Friday, 22 November 2024

कविता #21- लेखणीचा लपंडाव

 

Published in #Pratyaksha newspaper 


     आज बऱ्याच दिवसानंतर हो नाही करत काही तरी लिहायला सुचलंय.  पण त्या मागे मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे दोन्ही इच्छा शक्तिंचे पाठबळही होतेच.  ह्याचे सर्व श्रेय त्यांचेच आहे.  कारण त्यांच्यामुळेच थांबलेल्या या गाडीला पुन्हा नव्याने 'एक्स्प्रेस वे' गवसावा असं वाटतंय.  आणि हे वाटणं मला मात्र पूर्णपणे मनसोक्त अनुभवायचं आहे.


     सध्याच्या गडबडीत शब्द सुचणं म्हणायला गेलं तर मला कठीणच वाटत होतं. हृदयाला गोष्टी भिडत नाहीत तोपर्यंत मनाचा आणि बुद्धीचा मेळ साधला जात नाही, अगदी तसंच काहीसं!  भिडलेल्या हृदयाला हे वाक्य कारणे दाखवा निमित्त म्हणावं तरी काही रुपी हे खरंही असावं.  काय वाटतं?


     मन शांत जरी ठेवले तरी विचारांना लगाम द्यायचा की त्यांना मुक्तविहार करू द्यायचं?  लगाम दिला तर डोक्यातल्या भूणभूण करणाऱ्या भुंग्यांना आपण किती थांबवणार! आणि मुक्ताविहार करायला द्यायच म्हंटले तरी किती धरून ठेवणार!  नाही का?


     ह्यांच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र ज्ञानेंद्रियांना आपला डाव साधला.  आणि ना हा म्हणता म्हणता 'लेखणीचा लपंडाव' सरसर पानांवर धावला.  डोक्याने मनाशी गट्टी करत हृदयावर पकड धरली आणि अलगद त्यावर विसावत ओठांच्या कडांवर रुंदावली.


लेखणीच्या कुशीत पेनच रुसला
कागदावर त्याचा फटकाच बसला.

शाईने सोडली पेनाची साथ
रबर म्हणाला ही काय बात!

डोळ्यांनी दिले त्यावर इशारे
गोल-गोल फिरले ह्यावर बिचारे!

नाकाचा शेंडा भलताच उडाला
हलकाच पाण्याचा थेंब गळाला.

ओठांच्या बाणाने निशाणा साधला
सरळ रेषेत समांतर धावला!

कानांच्या पाकळ्यांनी हलक्यात घेतले
दातांच्या फटीत जिभेला धडकले.

मनाने थेट इशाराच साधला
बुद्धीच्या विचारांना छेद लगावला!

हळूच उतरले काव्यांचे रंग
गोबऱ्या गालावर हसूच दंग.

जमले म्हणत हात सरसावले
त्यावर पायाने ठेकाच लगावले.

लेखणीला आले हुरूप शाईवर
उतरले शब्द थेट पानांवर.

                                         - अनुप्रिया सावंत.

Friday, 10 May 2024

शिदोरी - लव्ह यू जिंदगी💞

निळभोर आकाश, चंदेरी रुपेरी वाळू, समोर लाटांवर स्वैर होणारा मुक्त आणि अथांग समुद्र आणि समुद्राला शोभा देणारी, त्याचे अस्तित्व जाणवून देणारी नारळाची उंच उंच झाडी.  


सागराचा साथी असणारा त्याचा एकमेव किनारा ज्याच्यावर हक्क गाजवताना आपल्याला साऱ्या जगाचा विसर पडतो.  


ह्या सागराच्या खोलीचा थांगपत्ता कधी लागणं खरंच शक्य नाही.  अगदी प्रत्येकाच्या मनासारखं.  पोटात अनेक गोष्टी दडवून ठेवल्या असतात.   त्याच्यासोबत अनेक जीवांना सांभाळत आपले कार्य पूर्ण करत त्याचा प्रवास मात्र चालूच असतो, अगदी अनादिकाळापासून अनंतापर्यंत.  त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेताना गडद होऊन गुडूप व्हायला होत.  अगदी कितीतरी रहस्य दडवून तो तसाच त्याच्या साथीदारांसोबत खळखळत असतो.  त्याचे अश्रू कधी दिसत नाही, मात्र जाणीव होत राहते.  


राग, आनंद, दुःख, वेदना, जाणीव, लोभ, प्रेम, त्याग अगदी सर्वच.  भावनेचा पुरही वाहून जातो, त्यात अनेक गोष्टींचा उच्छाद मांडला जातो, कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध.  कधी तर खवळल्यासारखं अगदी बाहेर किनाऱ्यावर फेकून देतो.  तर कधी त्या किनाऱ्यावर संथपणे तरंगत राहतो आणि पुन्हा परतीचा प्रवास करत त्याच्या दाट खोलीत सामावून जातो.  


हा सागर त्याचं कार्य कधीच विसरत नाही.  किंबहुना त्याला त्याच कार्य विसरून चालतच नाही.  म्हणूनच तो त्याचं भान हरपून जगतो आणि जगताना त्या आकाशाला पुन्हा नव्याने मिठी मारत साद घालत राहतो, कारण त्याला त्याची डेस्टिनी माहीत असते.  अशी डेस्टिनी जी त्याच्या कार्याला पूर्णत्व देते.  कसलीही अपेक्षा न करता तो फक्त निर्सगाच्या सानिध्यात स्वतःला झोकून देतो आणि तेच खर त्याच अस्तित्व असत.


माणसाच्या आयुष्याचं ही तसच तर असत.  कुठे थांबायचं हे आपलं आपल्याला कळायला हवं.  मला हे हवंय किंवा मला हे मिळालच नाही म्हणून स्वतःला कोसत राहण्यापेक्षा आपला किनारा आपण सांभाळायला हवा.  


सागर जेव्हा समुद्राचा किनारा सोडून वाहतो तेव्हा त्याच्या कृतीने बऱ्याच गोष्टी हातापलिकडे जातात ज्यांना सांभाळणं कठीण होत.


आपल्या आयुष्याचा किनारा सुद्धा असाच आहे, तो ओलांडला की मार्ग हरवतोच. 

 

आपली मर्यादा माहीत पाहिजे हे नक्की, 'But remember that Sky is the only limit.' 


आयुष्य जगायचं असेल तर समुद्रासारखे जगले पाहिजे.  सगळ काही सामावून सुद्धा नामा-निराळा.  आहे त्यात सुख शोधून आपली डेस्टिनी मिळवणारा.  सतत खळखळणारा, कधी संथ होऊन वाहत राहणारा, तर कधी लाटांवर मुक्तपणे संचार करणारा.  


आयुष्य म्हणजे एक सुंदर फुल आहे.  त्या फुलात देवाने त्याचा सुगंध अगदीच भरभरून दिला आहे.  त्या फुलाला जपत त्याचा ताजेपणा बहरत ठेवणं हे आपलं कार्य आहे.  कारण मनुष्य हा 'प्रवासी' आहे.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, मात्र परतीचा प्रवास प्रत्येकाला सारखाच आहे.


आदमी मुसाफिर है

आता है जाता है|

आते जाते रस्ते मे 

यारी छोड जाता है|


आपण कोण आहोत हे लोकं नक्कीच विसरून जातील.  मात्र आपण काय आहोत, काय केले आणि कसे जगलो हे नक्कीच लक्षात राहतं.  


आमची आई नेहमी सांगते...

"Say yourself just... Love you Jindagi💞".

                                                            

                                                                  - अनुप्रिया सावंत.

Friday, 3 May 2024

लघुकथा #1 - Be Optimistic!


चिनू शाळेतून रडतच घरी आली.  आल्या-आल्या हातपाय न धुता तशीच नाराज बसली.  देवघरातील अगरबत्तीचा सुवासाने तिला प्रसन्न वाटत होतं.  तरीही शाळेतल्या गोष्टीमुळे ती पुन्हा उदास झाली.  आईने तिला स्वच्छ हातपाय धुवून तयार होण्यास सांगितले.  छोटी चिनू आज्ञाधारक बाळाप्रमाणे तशीच उठून हातपाय धुण्यास गेली.  


गरम गरम शिऱ्याचा खमंग वासाने चिनुची मोठी ताई चिऊ बाहेर आली.  अभ्यास करून तिच्या खोलीतून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला येत असताना तिचं लक्ष आपल्या छोट्या चीनुकडे गेलं.  आपल्या छोट्या बहिणीला असं रुसलेल बघून तिने आईला नजरेनेच काय झाले ते विचारले, त्यावर आईने डोळ्यांनीच थोडा वेळ थांब सांगितले.  


चिनू नाश्त्याला बसल्यावर आईने गोड हसून तिला हळूच साद घातली तशी चिनू आईला घट्ट बिलगली.


अगदी लहान निरागस बाळासारखं मुसमुसतच शाळेत निंबंध स्पर्धेतल्या तिचा क्रमांक कसा हुकला ते रडत रडत आईला सांगायला लागली.  चिनुला तस करताना पाहून चिऊ ताईला हसूच आले.  तसं आईने डोळे मोठे करून चिऊला गप्प केले आणि गोड हसून मायने चिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  


स्पर्धा नेहमी चालूच असतात.  क्रमांक हुकला म्हणून रडण्यापेक्षा तू स्पर्धेत सहभाग घेतलास हीच गोष्ट तुला पुढे यश देणार आहे.  


क्रमांक हुकला म्हणून त्यासाठी आज रडत बसून नाराज होण्यापेक्षा पुन्हा नव्या जोमाने तयार होऊन येणाऱ्या संधीला हसून साद घाल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपण त्यात रंग भरले पाहिजे.


प्रत्येकाच्या बाबतीत छोट्या-मोठ्या गोष्टी कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध होतच असतात.  


त्यातही गंम्मत म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुपित उलगडावं तसं नवीन ज्ञानाचं भांडार खुले होत असते.


म्हणतात ना, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक मार्ग उघडे होत असतात.  फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.


छोट्या छोट्या गोष्टीत रडण्यापेक्षा ऑप्टिमिस्टिक राहण्यात खरं सुख आहे.  त्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.  तरंच खरी मज्जा! 


काय?  पटतंय ना!  


थोडा है, थोडे की जरुरत है|


आईचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून दोघींना नेहमीच खूप छान वाटायचं.   


आपल्या आईला जादू की झप्पी देत चिनू आणि चिऊ दोघींनीही हसून मान डोलावली आणि देवघरातील अगरबत्तीच्या सुंगांधासारखा विचारांतला सुंगंध प्रसन्नतेने सर्वत्र दरवळला.


                                                                - अनुप्रिया सावंत.

Tuesday, 18 July 2023

कविता #२० - किमयागार

Photo: Google

           Photo courtesy: Google

(प्रस्तुत कविता 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे.)

          व्यक्ती तशी वल्ली तितक्याच प्रकृती.  माणसांमध्ये ही गोष्ट प्रत्येकाला पाहायला मिळतेच.  पण त्याच माणसांना खुलवणारा, हसवणारा, साद घालणारा आणि त्याच्यासोबत जुळवून घ्यायला शिकवणारा मात्र समोर असूनही अलिप्त राहत असतो तितकाच अलिप्त असूनही जवळ असतो.  म्हणूनच तर ह्याला 'किमयागार' म्हणतात.  बरोबर ना!  ह्याची जादूच निराळी.  जगायला शिकवणाराही हाच आणि जगताना अनुभवायला शिकवणाराही हाच.


 रोपट्यांनी साऱ्या फुलावे घट्ट मातीच्या साक्षीणे

फुला - फुलाने बहरावे वाऱ्याच्या सोबतीने!


चांदण्याची सारी शोभा निळ्या नभी चमकावी

मधूनच तारे - तारका त्याच्या सोबतीने असावे!


सर्व दिशांतले वारे घट्ट मिठीत विसावे

मंजुळ ध्वनीच्या लहरी त्यात डुलत राहावे!


खळखळाट नदीचा नाद चहू बाजूंनी गर्जितो

डोंगर दरी कपाऱ्यातून बेधुंद मुक्त संचारतो!


किमया ही किमयागाराची तोचि साधितो जाणावे

त्याच्या सोबतीने सारे आपण चालतची राहावे!!!

                                                         अनुप्रिया सावंत. 

Tuesday, 9 May 2023

कविता #१९ - मागे वळून पाहताना...

(सदर कविता 'प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक वृत्तपत्र' मध्ये छापून आलेली आहे.)

     दिवसामागून दिवस जातच असतात. मिनिटामिनिटाच्या हिशोबात म्हणतात ना, वेळ कधी थांबत नाही.  तरी उगाच आपण बऱ्याचदा घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो.  जर-तर मध्ये काही तथ्य नसतेच, मात्र आपण त्यातच गुरफटत असतो.  हातात असणाऱ्या गोष्टींपेक्षा नसणाऱ्या गोष्टीत आपण जास्तच गुंतून राहतो.  चढ-उतार अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण मन आपणच कसे वेगळे हे सिद्ध करत राहतं.  बरोबर ना!  आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगता यायला हवं आणि जगताना ते अनुभवताही यायला हवं.  डिजिटलायझेशनच्या युगात सर्व शक्य आहे, फक्त त्याचा उचित वापर करता यायला हवं!  असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली, हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


 असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली

जीवनाच्या वळणावर आस नित्य मनी

ध्यास असावा सोबती अन महत्वाकांक्षा

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


लाटा येती किनारी नि निघोनी जाती

फोडुनी टाकावी त्याच जिद्दीच्या बळाने

आहोटी आणि भरतीच्या ह्या विशाल भिंती

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


प्रवाहासोबत प्रवाहाविरुद्धही पोहावं लागते

वाराही जिथे बदलतो दिशा वादळी भीतीने

आपण मात्र संकटी ठाम असावं नक्की

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


आनंदाच्या हिंदोळ्यावर अनुभवाचे चीज

परिश्रमाचे साक्षीने रोवावे त्याचे बीज

कृतज्ञता ठेवुनी ठायी असावे निश्चिन्त

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


                                   - अनुप्रिया सावंत.

Friday, 21 October 2022

कविता #18 - स्वच्छंदी

     खरं तर लिहिण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे प्रत्येकाकडे खूप काही असते. आवडीचे पदार्थ खायचे आहेत, बनवायचे आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, मैत्रिणी-मित्रांना भेटायचे आहे, भटकंती करायची आहे, लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे, खूप काही छान छान गोष्टी करायच्या आहेत. सर्वात महत्वाचं स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. मात्र सगळं कळत असूनही हे आपलं मन मात्र अनेकानेक गोष्टीत अडकलेले राहिले आहे आणि त्यातून आऊटपुट काय? थोडं गंमतीत घ्यायचे झालं तर 'बाकी सब ठीक है| हो की नाही?

     आपल्या मनाला आपण खूप बांधून ठेवतो. एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की मात्र एक नाही दोन नाही अनेक दगड समोर येऊन उभे राहतात आणि सुरु होते मनाची लहर! तुम्हाला म्हणून सांगते अगदीच 'कहर' आहे हो हे!  
तेवढ्यात मन गुणगुणू लागते... दगड दगड दगड दगड इकडे दगड तिकडे दगड... दगड दगड दगड दगड. थांबा थांबा..... तुम्ही लगेच चाल म्हणायलाच सुरुवात केली...

     खरं तर मीच खूप दिवसांनी माझ्या ब्लॉगला भेटायला आले आणि तिथे पुन्हा 
भेट झाली माझ्यातल्या हरवलेल्या 'मी' ची. असा 'मी' जो पुन्हा स्वतःला काही सांगू पाहत आहे, काहीतरी सुचवायचे आहे, काहीतरी पुन्हा त्या दुनियादारीत स्वतःलाच नव्याने पाहायचे आहे. कामे तर प्रत्येकाचीच चालू असतात. वेळ नसतोच, तो आपल्याला काढावा लागतो, हे माहित असूनही चालण्यातला वेग थोडासा कमी झालेला असतो. थोडासाच म्हटले, कारण नुसती गाडी चालू करून उपयोग नाही, ऍक्सिलेटरवर जोर धरावाच लागतो. आपल्यातला छंद आपण नाही जपला तर ह्या आपल्या 'स्वच्छंदी' मनाला साद कशी घालणार?



नको राग नको द्वेष,

नको लोभ विनाकारण त्वेष,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको थट्टा नको मस्करी,

नको हांजी कुणाची फुशारकी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको लालच नको बंधने,

नको खोटे नाते आश्वासने,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


रम्य चित्र संगीताची साथ,

नभी इंद्रधुनचा रंग खास,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


शुभ्र आकाश ढगांची बात,

पक्षी स्वैरावत मनमुराद गात,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


वेळेचे गणित बांधूनी गाठोडी,

स्वप्नांचे पंख घेऊनी भरारी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


                                                      - अनुप्रिया सावंत


Tuesday, 31 May 2022

व्याकरण - विरामचिन्हे

  


लिहिताना आपले हावभावआपल्या भावना व्यक्त करताना चिन्हांचा वापर करावा लागतो.  ह्याच चिन्हांना मराठी व्याकरणात आपण 'विरामचिन्हेअसे संबोधतो.

(WHENEVER WE EXPRESS OUR FEELINGS BY WRITING , WE HAVE TO USE SOME SYMBOLS AND THESE SYMBOLS ARE CALLED PUNCTUATION MARKS.)

Ø  "वाहकिती छान."

Ø  तुझे नाव काय आहे?

Ø  मी अनुप्रिया आहे.

वाक्य वाचताना आपल्याला त्या चिन्हांनुसार आवाजातील चढ उतार बदलताना जाणवतो.  आणि म्हणूनच आपल्याला त्या वाक्यांतील भाव ओळखण्यास मदत होते.  अशा चिन्हांच्या संचांना(Group) आपण 'विरामचिन्हे' म्हणतो.

 

v  लेखनात येणारी प्रमुख विरामचिन्हे अभ्यासुयात.

 

१. पूर्णविराम (.) – (Full Stop)

१. वाक्य/विधान पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी ह्याचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

- माझे नाव अनुप्रिया आहे.


२. शब्दांचे संक्षिप्त रूप (In short) दर्शविण्यासाठी आद्याक्षरापुढे ह्याचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

वि. वि. = (विनंती विशेष)

वि. दा. सावरकर = (विनायक दामोदर सावरकर)


२. स्वल्पविराम (,) - (Comma)

     एकाच प्रकारचे अनेक शब्द एकामागोमाग / लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.


उदाहरणार्थ,

छान, सुंदर, अप्रतिम आणि जबरदस्त काम केले आहेस.


- दुसऱ्याला उद्देशून/संबोधन करताना स्वल्पविराम वापरला जातो.

उदाहरणार्थ,

सीमा, हे पुस्तक वाच.

 

प्रश्न चिन्ह(?) – (Question Mark)

     प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिन्हाला प्रश्न चिन्ह असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

        तुझे नाव काय आहे?

        तू कुठे राहतोस?

 

उद्गारवाचक चिन्ह (!) – (Exclamation Mark)

             आनंददुःखआश्चर्यराग अशा भावना व्यक्त करताना शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्हांचा वापर करतात. 

उदाहरणार्थ,

अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.


अवतरण चिन्ह (") (‘) – (Quotation Mark)

     दुसऱ्यांचे म्हणणेमहत्वाचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर करतात.

Ø  दुहेरी अवतरण चिन्ह (")

Ø  एकेरी अवतरण चिन्ह (‘)


एकेरी अवतरण चिन्ह (‘) - जेव्हा महत्वाच्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दर्शवायचा असेल तेव्हा एकेरी चिन्हांचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

ü  साने गुरुजी ह्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचनीय आहे.

ü  'ज्ञानेश्वर' हे थोर संत होते.

 

दुहेरी अवतरण चिन्ह (") - बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ,

ü  शिक्षक म्हणाले"मुले अतिशय हुशार आहेत."


                                                                  - अनुप्रिया सावंत.

Sunday, 24 April 2022

व्याकरण - भाषा व वर्ण



भाषा - विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे 'भाषा' होय.

(Language - It is a means of expressing thoughts.

साधन – Method/tool/way)

 

वर्ण - आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.

(वर्ण – Letter/character)

मूलध्वनी – Basic Sound)



मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.  त्यांना 'मुळाक्षरे' किंवा 'वर्णमाला' असे म्हणतात.

('मुळाक्षरे' किंवा 'वर्णमाला' – Alphabets)

 

उदाहरणार्थ (Example),

हरीण – ह + अ + र + ई + ण + अ

           या ध्वनींना आपण 'वर्ण' म्हणतो.

                                                                - अनुप्रिया सावंत.

Monday, 14 March 2022

व्याकरण - नाम(Noun)



‘नाम’ म्हणजे काय?  (What is Noun?)

     एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्यालानामअसे म्हणतात.

(Noun - A word that is the name of a thing, an idea, a place or a person.)


उदाहरणार्थ,

चित्रे पाहून तुमच्या लक्षात येईल नाम म्हणजे एखाद्या गोष्टीला/वस्तूला (object) दिलेले नाव होय.



खालील चित्रात काही वाक्ये व चित्रे आहेत. प्रत्येक गोष्टीला ओळखण्यासाठी आपण त्यानुसार नाव दिलेले आहे.  



नाम म्हणजे अशी गोष्टी की ज्याला ठराविक असे काही नावे दिली जातात.

नामाविषयी अजून काही उदाहरणे पाहुयात.

  • पुस्तक टेबलावर ठेव.
  • राघव बाजारात जा.
  • मुले घरी गेली.
  • घराशेजारी मोठी नदी वाहते.
  • विहीर मोठी आहे.
  • तलावात बदक पोहत आहेत.
  • निसर्ग सुंदर दिसत आहे.
  • झाडे हिरवीगार आहेत.
  • सिंह शूर प्राणी आहे.
  • समुद्र विशाल आहे.


वरील विधाने/वाक्ये (Sentences) वाचत असताना आपल्या लक्षात येते की, एकाच वाक्यात अनेक नामे आलेली आहेत आणि म्हणूनच ह्या नामाचे काही विशिष्ट प्रकारही येतात.


नामांचे प्रकार

नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१) सामान्यनाम

२) विशेषनाम

३) भाववाचक नाम



नामांचे प्रकार असेच सहज व समजायला सोप्या उदाहरणासहित अभ्यासुयात पुढील भागात.  


*मराठी व्याकरणासंदर्भातील तुमचा अभिप्राय नक्की कळवावा.*  

*ब्लॉगला कनेक्ट राहण्यासाठी ब्लॉग नक्की फॉलो (Follow) करा.*

*ब्लॉगवरील व्याकरणाचे विडिओ तुम्ही YouTube Channel वर पाहू शकता.*




                                                                     अनुप्रिया सावंत.