Monday, 1 September 2025

नाटिका: समर्पण

     आज खरं तर लेख लिहिण्यापेक्षा मला काहीतरी वेगळं लिहिण्याची ओढ लागली होती.  आणि ती समर्पणाची ओढ खऱ्या अर्थाने समर्पण रुपी लेखणीतून उतरली.   निमित्त जरी शिक्षक दिनानिमित्त छोटासा भावना व्यक्त करणारा लेख असावा, असे जरी वाटले तरी हे जे समर्पण मांडले गेलंय ते फक्त केवळ त्यांच्याच स्फूर्तीमुळे. 


सिखने के लिये सिखाओगे तो सीख पाओगे…

किसी को सिखाने के लिये सिखाओगे तो कभी नही सीख पाओगे!


     बघायला गेले तर जणू काही आताच्या काळातली catchy लाईन असावी, जी खऱ्या अर्थाने त्यांच्या निर्मळ शुद्ध भावनेतून, विचारांतून मला जणू कळत नकळत लाभलेली शिकवण असावी आणि हेच समर्पण त्यांनी माझी गुरुदक्षिणा पुष्प म्हणून स्वीकारावे ह्या पेक्षा मोठा आनंद तो काय!  


नाटिका: समर्पण

(शिक्षक दिनाचा कार्यक्रम नुकताच संपला आहे. दोन शिक्षिका बेंचवर बसलेल्या आहेत. मुलांनी दिलेली ग्रीटिंग्ज, फुलं आणि सोबतीला हक्काचा चहाचा कप. वातावरण हलकंफुलकं, पण चर्चेला उधाण येणार आहे. पार्श्वभूमीत विद्यार्थ्यांचा गडबडाट आणि हलके स्वरात श्लोक/गाणी ऐकू येत आहेत.)


शिक्षिका १ (हसत, फुलांकडे बघत):

किती गोड ग्रीटिंग्ज दिली आहेत मुलांनी!  खरंच, त्यांच्या निरागस डोळ्यातलं प्रेम पाहून मन भरून आलं.


शिक्षिका २ (मस्करीत):

हो ना!  ही फुलं आपल्या शिकवण्याला मिळाली आहेत, आपल्या चेहऱ्याला नाही.


(दोघी हसतात. थोडा वेळ शांतता.)


शिक्षिका १ (थोड्या गंभीर स्वरात):

आजचा दिवस नेहमीच विशेष वाटतो.  पण मला एक गोष्ट नेहमी हृदयाला स्पर्शून जाते, आपण शिक्षक असूनही अजून शिकतच आहोत.  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांतून, त्यांच्या उत्सुकतेतून, त्यांच्या निरागस उत्तरांतून… कधीकधी त्यांच्या बंडखोर वृत्तीतून सुद्धा, रोज नवं काहीतरी कळतं.


शिक्षिका २ (मान डोलावत):

हो, अगदी खरं आहे.  पण एक गोष्ट नक्की, शिकवणं आणि शिकणं यात फार मोठा फरक आहे.

जो शिकायला तयार असतो, त्याला शिकवणं आपोआप जमतं.

पण जर मनात फक्त 'मी शिकवतेय' एवढंच ठेवलं, तर खरं शिकणं कधीच होत नाही.

'धडा शिकवणं आणि धडा शिकणं', ही जणू दोन टोकं आहेत, पण दोन्ही आवश्यक आहेत.


शिक्षिका १ (उत्सुकतेने):

म्हणजे तुझं म्हणणं काय आहे?


शिक्षिका २ (हळू पण ठाम आवाजात):

सिखने के लिये सिखाओगे, तो सीख पाओगे…

किसी को सिखाने के लिये सिखोगे, तो कभी नही सीख पाओगे!


शिक्षिका १ (विचारात):

म्हणजे?


शिक्षिका २ (शांत स्वरात):

हल्ली बऱ्याचदा आपला अहंकार आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागतो.

आणि आपण चांगल्या गोष्टींपेक्षा चूक कुठे आहे? यावरच जास्त लक्ष केंद्रित करतो.

तिथेच गफलत होते आणि छोटी गोष्ट मोठी होते.  हे मला नेहमी खटकतं.


खरं सांगायचं तर – “छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?”


शिक्षिका १ (विचारात):

बरोबर आहे. आपण बरंच काही चुकांमधून शिकू शकतो, पण त्याऐवजी आपण समोरचा कधी चुकतोय?  आणि मी त्याला कधी एकदा पकडतोय, यावरच वेळ घालवतो.


कधी आपण एक विचार असाही करतो, “मी मोठी आहे तर माझं ऐकलंच पाहिजे”… किंवा “माझी पोस्ट मोठी म्हणून माझा अहंकार जणू सुखावला पाहिजे”.  पण आपण शिक्षक असूनसुद्धा, 'शिक्षक' आहोत हेच विसरतो.


शिक्षिका २ (हसत-उपरोधाने):

हो! आणि कुणी खराखुरा, मेहनती दिसला, तरी आता कौतुकापेक्षा अर्थहीन चर्चाच जास्त ऐकू येतात.  आणि हे हल्ली प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते.


एखादी गोष्ट छोटी करून सोडवता येईल का हे बघण्याऐवजी, “समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?” यातच जास्त लक्ष जातं.

मोठेपणाचा अहंकार म्हणजे खरंतर एक मोठ्ठा दगड आहे, ज्यावर आपणच डोकं आपटून घेतो!


(काही क्षण शांतता.  शाळेच्या अंगणात लाऊड स्पीकर वर श्लोक चालू आहे , “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः…”)


शिक्षिका १ (थोडं थांबून):

आपल्याला बर्‍याचदा वाटतं की “मला खूप काही येतं, माझा इतका अनुभव आहे, मी अमुक आहे, तमुक आहे…”

आणि मग समोरच्याचं बोलणं आपण आपल्या सो कॉल्ड EGO वर घेतो.

पण खरं सांगू? जिथे EGO येतो ना, तिथे व्यक्ती म्हणून स्वार्थ नक्कीच शिरतो.

हा EGO म्हणजे अगदी शत्रू!  सोयीस्कर चांगल्या गोष्टी विसरतो.


थोडा है थोडे की जरुरत है!


एखादी गोष्ट छोट्या प्रमाणात सोडवली तर झालं असतं, पण नाही… आपल्यातला लपलेला अहंकार दगडासारखा आडवा येतो आणि आपणच त्यावर डोकं आपटून घेतो.


शिक्षिका २ (हसत मंजूर करत):

हो अगदी खरं!

बर्‍याचदा आपण वेळ घालवतो तो 'समोरच्याची चूक कशी दाखवता येईल?' ह्यावर. पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे त्या वेळेत स्वतःला आणि देणाऱ्यालाही काहीतरी चांगलं देणं.


चुका सगळ्यांकडून होतात, पण त्या शोधत बसण्यापेक्षा त्यातून शिकणं जास्त महत्त्वाचं आहे.


शिक्षिका २ (खळखळून हसत):

हो! हल्ली चर्चेचं पीक भारीच आलंय!

कौतुकाचं खतच नाही उरलं म्हणायचं!


शिक्षिका १ (गंभीर होत):

पण मग उपाय काय?  आपणही त्यांच्यासारखं करायचं का?  की काही गोष्टी NEGLECT करायच्या?  पण हे NEGLECT करण्याचंही प्रमाण कसं ठरवायचं?


शिक्षिका २ (संयमाने):

अगं उपाय फार अवघड नाही.  जोपर्यंत तुला तुझ्या कामात आनंद मिळतो, तो आनंद फुलाच्या सुगंधासारखा पसरवायचा.  शिक्षक म्हणून आपले विद्यार्थी आपल्या शिकवणीतून फक्त  धडा शिकणार नाहीत,  तर नकळत ते प्रेम, ती आत्मीयता, तो आनंद, शिकण्याची जिद्द आणि प्रेरणा घेऊन जातील.  आणि हीच गोष्ट त्या-त्या क्षेत्रातील अगदी प्रत्येकाला लागू होते, बरं का!


शिक्षिका १ (उत्साहाने, डोळ्यात चमक):

वा! म्हणजे लक्ष इतरांवर नाही, तर माझ्या कार्यातून स्वतःला व स्वतःसोबत इतरांना काय चांगलं देता येईल ह्यावर हवं.  

म्हणजे... जणू परीस स्पर्शे सोने व्हावे!


शिक्षिका २ (मिश्कील टोनमध्ये):

हो… आणि बाकी लोकांचं?

त्यांचं MUTE BUTTON ऑन करून टाकायचं!

नुसतं दुर्लक्ष नाही, तर त्यांच्या गोष्टींना त्यांच्या जागी ठेवून आपला वेळ आणि उर्जा दोन्ही वाचवायची.


शिक्षिका १ (हसत, डोकं हलवत):

खरंय! शेवटी समाधान तेव्हाच मिळतं, जेव्हा आपलं काम पूर्ण केल्याची जाणीव होते.

एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद – तीच तर खरी कमाई!

एक व्यक्ती म्हणून समाजाचे लागणारे देणं  हेच तर खरं 

समाधान!


शिक्षिका २ (हात जोडत, हसत):

हो… तोच खरा समर्पण!


(दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात. मंचावर हलका प्रकाश पसरतो. पार्श्वभूमीत श्लोकाचा आवाज वाढतो. पडदा हळूहळू खाली येतो.)


                                                                  - अनुप्रिया सावंत

Sunday, 17 August 2025

कविता #22 - वाटेवरचा प्रवास!

   

     जीवन हा एक अखंड प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन अनुभव, संघर्ष, आनंद-दुःख यांचे मिश्रण आपल्याला सतत घडवत असते. म्हणतात ना... Change is only constant. आपण चालत आलेली वाट कधी उभी-आडवी, काटेरी; तर कधी हिरवीगार, पावसाळी. पावलोपावली बदलणारा निसर्ग हा आपल्याच मनोवृत्तीचा आरसा असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्की होणार नाही. प्रवास थांबत नाही, चालूच राहतो. थकव्याच्या क्षणीही अंतरंगातील ऊर्जाच पुन्हा पावलं पुढे टाकायला भाग पाडते. त्यातूनच नवे बळ देत असते.


     'वाटेवरचा प्रवास!' ही कविता जीवनाच्या ह्या प्रवासाचीच कहाणी सांगत आहे. संघर्ष आणि थकवा असूनही आशेचा, धैर्याचा आणि उभारीचा प्रकाश आपल्याला पुन्हा चालायला शिकवतो. अंधारानंतर प्रकाश, पावसानंतर ऊन, आणि दुःखानंतर उमलणारा हसरा क्षण, याचं प्रतिबिंब म्हणजे हा 'वाटेवरचा प्रवास!'


पहाटेच्या पायवाटेवर,

पाऊल टाकताच वारा गाई,

दगडधोंड्यांच्या गोष्टींनी,

पाऊल थांबवुनी पाहे जाई!


विचारांचे वळणवाटे,

ओझे जड मनावर चढते,

थकलेले देह-श्वास माझे,

उसासा घेऊन मागे वळते!


अंतरातून ऊब हलकी,

श्वास नवा स्पंदन भरते,

पुन्हा पाऊल पुढे सरके,

धूसरपणावर उजेड फुलते!


कधी वारा झोंबणारा,

कधी सूर्य उबदार होई,

वळणावर धीर नवा तो,

मनाला उभारी देत राहे!


प्रवास कधी लांब, ओसाड,

कधी पावसात भिजवितो,

पावलांच्या ठशांत मात्र,

सूर उभारीचा साठवितो!


शक्ती नसे शब्दांमध्ये,

हृदयात ती साठवलेली,

अदृश्य स्पर्शातून जेव्हा,

जिवाला नवी उभारी देई!


एक काळजाची हळवी हाक,

पोहोचावी काळजापर्यंत,

सूर्यकिरण शुभ्र प्रकाशी,

चांदण्यासारखा तेजोमय!


दाट अरण्यातही सापडावा,

मार्ग एक अंतरीचा शुद्ध,

अंतरात्मा निर्मळ व्हावा,

जैसे परिस स्पर्श सुवासिक!

                                    - अनुप्रिया सावंत

Thursday, 8 May 2025

थर्ड वर्ल्ड वॉर ९ - ऑपेरेशन सिंदूर

 


     हल्लीच शाळेत आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भातील मॉक ड्रिल झाली.  सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच इतर सहकर्मचारी ह्यात शांतपणे पण तितक्याच जलद गतीने कृती करत होते.  बरेच विद्यार्थी गोंधळलेले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या व्यवस्थापनेसंदर्भात घरून ज्ञान प्राप्त असलेले त्यांच्याशी मॉक ड्रिल संदर्भात बोलताना आढळून आले.  शिक्षक विद्यार्थी चर्चा नंतर मनात हा विचार येऊन गेला जर खरंच अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आलीच तर काय?  बऱ्याच ठिकाणी ह्या मॉक ड्रिल घेतल्या जातात पण सामान्य जनतेचे काय?  गृहिणीचे काय?  वयस्कर लोकांचे काय?  लहान मोठी मुले ज्यांना ह्या विषयावर चर्चा तर दूर पण साधी माहितीही नसते त्यांचे काय?  त्यांनी काय करावे?  



     बऱ्याच जणांना मॉक ड्रिल हे माहित आहेच.  पण वेळ आल्यावर प्रत्यक्ष घराघरात लोक त्याला कसे सामोरे जातील?  किती गोंधळ होईल?  विचार आलाच मनात.  माझ्या प्रमाणे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असणारच तेही अनेकदा.  त्याचे प्रात्यक्षिक उत्तर आजच्या 'नॅशनल सिव्हील मॉक ड्रिल' ह्या भारत सरकारच्या निर्णयाने दिला.  


     आज घराघरात ह्या विषयी चर्चा केली जात आहे.  माहित नसलेली गोष्ट किंवा अर्धवट माहित असलेली गोष्ट दोन्ही व्यक्तीला घातकच असतात.  पण त्यामुळे माहिती घेऊच नये किंवा चर्चा करूच नये हे त्याहूनही भयानक असते. 


     पहलगाम दहशतवादी हल्ला हा प्रत्येक भारतीयांसाठी वेदनादायक आणि तितकाच तीव्र निषेध व्यक्त करणारा आहे.  आज भारतीयच नाही तर अनेक देशांमध्ये ह्या हल्लाविरुद्ध निषेध केला जात आहे. 


     हा निषेध फक्त निषेध म्हणून नाही तर त्याविरुद्ध आणि त्यापलीकडे आपल्या भारताने भारतासाठी घेतलेला स्टॅन्ड आहे.  आणि त्याचे प्रत्युत्तर भारताने 28 सप्टेंबर 2016 चा उरी हल्ला,  पुलवामा 'सर्जिकल स्ट्राईक' 26 फेब्रुवारी २०१९ आणि आज 7 मे 2025 रोजी पहलगाम येथे 'ऑपेरेशन सिंदूर' दहशतवाद्यांचा हिशोब करून घेतला गेला.   


गो द्विज धेनु देव हितकारी। कृपा सिंधु मानुष तनुधारी॥

जन रंजन भंजन खल ब्राता। बेद धर्म रच्छक सुनु भ्राता॥2॥


     दहशतवाद्याला धर्म हा नसतोच.  ती एक विकृती आहे.  आणि अशी विकृती त्यांचे पाळेमुळे खणूनच वाढत राहतात.  त्यामुळे त्यांना दिले जाणारे खतपाणी(नेमके काय, कसे व कोणते?) ह्यावर एक सजग नागरिक म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे.  कोणत्याही गोष्टीला खतपाणी मानसिक, भावनिक आणि आर्थिक ह्या मुख्य गोष्टीने मिळते.  ह्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा प्रत्येकाने मागच्या १० वर्षाच्या घडामोडी जागतिक आणि राजकीय पातळी अशा प्रत्येक घटनेचा गोष्टींबद्दल विचार करायला हरकत नाही.  


     सुशिक्षित अडाणी आपल्या आजूबाजूला बरेच पाहायला मिळतात जे मागचा पुढचा विचार न करता सरळ बोलून जातात, 'आपल्याला काय करायचे आहे?'  'अमुक असा नि तमुक तसा.',  'शेवटी राजकारण आहे जो तो आपली खळगी भरतो.'; एका अर्थी त्यांचे म्हणणे बरोबरच आहे, मात्र हेच राजकारण जेव्हा घराच्या उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा मात्र आपण आकांडतांडव करतो. 


    राजकीय(राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ), न्यायाधिक , लष्करी प्रमुख आणि परकीय सत्ता चालवणारे हे सर्वच त्या-त्या देशाला प्रत्यक्ष आकार देत असतात.   पूर्वापार चालत असलेली ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत, बघत आलो आहोत आणि अनुभवतही आलो आहोत.


     देशाचा नेता जितका सक्षम नेतृत्व करणारा तितकाच तो देश सुरक्षित.  ह्याचे प्रत्यक्ष स्वरूप आज आपण सर्वच पाहत आहोत.  भारत म्हणून हिणवणारे तेच लोक आज आपल्याकडे विश्वासाच्या, मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत.  हिमालयासारखी पोलादी छाती असणारा आपला 'भारत' ना कोणी जिंकू शकला ना कोणी हरवू शकला.  


     ज्या हाताने मदतीचा हात पुढे करता येते त्याच हाताने ह्या भारताला वेळप्रसंगी शत्रूला मुळासकट उखडूनही काढता येते.


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:



     अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसरात दहशतवादी घटना घडली जिथे पर्यटक पर्यटनासाठी आले होते.  या भागाला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणूनही ओळखले जाते.



     लहानांपासून वयस्करांपर्यंत सगळेच पर्यटनाच्या आनंदात व्यस्त असताना जो भ्याड हल्ला तिथे झाला तो निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.  


      ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हा क्रूर खेळ  खेळला, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने उचललेले हे पाऊल.   म्हणजेच.....


श्री राम राम रणकर्कश  राम राम




     पाकव्याप्त काश्मीर (पोक), ज्याला पाकिस्तानमध्ये 'आझाद जम्मू आणि काश्मीर' म्हणून ओळखले जाते, हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग पाकिस्तानने कब्जा करून बळकावलेला भाग आहे.  


      कलम ३७० ह्या कलम अंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता.  भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात स्थित असलेला हा काश्मीरच्या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे.  1947 पासून भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील हा वादाचा विषय आहे. 





      हा कलम रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश बनला आहे.  या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील गुंतवणूक आणि विकास त्याच प्रमाणे तिथली जनता देखील जी आधी तिथल्या दहशतवादांच्या दबावात होती ती मुक्त झाली आहे.  कारण तेथील अनेक लोकांचा असा विश्वास होता की हे कलम जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला आणि सामाजिक प्रगतीला अडथळा ठरत आहे.  त्यामुळे जनमत कौल देखील कलम रद्द करण्यासाठी तितकेच महत्वाचे होतेच.  




(जम्मू काश्मीर हे स्वतंत्र संस्थान आणि त्याचे महाराजा हरिसिंह असताना कलम ३७० नक्की का आणि कसे आले?  ह्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल.)




     २३ एप्रिल २०२५ रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येतील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सुरक्षा विषयक बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सिंधू पाणी करार रद्द ते अटारी बॉर्डर बंद हे निर्णय घेतले.  





     स्वातंत्र्याच्या वेळी, दोन नव्याने निर्माण झालेल्या स्वतंत्र देशांमधील म्हणजेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सीमारेषा सिंधू खोऱ्याच्या अगदी पलीकडे ओढण्यात आली होती, ज्यामुळे पाकिस्तान खालचा किनारी भाग राहिला. 


      शिवाय, दोन महत्त्वाचे सिंचन मुख्य प्रकल्प, एक रावी नदीवरील माधोपूर येथे आणि दुसरे सतलज नदीवरील फिरोजपूर येथे, ज्यावर पंजाब (पाकिस्तान) मध्ये सिंचन कालवा पूर्णपणे अवलंबून होता, ते भारतीय भूभागात सोडण्यात आले. अशाप्रकारे दोन्ही देशांमध्ये विद्यमान सुविधांमधून सिंचन पाण्याच्या वापराबद्दल वाद निर्माण झाला.







     या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला वाटल्या जातात. त्याच वेळी, या करारामुळे प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाला वाटलेल्या नद्यांचे काही विशिष्ट वापर करण्याची परवानगी मिळते.


     भारताला विशेष वापरासाठी वाटप केलेल्या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याचा वापर करण्यासाठी, भारताने खालील धरणे बांधली आहेत:


सतलजवरील भाक्रा धरण

बियासवरील पोंग आणि पांडोह धरणे आणि

रावी थीन.




     बियास-सतलज लिंक, माधोपूर-बियास लिंक आणि इंदिरा गांधी नाहर प्रकल्प यासारख्या इतर कामांमुळे भारताला पूर्वेकडील नद्यांच्या जवळजवळ संपूर्ण पाण्याचा वापर करण्यास मदत झाली आहे.


     १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार, रावी, सतलज आणि बियास या तीन नद्यांचे सर्व पाणी भारताला विशेष वापरासाठी देण्यात आले होते. सिंधू पाणी करार हा १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील पाणी वाटप करार आहे. तो जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केला होता. हा एक महत्त्वाचा करार आहे आणि आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी पाणी वाटप करारांपैकी एक आहे.


     या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला देण्यात आल्या आहेत.


      पाकिस्तान हा आधीच जगातील सर्वात जास्त पाण्याची टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे.  पाकिस्तानातील ८०% लागवडीखालील जमीन, सुमारे १.६ कोटी हेक्टर, सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.  


     जर भारताने सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचा प्रवाह कमी केला तर त्याचा परिणाम तात्काळ आणि गंभीर होईल ह्याची जाणीव असलेल्या भारताचे हे पाऊल म्हणजे दहशतवादी गटांना लगाम घालण्यासाठी आणि घुसखोरी थांबवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याची रणनीती आहे.

हरि प्रेरित तेहि अवसर चले मरुत उनचास।

अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि लाग अकास॥25॥


      नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370, 35A, राम मंदिर, सिंधू जल करार स्थगिती आणि आता ऑपेरेशन सिंदूर.




      अजून असे बरेच मोठे मोठे अचूक शिवधनुष्य पेलले जाणार आहेत, तेही योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी.  आपण फक्त रामाचे वानर सैनिक म्हणून कार्य करत राहायचे.  त्याच्या कार्यात खारीचा वाटा उचलता यावा, हीच आई महिषासुरमर्दिनी चरणी प्रार्थना!


युद्ध करेंगे मेरे श्रीराम। समर्थ दत्तगुरु मूल आधार। मैं सैनिक वानर साचार। रावण मरेगा निश्चित ही॥


आजचा मॉक ड्रिल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अगदी जबरदस्त (How is the Josh... High Sir!!!) पार पडला आहे.  


बोलो "जय श्री राम हो गया काम!" 


त्याच्या नामा शिवाय पर्याय नाहीच आणि तो काहीही करू शकतो, अगदी काहीही!


सुंदरकांड मधील शेवटची ओवी सतत मनात गुंजी घालते...

सकल सुमंगल दायक रघुनायक गुन गान।
सादर सुनहिं ते तरहिं भव सिंधु बिना जलजान॥60॥




     वेगाने घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळींवरील घडामोडींवर आपले जमेल तितके आणि समजेल तसे लक्ष असलेच पाहिजे. कारण... Third World War has been Started... 

                                                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 7 May 2025

पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?



पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?


पत्रलेखन म्हणजे आपणच मांडलेले आपले विचार, भावना, आपले मत किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रारी यांचे लेखी स्वरूपात केलेले लेखन म्हणजे 'पत्रलेखन' होय.


बऱ्याचदा आपल्याला भावना व्यक्त करतांना शब्दांची जमवाजमव करावी लागते.  काहीवेळेस भावना व्यक्त करायला वेळेचा अभाव असतो तर काही वेळेस समोरची व्यक्तीच उपलब्ध नसते.  अशा वेळेस लिखित मजकूर आपले कार्य चोख बजावतो. थोडक्यात , हे महत्वाचे संवाद माध्यम आहे. ज्याचे महत्तव आजच्या काळातही तितकेच टिकून आहे.


प्राचीन काळापासून हा प्रकार आपण पाहत आलो आहोत.  काळानुसार त्यात बरेच बदल झाले असले तरी 'पत्रलेखन' हा विषय अजूनही विशिष्ट स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतो.


त्याच गोष्टी लक्षात ठेवून मी आपल्यासमोर पत्रलेखन करतानाचे काही प्रमुख गोष्टी, त्यांचे घटक व स्वरूप सोप्या करून मांडण्याचा प्रयास असणार आहे.


विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केलेला हा आराखडा असला, तरी प्रत्येकाला पत्रलेखन करताना हे स्वरूप डोळ्यासमोर आल्यास सोपे होईल ह्याची खात्री आहे.


पत्रलेखन अनौपचारिक (मित्र - मैत्रिणी, कुटूंब, जवळचे व्यक्ती), औपचारिक(संस्था, कार्यालय किंवा विशिष्ट उद्देशाने), व्यावसायिक(मागणी पत्र, तक्रार)  अशा प्रकारांची असतात.  


खालील पत्रलेखन स्वरूप हा तिन्हींचा एकत्रित करून समजायला सहज असावा अशा स्वरूपाचा नमुना बनवलेला आहे.  अर्थातच विद्यार्थ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल.  



पत्रलेखन स्वरूप:


दिनांक:
प्रति,
नाव
पत्ता
महोदय / प्रिय व्यक्तीचे नाव   (औपचारिक / अनौपचारिक)
नमस्कार  (नमस्कार पद्धत)


विषय (ज्या विषयावर आपल्याला पत्रलेखन करावयाचे आहे तो विषय थोडक्यात स्प्ष्ट असावा.)


विषयानुरूप पत्राचा आशय  (तुम्ही तुमच्या खास शैलीमध्ये तुम्हाला आवडेल तसा आशय / मुद्दे / मत ह्यात मांडू शकता.  जेणे करून पत्राचा मूळ उद्देश ह्यात सविस्तरपणे समोरच्याला कळेल.  आशयामध्ये कमीत कमी दोन परिच्छेद असायला हवे.)


आपला नम्र  किंवा तुझा/तुझी भाऊ/बहीण,   (विषयानुरूप - तुम्ही कोणाला किंवा कोणत्या संदर्भात(औपचारिक / अनौपचारिक) लिहीत आहात त्यावर आधारित तुम्ही पत्र आवरते घेऊन त्यांचे निरोप घेता.) 



(पत्राचा शेवट)
तुमचे नाव  
पत्ता
ई-मेल आयडी
संपर्क साधन


       अशा स्वरूपात तुम्ही पत्रलेखन पूर्ण करू शकता.  विद्यार्थ्यांनी पत्रलेखन करताना कोणत्या भागाला किती गुण आणि कसे गुण विभागले असतात त्यानुसार जर अभ्यास केला तर नक्कीच पत्रलेखन प्रकारात उत्तम गुण मिळवू शकतात.


     आजच्या जगात सोशल मिडीयासारखे साधने, ई-मेल, चॅटबॉक्स असे अनेक साधने उपलब्ध असली तरी, पत्रलेखन अजूनही तितकेच प्रभावी संवाद माध्यम म्हणून वापरले जाते.  त्यामुळे नमुना म्हणून सादर केलेला हा पत्रलेखन प्रकार सामान्य माहिती स्वरूपात आहे.  तुम्ही तुम्हाला आवडेल तसा विषयानुरूप त्यात बदल करू शकता.

                                                                                                                                                 - अनुप्रिया सावंत.