Thursday, 29 November 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक


Image : Pratyaksh Newspaper
     
     आजचा 'बिगर राजकीय दैनिक-प्रत्यक्ष' हा वृत्तपत्र वाचताना त्यातील अमेरिकेतील चेटुकविद्येसंदर्भातील बातमी वाचण्यात आली. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडींवर नियमित अप टु डेट माहिती वाचकांना मिळवून देणारा हा एकमेव दैनिक वृत्तपत्र.

    ब्लॅक मॅजिक आणि थर्ड वर्ल्ड वॉर ह्याचा एकमेकांशी काय संबंध हा प्रश्न नक्कीच आपल्याला पडला असेलच.  पण खरंच, ह्याचा संबंध अगदीच आहेच आणि तोही ठराविक समूहामध्ये नसून हे अनेक देशातील कानाकोपऱ्यात घडत असणारे खरेखुरे प्रकार आहेत.  ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे 'अमेरिका'.  होय, उच्चशिक्षित उच्चभ्रू वस्ती असणारा हा प्रगत देश आणि तिथे चालतात ते चेटूकविद्या म्हणजेच ब्लॅक मॅजिक. 

   अमेरिकेत महिषासुराचे मंदिर उभे करण्यासाठी काही कुवृत्तीच्या लोकांनी आपला संघ तयार केला होता.  मात्र त्यालाच विरोध करणारेही तितकेच उपस्थित होते.  ह्या घटना आपल्या भारताबाहेरच्या असल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे कानडोळाच केला.  डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्दा ह्या गोष्टीला कडाडून विरोध केल्याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या.  पण त्याची फारशी गंभीरता नागरिकांना आली नसावी. 

  मात्र आता अमेरिकेसमोरची चिंता दार ठोठावत नसून आत प्रवेश करती झाली आहे. अमेरिकेतील काही संस्थाने ह्यांच्या दाव्यानुसार तसेच प्रत्यक्ष पाहणीनुसार ब्लॅक मॅजिक उपासकांची संख्या ही आठ हजारावरून पंधरा लाखांवर गेली आहे.  कदाचित त्याहीपेक्षा जास्त उपासक असावे, जे अजूनही जगासमोर आली नसतील.  धक्कादायक गोष्ट ह्यापेक्षा मोठी अशी की, ख्रिस्तधर्माशी एकनिष्ठ असणारे सश्रद्ध मंडळीही आता चेटूकविद्येच्या मायाजालात अडकत चालली आहे.

  Third World War is part of New World Order.  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' च्या पद्धतशीर मायाजालात जग अडकत चालले आहे.  कारण 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' (एनडब्लूओ) हे एक कुख्यात अस्पष्ट षड्यंत्र सिद्धांत आहे, ज्यात असे म्हटले आहे की काही शक्तिशाली गट गुप्तपणे जग चालवत आहेत आणि स्वतःची सत्ता स्थापन करू पाहत आहे.

  'न्यू वर्ल्ड ऑर्डर' हा शब्द नवीन नवीन नाट्यमय गोष्टीत जगाला अडकवून तसेच त्यांना गुलाम बनवून सर्व राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा नाश करण्यासाठी समर्पित गुप्त अभिजाताने वापरला जातो.

    खरं तर फक्त अमेरिका ह्यात अडकली आहे, हा समज चुकीचा आहे.  कारण तिसरे महायुद्धाची पार्श्वभूमी ही न्यू वर्ल्ड ऑर्डर च्या रहस्यमय चालीने सुरू झाली आहे.  प्रत्येक देशात काही न काही अचंबित करणाऱ्या आणि अस्थैर्य प्राप्त करणाऱ्या घडामोडी घडतच आहे.

      आपल्या भारतात कधी न होणारी हॉलीविनची पार्टी सुरू झाली आहे.  ऑफिस, कॉलेज, शाळा इतकेच नव्हे तर अगदी ज्युनिअर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्यात सहभागी केले जात आहे.  मुलांना जरी ह्याची गम्मत वाटत असली तरी सुज्ञ आणि सुशिक्षित पालकवर्ग मात्र ह्यात हिरीरीने पुढाकार घेताना आणि आपल्या मुलांना जास्तीत जास्त कस भुतासारखं दिसता येईल, वेडीवाकडी किळस येणारी वेशभूषा देऊन जिंकविता येईल, ह्यात बेधुंद झालेले पाहण्यास मिळाले. 

     वेशभूषा केल्यामुळे कोणी चेटूक होत नाही किंवा त्याचे साधक होत नाही असे हसत हसत म्हणणारे मात्र नकळत महिषासुराचे साधक बनत आहेत.  माहित नसणे आणि माहित न करून घेणे दोन्ही गोष्टी घातकच आहेत.

     परवा माझी मैत्रीण तिच्या शेजारच्या कुटुंबाची गोष्ट सांगत होती.  मुलीला मूल होत नाही म्हणून अंगात येणाऱ्या बाबाला भेटायला गेले आणि वर्षभरात त्यांना मुल झालं.  त्यासाठी तीन रस्त्याला लिंबू फेकणे, पाठी वळून न बघणे, तसेच एखादा कपडा आणून त्याला होल्स करणे, वैगरे वैगरे गोष्टी होत्या. अशा विविध करणी-मंत्र-तंत्रचा प्रकार केल्यावर त्यांना मिळालेल्या फळामुळे त्यांचा आनंद(?) द्विगुणित झाला आणि नकळत ते चेटूक विद्येचे साधक झाले. 

    अजून अशीच एक साम्य तरीही वेगळी असणारी गोष्ट इथे प्रामुख्याने आठवली.  अमेय इंजिनिअर कॉलेजमध्ये असताना एक तंत्र-मंत्र करणारा साधक अनायासे त्यांच्या ग्रुपला भेटला.  आधीच मार्क सांगतो, पास करतो सांगून घेऊन गेला आणि त्यांचा त्याने स्वतःच्या काळ्या विद्येसाठी बळी दिला.  सश्रद्ध व स्वतःच्या मेहनतीवर तसेच परमेश्वरावर दृढ विश्वास असलेला अमेय मात्र त्यातून बचावला, ते त्या साधकाच्या नादी न लागल्यामुळे.  होय खरंच. परमेश्वर आहेच आणि त्यावर पूर्ण विश्वास आपल्याला कुठल्याही संकटातून सहज बाहेर काढते हे अमेयने अनुभवलं.

     आजकालच्या आपल्या सर्वांनाच सर्व काही झटपट हवं असतं. त्यासाठी गैरमार्गाचा वापर करायलाही काहीवेळेस आपण धजत नाही.   मात्र भक्तीची शिदोरी जवळ असली की सबुरी लाभतेच.  त्यामुळे चुकीच्या गोष्टीपासून रक्षण करण्यास, सद्गुरू आपल्या हाक मारण्याच्या आधीच उभा ठाकतो.   असत्यावर सत्याचा विजय हा नेहमीच असतो.  महिषासुराचा वध हा महिषासुरमर्दिनीकडून होतोच.

     अस्तिकता ही श्रद्धेमुळे येते, श्रद्धा ही भक्तीभावामुळे येते.  भक्तिभाव हा उपासनेतून उत्पन्न होतो.  चांगले कार्य करताना न हाक मारताही परमेश्वर संकटात सोबत असतोच.  मात्र वाईट कर्म करताना रावण त्याचे सर्व बळ एकवटतो, जेणेकरून त्याच्या साधकात भर पडून त्याच्या गुलामांची संख्या वाढेल.

   आज जगात एवढ्या प्रमाणात वाईट गोष्टी घडत आहेत, त्याचे उदाहरण देऊ तितके कमीच.  चॅलेंज घेणे, टिकटोक व्हिडीओ बनवणे, गेम्सच्या आहारी जाऊन स्वतःची मानसिक-शारीरिक हानी करणे, ह्या रोजच्या घडणाऱ्या गोष्टी असल्या तरी 'All Plan Set - एक अस्पष्ट षडयंत्र' प्रमाणे हे सर्व 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' चा एक भाग आहे,  हे आपल्याला आता कळायला हवे.

     आजकालची तरुणाई ह्या सर्व गोष्टी हसण्यावर घेते.  मात्र खरंच प्रत्यक्षात घडणाऱ्या ह्या घटना आणि त्या घटनांचे झालेले बळी ह्यांच्यातुन मात्र तिसरे महायुद्धाचे वादळ उभे ठाकले आहे आणि असुरी न्यू वर्ल्ड ऑर्डर सर्व प्लॅन सेट करत आहे. 

    ह्यातून आपण, प्रत्येक नागरिकाने, समाजाने बोध घेऊन वेळीच सावध व्हायला पाहिजे.  कारण... Third World War has been started...

                                 - अनुप्रिया सावंत.


थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय


थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

Wednesday, 28 November 2018

ई-मेल(E-Mail) १ - इंटरनेटवर खाते तयार करणे

     आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहेच. आपण मोबाईलचा वापर फक्त संपर्क करण्यासाठी करत नसून इतर अनेक गोष्टींसाठी करतो. उदाहरणार्थ, आधार कार्ड, लाईटबिल, गॅसबिल, मोबाईल बिल, बँक व्यवहार. 



    मला भजन ऍप त्यातील अभंग ऐकण्यासाठी वापरायचा आहे. हा ऍप वापरताना मला त्यात माझा स्वतःचा इमेल आयडी माहीत असणे महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय ऍप वापरता येऊ शकत नाही. अश्या वेळी आपण काय करणार?



    आपल्या जवळ आपला इमेल आयडी असणे आता गरजेचं झाले आहे. मी हाऊस मेकर आहे मग मला ह्याची काय गरज? किंवा मी आता नोकरीला नाही घरीच असते मग मला काय उपयोग? अशी उत्तरे ह्या टेक्नोसॅव्ही जगात देणे चुकीचे ठरेल. सध्याचे युग हे संगणकाचे आहे, त्यामुळे काळाला धरून असणाऱ्या गोष्टी आपल्याला माहीत असणे व त्याचा वापर करणे ही आजची गरज आहे.



     आपण जवळ जवळ सर्वेच जण व्हाट्स ऍप वापरतो मात्र बऱ्याच वेळेला असे होते की आपल्याला आपला इमेल आयडी माहीत नसतो. हो खरंय! असं आमच्या शेजारच्या काकूंच्या बाबतीत झालंय. त्या स्मार्टफोन वापरकर्ते आहेत मात्र त्यांच्या स्मार्टफोनसाठी लागणारी प्राथमिक व आवश्यक गोष्ट, स्वतःचा इमेल आयडी. तो त्यांना त्यांच्या मिनूने तयार करून वापरण्यास सज्ज करून दिला. हो, हे चित्र बऱ्याच घरांत थोड्याफार फरकाने असते.

     इंटरनेट आपल्या प्रत्येकाकडे हल्ली असतो. ह्याचे कारण व उदाहरण, आपले व्हाट्स ऍप, जे आपल्या फ्रेंड व फॅमिलीला एकाच जागी हवे तिथे आणून त्यांच्याशी संपर्क घडवते. 'गुड नाईट टेक केअर' हा मुव्ही आजच्या काळाची गरज व वाढत्या टेक्नोसॅव्हीचे चांगले-वाईट परिणाम तसेच संभाव्य धोके ह्यांची जाणीव करून देऊन ह्यातून बोध घेण्याचे ज्वलंत उदाहरण आहे. खास करून पालकांसाठी, त्यांच्या पालकत्वासाठी, प्रत्येक कौटुंबिक सदस्यासाठी हा मुव्ही खूप काही शिकवून जातो. आणि म्हणूनच टेक्नोसॅव्ही दुनियेत आपण जरी टेक्नोसॅव्ही नसलो तरी ह्या इथे वावरण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टींची माहिती तर हवीच पण त्याच बरोबर त्याचे प्रात्यक्षिक कृती स्वतःसाठी स्वतः करता येणेही तितकेच गरजेचे आहे. त्यातलेच हे महत्वाचे म्हणजे आपले इमेल खाते.

     ईमेलच्या साहाय्याने आपण संदेश म्हणजेच मेसेजेस पाठवू शकतो. फक्त माहिती टाईप करून नाही तर आपले फाईल्स, फोटो, व्हिडीओ क्लिप्स ह्या गोष्टीही पाठवू शकतो. मात्र ह्यासाठी इंटरनेट अकाउंट असणे आवश्यक आहे. आपला हा मेसेज कुठेही काही सेकंदामध्ये पाठविणाऱ्याला मिळतो. थोडक्यात, ह्याचा वापर गॉसिप, शुभेच्छा, आमंत्रण, बातम्या, व्यापार ह्यांची देवाणघेवाण करण्यासाठी होत असतो.

असा हा महत्वाचा असणारा ईमेल आपण कसा तयार करतात ते पाहुयात.

1. आपल्याला इमेल करण्यासाठी खालील गोष्टी असणे गरजेचे असते.

* आपला संगणक/ स्मार्ट फोन/ लॅपटॉप

* इंटरनेट केनेक्शन

* वेब ब्राऊझर

* इमेल अकाऊंट


2. आता आपल्याकडे वरील बाबी अंतर्गत इमेल अकाऊंट नसल्यामुळे तो तयार करायचा आहे.

त्याची कृती खालीलप्रमाणे:

1. वेब ब्राउझर वर क्लीक करा. (वेब ब्राउझर - इंटरनेट एक्सप्लोरर / मॉझिला / तुम्ही जो वापरत असाल)

खालीलप्रमाणे वेब ब्राऊझर स्क्रीन प्रदर्शित होते.






2. अड्रेसबार मध्ये तुम्हाला इमेल ज्या साईट वरचा हवा आहे त्या साईटचा अड्रेस टाईप करा. 


उदारहरणार्थ, 'याहू' किंवा 'जी मेल' ह्या साईट वरचा इमेल आयडी हवा आहे. तर त्यानुसार त्या साईटवर जाणे.
(इथे मी 'गूगल अकाऊंट - जी मेल' प्रात्यक्षिक करत आहे.)

खालील आकृती पहा.




3. आता जी प्रदर्शित स्क्रीन दिसते आहे, त्या स्क्रीनला 'लॉगिन विंडो / स्क्रीन' म्हणतात.




4. आपण प्रथमच आपला नवीन इमेल आयडी बनवत आहोत, त्यामुळे 'Create account' ह्यावर क्लीक करणार.


5. आता आपल्याला आपले अकाऊंट तयार करण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. 

त्यात आपले 

* First Name पहिले नाव 

* Last Name शेवटचे नाव

     ह्यानंतर त्याखाली आपल्याला आपले Username द्यायचे आहे म्हणजे आपल्याला आपले अकाऊंट नाव कोणत्या नावाने हवे आहे ते द्यावयाचे आहे. ह्या अकाऊंट / पत्त्यावर इतर व्यक्ती आपल्यालाशी आपल्या ह्या युझरनेमवर इंटरनेटद्वारे पत्रव्यवहार सुरू करू शकतील.


लक्षात ठेवा आपला युझरनेम हा इतर कोणीही वापरलेला नसावा. जर तुम्ही घेतलेला युझरनेम दुसऱ्या कोणी वापरला असेल तर तुम्हाला संगणक दुसरा युझरनेम वापरण्यास सांगेल. व त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शनही करेल. खालील आकृती पहा:



     
     त्याचप्रमाणे जर तुमचा पासवर्ड हा चुकीचा असेल किंवा आठ / 8 अक्षरांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एरर्र लाल अक्षरात दर्शवेल. आणि त्याप्रमाणे पुढे मार्गदर्शन करेल.

खालील आकृती पहा.




     नाव, युझरनेम, पासवर्ड इत्यादी व्यवस्थित संगणकाकडून मान्य झाल्यावर मला पुढील स्क्रीन दिसेल ती ह्याप्रमाणे:




     आता मला इथे माझी इतर माहिती पूर्ण करणे गरजेचे आहे.

     फोन नंबर हा त्यांनी ऑपशनल दिला आहे म्हणजे तो लिहिलाच पाहिजे ह्याचे काहीही बंधन नाही. आणि जरी आपण त्यांना आपला नंबर दिला तर तो इतरांना दिसणार नाही ह्याची आपल्याला खात्री देतात. हे आपल्या सुरक्षित खात्यासाठी / अकाऊंटसाठी असते.

    त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख त्यांनी सांगितल्या प्रमाणे लिहायची असते. प्रथम महिना, दिवस मग वर्ष. त्या त्या कॉलम वर आपण माऊस पॉइंटर नेऊन आपली माहिती पूर्ण करावयाची असते.

    त्याखाली जेंडर हा कॉलम असतो. त्यावर क्लीक करून तो पूर्ण करावा.

    जर एखादा कॉलम / रकाना भरण्यास आपण विसरलो किंवा तो रकाना रिकामा ठेवला तर आपण पुढच्या स्क्रीनवर जाऊ शकत नाही. संगणक लाल अक्षरांनी तो रकाना भरण्यास दर्शवितो. कारण बंधनकारक असलेले रकाने / कॉलम आपल्याला पूर्ण करणे हे गरजेचे असते. 





     हे सर्व पूर्ण करून नेक्स्ट / Next केल्यावर संगणक आपल्याला गुगल अकाऊंटचे नियमावली / Privacy and Terms चे स्क्रीन दाखवितो. त्या खाली I Agree ह्या बटनांवर क्लीक केल्यास आपले अकाउंट यशस्वीरित्या वापरण्यास तयार होते.





ह्यानंतर आपल्याला वेलकम ची स्क्रीन पाहण्यास मिळते.




     
     नेक्स्ट बटनांवर क्लीक करून आपल्याला हव्या असलेल्या व्ह्यू / दृश्य / डिझाईन मध्ये आपण आपले जीमेल अकाऊंट वापरण्यास तयार होते.





     येस! आपले इंटरनेटवरील पत्रव्यवहारासाठीचे दालन आपल्याला खुले झाले आहे, तेही आपण स्वतः तयार केलेले.  हो ना!


     मेल कसा लिहायचा, पाठवायचा व आलेले मेल कसे पाहायचे हे आता आपण पुढील सदरात पाहू.

                                                                              - अनुप्रिया सावंत.

         मागील लेख                               पुढील भाग

Wednesday, 25 July 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

   

     आपल्या भारतात थर्ड वर्ल्ड वॉर ही गोष्ट 100 पैकी 2 जणांना तरी ठाऊक असेल का? ह्या बद्दल मला शंका आहे. खरं तर त्या 2 जणांमध्ये मी नवीनच ऍड झालेली मला मानते. ह्याला कारणही तसेच आहे. नुकत्याच एका आमच्या ग्रुप मध्ये ह्याची चर्चा चालू होती. आपल्याला दुसरे महायुद्ध पुस्तकी स्वरूपातून ऐकण्यात व अभ्यासनात आले ह्यावर जवळ जवळ सर्वेच दुजोरा देत होते. वर्धमानच्या तोंडातून तिसऱ्या महायुद्धविषयी ऐकताना आम्ही अक्षरशः त्याचा पापड करत होतो मात्र वीजेच्या आवाजसारखे त्याचे घडणाऱ्या घडामोडीतील गोष्टी ऐकून थंडर अनुभवत होतो.

     सिरिया, इराण, इराक, अमेरिका, इजराईल ह्यांची नावे आता पाठ झाली आहेत कारण सततचे त्यांच्यावरील काही न काही हल्ले किंवा घटनाक्रम. त्यांच्यातील घडणाऱ्या घडामोडी ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या पायाभरणीचे काम करत आहेत. हेही आम्हाला नव्यानेच जाणवत आहे. आपल्याला एक सवय असते... जो पर्यंत एखाद्या गोष्टीची झळ आपल्याला लागत नाही तो पर्यंत आपल्याला त्या भीषणतेची जाणीवही होत नसते. मुळात ते मान्य करणं आपल्याला पचत नाही. त्यामुळे उगाच कोणी काही माहिती सांगत असेल तर ती ऐकून घेण्याची संयमताही आपल्याजवळ नसते, असते ती फक्त अधीरता तेही बाष्कळ बडबड ऐकण्याची.  खरं तर तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे... आणि ह्याची झळ प्रत्येकाला पोहोचणारच आहे.  हे महायुद्ध देशादेशांतर्गत परिस्थिती नसून घर, ऑफिस, इतकेच न्हवे तर व्यक्ती व्यक्ती मधील मतभेद, वाद, तंटे ह्यास्वरूपातून आकार घेत आहेत.
    डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिखित सखोल अभ्यासपुर्ण तसेच वास्तव्याला धरून असणारे 'तिसरे महायुद्ध' हे पुस्तक मला घडणाऱ्या घडामोडींची अर्थपूर्ण माहिती मिळविण्यास व त्याविषयी जाणून घेण्यास आणि त्याहुन अधिक त्याचा योग्य अर्थ लागण्यास मोलाची भूमिका बजावत आहे.  हे माझे वैयक्तिक ठाम मत आहे.

     आपल्या जागतिक आंतरराष्ट्रीय घडामोडीतील बातमीत तिसऱ्या महायुद्धाची बरीचसी माहिती आपल्याला वाचण्यात येते. माझ्या लेखणीतून दैनंदिन व्यवहारातील गोष्टींच्या घडामोडीद्वारे ह्या तिसऱ्या महायुद्धाची झळ नक्की काय आहे? ते मांडण्याचा प्रयास ह्या सदरातून केला जाईल.

     आज ऑफिस मध्ये कामाचा खूप लोड होता हे वाक्य संपते ना संपते तोच त्याला जोडून दुसरे वाक्य ह्यांनी पूर्ण केले ते म्हणजे ऑफिसच्या संगणकात वायरस आलाय... काय कसा केव्हा कोणाला कळायची फुरसत की काय सर्वांनाच आज जवळजवळ 24 तासाची ड्युटी झाली. 

     वायरस हा शब्द नेहमीच आपण ऐकतो पण सध्याच्या ह्या वायरसने मात्र जगाचीच झोप उडवली आहे. खरं तर थर्ड वर्ल्ड वॉर चा एक भाग म्हणायला हरकत नाही अस वाटावं इतका हा धुमाकूळ आणि त्याहीपेक्षा अधिक गोंधळ ह्या वायरसने घातला आहे.

     आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' वायरस 'वन्नाक्राय' या नावाने ओळखला जात आहे. भारतासह शंभराहून अधिक देश ह्या हल्ल्याला बळी पडले आहेत. 'रॅन्समवेअर' हल्ला म्हणजे लॅपटॉप किंवा संगणक चालू केल्यावर त्या स्क्रीनवर मेसेज दिसतो की तुमचा संगणक हॅक झाला आहे. जर तुम्हाला तुमचा डेटा हवा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर पेमेंटचा एक बॉक्स दिसतो त्यावर क्लीक करण्यास सांगितले जाते व अमुक रक्कम त्यांनी दिलेल्या वेळेत बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जाते. जर असे नाही झाले तर तुमचा डेटा डिलीट होतो. स्क्रीनवर दिलेल्या वेळेचे काउंट डाऊनही सुरू होते. ते पाहण्याव्यतिरिक्त स्क्रीनवर कुठलेही ऑप्शन नसते. कारण संगणक किंवा लॅपटॉपच्या पूर्ण ताबा हॅकर्सकडे असतो. ही गोष्ट सायबर गुन्हा अंतर्गत येते व अश्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला 'रॅन्समवेअर' असे म्हणतात. आणि ह्या गोष्टी अगदी अज्ञात ठिकाणाहून होतात, ज्याचा शोध घेणे एक प्रकारचे आव्हान असते.

     माहितीप्रमाणे या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला आहे. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपॉइमेंट्सदेखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली. 

     ही गोष्ट फक्त मोठे ऑफिसेस किंवा आयटी क्षेत्रातच होत आहेत असे नाही तर स्मार्टफोन युजर्सना देखील ह्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आपले संगणक असो किंवा स्मार्टफोन जितका सुरक्षित तितकाच फायद्याचे ठरेल. इंटरनेट वापरताना कुठल्याही जाहिरात किंवा भूलथापांना बळी पडू नये. मोबाइल गेम खेळताना अनेक वेळा जाहिरातीचे विंडो ओपन होतात. किंवा अमुक लिंक वर क्लीक करा असे मेसेज येतात त्यावेळी काळजीपूर्वक त्या गोष्टींकडे लक्ष देणे व दक्ष राहणे तितकेच महत्वाचे आहे. कारण... Third World War has been started..

                            अनुप्रिया सावंत

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)


Monday, 23 July 2018

निसर्गाशी गुजगोष्टी

Photo Source:Google

       निसर्ग आणि मानवाचं एक सुंदर नातं आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आठवणींची साठवण म्हणजे निसर्गाशी दिलखुलास मारलेल्या गप्पांचा एक कप्पा. जिथे फक्त तो आणि तुम्ही अगदी मनमोकळेपणाने संवाद साधत असता. निसर्गाशी आपल्या गप्पा नेहमीच रंगतात. त्यातलेच काही तुमच्या आमच्या मनातले निसर्गाशी केलेल्या ह्या गुजगोष्टी.

     व्वा! आज वातावरणात किती सुंदरता जाणवतेय. काय प्रसन्न वाटतंय! सकाळची सूर्यकिरणे जणू जेजुरीचं दर्शन हळदीचा भंडारा उधळून घ्यावा तशी अंगणातल्या तुळशीला भेटायला येऊन सोनेरी पिवळे केशरी झाले आहेत. हिरवी झाडे आनंदाने डोलताहेत. 

     अहाहा... किती छान संगीत झाडातून ऐकू येतंय. कोकिळा... तुझ्या आवाजातील मधुरता काय वर्णावी बरं, जिथे श्रेष्ठ गायकांना तुझ्या आवाजची पदवी दिली जाते. सोबतीला तुझे सारे मित्र मैत्रिणींची किलबिलाट चालू आहे. ह्या झाडांना किती खेळवत असेल नाही का! ही झाडे डोलताहेत ते तुमच्यासोबत पकडपकडी खेळण्यासाठी! हम्म... आता लक्षात आलं.  छान!

     ही सुदंर रंगबेरंगी फुलं, फुलांचा सुगंध ह्या झाडांना किती टवटवीतपणा देतोय. फळांचा रस मनाला तृप्त करतोय. देव्हाऱ्यातील देव तुमच्या आगमनाची वाट पाहताहेत. त्यांनाही श्रुंगार करून निसर्ग अनुभवायचा आहे तर! किती छान दृश्य आज मनाला नव्याने आनंद देतोय.

     ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम, टपोरे थेंबांचा जमिनीवर होणारा वर्षाव, मातीचा सुगंध. नुसता विचार मनाला तजेलता देतोय.  तुमच्याही... हो ना! 

                  देवा तुझे किती सुंदर आकाश, 
                      सुंदर प्रकाश सूर्य देतो... 

     हे गाणं बरेच दिवसापासून गुणगुणने चालूच आहे. गाण्याचा भावार्थ मनाला सतत खुणावतोय. मात्र अर्थाशी मन समरस होता होता कामाच्या गडबडीत गुणगुणनेच सुरू असायचे. ओठावर रुळलेले हे गाणं मात्र मला आज भावनेशी सरमिसळून घेतोय. कागदही स्वेच्छेने आज उड्या मारताहेत. पेन मात्र आज दांडियाची काठी गरबा खेळताना जशी फिरवावी तसा कागदावर मनसोक्त नाचत लेखणी चालवतोय. अहा... ही तर निसर्गाची जादू आहे जी प्रत्यकेला मनमुराद आनंद लुटायला देतेय. 

     निळे निळे स्वच्छ आकाश... पांढरे कापसासारखे ढग त्यातही काही गुबगुबीत, काही लांबट. पळताहेत असे जणू एकमेकांशी पकडापकडी खेळताहेत. सूर्य मात्र त्यांच्या पकडापकडीत लपाछपी खेळत ऊन सावल्यांचा खेळ खेळतोय. किती छान देवा तुझी किमया... गडगडाट ssss 

    हा आवाज कसला?? वीज राणी... पावसाची... छान! तिलाही आतुरता लागली तिच्या सवंगडयांशी खेळण्याची. हो! एवढेच न्हवे तर जमिनीला वेध लागलेत चिंब भिजण्याची आणि पावसाच्या टपोरे थेंबांना ओढ लागली भूमीला स्पर्श करण्याची. किती सुंदर नातं आहे ह्या साऱ्यांचं नाातं एकमेकांशी. 

     देवा! किती सुंदर रम्य ही वसुंधरा जिच्या उदरात एवढ्या सुंदर गोष्टी लपल्या आहेत. तुझीच कृपा सारी. हे दृश्य किती सहज अनुभवता येते मानवाला. पण तेही त्याला अशक्य व्हावे एवढा माणूस कामात अडकलाय? खरंच का??? 

     निसर्ग खुणावतोय त्याच्या प्रेमळ लीला पाहण्यासाठी, त्याचे अवर्णनीय रूप अनुभवण्यासाठी, त्याच्या मनाचा आपल्या हृदयाशी संवाद साधण्यासाठी. मानवी मनापेक्षा त्यालाच ओढ जास्त बिलगण्यासाठी. मग आपणही त्याच्या कुशीत लपंडाव खेळत, भटकंती करत, त्याच्याशी गुजगोष्टी करत जीवनाचा आनंद लुटायला हवा. काय? खरंय ना!!! 

                     अनुप्रिया सावंत.

Friday, 6 April 2018

स्पर्श

    
Image Source: Google
    काय म्हणायचं ह्या माणसांना... घृणा वाटते एकदम... निर्लज्ज, बेशरम ह्या लेव्हलच्या पदवी कमीच पडतील ह्यांना.  भलीमोठी डिग्री घेऊन मिरवतात आणि लक्षण सगळे खोटे.  अगं काय झालं कृतिका?  चिडचिड असहाय्य झालेली कृतिका संध्याच्या बोलण्याने भानावर आली.  मनात असंख्य प्रश्न, राग, द्वेषाच्या पाऱ्यात उन्हाच्या लाह्या तरी जीवाला कमी बोचतील.   बॉस आल्याने दोघीही गप्प बसल्या आणि आपापल्या कामाला लागल्या. 

      कृतिका एक धडाडीचे व्यक्तिमत्व.  दिसायला सुंदर स्वभावाला थोडी तापट पण तितकीच हळवी.  ऑफिस ते घर बसने प्रवास करणारी.  संध्या, कृतिका, गौरी आणि माधुरी चौघी शाळेपासूनच्या बालमैत्रिणी.  संध्या आणि कृतिका एकाच ऑफिसमध्ये मात्र डिपार्टमेंट वेगवेगळे, त्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या.  गौरी आणि स्वाती दोघी वेगवेगळ्या ऑफिस मध्ये मात्र दर रविवारी ह्या चौघी घरापासून जवळच ठरलेल्या ठिकाणी म्हणजे शिवाजी पार्कला न चूकता भेटतात.

     कृतिकाच्या कामात मुद्दामहून काही न काही चुका काढून सतत तिला केबिन मध्ये बोलावणारा आणि लॅपटॉपवर मुद्दामहून काही ना काही काम देताना हाताला, अंगाला स्पर्श करणारा तिचा विकृत बॉसची तिला मनस्वी चीड यायची.  वाटायचं ह्याचं एकदाच बिंग फोडूनच टाकावं.  पण विश्वास ठेवणार कोण आपल्यावर?  संध्याला कृत्तिकाबद्दल बॉसचे मुद्दामहून चाललेल्या गोष्टी कळत होत्या मात्र तीही इतरांना हे सांगू शकत नव्हती.  ह्यावर जॉब चेंजिग हा खरंच पर्याय आहे का?  आपल्या ठरलेल्या ठिकाणी दोघी ऑफिसमधून सुटल्यावर बोलत होत्या.  आपल्या मैत्रिणींना ह्याविषयी बोलून काय तो तोडगा काढलाच पाहिजे... ह्यावर दोघींचं एकमत झाले.  घरी सांगितलं तर घरचे कसे.. काय आणि कोणत्या प्रतिक्रिया देतील म्हणून दोघींनी घरी सांगणे टाळले.

     गौरी कराटे चॅम्पियन म्हणून फेमस.  रस्त्याने धक्के देणारे, जाणून बुजून चालताना स्पर्श करणारे, विचित्र नजरा ह्यांचा सोक्षमोक्ष आपण कधीतरी लावू ह्या धाडसी व बिनधास्त विचारांची असणारी.  नुसती विचारच नाही तर कृती करणारी.  असेच एके दिवशी ऑफिसहुन घरी जाताना एका व्यक्तीने जाणून बुजून तिला धक्का दिला.  तो थोडा पुढे जातो ना जातो तेवढ्यातच.... आबे रुक साले... तेरी तो... रुक... क्षणातच सगळे तिच्याकडे पाहायला लागले... ज्याने धक्का दिला त्याची पुरती गाळण उडाली होती.. त्याच क्षणी जराही विलंब न लावता त्याची कॉलर पकडून तिने त्याच्या मुस्कटात लगावली.  तिच्या अंगात जणू वाघिणीचे बळ आल्यासारखे भासले.  तिथेच काही अंतरावर पोलिसांची गाडी उभी होती.  लोकांनीही ह्या रणरागिणीला सलाम करून त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले.  एवढेच नाही तर पोलिसांनीही तिचे विशेष कौतुक केले.  एवढी सतर्कता लोकांनीही दाखवली त्यामुळे तिच्या नारीशक्तीला आणि त्या लोकांच्या सहकार्याला मुजरा.  अश्या गौरया घराघरात जन्माला याव्यात.  झालेला सर्व प्रकार गौरीने आपल्या घरी आल्यावर घरच्यांना सांगितला व तशीच ती आपल्या मैत्रिणींना ठरलेल्या ठिकाणी भेटण्यास निघाली.
    
   कृतिकाच्या पडलेला चेहरा गौरीला काहीतरी बिनसल्याची जाणीव करून देत होता.  विचारल्यावर आहे तो प्रकार संध्याने तिच्या कानावर घातला.  त्यावर शांत बसेल ती गौरी कसली?  थोड्याच वेळापूर्वी घडलेली गोष्ट तिने दोघींशी शेअर केला.  काही वेळ सर्वच शांत बसलेले पाहून गौरीने विषयाला सुरुवात केली.  आपण खरं तर खूप शांत बसतो संध्या... हे सगळे प्रकार वेळीच रोखता येतातही आणि काही वेळेस आपल्या गप्प बसण्याच्या सवयीमुळे टोकालाही जातात.  माझा भाचा विराज... तिसरीला आहे... बहिणीचा एकुलता एक मुलगा असूनही तितकाच शिस्तप्रिय आणि हुशार आहे.  माझ्या बहिणाचा दीर अधून मधून त्यांचा घरी येत असतो.  तो जेव्हा केव्हा येतो तेव्हा विराज खूप अस्वस्थ होतो.  खूप बिथरला सारखा करतो... कारण काय तर दोघांनाही कळेना!

     विराज आजीकडे आला तेव्हा त्याला ह्या गोष्टीबद्दल विचारले असता त्याने ज्या काही गोष्टी तुटक मुटक सांगण्याच्या प्रयत्न केला त्यावरून वारंवार घडलेल्या ह्या प्रकाराबद्दलची भीषण कल्पना आली.  सतत त्या काकाचे विराजला घेऊन मांडीवर बसणे.. गालगुच्छा घेणे... पायात दाबणे... ह्याप्रकारने विराज खूप संकोचून जायचा मात्र त्याला ते शब्दात मांडता येत नव्हते... नाही घरच्यांना सांगता... त्याच्यावरील लैंगिक शोषणामुळे त्याची मानसिकता ढासळत चालली होती.  ताईला ह्याबद्दल कल्पना दिली असता तिला धक्काच बसला... मात्र ती भाऊजींना सांगायला तयार होईना... नाती बिघडण्याची भीती.... ह्यावर तिने पर्याय शोधला... विराजला त्याचे काका आल्यावर एकटे त्यांच्याबरोबर सोडायचे नाही.  मला सांगा हा खरच पर्याय असू शकतो की अजून काही उपाय शोधता येईल?  गौरीच्या बोलण्याने संध्या तिच्या भूतकाळात गेली.

     आपली संध्या खुपचं साधी.  मात्र लहानपणीच्या काही गोष्टींमुळे तिलाही पुरुषांच्या विकृत स्वभावाचा प्रचंड राग यायचा.  आई नोकरीनिमित्त नऊ तास बाहेर तर वडील ऑफिसला सकाळी जायचे ते रात्री घरी यायचे.  मुलांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून तिच्या आईने प्रायव्हेट होम ट्युशन तिच्यासाठी चालू केले.  संध्याला मात्र सर्वांसोबत अभ्यास करायला आवडायचे.  आईच्या पुढे तिला काही बोलता यायचे नाही, त्यामुळे तिचे ट्युशन घरीच चालायचे.  संध्याला तिचे सर शिकवताना अतिशय प्रेमाने शिकवत.  मात्र ज्यावेळी तिची आई घरातील कामात व्यस्त असे त्यावेळी सरांचं प्रेमाने शिकवण तिला नकोसं व्हायचं.  त्याला कारण जाणून बुजून केलेला स्पर्श.  कधी हातावर हाथ ठेवून तर कधी जवळ बसवून.   सातवीत असणारी संध्या सरांचं विचित्र वागणं आईला नीट स्पष्टही करू शकली नाही, फक्त आई मला नको असा क्लास... मला ते सर नाही आवडत... आई मात्र आपल्या बाळाला समजावत होती... बाळा छान आहेत सर... मी ओळखते त्यांना.. नीट अभ्यास घेतील तुझा... ह्यावर संध्या फक्त स्वतःवर चिडचिड करत राहिली.  भूतकाळातील आठवणीने संध्या कासावीस झाली.  खरंच ह्या गोष्टी दाबून का ठेवल्या जातात?  ह्यांचा पर्दाफाश करणे महत्वाचे की गपगुमानं चालत राहून ते विसरणे हे फायद्याचे?  कोमल मनावरील आघाताचा विचार कोण करणार?  खरच ते विसरता येतं का?  हा स्पर्श... समज....गैरसमज... ह्याविषयी का कुणी सांगत नाही?  घरातले मनमोकळेपणाने का बोलत नाही ह्याविषयी?  शाळेत सांगितले जाते तो पर्यंत आपल्याला बरीच समजही आलेली असते.  पण घडून गेलेल्या गोष्टी मात्र झाकून जातात... मुक्कामार लागल्यासारखं...  संध्याच्या ह्या अचानक बोलण्याने तिच्यावर बालमनात झालेला आघाताने पहिल्यांदाच तिच्या मनातील मूक जखमेला मोकळी वाट करून दिली होती.  मगाशीच येऊन पोचलेल्या स्वातीला नकळत हुंदका आला... तिची अवस्था पाहून तिघींनी तिला पाणी प्यायला देऊन शांत केले.

    स्वाती... लग्नाला 2 वर्ष झालेली... गोंडस मुलगा पदरी... नवरा उच्चशिक्षित, सुसंस्कारी, अतिशय प्रेमळ तितकाच भावुक.  स्वाती क्लेरिकल म्हणून सरकारी कार्यालयात कामाला आहे... घर नोकरी संसार अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळते.  कुटुंब आणि नोकरी तितक्याच लीलया पेलते.  घरापासून बाजार थोडा दूर... भाजीपाला फळभाज्या काही हवे असेल तर विकणारे सोसायटीत येतात.  दररोज सोसायटीत केळीवाला भैय्या घरोघरी केळीसाठी फिरतो.  स्वातीही इतरांप्रमाणे त्याच्याकडूनच केळी विकत घेते... दर वेळी केळी घेताना तो भैय्या हाताला हात लावायचा... घाईत पैसे देताना असेल म्हणून स्वातीनेही दुर्लक्ष केले... पुन्हा एकदा त्याला लांबून पैसे देताना पुन्हा त्याने हाताला हाथ लागेल अश्या रीतीने वर्तन केले... असे करताना त्याच्या चेहऱ्यावर भाव मात्र शून्य... जणू काही झालेच नाही... तो खूप घाईत आहे असा अविर्भावात... पुढच्या वेळेस मात्र मी ह्यांना म्हणाली... जरा तुम्ही घ्या हो त्याच्याकडून मी कामात आहे... कसाबसा वेळ मारून तो विषय तिथेच थांबवला.. मात्र दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केळीवाला आल्यावर पुन्हा नवऱ्याला बोलली अहो तुम्हीच घ्या... तो केळीचे पैसे घेताना हाताला हाथ लावतो... ह्यावर मात्र ह्यांनी लगेचच प्रतिक्रिया देताना म्हंटल की तू देताना नीट पैसे देत नसशील त्याला... आणि ह्यापुढे आपल्याला केळी नको असे म्हणून त्यांनी विषयच बंद केला.  नवऱ्याच्या प्रतिक्रियेवर राग व्यक्त करावा की भोळेपणा समजून कीवL करावी हेच कळेना... घडलेला प्रकार मैत्रिणींशी शेअर करताना चौघीही कमालीच्या दुखावल्या गेल्या.

     कृतिका, संध्या, गौरी आणि स्वाती ह्यांच्यासारख्या समाजात कित्येक मुली आहेत.  बऱ्याच वेळा आपण ह्या गोष्टी छोट्या मोठया कारणास्तव सोडून देतो.  काही वेळा त्यावर पडदा टाकतो तर काही वेळा स्वतःलाच दोष देतो.  कृतिकाने बदनामी नको म्हणून सहनशीलता वाढवली तर संध्या सारख्या सोज्वळ मुलीला तिच्या आईच्या बाहेरील व्यक्तीवर असलेल्या विश्वासामुळे पोखरून काढले गेले.  स्वातीसारख्या स्रियांना आजही असे अनेक अनुभव येताहेत त्याविषयी त्या कोणाला सांगूंही शकत नाही आणि सहनही करू शकत नाही.  आजही समाज स्त्रीला दोषी ठरवतो.  स्वातीचा नवरा जितक्या सहजतेने तिला बोलला की तू पैसे देताना नीट पैसे देत नसशील ह्यावरून पायाची आग मस्तकात भिनतेय असंच काहीसं स्वातीला झालं असेल.  ह्यात त्या स्त्रीवरील अविश्वास समजायचं की अस्सल भोळा भाबडा स्वभाव समजायचं?

     आपण ज्या समाजात वावरतोय तिथे आपण सतर्क राहिले पाहिजे.  कृतिकासारख्या असंख्य स्त्रीया आहेत... त्यात काहीजणी शांत बसून सहन करणाऱ्या तर काही त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या.  संध्यासारख्या प्रत्येक मुलींना लहानपणीच काही गोष्टी शिकवण्याची व समजवण्याची गरज असते... त्यासाठी हक्काने मायेने जवळ घेणारे आणि तेवढ्याच अल्लड बुद्धीला समजून घेणाऱ्या व्यक्तिमत्वाची... मग त्या भूमिकेत आईच असेल असे नाही... आणि प्रत्येक वेळी समजून घेणारे आणि समजवणारे शिक्षकच असतील असेही नाही.  आपल्या बाळाला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श समजावणे ही काळाची गरज आहे.  गौरीसारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यावीच मात्र त्याचबरोबर आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे प्रत्येक कुटुंबाने द्यायला हवे.  स्वातीसारख्या स्त्रियांनी स्व-अस्तित्वाची जाणीव ठेवून अश्या विकृतींना तिथल्या तिथेच आळा घालून देण्याच्या विचारांना जागवणे ही गरज आहे.  ह्या भूमिकेत नवऱ्यानेही तितक्याच जबाबदारीने आपल्या बायकोच्या भावना समजून तिला अशा प्रसंगांना सामोरे जाण्यास तयार करायला हवं... मानसिक बळ द्यायला हवं.

     समाज बदलतोय... विचार बदलताहेत... स्त्रिया खऱ्या अर्थाने घडताहेत... हे फक्त विधानाकरता की खरंच?  खरं सांगायचं तर हा स्पर्श जितका प्रेमळ असतो तितकाच विकृतही असतो... त्याला कारण माणसांच्या वृत्ती.  जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... आळा घालताना व्यक्ती कधी विळख्यात सापडली जाते कळत नाही...  त्यामुळे स्ट्रिकनेस पेक्षा स्मार्ट अलर्टनेस हा हवाच... आणि हो... स्पर्श.... ह्या घडणाऱ्या गोष्टी फक्त स्त्रियांच्याच बाबतीत घडत आहे ह्या भ्रमातून आपल्याला बाहेर येणे तितकेच गरजेचे आहे... काळ बदलतोय... मुलगा असो की मुलगी... लहान असो की मोठे... शक्य तितक्या लवकर... दे मस्ट हॅव टू नो अबाऊट गुड टच अँड बॅड टच... Raise Your Voice..

                                    - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    

Tuesday, 3 April 2018

फोल्डर

     फाईल्स म्हणजे काय हे आपण पाहिले.  विविध एप्लिकेशन्स मध्ये तयार केलेल्या आपल्या माहितीचा साठा फाईल्समध्ये असतो.  प्रत्येक फाईल ही दुसऱ्या फाईल पेक्षा वेगळी असते.  ह्या सर्व फाईल्स ज्या विभागात एकत्र ठेवले जातात, त्याला 'फोल्डर' असे म्हणतात.  फोल्डर हे आपल्या संगणकावरील ड्राईव्ह प्रमाणे असते. (संगणकावर आपण C: D: हे ड्राइव्हज् पाहतो.)  म्हणजेच एकाच नावाचे दोन फोल्डर आपण तयार करू शकत नाही त्याचप्रमाणे एकाच फोल्डर मध्ये आपण एकाच नावाच्या दोन फाईल्स तयार करू शकत नाही.

     थोडक्यात, फोल्डर्स म्हणजे हार्ड डिस्कवर माहिती साठवण्याचे छोटे छोटे कप्पेच असतात.  एका फोल्डरमध्ये एकाच विषयाशी संबंधित अनेक फाईल्स आपण साठवू शकतो.  तसेच एका फोल्डरच्या आत आपण आणखी एक फोल्डरही तयार करू शकतो. फोल्डरच्या आतील फोल्डरला सब फोल्डर असे म्हणतात.  फोल्डर आणि सब फोल्डरचा डिफॉल्ट आयकॉन पिवळ्या रंगाचा असतो.

फोल्डर कसा तयार करावा:
     तुम्ही फोल्डर माय कॉम्पुटर तसेच विंडोज एक्सप्लोररच्या साहाय्याने तयार करू शकता.

माय कॉम्प्युटरचा वापर करून फोल्डर तयार करणे-

१) माय कॉम्पुटर ह्या आयकॉनवर डबल क्लीक करणे.
Photo Source: Google

2) आपल्याला जिथे आपला फोल्डर बनवायचा आहे त्या भागातील ड्राईव्ह किंवा फोल्डर सिलेक्ट करणे.  सिलेक्ट केल्यामुळे आपण त्या ड्राईव्ह / फोल्डरच्या आतील भागात येतो.

3) ज्या ड्राईव्ह किंवा फोल्डर मध्ये आपल्याला नवीन फोल्डर बनवायचा आहे तेथील कोणत्याही सफेद भागावर राईट क्लीक करा.  ओपन झाल्यावर न्यू फोल्डर लिहिलेले आपल्याला  दिसेल, त्यावर सिलेक्ट करा.

4) आपल्याला पिवळ्या रंगाचे एक बॉक्स दिसेल.  त्या फोल्डर बॉक्स ला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नाव देऊन त्यावर एंटर करा.
Photo Source: Google
     तुमचा फोल्डर तुम्ही दिलेल्या नावानुसार तयार झालेला तुम्हाला त्या स्क्रीनवर पाहता येईल.

     आपण बनवलेले फोल्डर आपण शेअरही (शेअर म्हणजे आपली फाईल आपल्यासोबतच ठेवून दुसऱ्यालाही ती पाठवू शकतो) करू शकतो.  त्यासाठी संगणकावर विविध पर्याय असतात.  सोपं उदाहरण 'ब्लुटूथ'.  आपण मोबाइलवर एखादी इमेज शेअर करताना म्हणजेच दुसऱ्याला पाठवताना ब्लुटूथचा वापर करतो.  इतरही अनेक पर्याय ह्यासाठी आहेतच.  (आपण सध्या संगणकासंदर्भातील फाईल शेअरिंग पाहत आहोत त्यासाठी ब्लुटूथ हे एक उदहरणासाठी दिलेले आहे.)


फोल्डर कसे शेअर केले जाते:
  • फोल्डर शेअर करण्यासाठी शेअर करायच्या फोल्डरवर माऊस पॉइंटरच्या साहाय्याने राईट क्लीक करा.  
  • तिथे आपल्याला 'शेअर विथ' / 'share with' हा ऑप्शन दिसेल.  त्यावर क्लिक करणे.
Photo Source: Google
  • ज्या व्यक्तीसोबत किंवा लोकांसोबत आपल्याला आपली फाईल शेअर करायची आहे त्यांना सिलेक्ट करा.(संगणकाला कनेक्टेड असलेल्या युझर्सचे/ वापरकर्त्यांचे नावे दिसतात.) 
  • सिलेक्ट झाल्यावर 'Add' वर क्लिक करा.  
  • तुमची फाईल 'Add' केलेल्यांसोबत शेअर्ड होईल.

फोल्डर शेअरिंग बंद करायचे असल्यास:
  • जे फोल्डर तुम्हाला शेअर करावयाचे नाही त्यावर तुम्ही राईट क्लिक करून प्रथम 'शेअर विथ' ह्या ऑप्शन वर क्लिक करा.  
  • त्यानंतर 'नो बडी' ह्यावर माऊस पॉइंटर नेऊन तो ऑप्शन क्लिक करा. 
  • तुमची फाईल अनशेअर्ड होईल.
Photo Source: Google

     आपण माय कॉम्पुटर द्वारे फोल्डर बनवणे तसेच फोल्डर शेअर्ड व अनशेअर्ड करणे पाहिले.  आता पुढे आपण विंडोज एक्सप्लोरर द्वारे फोल्डर कसा बनवतात हे पाहू.  तत्पूर्वी विंडोज एक्सप्लोरर काय आहे? आणि त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो? हे आपण पाहणार आहोतच, तो पर्यंत इथेच थांबुयात.
                                                                                            - अनुप्रिया सावंत.

        मागील लेख                                                                            पुढे पहा

Monday, 2 April 2018

क्रशवाली स्टोरी - He Is My Crush


     प्रत्येकाला एक अशी व्यक्ती आवडते जी त्याची क्रश असते.  पण क्रश असणारी व्यक्ती हे आपले प्रेमंच असते असं नाही.  आपल्या प्रेमाला आपल्या क्रशबद्दल सांगतानाचा विश्वास आणि योगायोग ह्या गोष्टीबद्दल ही कथा आहे.

     अनघा... सातवीत असतांनाच प्रेमात पडली.  खरं तर प्रेम करण्याचं हे वय नाहीच म्हणा पण प्रेम म्हणजे काय तेही माहीत नसताना त्याच्या नावावरही खुश होणारी.  कधी पाणीपुरी तर कधी वडापाव खाण्याच्या बहाण्याने जाता येता तिला त्याच्या घराचा दरवाजा दिसायचा.  कधी तो उभा दिसायचा तर कधी मानलेल्या सासू बाई.  ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी बाई अभ्यासात पण त्यालाच शोधायच्या.  बाजारात भाजी आणयलाही आवडीने जाणाऱ्या आपल्या लेकीचं आईला कौतुक भारी, तर हिला मात्र त्याच्या नुसत्या दिसण्याचं.  पोरगा नुसता दिसायलाच नाही तर बुद्धीनेही हुशार.  पूर्ण कुटुंब एकमेकांच्या ओळखीतलेच.  त्यामुळे त्याच्या बद्दलची जमेल तितकी माहिती अनघा मिळवायची.  अर्थात हे करत असताना कोणालाही शंका येणार नाही हे पाहूनच.  दोघेही एकाच वयाचे मात्र शाळा आणि माध्यम दोन्हीही दोन टोकाचे.
    
     ह्या प्रेमात तर्फी न्हवती... होती ती बर्फी... निखळ प्रेमाची. असो. असे हे प्रेम सातवीपासून तब्बल पंधरावी म्हणजे ग्रॅज्युएशन होईस्तोवर कोणाला कळू दिले नाही. तब्बल 9 वर्ष तिने त्याला पाहण्यातच घालवले. खरं तर हेच का प्रेम हेही तिला जाणून घ्यायचे नव्हते, तिला फक्त त्याला पहायचे होते. वर्ष सरत होते, दिवस पळत होते. दोघेही शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले होते. हिने एकदाही त्याच्या मनात कोणी आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
     
     अचानक एके दिवशी अनघाला कळते की त्याची अगोदरपासून गर्लफ्रेंड आहे. नाराजीतेने अनेक प्रश्न स्वतःला करते... आपण त्याला आधीच सांगितलं असतं तर.. आपण उशीर केला... वैगरे वैगरे... क्षणातच स्वतःला सावरत ती विचारते... 9 वर्ष फक्त त्याला पाहण्यात घालवली... ह्यात खरंच तुला प्रेम होतं की अजून काही?.. नो नो नो... इट्स नॉट लव्ह... अँड इट्स अलसो नॉट ऍटरॅक्शन... आणि नक्कीच हे चुकीचंही नाही... इट्स सॅमथिंग क्रेझिनेस... येस... आय हॅव क्लिअर वेरी स्पेशल थिंग... ओ येस... ही इज माय क्रश... फॉरेव्हर क्रश?.... हा हा हा... येस... अनघा एक क्लीन क्लिअर व्यक्तीमत्व आणि तितकीच डॅशिंग.  पिक्चर अभी बाकी है... करत अनघा सगळे विचार झटकून नॉर्मल झाली.
     
     अनघाला ह्या गोष्टीतून बाहेर यायला फारसा वेळ लागला नाही... मुळात तिला तिच्या भावना स्पष्ट होत्या.  आणि तिला स्वतःच्या भावनांची कदर आणि आदर दोन्हीही भरभरून होत्या.  भटकंती सोबत फोटोग्राफी करणं हा तिचा सर्वात आवडत छंद. ह्यातच तिचा नवीन ग्रुप जोडला गेला.  सर्वांशी बिनधास्त बोलणारी आणि सर्वांमध्ये लगेच मिसळणारी अनघा अनिशला बघता क्षणीच आवडली होती.  अनेक ट्रेकिंगच्या वेळेस एकत्र मौजमजेत दोघेही एकमेकांना चांगले ओळखायला लागले होते.  आवड ह्या प्राथमिक स्थराने आता द्वितीय स्थराचा टप्पा गाठला होता.  फोन वरच्या गप्पा, चॅटिंग एव्हाना सुरू होऊन गाडी रुळावर आली होती.  बस 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा सीन प्रतीक्षेत होता.
     
   क्लीन क्लिअर स्पष्ट अनघा आणि प्रेमळ समझदार, तितकाच सहज स्वभावाचा अनिश.  दोघांची जोडी तितकीच छान आणि तितकीच हलकी फुलकी. बोलताना मनातलं सर्व शेअर करणाऱ्या अनघाने अनिशला तिच्या क्रश विषयीची गोष्ट, तिच्या भावना सर्व काही त्याच्याशी शेअर केलं.  अनिशनेही तितक्याच हळुवारपणे तिच्या भावनांचा आदर केला.  मात्र दोघांनी अधिक काही न बोलता विषय तिथेच थांबवला.  अनघाला आपण अनिशशी जे काही बोललो त्याचा अनिश राग तर करणार नाही ना? ह्या विचाराने थोडी काळजी वाटली.
    
    दुसऱ्या दिवशी अनिशने तिला फोन केला आणि आपण त्याला भेटलो असल्याचे सांगितले.  अनघाला तिच्या कानावर विश्वास तर बसेना, मात्र नक्की काय झाले हेही तिला कळेना.  कारण तिचं अनिशवर खरं प्रेम होतं आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती.  अनघाच्या मनावरचं दडपण अनिशलाही जाणवायला लागले.  तो काही बोलणार तितक्याच अनघा अनिशची माफी मागून त्याला पुन्हा पुन्हा आपल्या प्रेमाची कबुली देऊ लागली... अनिश कसलाही चुकीचा विचार करू नकोस, मला फक्त तो आवडायचा आणि त्यापलीकडे कोणतंच नात कधीच नव्हतं. अनघाला कोणत्याही क्षणी रडू येईल हे जाणून अनिशने तिला शांत राहण्यास सांगितले.
     
     योगायोग कसा असू शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण.  दोघेही संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटले. अनघा मी भेटलो त्याला... अनिशच्या ह्या बोलण्याने राग, काळजी, उत्सुकता ह्या सगळ्याच भावना अनघाच्या नजरेत दाटून आल्या होत्या.  आपण फक्त बोललो आणि ह्याने सरळ त्याला शोधून त्याची भेट घेणं हे अनघाला विचारात पाडणारे होते.  हा आपली मस्करी तर करत नाहीये ना? अनिशच्या स्वभावाचे पैलू बघण्यात हरवलेल्या अनघाला अनिशने मोठ्याने हसून भानावर आणले.  तिला प्रेमाने मिठी मारत तिचा हात हातात घेतला... आय लव्ह यु अनघा.  अनिशच्या बोलण्याने अनघा अजूनच गोंधळात पडली.

     तू काल बोलताना त्याच्याविषयी आणि झालेल्या गोष्टीविषयी माझ्याशी सर्वच सविस्तर शेअर केलेस.  अनघा... मीही या गोष्टी वर जास्त काही विचार केलाच नाही. आज ऑफिस मध्ये सकाळी अचानक तो समोर आला आणि तुझ बोलणं आठवलं. खरं तर तू सांगत होतीस तेव्हाच मला हा आठवला.  कारण तू त्याचे केलेले वर्णन.. त्याची गर्लफ्रेंड त्यांचे प्रेम. त्याच्या सगळ्या गोष्टी मी कॉलेजपासून पाहिले आहे.  आणि तू सांगताना त्या हुबेहूब जुळल्या होत्या.  मात्र सर्वात मोठा योगायोग असा की तो कॉलेज लाईफनंतर आज प्रथमच भेटला आणि तेही तू मला जेव्हा बोललीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी.  मला खूप गंमत वाटली... आणि अनघा... तुझ्यावरचं प्रेम विश्वास अधिकच वाढलं.

     अनघा... तो आणि मी आम्ही एकाच कॉलेजमध्ये... एकाच वर्गात... आमची खूप छान मैत्री आहे... आणि हो त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल आम्हाला सर्वांनाच माहीत होतं की ते खूप सिरिअस कपल आहेत. हम्म... ते लहानपणापासून प्रेम करतात हे नंतर कळालं मला पण माझा सातवी पासून क्रश आहे तो... म्हणजे ती माझ्या नंतर आली.. अनघाच्या ह्या बोलण्याने दोघेही मनापासून हसत एकमेकांच्या मिठीत विसावले.  विश्वासाचं नात नकळत दृढ झालं होतं.
'दिलवाले दुल्हन ले जाएंगे' च्या हटके क्रशवाल्या स्टोरीचा... प्रेमाचा वटवृक्ष विश्वासाच्या फुलांनी बहरला आहे... त्यावर सुंदर गोड फळेही आली आहेत.

                                                                                            - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                           पुढील कथा वाचा

Saturday, 31 March 2018

कविता #14 - नाउमेद मी कधीच नव्हते...




     प्रत्येक व्यक्तीच्या मनात व्यक्तिपरत्वे अनेक विचारांचे काहूर माजत असते. आपण काय करतोय? काय चालू आहे? एक ना अनेक प्रश्न स्वतःच स्वतःला बऱ्याच वेळा विचारतो. आपल्या जे हवे असते ते मिळतेच असे नाही. आणि जे आपल्याजवळ असते त्यात आपण समाधानी असतोच असे नाही. कारण माणसाला जे हवंय त्यापेक्षा त्याच्याकडे काय नाही आहे, ह्या तुलनेतच तो जास्त गुरफटला जातो. ह्यात आपला आळशीपणा म्हणा किंवा आत्मविश्वासाची कमी म्हणा ह्यामुळे स्वतःला ओळखण्यात आणि त्यातून चांगले शिकण्यात कमी पडतो.

     कुठेतरी मेहनत कमी पडते किंवा काहीतरी अविचारीपणा नडतो. मात्र ह्यामुळे गफलत होते ती आपलीच. नाही का? क्षणात असे वाटते सगळे मार्ग थांबले. क्षणात वाटते आता काहीच नाही उरले. पण, खरच असं असतं का हो? जीवन ही कला तर आहेच पण त्याहूनही सुंदर परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मग असं असताना खरच आपले मार्ग थांबतील का? तर नक्कीच नाही. थांबेल ती 'आशा' कसली? सोडून देईल त्यात 'उमेद' कसली? हिंम्मत हारेल ती 'व्यक्ती' कसली?

        कारण, उमदीपणा व्यक्तीला प्रवाहित करतो ते न थांबण्यासाठीच. नदीच्या प्रवाहासारखा कुठूनही प्रवाहित झाला तरी अथांग समुद्राला मिळण्याकरिता, सागराच्या लाटांसोबत किनारा शोधण्याकरता. स्वतःच्या नावेत स्वतः नावाडी होण्याकरता.

    नाउमेद मी कधीच नव्हते... 'दैनिक प्रत्यक्ष काव्यपीठ' द्वारे माझी ही कविता दिनांक 5 मार्च 2018 ला छापून आलेली आहे. ती मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून पुन्हा सर्वांसमोर सादर करते.


उमदी ही आशा,
ना उमेद मी कधीच नव्हते.
जीवनाची भाषा मी 
जगण्यातून शिकत होते.
हातात असतानाही हाताच्या रेषेत 
वेड्यासारखी शोधत होते.

हृदयात असूनही,
देवळाची पायरी चढत होते.
दगडासमोर डोके फोडून, 
जखमांनी विव्हळत होते.
तरीही उमेदाची आशा,
मनामनात भिनवत होते.
नाउमेद मी कधीच नव्हते.

जगण्यासाठी सतत, 
झोकून प्रयास करत होते.
प्रयास करताना मात्र 
डोळे झाकत शोधत होते.
ठेच लागता पायाला, 
दोष मात्र दगडाला देत होते,

माझी चूक मला कळताच,
स्वतावर फक्त हसत होते.
प्रयत्न अपुरे असताना,
दैवावरच दोष देत होते.

आळशीपणाने भरलेल्या
ह्या माझ्याच मनाला,
पुन्हा नव्याने जागवत आहे.
माझ्या मनाला समजावत, 
पुन्हा पुन्हा शहाणं मी करणार आहे.

कारण अजूनही उमेद आहे, 
नाउमेद मी कधीच नव्हते.

                                                       - अनुप्रिया सावंत.

Friday, 30 March 2018

फाईल - प्रायमरी नेम आणि एक्सटेंशन

     मागच्या सदरात फाईल विषयी आपण काही गोष्टी जाणून घेतल्या आहेत. ह्या फाईलला नाव देताना त्यांना ज्या दोन भागात विभागले जाते त्या विषयी आपण आज पाहणार आहोत.

फाईल नेमचे दोन भाग असतात.
1) प्रायमरी नेम
2) एक्सटेंशन


1) प्रायमरी नेम :
     प्रायमरी नेम हा प्रत्येक फाईलच्या सुरुवातीचा भाग असतो. आणि हे प्रायमरी नेम जी व्यक्ती ती फाईल बनवते ती व्यक्ती देते. आपल्या फाईलला नाव देताना फाईलमधील माहितीला अनुसरून द्यावे जेणेकरून ती फाईल आपण सहजरित्या शोधू शकतो.

     फाईल नेममधील प्रायमरी नेम देताना अक्षरे, अंक, चिन्ह यांचा वापर करता येतो यांनाच कॅरॅक्टर असे म्हणतात. परंतु काही चिन्हांचा अपवाद वगळता (ही चिन्हे /,\, *,?, <, > विशिष्ट अर्थ असणारी आहेत आणि त्यांचा वापर कॉम्पुटर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये केला जातो.) कीबोर्ड वडील इतर सर्व चिन्हांचा वापर फाईलच्या नावासाठी करता येतो.

    डॉस ऑपरेटिंग सिस्टिम मधील नेमिंग कॅरॅक्टर संख्येला मात्र येते मर्याद असते. त्यात फक्त 8 कॅरॅक्टर वापरले जातात, तर आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये प्रायमरी नेम 255 कॅरेक्टर आपण वापरू शकतो.


2) एक्सटेंशन
     आपण पाहतो ज्यावेळी आपण संगणकावर फाईल ओपन करतो त्यापुढे . (ह्या डॉटला परिअड असे म्हणतात)करून त्या त्या फाईलच्या एक्सटेंशन विषयी लिहिलेले असते. उदाहरणार्थ आपण मागे फाईल बनवताना पाहिले .txt
हे .txt ती फाईल नोटेपॅड मधील फाईल असल्याचे स्पष्ट करते.

     एक्सटेंशन हा फाईल नेमचे दुसरा भाग असतो. फाईल नेम आणि एक्सटेंशन ह्यांच्या मध्ये जो डॉट म्हणजेच पूर्णविराम असलेला आपल्याला दिसतो त्याला पिरिअड असे म्हणतात. हा एक्सटेंशनचाच भाग असतो. पिरिअड नंतर सामान्यतः 3 अक्षरांनी हे एक्सटेंशन दर्शविले जाते. हीच महत्वाची अक्षरे आपल्याला फाईल कोणत्या अप्लिकेशन प्रोग्रॅमची आहे हे सूचित करते. 

नोट: विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये एक्सटेंशन आपोआप(by default) दिले जाते.


आपण खाली काही उदाहरणे पाहू:

अप्लिकेशन प्रोग्रॅम          फाईलचा प्रकार            एक्सटेंशन

1) मायक्रोसॉफ्ट वर्ड        वर्ड डॉक्युमेंट                 .doc
2) MS पॉवरपॉइंट          पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन      .ppt
3) MS एक्सेल                एक्सेल वर्कशीट              .xls
4) MS पेंट                     बिटमॅप इमेज                 .bmp
5) नोटपॅड                      टेक्स्ट                            .txt
6) इंटरनेट एक्सप्लोरर    वेबपेज                          .html

     प्रायमरी फाईल आणि त्याच्यासह असलेले एक्सटेंशन ह्याविषयी सविस्तर माहिती आपण पहिली.  सर्व फाईलस एकत्र कशा प्रकरे संग्रहित केला जातो त्या फोल्डर विषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या सदरात.

                                                                                      अनुप्रिया सावंत.

          मागील लेख                                                                                     पुढे पहा