आपली मुले शाळेत जाताना कशी जातात? कोणत्या मुलांसोबत जातात? त्यांचे मित्र कोण? ह्या बाबत पालकांनी जागृत राहणं अत्यावश्यक आहे. रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांना हात दाखवत लिफ्ट मागणे ही शाळेतल्या मुलांची रोजच्या पाहण्यातली गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
शाळेत जायला उशीर म्हणून असो कि मज्जा मस्ती. सर्रास रस्त्यावर गाड्यांना हात दाखवत लिफ्ट मागतात. त्यांच्यातल्या बऱ्याच मुलांना लिफ्ट मिळतेही. लिफ्ट देणारे जास्तीत जास्त बाईक स्वारच असतात. मुलं सहज त्यांच्याबरोबर निघून जातात. पण कुठल्याही बाबतीतला विचार न करता त्यांच्याबरोबर निघून जाणे, ही खरी तर त्यांची अल्लड बुद्धी म्हणायची कि आणखी काही. जे त्या मुलांना लिफ्ट देतात ते माणुसकी म्हणून असो कि भावनिक असो, हे त्यांनीही थांबवायलाच हवे. कारण त्यांच्या तसे करण्याने मुलांच्या चुकीच्या प्रवृत्तींना कळत-नकळत बळ मिळते.
बऱ्याच वेळा आपण पेपर मध्ये मुलांच्या अपहरनाबद्दल वाचतो. पण त्याचा गंभीरतेने ना मूले विचार करत ना पालक. आपली मूले शाळेत जाताना खरच असा प्रकार करत असतील तर! ह्या गोष्टीचा विचार फक्त पालक आणि मुलांनीच करावा असेही नाही. तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात आणून देऊन त्यास आळा घालावयास हवा. पालकांनीही स्वतः वेळीच सावध होऊन मुलांनाही ह्याबाबतची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
खरं तर प्रत्येक वेळी पालक आणि शिक्षक आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकतील असेही नाही. पण तरीही शक्य तितकं सर्वांनीच ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून आपल्या मुलांना ह्या गोष्टीची जाणीव करून देऊन त्यांनाही त्यांच्या स्वतःसाठी तसेच त्यांच्या वर्गमित्रांच्या सुरक्षीततेसाठी चुकीच्या गोष्टींना आळा घालायला शिकवायलाच हवे.
एक सुजाण नागरिक म्हणून हे आपले कर्तव्यही आहे आणि आपली नैतिक जबाबदारीही आहे.
अनुप्रिया आदित्य सावंत.
मागील कथा वाचा पुढील कथा वाचा
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.