Friday 3 May 2024

लघुकथा #1 - Be Optimistic!


चिनू शाळेतून रडतच घरी आली.  आल्या-आल्या हातपाय न धुता तशीच नाराज बसली.  देवघरातील अगरबत्तीचा सुवासाने तिला प्रसन्न वाटत होतं.  तरीही शाळेतल्या गोष्टीमुळे ती पुन्हा उदास झाली.  आईने तिला स्वच्छ हातपाय धुवून तयार होण्यास सांगितले.  छोटी चिनू आज्ञाधारक बाळाप्रमाणे तशीच उठून हातपाय धुण्यास गेली.  


गरम गरम शिऱ्याचा खमंग वासाने चिनुची मोठी ताई चिऊ बाहेर आली.  अभ्यास करून तिच्या खोलीतून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला येत असताना तिचं लक्ष आपल्या छोट्या चीनुकडे गेलं.  आपल्या छोट्या बहिणीला असं रुसलेल बघून तिने आईला नजरेनेच काय झाले ते विचारले, त्यावर आईने डोळ्यांनीच थोडा वेळ थांब सांगितले.  


चिनू नाश्त्याला बसल्यावर आईने गोड हसून तिला हळूच साद घातली तशी चिनू आईला घट्ट बिलगली.


अगदी लहान निरागस बाळासारखं मुसमुसतच शाळेत निंबंध स्पर्धेतल्या तिचा क्रमांक कसा हुकला ते रडत रडत आईला सांगायला लागली.  चिनुला तस करताना पाहून चिऊ ताईला हसूच आले.  तसं आईने डोळे मोठे करून चिऊला गप्प केले आणि गोड हसून मायने चिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  


स्पर्धा नेहमी चालूच असतात.  क्रमांक हुकला म्हणून रडण्यापेक्षा तू स्पर्धेत सहभाग घेतलास हीच गोष्ट तुला पुढे यश देणार आहे.  


क्रमांक हुकला म्हणून त्यासाठी आज रडत बसून नाराज होण्यापेक्षा पुन्हा नव्या जोमाने तयार होऊन येणाऱ्या संधीला हसून साद घाल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपण त्यात रंग भरले पाहिजे.


प्रत्येकाच्या बाबतीत छोट्या-मोठ्या गोष्टी कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध होतच असतात.  


त्यातही गंम्मत म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुपित उलगडावं तसं नवीन ज्ञानाचं भांडार खुले होत असते.


म्हणतात ना, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक मार्ग उघडे होत असतात.  फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.


छोट्या छोट्या गोष्टीत रडण्यापेक्षा ऑप्टिमिस्टिक राहण्यात खरं सुख आहे.  त्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.  तरंच खरी मज्जा! 


काय?  पटतंय ना!  


थोडा है, थोडे की जरुरत है|


आईचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून दोघींना नेहमीच खूप छान वाटायचं.   


आपल्या आईला जादू की झप्पी देत चिनू आणि चिऊ दोघींनीही हसून मान डोलावली आणि देवघरातील अगरबत्तीच्या सुंगांधासारखा विचारांतला सुंगंध प्रसन्नतेने सर्वत्र दरवळला.


                                                                - अनुप्रिया सावंत.

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.