Sunday, 17 August 2025

कविता #22 - वाटेवरचा प्रवास!

   

     जीवन हा एक अखंड प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन अनुभव, संघर्ष, आनंद-दुःख यांचे मिश्रण आपल्याला सतत घडवत असते. म्हणतात ना... Change is only constant. आपण चालत आलेली वाट कधी उभी-आडवी, काटेरी; तर कधी हिरवीगार, पावसाळी. पावलोपावली बदलणारा निसर्ग हा आपल्याच मनोवृत्तीचा आरसा असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्की होणार नाही. प्रवास थांबत नाही, चालूच राहतो. थकव्याच्या क्षणीही अंतरंगातील ऊर्जाच पुन्हा पावलं पुढे टाकायला भाग पाडते. त्यातूनच नवे बळ देत असते.


     'वाटेवरचा प्रवास!' ही कविता जीवनाच्या ह्या प्रवासाचीच कहाणी सांगत आहे. संघर्ष आणि थकवा असूनही आशेचा, धैर्याचा आणि उभारीचा प्रकाश आपल्याला पुन्हा चालायला शिकवतो. अंधारानंतर प्रकाश, पावसानंतर ऊन, आणि दुःखानंतर उमलणारा हसरा क्षण, याचं प्रतिबिंब म्हणजे हा 'वाटेवरचा प्रवास!'


पहाटेच्या पायवाटेवर,

पाऊल टाकताच वारा गाई,

दगडधोंड्यांच्या गोष्टींनी,

पाऊल थांबवुनी पाहे जाई!


विचारांचे वळणवाटे,

ओझे जड मनावर चढते,

थकलेले देह-श्वास माझे,

उसासा घेऊन मागे वळते!


अंतरातून ऊब हलकी,

श्वास नवा स्पंदन भरते,

पुन्हा पाऊल पुढे सरके,

धूसरपणावर उजेड फुलते!


कधी वारा झोंबणारा,

कधी सूर्य उबदार होई,

वळणावर धीर नवा तो,

मनाला उभारी देत राहे!


प्रवास कधी लांब, ओसाड,

कधी पावसात भिजवितो,

पावलांच्या ठशांत मात्र,

सूर उभारीचा साठवितो!


शक्ती नसे शब्दांमध्ये,

हृदयात ती साठवलेली,

अदृश्य स्पर्शातून जेव्हा,

जिवाला नवी उभारी देई!


एक काळजाची हळवी हाक,

पोहोचावी काळजापर्यंत,

सूर्यकिरण शुभ्र प्रकाशी,

चांदण्यासारखा तेजोमय!


दाट अरण्यातही सापडावा,

मार्ग एक अंतरीचा शुद्ध,

अंतरात्मा निर्मळ व्हावा,

जैसे परिस स्पर्श सुवासिक!

                                    - अनुप्रिया सावंत

3 comments:

  1. Khupach chan💗👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. यह कविता जीवन की सच्चाई को दर्शाती है। आपने बहुत ही सुंदर तरीके से जीवन की यात्रा और संघर्ष को व्यक्त किया है।

    ReplyDelete
  3. अप्रतीम

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.