Saturday 12 March 2022

कविता #17 - शब्दांचे गुंफण


       'शब्द' अगदीच अडीच अक्षरांनी बनलेला.  हाच जेव्हा मनाच्या पटलावर उमटत जातो तेव्हा भावना अगदी मुक्त झाल्यासारख्या होतात.  मनात साठवून ठेवलेल्या अनेक विचारांना ह्या शब्दांसह जेव्हा मोकळी वाट मिळते तेव्हा मुक्तछंद पणे फक्त वाहत राहतात.  कधी आनंद, कधी प्रसन्नता, कधी क्लेश, कधी नाराजी, कधी हसणं तर कधी रडणं.  मानवी मन त्याच्या भावना सगळ्याच रसाने अगदी सरमिसळून जातात ते ह्याच शब्दांच्या आधाराने.  खरंय ना! 


     बऱ्याचदा आपल्याला सांगायचं असतं बरेच, पण शब्दांना काही केल्या पकडता येत नाही.  म्हणजे अगदीच म्हणायचं तर शब्दांचे सुद्धा लपंडाव चालूच असतात.  त्यांना पकडण्यासाठी पकडापकडी करत अगदी खो सुद्धा देता येतो.  ह्याच शब्दांच्या दुनियेत कधी दोन रन, कधी चार तर अगदी सिक्स मारून षटकार करताना अगदी भन्नाट मजा येते.  आणि आऊट झाल्यावर मात्र पुन्हा लपाछपी करत हेच शब्द आपल्याला भुलवतही राहतात.  आहे की नाही शब्दांची गंम्मत.  


शब्दांची गुंफण निरंतर अशीच बहरत जावो,

मनाच्या अंतरी प्रत्येक पटलावर रसिक वाचकहो,

सदाबहार नित्यनूतन अशीच सादर होत राहो,

ही माझी इच्छा असावी तुमची सदिच्छा!!!


दैनिक प्रत्यक्ष वर्तमानपत्रात दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छापून आलेली ही माझी 'शब्दांची गुंफण' कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.  तुमचा अभिप्राय नक्की कळवावा. 


शब्दांना शब्दांनी गुंफायला लागतो वेळ खरा,

मनाची भाषा कळायला नाही लागत बहाणा.


उमटत जातात पानांवर मुक्तहस्ताने ही अक्षरे,

जणू ओंजळीत भरलेल्या पारिजातकाच्या सुवासाने.


ठाव घेत मनी दडून बसलेला कल्लोळ भावनांचा,

उधळत चहू बाजूंनी सप्तरंग इंद्रधनू नभीचा.


पहुडावे मनाने ह्या सुखाच्या निद्राधीन,

नाते हृदय शब्दांचे होवो लेखणीच्या स्वाधीन.


विनावे शब्दांच्या धाग्यांनी जसे फुलाने बहरावे,

शब्दांच्या लपंडावामध्ये फक्त फुलतच राहावे.


                                                                                     - अनुप्रिया सावंत.


No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.