Published in #Pratyaksha newspaper |
आज बऱ्याच दिवसानंतर हो नाही करत काही तरी लिहायला सुचलंय. पण त्या मागे मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे दोन्ही इच्छा शक्तिंचे पाठबळही होतेच. ह्याचे सर्व श्रेय त्यांचेच आहे. कारण त्यांच्यामुळेच थांबलेल्या या गाडीला पुन्हा नव्याने 'एक्स्प्रेस वे' गवसावा असं वाटतंय. आणि हे वाटणं मला मात्र पूर्णपणे मनसोक्त अनुभवायचं आहे.
सध्याच्या गडबडीत शब्द सुचणं म्हणायला गेलं तर मला कठीणच वाटत होतं. हृदयाला गोष्टी भिडत नाहीत तोपर्यंत मनाचा आणि बुद्धीचा मेळ साधला जात नाही, अगदी तसंच काहीसं! भिडलेल्या हृदयाला हे वाक्य कारणे दाखवा निमित्त म्हणावं तरी काही रुपी हे खरंही असावं. काय वाटतं?
मन शांत जरी ठेवले तरी विचारांना लगाम द्यायचा की त्यांना मुक्तविहार करू द्यायचं? लगाम दिला तर डोक्यातल्या भूणभूण करणाऱ्या भुंग्यांना आपण किती थांबवणार! आणि मुक्ताविहार करायला द्यायच म्हंटले तरी किती धरून ठेवणार! नाही का?
ह्यांच्या लुटूपुटूच्या भांडणात मात्र ज्ञानेंद्रियांना आपला डाव साधला. आणि ना हा म्हणता म्हणता 'लेखणीचा लपंडाव' सरसर पानांवर धावला. डोक्याने मनाशी गट्टी करत हृदयावर पकड धरली आणि अलगद त्यावर विसावत ओठांच्या कडांवर रुंदावली.
लेखणीच्या कुशीत पेनच रुसला
कागदावर त्याचा फटकाच बसला.
शाईने सोडली पेनाची साथ
रबर म्हणाला ही काय बात!
डोळ्यांनी दिले त्यावर इशारे
गोल-गोल फिरले ह्यावर बिचारे!
नाकाचा शेंडा भलताच उडाला
हलकाच पाण्याचा थेंब गळाला.
ओठांच्या बाणाने निशाणा साधला
सरळ रेषेत समांतर धावला!
कानांच्या पाकळ्यांनी हलक्यात घेतले
दातांच्या फटीत जिभेला धडकले.
मनाने थेट इशाराच साधला
बुद्धीच्या विचारांना छेद लगावला!
हळूच उतरले काव्यांचे रंग
गोबऱ्या गालावर हसूच दंग.
जमले म्हणत हात सरसावले
त्यावर पायाने ठेकाच लगावले.
लेखणीला आले हुरूप शाईवर
उतरले शब्द थेट पानांवर.
- अनुप्रिया सावंत.
खूप सुंदर
ReplyDelete