Tuesday 9 May 2023

कविता #१९ - मागे वळून पाहताना...

(सदर कविता 'प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक वृत्तपत्र' मध्ये छापून आलेली आहे.)

     दिवसामागून दिवस जातच असतात. मिनिटामिनिटाच्या हिशोबात म्हणतात ना, वेळ कधी थांबत नाही.  तरी उगाच आपण बऱ्याचदा घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो.  जर-तर मध्ये काही तथ्य नसतेच, मात्र आपण त्यातच गुरफटत असतो.  हातात असणाऱ्या गोष्टींपेक्षा नसणाऱ्या गोष्टीत आपण जास्तच गुंतून राहतो.  चढ-उतार अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण मन आपणच कसे वेगळे हे सिद्ध करत राहतं.  बरोबर ना!  आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगता यायला हवं आणि जगताना ते अनुभवताही यायला हवं.  डिजिटलायझेशनच्या युगात सर्व शक्य आहे, फक्त त्याचा उचित वापर करता यायला हवं!  असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली, हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


 असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली

जीवनाच्या वळणावर आस नित्य मनी

ध्यास असावा सोबती अन महत्वाकांक्षा

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


लाटा येती किनारी नि निघोनी जाती

फोडुनी टाकावी त्याच जिद्दीच्या बळाने

आहोटी आणि भरतीच्या ह्या विशाल भिंती

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


प्रवाहासोबत प्रवाहाविरुद्धही पोहावं लागते

वाराही जिथे बदलतो दिशा वादळी भीतीने

आपण मात्र संकटी ठाम असावं नक्की

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


आनंदाच्या हिंदोळ्यावर अनुभवाचे चीज

परिश्रमाचे साक्षीने रोवावे त्याचे बीज

कृतज्ञता ठेवुनी ठायी असावे निश्चिन्त

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


                                   - अनुप्रिया सावंत.

1 comment:

  1. भावना खूप छान व्यक्त केल्या आहेत. Keep it up

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.