोष्टी आणि त्यानुसार असलेले आपले कर्म जीवनात प्रत्यक्ष उतरत असते.  Spiritually आपला strongness आपल्याला सकारात्मक स्पंदन निर्माण करण्यास सहाय्यभूत होतात.  'भक्ती' हा प्रत्येक कार्याचा बेस आहेच, पण 'प्रपंच हाच परमार्थ', हे विसरून चालणार नाही. 


त्यासाठी...

     "Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied."

              अनुप्रिया सावंत