Wednesday, 28 January 2026

कविता #23 - शाळा!

(सदर कविता प्रत्यक्ष दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे.  नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.) 

     ही कविता म्हणजे केवळ शाळेचं वर्णन नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एका अविस्मरणीय प्रवासाची आठवण आहे. पहिल्या घंटानादापासून ते वर्गातल्या खोडकर हसण्यांपर्यंत, मैदानावरच्या धावण्यांपासून ते ग्रंथालयातील शांततेपर्यंत... आपण सगळेच कधी ना कधी हे जगणं अनुभवलं आहे. ही कविता वाचताना आपण फक्त शब्द वाचत नाही, तर स्वतःचं बालपण पुन्हा एकदा अलगद जगत असतो.

     शाळेचा प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून गेला. टिफिनमधला वाटलेला घास मैत्रीचं मोल शिकवून गेला, छोट्या छोट्या यशांनी आत्मविश्वास दिला, तर अपयशांनी धैर्य दिलं. शिक्षकांच्या शब्दांतून मिळालेलं मार्गदर्शन आणि मैदानावर शिकलेलं धैर्य ह्यातून अनुभवांतून आपण आज जे आहोत ते घडलो आहोत.

     घंटानाद, वर्ग, बाक, मैदान... हे शब्द फक्त आठवणी नाहीत, तर आपल्या मनावर कोरलेले ठसे आहेत. आज आपण कितीही पुढे गेलो, कितीही बदललो, तरी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात  शाळेतला प्रत्येक कोपरा अजूनही जिवंत आहे. ही कविता त्या आठवणींना जणू हळूच हाक मारते.

     प्रत्येकाची शाळा वेगळी असली, तरी तिथे उमललेली स्वप्नं, मैत्री, संस्कार आणि आत्मविश्वास मात्र सगळ्यांसाठी सारखेच असतात. शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, तर माणूस घडवणारी भावना आहे, हे ही कविता ठळकपणे सांगते.

     ही कविता आपल्याला फक्त भूतकाळात नेऊन ठेवत नाही, तर आजच्या आपल्याला एक हळवा प्रश्नही करतेय!
“तुला घडवणाऱ्या त्या शाळेच्या आठवणीला अजूनही तू साद घालतेस का?”


शाळेचा पहिला घंटानाद, उघडतो ज्ञानाचे दरवाजे,
मैत्रीची रंगीत दुनिया, फुलते नित्य वर्गामध्ये.

शिक्षकांच्या शब्दांमध्ये, मार्गदर्शनाचा उज्ज्वल प्रकाश,
खेळ–अभ्यास–हसू–मस्ती, यातूनच होत जातो विकास.

मैदानावरच्या वेगवान धावण्यात, शिकतो धैर्याचं बळ,
छोट्या छोट्या यशांनी, प्रत्येक दिवस होई उजळ.

टिफिनमधला वाटलेला घास, देतो मैत्रीचा गोड पुरावा,
या नात्यांच्या उबेतून, मनाला मिळतो नवाच ठावा.

ग्रंथालयातील शांततेत, पुस्तकं देतात ज्ञानाची मजा,
प्रत्येक पानावर उमटतो, जीवनाचा सुंदर धडा.

सभागृहातील कार्यक्रम, उभारी देतात स्वप्नांना,
उमलतात नवे कलागुण, आत्मविश्वास वाढतो मना.

मैत्री, संस्कार, स्वप्नं इथेच सगळं आकार घेतं,
शाळेचा हा प्रवास, खरं माणूस घडवतं.

शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, ती भावनांची दुनिया,
इथेच शिकतो आपण, जीवन जगण्याची खरी किमया.

                                        - अनुप्रिया सावंत