Sunday, 26 July 2015

ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) / परिचालन प्रणाली

     आज आपण जाणून घेऊयात ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS म्हणजे काय?  आपण जेव्हा कॉमप्यूटर(संगणक) सुरु करतो, तेव्हा माऊस पोइंटर हलवतो, गेम खेळतो, गाणी ऐकतो.  असे करत असताना आपल्याला वाटते हे सगळं आपण करतोय म्हणून आपल्यामुळेच होतंय.  नाही का?  पण हे सगळं करून घेणारा खरा सूत्रधार मात्र वेगळाच असतो.  ह्या सगळ्या गोष्टी आणि योग्य त्या प्रक्रिया संगणकामध्ये घडवून आणणाऱ्या प्रोग्रॅमला "ऑपरेटिंग सिस्टम" म्हणतात.

     ऑपरेटिंग सिस्टम (OS) हा एक आज्ञावलींचा संच (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम) प्रोग्रॅम आहे.  हा प्रोग्रॅम कॉम्पुटरमधील मशीनशी संवाद साधतो.  त्यामधली प्रक्रियांचे क्रमवार नियंत्रण करतो.

     रस्त्यांवर वाहतुकीचे नियंत्रण करणारा पोलिस असतो ना! तसेच ऑपरेटिंग सिस्टम कॉम्पुटरमधील कामकाजाचे नियंत्रण करतो.  हे ऑपरेटिंग सिस्टम कॉम्पुटर आणि त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम करते.  जसे आपण माणसा माणसांशी साधतो तसे आपण संगणकाशी सरळ संवाद साधू शकत नाही. आणि त्यामुळेच आपली आवश्यकता संगणकाला कळण्यासाठी ज्या माध्यमाची गरज असते, त्या माध्यमाचे काम ऑपरेटिंग सिस्टम करतो.

ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य कसे चालते हे पाहूयात:


१) कॉम्पुटरमधील इनपुट डिव्हाईसेस (आदान साधने म्हणजेज - कीबोर्ड, माऊस) द्वारे आलेली सूचना / माहिती ओळखतो.

२) कॉम्पुटरमधील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आऊटपूट डिव्हाइसेसच्या (प्रदान साधने जसे कि - मोनीटर, प्रिंटर) मदतीने माहिती दर्शविते.


३) कॉम्पुटरला जोडलेल्या सर्व साधनांवर नियंत्रण ठेवतो.  त्याच्याकडून योग्य प्रकारे कामे करून घेतो.




सध्या बाजारात प्रचलित असलेल्या ऑपरेटिंग सिस्टम - डॉस(DOS), मायक्रोसॉफ्ट विंडोज, MAC OS, लिनक्स किंवा युनिक्स आणि सोलेरीस(Solaris).

     कॉम्पुटर वापर करणाऱ्या व्यक्तीला ऑपरेटिंग सिस्टमबरोबर संवाद साधण्यासाठी एका माध्यमाची गरज असते.  त्या माध्यमाला "युजर इंटरफेस" असे म्हणतात.

आता ह्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत -


१) CUI म्हणजे कॅरेकटर युजर इंटरफेस - ह्या इंटरफेसमध्ये कीबोर्डच्या मदतीने आज्ञा टाईप करावी लागते.  यामध्ये आज्ञाचे (कमांड) स्वरूप (सिनटेक्स) सांकेतिक भाषेत असते.  ते युजरला लक्षात ठेवावे लागते.  आज्ञा टाईप करण्यात चूक झाल्यास कॉम्पुटर आज्ञाचे पालन करीत नाही.




२) GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस -  काही ऑपरेटिंग सिस्टममध्ये आज्ञांचे अर्थ चटकन समजण्यासाठी काही चित्रे चिन्हे किंवा अक्षरे स्क्रीनवर दिली जातात.  त्या चित्रांवर किंवा चिन्हांवर माउसचा वापर करून क्लिक केले असता आज्ञा कार्यान्वित होते.  यामुळे इग्रंजी भाषा न येणाऱ्यालाही कॉम्पुटर सहजतेने वापरता येतो.



आपण पाहूयात ह्या ऑपेरेटिंग सिस्टीमचे प्रकार काय आहेत?
     ऑपेरेटिंग सिस्टीमचे प्रामुख्याने चार प्रकार असतात.  आणि हे प्रकार ज्या प्रकारचे कॉम्पुटर (संगणक) आणि एप्लिकेशन सॉफ्टवेअरचे नियंत्रण आपले ऑपेरेटिंग सिस्टीम करते, त्यावरून ठरवले जातात.

१) रिअल टाइम ऑपेरेटिंग सिस्टीम (RTOS)

    इनपुट डिव्हाईस म्हणजेच आदान माध्यम मधून देण्यात येणाऱ्या आज्ञांना लगेच प्रतिसाद देणाऱ्या ऑपेरेटिंग सिस्टीमला रिअल टाइम ऑपेरेटिंग सिस्टीम (RTOS) म्हणतात.

२) सिंगल युजर सिंगल टास्क

     या प्रकारच्या ऑपेरेटिंग सिस्टीममध्ये एकच व्यक्ती एकाच प्रकारचे काम प्रभावीपणे करू शकते.

३) सिंगल युजर मल्टीटास्किंग

     या ऑपेरेटिंग सिस्टीममध्ये एक व्यक्ती अनेक कामे एकाच वेळी करू शकते.
उदाहरणार्थ, विंडोस ऑपेरेटिंग सिस्टीममध्ये एकाच वेळी नोटपॅड किंवा वर्डपॅडमध्ये माहिती टाईप करत असताना आपण नेटवरून माहिती डाऊनलोडही करू शकतो.

४) मल्टीयुजर

     यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच वेळी कॉम्पुटरचा वापर करू शकतात.

आता आपण जाणून घेऊयात काही महत्वाच्या ऑपेरेटिंग सिस्टम ज्या आपण हल्ली ऐकत असतो.

पण नेमकं काय आहे हे थोडक्यात पाहूयात.

१) मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपेरेटिंग सिस्टम म्हणजे MS DOS
     एम एस डॉंस ही कमांड लाईन युजर इंटरफेस आहे.  या ऑपेरेटिंग सिस्टमच्या बूटिंगनंतर कॉम्पुटरच्या मोनीटरवर 'C' प्रोम्प्ट ('C \ >' - अश्या रीतीने) दिसू लागते. ह्या प्रोम्प्टपुढे कमांड टाईप करून एंटर दाबल्यावर कमांड कार्यान्वित होते.  डॉस कमांडचे स्वरूप हे ठरलेले असते.
उदाहरणार्थ, dir , del , edit , exit , cls ह्या काही डॉस कमांड आहेत.



२) लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टम (LINUX) 

     ही ऑपेरेटिंग सिस्टम लिनक्स टोरवोल्ड या संशोधकाने तयार केली आहे आणि त्यानंतर त्यात अनेकांनी बदल केले.  ही एक मल्टीटास्किंग मल्टीयुजर ऑपेरेटिंग सिस्टम आहे.  या ऑपेरेटिंग सिस्टमचा सुरुवातीपासूनच बिना मोबदला वापर होऊ लागला.  तसेच यामध्ये सुधारणाही करण्याची मुभा दिली गेली.



३) विंडोज ऑपेरेटिंग सिस्टम

     अमेरिकेतील मायक्रोसोफ्ट या कंपनीने वापरायला सोपी ऑपेरेटिंग सिस्टम सुरु केल्यावर एक स्क्रीन दिसते.  त्यामध्ये काही चिन्हे आणि चित्रे असतात.  स्क्रीन एखाद्या खिडकीप्रमाणे भासते.  ह्यामध्ये एकाच वेळी अनेक विंडो प्रोग्रॅम उघडण्याची सोय असते.  म्हणून या ऑपेरेटिंग सिस्टमला विंडोज असे नाव देण्यात आलेले आहे.
उदाहरणार्थ, वर्डपॅडची विंडो, पेंटची विंडो.



     आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले तसेच बऱ्याच प्रमाणात वापरातले ह्या गोष्टी असूनही आज आपल्याला ह्या निमित्ताने बरेच काही नवीन शिकायला मिळाले.  पुन्हा भेटू आणखी माहितीसह तसेच  ह्यात ऑपेरेटिंग सिस्टम संदर्भात जाणून घेताना बूटिंगचा जो उल्लेख आलेला आहे तो प्रकार काय आहे? हेही आपण पुढच्या सदरात पाहणार आहोत.

                                                                                            - अनुप्रिया आदित्य सावंत.


           मागील लेख                                                                               पुढे पहा

5 comments:

  1. खूपच छान . हसत खेळत संगणक शिकण्याचे कसब शिकवणारा लेख. ऑपरेटींग सिस्टीमची माहिती अत्यंत सफाईने आणि प्रभावी माध्यमातून मांडली आहे.

    ReplyDelete
  2. plz help mi one questions ans.....1) विंडोज ऑपरेटिंग सिस्‍टीम ही ...............युजर इंटरफेस आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो. विंडोस ही युजर इंटरफेस आहे.
      युजर इंटरफेस म्हणजे जेव्हा व्यक्ती आणि संगणक यांना एकमेकांशी संवाद साधायचा असेल आणि तो संवाद साधण्यासाठी विशेष प्रणाली जेव्हा वापरकर्ता (युजर / तुम्ही स्वत:) वापरतो तेव्हा ती सिस्टम ही 'युजर इंटरफेस' होते.
      उदाहरणार्थ, तुम्हाला संगणकावर चित्र काढायचे आहे किंवा काहीतरी टाईप करायचे आहे त्यावेळी तुम्ही संगणकाला आज्ञा द्याल कि मला चित्र काढायचे आहे. परंतु, ही आज्ञा देताना तुम्ही त्याच्याशी बोलून तर नाही देऊ शकत.
      त्यावेळी तुम्ही काय कराल, चित्र काढण्याकरता संगणकाला जोडला गेलेला माऊस हाती घ्याल किंवा कीबोर्डने अक्षर टाईप कराल.
      ही क्रिया करीत असताना संगणकाला अंतर्गत आज्ञा दिली जाते त्यामुळे तुम्ही ज्या कृती करत आहात त्यानुसार संगणक तुम्हाला हवे तसे संगणकीय पडण्यावर दाखवतो.

      थोडक्यात, तुम्हाला संगणकावर ज्या चित्रकृती (आयकॉन) दिसतात, त्यावर तुम्ही माऊस नेऊ शकता किंवा टाईप करून आज्ञा देऊ शकता. तो तुम्हाला भरपूर ओप्शन्स देत असतो. उदाहरणार्थ, चित्र काढण्यासाठी पेंट, तुमचा स्वताचा बायो डेटा तुम्हाला टाईप करायचा असल्यास वर्ड, अंकवारी करायची असल्यास केलकुलेटर (Calculator) ह्या सुविधा तो तुम्हाला तुमच्या माऊसच्या एका क्लिक वर तुम्हाला देतो. ह्यासाठी तुम्हाला कोणत्या कोडींगमध्ये (कोडींग पद्धत मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपेरेटिंग सिस्टम म्हणजे MS DOS वरील आकृतीत दाखवली आहे ती पहावी) आज्ञा द्यावी लागत नाही, ती सहज होते. म्हणजेच ते युजर इंटरफेस आहे.

      Delete
  3. खूपच छान लेख आहे.

    ReplyDelete
  4. Khupch sunder.
    Ajun vachun ghyayla aawdel!

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.