शाळेतील दुपारची वेळ होती. अभ्यासाचे तास संपले होते आणि कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. समोरून शिक्षिका येताना दिसल्या. त्यांना पाहताच एक विद्यार्थिनी-शिक्षिका आदराने उभी राहिली.
शिक्षिका थोडं थांबल्या, हलकंसं स्मित करत म्हणाल्या,
“प्रत्येक वेळी असं उभं राहण्याची गरज नाही गं! मी इतकी मोठी नाहीये.”
त्यांचा मृदू आवाज मनाला भिडला. त्या क्षणी बालपणात शिकवलेले संस्कार डोळ्यांसमोर आले. गुरुजनांप्रती आदर, मोठ्यांचा सन्मान, नम्रता हे सगळं वागण्यात नकळत प्रकट झालं होतं.
काही दिवसांपूर्वीच प्रिन्सिपल मॅडम भेटल्या होत्या. विद्यार्थिनी शिक्षिका नेहमीप्रमाणे उभी राहिली. त्या हसत म्हणाल्या,
“बस, गरज नाही उभं राहायची.”
ती बसली, पण मनात मात्र अस्वस्थता जाणवली. थोड्या वेळाने नम्रपणे म्हणाली,
“मॅडम, मी कंफर्टेबल आहे. तुम्ही आहात तोपर्यंत मला उभं राहायचं आहे.”
क्षणभर शांतता पसरली. मॅडमच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. त्यांच्या नजरेत एक भाव स्पष्ट दिसत होता. ही कृती शरीराने होत नाही, ती मनातून उमटते. संस्कारांची खरी ताकद अशा न बोललेल्या क्षणांत जाणवते हे मात्र तितकेच खरे!
त्या संध्याकाळी घरी निवांत वेळ मिळाला. गरमागरम चहाच्या वाफेत मी आणि आई गप्पा मारत बसलो. शाळेतील प्रसंग सांगताना आई शांतपणे ऐकत राहिली. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. ती म्हणाली,
“हे त्या बाळामध्ये असणारे संस्कार आहेत अनु. शिक्षकांनी, मोठ्यांनी लावलेली बीजे वागण्यातून उमलतात.
म्हणूनच म्हणतात — "मूळ कधी विसरू नये."
त्या शब्दांतला गहिरा अर्थ मनात कोरला गेला. चहाच्या कपात फक्त चहाचा स्वाद नव्हता, तर नात्याचं उबदारपण, संस्कारांची जाणीव आणि आठवण होती.
रात्रीच्या शांततेत विचार मनात फिरत राहिले. शाळेतील जुन्या दिवसांची आठवण झाली. शिक्षक केवळ विषय शिकवत नव्हते, तर आयुष्य जगण्याचे मूल्यही देत होते. आदर, नम्रता, कृतज्ञता या गोष्टी कुणी दररोज सांगून शिकवलेल्या नव्हत्या; त्या बालपणातच मनात रुजलेल्या होत्या.
संस्कार हे कृत्रिम नसतात. ते लहान लहान कृतींमधून झळकतात. शिक्षक वर्गात आले की उठणं, नमस्कार करणं, मोठ्यांशी संवाद साधताना आदर राखणं. या सगळ्या कृती नियम म्हणून नव्हे, तर भावना म्हणून घडतात.
हो, हे अगदी खरं आहे. या सगळ्या अनुभवातून एक महत्त्वाची शिकवण स्पष्ट झाली ते म्हणजे, संस्कार हे कृतीतून नव्हे तर नजरेतून, मनापासून आणि भावनांमधून प्रकट होतात.
मुळे घट्ट असतील, तर व्यक्तिमत्त्व स्थिर उभं राहतं.
आजच्या आधुनिक काळात बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, पण एक गोष्ट कायम राहायला हवी, ती म्हणजे आपल्या मुळांप्रती 'कृतज्ञता'. कारण मुळेच झाडाला बळ देतात, आणि संस्कारच व्यक्तिमत्त्वाला दिशा देतात.
त्या छोट्याशा प्रसंगाने जीवनाची मोठी शिकवण दिली.
“Never forget your roots — कारण तेच आपल्याला खरं मोठं बनवतात.”
- अनुप्रिया सावंत