Saturday, 25 October 2025

"देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास!"


        आज आमच्या दोघींचा, एखादी गोष्टी तयार कशी करतात आणि कशा कराव्यात ह्यावर छोटासा संवाद चालू होता.  संध्याकाळी नकळत ती धडाधड तिच्या देवबाप्पाची गोष्ट सांगत गेली आणि मी हो हो करत तिच्या गोष्टीतले वाक्य तसेच्या तसे मोबाईलमध्ये लिहून घेत राहिले.  मला असे करताना पाहून तिला बरेच प्रश्न पडले.  तिने विचारलेही... तू काय करतेस आई?  आणि मग तिला मी तिचीच गोष्ट जशी तिने सांगितली तशी लिखित स्वरूपातली वाचून दाखवली.  


खरं तर दोघींना नवीन पैलू मिळत गेले आणि आज प्रथमच प्राजक्ताने तिला आकलन झालेली गोष्ट असेल, विचार असेल किंवा तिचा दृष्टिकोन असेल जे मी फक्त लेखणीतून मांडले.  


     हे अगदीच खरंय!  आपण मुलांना जे सांगतो त्याचा बॅक ऑफ द माईंड मुले खूप खोल विचार करत राहतात.  ती ऐकत असणाऱ्या अग्रलेख मधल्या कथा, 'प्रत्यक्ष'मध्ये येणारे शेवटच्या पानांवरील ललित लेखन, तिला वाचून दाखवत असणारे लेखन, कविता ह्या सगळ्या तिच्या बुद्धीला, मनाला ज्या भिडल्या त्या प्रमाणे आलेल्या तिच्या विचारांचा हा संगम आहे.  प्रत्यक्षपणे 🙏हरीकृपा ही केवलम्! श्रीराम!🙏


कथेचं नाव: "देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास!"

प्राजक्तावीरा सावंत (वय — ८ वर्षे)

लिहिण्याची तारीख: २८/०८/२०२५ (गुरुवार)


"देव आणि बाळाचा प्रश्नांचा प्रवास"!


एक मुलगा होता.  तो नेहमी खूप प्रश्न विचारत असे,

“हे असे का? ते असे का?” त्याला सतत प्रश्न पडत राहत होते.  तो स्वतःही खूप विचार करत असे,

“देवाने मला असं का बनवलं? तसे का बनवले?”


घरातले लोक त्याचे प्रश्न ऐकून कधी कधी कंटाळून म्हणत,

“तू देव बाप्पाला विचार.”


मुलगा खरंच गेला आणि गणपती बाप्पाला विचारायला लागला, गणेश उत्सव सुरू असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात बाप्पा आले होते.  त्याच्याही घरी आले होते.  


त्याने प्रेमाने बाप्पाच्या डोळ्यात बघत म्हटलं,  “बाप्पा, मी काय करु? मी कोणाला काही विचारलं तर म्हणतात, ‘ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, ह्याला विचार, त्याला विचार, उत्तर तर कोणीच देत नाही!’ आणि आज आई म्हणाली, ‘तू बाप्पालाच जाऊन विचार.’ आता मला तू तरी सांग.”


तो बोलत बोलत तिथेच झोपी गेला. स्वप्नात बाप्पा आले आणि म्हणाले, “बाळा, तू जे काही प्रश्न विचारतोस, त्याची उत्तरे तुला नक्की मिळतील.  मी उद्या तुला भेटायला येईन.”


सकाळ झाली. मुलाला वाटलं, “बाप्पा आता येतील, मग माझ्याशी बोलतील.”  पण बाप्पा आले नाहीत.  शेवटी तो कंटाळून पुन्हा गणपती बाप्पाला विचारतो, “तू तर आलाही नाहीस, भेटलाही नाहीस, आणि काही सांगतही नाहीस!”


तो बाहेर चालत चालत नदीकाठी गेला आणि शांत बसून विचार करू लागला,

“माझे प्रश्न इतके का आहेत? मला खरंच उत्तरे मिळणार नाहीत का? की मी जास्त विचार करतोय का?”


शेवटी तो आर्त स्वरात म्हणाला,

“हे गणेशा, मी कंटाळलो ह्या प्रश्नांनी.”


त्याच वेळी त्याच्या डोक्यावर एक हात आला.  तो डोळे उघडतो तर एक आजोबा हसत त्याच्याकडे पाहत होते. 


आजोबा म्हणाले, “बाळा, एवढा विचार करणे गरजेचे आहे का? काही प्रश्नांना लगेच उत्तरे मिळतात, काही प्रश्नांना थोडा वेळ लागतो. पण विश्वास आणि आपले कार्य दोन्ही चालू ठेवले पाहिजे. थोडा वेळ लागेल, पण मार्ग नक्की मिळतो.”


मुलगा फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. आजोबांचा हस्तस्पर्श आणि बोलणे त्याच्या मनाला खूप आवडून गेले.


तो शांतपणे नदीकाठी बसून राहिला. येताना डोळ्यात खूप प्रश्न घेऊन येणारा मुलगा आता स्वतःमध्ये आनंद आणि विश्वास असलेला अनुभवत होता. त्याला समजलं की, काहीही प्रश्न असोत, माझा देव मला पाहतो आहे. माझा बाप्पा माझ्या नेहमी जवळ आहे, मार्ग दाखवण्यासाठी.


मुलगा पुन्हा आपल्या आजी आजोबांच्या घराकडे जायला निघतो.  दोन दिवस राहून आपल्या घरी जाणारे काही गणपती बाप्पा वाजत गाजत मिरवणुकीतून जात असताना एकच धून त्यात सतत वाजत असते,  ज्यावर सर्वच खूप आनंदाने नाचत असतात.

“बोलो भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा!”


आता मात्र त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास आणि शांतीची चमक अधिक वाढत जाते.  तो हसतो आणि मनात स्वतःशी बोलतो,


“प्रश्न विचारणे चुकीचे नाही; त्यातून मी शिकतो आणि तयार होतो. विश्वास ठेवणे आणि कार्य करत राहणे हेच महत्वाचे आहे. 


आम्ही प्रश्न विचारतो, आम्ही खूप अगावपणा करतो, आम्ही खूप रागावतो, आम्ही खूप भांडतो आणि आम्ही खूप खूप धम्माल पण करतो, कारण आमच्या बाप्पाला आवडते म्हणून.”

गणपती बाप्पा मोरया!


                                                                                    अनुप्रिया सावंत

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.