
कधी कधी एखादी ओळ वाचली जाते आणि पुढे बराच काळ मनात रुंजी घालत राहते...
'तुमचा मी भार वाहीन सर्वथा,
नसे हे अन्यथा वचन माझे.'
साईबाबांच्या वचनातील ही ओळ मनात कुठेतरी रेंगाळत होती. शब्द तसे परिचित होते, अर्थही नवीन नव्हता. तरीही आज ते वाचताना मन काहीसं थांबलं. पुन्हा पुन्हा त्याच ओळीकडे वळत राहिलं.
किती विलक्षण असतं ना!
एखादा शब्द कानावर पडतो, एखादी ओळ नजरेस पडते आणि नकळत मनाच्या आत काहीतरी हलू लागतं. त्या शब्दांचा नाद कानापर्यंत पोहोचतो; पण त्यातून निर्माण होणारी स्पंदनं मात्र मनाच्या कितीतरी खोलवर जाऊन पोहोचतात.
कदाचित तोच भक्तीचा एक निःशब्द सोहळा असावा. जिथे शब्द संपतात आणि मनाचा संवाद सुरू होतो.
मनात विचार आला, खरंच, मनःशांती म्हणजे तरी काय? सगळं काही मनासारखं घडणं, की मनासारखं काहीच घडलं नाही तरी आत कुठेतरी एक आधार असल्याची जाणीव असणं?
कदाचित याच जाणीवेच्या शोधात आपण आयुष्यभर असतो.
अनेकदा स्वतःकडे पाहताना एक गोष्ट जाणवते. आपल्या प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक विचारामागे आणि अगदी आपल्या भक्तीमागेही नकळत एक 'मी' असतोच.
मला असा अनुभव आला म्हणून माझी श्रद्धा वाढली. अमुक घडलं म्हणून मन खट्टू झालं. एवढी सेवा केली, एवढं नामस्मरण केलं, मग काय मिळालं? इतके प्रयत्न केले, तरीही मनासारखं घडलं नाही. मी इतकं केलं, मला इतकं मिळालं...
या सगळ्या विचारांमध्ये कधी कधी स्वतःचाच आवाज इतका मोठा होतो की, दुसरं काही ऐकूच येत नाही.
मग सहज प्रश्न पडतो, हा 'मी' जेवढ्या हक्काने माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असतो, तेवढ्याच सहजतेने माझ्या जवळ असलेल्या त्या प्रेमस्वरूपाची जाणीव मला होते का?
हनुमंताच्या हृदयात प्रभू श्रीरामचंद्र आहेत, हे चित्र आपण किती भक्तिभावाने पाहतो.
पण त्या चित्राकडे पाहताना कधी स्वतःच्या हृदयात डोकावून पाहावंसं वाटतं का?
माझ्या आतही असंच काहीतरी अनंत, अव्यक्त आणि प्रेमस्वरूप असू शकेल, ही जाणीव कधी मनाला स्पर्शून जाते का?
स्वतःचं मन कधी दिसलं नाही. तरी त्याला समजून घेण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी, आनंदी करण्यासाठी किती धडपड सुरू असते.
मग त्या मनाच्या पलीकडे असलेल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला आपण इतके अनभिज्ञ का राहतो?
कदाचित प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा असे प्रश्न मनात निर्माण होणंही कधी कधी अधिक महत्त्वाचं असतं.
अनुभव... या एका शब्दानेही असाच एक वेगळा विचारप्रवास सुरू केला.
आपण सहज म्हणतो, मला असा अनुभव आला, मला तसा अनुभव आला.
पण अनुभव म्हणजे नेमकं काय?
एखादी घटना घडली आणि आपण तिला अनुभव म्हटलं, की त्या घटनेनंतर आपल्यात काहीतरी बदललं, त्याला अनुभव म्हणायचं?
या शब्दाकडे पाहताना 'भव' या शब्दाने लक्ष वेधून घेतलं.
'सुखी भव', 'विजयी भव', 'यशस्वी भव'... आशीर्वाद देताना उच्चारले जाणारे हे शब्द. 'भव' म्हणजे हो, होवो, तसे घडो, असा शुभेच्छेचा भाव.
आणि मग 'अनु' हा संस्कृत उपसर्ग. संदर्भानुसार मागोमाग, अनुसरण करून, अनुरूप असा त्याचा अर्थ.
शब्दांचा हा विचार करताना 'अनुभव' या शब्दाकडे एका वेगळ्या नजरेने पाहावंसं वाटलं.
ही त्याची शास्त्रीय व्युत्पत्ती नसली, तरी मनाला त्यातून एक सुंदर अर्थ जाणवला.
अनुभव म्हणजे केवळ घडलेली गोष्ट नसावी.
त्या गोष्टीमागोमाग आपल्या मनात उमटलेली जाणीव, काळानुसार बदललेला दृष्टिकोन आणि आत कुठेतरी शांतपणे रुजलेली समज असावी.
एखाद्याने सांगितलं की देव आहे, तर ती माहिती.
कोणीतरी देवाच्या अनुभूतीबद्दल सांगितलं, तर ते त्याचं कथन.
पण एखाद्या कठीण प्रसंगात कुठूनतरी धीर मिळणं, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असताना पुन्हा उभं राहण्याची उमेद निर्माण होणं, मन अगदी अस्वस्थ असताना अनपेक्षितपणे शांत होणं... याला नेमकं काय म्हणावं?
तो केवळ योगायोग असतो? मनाची समजूत असते? की श्रद्धेने दिलेला आधार?
उत्तर काहीही असो, त्या क्षणी मनाला जे जाणवतं, त्याचं महत्त्व कमी होत नाही.
काही अनुभव सांगता येतात, काही समजावून देता येतात; पण काहींचं अस्तित्व केवळ स्वतःपुरतंच राहतं. त्यांना पुरावे नसतात, स्पष्टीकरण नसतं.
तरीही ते मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायमचे घर करून राहतात.
आणि कदाचित म्हणूनच प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रवास वेगळा असतो.
कोणाला एखाद्या अनुभवातून देव जवळचा वाटतो, कोणाला कोणताही अनुभव न येताही त्याच्यावर अढळ विश्वास असतो.
कोणाच्या भक्तीला शब्द असतात, कोणाची भक्ती निःशब्द असते.
कोणाला मंदिरात गेल्यावर शांत वाटतं, तर कोणाला आपल्या रोजच्या कामातच एक अनामिक समाधान मिळतं.
यात योग्य-अयोग्य ठरवण्याचा प्रश्नच कुठे येतो?
प्रत्येकाचं मन वेगळं, त्याची वाट वेगळी आणि त्या वाटेवर त्याला मिळणारी जाणीवही वेगळी.
पण कधी कधी स्वतःच्याच मनात एक प्रश्न येतो.
आपण देवाकडे इतक्या अपेक्षेने पाहतो, त्याच्याकडून एखादी खूण, एखादा चमत्कार, एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वाट पाहतो.
पण त्याच वेळी त्याने दिलेल्या बुद्धीचा, विवेकाचा आणि कर्म करण्याच्या संधीचा किती विचार करतो?
आयुष्याचा हिशोब मांडताना आपणही किती सहजपणे मागच्या जन्मातील पुण्य-पाप, या जन्मातील कर्म आणि नशिबाचे ताळेबंद तयार करतो.
काही मनासारखं घडलं की पुण्याई आठवते आणि काही मनाविरुद्ध घडलं की कर्माचा सिद्धांत आठवतो.
पण या सगळ्या हिशोबात आजचा दिवस कुठेतरी मागे पडतो का?
आज माझ्या हातून काय घडतं आहे? माझ्या वागण्यात किती प्रामाणिकपणा आहे? माझ्या कर्तव्यांशी मी किती एकनिष्ठ आहे? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, माझ्या मनात ज्या श्रद्धेचा वास आहे, ती माझ्या जगण्यातही कुठेतरी दिसते आहे का?
प्रपंच आणि परमार्थ यांचा विचार करतानाही असंच काहीसं वाटतं.
कधी प्रपंचाच्या व्यापात स्वतःसाठी, मनासाठी वेळच उरत नाही.
तर कधी परमार्थाच्या विचारात प्रपंचातील छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांचं महत्त्व कमी वाटू लागतं.
पण या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरोधातच असायला हव्यात का?
घरातील माणसांशी प्रेमाने वागणं, आपल्या कामाशी प्रामाणिक राहणं, कोणाला शक्य तिथे मदतीचा हात देणं आणि तरीही दिवसाच्या शेवटी मनातल्या त्या परमेश्वराशी एक निःशब्द नातं जपणं... यातही तर एक वेगळीच भक्ती असू शकते.
कदाचित प्रपंच सोडून परमार्थ शोधण्यापेक्षा प्रपंचात राहून परमार्थाची जाणीव जपणं अधिक कठीण असावं.
आणि या सगळ्या विचारांमध्ये पुन्हा एकदा मन सद्गुरूंच्या चरणी येऊन थांबतं.
देवाला जाणण्याचा प्रयत्न करताना कितीतरी प्रश्न पडतात. त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या इच्छेबद्दल, आपल्या कर्माबद्दल.
पण... जेव्हा सद्गुरूंचा सहवास लाभतो, त्यांच्या शब्दांतून किंवा केवळ त्यांच्या अस्तित्वातून काहीतरी उमगतं, तेव्हा या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची घाईच कमी होते.
सद्गुरू म्हणजे कदाचित प्रत्येक प्रश्नाचं तयार उत्तर नव्हे; तर स्वतःच्या आत डोकावण्याची दृष्टी.
त्याच्या मार्गदर्शनातून स्वतःला समजून घेण्याचा, स्वतःच्या मर्यादा ओळखण्याचा आणि जगण्याकडे अधिक समंजसपणे पाहण्याचा प्रवास सुरू होतो.
देव जाणण्याची माझी पात्रता किती, माझी भक्ती किती प्रगल्भ, माझे अनुभव किती मोठे, याचा हिशोब कशाला?
कधी कधी एवढंच पुरेसं वाटतं की, या सगळ्या प्रवासात एक मार्गदर्शक हात सोबत आहे.
माझ्या प्रयत्नांना दिशा देणारा, माझ्या मनाला स्थैर्य देणारा आणि माझ्या श्रद्धेला अधिक खोल नेणारा.
'एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा...'
या ओळीचा अर्थ आज कदाचित नव्याने जाणवतो आहे.
आयुष्यात सगळंच समजेल असं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल असंही नाही.
प्रत्येक अनुभवाचं स्पष्टीकरण देता येईलच असं नाही.
पण तरीही मनात एक विश्वास असू शकतो. आणि कदाचित त्या विश्वासातच मनाला हवी असलेली शांतता दडलेली असावी.
आज या सगळ्या विचारांचा काही ठोस निष्कर्ष काढावासा वाटत नाही.
कारण काही विचार उत्तरांसाठी नसतातच. ते केवळ मनात उमटण्यासाठी असतात.
आपल्याला थोडं थांबवण्यासाठी, स्वतःकडे पाहायला लावण्यासाठी आणि नकळत आपल्या आतल्या प्रवासाची जाणीव करून देण्यासाठी असतात.
साईबाबांची ती ओळ पुन्हा मनात घुमते आहे...
'तुमचा मी भार वाहीन सर्वथा,
नसे हे अन्यथा वचन माझे.'
काही क्षण असे असतात, जेव्हा मनाला काही मागायचं नसतं, काही सिद्ध करायचं नसतं, अगदी काही बोलायचंही नसतं.
फक्त शांतपणे नतमस्तक व्हावंसं वाटतं.
प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायलाच हवं असं नाही.
काही अनुभव असेही असतात, ज्यांचा अर्थ त्या क्षणी उमगत नाही; पण काळाच्या ओघात तेच अनुभव नव्याने काहीतरी सांगू लागतात.
काही जाणीवा शब्दांत मांडता येत नाहीत, तरी मनाच्या गाभाऱ्यात कायमच्या रुजून राहतात.
आणि मग वाटतं, अनुभव म्हणजे केवळ काहीतरी घडून जाणं नव्हे; तर त्या घडण्याने आपल्या मनात उमटलेली एक अनामिक जाणीव असावी.
कदाचित तीच... अनुभवाची अनुभूती!
- अनुप्रिया सावंत
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.