Friday 10 April 2015

तुटे वाद संवाद तो हितकरी...

     
     बऱ्याच दिवसानंतर आज मोकळा वेळ मिळाला. संध्यान्हाच्या वेळेस चहाचा दरवळणारा सुगंधा सोबत बाहेरचा परिसर न्याहाळत बसली होती. आज मनसोक्तपने स्वतःशीच संवाद चालला होता.  
    
     रस्त्यावरची रहदारी, गाड्यांचे आवाज, खेळणारी मुलं, ऑफिस मधून घर परतीच्या प्रवासाला घाई गडबडीत बस, रिक्षा पकडणाऱ्यांची धावपळ. स्वतःच्या बाबतीतही हा अनुभव प्रत्येक जण अनुभवत असतोच. पण का कुणास ठाऊक, आज मन एकदम शांत होतं जणू काही गुलमोहर बहरतो तसं मनही बहरतच होते. 
     धावपळीच्या दुनितयेत स्वतःला आरशात पहायलाही मिळू नये, खरंच एवढे आपण का बरे बिझी असतो? घरच्यांशी मनमोकळेपणे बोलायला वेळही मिळू नये इतके आपण खरच कामात असतो? बरे बोलायला मिळाले, तरी त्यात जास्तीत जास्त संवादा पेक्षा वादच जास्त होतो! कितीही समजून घ्यावे म्हंटले तरी कळत न कळत वाद हा होतोच.  मग हा वाद संवादात रुपांतरीत नाही होऊ शकत का? 


नवरोबा म्हणतात - ऑफिसवरून घरी येउन आराम करावा म्हंटल तर काही ना काही काम निघतेच! साधं २ मिनिट बसायलाही फुरसत नाही? काय हे! जाऊदेत घरीच उशिराने जाऊयात. 

बायको म्हणते - दिवसभर राबावं, घर सांभाळावं तरी प्रेमाचे दोन शब्द बोलायलाही कोणाला वेळ मिळू नये? 
मुलं म्हणतात - आता शाळेला सुट्टी पडली म्हणजे आमची पुस्तकांची कट्टी आणि खेळायची गट्टी जमली. पण कितीही अभ्यास केला, छान वागलं तरी आम्हाला कोणी बुवा समजूनच घेत नाही. 

वयस्कर म्हणतात - वय झालं, म्हातारे झालो, दुखत खुपत कोणाला सांगायची सोय नाही. 

किती हे प्रश्न आणि किती हे कोडं!!!!! 

     प्रत्येक जण स्वतःशीच वाद घालतो नाही का? इतरांशी नाही तर नाही पण निदान स्वतःशी पण संवाद साधू शकत नाही. असे का बरे होते? खरेच! माणसे इतकी बदलतात का हो? काम नाही केले तर खाणार काय? हक्काच्या माणसांची नाही भांडणार तर कोणाशी भांडणार? अभ्यासच करत राहणार तर खेळणार कधी? आमचं कोण कधी ऐकणार का? ह्या ना अश्या अनेक नाना-तऱ्हेच्या प्रश्नांनी स्वतःचच मन स्वतःला भंडावून सोडते.


     प्रत्येकाकडे वेळ ही सारख्याच प्रमाणात असते. फरक फक्त इतकाच कि समोरचा ती वेळ कश्या प्रकारे मेनेज करतो. 'समोरचा वेळ देत नाही', 'आज मला वेळच नाही', खूप कामे आहेत', 'म्हातारे झालो म्हणून थकलो', ह्याच आणि अश्या अनेक कारणांत आपण इतके गुरफटून जातो कि ह्या प्रश्नांच्या साखळीत आपण स्वतःलाही विसरतो. आपले स्वतःचेही अस्तित्व आहे, आपण स्वतः ही आहोत ही जाणीव आपल्याला हा निर्माण झालेला वाद विसरायला लावतो.


     स्वतःला वेळ देण्यात आणि स्वतःशीच संवाद साधण्यात खूप वेगळाच आनंद आहे. १० मिनिटे का होईना! 

एकदा अनुभवून पाहायला हवं,
कधी स्वतःच स्वतःशी हसायला हवं, 

आरशात पाहून छान-छान गप्पा मारायला हव्यात.
चालता चालता निसर्गाला पाहायला हवं. 

 वाऱ्याची झुळूक अनुभवायला हवी,
स्वतःचे कौतुक मनसोक्त करायला हवं, 

प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत, 
आनंद साजरा करायला शिकायला हवं. 

सगळं खूप छान असतं, 
प्रेम आणि पवित्र्यात जपायला हवं. 

     वादाचे रुपांतर संवादात व्हायला फक्त प्रेम पुरेसे असते. प्रेमाचे दोन शब्दही आयुष्य बदलवते. आणि त्या प्रेमासाठी फक्त लाभेवीन प्रीत हवी असते. 

'लाभेवीन'!!!!! 

    लाभेवीन प्रीत जशी परमेश्वर आपल्या भक्तांवर करतो, सद्गुरु त्याच्या लेकरांवर करतो. आई आपल्या बाळांवर करते. प्रत्येकात परमेश्वराचा अंश असतो आणि ती सद्गुरुतत्वानुसार जोडली जाते जन्मानुजन्म, हे शक्य होते 'प्रेम आणि पावित्र्य' ह्याच गोष्टीने. आपण स्वतःवरही अशीच लाभेवीन प्रीत करायला शिकले पाहिजे. त्यात कधीच स्वार्थ येत नाही. स्वतः स्वतःवर अश्या प्रेमात पडलो कि त्याची नाळ संवादाशी नकळत बांधली जाते. नाही का!!!!! 

                                                                                                   -  अनुप्रिया ठोंबरे सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 


1 comment:

  1. अनुप्रिया आपण अप्रतिम विचार मांडले आहेत .खरेच आजच्या धकाधकीच्या जीवनात घडयाळाच्या काट्यांवर कसरत करताना माणूस आपले स्वतःचे अस्तित्त्वच गमावून बसतो की काय अशी खंत मनी दाटून येते. आपल्या घरातील आपल्याच रक्ताच्या
    नात्याशी , आपल्याच जीवाभावाच्या माणसांशी संवादच साधला जात नसल्याने दुरावा निर्माण होत आहे.
    स्वतःशी संवाद साधणे तर खूप लांब राहिले.
    तुमचा लेख वास्तवाचे भान करून देतो आणि काळाची गरज काय आहे ह्याची परखड जाणीवही करून देतो.
    खूप सुंदर रीत्या पटवून दिले आहे.

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.