Sunday, 6 November 2016

कविता #12 - मनाची सर...

               बऱ्याच दिवसांनी मोकळा वेळ मिळाला मात्र शब्दाला गती मिळत नाहीये.. अक्षरही शब्दांमध्ये गुंफले जात नाहीयेत.. मन शांत आहे तरीही अनेक विचारातून फिरत आहे.. संध्याकाळची मैफिल ताऱ्यांनी सजल्यासारखी नटली आहे.. चांदण्या रात्रीत शाल पांघरल्यासारखे शब्द पहुडले आहेत.. मनाला उसंत मिळाली भावनेला नाही.. शब्दाला जागवायला हवं.. 
    
          मनाची झेप अनेक विचारांत गवसणी घालतंच आहे.. त्यातूनच गवसलेली ही सैरभैर मनाची सर... 

Sunday, 5 June 2016

जागतिक पर्यावरण दिन!!!

     आज ५ जून हा दिवस संपूर्ण विश्वात 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. ५ जून १९७२ रोजी बदलत्या हवामानाविषयी स्टॉकहोम येथे पहिले विचारमंथन करण्यात आले, म्हणूनच त्या दिवसापासून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जाऊ लागला.


     आज आपण पाहतो उष्णता खूप अधिक प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या पावसाळ्या नंतर जसा हिवाळा येईल तसाच पुढील उन्हाळा अधिक उग्र स्वरूप धारण करून येईल. २००५ चा २६ जुलै हा अजूनही प्रत्येकाच्या स्मरणात असेलच. त्याला कारणही पर्यावरणातील असमतोल हाच होता. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, पर्यावरणाचा व वन्यजीवांचा ऱ्हास अश्या विविध गोष्टींमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा महाराक्षस समोर उभा राहिला आहे. 

     सध्याच्याच घटना... डम्पिंग ग्राउंडविषयी आपण सर्वांनी ऐकले तर काही जणांनी प्रत्यक्षात अनुभवले. तिथल्या कचऱ्याचे विघटन होण्याअधिक राजकारणच अधिक झाले. त्याचे परिणाम मात्र भोगावे लागले ते तेथील स्थानिकांना आणि पर्यायांनी आपल्या सर्वांनाच. त्यातून जे वायुप्रदूषण झाले, श्वसनविकार झाले, शारीरिक मानसिक समस्या निर्माण झाल्या ते निराळेच. वास्तविक पाहता प्रत्येक घरात ओला कचरा आणि सुका कचरा अशी वर्गवारी केल्यास डम्पिंग ग्राउंडवर केवळ २० टक्के कचरा जाऊन पडेल. आज मुंबईसारख्या शहरात नऊ हजार टन कचरा गोळा केला जातो. घराघरात जर ह्या सुका आणि ओला कचऱ्याची वर्गवारी केल्यास डम्पिंग ग्राउंडवर पडणारा कचरा केवळ १५०० ते १८०० टन होईल. (रेफेरेंस बाय गुगल सर्च इंजिन) हल्ली रस्त्यावरील ट्रफिक जॅम आणि भरमसाट वाहने ह्यामुळे वायुप्रदूषणात भरच पडत आहे.

     ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साइड ह्यांचे
ही प्रमाण संतुलित नाही. ह्याला कारण झाडांची झालेली कत्तल आणि गळती, ह्याला जबाबदारही मानवच. उन-पावसात आधार देणारे झाडे आज आपल्याला शोधावे लागतात. पण तरीही आजच्या युवा पिढीचे ह्या बाबतचे बदलते मत प्रत्यक्षात दिसत आहे. अनेक ठिकाणी 'वृक्षारोपण' उपक्रम सुरु करण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे कार्यक्रमात देखील आपण बघतो की 'छोटे रोपटे भेट' म्हणून आलेल्या पाहुण्यांना दिले जात आहेत. ही बदलती मानसिकता प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे, आणि त्याहूनही अधिक त्यासाठी प्रत्यक्षातले प्रयास.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावरून त्यांच्या पहिल्याच भाषणात भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नाविषयी आवाहन केले होते.  ते म्हणाले होते की, '१२० कोटी लोकसंख्येच्या देशाने जर स्वच्छतेचा निश्चय केला तर आपला देश अस्वच्छ करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, म्हणून देशाचा कानाकोपरा स्वच्छ करण्याचा निश्चय प्रत्येकाने करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.'
 
     'जागतिक पर्यावरण दिन' ह्या निमित्ताने सर्वांनी मिळून निश्चय करू की, 'पर्यावरणाची हानी होणार नाही, असा एक तरी संकल्प मी करेन.' आणि तो कसोशीने पाळण्याचा आग्रह असेन.  मग त्यात माझा खारीचा वाट हा नक्कीच असणारंच.

     चला तर मग घेऊयात वसा आपल्या वसुंधरेच्या सुंदरतेचा!!!
 
                                                              अनुप्रिया सावंत.
 


मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Thursday, 12 May 2016

डेस्कटॉप - Desktop Information

      फाईल आणि फोल्डर ह्याविषयी जाणून घेण्या आधी आपण आपल्या संगणकाच्या पडद्यावर (डेस्कटॉवर)असणाऱ्या विविध गोष्टींची बेसिक माहिती करून घेऊयात. जेणे करून फाईल आणि फोल्डर बनविताना आपल्याला पूर्वज्ञान होईल.

     आकृतीमध्ये दर्शविलेले चिन्ह आणि त्या चिन्हासमोर असलेली नावे ह्यांची ओळख करून घेऊयात.




     आपण ज्यावेळी संगणक सुरु करतो तेव्हा मूलतः तो ह्या प्रकारे आपल्याला दिसतो. त्यात असेलेले विविध प्रकारचे चिन्ह, चित्रे आणि नावे आपण वाचतो. आणि त्याद्वारे आपण ओळखतो कि अमुक चित्र व त्याचे नाव कशाशी संबंधित आहे आणि त्यात कोणती माहिती असू शकेल. (अर्थात फाईल आणि फोल्डरचा येथे संबंध येतो, तो आपण पुढील सदरात पाहू.) आकृतीत दाखविण्यात आलेले चौकाटातील लाल रंगाचे नावे हे आपल्याला त्या संबंधित आकृतीच्या भागाला  काय म्हणतात? हे दर्शविण्यासाठी देण्यात आलेली आहेत.


डेस्कटॉप - हा भाग म्हणजे संगणकाचा वॉलपेपर होय. जसे आपल्या आधुनिक काळात वापरात असलेल्या मोबाईलवर आपले स्वतःचे किंवा इतर फोटो(चित्र) ठेवतो त्याला आपण त्याचे वॉलपेपर म्हणतो.  हा वॉलपेपर आपण बदलू शकतो.

डेस्कटॉप आयकॉन्स - डेस्कटॉपवर असलेल्या आयकॉन्सना म्हणजे डेस्कटोपवरील भागावर असलेल्या कोणत्याही चिन्हान्कृत भागाला 'डेस्कटॉआयकॉन्स' असे म्हणतात.

माउस पोइंटर - वरील आकृतीत आपण जे बाणासारखे चिन्ह पाहत आहोत त्याला माउस पोइंटर असे म्हंटले जाते.   त्याद्वारे आपण हव्या त्या फाईल किंवा फोल्डरवर चटकन जाऊ शकतो. तसेच हवी असलेली माहिती 'माउस पोइंटर' च्या क्लिकने सहज मिळवू शकतो.

टास्कबार
-
टास्कबार म्हणजे संगणकाच्या खालच्या भागात असलेली आडवी लांब पट्टी (ब्लू रंगाची किंवा वॉलपेपर समावेशक असलेल्या रंगाची) म्हणजे टास्कबार होय.
 क्विक लॉंच - जेव्हा आपल्याला एखादी फाईल किंवा एखादे अप्लिकेशन चटकन ओपन करता यावे ह्यासाठी टास्कबारवर आपण ते अप्लिकेशन किंवा फाईल लॉक करून ठेवतो म्हणजे 'पिन' करून ठेवतो (Pin - Unpin ह्या संगणकीय भाषा) त्या भागाला  'क्विक लॉंच' असे म्हणतात.

नॉटीफिकेशन एरिया - नॉटीफिकेशन एरिया म्हणजे वेळ, तारीख, स्पीकर असल्यास त्याचे चिन्ह, इंटरनेट जोडणी असल्यास त्याची चिन्ह असे वेगवेगळे नॉटीफिकेशन असतात. म्हणजेच टास्कबारच्या उजव्याबाजूला असणाऱ्या चिन्हांना 'नॉटीफिकेशन्स एरिया' असे म्हणतात.  

     डेस्कटॉम्हणजे काय आणि डेस्कटॉवरील विविध भाग ह्यांची बेसिक ओळख आपल्याला झालेली आहे.  आता फाईल आणि फोल्डर बनवण्यासाठी डेस्कटॉचा वापर, जाणून घेऊयात पुढच्या सदरात...

                                                                     अनुप्रिया सावंत.


           मागील लेख                                                  पुढे पहा

Saturday, 27 February 2016

कविता #11 - 'मराठी राजभाषा दिन' - हार्दिक शुभेच्छा!


'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'.

     27 फेब्रुवारी, हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.  कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर - थोर कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून प्रसिद्ध.  त्यांनी 'कुसुमाग्रज' ह्या टोपण नावाने त्यांचे कवितालेखन केले.) यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे.  हा वारसा आपण आणि आपल्या भविष्यातील पिढीने जपला पाहिजे.   आणि तो अखंड सुरू रहावा याच स्फूर्तीने कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस आपण 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करतो.  

मराठीचा छंद
मराठीचा गंध,
लाभला वारसा
भारतीय आमुचा जन्म.

बोलतो मराठी
ऐकतो मराठी,
जाणतो मराठी
अभिमान रुपी.

संतसज्जनांनी प्रत्यक्ष
देव जन्मभूमी लाभली,
सर्व त्यागुनी वीरांनी
मराठी मायभूमी घडविलीं.

अनंत ध्येयसक्तींनी
कवीरूपी माय सजली,
नानाविध अलंकार
भूषवित मराठी अवतरली.

सहज सोपी सुंदर भाषा
घेते हृदयी ठाव मनाशी,
अभिमान आम्हा भारतीयांना
गर्जतो मराठी मी मराठी.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

                                                   - अनुप्रिया सावंत.

Monday, 15 February 2016

कविता #10 - व्हॅलेंटाइन स्पेशल - माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

     दरवेळेस ठरवतो आज तरी तिला आपण बोलू शकू. पण नाही, ह्याही वेळेस मन धजावले.  माहित आहे मला तुलाही मी आवडतो!  पण का तुला हे सांगता येत नाही, कि मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो.  तुही बोलायला तयार नाहीस पण माझे अबोल मन तर तुला कळतेय ना! 
     व्हॅलेंटाइन डे होऊनही प्रेम व्यक्त करता नाही आले...
प्रेम असूनही तुला सांगता नाही आले.  खरं तर प्रेमाचा दिवस ठरवून ते तेव्हाच व्यक्त करतात असे काही नसते, हे जाणतो गं मी.  पण तरीही...
प्रीतीची भाषा, प्रेमाचा अबोल नजराणा
ह्या शब्दरूपी कवितेतून तू
जाणशील का माझ्या भावना?


दोघांच्या प्रेमाचा अबोल नजराणा,
मनाची चलबिचलता प्रीतीचा नजारा,

दिल मे तेरी तस्वीर, धडकन मे तेरी धून
तुझ्याचसाठी मी वेडा कळेल का तुला?

कर्तव्य परायणता, कर्तव्य दक्षता,
प्रेमाची निष्ठा, तुझीच आस्था..
तत्परता आपुली नि मनाची आतुरता,
अबोलं मन माझे कळेल का तुला?

तुझ्यावरच प्रेम, मन सांगायला धजतयं...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

हृदय तुझ्याच प्रेमासाठी आसुसले,
नजर नित्य राही तुझ्याच वाटेला...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

जवळ असतानाही मन तुलाच पाहत रहातं,
लांब असतानाही मन तुझ्याच जवळ असतं..
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

दूर जाताना न वळता सहज निघूनही जातेस...
तुझ्या पाऊल वाटा शोधत नजर फिरत राहते..
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

जे ठाउके मजला ते माहित मलाच...
तुला ते माहित असावे कि नसावे,
ह्या प्रश्नाचीही मनी नाही आस...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

शेवटच्या क्षणी माझ्या तू जवळ असावीस,
डोळे भरुनी पाहत तुला मी तुझ्याच जवळ असावं...
मनाची ही तळमळता, नजरेची ही आतुरता...
माझी तुझ्यावरी प्रीत कळेल का तुला?

                                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 3 February 2016

सेकंडरी स्टोरेज मेमरी

    संगणकाच्या मेमरी साईझविषयी आपण मागील सदरात जाणून घेतले.  आता पाहूयात ह्या मेमरीज कुठे आणि कश्या पद्धतीने साठवल्या जातात.

     आपण बाहेरून एखादी वस्तू आणली की, ती वस्तू तिची जागा बघून त्या ठिकाणी ठेवून देतो.  जर एखादा पदार्थ असेल तर आपण त्या पदार्थाचा आकार बघून त्या साईझच्या डब्यात तो पदार्थ ठेवून देतो.  त्याचप्रमाणे संगणकामध्ये आपण आपला डेटा आपल्या सोयीनुसार आप-आपल्या 'फोल्डर' मध्ये एखादी फाईल बनवून ठेवून देतो.  ह्यालाच 'डेटा स्टोर' करणे असे म्हणतात.  डेटा स्टोर करण्यासाठी आणि ही माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी सेकंडरी मेमरीचा वापर केला जातो.  

आपण पाहूयात ही सेकंडरी स्टोरेज मेमरी म्हणजे काय?

सेकंडरी स्टोरेज मेमरी - सेकंडरी स्टोरेज मेमरीला 'सहाय्यक संग्रह स्मृती' असेही म्हणतात.  या मेमरीतील माहिती कायमस्वरूपी साठवता येते.  या मेमरीत लिहिता येते आणि लिहिलेले पुस्तीही येते. (डिलीट करता येते).  सेकंडरी मेमरीची क्षमता प्रायमरी मेमरीपेक्षा अनेक पटीने जास्त असते.  ह्या मेमरीमध्ये साठवलेली माहिती आपण संगणकाला आज्ञा दिल्याशिवाय संगणक ती नष्ट करीत नाही.  ती आपण केव्हाही वापरू शकतो.  म्हणून या मेमरीला 'परमनंट मेमरी' असे म्हणतात.


ह्या सेकंडरी स्टोरेज मेमरीचे दोन प्रकारात विभागणी केली जाते.

१) नॉन रिमुव्हेबल मिडिया
२) रिमुव्हेबल मिडिया

१) नॉन रिमुव्हेबल मिडिया - कायमस्वरूपी बसवलेल्या स्टोरेज मेमरीला 'नॉन रिमुव्हेबल मिडिया' असे म्हणतात.  हार्ड डिस्क ही नॉन रिमुव्हेबल मिडियाचे उदाहरण आहे.

      ही हार्ड डिस्क सी.पी.यु. केबिनेटमध्ये कायमस्वरूपी बसवलेली असते.  हार्ड डिस्कमध्ये संगणकात 'इंस्टाल (INSTALL) केलेले प्रोग्राम साठवलेले असतात.

२) रिमुव्हेबल मिडिया - जी मेमरी आपण संगणकापासून वेगळी करू शकतो  आणि तिला हवी तिथे नेऊ शकतो, (म्हणजे पोर्टेबल)  तिला  'रिमुव्हेबल मिडिया' असे म्हणतात.  CD , DVD , पोर्टेबल हार्ड डिस्क, पेन डाइव्ह, कार्ड-रीडर हे रिमुव्हेबल मिडियाचे उदाहरण आहेत.  

       ह्या साधनांद्वारे आपण माहिती एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडे पाठवू शकतो.  
      म्हणजेच ज्या साधनांद्वारे आपण संगणकातील माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो ते साधन रिमुव्हेबल मिडिया अंतर्गत येते.

      रोजच नवीन नवीन टेक्नोलॉजी उदयास येत आहेत आणि  दिवसेंदिवस त्यांचा विस्तार हा वाढतच आहे.        
   पुढच्या सदरात आपण जाणून घेऊयात आपल्या बेसिक संगणक शिकण्यासाठीच्या तसेच संगणकात आवश्यक ती माहिती एका ठिकाणी व्यवस्थितरीत्या ठेवण्यासाठी वापरात येणाऱ्या फाईल व फोल्डर ह्याविषयी.

              मागील लेख                                                                              पुढे पहा

Tuesday, 19 January 2016

मनाचे सुख...


      सुख म्हणजे नक्की काय असतं?  जे मनापासून असते ते सुख?  कि जे मानण्यात असते ते सुख?
मनाचे सुख...
    
     आज अगदी सहजच पुस्तकांच्या कपाटात पुस्तके पाहत असताना 'हसत जगावं' हे पुस्तक पहिले आणि म्हंटले जरा वाचून बघावं.  पुस्तकात अनेक छान छान गोष्टी होत्या.  त्यातले 'मनाचे सुख'...  ही गोष्ट वाचत असताना मला जाणवले ते म्हणजे मी काही दिवसांपूर्वी विचार करत असलेली गोष्ट आणि ह्या पुस्तकातून वाचनात आलेली गोष्ट हे बऱ्याच अंशी सारखीच आढळली.  'तुटे वाद संवाद...' ह्या बद्दलच्या माझ्या ब्लॉगच्या एका आर्टिकल बद्दल लिहित असताना माझ्या मनात चालेला संवाद हाच होता... 'मनाचे सुख म्हणजे नक्की काय?'

      आपण कळत नकळत काळाच्या ओघासोबत चालत असताना कुठेतरी वाहत असतो. मनाचे सुख शोधण्यासाठी धडपडत असतो. पण मनाचे सुख ह्या गोष्टीबद्दल मला तरी असे वाटते कि ते आपल्यातच दडलंय. पण आपण आपल्या संकुचित वृत्तीमुळे ते हरवतोय.  लोभ, राग, द्वेष, मत्सर ह्यामुळे आपण आपले सुख गमवतोय.  हातात जे आहे त्याचा आनंद करण्याऐवजी, मी जे नाहीये त्याच्याच पाठी तर धावत नाहीये ना?  नाही नाही... मन हे सैरभैर पळणारेच असते, फुलपाखरासारखे स्वच्छंद जगणारेही असते. पण... फुलपाखरासारखे मुक्त जगताना आपले भान सोडून तर आपण जगत नाहीये ना!  हाही विचार मी करतेय का?  पण.. का करायचा हा विचार?  आयुष्य माझं आहे मला हवं तसं आपण जगू... हल्लीच चित्रपट पाहिला - 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि... मनाने पुन्हा कल्पनेच्या विश्वात रमायला सुरुवात केली.

      तरीही... असा विचार करताना आपण आपल्या आयुष्यात असलेल्या माणसांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या आप्त स्नेहांचा प्रामाणिक विचार करतो का?  हे आणि असे अनेक प्रश्नांनी ह्या छोट्याश्या 'मनाचे सुख' ह्या गोष्टीने  प्रश्नावालींचा काहोर माजवला.  उत्तर माझ्याजवळच होते आणि आहे.  पण त्या उत्तराकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकतोय.  हो! खरच चुकतोय.  का कुणास ठाऊक... आज जाणीव होतेय कि हल्ली सोशल मेडिया मध्ये आपण किती गुंतत आहे.  समाजाचे भान तर दूरच, आपल्याला आपलेही भान नसते.   वेगवेगळे कॅन्डी क्रश सारखे गेम्स खेळण्यात तर आपण आनंद व्यक्त करतोय आणि त्याहीपेक्षा त्या गेम्सचे रिक्वेस्ट दुसऱ्यांना पाठवण्यात आपले मोठे सुखच मानतोय.  खरं तर फारच हास्यास्पद गोष्ट आहे ही.

      स्वतःच्या सुखासाठी मोठ-मोठ्या चैनीच्या वस्तू विकत घेण्यात सुख मानतो.  पण घरात नेमकी गरजेची वस्तू कोणती?  घरातल्यांना आपण सुख देतोय का?   माझ्या जबाबदारीची जाणीव आहे का?  माझे कर्त्यव्य तर मी विसरत नाही ना!  त्यात काही उणीव आहेत का?  समाज... समाजासाठी आपण काही करतोय का?  ह्या पूर्वी होऊन गेलेले आणि अजूनही समाजासाठी झटणारे मदर तेरेसा, बाबा आमटे ह्यांनी समाजाची सेवा करण्यात आपले मोठे सुख मानले आहे.   राष्ट्रासाठी शहीद होणारे वीर राष्ट्रासाठी प्राणाची आहुती देण्यात आणि आपल्याकडून समाजासाठी सेवा घडावी हेच मोठे सुख मानत आहे.  आणि मी?  आपण मात्र त्या शहीदांसाठी श्रद्धांजली तर सोडा, त्यांच्या स्मृतीही विसरून जातोय. 
     स्वतःसाठी संकुचित विचार करणारी माणसे सुख कधीच मिळवू शकत नाही.  वरून जरी आपल्याला अशी माणसे आनंदी दिसले, तरी आतल्या-आत आपण काहीच करू शकलो नाही ह्याची जाणीव त्यांनी कधी ना कधी नक्कीच होत असते.  ह्या गोष्टीचा परामर्श घेताना त्यात अनेक गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या.  कवी कुसुमाग्रज म्हणतात... आपण धरणे बांधली, इमारती बांधल्या, कारखाने बांधले; पण मन? मन बांधायचे आपण विसरून गेलो.  खरंच... मन बांधणं आपण विसरून गेलो.   घडाळ्याच्या काट्यावर चालणारी माणसं आपण आजकाल मनाचे सुखच विसरून गेलो.  जे करतोय त्यात सुख शोधण्याचा आनंदच आपण हरवून बसलोय.

      माझे 'DAD' आणि 'मित्र' ह्या दोन्ही भूमिकेत असणारे डॉक्टर अनिरुद्ध जोशी ह्यांचे एक वाक्य मनाला अगदी जवळून स्पर्श करते, ते म्हणजे...
                       'छोटी बात को हम छोटी क्यो नही रख सकते?'

       उगाचच छोट्या गोष्टींचा आपण बाऊ करतो आणि स्वतः सोबत दुसऱ्यांनाही त्रास देतो.  जे आहे त्यात सुख शोधण्याऐवजी जे नाही ते मिळविण्यासाठी अट्टाहास करतो.  आपण विसरून जातो.. अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जवळ आहेत ज्यात सुख दडलंय... आणि सुख मिळवण्याच्या नादात आपण ते साजरा करायलाच विसरतोय.  
हो ना?
                                           
                                                                                   अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Friday, 1 January 2016

कविता #9 - नवीन वर्षाच्या शुभेच्छा! - Welcome 2016



नवीन वर्ष नवीन दिवस
नवीन स्वप्न नवीन संकल्पना,
नवी दिशा नवा ध्यास
असावा नित्य पुन्हा खास.


                  गेले दिवस उरल्या आठवणी
                  काही आवडी काही नावडी,
                  जुनी नाती नव्याने उलगडावी
                  प्रेम पावित्र्यात जपून ठेवावी.


नको सारे हेवेदावे
नको मागचे काही,

प्रेम रुपी सारे हवे
फुलाचे फुलणे नव्याने असावे.

                   राग मत्सर द्वेष
                 नसावा मनी लोभ,
                 विसरुनी हे सारे त्वेष
                 धरुनी संकल्परुपी प्रेम.

संकल्पनेचा नको नुसता
आरंभशूर फक्त आता,
नित्य स्वरूप पूर्ण रुपी
करुनी घे निश्चित 'संकल्प' आता.


                    करूया स्वागत नवं वर्षाचे
                  वाढवूनी रोपटे संकल्प बीजाचे,
                  धरुनी कास ध्येयाची
                  उंच आकाशात झेपावण्याची.

 
नवीन वर्षाच्या सर्वांना अनिरुद्धमय शुभेच्छा!
जय जगदंब जय दुर्गे.


                                               - अनुप्रिया सावंत.

Thursday, 31 December 2015

कविता #8 - कविवर्य - मंगेश पाडगावकर


पावसाच्या सरी बरसाव्यात
तश्या शब्दांच्या बरसणाऱ्या सरीत
ओलचिंब भिजवणारे... मंगेश पाडगावकर

हवेचा गारवा स्पर्शून
प्रेमाचे बंध हळुवार
कवितेतून जोडणारे... मंगेश पाडगावकर

समुद्र आणि आकाशाचे मिलन
ज्या शब्द रचनेतून घडवावे
ते रचनाकार... मंगेश पाडगावकर

मुलांच्या बालमनाला
आनंदित करून
डोलायला लावणारे बालगीत
ते गीत... मंगेश पाडगावकर

प्रेम युगुलांना कवितेतून
ऋणानुबंधात जोडणारे
ऋणानुबंध... मंगेश पाडगावकर

मराठी संस्कृतीत तुरा
मानाचा रोवणारे
महाराष्ट्र गौरव... मंगेश पाडगावकर

भातुकलीच्या खेळामधल्या
राजा राणीला एकत्र आणणारे
शब्दरूपी घर... मंगेश पाडगावकर

निसर्गाशी संवाद साधताना
हळूच लेखणीच्या कुशीत
विसावणारे लेखक... मंगेश पाडगावकर

कवी मनाला
तेवत ठेवून
सतत प्रेरणा देणारे
प्रेरणास्रोत... मंगेश पाडगावकर

चांदण्यासंगे अंतरंगी
ओसंडून वाहणारे
नक्षत्रांचे देणे
ते नक्षत्र... मंगेश पाडगावकर

'माझे जीवन गाणे'
संपूर्ण जीवन प्रवास
सोप्या शब्दांसह मांडून
घेतला जगाचा निरोप
स्वर्गीय कविवर्य... मंगेश पाडगावकर

तुझेच कविमन तुलाच अर्पुनी
वाहतो आदरांजली
पुन्हा यावे या मायभूमी
जीवन गाणे रुपी.


                           - अनुप्रिया सावंत.

Sunday, 27 December 2015

प्रत्यक्ष - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त




प्रत्यक्ष - १० वा वर्धापनदिन विशेषांक - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त

     'प्रत्यक्ष' ह्या दैनिक वृत्रपत्रास २०१५ च्या दत्तजयंतीच्या शुभमुहर्तावर १० वर्षे पूर्ण झाली. दर दिवशीच्या दैनिक वृत्तांसोबत प्रती वर्षी विशेष लेख असणाऱ्या प्रत्यक्षाची नवीन नवीन संकल्पना काळाच्या बरोबरीने असते. वास्तव्याची ओळख अगदी जवळून करून देणारा प्रत्यक्ष हा एकमेव असा दैनिक आहे, जो इतर राजकीय आणि बिगर राजकीय दैनिकापेक्षा अनेक पटीने वेगळा आहे.

     लहान मुलांच्या बुद्धीला चालना व मनोरंजन देण्यापासून ते अगदी तरुणांपासून थेट ज्येष्ठ लोकांपर्यंत उपयुक्त असे हे वृत्तपत्र आहे. जगातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा इत्यंभूत खबरी ह्यात असतातच.

     यंदाच्या ह्या विशेषांकामध्ये  मानवाचे जीवन ते अगदी रहस्यमय आदिवासींच्या जीवनातील वात्सव्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असलेल्या उलाढाली, नैसर्गिक आपत्तीचा तिढा, गोल्डन ट्रेनचे भुयार, अण्वस्राहून भयंकर 'अमली पदार्थ', तियांजीन स्फोट, नेपाळचा धरणीकंप, अमानवी व्यापार, 'मोबाईल बँकिंग' घोटाळे, The Catacombs of Paris ( रहस्यमय ठिकाण), नाझ्का लाईन्स(पेरू) - रहस्यमय ठिकाण, विलक्षण जीवसृष्टी, ट्यूब ट्रान्सपोर्ट ह्या आणि अश्या अनेक विषयांवर सखोल माहिती देणारे, जाणीव करून देणारे व वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला लावणारे विषय आहेत. त्यांची ओळख 
वाचताना आपल्याला प्रत्याक्षामुळे प्रत्यक्ष होत आहे.

     तसेच जॉर्जिया नेशनल अक्वेरिअम, वाळवंटातले मत्सालय, ट्रोपिकल आयलंड रिझोर्ट (जर्मनी) ह्या मानवनिर्मित सौंदर्याची ओळखही ह्यातून होते. फक्त एवढेच न्हवे, तर रोजच्या घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा, उलाढाली ह्यांची वास्तव्यातील घटना कळते. आजच्या जलद युगात अपडेट राहता यावे म्हणून मागच्याच वर्षी 'प्रत्यक्ष'
नववर्ष विशेषांक मार्फत 'सोशल मेडिया इश्यू' अंतर्गत ब्लॉग बनवणे, फेसबुक हाताळणे यांचे अतिशय बारकाईने मुद्दे मांडून तसेच ते सर्वांसाठी उपयुक्त व्हावे, प्रत्यक्षात वापरता यावे अश्या सुयोग्य रचनेत सादर केले होते. ह्याही वर्षी नवीन विषय आणि नवीन भेट ह्या संकल्पनेतून सोशल मेडिया दुनियेतील सफर विस्तृतरित्या पुन्हा एकदा घडवली आहे ती - ई-कॉमर्स आणि पेमेंट्स ह्या विषयाच्या सादरीकरणातून.

     वरील गोष्टी वाचत असतानाच लक्षात येते कि, "विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त" ह्या प्रत्याक्षाच्या वर्धापन विशेषांकातून अनेक गोष्टी ज्या आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला, पर्यायी आपल्या विश्वात घडत आहेत, त्यांची जाणीव होते. इंटरनेटच्या दुनियेत फेसबुक, ट्विटर ह्या सारख्या माध्यमातून जगाशी आपण जसे जोडले जात आहोत, तसेच 'प्रत्यक्ष'च्या माध्यमातून डॉक्टर अनिरुद्ध जोशी आपल्याला
काळासोबत चालायला खर तर चालवायलाच शिकवत आहेत.  ह्या वर्षीच्या विशेषांकमध्ये समाविष्ट केलेल्या गोष्टी जेवढ्या भयावह आणि महत्वाच्या आहेत, तेवढ्याच त्या जनमानसात वास्तव्याची कानउघडणी करणारे आहेत. ह्यातून जगातील घडामोडींच्या बाबतीत स्वतःचे व आपल्या आप्तीयांचे संरक्षण करत मानवाने कसे सतर्क राहायला हवे, ह्याची वारंवार प्रचीती येते.

     'दैनिक प्रत्यक्ष' हा आजच्या जीवनाला आणि वास्तविक घडामोडीला साजेशा असा असून त्याचे नियमित वाचन व्यक्तीला वेगळा दृष्टीकोन देते. इतकेच नाही तर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात, स्वतःला ह्या धावत्या जगात सतर्क, अपडेट ठेवण्यास मोलाची कामगिरी बजावतो. प्रत्येकाने वाचावे असे हे दैनिक प्रत्यक्ष नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर जगाला माहिती देऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतोच, पण त्याच बरोबर वाचकांना नेहमीच 'वेगळ' देऊन वास्तव्यातील घटनांच्या शैलींचा छटा बारकाईने पाहण्यास शिकवतो आणि हेच प्रत्यक्षचे वैशिष्ट्य आहे.

    आध्यात्मिक ते वैज्ञानिक ह्यांची उत्तम जोड 'प्रत्यक्ष'मध्ये वेगवेगळ्या स्वरुपात पहायला मिळते. 'प्रत्यक्ष' हा 'आपला मित्र' आहे. काळासोबत चालायचे असेल तर प्रत्यक्षची(आपल्या
प्रत्यक्ष मित्राची) साथ ही हवीच. 
     
     हीच माहिती हिंदीमधून 'प्रत्यक्ष मित्र''अंबज्ञ' प्रत्यक्ष मधूनही मिळते.  
http://www.pratyaksha-mitra.com/ 
     ह्या वेबसाईटला भेट देणाऱ्या प्रत्येकाला ह्या 'प्रत्यक्ष' चे महत्व आजच्या घडीला प्रत्यक्षात किती महत्वाचे आहे? ह्याची जाणीव आपसूकच होते.  आजच्या जगातील ह्या भीषण वास्तव्याला सामोरे जाण्यासाठी, चला तर मग चालूयात 'प्रत्यक्ष' सोबत...
                                                                
                                                                   अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Sunday, 13 December 2015

'आपले आरोग्य' - 'आरोग्यम सुखसंपदा'

     आपल्या प्रत्येकाला वाटते आपण हेल्दी असावे. आपण मस्त सुदृढ दिसावे. मग आपण त्यासाठी निरनिराळे प्रयोग स्वतःवर करून पाहतो. अर्थात मीही पाहिलेच होते! पण हे निरनिराळे प्रयत्न डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेतल्यामुळे आणि तसेच सतत आपल्या मनाप्रमाणे रिझल्ट न मिळाल्यामुळे आपण कसलाही योग्य विचार न करता डॉक्टरही बदलतो. आरोग्याबाबत सगळ्यांच्याच मनात काळजी ही साहजिकच असते. पण त्या काळजीला योग्य मार्ग आणि योग्य सल्ल्याची आवश्यकताही असतेच. आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शकही. नाही का?

      १३ डिसेंबर २०१४, शहाजी राजे क्रीडा संकुल, अंधेरी येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी(एम. डी.) ह्यांचे 'आपले आरोग्य' ह्या विषयावर केलेले उचित आणि अत्यंत उपयोगी असणारे असे बहुपयोगी मार्गदर्शन मिळाले. उत्तम आरोग्य कसे असावे? आणि त्यासाठी आपल्या सवयी आपण हळू हळू का होईना, कसे उत्तम प्रकारे बदलून स्वतः मध्ये उत्तम बदल कसे घडवून आणू शकतो? हे त्यावेळी मनोमन पटले. आणि नुसते पटलेच नाही तर त्यानुसार प्रयासही सुरु झाले. आज १३ डिसेंबर, २०१५ म्हणजे एक वर्षातच डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाने शरीरातील व मनातील उचित बदल मी स्वतः आणि माझ्यासह माझे कुटुंबही अनुभवत आहे.

      मला केव्हाच सकाळी उठल्यावर ब्रेक फास्ट करणे आवडत नसायचे. त्यामुळे सकाळचा नाश्ता करायची मला सवयच न्हवती. फक्त चहा घेतला की माझी सकाळ सुरु. हेल्थ विषयीच्या मार्गदर्शन करत असताना त्या सकाळच्या नाश्ताविषयीच्या मार्गदर्शनात डॉ. अनिरुद्ध(बापू) ह्यांनी सकाळच्या नाश्त्याचे महत्व कसे आणि काय असते हे पटवून दिले. रात्री झोपल्या नंतरच्या काळापासून ते सकाळी उठे पर्यंतच्या काळात आपल्या पोटी काहीच नसते. त्यामुळे अश्या रिकाम्या पोटी आपण चहा घेतल्यावर आपल्या शरीराला ते हानिकारक असते. सकाळी नाश्ता केल्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी उर्जा तर मिळतेच परंतु त्यामुळे आपल्यात उत्साह राहतो. त्यामुळे आता सकाळी उठल्यावर नुसता चहा घेण्याची सवय बंद होऊन त्यासोबत काही ना काही खाणे असतेच. कधी इडली, कधी ढोकला, कधी ब्रेड बटर कधी आणखी काही ज्यात लेस ऑइल असेल.

     लेस ओइल (कमी तेल) ह्यामुळे तर आणखी एक गोष्ट फार उत्तम घडली. ती म्हणजे, मला जेवणात तेल भरपूर टाकण्याची सवय होती. त्यामुळे प्रश्न पडायचा कि भाजीत तेल आहे कि तेलात भाजी! इथेही त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझे लेस ओइल ही संकल्पना उत्तम जोर घेत आहे. फिश फ्राय करताना डीप फ्राय करण्यासाठी लागणारे भारंभार तेल वापरणे खूपच कमी झाले. माझ्या जेवणात तेल आहे कि नाही हे घरच्यांना कळत तर नाहीच! परंतु जेवणाची चव जराही न बदलता ते जेवण आता घरचे अधिक चवीने खाऊ लागले आहेत. कारण नको असलेले अतिरिक्त तेल शरीरात जाण्यापासून सगळ्यांची सुटका तर झालीच आहे आणि त्याहीपेक्षा आता वजनही न वाढता शरीर सुदृढ दिसत आहे. एकंदरीत हा बदल सर्वांनीच अनुभवला आणि तो प्रत्येकाला आवडला.

     घरात सततचा चहा प्यायला लागणारी मी, आता चहाचे प्रमाण पहिल्यापेक्षा बरेच कमी झाले आहे. त्याहीपेक्षा चहामध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थात जिथे साखर लागते, ते आता बाद होऊन त्याची जागा Dextrose ने घेतली आहे. ह्यामुळे साखर पूर्णपणे बंद होऊन वजनही अटोक्यात आहे.

     डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांच्या 'आपले आरोग्य' ह्या मार्गदर्शनामुळे शरीरात आणि मनात जो अवर्णनीय बदल झाला आहे तो मी आणि माझ्या घरचे आम्ही सगळेच अनुभवत आहोत. आणि आम्ही ते एन्जोय करत आहोत. Yes! I Am Healthy. त्यांनी सांगितलेल्या अजूनही बऱ्याच गोष्टी अधिकाधिक जाणून घेऊन आणि त्या अमलात आणून हेल्दी राहण्याचा प्रयास आम्ही सर्वच करीत आहोत. 

 
'आरोग्यम सुखसंपदा' -  http://www.aarogyamsukhsampada.com/ 
  
     ह्या वेब साईट मार्फत अधिक मदत होत आहे.  आरोग्यविषयक उचित आणि निश्चित जाणून घेण्याविषयी डॉक्टर अनिरुद्ध (बापू) जोशी ह्यांनी केलेले मार्गदर्शन हे आयुष्याला नक्कीच 'आरोग्यम सुखसंपदा' असे करणारे आहे. सुंदर आयुष्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने असलेले असे हे मार्गदर्शन तुम्हीही नक्कीच अनुभवून पहा.


                                                         अनुप्रिया सावंत.


मागील कथा वाचा                                              पुढील कथा वाचा 

Wednesday, 30 September 2015

ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल...

आमची मैत्री म्हणजे धम्माल.
सुखात पार्टी घेऊन लुटणारा,
दुखात खांदा देऊन शांत करणारा.
मस्तीमध्ये त्रास देणारा,
लाडाने दुसर्याच नावाने चिडवणारा.
आणि कधी 'ती' दिसली तर...
तर त्याच नावाने चिडवणारा.

चहाची कटिंग आपल्याच खिशातून घेणारा,
हाक मारताना दोन तरी शिव्या घालणारा.
दिसला कुठेही तर हात मिळवून विचारपूस करणारा,
पोरींसमोर मात्र शिव्या देऊन शाईनिंग मारणारा.

कुठचाही प्रवास असो, भन्नाट मज्जा करणारा.
गाण्यांच्या भेंड्या घेत गाण्यांमधून चिडवणारा.
आपण चिडलो कि अजूनच चिडवणारा.
आपण साथ दिली कि (डफली अजून जोरात वाजवणारा) मनोमन सुखावणारा.

नाचा रे करून, कधी बाला डान्स तर कधी...
नागीण डान्स करायला लावून स्वता:ही डुलणारा.
कोणी डान्स करायला नाही बोलला म्हणून...
सूट म्हणून... अक्टिंग करायला लावणारा.

त्याच्या अक्टिंगमध्ये स्वता:च सहभाग घेऊन साथ देणारा.
तरी... ह्यातलेही करायला कोणी ना केलेच, तर.....
तर काय!  गपचूप एकमेकांना खुणवून
टपली, बुक्क्यांची जोरदार तयारी करणारा.

द्या रे ह्याला टपली करून हाणणारे.
लागला का रे तुला कुठे करून 
प्रेमाने दोन शिव्या देऊन जवळ घेणारे.

ह्यात प्रेम असते, आपुलकीची भावना असते.
मैत्रीचा विश्वास असतो, घट्ट मैत्रीची साद असते.

कोण कोणाच्या शिव्या खाईल? 
कोण कोणासाठी उगीचच पनिशमेंट स्वीकारेल?
हीच तर मैत्रीची बात असते,
आपुलकीची जाण असते.
ह्यातच आपली मैत्री खास असते.

नागीण डान्स काय, बाला डान्स काय,
हातावरच खोटं खोटं गिटार घेऊन वाजवणं काय?
सगळं फक्त मित्रांच्या धम्मालसाठी, 
मित्रांच्या एका दिलखुश स्माईलसाठी.

हा खरा मैत्रीचा खटाटोप असतो.
जाणीव असते ह्याची आपल्या दोस्तांनाही,
म्हणून तर त्याचं असतं हक्काने सांगणं.

मैत्री ही मित्रत्वाची जाण असते,
शिव्या घातल्या काय नि रागावलं काय?
गरजेच्या वेळेला धावणारे पाय असते.
संकटातून खेचून काढणारे हाथ असते.
परमेश्वराने दिलेली मैत्रीची देणगीच खास असते.

सारांच्या नशिबी असा दोस्ताना नसतो,
ज्यांच्याकडे असते त्यांना ह्याची जाणीव असते.
कारण ज्यांच्याकडे नसते त्यांना हा टवाळेपण भासतो.

म्हणूनच... कितीही शिव्या खाल्ल्या काय,
कितीही टपल्या पडल्या काय,
नि कोणी कसाही डान्स सांगितला काय!
सगळ काही एक कुटुंब आणि 
कुटुंबातली मेजवानीच असते.
आपल्याकडून आपल्यासाठीच असणारी 
आपल्या मैत्रीची शान असते.

ही शान... हा धागा... आयुष्यात जसा गुंफावा, 
तसा तो अधिकाधिक घट्ट होत जातो.
परमेश्वराने आयुष्या सोबत दिलेली,
अनमोल भेटवस्तूपैकी 'मैत्री' ही त्यातलीच असते.
म्हणूनच आमची मैत्री, आमचा दोस्ताना हा आमचा आहे,
आणि तो आमचा 'खास' आहे,

आम्ही वाजवतो, 
आम्ही नाचतो, 
आम्ही धम्माल करतो.
आमच्या DAD ला आवडते म्हणून.
                                                      - अनुप्रिया आदित्य सावंत.
                                        :D :D :D :D :D
                                                          (ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल)

ढोल ताशाच्या गजरात...


ना कोणता डिप्लोमा,
ना कोणती डिग्री,
इथे फक्त आणि फक्त 'प्रेम आणि भक्ती'.

बापुची ती एक झलक,
बहार येते सर्वांगांना.

कलेच्या सादेने भिनते,
अनिरुद्ध प्रेम नसनसांतुनी.

ढोल नि ताशा ही नाही नुसती कला,
त्या कलेत आहे अनिरुद्ध प्रेमाची नशा.

ढोल ताशाच्या आवाजात,
आमच्या बाप्पाचे आगमन होता क्षणीच...
बाप्पाचा चेहरा खुले, आनंदाने नाचे.
आमची कला पाहुनी,
बापू आमचा मनोमन सुखावे.

हाच उत्साह, हेच प्रेम,
आम्हाला पदोपदी घडविते.
अनिरुद्ध प्रेमाने,
अनिरुद्धमय होऊनी जाते.

तयार आहोत आम्ही,
पुन्हा त्याच जल्लोषात.
"आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या 'DAD' ला आवडते म्हणून".

                        - अनुप्रिया आदित्य सावंत.

Wednesday, 9 September 2015

एक सुजाण नागरिक म्हणून...


    आपली मुले शाळेत जाताना कशी जातात?  कोणत्या मुलांसोबत जातात?  त्यांचे मित्र कोण?  ह्या बाबत पालकांनी जागृत राहणं अत्यावश्यक आहे.  रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांना हात दाखवत लिफ्ट मागणे ही शाळेतल्या मुलांची रोजच्या पाहण्यातली गंभीर आणि चिंतेची बाब आहे.  


     शाळेत जायला उशीर म्हणून असो कि मज्जा मस्ती.  सर्रास रस्त्यावर गाड्यांना हात दाखवत लिफ्ट मागतात.  त्यांच्यातल्या बऱ्याच मुलांना लिफ्ट मिळतेही.  लिफ्ट देणारे जास्तीत जास्त बाईक स्वारच असतात.  मुलं सहज त्यांच्याबरोबर निघून जातात.  पण कुठल्याही बाबतीतला विचार न करता त्यांच्याबरोबर निघून जाणे, ही खरी तर त्यांची अल्लड बुद्धी म्हणायची कि आणखी काही.  जे त्या मुलांना लिफ्ट देतात ते माणुसकी म्हणून असो कि भावनिक असो, हे त्यांनीही थांबवायलाच हवे.  कारण त्यांच्या तसे करण्याने मुलांच्या चुकीच्या प्रवृत्तींना कळत-नकळत बळ मिळते.



     बऱ्याच वेळा आपण पेपर मध्ये मुलांच्या अपहरनाबद्दल वाचतो.  पण त्याचा गंभीरतेने ना मूले विचार करत ना पालक.  आपली मूले शाळेत जाताना खरच असा प्रकार करत असतील तर!  ह्या गोष्टीचा विचार फक्त पालक आणि मुलांनीच करावा असेही नाही.  तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात आणून देऊन त्यास आळा घालावयास हवा. पालकांनीही स्वतः वेळीच सावध होऊन मुलांनाही ह्याबाबतची जाणीव करून देणे आवश्यक आहे.



     खरं तर प्रत्येक वेळी पालक आणि शिक्षक आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकतील असेही नाही.  पण तरीही शक्य तितकं सर्वांनीच ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून आपल्या मुलांना ह्या गोष्टीची जाणीव करून देऊन त्यांनाही त्यांच्या स्वतःसाठी तसेच त्यांच्या वर्गमित्रांच्या सुरक्षीततेसाठी चुकीच्या गोष्टींना आळा घालायला शिकवायलाच हवे.



     एक सुजाण नागरिक म्हणून हे आपले कर्तव्यही आहे आणि आपली नैतिक जबाबदारीही आहे.


                                                                                                               अनुप्रिया आदित्य सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

Friday, 4 September 2015

कविता #7 - मन म्हणजे...

मन म्हणजे वाऱ्याची झुळूक,
झोक्यासारखी झुलत झुलत उंच आकाशाला भिडणारी.

मन म्हणजे पक्ष्यांचे पंख,
हवे तसे आकाशाला गवसणी घालणारे.

मन म्हणजे एक वेडी आशा,
मनाला सैरभैर करणारी लहर.

मन म्हणजे पाण्यावरचा तरंग,
तरंगातून उसळणाऱ्या उंच उंच लाटा.

मन म्हणजे समुद्र सारखी असणारी भरती ओहोटी,
सुखं-दुःखाचे तरंग, तर कधी लाटांवर स्वैर होत मुक्त संचार करणारे.

मन म्हणजे समुद्रातील शंख-शिंपल्यांची झालर,
कधी मोत्यांत गुंतून जाईल हे न सांगता येणारं.

मन म्हणजे संसारातील भांडी-कुंडी,
जितके धुवून पुसू तितके ते नवं-कोरं.

मन म्हणजे भिंतीतील नाजूक शिल्पकाम,
विचारांच्या माळेत गुंतलेले पण तरीही ठाम.

मन म्हणजे चांदण्या रात्रीचे तारे,
काजवा सारखा चमकणारा प्रकाश,
आठवणींना जागवणारा, लहरींच्या धुंधीत डोलणारा,
फुलांच्या माळेसारखा गुंफणारा, चांदण्यांसारखे हसणारा.

ज्वालामुखीसारखा तळमळणारा,
तर क्षणात मोहाच्या क्षणाला भुलणारा,
कित्येकदा चुकणारा,
तरी स्वतःच स्वतःला सावरणार असं वेडंवाकडं हे आपलच मन.

मन म्हणजे जीवनाचे रहस्यं,
कितीही उलगडा झाला, तरी आयुष्याचा कोडं न सुटणार.
असं हे मन, असं हे आपलच मन.

                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday, 2 September 2015

आठवणीतले क्षण - ढोल प्रक्टिस - दादर ते कर्जत प्रवास...

चला संडे आला, तयारीला लागा.
प्याटर्न लक्षात आहे ना सगळ्यांच्या,
येताना ढोलचा अडीओ ऐकून या रे...
आणि सगळ्यांनी वेळेवर या.

अरे मला सकाळी कॉल कर हा!
तू आधी सकाळचा अलार्म लाव.
भावा, साहेब येणारे काय?
रात्री कोण कोण गेलंय आधीच?
तो तर रात्रीच पोचतो रे... १०० टक्के हजेरी आहे त्याची.
भाई ट्रेन कितीची पकडणार आहेस?
अरे फोन वाजल्यावर उचला रे... झोपू नका फोन बंद करून!
जाताना एकत्र जाऊयात हा!.. .दादरला भेटा.
अरे मेट्रो चालू झाली रे... घाटकोपरला भेटा सगळ्यांनी.

(रात्रीची २:३० वाजता कोठुंबेहून फोन.....)
अरे मित्रा झोपलास का?
सकाळी उठायचय ना लवकर... झोप आता वाजले बघ किती....

(समोरचा फुल झोपेत असताना पुन्हा ३:३० ला तोच फोन....)
काय करतोय रे? झोप नाही येतंय का? अजून झोपला नाहीस?
सकाळी लवकर ये प्रक्टिस करायचीय ढोलची, जरा आता झोप काढ मस्त.
(झोपेची पूर्ण वाट.....)

(सकाळी सगळे गडबडून उठत...)
अरेच्या... वाजले किती? अरे अलार्म वाजलाच नाही? (अलार्म लावलाच नाही)
माझा कॉल वाजून गेला, आता काही खैर नाही.
१० मिनटात ट्रेन सुटेल, चल आंघोळ राहू देत.
अरे आहे तसाच ये बाबा... आम्ही थांबतो पुढे.
तू ये रे निवांत... एक काम कर तिथे जेवायलाच ये ना....
भाई तू येउच नको रे, आज आराम कर घरपे.

(ट्रेन पकडताना....)
अरे तू कुठे आहेस, माझी ट्रेन समोरून गेली रे,
पाठून कोणी येतंय का सोबतीला,
 अरे त्याला कॉल करा, झोपला असेल अजून.
नाही... त्याला आदल्यादिवशीच उचलतात सोबत.
अरे मग कोणी पाठून येतंय का?
तुम्ही अजून झोपा काढा ना ट्रेन आपल्याच आहेत.

(नेरळला उतरल्यावर...)
तू ह्याच ट्रेन मध्ये?
अरे तो पण असेल इथेच बघा त्याला पण...
दोस्त, तू आया...
अरे सब एकही ट्रेन मे???
क्या बात क्या बात, इसे केहते हे याराना....
शाब्बास दोस्ता शाब्बास....

(टमटमचा प्रवास...)
अहो काका घ्या ना एवढेच पैसे असं काय करताय....
आम्ही एवढे जण आहोत सगळ्यांना घ्या एकत्र...
अरे तू दुसरा बघ तो कमी घेतोय का....
या रे इकडे भेटली गाडी.
कसं बसणार एवढे?
अरे ह्याला ढकला रे आत...
आधी ह्या जाड्याला आत पाठवा...
हा बघ! हा बघ... हा बारीक आहे बसवा बारक्यांना आधी.
ए... सरक रे आत.

(गाडी फुल....)
झाली का रे जागा...
कसं वाटतंय... सरक रे जरा...
अरे यहापे जगह देख कितना हे, आरामसे बैठा हे ये तो...
अरे अभंग चालू करा....
अरे हा झोपला गाडीत द्या एक एक...

(टपल्यांचा आवाज.... जणू काही टम टम वाल्या काकांना टाळ्या वाजल्याचा भास.)
:D :D :D :D :D
                                               - अनुप्रिया आदित्य सावंत.