Monday, 7 June 2021

कविता #16 - निसर्ग

         निसर्ग ह्याचा नुसता उल्लेख करताना सुद्धा किती गोष्टी आपल्यासमोर झरझर उभ्या राहतात.  त्याचे रंग, रूप, सौन्दर्य, आल्हादायकता, त्याचे हसणे, रुसणे, बागडणे, अनेकप्रकारे जगाशी असणारे अतूट नाते ह्यातून व्यक्त होत जाते.  ह्याच निसर्गासोबत आपण मनसोक्त गप्पाही मारतो.  मनातला हिंदोळ्यावर मुक्त संचार करतो, तो ह्याच निसर्गाच्या साक्षीने.  

       प्रत्येकाला त्याचे दिसणारे अलौकिक रूप न्यारेच.  ह्याचाच छत्राखाली सारे जीव विसावत राहतात.  हा आपल्याला हवा तसा सादही घालत असतो.  त्यालाही आपली सोबत आवडत असतेच.  व्यक्त होताना तो त्याच्या सवंगड्यांना घेऊन आपल्याशी गुजगोष्टी करत असतो, त्याच्या भावना आपल्याला सांगत राहतो.  हा खरंच एक साजिरा कलावंत आहे.  हो ना!

Published in #Pratyaksha Newspaper

सांज वेळेला निसर्ग रंगारी
नव्याने निसर्ग बहरत खुणवी
उधळत येतो त्याचे सप्तरंग
काय किमया त्याची वर्णावी!

सखे, काय सांगू या मनी
हाच कलावंत मनाला खुणवी
मनाच्या हिंदोळ्यावर मुक्त झुलवुनी
वाऱ्याच्या वेगानं बेभान बागडवी

समुद्राच्या लाटेवर सैरावैरा आदळत
म्हणे जाऊनि वाऱ्याला भिडतो
इथेच नित्य नादनिर्मिती घडवत
कलाची कलाकारी इथेच जडवितो

उधळतो चहूकडे सप्तरंग रंगारी 
जनी निरोप देता सायंकाळी
किमयागार नित्य हाच कलाकार
निरंतर ह्याची जादूच निराळी!

               - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 2 June 2021

लेक

 
  

     बीज अंकुरत पालवी फुटायला लागली की हळू हळू मोठे होत जाणारे रोपटे झाडांचा आकार घेत वृक्षात रूपांतरित होते.  आपणही वयाने त्यांच्यासोबत मोठे होत असतो ही जाणीव मनाला सुखावत जाते. आणि जसे हे निसर्गाचे नाते घट्ट होत जाते तसे निसर्ग आणि अनुभव ह्यांचे विश्व एकमेकांत समरस होत जाते.  माझ्या आईला झाडांची फारच आवड.  नेहमी छोट्या कुंडीत झाडे लावणे, जोपासणे, त्यांना पाणी घालणे, त्यांना टवटवीतपणा येण्यासाठी पाण्याचे अधूनमधून सिंचन करणे ह्या छंदात तिला रमताना पाहून वेळ कसा जायचा कळायचेच नाही.  तिला मी त्यांच्यासोबत बोलताना पाहिले, त्यांच्या भावना जाणून घेताना तिच्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव मी जवळून पाहिले आहे.  जणू आईच ती त्या रोपट्यांची!  


     आपल्या बाळाची काळजी आई जशी घेते तशीच काळजी ती झाडांची घ्यायची.  आमच्या बाल्कनीत अनेक झाडे लावली होती.  ती झाडे त्यांच्या आकार विस्तारते झाले की त्यांना अजून पोषक वातावरण मिळावं म्हणून तिने आमच्या बगीचेत त्यांचे भरण पोषण केले.  शाळेतून येताना जाताना त्यांना बघताना वेगळाच आल्हाद जाणवायचा. आम्ही दोघं भावंडं नेहेमीच एकमेकांना टाळी देत म्हणायचो, ही तर आपल्या आईची बाळं आहेत, म्हणजे आपले भाऊ बहीण झाले.  


     शाळेत शिक्षिका असलेली माझी आई मृदू, शांत आणि सतत काही न काही नवीन करण्यात नेहमीच गुंतलेली असायची.  शाळा, घर, मुले आणि तिचं फुलत असलेलं नंदनवन हेच तिचं जीवन.  आणि ते जीवन जगताना त्यात नव्याने सातत्यपूर्ण आनंद ती छोट्या छोट्या गोष्टीतून घ्यायची आणि त्याची सवय आम्हालाही तिने करून दिली.  कुठलंही काम असो तिच्यातील सळसळता उत्साह नेहमीच कामासाठी एनर्जी देत असायचा.  


     आम्ही दोघेही बहीण भाऊ भरपूर मस्तीखोर.  काही न काही सतत एकमेकांच्या कुरघोडी काढत रुसवा फुगवा करत राहायचो.  तरीही न थकता, न दमता तिच्या कलेने आम्हाला छान समजावून सांगायची.  ती शाळेतून घरी यायची तेव्हा आम्हाला खिडकीत बसून वाट पहायला खूप धम्माल यायची.  कारण येताना आम्हाला भरपूर खाऊ  आणायची ती बाजारातून.  अर्थात त्यात फळांचे प्रमाण अधिक असायचे.  जेवणात पालेभाजी असायलाच हवी हा तिचा आग्रह असायचा.  जशी तिला आमच्या आहाराची काळजी असायची तशीच ती तिच्या बागेची तिथल्या प्रत्येक झाडांची काळजी तेवढ्याच तत्परतेने घ्यायची.  


     शाळेतल्या अनेक गरजू मुलांच्या पुस्तकांची शाळेच्या फीची व्यवस्था करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना शिकण्यास प्रोत्साहित करत असायची.  तिचा अध्यापनाचा दर्जा पाहून सरकारकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेल्या माझ्या आईचा आम्हाला अभिमान असला तरी तिने ह्या गोष्टीने हुरळून न जाता सातत्यपूर्ण सकारात्मक कार्य करण्याची जिद्द आमच्यात रुजवली.


     आईने तिच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या.  आमचे शाळा, कॉलेज होऊन दोघेही नोकरीवर रुजू झालो.  बघता बघता संसारही सुरू झाला.  आमच्या बागेतील झाडांना आता फळे फुले बहरत होते आणि त्याचा आनंद आजीच्या मांडीवर बसून त्यांचे नातवंड घेत होते.  अजूनही आई जेव्हा जेव्हा बाहेर कामानिमित्त जाते तेव्हा तेव्हा आम्ही त्याच ओढीने ती घेऊन येणाऱ्या खाऊचे वाट पाहत असतो आणि आता तर तिचे नातवंडेही.


     माझ्या आईंनी मला संसारात अडकून राहू नये, म्हणून सतत माझ्या कलेला पाठिंबा देत मलाही शिक्षक ते प्राध्यापकापर्यंतचा प्रवास घडवून आणला होता.  माझ्या दोन्ही अहो आई आणि ए आईने माझ्या प्रपंचाचा भार आपापल्यापरीने हलका केला होता, असं मी नेहमीच माझ्या सख्यांना सांगते.  खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये खूप विलक्षण शक्ती असते, त्याची जाणीव व्हायला हवी.  माझ्या दोन्ही माऊली माझ्यासाठी खूपच विलक्षणच आहेत.


     सकाळी लेकीचा फोन येऊन गेला होता, घरी जाताना भेटायला येणार आहे सांगितलं.  आणि तसंही अजून बऱ्याच गप्पा प्रत्यक्ष भेटून करायच्या आहेत.  तिच्या येण्याची वेळ होत आलेली, थोडा चहा बनवून घेऊ म्हणजे आल्यावर एकत्र बसून चहा पिताना गप्पांचा मनमुराद आनंद घेता येईल म्हणून चहा ठेवायला आत आले.  चहाचे वाफाळत्या धुक्यांचे आवरण मला पुन्हा माझ्या विचारांच्या दुनियेत घेऊन आले.  


     आज घरात बऱ्याच दिवसांनी निवांतपणा मिळाला.  गौरीशा, गणेश दोन्ही मुलं आता आपापल्या संसाराला लागली.  तरीही गौरीशा मात्र अजूनही तिच्या दोन्ही घरांना घट्ट जोडून आहे.  गौरीशा माझी मोठी मुलगी.  मुली पटापट मोठ्या होतात असं म्हणतात.  पण माझं तर ठाम मत आहे, मुली त्याहीपेक्षा लवकर समजुतदार आणि कर्तव्यदक्ष बनतात.  स्वयंपाकाची आवड नसलेली गौरी किचन किंग म्हणून कधी ताबा घेता झाली कळलंच नाही.  अगदी लहान असतानाच तिने स्वतःची आवड कलामध्ये जपून स्वतःचा घरगुती क्लास मोठ्या स्वतंत्र कोचिंग क्लासमध्ये जिद्दीने रूपांतरीत केले.   ह्या गोष्टी करताना तिचे घराकडे मात्र कधीच दुर्लक्ष झाले नाही.  माझ्या आणि लेकीच्या नात्याची जागा आमच्या मैत्रीने केव्हाच घेतली.


     माझं ऑफिस ते घर हा वेळ नऊ तासाचा असायचा.  आईप्रमाणे मी देखील शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आणि कालांतराने प्राध्यापक म्हणून नियुक्तही झाले.  घरातील कामे, शाळेतील मुलांचे पेपर, रिझल्टस ह्यात आमच्या आईंचा नेहमीच हातभार असे.  त्यामुळे, मुलांना माझ्यापेक्षाही जास्त लाड त्यांच्या आजीच्या चमचमीत पदार्थातून मिळून पुरवले जात.  नोकरी सांभाळून कुटुंब सांभाळणे हे एक आव्हानच मानते.  मला हे शक्य झाले ते केवळ  घर, नोकरी आणि कुटुंब ह्यांना जोडणारे मुख्य दुवे असणारे माझे 'अहो आई' आणि 'ए आई' ह्या दोघी आणि त्यांचे असलेले खंबीर पाठबळ आणि आधार.  मुलं ह्यांच्या संस्कारक्षम बीजात संस्कारीत होत होती.  घरी आल्यावर त्यांच्या आजीच्या गोष्टी ऐकण्याची हौस आमच्या दोघांचीही मनसोक्त पूर्ण व्हायची.


     घरातल्या भिंतींना बहर फुलत राहतो, जेव्हा घरात स्त्री असते.  हो, खरंच ही गोष्ट मला मनापासून मोहित करते.  मला सहज आठवलं म्हणून हा विषय.  बऱ्याच वर्षापूर्वी एका शाळेत डेमोसाठी मला बोलावण्यात आलेले आणि महत्वाचं म्हणजे त्यांची काही अट नव्हती की, पाठच घ्या किंवा कविताच घ्या किंवा व्याकरणच सादर करा.  पण मी मात्र तिन्ही गोष्टी व्यवस्थित तयारी करून गेलेले.  रस्त्यातून जाताना अगदी सहजच विचार आला आपल्याला दहा मिनिटांत त्यांनी डेमो द्यायला सांगितला आहे, तर काय बरं द्यावा?  पाठ घ्यावा? कविता घ्यावी? की व्याकरण मस्त घेऊ?  हे की ते करत मी शाळेचा गेट गाठला आणि आता मात्र मला विचार करायला काहीही फुरसत नव्हती.  


     पूर्ण वर्ग भरत आलेला जाणवला, ते विद्यार्थ्यांनी भरलेले नव्हे तर भावी शिक्षकांनी.  एक एक करत डेमोचे टप्पे पार पडत होते.  आता माझ्या आधी अजून एक शिक्षिका होती, तिच्या नंतर माझा डेमो ठरलेला, मात्र अचानक त्यांनी मला आधी डेमोला बोलावलं.  झालं.... आता मात्र माझं एक पक्क होतं की मी कविता घेते.  डेमोला विद्यार्थी नसून शिक्षक आणि शाळेचे मुख्य कॉर्डिनेटर बसले होते.  क्षणभर थांबले आणि मग जी गाडी माझी सुरू केली, ते अगदी ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेगवान झाली.  माझ्या कवितेचे नाव होते 'लेक'.


     गाडी गिअर मध्ये व्यवस्थित आल्यानंतर काय उदाहरण द्यावं? हा प्रश्नच मला पडला नाही.  त्यांच्याच नजरेतून विविध अनुभव विश्व मांडताना, मला उदाहरणे शोधावी लागलीच नाही.  ती अलगद उलगडली जात होती.  कारण आपला विषयच हार्ड.  त्यात मी एवढी समरस झाली, की मला बराच वेळ विसर पडला की, आपल्या समोर विद्यार्थी नसून अध्यापक आहेत, जे अनेक वर्षांपासून अनुभवी शिक्षक म्हणून वावरत आहे.  


     थोडक्यात, आपली कला आपल्याला सादर करायची असेल, तर त्या कलेला कोणतेही निमित्त अगदी चपखल बसते, हे माझ्या आईचे तत्वज्ञान.  विषयाचे विषयांतर झाले तरी, जर विषयाला प्रवाह योग्य असेल, तर आनंद घ्यायला व द्यायला आणि रसग्रहणाची निर्मिती करायला तुम्हाला आम्हाला रसिक हे व्यासपीठ आपला कणाच असतो.  


     बॅक टू टॉपिक.  मुलगी घरात असेल तर आईवडिलांना नुसती घरकामात मदत होते असे नाही, तर तिच्यात सतत नावीन्य भरलेले असते.  माझ्या मुलीला काही न काही सतत नवीन प्रयोग करण्यात जो आनंद मिळतो, त्यापेक्षा तो आनंद पालक म्हणून पाहताना गुणाकाराच्या पटात भर पाडत राहतो.  भाऊ-भाऊ मिळून जेवढे पराक्रमी नसतील, तेवढे अतुल्य पराक्रम हे दोघे भाऊ बहीण सतत एकमेकांच्या खोड्या काढून गाजवतात.  एखादा जरी रुसला तरी, त्यांच्यात असलेला आनंद किंवा नाराजी त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  तरीही, ह्या सगळ्यात केंद्रीत असते ती 'लेक'.  


     घरात आई आजारी असेल तर ही लेक मात्र आईच्या भूमिकेत यायला सांगावं लागत नाही.  वडिलांची औषधं, भावाचा डब्बा, स्वयंपाक सगळं कसे अगदी माझं म्हणून करते.  हे माझंपण मला त्या प्रत्येक लेकीत दिसते.  म्हणूनच कदाचीत, शाळेतला अध्यापनाचा तो अनुभव ह्या लेकीने आधीच अध्ययन करून घेतला असावा.


     प्रवासात ये-जा करताना एक वाक्य मला नेहमीच दिसत असते, 'नसीब वालोंके घर लडकी होती है|'  मला हे वाक्य बघून स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो.  आणि हीच ती 'लेक' स्त्री जीवनातील तिच्या प्रत्येक क्षणी अगदी तत्पर आणि कर्त्यव्यनिष्ठ असते.  मग तीची भूमिका मुलगी म्हणून असो की सून म्हणून.  कारण मायेच्या स्पर्शात लेकीला जबाबदारीचे ओझे कधीच होत नसते.


                                        - अनुप्रिया सावंत.

Tuesday, 1 June 2021

मराठी व्याकरण - लिंगाचे प्रकार

मराठी व्याकरण - लिंगाचे प्रकार (Kinds of Gender)


Ø  लिंगाचे खालील प्रकार आहेत:


१. पुल्लिंग (Masculine Gender)


२. स्त्रीलिंग (Feminine Gender)


३. नपुसकलिंग (Neuter Gender)


--------------------------------------------------------------

पुल्लिंग (Masculine) 

     नामाच्या रुपावरुन जर पुरुष-जातीचा बोध होत असेल, तर त्यालापुल्लिंगीअसे म्हणतात. 


उदाहरणार्थ

घोडा, राम, मुलगा, सूर्य, हिमालय, इत्यादी.


--------------------------------------------------------------

स्त्रीलिंग (Feminine) 

     नामाच्या रुपावरुन जर स्त्री-जातीचा बोध होत असेल, तर त्याला स्त्रीलिंगी असे म्हणतात.


उदाहरणार्थ

नारी, मुलगी, दिपाली, गाय, काठी, बशी, नदी इत्यादी.


--------------------------------------------------------------

नपुसकलिंग (Neuter) 

ü       नामाच्या रुपावरुन जर पुरुष-जातीचा किंवा स्त्री-जातीचा बोध होत नसेल, म्हणजेच दोहोंहून वेगळेपणाचा बोध होतो, तेव्हा त्याला 'नपुसकलिंग' असे म्हणतात.


उदाहरणार्थ

झाड, मंदिर, फुल, घड्याळ, इत्यादी. - (ते घड्याळ, ते घर, ते फुल, ते सीताफळ.)

ü  ज्या नामांमध्ये 'ते' सर्वनाम लागते, ते सर्वनपुसकलिंग नामे समजावीत.


--------------------------------------------------------------

vमाहितीसाठीv

उभयलिंगी (Common)


v  काही नाम हे उभयलिंगी असतात


ü  उदाहरणार्थ

     डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक, शिक्षक 

 üमुलगी - मुलगा दोघे ह्या भूमिकेत असू शकतात, त्यामुळे अशा नामांना 'उभयलिंगी' असे म्हणतात.


--------------------------------------------------------------

लक्षात ठेवा(Note): 


vलिंग ओळखताना नाम एकवचनी असावे. 

vजर अनेकवचनी नाम असेल, तर ते प्रथम आपण एकवचनी करून घ्यावे.


                                   अनुप्रिया सावंत.

मराठी व्याकरण - लिंग

मराठी व्याकरण - लिंग (Gender)


*‘नाम’ म्हणजे काय* (What is Noun?)

एखाद्या वस्तूलाव्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते,  त्याला  ‘नाम(Noun)’ असे म्हणतात.


लिंग म्हणजे काय?

     मराठी व्याकरणामध्ये एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांचा उल्लेख करण्यासाठी वापरण्यात येणारे नाम, हे एकतर पुरुष-जातीचे, स्त्री-जातीचे किंवा दोहांपैकी कुठल्याही जातीचे नसते. 


व्याख्या:

     नामाच्या रुपावरुन एखादी वस्तू किंवा व्यक्ती ही पुरूषत्वदर्शक आहे की, स्त्रीत्वदर्शक आहे की, नपुसकत्वदर्शक आहे, हे ज्यावरून कळते, त्याला त्याचे 'लिंग' म्हणतात.


लक्षात राहण्यासाठी:

लिंग - सूत्र – तो’, ती’, ते


तो मुलगा(पुल्लिंगी),        ती मुलगी(स्त्रीलिंगी),      ते फुल(नंपुसकलिंगी)  

                  


     थोडक्यात, वरील शब्दांत आलेले तो’, ‘ती’, ‘ते ही सर्वनामे त्या-त्या शब्दाची वेगवेगळीजातकिंवालक्षणदाखवतात, हे लक्षण म्हणजेच 'लिंग(Gender)होय.


माहितीसाठी: 

  • मराठीत लिंगव्यवस्था ही अत्यंत अनियमित आहेत्यामागे विशिष्ट तत्व असे दिसत नाही.  
  • एखादा नियम पहावा, तर त्याला अपवादच जास्त मिळतो.  


व्याकरणातील लिंग ओळखण्याचा मार्ग म्हणजे

तो - पुल्लिंगी 

(ज्या नामामध्ये 'तोहे सर्वनाम लागतेती सर्व  'पुल्लिंगी' नामे)


ती - स्त्रीलिंगी 

(ज्या नामांमध्ये 'तीहे सर्वनाम लागते,  ती सर्व  'स्त्रीलिंगी' नामे)


ते - नपुसकलिंग 

(ज्या नामांमध्ये 'ते' हे सर्वनाम लागते, ती सर्वनपुसकलिंग’ नामे)


सदर व्याकरण विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी: 

YouTube (व्याकरण - लिंग)


                                               - अनुप्रिया सावंत.

Monday, 31 May 2021

मराठी व्याकरण - वाक्य म्हणजे काय?

मराठी व्याकरण - 'वाक्य' / 'Sentence'


      मराठी व्याकरणाची सुरुवात करताना आज आपण प्रथम 'वाक्य' कशी तयार होतात?  ते पाहणार आहोत.  'चिन्ह' म्हणजे काय?  'अक्षर' म्हणजे काय? अक्षरांचे संच, त्यापासून 'शब्दआणि शब्दांचे 'वाक्य', हे सोप्या शब्दांत जाणून घेणार आहोत.



सदर व्याकरण विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी: YOUTUBE LINK


                                                          - अनुप्रिया सावंत.

'Grammar - व्याकरण' सदरा संदर्भात...



नोट्स - व्याकरण / Grammar

     मराठी व्याकरणाचा हा सदर सुरु करताना मला अतिशय आनंद होत आहे.  शिक्षक म्हणून मराठी विषयावरचे माझे प्रेम, आदर, त्यासाठी लागणारी कार्य तत्परता आणि त्यातून मिळणारा आनंद हा द्विगुणित करण्यासाठी ह्या सदराचे सादरीकरण मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून करत आहे.  'Grammar - व्याकरण' ह्या सदरातून त्यासंदर्भातील गोष्टी साध्या आणि अतिशय सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयास आहे.  


     व्याकरण सदरासाठी सर्वप्रथम मार्गदर्शिका आणि शिक्षक असलेली माझी आई, माझे विषय शिक्षक, व्याकरणासंदर्भातील विविध पुस्तकांच्या लेखकांचे लेखन तसेच माझे सहकारी ह्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.  ह्या सर्वांसह विविध स्पर्धा परीक्षा पुस्तके, तसेच इंटरनेटच्या साहाय्याने एकत्रित ज्ञानाच्या अभ्यासातून तयार करण्यात आलेले हे 'नोट्स' - प्रायमरी/प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्रवेश परीक्षा/UET अशा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच उपयुक्त आहेत.  

       
       ब्लॉगवरील माझ्या 'Grammar - व्याकरण' ह्या सदरात YOUTUBE LINK दिलेली असेल. सदर व्याकरण व्हिडीओ स्वरूपातही उपलब्ध असेल.  


व्याकरणाचे मुद्दे/TOPIC खालील प्रमाणे: 

मराठी व्याकरण नोट्स:
(व्याकरण सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.)


                                                  - अनुप्रिया सावंत.

Friday, 7 May 2021

थर्ड वर्ल्ड वॉर ८ - चीनचा फास

     



भारत व युरोपिय महासंघ यांचे व्यापारी सहकार्य अधिक प्रमाणात वाढत आहे.  कोरोनाच्या महासंकटातून पूर्ण जगच होरपळून निघत आहेत.  त्यात अर्थव्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था असताना भारत मात्र ह्याला पूर्णतः नसला तरी बऱ्याच प्रमाणात अपवाद म्हणायला हरकत नाही.  


चीनने जो काही खेळ सुरु केलेला तो चीनच्याच अंगावर उलटायला सुरुवात केव्हाच झाली आहे.  युरोपीय महासंघ व्यापारी क्षेत्रात भारतासह करार करण्यास पुढाकार घेण्यास जी सहकार्याला दिसून येत आहे, त्यामुळे चीनचे धाबे नक्कीच दणाणलेले दिसत आहेत.  कारण चीनने जे अक्राळ विक्राळ जाळे पसरवले होते ते आता उखडून काढायला चीनच्याच धूर्त खेळीमुळे मदत झाली आहे.

 

     हुवेवरील बंदीवर चीन आक्रमक भूमिका घेत आहे.  जपानऑस्ट्रेलियाब्रिटनकॅनडाभारतस्वीडन अशा १० पेक्षा अधिक देशांनी बंदीची घोषणाही केली.  चीनच्या बाजारपेठांचा अगदीच बाजार उठला आहे.  चीनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्यापारसुद्ध अधिक तीव्र केले आहे.  स्वीडीश कंपन्यांना संधी नाकारणेऑस्ट्रेलियाचे नैसर्गिक इंधनवायूचे आयात प्रमाण कमी करणेअसे अनेक गोष्टी चीन इतर देशांना कोंडीत पकडण्यासाठी विविध मार्गाने करत आहे.  आस्ट्रेलियातून होणारे २९ टक्के फायदेशीर असणारे आयात व्यापार चीनने पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे.  त्या ऐवजी चीन तुर्कीशी व्यापार करण्यास उत्सुक दिसत आहे.  अर्थात ह्या गोष्टीला त्यापलीकडे जाऊन सबळ कारणे आहेच.

 

     चीन आणि फिलिपाइन्स ह्यांचा साऊथ चायना सी मुद्द्याचा वाद चिघळतो आहे.  चीनने आपली मच्छिमार जहाजे फिलिपाइन्सच्या हद्दीत घुसवले होते.  चीनचे हे कारनामे विनाकारण नसतात हे एव्हाना त्याच्या ड्रॅगन वृत्तीमुळे जगाला कळत चालले आहे.  जशात तसे आणि सतर्कता म्हणून फिलिपाइन्सने सुद्धा घुसखोरीची प्रयत्न उधळवला आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साऊथ चायना सी मध्ये 'मिलिटरी हबउभारण्याच्या त्यांच्या दृढ निर्णयाचा थेट इशाराच चीनला दिला आहे.

 

क्वाडला (Quad – The Quadrilateral Security Dialogue - QSD) चीनच्या विरोध आहे.  बांगलादेशने ह्याला पाठिंबा देऊ नये अन्यथा बांगलादेशचे नुकसान होईल असे चीनने इशारा वजा धमकीच बांगलादेशला दिली आहे.  आता ह्या गोष्टीने चीनला बांगलादेशचे कसे आणि काय नुकसान करता येईल ह्याचा अंदाज आपल्याला हळू-हळू का होईना जागतिक घडामोडी बघता नक्कीच लावता येऊ शकेल.

 

(ह्या संदर्भातील सविस्तर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.)

क्वाड आर्थिक व सुरक्षाविषयक संघटना म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.  मात्र भेदरलेल्या चीनला हे कारस्थान वाटतंय.  खरंच आहे म्हणा!  चीनची खेळी सर्वच जग पूर्णपणे ओळखून आहे.  


'साऊथ चायना सी' चीनला संपूर्णपणे गिळंकृत करायचा आहे.  आणि त्यासाठीची हालचाल फार आधीपासूनच आखली गेलेली आहे.  हाँगकाँगची झालेली वाताहत स्पष्टच दिसून येत आहे.  त्यातच तैवानचा ताबा जर चीनला मिळाला, तर चीन अमेरिकेलाच काय पूर्ण जगाला किती धोकादायक ठरू शकेल ही वास्तविकता आता सर्वांच्याच लक्षात येतेय.


सध्या सुरु असलेले पॅलेस्टाईन आणि इस्राईल युद्ध भयंकर आहे.  दोन्हीकडे धगधगती आग सुरु असताना चीनने पुन्हा आपला हात साफ करत तेल ओतायचं काम केल आहे.  चीनच्या सवयीचे नवल नाही, पण ह्या युद्धाने चीनला असे काय फरक पडणार असा जर प्रश्न आपल्याला पडला?  तर आपण प्रत्यक्षातल्या वास्तविकतेपासून किती दूर आहोत ह्याची त्याचक्षणी खात्री पटेल.


     ह्याचे कारण स्पष्ट आहे.  चीन आर्थिक आणि आण्विकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे, हे तो वारंवार सिद्ध करतोच आहे.  त्यातून त्याची जगातील सर्वात मोठी महासत्ता बनण्याची आकांशा, जिद्द, आणि ध्येय हे अगदीच स्पष्ट आहे.  चीनने धूर्तपणे नेपाळला आपल्या बाजूने केले आहे, त्याचसह श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूतान असे छोटे देश सुद्धा चीनने आपल्या बाजूने केव्हाच वळवले आहेत.  पाकिस्तानविषयी काही सांगायलाच नको.  मानसपुत्र असल्यासारखे चीन-पाकिस्तानचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे.  


खनिजसाठ्यांनी समृद्ध असणाऱ्या इराणला आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या वर आणण्यात पाकिस्तान आणि चीनचाच हात आहे.  चीनचा नकाशा नीट निरखून पहिला तर त्याचा आजूबाजूला आणि एकमेकांशी असलेले संलग्नित छोटे मोठे जोडून असलेले देश पाहता आपल्याला त्याचा अक्राळ विक्राळ जबड्याचे स्वरूप दिसते.  


     चीनचे सुरु असलेले कारनामे जगासमोर कितीही पांघरण्याचा प्रयत्न केलेला असला तरी उघड आहे.  कम्युनिस्ट असलेल्या चीनचे उत्तर कोरियाला आपल्या मुठीत घेऊन त्याचे लक्ष्य दक्षिण कोरियावर किती आसुसलेले आहे, हे सध्या सुरु असलेल्या साऊथ चायना सी प्रदेशातील हालचालींवरून स्पष्ट आहे.  हाच दक्षिण कोरिया चीनला जादूचा दिव्यासारखा भासतोय.  नेमकं हेच ओळखून अमेरिका, भारतासह इतर देशांनी सर्व दृष्टींनी सहसंबंध मजबूत करण्याचे धोरण आखले आहे.  त्यातलेच स्पष्ट असलेले धोरण म्हणजे 'क्वाड कमिटी'.

सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषणासहित देणाऱ्या 'बिगर राजकीय दैनिक - प्रत्यक्ष' ह्यांचे आंतरराष्ट्रीय बातम्या म्हणजे डोळ्यात अंजन घालणारे आहे.  आणि त्याचमुळे आम्हा वाचकांना अतिशय गुंतागुंत वाटणाऱ्या ह्या घडामोडी लक्षात यायला सहज सोपे जाते.  कारण... Third World War has been Started...


                                                                                                - अनुप्रिया सावंत.