Friday 10 May 2024

शिदोरी - लव्ह यू जिंदगी💞

निळभोर आकाश, चंदेरी रुपेरी वाळू, समोर लाटांवर स्वैर होणारा मुक्त आणि अथांग समुद्र आणि समुद्राला शोभा देणारी, त्याचे अस्तित्व जाणवून देणारी नारळाची उंच उंच झाडी.  


सागराचा साथी असणारा त्याचा एकमेव किनारा ज्याच्यावर हक्क गाजवताना आपल्याला साऱ्या जगाचा विसर पडतो.  


ह्या सागराच्या खोलीचा थांगपत्ता कधी लागणं खरंच शक्य नाही.  अगदी प्रत्येकाच्या मनासारखं.  पोटात अनेक गोष्टी दडवून ठेवल्या असतात.   त्याच्यासोबत अनेक जीवांना सांभाळत आपले कार्य पूर्ण करत त्याचा प्रवास मात्र चालूच असतो, अगदी अनादिकाळापासून अनंतापर्यंत.  त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेताना गडद होऊन गुडूप व्हायला होत.  अगदी कितीतरी रहस्य दडवून तो तसाच त्याच्या साथीदारांसोबत खळखळत असतो.  त्याचे अश्रू कधी दिसत नाही, मात्र जाणीव होत राहते.  


राग, आनंद, दुःख, वेदना, जाणीव, लोभ, प्रेम, त्याग अगदी सर्वच.  भावनेचा पुरही वाहून जातो, त्यात अनेक गोष्टींचा उच्छाद मांडला जातो, कधी मनासारखं तर कधी मनाविरुद्ध.  कधी तर खवळल्यासारखं अगदी बाहेर किनाऱ्यावर फेकून देतो.  तर कधी त्या किनाऱ्यावर संथपणे तरंगत राहतो आणि पुन्हा परतीचा प्रवास करत त्याच्या दाट खोलीत सामावून जातो.  


हा सागर त्याचं कार्य कधीच विसरत नाही.  किंबहुना त्याला त्याच कार्य विसरून चालतच नाही.  म्हणूनच तो त्याचं भान हरपून जगतो आणि जगताना त्या आकाशाला पुन्हा नव्याने मिठी मारत साद घालत राहतो, कारण त्याला त्याची डेस्टिनी माहीत असते.  अशी डेस्टिनी जी त्याच्या कार्याला पूर्णत्व देते.  कसलीही अपेक्षा न करता तो फक्त निर्सगाच्या सानिध्यात स्वतःला झोकून देतो आणि तेच खर त्याच अस्तित्व असत.


माणसाच्या आयुष्याचं ही तसच तर असत.  कुठे थांबायचं हे आपलं आपल्याला कळायला हवं.  मला हे हवंय किंवा मला हे मिळालच नाही म्हणून स्वतःला कोसत राहण्यापेक्षा आपला किनारा आपण सांभाळायला हवा.  


सागर जेव्हा समुद्राचा किनारा सोडून वाहतो तेव्हा त्याच्या कृतीने बऱ्याच गोष्टी हातापलिकडे जातात ज्यांना सांभाळणं कठीण होत.


आपल्या आयुष्याचा किनारा सुद्धा असाच आहे, तो ओलांडला की मार्ग हरवतोच. 

 

आपली मर्यादा माहीत पाहिजे हे नक्की, 'But remember that Sky is the only limit.' 


आयुष्य जगायचं असेल तर समुद्रासारखे जगले पाहिजे.  सगळ काही सामावून सुद्धा नामा-निराळा.  आहे त्यात सुख शोधून आपली डेस्टिनी मिळवणारा.  सतत खळखळणारा, कधी संथ होऊन वाहत राहणारा, तर कधी लाटांवर मुक्तपणे संचार करणारा.  


आयुष्य म्हणजे एक सुंदर फुल आहे.  त्या फुलात देवाने त्याचा सुगंध अगदीच भरभरून दिला आहे.  त्या फुलाला जपत त्याचा ताजेपणा बहरत ठेवणं हे आपलं कार्य आहे.  कारण मनुष्य हा 'प्रवासी' आहे.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, मात्र परतीचा प्रवास प्रत्येकाला सारखाच आहे.


आदमी मुसाफिर है

आता है जाता है|

आते जाते रस्ते मे 

यारी छोड जाता है|


आपण कोण आहोत हे लोकं नक्कीच विसरून जातील.  मात्र आपण काय आहोत, काय केले आणि कसे जगलो हे नक्कीच लक्षात राहतं.  


आमची आई नेहमी सांगते...

"Say yourself just... Love you Jindagi💞".

                                                            

                                                                  - अनुप्रिया सावंत.

Friday 3 May 2024

लघुकथा #1 - Be Optimistic!


चिनू शाळेतून रडतच घरी आली.  आल्या-आल्या हातपाय न धुता तशीच नाराज बसली.  देवघरातील अगरबत्तीचा सुवासाने तिला प्रसन्न वाटत होतं.  तरीही शाळेतल्या गोष्टीमुळे ती पुन्हा उदास झाली.  आईने तिला स्वच्छ हातपाय धुवून तयार होण्यास सांगितले.  छोटी चिनू आज्ञाधारक बाळाप्रमाणे तशीच उठून हातपाय धुण्यास गेली.  


गरम गरम शिऱ्याचा खमंग वासाने चिनुची मोठी ताई चिऊ बाहेर आली.  अभ्यास करून तिच्या खोलीतून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला येत असताना तिचं लक्ष आपल्या छोट्या चीनुकडे गेलं.  आपल्या छोट्या बहिणीला असं रुसलेल बघून तिने आईला नजरेनेच काय झाले ते विचारले, त्यावर आईने डोळ्यांनीच थोडा वेळ थांब सांगितले.  


चिनू नाश्त्याला बसल्यावर आईने गोड हसून तिला हळूच साद घातली तशी चिनू आईला घट्ट बिलगली.


अगदी लहान निरागस बाळासारखं मुसमुसतच शाळेत निंबंध स्पर्धेतल्या तिचा क्रमांक कसा हुकला ते रडत रडत आईला सांगायला लागली.  चिनुला तस करताना पाहून चिऊ ताईला हसूच आले.  तसं आईने डोळे मोठे करून चिऊला गप्प केले आणि गोड हसून मायने चिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  


स्पर्धा नेहमी चालूच असतात.  क्रमांक हुकला म्हणून रडण्यापेक्षा तू स्पर्धेत सहभाग घेतलास हीच गोष्ट तुला पुढे यश देणार आहे.  


क्रमांक हुकला म्हणून त्यासाठी आज रडत बसून नाराज होण्यापेक्षा पुन्हा नव्या जोमाने तयार होऊन येणाऱ्या संधीला हसून साद घाल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपण त्यात रंग भरले पाहिजे.


प्रत्येकाच्या बाबतीत छोट्या-मोठ्या गोष्टी कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध होतच असतात.  


त्यातही गंम्मत म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुपित उलगडावं तसं नवीन ज्ञानाचं भांडार खुले होत असते.


म्हणतात ना, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक मार्ग उघडे होत असतात.  फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.


छोट्या छोट्या गोष्टीत रडण्यापेक्षा ऑप्टिमिस्टिक राहण्यात खरं सुख आहे.  त्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.  तरंच खरी मज्जा! 


काय?  पटतंय ना!  


थोडा है, थोडे की जरुरत है|


आईचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून दोघींना नेहमीच खूप छान वाटायचं.   


आपल्या आईला जादू की झप्पी देत चिनू आणि चिऊ दोघींनीही हसून मान डोलावली आणि देवघरातील अगरबत्तीच्या सुंगांधासारखा विचारांतला सुंगंध प्रसन्नतेने सर्वत्र दरवळला.


                                                                - अनुप्रिया सावंत.